fbpx
OTT कला

भांडवलशाही आणि फॅसिझमचा के-ड्रामामध्ये धुडगूस

ओटीटीवर सध्या के-ड्रामा किंवा कोरिअन ड्रामामध्ये “स्क्विड गेम्स” आणि “हेलबाऊंड” या मालिका प्रचंड गाजत आहेत. जगभरातून या मालिकांना मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. या दोन्ही मालिका रुपककथा घेऊन आल्या असल्या तरी “स्क्विड गेम्स”, द. कोरियातील क्रूर भांडवलशाही आणि “हेलबाऊंड” फॅसिझमवर भाष्य करतात. आशिया खंडातील गरीब देश म्हणून गणल्या गेलेल्या द. कोरियाने गेल्या ५०-६० वर्षांमध्ये प्रगत देश म्हणून आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. विकासाचं मॉडेल राबवून, जगभरातल्या भांडवली देशांकडून वाहवा मिळवली. पण ही प्रगती केवळ चकचकीत शहरं आणि एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादीत राहिली. उलट गरीब, कामगार वर्गाचं आणखी शोषण करून, त्यांना देशोधडीला लावून भांडवलशाहीची पकड दक्षिण कोरियाने आणखी मजबूत केली. त्याचवेळी सत्तेत येणाऱ्या हुकुमशाही सरकारांनी जनतेची मुस्कटदाबी करून गरीब वर्गाला आणखी गाळात लोटलं. भांडवलशाही आणि फॅसिझम आजच्या आधुनिक काळामध्ये कसं बहुसंख्याकांच्या विरोधी काम करून विशिष्ट वर्गाला बळ देतात आणि त्यांचे हितसंबंध जपतात याचं इतकं वास्तववादी चित्रण अलीकडच्या मालिकांमध्ये आलेलं नाही.

Do You Know What Someone With No Money Has In Common With Someone With Too Much Money? Living Is No Fun For Them.

“स्क्विड गेम्स” मालिकेतलं हे वाक्य आहे. प्रचंड पैसा, साधनसंपत्तीवर असलेली मक्तेदारी आणि राजकीय ताकद या जोरावर भांडवलशाही कसा विचार करते आणि कशी वागते याचं उत्तम उदाहरण या मालिकेमध्ये दिसतं. या मालिकेला पहिल्या चार आठवड्यात जगभरातल्या ११ कोटी प्रेक्षकांनी पसंती दिली आणि ती ओटीटीवर हिट झाली.

द. कोरियामध्ये लोकांचा आर्थिक स्तर गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्याचं सांगितलं जात असलं तरी या प्रगतीपासून करोडो लोक दूरच आहेत. जगातील सर्वाधिक आत्महत्या या द. कोरियामध्ये होतात विशेषतः वृद्ध लोकांमध्ये. त्याचं कारण अर्ध्याहून जास्त वृद्ध हे गरिबी रेषेखाली राहतात. तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण कमालीचं मोठं म्हणजे २०२० मध्ये ते २२ टक्के एवढं होतं. त्यात महागडं खाजगी शिक्षण, सक्तीची लष्करी सेवा, जीवघेणी स्पर्धा अशा अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. रोजचं जगण्यासाठी कर्ज काढावं लागणं आणि मग खाजगी कर्जाच्या जाळ्यात अडकणं ही सुद्धा द. कोरियातील लोकांची शोकांतिका आहे. मोठमोठ्या उद्योगात असलेल्या कामागार संघटनांना मोडून काढण्यासाठी, संप तोडण्यासाठी झालेला प्रचंड हिंसाचार यासाठी द. कोरिया प्रसिद्ध आहे. काही महिन्यांपूर्वी द. कोरियातील सर्वात मोठी कोरिअन कॉन्फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन या संघटनेच्या नेत्याला कोविडच्या नियमांचं उल्लंघन केल्याने तुरुंगात टाकण्यात आलं. खरंतर त्याने कामगारांचा मोर्चा काढून सरकारी धोरणांवर टीका केली होती आणि कामगारांची एकजूट सरकारला दाखवून दिली होती. कामगार वर्गाला चिरडण्यासाठी द. कोरियाने गेल्या ५० वर्षांत कितीतरी हातखंडे अवलंबले आहेत. अगदी महिलांनाही यातून सोडलं नाही. मारहाण, जाळपोळ करण्यापासून ते आपला हक्क मागणाऱ्या महिलांच्या अंगावर गू-घाण टाकण्यापर्यंत अनेक दृष्कृत्य द. कोरियामध्ये झाली आहेत. मग कंपन्या बंद झाल्याने रस्त्यावर आलेले कामगार, काम नसल्याने वाढलेली गुन्हेगारी असे अनेक सामाजिक प्रश्न ही मालिका एकेका पात्राच्या माध्यमातून पुढे आणते.

“स्क्विड गेम्स” मध्ये २००९मध्ये सॅंगयोंग मोटर्स मध्ये झालेला संप कसा कामगारविरोधात हिंसा करून पोलिसांनी मोडून काढला होता याचा उल्लेख येतो. कारण त्यातूनच बेकार झालेल्या कथेच्या नायकाचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं. पैशांच्या प्रश्नामुळे त्याची बायको दुसऱ्या माणसाशी लग्नं करते. त्यांना असलेल्या मुलीच्या वाढदिवसाला भेटवस्तूही खरेदी करण्याची त्याची परिस्थिती नसते. मग आईचे पैसे चोरून ते दुप्पट करण्यासाठी घोड्याच्या शर्यतीत लावतो आणि हरतो. आर्थिक गाळात गेलेला तो आणखी आणखी गाळात रुतत जातो.

या मालिकेमध्ये समाजातले कर्जबाजारी झालेले, गरीब लोक हेरून, त्यांना ३,८०० कोटी रुपयांच्या बक्षिसाचं आमीष दाखवलं जातं. त्यासाठी त्यांना एक खेळ खेळायचा असतो. त्यांना एका बेटावर नेलं जातं जिथे ४००-४५० लोक हा खेळ खेळण्यासाठी तयार असतात. तिथे काम करणारे सर्वजण मास्क घालून असतात आणि प्रत्येक जण हा कॅमेऱ्याच्या नजरेखाली असतो. त्यामुळे नक्की हे खेळ कोण आयोजित करत आहे हे कधी कळतच नाही. पण प्रत्यक्ष खेळ सुरू होतो तेव्हा लक्षात येतं की खेळात हरणाऱ्यांना थेट गोळ्या घालून ठार मारलं जातं. त्यांना त्यांच्या जगात परत जाण्याचा मार्ग कायमचा बंद होतो. तरीही केवळ पैशांच्या आमीषाने लोक हा खेळ खेळत राहतात. एकदा आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये परत जायची संधी मिळूनही केवळ पैशाच्या आमीषाने सर्व खेळाडू परत येतात. त्यांना झोपण्यासाठी दिलेल्या हॉलमध्ये उंच छताला पैशांचं प्रचंड मोठं भांडं लटकवलेलं असतं. प्रत्येक खेळानंतर हरणाऱ्या आणि मारले गेलेल्या खेळाडूंचे पैसेही त्यात जमा होत असतात. त्यामुळे जितके खेळाडू मारले जातात तितकं उरलेल्या खेळाडूंसाठी बक्षिस वाढत राहतं आणि ते आपल्यालाच मिळेल ही खोटी आशासुद्धा. हा खेळ आयोजित करणारे अर्थातच श्रीमंत वर्गातले काही जण असतात. त्यांच्यासाठी माणसं खेळताना मरणं, ओरडणं, वेदना, हिंसा या गोष्टी करमणूक असते. भांडवलशाही केवळ गरिबांचं शोषण करून थांबत नाही तर त्यांना वेदनेत बघणं यातून त्याना विकृत आनंद मिळतो.

“हेलबाऊंड”मध्ये अचानक काही गरीब लोकांना “पापी” म्हणून ठरवलं जातं आणि कोणीतरी राक्षसी शक्ती येऊन त्यांना क्रूरपणे सर्वांसमोर ठार मारतात, जाळून टाकतात. हळूहळू याचं प्रमाण वाढत जातं, पापी लोकांना या राक्षसी पात्रांकडून पूर्वसूचना मिळते आणि मग ठरल्या दिवशी त्यांना हालहाल करून मारलं जातं. त्या राक्षसी शक्तींना कोणीही थांबवू शकत नाही, पोलीस बघ्याची भूमिका घेतात आणि त्या राक्षसी शक्तींना पाठिंबा देण्यासाठी एक हिंसक गट “अॅरो हेड” तयार होतो. तो लोकांना सातत्याने मारहाण करून त्यांच्यावर दहशत निर्माण करतो. यूट्यूबच्या माध्यमातून तरुणांना भडकवणं आणि एकट्या दुकट्या माणसाला पकडून मारहाण करणं हे त्यांचं काम असतं. अगदी पोलिसांनासुद्धा मारहाण करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. तसंच पापी ठरवलेली लोकं, त्यांच्या कुटुंबियांचे फोटो जाहीर करून त्यांच्यावर ठपका ठेवणं, त्यांची बदनामी करणं हे त्यांचं काम असतं. त्यांच्या मारहाणीच्या भीतीने लोक तक्रार करायलाही पुढे येत नाहीत. त्यामुळे समाजातले गुन्हे कसे कमी झाले आहेत आणि देवाचं राज्य स्थापन होणार आहे, अशा वल्गना केल्या जातात. मग या संपूर्ण प्रकाराला आपला पाठिंबा देणारी, हे सगळं देवाच्या माध्यमातूनच होत आहे असं सांगणारा एक पंथ “न्यू ट्रूथ” नावाने पुढे येते आणि समाजावरची आपली पकड मजबूत करते. राक्षसी शक्ती पापी लोकांना कसं मारतात- म्हणजे जजमेंट डे वगैरे संकल्पना आहेत तसं – याचं थेट प्रक्षेपण टीव्हीवर करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणं, त्यातून पैसे कमावणं आणि निरपराध लोकांना लक्ष्य करणं हा उद्देश असतो. ठराविक लोकचं पापी का ठरतात याचं उत्तर हा पंथ किंवा राक्षसी शक्ती कधीच देऊ शकत नाही. उलट बळी जाणारे बहुतेक निरपराध, गरीब असेच असतात. पण या पंथाच्या हुकुमशाहीला धक्का बसतो जेव्हा एका नुकत्याच जन्मलेल्या बाळाला राक्षसी शक्ती येऊन तू पापी आहेस आणि तीन दिवसांनी तुला शिक्षा मिळणार असं सांगितलं जातं तेव्हा. कारण आतापर्यंत मारण्यात आलेली माणसं मोठी असतात, खोटं बोलणं, अश्लील चित्रफित फोनमध्ये ठेवणं, दोन वेगळ्या पुरुषांशी संबंध ठेवून मूल जन्माला घालणं अशी पापं (?) या लोकांनी केलेली असंगत आणि दहशतीखाली असलेलं जगही ते मान्य करतं. पण नवजात बाळाचं पाप काय असू शकतं?

कोरियाई युद्ध, १९५३
कोरियाई युद्ध, १९५३

कोरिअन सिनेमा किंवा मालिकांमध्ये असलेला प्रचंड हिंसाचार हा कदाचित त्या समाजाचं प्रतिबिंब दर्शवतो. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी अखंड कोरियावर जपानचा प्रभाव होता. पण युद्ध संपल्यावर आणि जपानने शरणागती पत्करल्यावर उत्तर कोरिया हा सोव्हिएत युनियन आणि द. कोरिया हा अमेरिकेच्या प्रभावाखाली गेला. कम्युनिस्ट विरुद्ध भांडवलशाही असा संघर्ष या एकाच देशाच्या दोन तुकड्यांमध्ये सुरू झाला. त्याचा परिणाम १९५० मध्ये युद्धात झाला आणि एकाच देशाचे दोन देश होऊन ते कायमचे शत्रू बनले. उ. कोरियामधील कम्युनिस्ट सरकारवर हुकुमशाही, गरिबी, कमकुवत अर्थव्यवस्था वगैरे टीका सातत्याने होत असते. पण द. कोरिया मात्र प्रगत ठरवला जातो. पण हे सगळं इतकं सरळ-साधं नाही. द. कोरियामध्येही असलेलं कम्युनिस्ट वर्चस्व मोडीत काढण्यासाठी अमेरिका आणि इतर भांडवलशाही देशांनी प्रचंड प्रयत्न केले, ताकद, पैसा पुरवला, पपेट सरकारं बसवली. वर सांगितल्याप्रमाणे कामगार संघटना, कम्युनिस्ट विचारसणी संपवण्यासाठी कायम हिंसेचा वापर झाला. या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेत आणि इथल्या हुकुमशाही सरकारांना मदत करत द. कोरियामध्येही फॅसिस्ट शक्तींनी कधी कोणत्या पंथाच्या माध्यमातून, कधी धर्मगुरू बनून सर्वसामान्यांवर दहशतच निर्माण केली आहे.

फॅसिझम हा केवळ द. कोरियापुरता मर्यादीत प्रश्न नाही. अमेरिकेमध्येही कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये घुसून गुंडांनी घातलेला धुडगूस सगळ्या जगाने पाहिली. हेलबाऊंड बघताना आपल्याकडे गोरक्षकांच्या माध्यमातून आलेल्या फॅसिझमची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. निरपराध मुस्लिमांना गोमांसाच्या संशयावरून ठेचून मारणं, रस्त्यात झुंडीने पशू व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवून मारहाण करून पैसे उकळणं हे या कथेतल्या राक्षसी शक्तींप्रमाणेच आहे. फॅसिझमचं स्वरुप एकचं असतं आणि त्याला फक्त रस्त्यावरची लढाईच तोंड देऊ शकते. ही दोन्ही कथानकं केवळ द. कोरिया नाही तर आजच्या जगाचं वास्तव समोर आणतात.

लेखिका मुंबईस्थित राजकीय पत्रकार आहेत

Write A Comment