fbpx
सामाजिक

मेंदूतली नग्नता

सध्या देशासमोर महागाई, गरिबी, बेरोजगारी, अन्न, शिक्षण हे प्रश्न नसून बॉलिवूड कलाकार रणवीर सिंगचे‘बम’ (कुल्ले) हा राष्ट्रीय विषय झाला आहे. त्याने केलेल्या न्यूड फोटो मॉडेलिंगमुळे त्याच्याविरोधात पोलीसतक्रारी झाल्या आणि तक्रार करणाऱ्याने हा राष्ट्रीय मुद्दा असल्याचं जाहीर करत त्याचा निषेध व्यक्त केला. आताअशा मोठ्या मोठ्या समस्या भारतासमोर अनेकदा उभ्या राहतात. एखादी मॉडेल, बॉलिवूड कलाकार मध्येचकामधाम सोडून पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण करत नग्नं फोटो-व्हिडिओ काढतात आणि भारताची संस्कृतीधोक्यात येते. त्याने आमच्या पोरो-बाळांच्या मनावर भयंकर परिणाम होतो. आपण खरं तर या संस्कृती रक्षकांचेआभारी मानायला हवेत. त्यांच्याचमुळे भारताची संस्कृती टिकून आहे आणि पाश्चिमात्य प्रचाराला बळीपडलेल्यांवर थोडा तरी वचक आहे.

केवळ बॉलिवूडच नव्हे तर चित्रकार, लेखक, कवी यांच्यावरही मध्ये मध्ये असे आरोप होतच असतात. कुणाच्यापुस्तकांवर बंदी येते तर कुणाच्या चित्रांवर. जानेवारी महिन्यामध्ये अशाच पद्धतीने पुण्यात आयोजित अक्षय माळीयांचे फोटोचं प्रदर्शन नग्नतेच्या आरोपाखाली थांबवण्यात आलं होतं. अकबर पद्मसी यांचं १९५४ मधलं दलव्हर्स चित्रावर असाच आक्षेप घेण्यात आला, नृत्यांगना प्रोतिमा बेदी यांनी जुहू बीचवर १९७४ मध्ये विवस्त्रचालल्याने मोठा वाद झाला, मॉडेल मिलिंद सोमण आणि मधु सप्रे यांनी १९९५ मध्ये एका जाहिरातीसाठी विवस्त्रफोटो काढल्याने भारतीय संस्कृती बुडाली होती, एमएस हुसेन यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराला भारतमातेचंनग्न चित्र काढल्याने माफी मागावी लागली होती. त्यांना तर देशातूनच सळोकीपळो करून सोडलं होतं. नाटककारविजय तेंडुलकरांसारखा मोठा लेखकही या नैतिकतेच्या आरोपातून सुटला नव्हता. संघराम बाइंडर या त्यांच्यानाटकावर अश्लीलतेचा आरोप झाला होता. गेल्याच आठवड्यात बुकर हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळवणाऱ्या लेखिकागीतांजली श्री यांनी शंकर-पार्वतीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत त्यांचा कार्यक्रमच रद्द करण्यातआला. ही काही मोठी उदाहरणं झाली. पण लहान, फारशा प्रसिद्धी झोतात नसलेल्या कलाकारांनाही अशाचप्रकारे मानहानी, दबाव, पोलीस केसेस सहन कराव्या लागतात.

अभिनेते रणवीर सिंह वर न्यूड फोटोशूट साठी चेबूर पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली
अभिनेते रणवीर सिंह वर न्यूड फोटोशूट साठी चेबूर पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली

मूळात ज्या भारतीय संस्कृतीच्या नावाने गळे काढले जातात ती संस्कृती नक्की आहे काय आणि कोण ती पाळतं? शिवलिंगाची पूजा करणाऱ्या या देशामध्ये नागड्याने फोटो काढले तर नक्की  कोणती संस्कृती भ्रष्ट होते? प्रजननाचे प्रतीक असलेल्या योनी दाखवणाऱ्या आदिमातांच्या अनेक मूर्तींची मूल होण्यासाठी आजही साग्रसंगीतपूजा होते. अजिंठा, खजुराहो अशा इथल्या अनेक मूर्ती या नग्नं, अर्धनग्नं, मैथून करताना आहेत याची पुन्हा पुन्हाआठवण करून द्यायची वेळ का येते? कृष्ण अंघोळीला नदीम उतरलेल्या गोपिकांचे कपडे पळवायच तर त्याचंकोण कौतुक पुराण कथांमध्ये केलं जातं. स्त्री-पुरुषांच्या शरिरांची रसाळ वर्णनं ही अनेक हिंदू प्राचीन पुस्तकांमध्येसापडतील. शाक्त पंथातील तंत्र साधनेमध्ये मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथून या पाच घटकांनी युक्त देवीचीउपासना केली जाते. त्याशिवाय ती पूर्ण होत नाही, असं मानलं जातं. मानवी देहाचं रहस्य समजून घेतल्यानेचविश्वाचे रहस्य समजू शकेल या श्रद्धेवरच तंत्र साधनेतील देहवादाची मांडणी झाली आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्याशतकामध्ये लिहिलेला वात्सायनाने ‘कामसूत्र’ हा ग्रंथ लिहून जगाला लैंगिकतेचं ज्ञान दिलं. सरकारचे हजारो-कोटी रुपये खर्च करून दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये नग्न साधू हे वैशिष्ट्यं मानलं जातं. त्यांनीकेलेला कपड्यांचा त्याग हा अध्यात्मिकतेशी जोडला जातो आणि त्यामुळे त्यांचं नग्नं वावरणं गुन्हा ठरत नाही.

आज ज्या गोष्टी नग्नं, अश्लील वाटतात त्या प्राचीन भारतात सहज मान्य होत्या हे अशा कित्येक उदाहरणांवरूनआणि संशोधनातून तज्ज्ञांनी दाखवून दिलं आहे. पण तरीही हिंदू संस्कृतीच्या नावाने गळे काढताना हा इतिहाससोयीस्कररित्या विसरला जातो. भारतात आज ज्याला नग्नता म्हटलं जातं त्या कमी कपडे घालण्याच्या पद्धतीलापहिल्यांदा युरोपियन प्रवासी आणि ब्रिटिशांनी नोंदवलं. म्हणजेत भारतातल्या जनतेला त्यावर काहीच आक्षेपनव्हता. अगदी उच्च जातींमध्येही अशाचपद्धतीने अंगवस्त्र-छाती आणि कंबर झाकण्यापुरतं- नेसण्याची पद्धतहोती. जगप्रसिद्ध प्रवासी मार्को पोलो याने एका ठिकाणी उल्लेख केला आहे की, मलबार भागाचा प्रवास करतानाअसं म्हणता येईल की इथे कपडे कापून किंवा शिवून देणारा शिंपीच नाहीये. त्यामुळे बहुतेक जण नग्नंच असतात. केवळ सभ्येतेसाठी इथले लोक थोडेफार अंग झाकतात, मग त्या महिला असू देत किंवा पुरुष, गरीब किंवा श्रीमंत, राजा किंवा प्रजा. इथला राजाही केवळ कमरेभोवती वस्त्र गुंडाळतो. अगदी युद्धावरही हे लोक नग्नंच जातात केवळभाला आणि ढाल घेऊन. आता जगभरात प्रवास करून त्याची नोंद करणाऱ्या मार्को पोलोसारख्यालाही ही नग्नतातेव्हा आश्चर्यकारक वाटली होती तिथे इतरांची काय बात!

कार्ला, महाराष्ट्र येथे बौध्य धर्माच्या लेण्यांमध्ये सापडलेले शिल्प
कार्ला, महाराष्ट्र येथे बौध्य धर्माच्या लेण्यांमध्ये सापडलेले शिल्प

उत्तर भारतातल्या बौद्ध स्तुपांमध्ये नर्तिका या अर्धनग्नं दाखवल्या आहेत. दगडात कोरली गेलेली अनेक शिल्पं, गुफांमधल्या भिंती यातील मूर्ती या भारताची प्राचीन संस्कृती दाखवतात. ती नग्नता ही सहज वाटते. त्याला आपणस्वीकारणार की नाही? त्याउलट ग्रीक संस्कृतीमध्ये मात्र मूर्त्यांनाही पातळ कपड्याचा आभास निर्माण करूनलैंगिक अवयव थोडे झाकण्याचा प्रयत्न काही ठिकाणी केलेला दिसतो. रामायमण, महाभारतातहीकापडाएेवजी अंग झाकण्यासाठी झाडाच्या सालीचा, पानांचा वापर केल्याचे उल्लेख आहेत. अजूनही अनेकआदिवासी जमातींमध्ये अशा पद्धती आहेत. पण त्यांना आपण अज्ञानी, अडाणी म्हणून दुर्लक्षित करतो.

मानवी उक्रांतीचा सिद्धांत मांडणारा चार्ल्स डार्विन यालाही १८३० मध्ये अमेरिकेच्या दक्षिण टोकाच्या भागांमध्येफिरताना नग्नं, अर्धनग्नं लोक पाहून आश्चर्य वाटलं होतं. ब्रिटिश वसाहतींमध्ये धर्मप्रसारासाठी फिरणाऱ्यामिशनरी लोकांनाही या नग्नतेबद्दल आक्षेप होते. ख्रिश्चनिटी, सिव्हिलायझेशन आणि क्लोथिंग (Christianity, Civilisation and Clothing) हे तीन ‘सी’ त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. ब्रिटशांनी नग्नतेचा संबंध हा गरिबीशी, अडाणीपणाशी, कुरुपतेशी आणि असभ्यपणाशी जोडला. त्यांनी वसाहतींमध्ये आणलेल्या रेल्वे, रस्तेयांसारख्या सुधारणा वापरण्यास हा वर्ग लायक नाही, असं केवळ कपड्यांवरून त्यांनी ठरवलं.  वसाहतीतील मूळलोकांबद्दल वापरला जाणारा नेटिव्ह हा शब्दप्रयोगही याच त्यांना कमी लेखण्याच्या किंवा हिणवण्याच्यामानसिकतेतून आला आहे.

टी. एच. हक्सली
टी. एच. हक्सली

टी एच हक्सली या ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञाना १८६९ मध्ये ब्रिटिशांच्या वसाहतींमधल्या नग्नं लोकांचे फोटोअभ्यास आणि संशोधनासाठी मागवले. कारण अशापद्धतीने कपडे न घालणं हे ब्रिटिशांना त्यांच्या व्हिक्टोरियनसंस्कृतीनुसार असभ्यतेचं लक्षण वाटत होतं. त्या काळात ब्रिटनमध्ये कलेतही नग्नता मान्य नव्हती. मानव समूहाचीउत्पत्ती ज्यांच्यापासून झाली असं मानलं जाते त्या अॅडम आणि इव्हच्या नग्नं असण्याबद्दलही ख्रिश्चन धर्मामध्येनंतरच्या काळात आक्षेप नोंदवण्यात आले. अनेक चित्रांमध्ये नंतरच्या काळात त्यांचे लैंगिक अवयव पानं वगैरेलावून झाकण्यात आले. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांना सुरुवातीच्या काळात हा विवस्त्र असलेल्या स्थानिकलोकांसोबत फोटो काढण्यात फार उत्सुकता होती. असे कित्येक फोटो म्युझियम किंवा संशोधनात्मकपुस्तकांमध्ये आढळतात. काही तज्ज्ञांच्या मते, त्या काळात काळ्या वर्णाच्या लोकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास याफोटांच्या माध्यमातून करण्यात आला. त्यांच्या शरिराच्या अवयवांची मापं घेणं, त्याची तुलना करणं, वेगवेगळ्याजमातीबद्दलच्या नोंदी ठेवणं असा एकदम बारकाईने अभ्यास झाला. एकतर त्याबद्दल वसाहतीच्या लोकांनाकोणतीही कल्पना देण्यात आली नाही की त्यांचे फोटो घेताना, ते संग्रही ठेवताना त्यांची परवानगी विचारली नाही. त्यामागे वर्ण वर्चस्वाची भावना दडलेली होतीच. अशापद्धतीने गोऱ्या वर्णाच्या लोकांना कपडे काढून, त्यांच्याप्रतिमा घेऊन अभ्यास झाला नाही. युरोपियन चित्रांमध्येही नग्नता ही केवळ महिलांचा दाखवली जायची. त्यातपुरुष क्वचितच असायचे. वसाहतीतील लोकांचे नग्नं फोटोंचं प्रदर्शन हा ब्रिटिश जनतेच्या कुतूहलासोबतकरमणूकीचाही विषय झाला होता.

ब्रिटिशांनी भारतात येऊन लादलेल्या कायद्यांमुळे श्लील-अश्लीलतेचे परिमाण पहिल्यांदा आखले गेले. त्यांनीकपडे वापरण्याच्या किंवा न वापरण्याच्या पद्धतीवरून एखाद्याला अश्लील, असभ्य ठरवायला सुरुवात केलीआणि त्याचंच प्रतिबिंब हे त्यांच्या कायद्यांमध्ये दिसतं. आज तेच कायदे आपण आपल्या नागरिकांवर लादतआहोत. नग्नता ही माणसाच्या मेंदूत असते. एखाद्याला नग्नं फोटो काढायला, चित्र काढायला, त्याचा कलेमध्येवापर करायला काही चुकीचं वाटत नाही. पण दुसऱ्याला मात्र ते फारच असभ्यपणाचं लक्षण वाटतं. कारण हेआपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. वर्षांनुवर्षे ब्रिटिश मानसिकतेच्या गुलामीमध्येघालवल्यानंतर आपली संस्कृतीच आपल्याला परकी वाटायला लागते. त्यामुळे ज्या संस्कृतीच्या नावाने आपणगळे काढत आहोत ती नक्की कोणती संस्कृती आहे याचा अभ्यास संस्कृती रक्षकांनी करण्याची गरज निर्माणझाली आहे.


संदर्भः

1. लोकायत, स. रा. गाडगीळ

2. Nudity In India in Custom and Ritual- W. Crooke (The Journal of the Royal Anthropology Institute of Great Britain and Ireland, Vol 49)

3. Nakedness and the Colonial Imagination, Philipa Levine, Victorian Studies Vol 50, no 2 .

लेखिका राईट अँगल्सच्या नियमित वाचक, हितचिंतक आहेत.

Write A Comment