fbpx
कला

“न्यू यॉर्ककर”ची कथा सांगणारा “फ्रेंच डिस्पॅच”

न्यू यॉर्कमधून न्यू यॉर्कर नावाचं साप्ताहिक निघतं. त्याचा पहिला अंक १९२५ साली निघाला होता. या साप्ताहिकाचे वर्षाला एकूण ४७ अंक निघतात. एका अंकाची किमत १२ डॉलर असते. कटकट न करता लोक अंक विकत घेतात, कोणी सबसिडी मागत नाही की किंमत कमी करा अशी मागणी करत नाही. १२ लाख लोकं तो नियमितपणे विकत घेतात. सरकारकडून अनुदान वगैरे न मागता वाचकांच्या आणि जाहिरातींच्या आधारावर न्यू यॉर्कर उत्तम चालतो.

अंकाचं एक वैशिष्ट्य ह्यूमर असं आहे. ह्यूमर या शब्दाला मराठीत त्यातल्या त्यात बरा शब्द म्हणजे मौज. मौज म्हणजे मौज. त्यात काहीही असू शकतं. विनोद असतो, विसंगती असते, भंकस असते. मौजेची व्याख्या होऊ शकत नाही. मौजेला लांबी रुंदी नसते.

हिरोशिमा उध्वस्थ झाल्याला वर्ष होऊन गेलं होतं. एक बातमीदार त्या बाजूला जाणार होता, लिहितो असं म्हणाला. संपादक म्हणाले लिहा. बातमीदारानं लिहून पाठवलं. संपादक लै खूष झाले. मजकुराची लांबी फार होती. अशावेळी लेखमाला करणं हा मार्ग लोकं अवलंबतात. संपादक म्हणाले छ्या, लोकांना इतका काळ थांबवणं बरोबर नाही. मग? एकाच अंकात छापून टाकायचं ठरलं. अंक म्हणजे एक लेख. तरीही मावेना. मग संपादकानं जाहिराती काढून टाकल्या. अंकात काही म्हणजे काहीही न ठेवता अथ पासून इती पर्यंत एकच लेख. अंक छापला. तो इतका खपला की कित्येक दिवस तो अंक छापतच राहिले. आईनस्टाईन अंकाची बातमी वाचून स्टॉलवर गेले तर त्यांना अंक मिळेना. मग त्यांच्यासाठी म्हणून अंकाची पुन्हा एक आवृत्ती काढून प्रती त्यांच्याकडं पोचवण्यात आल्या.

एक बातमीदार. तो न्यू यॉर्कभर भणंग फिरत असे. त्याला वाट्टेल त्या विषयावर त्याला वाट्टेल तेव्हां लेख लिहीत असे. न्यू यॉर्कमधल्या उंदरांवर त्यानं लिहिलं. गळ टाकून नदीत पडलेली प्रेतं बाहेर काढून त्या प्रेतावर मिळणाऱ्या वस्तू विकणाऱ्या माणसावर त्यानं लिहिलं. दाढी मिशा असणाऱ्या एका स्त्रीवर त्यानं लिहिलं.

न्यू यॉर्करमधे काय येईल ते सांगता येत नसे. न्यू यॉर्कर म्हणजे हटके, विक्षिप्त, चक्रम, अतरंग मजकुर. तिथं लिहिणारे बातमीदारही तसेच. लेखकानं पाठवलेला लेख प्रसिद्ध व्हायला कधी दोन चार वर्षंही लागत. लेखकानं पाठवलेल्या मजकुरावर येवढे संपादकीय संस्कार होत की प्रसिद्ध झालेला लेख पहाताना लेखकानंही बुचकळ्यात पडावं की हा लेख आपलाच आहे की दुसऱ्या कोणाचा. न्यू यॉर्करची स्वतंत्र भाषा होती. संपादकांचे भाषेबद्दल, शैलीबद्दल, शब्दांबद्दल फार कडक नियम होते. स्वल्प विराम असलेच पाहिजेत असा आग्रह. भाषा तपासणारी फौजच न्यू यॉर्करमधे होती.

“फक” हा शब्द न्यू यॉर्करच्या संपादकांना मंजूर नव्हता. कोणाच्या लेखनात तो आला तर गाळला जात असे. एका लेखकाच्या लेखाचा विषय होता बोटीवर काम करणारे लोक. ते लोक फक हा शब्द अगदी सढळ तोंडानं वापरत असत. लेखात फक पसरले होते. संपादकानं ते कापले. लेखक संपादकांकडं गेला, हुज्जत घातली. फक हा शब्द वगळला तर लेखात काहीच उरत नाही हे दाखवलं. संपादकानं फक या शब्दाला परवानगी दिली. नंतर तो शब्द एकूणच पत्रकारीमधे रूढ झाला, अमेरिकन पत्र तो वापरू लागली.

न्यू यॉर्करला काळ समजत असे.

"न्यू यॉर्ककर"ची कथा सांगणारा "फ्रेंच डिस्पॅच"
“न्यू यॉर्ककर”ची कथा सांगणारा “फ्रेंच डिस्पॅच”

फार लोकांचं न्यू यॉर्कवर प्रेम आहे. अशा लोकांमधेच एक वेस अँडर्सन. वेस अँडर्सन हा चित्रपट दिग्दर्शक आहे. त्यानं न्यू यॉर्कर या विषयावर एक फिल्म केलीय. “फ्रेंच डिस्पॅच” हे त्या फिल्मचं नाव. न्यू यॉर्कर, न्यू यॉर्करचे संपादक आणि बातमीदार, न्यू यॉर्करचा संपादकीय विभाग यावरच ही फिल्म आहे. पण हे सगळे घटक वेस अँडरसनला जसे समजले तसे त्यानं मांडलेत. त्यासाठी साप्ताहिकाचं नाव ठेवलंय फ्रेंच डिस्पॅच आणि तो निघतो फ्रान्समधून.

वेस अँडर्सनवर फ्रेंच न्यू वेव्ह या शैलीच्या प्रभाव आहे. ही शैली फिल्मला प्लॉट वगैरे असावा असं मानत नाही. फिल्मसाठी एखादी कादंबरी, कथा वगैरे असावी असं या शैलीला वाटत नाही. भरपूर लाईट्स वापरून, चमत्कार करून ते फिल्म करत नसत. जीवनाला थेट भिडणं हे त्या शैलीचं वैशिष्ट्य होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि नंतर माणसाचं जगणं, माणसाची वैगुण्य उघडी पडली. माणसाचं जगण रस्त्यावर आलं. इटालियन आणि फ्रेंच दिग्दर्शकांनी ते जीवन जसंच्या तसं दाखवलं.

जगणं अशाश्वत आहे. जगण्यात विसंगती आहेत. ॲबसर्डिटी हा जगण्याचा एक अटळ तुकडा आहे. न्यू वेववाले ते जगणं टाळत नव्हते, दाखवत होते. रोझेलिनी, डी सिका, रेनवा, हिचकॉक. न्यू वेव वगैरे मामला १९५० नंतरचा. म्हणजे आता सत्तर वर्षं होऊन गेलीत. वेस्ट अँडरसनचे चित्रपट आपल्याला ती शैली २०२०मधे आपल्याला दाखवतो. त्यानं केलेल्या चित्रपटात हा फ्रेंच डिस्पॅच हा अगदी ताजा चित्रपट.

फ्रेंच किचनमधला संपादक सांगतो की मी मेलो की पेपर बंद करा. प्रकाशन, जागा वगैरे विकून टाका. काहीही मागं ठेवू नका. ज्यांनी वर्षाची वर्णणी दिली असेल त्यांना उरलेल्या काळाचे वर्गणीचे पैसे परत करा.

फिल्ममधे संपादक मेलेला दिसतो. त्याचा स्टाफ त्याच्या भोवती बसलाय, तंगड्या हलवत ते शेवटचा अंक कसा काढायचा याची चर्चा करताहेत. केक येतोय, केकवर मेणबत्त्या आहेत, एका सहकारी स्त्रीला दाटून येतं. तेवढ्यात तिला संपादकाचा दम आठवतो, रडायचं नाही. एक फ्लॅश बॅक. एक कर्मचारी दरवाजातून आत येतो आणि संपादकाला म्हणतो की फोरमननं मजकूर मागितलाय, अंक छापायची वेळ झालीय. संपादक त्याला नोकरीवरून काढून टाकतो. अंक केव्हाही निघेल, फोरमन कोण गेला अंक छापायची वेळ सांगणारा. नोकरीवरून काढून टाकलं म्हणून तो कर्मचारी रडतो. संपादक दम देतो,रडायच नाही. कर्मचारी दरवाजा बंद करून जायला निघतो तेव्हां आपल्याला भिंतीवर लिहून ठेवलेलं दिसतं, या ऑफिसात रडायला परवानगी नाही.

फिल्ममधे एक चित्रकार आहे. खून केल्याबद्दल त्याला शिक्षा झालीय. तो ३,६४७ दिवस तुरुंगात आहे, त्याचे १४,६३० दिवस उरलेत. त्यानं स्वतःची मरण्याची व्यवस्था केलीय. तुरुंगात त्याला दररोज मिळणारा माऊथ वॉश पितो. कोर्ट त्याला म्हणतो की तू दोन खून केलेस. तो थंडपणानं सांगतो की पहिला माणूस चुकून मारला गेला, तो अपघात होता. दुसरा माणूस मारला तो स्वसंरक्षणासाठी. या चित्रकारानं काढलेलं चित्रं तुरुंगात दुसरा फ्रॉडसाठी पकडलेला चित्रव्यापारी विकत घेऊ इच्छितो. चित्राची किमत विचारतो. चित्रकार किमत सांगतो ५० सिगारेट्स. व्यापारी म्हणतो की मी अडीच लाख फ्रँक्स देणार आहे. पण सध्या मी तुला ॲडवान्स म्हणून चार सिगरेट्स देतो.

अशी माणसं. अशा माणसांवरचे लेख. ते छापणारं फ्रेंच डिस्पॅच.

चित्रपट अत्यंत देखणा आहे. टॅब्लो, प्रत्यक्ष चित्रण, टुडी शैली, कार्टून ॲनिमेशन शैली अशा अनेक शैलींचं मिश्रण चित्रपटात आहे.रंग, मांडणी, चित्रीकरण सारंच अजब सुंदर आहे.

चित्रपट न्यू वेव शैलीतला आणि विषय सुद्धा विक्षिप्त. त्यामुळं कोणी जर चित्रपटातून अर्थ वगैरे काढायचा प्रयत्न करू लागला तर त्याची गोची होणार. जगणं जसं तुकड्यात,असंबद्ध, विक्षिप्त तसाच चित्रपट. तीच या चित्रपटाची गंमत आहे. चित्रपट ऑस्करच्या रांगेत आहे. काही तरी नक्की हाती लागणार!

ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक व सिद्धहस्त लेखक

Write A Comment