fbpx
OTT कला

लोकांचा हिरो चंद्रू!

“जयभीम” या चित्रपटानं धम्माल केलीय. समीक्षकांची दाणादाण उडवून दिलीय. पेपर आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतल्या लोकांनी त्याला पाच पैकी साडेतीन ते चार गुण दिलेत. कोणीही पाच गुण दिलेले नाहीत. म्हणजे चित्रपट चांगला आहे पण उत्तम नाही असं त्यांचं मत पडलंय. याचा अर्थ चित्रपट कलेच्या कसोट्यांवर काहीसा कमी पडलाय. पण करोडो प्रेक्षकांनी तो पाहिलाय. असं म्हणतात की “गॉडफादर” या चित्रपटाचा प्रेक्षकांचा उच्चांक या चित्रपटानं मोडलाय आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला भरपूर पैसा मिळालाय. प्रेक्षक थेटराच्या बाहेर पडतो तेव्हां म्हणतो की पैसा वसूल. कधी कधी बारा आणे वसूल तर कधी कधी चौदा आणे वसूल असं प्रेक्षक म्हणतो. कधी कधी तो चित्रपट पहातांना शिव्यांची लाखोलीही वाहतो. प्रेक्षक चित्रपटात गुंतला कां? चित्रपट पहाताना त्याचा गळा दाटला कां? त्याच्या डोळ्यात पाणी आलं कां? त्यानं संतापानं मुठी आवळल्या कां? या प्रश्नांच्या उत्तरावर चित्रपटाचं यश अवलंबून असतं.

मुन्नाभाई एमबीबीएस लोकांना सॉलिड आवडला होता. जयभीमही लोकांना आवडलेला दिसतोय. प्रेक्षकाला एक हिरो पडद्यावर पहायचा असतो. दैनंदिन जीवनात तो त्याला अनुभवायला मिळत नसतो. हिरो दुष्टांची वाट लावतो, तो जवळपास सर्वगुण संपन्न असतो. समाजात अनेक वाईट गोष्टी घडत असतात. प्रेक्षकांना त्या वाईट गोष्टींशी लढणारा, दुष्टांचं निर्दालन करणारा हिरो हवा असतो, स्पायडरमॅनसारखा. जयभीममधे ॲडवोकेट चंद्रू तो हिरो आहे. एका आदिवासीला पोलिसांनी खोटा गुन्हा नोंदवून छळ करून मारलेलं असतं. पोलिस, न्यायालय, सरकार, राजकीय पक्ष सारे सारे गप्प तरी असतात किंवा गुन्ह्यात सहभागी तरी असतात. चंद्रू हा एकटा माणूस पुरावे गोळा करतो, लढतो. आमिषं येतात, तो बळी पडत नाही. तो पैसेही घेत नाही.अगदी अस्साच वकील लोकांना हवा असतो, जो व्यवहारात भेटत नाही. जेवढा अन्याय मोठा आणि तीव्र तेवढा हीरो चंद्रू अधिकाधीक झळाळतो.

जयभीममधे कॅमेरा चंद्रूच्या आसपास फिरत असतो. चंद्रू कोर्टात युक्तीवाद करतो तेव्हां अगदी जवळून आपल्याला दिसतो. चंद्रू मूठ आवळून घोषणा करताना दिसतो. अगदी जवळून. संगिनी या अन्यायग्रस्त महिलेची कहाणी ऐकत असताना कधी विचारात पडलेला चंद्रू दिसतो, कधी कहाणी ऐकून विकल झालेला चंद्रू दिसतो तर कधी महिलेनं पूर्ण सत्य सांगितलं नाही यानं चिडलेला एक व्यावसायिक वकील चंद्रू दिसतो. कॅमेऱ्याचं त्याच्यावर फार जवळून लक्ष असतं.

कधी कॅमेरा कोर्टाच्या तक्तपोशीला चिकटलेला असतो. तेव्हां आपल्याला अख्खं कोर्ट, न्यायाधीश, इतर वकील, अशीलं, प्रेक्षक इत्यादी माणसं दिसतात. कोर्टातलं अँटिक फर्निचर दिसतं, झुंबरं दिसतात. म्हणजे एक मोठ्ठी व्यवस्था, व्यवस्थेतला तामजाम व वैभव दिसतं आणि त्यामधे एक छोटासा चंद्रू नावाचा ठिपका दिसतो, एक साधा वैशिष्ट्यहीन ठिपका दिसतो. हज्जार गोष्टी आणि त्यामधली एक गोष्ट म्हणजे चंद्रू. दोन परस्परांना छेद देणारी दृश्यं चित्रपटभर आलटून पालटून दिसत रहातात.

जगाच्या व्यवहाराच्या हिशोबात एक यःक्श्चित बिंदू असलेला चंद्रू आणि तरीही कॅमेऱ्याच्या जवळ असल्यामुळं पहाडायेवढा, जगापेक्षाही मोठा असणारा चंद्रू.

कॅमेरा आकाशात असतो आणि खाली सुंदर हिरव्या डोंगरांत एक बारीक ठिपका चंद्रू पुरावे गोळा करताना दिसतो. तामिळनाडूच्या रखरखाटात, उघडयाबंब घामेजलेल्या लोकांच्या घोळक्यात मुलाखती घेणारा चंद्रू दिसतो.

चंद्रू देखणाही दिसतो आणि परिसरातला ओंगळपणाही दिसतो.

ही कॅमेऱ्याची करामत आपल्याला सांगत रहातो ही हा आहे तुमचा हीरो, पहा त्याच्याकडं.

चित्रपटात मार्क्सचं भिंतीवरचं शिल्प आठ दहा वेळा तरी दिसतं. निदर्शनांच्या दृश्यांत कम्युनिष्ट पार्टीचा झेंडा दिसतो. एका दृश्यात कॅमेरा उजवीकडून चंद्रूकडून निघतो आणि डावीकडे हळ्ळी या मुलीकडं पोचतो. चार पाच सेकंद. पण त्यात एकाद सेकंदासाठी लेनिनचा पुतळा पाठीमागे दिसतो. एका दृश्यात चंद्रू म्हणतो गांधी नेहरूंची वगैरे चित्रं दिसतायत, यात आंबेडकरांचं चित्रं कुठं दिसत नाही.

बस. येवढंच. बाकीच्या सिनेमात कुठंही मार्क्सवाद, आंबेडकरांचे विचार इत्यादींचे उल्लेख-चर्चा इत्यादी नाही. फक्त शेवटी जयभीम या शीर्षकाची एक कविता म्हणा, एक सुविचार म्हणा, आहे.

ज्यांना मार्क्सवादी, कम्युनिष्ट, आंबेडकरवादी इत्यादींची चर्चा करायची असेल त्यांना रान मोकळं आहे. चित्रपट त्यात जात नाही.

चित्रपटभर उंदीर पकडून (अर्थात ते खाऊन ) जगणारी माणसं दिसतात. साप पकडणारा माणूस दिसतो. वीट भट्टीवर राबणारी माणसं दिसतात. या माणसांना पोलीस जनावरासारखं वागवतांना दिसतात. पोलीस कोठडीत या लोकांना होणारे भीषण अत्याचार दिसतात. निदर्शनं करणारे दिसतात आणि लढणारा चंद्रू दिसतो. यातून तुम्ही काय ते समजायचं. कंठाळी भाषण आणि उपदेश डोळीकानी येत नाही. हे थोडंसं आश्चर्यच आहे. कारण दक्षिण भारतीय सिनेमांत फार बटबटीत प्रचार असतो. ते काहीही असो. परंतू या दृश्य मांडणीमुळं लोक जे समजायचं ते समजतात.

'जय भीम' चित्रपटातला शेवटचा सीन - ॲमेझॉन प्राईम, २०२१
‘जय भीम’ चित्रपटातला शेवटचा सीन – ॲमेझॉन प्राईम, २०२१

चित्रपटात कास्टिंग नावाचा एक विभाग असतो. भूमिकेसाठी योग्य नटव्यक्ती निवडणं. या चित्रपटात तीन न्यायाधीश आहेत. सुरवातीला एक येतो आणि नंतर दोन न्यायाधीश येतात. म्हटलं तर ही छोटीशीच पात्रं असतात पण मोक्याच्या जागी असतात. हे न्यायाधीश भारी आहेत. त्यातले एक न्यायाधीश मराठी असल्यासारखे दिसतात. त्यांचं आडनाव चंद्रचूड वगैरे काही तरी असेल असं वाटतं. त्यांचं कोर्टाकडं तीक्ष्ण नजरेनं पहाणं आपल्याला घट्ट पकडून ठेवतं.

ऐश्वर्याची जागोजाग आठवण करून देणारं मद्रास हायकोर्ट. त्या कोर्टात मर्सीडीझनं येणारा ॲडवोकेट जनरल. पूर्ण चित्रपटभर पसरलेली फकाट गावं, रेताड उंचवटे, गवताच्या झोपड्या, फाटकी माणसं आणि कोठडीतली नको इतकी आणि नको इतक्या वेळा होणारी मारहाण. विसंगती, विरोधाभास, दोन टोकं सर्व चित्रपटभर आपल्याला दिसत रहातात.

बटबटीतपणा. नको इतकी लांबलेली अनावश्यक मारहाणीची दृश्यं. त्या दृष्यातली कृत्रीमता. व्यक्तीचित्रपणासाठी योजलेली ठोकळेबाज दृश्यं. कित्येक गंभीर प्रसंगात असलेलं पार्श्वसंगीत कॉमेडीदृश्यांसारखं वाटलं. सूचक दृश्य, प्रवचन टाळणं अशा गोष्टी करू शकणारा दिग्दर्शक ठोकळेबाज लांबलचक प्रसंग कां चितारतो असा प्रश्न अनेक वेळा पडतो. समीक्षकांना या गोष्टी बोचल्या असणार.

एकूणात समाजातल्या सामान्य माणसाची भीषण अवस्था, सार्वजनिक संस्था आणि व्यवहारातला अमानुषपणा आणि बेफिकिरी, जातीगत अन्याय हे भीषण वास्तव चित्रपटातून लोकांकडं पोचत असल्यानंच चित्रपट खूप पाहिला गेला.

ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक व सिद्धहस्त लेखक

Write A Comment