fbpx
सामाजिक

आपण आणि आपली अस्मिता! सलोखा जनसंवाद!

वैयक्तिक ओळख/अस्मिता

आपण सगळे या देशाचे नागरिक आहोत. भारतीय आहोत. आपल्याला आपल्या जन्मानुसार भाषा, धर्म, जात, वंश वर्ण अशा विविध प्रकारच्या ओळखी आपोआप मिळतात. यातील प्रत्येक ओळख आपल्यासाठी महत्त्वाची असते. आपल्या अस्तित्वाला अर्थ देणारी असते. मात्र अशा विविध प्रकारची ओळख असून सुद्धा आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत. ‘भारतीय’ आहोत. दुसरा भाग असा की या प्रत्येक ओळखीशी निगडित आपल्याला एक अस्मिता, अभिमान असतो. हा अभिमान, ही अस्मिता, ही ‘आपण श्रेष्ठ आहोत, आपण कोणीतरी विशेष आहोत, अशी भावना’ आपल्या मनात जागृत करते. एक प्रकारची मानसिक आणि सामाजिक सुरक्षिततेची भावना देते. ही एक मानसिक पातळीवर घडणारी स्वाभाविक प्रक्रिया आहे. याविषयी ‘सामाजिक मानसशास्त्रात’ व्यक्तीची अस्मिता का आणि कशी तयार होते याविषयी संशोधनही झालेले आहे. सर्वसामान्य समाजात अशा अस्मिता खूप मोठ्या प्रमाणावर सकारात्मक भूमिकाही बजावतात. तो समाज एकसंध राहतो. समाजातील परस्पर संवाद टिकून राहतो.समाजाचा विकास समतोल होण्यास मदत होते.तर मुख्य म्हणजे व्यक्तिगत पातळीवर आपण इतर अनेकांसारखे आहोत अशी ‘सामायिक ओळख’ माणसाला दिलासादायक वाटते. म्हणजेच या अस्मिता माण्साला एकाक वेळेस आपल्या ‘विशेषत्वाचीही जाणीव देतात’ आणि ‘सामुहिकतेशीही जोडतात. मात्र या अस्मितांची जाणीव अनेक कारणांमुळे कधी तीव्र बनते. कधी कमी होते. कधी अशा अस्मिता एकमेकांना छेद देतात. विशेषत: वेगवान जागतिकीकरणाच्या काळात अस्मितांचे तणाव तीव्र रुप धारण करतात.अशा अस्मितांमुळे जगात सर्वत्र विविध प्रकारचे तणाव कधी ना कधी निर्माण झाले आहेत.

गेल्या 30-40 वर्षात भारतात आपण यातील जात आणि धर्म या दोन अस्मितांमुळे आपण एका चमत्कारिक सामाजिक आणि मानसिक तणावाची स्थिती अनुभवतो. ती अशी की ‘माझी जात’ ही मला प्यारी असते, माझ्या धर्माचा मला विशेष अभिमान वाटतो आणि ती जात, इतरांपेक्षा मला अधिक श्रेष्ठ आहे, अशी जाणीव देते. म्हणजे पहा या देशातील सर्वोच्च ब्राह्मण जात असो किंवा सर्वात कनिष्ठ समजली गेलेली, खालची समजली गेलेली अशी दलित जात असो — त्या प्रत्येक जातीतील व्यक्तीला आपली जात/आपला धर्म ही वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाची आहे, एवढेच नाही तर अन्य कुठल्यातरी जातीपेक्षा ती वरची आहे; अशी भावना देते. तीच गोष्ट धर्माच्याबाबत आहे. माझा धर्म मला जगातील अन्य सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे, याची खात्री वाटते. माझा धर्म खरतर मला जन्माने मिळालाय, जात सुद्धा मला जन्माने आपोआप मिळाली आहे. मी ती निवडलेली नाही. ती मिळण्यामध्ये माझे शून्य कर्तृत्व आहे. अशी अपघाताने मिळालेली माझी ओळख ही मला एक भ्रामक श्रेष्ठत्वाची भावना देते. त्याच्याशी निगडित अनेक श्रेष्ठत्वाशी संबंधित कल्पना मी मनाशी बाळगतो. भारताचा गेल्या हजारोवर्षांचा इतिहास असा आहे की आपल्या जातीने आपल्याला भ्रामक श्रेष्ठत्वाची भावना दिली. इतकचं नाही तर त्याचा वापर करत अन्य माझ्या जातीपेक्षा ‘कनिष्ठ’ समजल्या जातीला तुच्छ लेखण्याचा अधिकार आहे असे मला सांगितले आहे. हे आज समाजाला घातक ठरत आहे. म्हणूनच या अस्मितांमधील गुणदोषांचा आपण मोकळेपणाने विचार केला पाहिजे.

आपल्या जातीय ओळखी किंवा अस्मिता या केवळ ‘अस्मिता’ नाहीत तर या अस्मितांमुळे आमच्या देशात गेली पंचाहत्तर वर्षेच नाही– तर गेली हजारो वर्ष विविध संघर्ष आणि सामाजिक तणाव निर्माण झाले. देशातील अनेक नागरिकांना जातीच्या आणि धर्माच्या आधारे माणूसपण नाकारले गेले, हे वास्तव आहे. अनेक दुर्बल जातींतील माणसांच्या हत्या झाल्या.अशा पद्धतीने माणूसपण नाकारल्यामुळे अतिशय हीन दर्जाचे जीवन या देशातील कोट्यावधी नागरिकांना पिढुनपिढ्या सहन करावे लागले आणि आजही सहन करावे लागत आहे. हे दूर करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या धार्मिक आणि जातीय आणि अन्य प्रत्येक अस्मितांकडे अधिक डोळसपणे आणि अधिक टीकात्मक पद्धतीने पाहिले पाहिजे. तरच मी खर्‍या अर्थाने माणूस होणार आहे.

आज या देशातील प्रत्येक जात आणि धर्माची माणसं एका भयाखाली वावरत आहेत. ‘आपला धर्म, जात खतरे मे आहे’ असे भय समाजात सतत टिकवले जात आहे. याचाच विचार आपल्याला करायला पाहिजे. याचा अर्थ आपली ओळख आणि आपली सर्व प्रकारची अस्मिता या चुकीच्या आहेत. आणि त्या टाकून दिल्या पाहिजेत असे अजिबात नाही.

No More Yadav, Jat, Gurjar: UP Transport Department To Seize Vehicles With ' Caste' Stickers

माणूस म्हणून वारसा/अभिमान

आपण भारत या एका प्राचीन इतिहास असलेल्या उपखंडाचे आणि आज भारत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशाचे नागरिक आहोत. हा इतिहास म्हणजे केवळ इतिहासातील राजे, त्यांच्यामधील लढाया, काही जाती आणि धर्म, त्यांची प्रार्थना स्थळे, किल्ले आणि मंदिरे याचा इतिहास नव्हे. तर या देशात किंवा या उपखंडात गेली सत्तर हजार वर्षे सतत घडत गेलेल्या सकारात्मक आणि माणसाचे माणूसपण अधिक उंचावणाऱ्या घटनांचा इतिहास होय. हा इतिहास निश्चितपणे अतिशय अभिमानाचा इतिहास आहे. मित्रांनो हा 70 हजार वर्षांचा आकडा कुठून आला? तर शास्त्रीय संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की भारतात किंवा भारतीय उपखंडात पहिल्या मानवाचे आगमन 70 हजार वर्षांपूर्वी झाले.

आफ्रिकेत मानवाची पहिली उत्पत्ती झाली. नैसर्गिक उलथापालथींमुळे आपला जीव वाचवण्यासाठी, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी या आपल्या पूर्वजांनी, मानवी प्रजातीने आधी ऑस्ट्रेलिया आणि तिथून पुढे भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये स्थलांतर केले. अशा प्रकारची स्थलांतरे भारतात भूकंप, वणवे, पूर, दुष्काळ अशा विविध नैसर्गिक आपत्तींमुळे नंतरच्या काळातही होत राहिली. कधी इंडो-आर्यन तर कधी अ‍ॅस्ट्रो-तिबेटीयन-जर्मन लोकांचा प्रवाह इथे स्थलांतरित झाला. असे ऐतिहासिक पुरावे आहेत. अशी मानवी स्थलांतरे 19000 वर्षापूर्वी पर्यंत झाली. असे जगभर घडले आहे. म्हणून या उपखंडातील मानवाचा इतिहास हा 70 हजार वर्षांचा आहे. गेल्या सत्तर हजार वर्षात या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांनी घडवलेला हा इतिहास आहे. आपण या 70000 वर्षातील स्थलांतरित माणसांच्या पिढ्यांचे वारस आहोत. त्यातील अभिमानाच्या गोष्टी त्या आपल्याला निश्चितपणे स्फूर्ती देणाऱ्या असतात. तो वारसा, ती ओळख आणि ती अस्मिता ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे.

लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे कुठल्याही राजाने किल्ले बांधले नाहीत, कुठल्याही राजाने मंदिरे बांधली नाहीत, कुठल्याही राजाने बोधगया आणि नालंदासारखी विद्यापीठे बांधली नाहीत. कुठल्याही सरकारनी किंवा पुढार्‍यांनी देशातील धरणे, रस्ते, रेल्वे प्रकल्प, कारखाने उभे केले नाहीत. या सर्वांची उभारणी, निर्मिती, बांधणी केली ती या देशातील सर्वसामान्य कारागिरांनी, उत्तुंग प्रतिभेच्या देशी अभियंत्यांनी आणि कलाकारांनी , त्या उभारणीत श्रम करणार्‍या सामान्य कामगारांनी सामुहिकतेने केली. त्याचा अभिमान आणि तो वारसा आपण निश्चित बाळगला पाहिजे. सामुहिकता हा मानवी अस्तित्वाचा मुलभूत पाया आहे.

सामुहिकतेचे जिवंत दाखले

आपण विठू नामाचा गजर करतो. आषाढी एकादशीला सार्‍या महाराष्ट्रातून लोक वारीला जातात. साधा विचार करू. या पंढरीच्या वारीला सातशे-आठशे वर्षांचा इतिहास आहे. ही केवळ भक्तीची वारी नाही. देवाची वारी नाही. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात अशा देशाच्या अनेक भागांमधून विविध भाषिक, विविध जाती आणि धर्माचे स्त्री-पुरुष वारकरी पंढरीला येतात. पायी येतात. आपल्या भाषा, जात, धर्म या सर्व अस्मिता बाजूला ठेवून एकमेकांच्या पाया पडतात. एकमेकांना उराऊरी भेटतात. लाखो वारकरी परस्परांना न ओळखणारे विविध जाती-धर्माचे वारकरी एकमेकांना कवटाळतात. प्रेम व्यक्त करतात. ही काय अद्भुत गोष्ट आहे? माणसांनी एकमेकांच्या पाया पडून दुसर्‍यातील देवत्व शोधणे. आणि ही काही गेल्या वीस पंचवीस वर्षातली किंवा 2014 पासून सुरू झालेली प्रथा नाही. तर गेली सातशे, आठशे वर्ष पंढरीची वारी सुरू आहे. गेली 700 वर्ष असे विविध भाषिक, विविध धार्मिक, विविध प्रांतातील वारकरी नियमित पंढरीला पोहोचतात. ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली ही संत परंपरा आहे. अशी प्राचीन प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. या संत परंपरेने प्रचंड साहित्य निर्माण केले. किमान 117- 120 संत या भागवत धर्मात झाले. त्यात स्त्रिया होत्या, पुरुष हते, ब्राह्मण होते, दलित होते, महार-मांग होते, मुस्लिम होते, हिंदू होते या सर्वांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात संत वांग्मय निर्माण केले. या वाङ्मयात केवळ मराठी, कानडी, गुजराती, हिंदी, पंजाबी, तेलगू, तमीळ भाषेतील शब्द आहेत. पण एवढेच नाही तर फारसी आणि उर्दू, अरबी भाषेतील अनेक शब्द अनेक, भाषिक प्रयोग या साहित्यात दिसतात. हे काय आहे? ही भक्कम भाषिक सहिष्णूता आहे. हा समभाव आहे. ही समता आहे. ही कोणी बाळगली आणि का बाळगली? मला वाटतं हा आपला खरा वारसा आहे. यात भाषिक सहिष्णूता तर आहेच पण या धार्मिक सहिष्णुता आहे. परस्पर स्वीकार आहे. सलोखा आहे. म्हणजे लक्षात घ्या, ज्या जाती व्यवस्थेने मंदिरांमध्ये ब्राह्मण जाती सोडल्या आणि त्यातही ब्राह्मण जातीतील पुरुष सोडले तर अन्य कोणालाही प्रवेश सुद्धा नाकारला, अशा समाजाने एका विठ्ठल नावाच्या अद्भुत लोकदैवतासाठी या देशातील बहुजन, दलित जातीतील स्त्री-पुरुष शेकडो वर्षे जमतात. त्यांना मंदिर प्रवेश नाकारला जातो. ते सर्व तरीही हट्टाने जमतात.चंद्रभागेत स्नान करतात. मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतात आणि परततात. हा शेकडो वर्षांचा व्यवहार काय सांगतो? तर कोणतेही सत्ताधारी काही म्हणोत, आमचा समतेवर विश्वास आहे.माणसांवर प्रेम आहे.जिव्हाळा आहे. आम्ही माणसं म्हणून एक आहोत.म्हणूनच आजच्या काळातही आजही ही सर्व जाती-धर्म-पंथ-स्त्री-पुरुषांना सामावणारी परंपरा दिमाखात सुरू आहे. मित्रांनो हा गेली सात-आठशे वर्ष चाललेला समतेचा सत्याग्रहच नाही का? किंबहुना, या ठिकाणी आठवण करायला पाहिजे की 75 वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळत असताना, याच महाराष्ट्राच्या भूमीत एक आधुनिक संत हऊन गेला. त्याचे नाव साने गुरुजी! त्यांनी या पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिरात सर्व जाती-धर्माच्या भक्तांना मंदिर प्रवेशाचा हक्क मिळवण्यासाठी आमरण उपोषण केले होते. त्यानंतर देशातील बहुजनांना पंढरीच्या विठुरायाच्या मंदिरात प्रवेश मिळाला. वारकर्‍यांच्या समतेच्या सत्याग्रहाची ती यशस्वी सांगता होती. मंदिर प्रवेशाची समता स्थापित झाली. मित्रांनो ही आपली अस्मिता आपल्याला निश्चितपणे महत्त्वाची आहे.

पुरीच्या जगन्नाथाची यात्रा, साई बाबांची यात्रा गावोगावी होणार्‍या गावाच्या यात्रा आणि उरुस असे अनेक दाखले देता येतील. या सर्व यात्रा, उरुसात जाती, धर्मा पलिकडे सर्वांनी एकत्र येण्याच्या, सामुहिकतेच्या परंपरा आहेत. हा आमच्या माणसांचा अस्सल वारसा आहे. अभिमानाच्या गोष्टी आहेत.त्या आजही अबाधित आहेत.

 

कर्नाटक: गेल्या 200 वर्षांपासून मुस्लिम नसलेले हिंदू गाव उरूस साजरे करत आहे मुस्लिम नसलेल्या गावात हिंदूंचा अनोखा उरूस साजरा. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील कोनाटंबीगे गावातील रहिवासी दोन शतकांहून अधिक काळापासून हा उत्सव साजरा करत आहेत. अशा प्रकारचा हा पहिलाच उरूस रविवारी सुरू झाला असून तो गुरुवारपर्यंत चालणार आहे.
कर्नाटक: गेल्या 200 वर्षांपासून मुस्लिम नसलेले हिंदू गाव उरूस साजरे करत आहे मुस्लिम नसलेल्या गावात हिंदूंचा अनोखा उरूस साजरा. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील कोनाटंबीगे गावातील रहिवासी दोन शतकांहून अधिक काळापासून हा उत्सव साजरा करत आहेत. अशा प्रकारचा हा पहिलाच उरूस रविवारी सुरू झाला असून तो गुरुवारपर्यंत चालणार आहे.

अस्मितांचे भ्रामक संघर्ष का?

या अस्मितेचाच विचार करत असताना आज या अस्मितांचे संघर्ष; मग ते जातीचे असोत वा धर्माचे असोत. ते आजच का तीव्र होत जाताना दिसतात? याचा थोडा धांडोळा घेऊ.

हे समजून घेण्यासाठी आपण मुंबई जवळच्या एका नवी मुंबईचा विचार करू. नवी-मुंबई या नावातच ही एक नव्याने तयार झालेली शहरी व्यवस्था आहे, हे स्पष्ट होतं. या नवी मुंबईत नवीन विमानतळ होतोय. याच नवी मुंबईत गेले 50 वर्ष नेमकेपणाने सांगायचे तर 1971 ‌- 72 पासून विविध विकास प्रकल्प आले. कधी एमआयडीसी असेल, कधी रासायनिक उद्योग असतील. तर कधी कोकण रेल्वे असेल. आता आंतरराष्ट्रीय विमानतळ. असे नवनवीन प्रकल्प याच प्रदेशात निर्माण झाले. या प्रकल्प निर्मितीच्या काळात येथील समाजात, या भूप्रदेशात प्रचंड मोठ्या उलथापालथी झाल्या. त्याचा आपण सहसा विचार करत नाही. परंतु हा ठाणे आणि रायगडचा परिसर म्हणजे भारताच्या अतिशय मोक्याच्या जागी असलेला किनारपट्टीचा प्रदेश आहे. मुंबईसारखे प्रचंड महत्त्वाचे बंदर याच प्रदेशालागत आहे. त्यामुळेच स्वातंत्र्याची पहिली तीस वर्षे मुंबईतील मोठ्या उद्योगांचे डम्पिंग ग्राउंड म्हणून या ठिकाणी अनेक प्रकारचे रासायनिक उद्योगांचे सांडपाणी सोडले गेले. नंतरच्या टप्प्यात या ठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमातून अनेक कारखाने उभे राहिले. पुढच्या टप्प्यात कोकण रेल्वे आली. हा बदल एकूण देशातील उद्योग उद्योगधंद्यांचा विचार करता अतिशय वेगाने घडलेला बदल आहे. हा बदल पचवला तो या प्रदेशातील बहुजन स्थानिक जाती समाजाने. म्हणजे असे की ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये मुख्यतः आगरी कोळी आणि कुणबी हे समाज वैशिष्ट्यपूर्ण समाज या प्रदेशातील मूळनिवासीआहेत. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण स्वायत्त संस्कृती आहे. महत्त्वाचे म्हणजे आगरी आणि कोळी या दोन समाजांची सांस्कृतिक पार्श्वभूमी ही खाडी आणि समुद्राशी निगडित होती. एका पद्धतीने विचार केला तर त्यांचा सांस्कृतिक व्यवहार हा पारंपारिक हिंदू धर्माच्या पद्धती पलीकडचा होता. म्हणजे असे की या दोन्ही समाजात ठाणे आणि रायगड या जिल्ह्यात (खरतर संपूर्ण कोकण किनारापट्टींच्या अनेक समाजात सामूहिक स्वायत्त सांस्कृतिक रचना होत्या.)गावाचे अनेक निर्णय सामुहिक पद्धतीने होत.

तुम्ही पाहाल तर हिंदू धर्मातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सर्व देवस्थानांमध्ये देवाचे पुजारी हे ब्राह्मण समाजाचे असतात. परंतु ह्या प्रदेशातील बहुसंख्य गावदेवी आणि गावातील मंदिरे याचे पुजारीपण हे स्थानिक गुरुवांकडे आहे. समाजातील लग्न व्यवहार हे स्थानिक लोक पार पाडतात. या ठिकाणी ब्राह्मण भटजी, भिक्षुक बोलावण्याची मूळ परंपरा नाही. मला कल्पना आहे, की अलीकडच्या काळात आगरी आणि कोळी समाजातील लग्नासाठी ब्राह्मणांना बोलवले जाते. प्रचंड खर्च केला जातो. परंतु पारंपारिक पद्धतीमध्ये लग्नकार्य आणि मयताचे कार्य यामध्ये ब्राह्मण किंवा उच्च वर्णीय जातींना स्थान नव्हते. याचे कारण काय? याचे कारण असे आहे की या मुळात हिंदू धर्माच्या पारंपारिक जाती व्यवस्थेतील समाज नव्हते. मात्र हे सर्व समाज बहुजनांच्या हिंदू संस्कृतीचा भाग आहेत हे लक्षात घ्यायाला हवे. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सारे समाज अधिक सामाजिक समता बाळगणारे समाज आहेत. कोळी समाज हा तर दर्यावर्दी होता. त्यांचे संपूर्ण जीवन हे समुद्रातील धाडसी अशा मच्छीमारी व्यवसायाशी निगडित होते. त्यामुळेच हा समाज अत्यंत समता मुलक होता. याचं छोटसं उअदाहरण द्यायचं तर आगरी कोळी समाजात बापाला अरे-तुरे म्हणण्याची पारंपरिक पद्धत होती. या कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरील गावांमध्ये हिंदू कोळी आणि मुस्लिम समाजातील कोळी हे सहजपणे एकत्रित वावरतात. एकमेकांशी त्यांचे नाते अतिशय जवळीकेचे आहे. हा इतिहास आणि हा सामाजिक सांस्कृतिक व्यवहार गेल्या 40-50 वर्षाच्या कालखंडात आधुनिक विकासाच्या टप्प्यात मागे पडत गेला आहे. एका नव्या परिस्थितीत येथील आगरी, कोळी, कुणबी इत्यादी समाज ढकलले गेले आहेत. पारंपारिक शेती संपली. पारंपारिक मिठागरे तर त्याआधी संपली. तसेच छोट्या बोटी घेऊन मच्छीमारी करण्याचे पारंपारिक कौशल्य ही संपुष्टात आले. यामुळे या सर्व समाजांचे उपजीविकेचे कौशल्य संपुष्टात आले. त्या जागी नवे उपजीविकेचे कौशल्य मात्र तयार झाले नाही. उलट खाजगी उद्योगधंदे, खाजगी बिल्डर आणि व्यवसायकांनी तसेच सरकारी उद्योगांसाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी विकल्या गेल्यामुळे या समाजात अचानक खूप मोठ्या प्रमाणत पैसे आले. या पैशाचे अर्थपूर्ण नियोजन कसे करावे याचा कुठलाही अनुभव नसलेला समाज. पण आर्थिकदृष्ट्या मात्र हे समाज मध्यमवर्गात आले आहेत.त्यामुळे हे समाज गोंधळात सापडले. याचेच परिणाम म्हणजे प्रचंड खर्च करून विवाह करणे, घरगुती समारंभसाजरे करणे. आणि धार्मिक समारंभ साजरे करणे हा एका बाजूला नवा बाजारु प्रघात सुरू झाला. तर दुसऱ्या बाजूला आमच्या तरुण पिढीकडे या पैशाचे नियोजन करण्याचे कौशल्य नसल्यामुळे ही पिढी चुकीच्या मार्गाला लागली. चैन आणि मौजमजा याच्या आहारी गेली. विविध धार्मिक आणि जातीय अस्मितांचा चुकीचा प्रभाव वाढत चालला आहे. तर काही गोंधळलेल्या लोकांना कधी नाना धर्माधिकारी किंवा पांडुरंगशास्त्री आठवले यांनी वेगळ्या अध्यात्मिक मार्गाला नेले. इथे लक्षात घ्यायला हवे की या बुवा महाराजांनी या गोंधळलेल्या समाजांना काही प्रमाणात आधार दिला. दारूच्या व्यसनातून बाहेर पडायला मदत केली. हा त्या समाजातील कुटुंबासाठी मोठा दिलासा होता हे मान्य करायला हवे. पण त्यातून शेती, मच्छीमारी, मत्स्यपालन आणि पारंपरिक कौशल्य हरवलेल्या समाजांचे प्रश्न काही सुटले नाहीत. पण लक्षात घेण्याचा भाग म्हणजे या बुवा, महाराजांनी या भागातल्या सामान्य जनतेला खोटी धार्मिक प्रतिष्ठा दिली. म्हणूनच हे बुवा महाराज त्यांना आपले वाटले.आपले वाटतात. यातूनच एक भ्रामक धार्मिक अस्मिताही तयार झाली. आपला धर्म ग्रेट, श्रेष्ठ अशी भावना. त्याचेच टोक म्हणजे इतर धर्म, जातींबद्दल द्वेष वाटणे. या सर्व सामाजिक घडामोडींमधून एक धार्मिक स्पर्धेची भावना वाढत गेली आहे. त्याचे परिणाम सर्वत्र दिसत आहेत. सांगण्याचा मुद्दा असा आहे की गेल्या पंधरा-वीस वर्षात घडलेल्या प्रचंड मोठ्या उलथापालथींमुळे आर्थिक विकासात मागे पडलेल्या, येथील समाजाचे पारंपारिक स्थान एका प्रकारे पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे नव्या परिस्थितीत आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या समाजांना धार्मिक आणि जातीय अस्मिता आधार वाटू लागतात.याचाच परिणाम म्हणजे कल्याणला निर्माण झालेला बौद्ध विरुद्ध आगरी कोळी असा चमत्कारिक अस्मितेचा संघर्ष.

या संदर्भात या ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील एका-महत्त्वाच्या घटनांचा आपण विचार करणे आवश्यक आहे.ही घटना म्हणजे दहा-बारा दिवसापूर्वी जवळच कल्याणमध्ये आगरी आणि कोळी समाजाचे दैवत असलेल्या एकविरा आईच्या मंदिराच्या प्रश्नावरून तयार झालेली तेढ. आपल्याला माहिती आहे की लोणावळ्याच्या जवळ सआहेत. या लेण्यांमध्ये एकविरा आईचे मंदिर आहे. या कारला लेण्या आणि एकविरा आईचे मंदिर या दोन्हींना खूप मोठा इतिहास आहे. कारला लेण्याचा इतिहास तपासला तर या लेण्या इसवी सनापूर्वी दुसऱ्या तिसऱ्या शतकात कोरल्या गेल्या होत्या. आणि या बौद्धकालीन लेण्या असून या ठिकाणी बौद्ध मंदिर, चैत्यगृह आणि बौद्ध लेण्यांची पारंपारिक रचना दिसून येते. या ठिकाणी आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे. तो असा की अशा सर्व बौद्ध लेण्या या नेपाळपासून म्हणजे भारत नेपाळच्या सीमेपासून ते गोव्यापर्यंत आढळतात. या लेण्या का निर्माण झाल्या? तर बौद्ध काळामध्ये नेपाळपासून, नेपाळच्याही पलीकडे तिबेट पासून गोव्यापर्यंत आणि खाली दक्षिणेपर्यंत व्यापारी मार्ग होता. म्हणजे तिबेट चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंचा व्यापार करत करत व्यापारी गोव्यापर्यंत येत आणि गोव्यापासून याच मार्गाने परत जात. या व्यापारी मार्गावर व्यापाऱ्यांना राहण्यासाठी म्हणून या लेण्या तयार झाल्या. निर्माण केल्या गेल्या. त्या ठिकाणी काही अभ्यास केंद्रे, विद्यापिठेही तयार झाली. या लेण्या येथील कारागिरांनी निर्माण केलेल्या अप्रतिम कलाकृती आहेत. हा जाती धर्मा पलिकडे आपल्या सर्वांचा अभिमानाचा विषय असला पाहिजे. तर अशा या बौद्ध लेण्या ठीकठिकाणी महाराष्ट्रात आढळतात. त्याच कळात स्थानिक लोकांच्या देवदेवता, प्रथा परंपरा सण उत्सव सुरूच असत. त्यात कोणताच विरोध नव्हता. मात्र आज या एकविरा देवीच्या मंदिराच्या संबंधी एकवीरा देवीचे देवस्थान का बौद्ध लेणे असा भ्रामक वाद निर्माण करून कल्याण मध्ये एका बौद्ध तरुणाला मारहाण करण्यात आली.त्याची विटंबना करण्यात आली. याविषयी अधिक शोध घेतला असता, असे लक्षात आले की एका फेसबुक पोस्टवरून खोटे अकाउंट तयार करून हा वाद निर्माण केला गेला आहे. याविषयीची पोलीस केस सुद्धा झाली आहे. म्हणजे हा वाद आता हिंदू विरुद्ध बौद्ध धर्मिय असा उभा केला जाण्याची तयारी आहे. या मागे स्थानिक आगरी कोळी आणि बौद्ध समाजातील माणसांच्या धार्मिक भवनांचा वापर केला जाणार.अशी चिन्हे आहेत. या मागे राजकीय गणिते आहेत. आजच्या सनातन हिंदुत्ववाद्यांना सर्वात मोठा ताकदवान विरोधक बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा दलित बौद्ध समाज वाटतो. त्यांच्या विरुद्ध हिंदूंतील गरीब जाती उभ्या करण्याचा हा डाव आहे. हे लक्षात घ्यायला हवे.

आगरी कोळी कुणबी विरुद्ध बौद्ध ध्रुवीकरण अपयशी

पण अभिमानाची गोष्ट अशी की आगरी, कोळी, कुणबी समाज आणि बौद्ध समाजाला या ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये खूप मोठा दोस्तीचा, सलोख्याचा इतिहास आहे. याच आगरी समाजातील सुपुत्र महान नेते नारायण नागो पाटील यांनी या परिसरात मोठे जनसंघर्ष उभारले होते. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात आगरी-कोळी समाजात शिक्षण प्रसार केला. याच नारायण नागो पाटील यांनी येथील आगरी, कुणबी, कोळी समाजाच्या गरीब छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हक्कांचे लढे उभारले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कुळ कायद्याची लढाई नारायण नागो पाटील यांनी उभी केली होती. त्यामुळेच महाराष्ट्रात कुळ कायदा तयार झाला.या समाजाला आपल्या जमिनीचे हक्क मिळाले त्यामुळे आगरी कोळी, कुणबी आणि बौद्ध समाज हे सतत एकत्रच राहिले. यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्षाचा इतिहास नाही. एवढेच नाही तर ठाणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यात आगरीबहुल गावांमध्ये दलित जाती किंवा बौद्धांसाठी स्वतंत्र वस्त्या नाहीत. सर्व समाज एकत्र राहतो. या पार्श्वभूमीवर एकवीरा देवी आणि बौद्ध लेण्याचा प्रश्न कोणीतरी जाणीवपूर्वक उभा करण्याचा प्रयत्न झाला आहे, हे निश्चित. परंतु कल्याणमध्ये रायगड आणि ठाणे या सर्व जिल्ह्याचे आगरी, कोळी व दलित समाजाने एकत्रितपणे या धार्मिक जातीयवादी संघर्ष वेळीच मोडून काढला हे पाहण्यासारखे आहे. कालच्या 20 जून 2023 रोजी मोठ्या संख्येने हे सर्व समाज एकत्र आले होते. कल्याण ठाणे रायगड मधील आगरी कोळी समाजातील सजग नागरिक आणि कल्याण अंबरनाथ ठाणे या परिसरातील जागृत दलित संघटना आणि सर्वसामान्य नागरिक एकत्र आले त्यांनी ‘सकल भारतीय समाज मोर्चा’ काढला. अशा प्रकारच्या धार्मिक आणि जातीय पायावरील ध्रुवीकरणाला ठामपणे विरोध केला. स्थानिक कलेक्टर आणि पोलीस यंत्रणांना या मोर्चाने असे सांगितले की अशा प्रकारच्या धार्मिक जातीय तणावांना प्रोत्साहन देणाऱ्या, भारताच्या संविधानाच्या विरोधी संविधानाविरोधी काम करणाऱ्या नागरिकांवर त्वरित कठोर कारवाई करा. या धार्मिक ध्रुविकरणाला त्यांनी ठामपणे विरोध केला.

हे आपोआप घडले नाही. मला असे वाटते ज्या जातीय आणि धार्मिक अस्मितांचे भ्रामक संघर्ष आज लढवले जातात, त्याविषयीचे नेमके भान येथील समाजाने दाखवले आहे. आपण सर्व मुंबई नवी मुंबई या परिसरातील आधुनिक विकासाच्या आणि आधुनिक शहरीकरणाच्या वातावरणात राहतो. या शहरीकरणाच्या बदलांमध्ये एका पातळीवर आपल्या सर्वांच्या सांस्कृतिक भाषिक धार्मिक अस्तित्वाचे प्रश्न आणि आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थानाविषयी एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला आहे. आपण एका नव्या समाज व्यवस्थेत खूप वेगाने येऊन पडलो आहोत. आजच्या जागतिकीकरणाचे हे थेट परिणाम आहेत. केवळ आगरी, कोळी, दलित यांच्यासारख्या समाजांसाठी जमिनीचे संबंध बदलले, उपजिविकेचे मार्ग बदल झाले तसेच आणखीही मोठे बदल घडले. भारतातील अन्य प्रांतातील नागरिक, उद्योजक इथे आले. त्यांच्या सांस्कृतिक प्रथा-परंपरा आल्या. त्यामुळेच काही प्रमाणात अस्वस्थता आणि असुरक्षितता आपल्या येथील समाजातील नागरिक अनुभवतात. आपल्या मुलांनी, आपल्या बहिणीने, आपल्या मुलींनी आंतरजातीय विवाह केला — तर आपल्याला असुरक्षित वाटतं. याचे कारण आपल्यामध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण अजूनही पुरेशी झालेले नाही. विचार करा भारतातून अमेरिकेला गेलेल्या, भारतातून इंग्लंडमध्ये जाऊन स्थायिक झालेल्या किंवा अन्य देशात गेलेल्या भारतीय माणसांमध्ये आंतरजातीय लग्न हा मोठा वादाचा तणावाचा विषय झाल्याचे कधी ऐकले आहे का? नाही. कारण त्या देशात गेल्यावर भारतीय म्हणून एक सांस्कृतिक अस्मिता या सर्वांना जोडते. परंतु आजच्या आधुनिक काळात आमच्या शहरातील समाजांमध्ये विविध राज्यांमधून आलेले विविध भाषिक, विविध जातीचे आणि विविध धर्माचे समाज एकत्र येऊन एक नवा समाज तयार व्हायला, त्यांच्यातील परस्पर नाते विकसित होण्याला काही काळ जावा लागेल. म्हणूनच या संक्रमणाच्या काळात अशा प्रकारच्या अस्मितांचे प्रश्न आणि बदल हे तणावाचे कारण बनतात.

नेमक्या याच अस्थिर परिस्थितीचा आणि बदलत्या शहरीकरणाचा उपयोग आजच्या घडीला भारतातील हिंदुत्ववादीशक्ती किंवा आपण असं म्हणून की स्थितिवादी, परंपरावादी शक्ती मग त्या हिंदू समाजातील असतील मुस्लिम समाजातील असतील, एखाद्या जातीतील असतील किंवा एखाद्या वांशिक गटातील असोत, त्या परिस्थितिचा फायदा आपल्या राजकीय फायद्यासाठी करून घेत आहेत. त्यातूनच एक चमत्कारिक प्रकारची हिंसक परिस्थिती या समाजामध्ये सातत्याने टिकवली जात आहे. म्हणजे कल्याणचा आगरी – कोळी – कुणबी विरुद्ध बौद्ध ध्रुवीकरण थांबवले गेले पण दुसरीकडे हजी मलंगचा प्रश्न परत उभा केला जात आहे. हाजी मलंगच्या पायथ्याशी अलिकडेच हिंदू संमेलन घेण्यात आले होते.

हे जाणीवपूर्वक घडविले जात आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. किंबहुना हे आता सर्वसामान्य लोकांच्याही सहज लक्षात येते. पण तरीही सत्तेच्या स्थानी असलेल्या अशा धर्मांध, दुराभिमानी सत्ताधारी याचा अतिशय क्रूरपणे उपयोग करताना दिसतात. एखादी वॅट्सॅपवरची पोस्ट किंवा निव्वळ खोटी आकडेवारी पसरवून धर्मांतराची अवाई उठवली जाते. यासाठी आधुनिक प्रसार माध्यमांचा अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. सर्वसामान्य समाजाची दिशाभूल केली जाते. बरं, हे करण्यासाठी बेकाम तरुणांच्या फौजा सहज हाताशी येतात. खोट्या बातम्या खोट्या अस्मितांना पोसतात. दुसऱ्या बाजूला याचा परिणाम म्हणजे समाजात फार पटकन हिंसाचे वातावरण तयार होते. हे रोखण्यासाठी केवळ भाजपवर, संघावर टीका करुन ते थांबणार नाही. आपल्याला जागृतपणे तणावाच्या जागा, मुद्दे शोधून त्यावर काम करायला हवे. ठिकठिकाणी सलोखा समित्या तयार करायला हव्यात. तणावाच्या प्रसंगी ठामपणे उभे रहायला हवे.

या देशात मुस्लिम धर्मीय येऊनही आता हजार वर्षे झाली आहेत. इस्लाम आला तो सुफींबरोबर आला. या देशात आज कमीत कमी साडेतीन ते चार हजार सुफी फकिरांचे पीर दर्गे आहेत. त्या पीर आणि दर्ग्यांनाही पाचशे-सहाशे वर्षांचा इतिहास आहे. हे मुस्लिम धर्मीय सुफी संप्रदायातील फकीर होते. त्यांनी ठीकठिकाणीसर्वसामान्य समाजात, विविध प्रकारचे योगदान दिले.

Bhakti Movement - OBJECTIVE IAS

पश्चिम बंगालमध्ये जंगल जमीनीचे रुपांतर शेतजमीनीत करण्याचे तंत्र अशा सुफींनी सामान्य लोकांना शिकवले. विजापूर आणि कर्नाटकातील महाराष्ट्र लगतच्या बिदर, गुलबर्गा इत्यादी परिसरात अनेक सूफी हे ‘दावल मलिक’ या नावाने ओळखले जातात. कोण होते हे दावल मलिक? दावल म्हणजे दवापाणी करणारे, पारंपारिक औषधोपचार करणारे वैदू होते. डॉक्टर होते. या सुफी फकीरांपैकी अनेकांनी दुष्काळाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची कैफियत, प्रश्न स्थानिक राजासमोर मांडल्याची उदाहरणे आहेत. सुफींच्या अशा योगदानामुळेच त्यांना स्थानिक हिंदू मुस्लिम जनतेने आपले मानले. म्हणूनच गेली सहाशे सातशे वर्ष संत आणि वारी परंपरेला समांतर या सुफींचे उरुसही साजरे होतात. अनेक सुफी पंढरीच्या वारीत सहभागी होतात. हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील सर्वसामान्य नागरिक आजही या पिरांना पुजतात. उत्सव करतात कव्वालीचे कार्यक्रम होतात, मलिदा वाटतात. महाराष्ट्रातील अनेक पीर त्या त्या ठिकाणची ग्रामदैवत आहेत. हे उगाच घडले नाही. हे कोणी लादलेलंही नाहीये. हे सर्व सामान्य माणसांनी स्वतःच्या शहाणपणातून निर्माण केलेले सामंजस्याचे उदाहरण आहे. हा सामंजस्याचा अखंड प्रवाह महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात अबाधित टिकला.

या सामान्य सहिष्णू व्यवहाराचा अर्थ आज पुन्हा एकदा नव्याने समजून घेण्याची गरज आहे. या अखंड सामाजिक सहिष्णुतेचा अर्थ असा आहे की सामान्य माणसांना आपापल्या धार्मिक, भाषिक, जातीय अस्मिता प्यार्‍या असल्या तरी त्यांना परस्पर संघर्ष नको आहे. त्यांना तणाव नको आहे. त्यांना परस्परांचे देव, धार्मिकश्रद्धां सांभाळत ज्ञान संवादातून विकास करण्यामध्ये अधिक रस आहे.

जगात ज्ञानाची परंपरा ठिकठिकाणी निर्माण झाली.जगात निर्माण झालेल्या ज्ञानावर कोणा एकाचा हक्क नाही.ती सर्व जगातील नागरिकांची सामुहिक, सामायिक परंपरा आहे.म्हणूनच इराण, इराक, इजिप्त आणि तुर्कस्तानमध्ये निर्माण झालेली ट्रिग्नोलॉजी हे जगभरात पसरली. अल्जिब्रा पसरला. चीनमध्ये निर्माण झालेले छपाईचे तंत्र भारतापासून संपूर्ण जगात पसरले. युरोपमध्ये लागलेले अनेक आधुनिक तांत्रिक, रासायनिक शोध हे सर्व जगाने स्वीकारले. ही सर्व परंपरा हा सर्व प्रवाह सहिष्णुतेचा प्रवाह आहे. मित्रांनो लक्षात घ्या, या पृथ्वीवर माणसाचे हजारो, लाखो वर्षांचेअस्तित्व टिकले ते माणसाच्या नैसर्गिक सामंजस्याच्या भावनेमुळे.

आपल्याला शिकवला जातो तो इतिहास लढायांचा, धार्मिक संघर्षांचा, भाषिक संघर्षांचा आणि वांशिक संघर्षाचा. वास्तविक गेल्या अडीच लाख वर्षातील माणसाचा प्रवास हा सहिष्णुतेचा, सामंजस्याचा होता. यामध्ये भाषिक, जातीय वांशिक संघर्षचा कालखंड हा अतिशय थोडा, म्हणजे कदाचित तीन ते पाच टक्के इतकाही नसेल. उर्वरित 97% कालखंड हा सहिष्णुतेचा कालखंड आहे. म्हणून ही पृथ्वी टिकली, माणूस टिकला. मित्रांनो इतिहास आपल्या बाजूने आहे. जातीय आणि धार्मिक अस्मितांच्या आधार घेऊन एक दुसऱ्याने विरुद्ध उभे राहणं आणि शत्रुत्व बाळगणं हा माणसाचा मूलभूत गुणधर्मच नाही. तर परस्पर सहकार्याने विकास साधणे हे माणसाने सामूहिकपणे, पृथ्वीवरील सर्व माणसांनी ठरवलेले एकमेव उद्दिष्ट आहे.

भाषिक देवाणघेवाणी प्रमाणे, विज्ञान, तंत्र वैज्ञानिक विकासासाठी आवश्यक देवाण-घेवाण सुद्धा झाली. आमचे हे आपण सर्वांनी स्वीकारले. इनफॅक्ट आपण ‘स्वीकार’ हा आपला गुणधर्म ठेवला. या देशात परस्परांचा स्वीकार करणे हीच मूलभूत सांस्कृतिक परंपरा राहिली आहे. नव्हे या पृथ्वीवरी मानवी अस्तित्वाची ती नैसर्गिक प्रेरणा आहे! असे असले तरीही जातीय आणि धार्मिक विषमता पार करण्यासाठी, त्यावर विजय मिळण्यासाठी आपल्याला अजूनही खूप प्रयत्न करायचे आहेत. याचे कारण आजच्या हिंदुत्ववादी सत्ताधाऱ्यांप्रमाणे अनेक सत्ताधारी वेळोवेळी आपल्या तात्कालीक राजकीय हितसंबंधांसाठी या समाजामध्ये वाद वाढवणार, द्वेष पेरणार आहेत. मात्र एक निश्चित आहे की असे असले तरी मूलभूत समतेचा, मूलभूत सहिष्णतेचा प्रवाह हा अतिशय भक्कम आहे. कारण आजची ही पृथ्वी घडवली सजवली ती आपल्यासारख्या सामान्य माणसांनी.

ज्याप्रमाणे आपल्या देशात लोक जातीय आणि धार्मिक अस्मितांना महत्त्व देतात त्याचप्रमाणे युरोप, अफ्रिका ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आपापल्या धार्मिक/वांशिक अस्मितांविषयी आणि वांशिक शुद्धतेविषयी अनेक अस्मिता, दुराभिमान लोक बाळगतात. या किती खर्‍या आहेत, यासंबंधी प्रत्यक्षात शोध घेण्यासाठी ‘नॅशनल जिओग्राफिक’ नावाच्या एका संशोधन करणाऱ्या प्रसिद्ध वैज्ञानिक वाहिनीने मोठा प्रकल्प हाती घेतला होता.हा जिनॉलॉजी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा होता. जगाच्या विविध खंडांमधून स्थलांतरित झालेया मानवात गेल्या हजारो वर्षांमध्ये काय बदल झाले? किती शुद्ध वंश आहेत? याचा शोध घेण्यात आला. लोकांमध्ये अशी धारणा आहे की आम्ही हे ‘अधिक श्रेष्ठ आणि अधिक शुद्ध वंशाचे उच्चवर्णीय आहोत. नेमक्या याच विषयावर संशोधन करण्यासाठी नॅशनल जिओग्राफीक या संस्थेने संशोधन हाती घेतले. जगाच्या विविध भागातील सर्वसामान्य नागरिकांचे गुणसूत्राच्या जीनच्या आधारे वांशिक वेगळेपण किंवा साधर्म्य निश्चित करणारा हा प्रकल्प होता. हा प्रकल्प अतिशय व्यापक पद्धतीने अमलात आणला गेला. या प्रकल्पाविषयी आज इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. काय होता प्रकल्प? तर प्रकल्पात सहभागी व्यक्तीला एक ‘टेस्टींग बड’ दिली जाई.म्हणजे काय तर एक काडी असायची या काडीला पुढे विशिष्ट प्रकारचा कापूस लावलेला असायचा. ही काडी प्रकल्पात सहभागी होणाऱ्या व्यक्तीने आपल्या तोंडात आतल्या बाजूने गालावर घासून ती काडी नॅशनल जिओग्राफी संशोधन केंद्रात पाठवायची. त्यावरील लाळेचे संशोधन करून सदर व्यक्तीच्या गुणसूत्रांची तपासणी केली जाते. या तपासणीमधून त्या व्यक्तीच्या माणसाच्या आई-वडिलांच्या हजारो वर्षांच्या पिढ्यांनी केलेल्या स्थलांतराच्या इतिहासाविषयी ठोस निष्कर्ष काढता येतात. त्याचप्रमाणे अशा व्यक्तीचे आजच्या गुणसूत्रात जगाच्या विविध प्रांतातील आणि खंडातील कोणत्या कोणत्या वंशाचे किती किती गुणसूत्र प्रमाण आज सामावलेले आहे, याविषयी एक चित्र उभे करता येते.तसेच वेगवेगळ्या देशातील नागरिकांच्या समाजातील गूणसूत्रांचेही चित्र पुढे येते. या वैज्ञानिक संशोधन प्रकल्पात असे सिद्ध झाले की जगाच्या पाठीवर आज कोणताही समाज आणि व्यक्ती मूळ शुद्ध राहिल्र्ली नाही. जगभरातील सर्व माणसांत गुणसूत्रांची सरमिसळ झालेली आहे.

तर अशा प्रकल्प भारतातील नागरिकांबाबतही राबवला गेला. नॅशनल जिओग्राफीच्या या संशोधनात भारतात काय आढळलं? तर भारताचे चार विभाग केले उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व तर या विभागातील सर्व नागरिकांत पुढील प्रमाणे विविध जागतिक वंशाच्या लोकांचे गुणसूत्र प्रमाण सापडतात. हा प्रत्येक समाज सरमिसळ झालेला समाज आहे. ते निष्कर्ष असे!

याचा अर्थ काय होतो? याचा स्पष्टपणे अर्थ असा आहे की या चार विभागातील भारतीय नागरिकांचा विचार केला तर त्या सर्वांची गुणसूत्रे आणि त्यातील वार्षिक सरमिसळ ही सरासरी सारखी आहे. समान आहे.

याचा अर्थ पश्चिम भारताचा म्हणजे आपला विचार केला आपण जिथे राहतो या प्रदेशाचा विचार केला , तर या प्रदेशातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, दलित, ओबीसी, सवर्ण आणि ब्राह्मण समाज अशा सर्व नागरिकांच्या गुणसूत्रांमध्ये साधर्म्य आहे. नव्हे ते समान आहे! म्हणजे माझी खरंतर मूलभूतरित्या ओळख ही संमिश्र वंशाचा पश्चिम भारतातील एक माणूस अशी आहे. म्हणूनच सुरुवातीला मी सांगितलेली माझी ओळख आणि त्यातून तयार होणारी अस्मिता ही अत्यंत भ्रमक आहे. आपण सर्व एक आहोत हे आज विज्ञानाने वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केले आहे. लक्षात घेण्याचा भाग म्हणजे हे आधुनिक संशोधन आहे. आज कदाचित ते सर्वसामान्य माणसांपासून लपवले गेले असेल. परंतु हे आधुनिक संशोधन किंवा वैज्ञानिक सत्य फार काळ दडवून ठेवता येणार नाही. विचार करा उद्या आपली मुलं आपल्या पुढच्या पिढीतील लहान मुलं हे टीव्हीवर नॅशनल जिओग्राफीचे हे संशोधन पाहतील तेव्हा ते काय विचार करतील? ज्यावेळेस त्यांना याचे भान येईल की आपल्या सगळ्यांची गुणसूत्र सारखी आहेत त्यावेळेस आपल्या पिढीच्या धार्मिक, भाषिक व जातीय अस्मिता म्हणजे किती मूर्खपणाचा भाग होता याची जाणीव त्यांना होईल. एवढेच नाही तर ती पिढी आपल्याला ठार मूर्ख समजेल.आपल्याबद्दल काय विचार करेल? आपण वृथा अभिमान बाळगत असलेल्या ओळखी भ्रामक असल्याचे भान आपण बाळगू या आणि आजच्या तणावाच्या काळात आपला माणुसकीचा, समानतेचा सलोख्याचा वारसा टिकवून ठेऊया!

समन्वयक, सलोखा संपर्क गट

Write A Comment