fbpx
विशेष

पुणेरी पगडी आणि फुले पगडी

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांना फुले पगडी घालायला लावली आणि महाराष्ट्रात एकदम वादंग सुरू झाले. पवार यांनी पुणेरी पगडीचा अवमान केला. पवार यांनी पुणेरी पगडी नाकारली. त्यांचे भान सुटले आहे. त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. विद्वत्तेची ओळख असलेल्या पुणेरी पगडीलाही त्यांनी क्षूद्र राजकारणात ओढले. निवडणुका आल्या की या जाणत्या राजाला जात आठवते. भाजपने कोल्हापूरच्या संभाजीराजे यांची राज्यसभेवर नेमणूक केली तेव्हा पवार म्हणाले : एकेकाळी छत्रपती पेशवे नेमत होते पण आता पेशवे छत्रपतींना नेमायला लागले आहेत, या त्यांच्या विधानाची आठवण काढून पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पेशवे ठरविले, असा आक्षेप घेतला गेला. न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले हेही पुणेरी पगडी घालत होते, मग तेही जातीयवादी होते का ? एकोणिश्शे पंच्याण्ण्वला युतीचे सरकार आले तेव्हाही पवारांना पेशवाईची आठवण झाली होती. अशी टीका व्हायला लागली. समाजमाध्यमांवर तर ‘‘मी इटालियन लुगडी धुवीन.. पण पुणेरी पगडी घालणार नाही’’. तसेच ‘‘आंबे खाऊन कोणी बा होत नाही.. आणि पगडी बदलून ज्योतिबा होत नाही’’, अशीही टवाळी सुरू झाली. यात अर्थातच समस्त अभिजन आणि संघपरिवाराचे समर्थक आघाडीवर होते. त्यातही भाजपमधले ‘बाटगे बहुजन’ पराकोटीचे आक्रमक होते.   पुण्याच्या मेळाव्यात पवार यांचे पुणेरी पगडी घालून स्वागत केले गेले. पवार यांनी नेहमीप्रमाणे ती पगडी घालून घेतली. नाकारली नाही. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना मुस्लिमांच्या कार्यक्रमात गेले होते. तेव्हा मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने त्यांना त्यांची टोपी घालायचा प्रयत्न केला. पण मोदी यांनी ती डोक्यावरची मुस्लिम ओळखीची टोपी नाकारली होती, हे विशेष. प्रश्न राष्ट्रवादी काँगे्रसच्या पुण्यातील कार्यक्रमातल्या पगडीचा आहे. छगन भुजबळ प्रकृतीच्या कारणास्तव थोड्या उशिरा व्यासपीठावर आले. तेव्हाही त्यांचे स्वागत पुणेरी पगडी घालून केले गेले. पण पवार भाषणाला उभे राहिले तेव्हा स्वागत कसे करायचे हे मी आता तुम्हाला दाखवितो, असे ते म्हणाले. त्यांनी भुजबळ यांना पुढे यायला सांगितले. ज्यांनी पुणेरी पगडी घालून त्यांचे स्वागत केले होते त्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या अध्यक्षांच्या हस्ते त्यांनी भुजबळ यांना फुले पगडी घालायला लावली. शिवाय, यापुढे पक्षाच्या कार्यक्रमात याच पगडीने स्वागत करायचे, असा आदेशही त्यांनी दिला. फुलेपगडी घातलेल्या भुजबळ यांचे पटापट फोटो निघाले. विषय संपला.

पण पुणेरी पगडीनंतर भुजबळांना फुले पगडी घालायला लावली म्हणून सगळीकडे एकदम वादंग सुरू झाले. अवमान झाला.. अवमान झाला.. म्हणून तपथाकथित संस्कृतीरक्षक उर बडवून घेऊ लागले. अगदी इतिहास आणि भूगोल काढून संस्कृती रक्षक पुण्यापासून थेट गोखले आणि रानडे यांच्यापर्यंत पाहोचले. आणि पवार कसे कट्टर जातीयवादी आहेत, असे सिद्ध करण्याची अहमिहिका लागली. पण यात एव्हडे आकांडतांडव करण्यासारखे काय होते ?   राजकारणात, समाजकारणात, वेगवेगळ्या चळवळीत नेहमीच प्रतिके वापरली जातात. प्रत्येक प्रवाह प्रतिकांच्या माध्यमातून आपली अशी वेगळी ओळख निर्माण करत असतो. विचारसरणीनुसार रंग, झेंडे, चिन्हे तसेच निशाणे ठरविली जातात. आपल्या विचाराला साजेशी इतिहासातील उदाहरणे शोधून त्यांचे दाखले दिले जातात. प्रस्थापित तसेच प्रस्थापित विरोधी, असे सगळेच प्रवाह आपापल्या सांस्कृतिक मानचिन्हांचा आग्रह धरतात. प्रस्थापित विरोधी विचाराचे जुन्या अस्मिता नाकारून नव्या अस्मिता निर्माण करतात. प्रस्थापित विचाराचे गट, पक्ष, संघटना प्रस्थापित असलेल्या अस्मिता जागवतात. परंपरा जपतात.  भारतातील ब्रिटिश राजवटीचे जोखड उलथून टाकण्याकरिता १८८५साली देशात इंडियन नॅशनल काँग्रेस या राजकींय पक्षाची स्थापना झाली. तत्पूर्वी भारताला राजकीय विचार नव्हता. राजकारण परिचित नव्हते. सहाजिकच राजकीय पक्षही अस्तित्त्वात नव्हते. ब्रिटिश राजवट आणि इंग्रजीच्या शिक्षणातून भारतीयांना युरोपातील राजकीय स्थित्यंतरांची तसेच वैचारिक घडामोडींची माहिती झाली. स्वातंत्र्य, लोकशाही, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये तसेच साम्यवादी विचारसरणी भारतीयांना ज्ञात व्हायला लागली. भारतीय समाजाला जाग यायला लागली होती. १८५७च्या फसलेल्या बंडानंतर भारतीय समाजात आत्मपरीक्षण सुरू झाले होते. आपण पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र झाले पाहिजे, असे वाटू लागले. युरोपात अनेक राष्ट्रे काही शतकांपासून आकाराला आली होती. तथापि, ती एक भाषिक, एक वांशिक आणि एका संस्कृतीतून आकाराला आलेली होती. त्यामुळे भारतात जेव्हा स्वातंत्र्यांची चर्चा व्हायला लागली तेव्हा ब्रिटिश म्हणू लागले की भारत हे राष्ट्रच नाही. भौगोलिक विभिन्नता, हजारो भाषा, हजारो जाती, जगाच्या पाठीवरचे सगळे धर्म, परस्परांशी फटकून असलेल्या विविध प्रकारच्या संस्कृती तसेच वर्ण यात कुठेच साधर्म्य नसल्याने राष्ट्र कसे साकारणार, असा त्यांचा सवाल होता. तसेच आम्ही निघून गेलो तर हा देश पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून पडेल. असे त्यांचे म्हणणे होते.

पण या सगळ्या वैविध्यातही भारत नावाच्या राष्ट्राची बांधणी होऊ शकते, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे होते. काँग्रेसच्या स्थापनेआधी तसेच स्थापनेवेळी यावर सखोल चर्चा झाली होती. त्यात दादाभाई नवरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक अशा दिग्गज प्रभृतींचा समावेश होता. या मंडळींनी पक्षबांधणीही केली आणि देशाची उभारणीही. चळवळीच्या माध्यमातून भारतातील यच्चयावत सगळ्या वैविध्यांना एका व्यासपीठावर आणले तसेच सगळी वैविध्ये एकत्र आणून भारत नावाच्या आधुनिक राष्ट्राचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणले.

या पाश्र्वभूमीवर भारतीय राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक होता. कोणत्याही एका धर्माचे, वंशाचे, भाषेचे, प्रदेशाचे आणि संस्कृतीचे वर्चस्व राष्ट्रावर नव्हते. तो सर्वांना बरोबर घेणारा, सर्वांना समान न्याय देणारा होता.  ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर काँग्रेस पक्षावर कोणत्याही एका धर्माचा, भाषेचा, संस्कृतीचा प्रभाव नव्हता. भारताची राज्यघटना बनवितानाही तिच्यावर अशा कोणत्याही एका घटकाचा प्रभाव राहणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. विशेषतः धर्माचा, मग तो हिंदू असो की मुस्लिम असो की खिस्ती ! द्विराष्ट्रवादाच्या विकृत विचाराने या देशाची फाळणी झाली होती. मग तो हिंदू राष्ट्रवाद असो की मुस्लिम. त्यामुळे अशा कोणत्याही विकृतीला राज्यघटनेत स्थान नाही. या विचारानुसार देशाचा ध्वज तिरंगा ठरला. ‘जन गण मन’, हे राष्ट्रगीत ठरले. या राष्ट्रगीताने देशातील सगळी प्रादेशिक, भाषिक, भौगोलिक तसेच वांशिक वैशिष्ठ्ये तसेच वैविध्ये आत्मसात केली. कोणत्याही धर्माची दूरान्वयेही दखल घेतली नाही. हे विशेष ! काँग्रेस पक्षाचा ध्वजही तिरंगा ठरला. त्यात स्वालंबन आणि साधेपणाचे प्रतिक म्हणून चरखा आला. काँग्रेस कार्यकत्र्यांचा वेशही सपेâद खादीचा झाला. गांधी टोपी म्हणून ओळखली जाणारी पांढरी टोपी कार्यकर्त्यांच्या डोक्यावर आली. आंदोलने आणि चळवळी नसतील तेव्हा कार्यकर्ते रचनात्मक कामाला वाहून घेऊ लागले. खादी, ग्रामस्वच्छता, अस्पृश्यता निवारण, सामाजिक सलोखा, अशी कामे कार्यकर्ते करत. कार्यकत्र्यांच्या राजकीय सामाजिक भूमिका सुस्पष्ट राहाव्यात यासाठी पक्षातर्फे वैचारिक शिबिरे घेतली जायची. या सगळ्यातून काँग्रेसने आपली ठसठशीत, अशी ओळख तयार केली. त्यामुळे काँग्रेसची सगळी प्रतिके, चिन्हे, कार्यक्रम, घोषणा, त्यांनी रूढ केलेल्या परंपरा या त्यांच्या राजकीय वैचारिक भूमिकेशी साजेशा होत्या. कारण त्या त्याच विचारधारेतून निश्चित करण्यात आल्या होत्या.

समाजवादी हे मूळचे काँग्रेसचेच. पण ते काँग्रेसपासून वेगळे झाल्यावर त्यांनीही आपली प्रतिके थोडीफार वेगळी बनविली. समाजवादी हे सगळे परस्परांचे ‘साथी’ बनले. म्हणजे सफेद खादीऐवजी काही समाजवादी रंगीबेरंगी खादी वापरायला लागले. लाल झेंडे घेऊन त्यांनी देशात एकेकाळी कामागारांचे मोठे संघटन उभे केले. राष्ट्र सेवा दलाच्या शाखा चालविल्या. दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक यांच्या प्रश्नांबद्दल त्यांना मनापासून आस्था वाटते. साने गुरुजींच्या संस्कारामुळे ही माणसे उपेक्षितांबद्दल कायम हळुवार राहिली. काँग्रेसने सहमतीच्या तत्त्वाचा कसोशीने वापर केला. पण समाजवादी स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक. त्यामुळे मतभेद झाले की लगेच सवता सुभा, ही समाजवाद्यांची ओळख निर्माण झाली.

कम्युनिस्टांनी लाल रंगाला आपली ओळख बनविली. त्यामुळे जगभरातल्या डाव्यांनी तसेच पुराोगाम्यांनी हा रंग स्वीकारला. मग ते साम्यवादी असोत वा नसोत. साम्यवाद्यांनी कामगार कष्टकऱ्यांच्या लढ्याला प्राधान्य दिले. १ मे या कामगार दिनाला जगभर महत्त्व दिले जाते. कामगार क्रांतीचे प्रतीक म्हणून डाव्यांच्या पक्षाचे आणि कामगार संघटनेचे ध्वज लाल झाले. पक्षानुसार त्या ध्वजावर विळा कोयता, विळा हातोडा, विळा कणीस अशी चिन्हे आली पण ध्वजाचा रंग लालच राहिला. पक्षाचे तसेच संघटनांचे कार्यकर्ते परस्परांना ‘कॉम्रेड ’ म्हणून संबोधतात. साम्यवादी कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या नावाआधी कॉम्रेड ही उपाधी आली. साम्यवादी चळवळीत लाल सलामला मोठे महत्त्व आहे. नेत्याच्या स्वागताला सन्मानाने मोठ्या शिस्तीत ‘लाल सलाम’ ठोकला जातो. नेता कार्यकर्ता निर्वतला तर तेव्हातर मोठ्या सन्मानाने त्याला अखेरचा ’लाल सलाम’ दिला जातो. साम्यवादी कॉम्रेड एकत्र राहण्याच्या ठिकाणाला ‘कम्यून’ म्हटले जायचे. ही संल्कपना जवळपास सगळ्या डाव्यांनी स्वीकारली होती. कम्युनिस्ट पक्षात शिस्तीला मोठे महत्त्व दिले जाते. कार्यकत्र्यांना मार्क्सवादाचे प्रशिक्षण सक्तीचे असते. त्यामुळे स्टडी सर्कल अथवा अभ्यास वर्गांना या चळवळीत महत्त्व दिले जाते. साम्यवाद्याप्रमाणेच सगळ्या डाव्यांमध्ये अभ्यास वर्गांना महत्त्व दिले जाते. भाकप, माकप, लाल निशाण आणि शेकाप हे सगळेच साम्यवादी किंवा साम्यवादाला जवळचे असे डावे पक्ष. शेकापचे कार्यकर्ते परस्परांना ‘भाई’ म्हणतात. या सगळ्या चळवळींनी आपापली प्रतिके निर्माण केली. त्यांनी दुसऱ्यांच्या विचाराची प्रतिके कदापिही स्वीकारली नाहीत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेच्या विरोधात तसेच सामाजिक समतेच्या प्रस्थापनेकरिता आयुष्यभर लढा दिला. चार्तुवर्णव्यवस्थेचा पुरस्कार करणारी मनुस्मृती त्यांनी जाळली. महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह केला. पेशवाईच्या काळात अस्पृश्यता पराकोटीची जाचक होती. त्या पेशवाईच्या पाडावाकरिता महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने शर्थीने लढले होते. कोरेगाव भीम जवळ इंग्रजांनी आपल्या बाजूने लढलेल्या महार तसेच इतरही जातीच्या शूरांची नावे तिथल्या स्मारकावर नोंदविली होती. डॉ. आंबेडकरांनी या स्मारकाला भेट देऊन वंदन केले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही हिंदू धर्मात न्याय मिळेनासा झाल्यावर त्यांनी जाहीररीत्या धर्मांतर करुन बौद्ध धर्म स्वीकारला. ह्रिंदू देवदेवता आणि परंपरा लाथाडल्या. लग्नविधीपासून बौद्ध धर्मातील सगळ्या चालीरीती स्वीकारल्या. डॉ. आंबेडकरांच्या अनुनयांनी ठिकठिकाणी बौद्ध विहार सुरू केले. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेनंतर या पक्षाने निळा रंग स्वीकारला. निळ्या रंगाचा ध्वज साकारला. तेव्हापासून निळा रंग हा आंबेडकरी चळवळीचा रंग ठरला. या चळवळीने आपली सगळी प्रतिके नव्याने निर्माण केली. धम्मचक्र परिवर्तन दिनी नागपुरात मोठ्या संख्येने दलित बांधव जमतात. बाबासाहेबांच्या निधनानंतर महापरिनिर्वाण दिनासाठी लाखोंच्या संख्येने लोक चैत्यभूमीवरील स्मारकाला वंदन करतात. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा स्मृतिदिन साजरा केला जातो. आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. आता त्यात कोरेगाव भीमा येथील स्मृतीस्तंभाला भेट देण्याची प्रथाही सुरू झाली. कोरेगाव भीमा या गावाजवळच ‘वढू बुद्रुक’ हे गाव आहे. तिथे औरंगजेबाच्या सैन्याने संभाजीराजांना हालहाल करुन मारले आणि त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करुन इतस्तता फेकले होते. इतकेच नव्हेतर संभाजीराजांवर कोणी अंत्यसंस्कारही करु नयेत, असे फर्मान औरंगजेबाने काढले होते. पण तरीही गावकुसाबाहेरचे संभाजीराजांच्या शरिराचे तुकडे गोविंद महार यांनी एकत्र करुन महाराजांवर अंत्यसंस्कार केले होते. येथे संभाजीराजांची तसेच शाक्तपंथीय कवि कलश यांची समाधी आहे. शिवाय, या वढू बुद्रुकला गोविंद महार यांचीही समाधी आहे. कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला भेट द्यायला जे लोक जातात ते जवळच्या वढू बुद्रुकला जाऊन संभाजीराजांच्या तसेच गोपाळ महार यांच्या समाधीचेही दर्शन घेतात. कोरेगाव भीमा हे पेशवाईच्या विरोधातले प्रतिक बनले आहे. तर वढू बुद्रुक हे एक प्रकारे मराठा आणि दलितांचे ऐक्याचे प्रतिक बनले आहे  तिथे जसे दलित जातात तसेच आता मराठेही जायला लागलेत. ही दोन्ही प्रतिके ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात जाणारी आहेत त्यामुळे ब्राह्मण्याच्या विरोधात जे कोणी आहेत त्यांच्या ती अस्मितेची प्रतिके बनली आहेत. आणि भविष्यातही त्यांना महत्त्व दिले जाणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच मराठा आणि आंबेडकरवादी यांच्यात दरी निर्माण करण्यासाठी हिंदुत्त्ववाद्यांनी कोरेगाव भीमाला योजनापूर्वक दंगल घडविली होती.

काँग्रेसच्या उदयानंतर भारतीय राजकारणात सगळी वैविध्ये सामावून घेणाऱ्या सर्वसमावेशकतेला महत्त्व होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच तो इथल्या राजकारणाचा मुख्यप्रवाह बनला होता. त्याच्यामागे चळवळीची मोठी लोकशक्ती उभी झाली होती. पण त्याच काळात धर्माच्या आधारावर राजकारण करायला सुरुवात झाली. हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच मुस्लिम लीग यांनी तिचा पाया घातला. धर्माचे राजकारण म्हणजे स्वधर्मीयांच्या हिताला प्राधान्य देणे. धर्म, संस्कृती आणि धार्मिक परंपरांचे उदात्तीकरण करणे. मग त्यात मूठभरांच्या हितासाठी कितीही विषमता, अन्याय आणि कौर्य असले तरी. एवढे करुनही धर्माचे राजकारण यशस्वीपणे पुढे जात नाही. कारण एकाच धर्मियांमधले अंतर्विरोध. त्यामुळे पुढे जाऊन इतर धर्म, संस्कृती याबद्दल शत्रुत्त्व निर्माण करावे लागते. शिवाय, आणखी एक जालिम उपाय म्हणजे धर्माची सांगड राष्ट्रवादाशी घातली जाते. हिटलरने वंशाची सांगड राष्ट्रवादाशी घातली होती. भारतात धर्माची सांगड राष्ट्रवादशी घालण्याचे प्रयत्न १९१६ पासून केले गेले. त्यातूनच सावरकरांनी द्विराष्ट्रवादाची मांडणी केली. त्याची विषारी फळे १९४७साली फाळणीमध्ये आपल्याला मिळाली. मधल्या काळात राजकारणात पिछेहाट झाली तरी नव्वदीच्या दशकापासून आक्रमक हिंदुत्त्वाच्या राजकारणाला तेजी आली. आणि आतातर सर्वंकश सत्ताच नव्हेतर देशाची वाटचाल हिंदूराष्ट्राकडे सुरू झाली आहे. धार्मिक राजकारणासाठी धर्म तसेच धार्मिक परांपरांतून आपल्या राजकारणाची ओळख पक्की करण्यासाठी प्रतिके घेतली गेली. काही नव्याने निर्माण केली गेली. रास्वसंघाने तर आपला वेगळा असा गणवेश तयार केला. खाकी चड्डी, पांढरा शर्ट, डोक्यावर काळी टोपी आणि हातात लाठी. ध्वज अर्थातच भगवा ठरविला होता. राष्ट्रध्वजही भगवा पाहिजे, असे त्यांचे अनेकवर्षे म्हणणे होते. छातीवर आडवा हात धरून भगव्या ध्वजाला सलाम करण्याची पद्धतीही वेगळी होती. ‘नमस्ते सदा वत्सले’, हे संघगीत तयार केले. अशा बाबीतून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. धार्मिक तसेच धर्मांध विचारधारेला साजेशी घोषवाक्ये निर्माण केली. ‘‘गर्व से कहो हम हिंदू है‘‘, ही घोषणा ही बाळासाहेब ठाकरे यांची घोषणा आकर्षक ठरली. तसेच ‘हसके लिया पाकिस्तान, लड के लेंगे हिंदुस्थान अशीही घोषणा एका विशिष्ठ कालावधीत लोकप्रियच ठरते. धार्मिक धृवीकरणाला टोक आणले की धर्माच्या राजकारणाला बरकत येते. यासाठी सोयीच्या इतिहासाची धुणी वर्तमानात धुतली जातात. शिवाजी महाराजांसारख्या थोर ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा राजकारणासाठी वापर केला जातो. त्यांचा संघर्ष धार्मिकच कसा होता आणि ते कसे कट्टर हिंदू होते, हेही जनमानसात रुजविले जाते. अशा प्रकारच्या राजकारणाचा विवेकाशी, विचारांशी संबंध नसतो उलट तो अविवेकाशी आणि अविचाराशी असतो. त्यामुळे धर्मांध राजकारणी आणि कार्यकर्ते सतत धर्मगंडाने पेटलेले असतात. दुसरा कुठलाही परधर्मीय त्यांना शत्रूच वाटतो. तुम्ही रस्त्यावर नमाज पढता तर आम्ही रस्त्यावर महाआरती करतो, असा त्यांचा पवित्रा असतो.
राजकारणात प्रत्येकाची काही प्रतिके असतात. ती निर्माणही केली जातात. त्यांची म्हणून एक परिभाषा असते. घोषवाक्ये असतात. या सगळ्यांना आपली प्रतिके दुसNयावर लादायची असतात. ज्या राजकीय विचाराची प्रतिके, चिन्हे, घोषवाक्ये नष्ट व्हायला लागतात. तेव्हा त्या विचाराचे राजकारण अधोगतीकडे निघाले आहे, असे समाजावे. मध्यंतरी भाजपने आणलेली प्रतिके, संकल्पना, घोषवाक्ये कमालीची लोकप्रिय झाली होती. उदा. महाआरती, महाअधिवेशन, चिंतन बैठक. तेव्हा उतरती कळा लागलेले काँग्रेसवालेही आमची परवा ‘चिंतन बैठक’ आहे. आमचे ‘महाअधिवेशन’ होणार आहे, असे सांगू लागले. लोकही आज गणपतीची महाआरती आहे, असे म्हणू लागले. काँग्रेसवाले त्यांची परिभाषच नव्हेतर मूलभूत विचारही विसरले होते. तेव्हा विस्मरण झालेले विचार, प्रतिके, घोषवाक्ये, परिभाषा पुन्हापुन्हा कार्यकर्त्यांपुढे मांडावी लागते. आपल्या विचाराची बैठक पक्की करण्यासाठी नव्याने काही प्रथा सुरू कराव्या लागतात. प्रतिके ठसवावी लागतात.
पुणेरी पगडी ही पेशव्यांची आणि अभिजनांची होती. गोखले, रानडे या प्रागतिक विचाराच्या नेत्यांनी जरी ती पगडी घातली असली तरी महात्त्मा फुले यांनी ती घातली नव्हती. ती अर्थातच सर्वसामान्य बहुजनांची नव्हती. याच प्रस्थापितांच्या पगडीने पुण्यात स्वागत केले जायचे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवालेही तेच करायचे. म्हणूनच शरद पवार यांनी फुले घालत तशा प्रकारच्या पागोट्याची ‘फुले पगडी’ घालण्याची सूचना केली. तेव्हा पवारांना जातीयवादी ठरविले गेले. त्याचे मूळ कारण असे की बहुजनांच्या राजकीय सामाजिक विचाराला साजेसे, असे प्रतिक त्यांनी प्रस्थापित पुणेरी पगडीच्या विरोधात नव्याने निर्माण केले. म्हणूनच तो गहजब. खरेतर हे त्यांनी खूप आधी करायला पाहिजे होते. धर्मांध राजकारणाशी दोन हात करताना जोमाने आपले विचार रुजविले पाहिजेत. त्याकरिता नव्या प्रथा, परंपरा, प्रतिकेही निर्माण केली पाहिजेत. निधर्मी राजकारणास पोषक ठरू शकतील, अशा अस्मिताही शोधल्या पाहिजेत. हे काम काँग्रेस राष्ट्रवाद्यांनीच नव्हे तर सगळ्या धर्मनिरपेक्ष शक्तींनी करण्याची गरज आहे.

लेखक महाराष्ट्रातील अव्वल राजकीय विश्लेषक व भाष्यकारांपैकी एक महत्वाचे विश्लेषक आहेत

1 Comment

 1. rajesh annikhinni Reply

  १) प्रथम शरद पवार आणि छगन भुजबळ याना पुणेरी पगडी घातली पण ती पगडी होती प्रत्यक्ष पेशव्यांना देहांत शिक्षा ठोठावणाऱ्या रामशास्त्री प्रभुणे यांची , सत्य अहिंसा आणि प्रेम या संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांचे गुरु गोपालकृष्ण गोखले यांची ,सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असे अग्रलेखात लिहीणार्या आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे इंग्रज सरकारला ठणकावून सांगणाऱ्या ,आणि तुरुंगवासात गीतेतील कर्मयोग उलगडून दाखविणारे गीतारहस्य लिहीणार्या लोकमान्य टिळकांची
  २) हि पगडी जेव्हा शरद पवार यांचे डोकीवर बसली तेव्हा ती विचार करू लागली कि मी इथे कोठे आले ?ज्या माणसाने आपल्याच पक्षातील जेष्ठ नेते वसंतदादा पाटील यांचे पाठीत विश्वासघाताने खंजीर खुपसून त्याचे राज्य एका रात्रीत पाडून जो मुखमंत्री बनला त्या माणसाच्या डोक्यावर ? ज्या छगन भुजबळ यांचा तुरुंगातून जामिनावर सुटल्याबद्दल सत्कार होतो आहे त्याच भुजबळांनी शिवसेनेत आमदार असताना पवारांनी भूखंडाचे श्रीखंड कसे खाल्ले होते यावरून मोठा गदारोळ करून विधानसभेचे कामकाज बंद पाडले होते (छगनला विकत घ्याला किती वेळ लागतो )त्या माणसाच्या डोक्यावर ? कसाबने मुंबईत निरपराध माणसांना ठार मारून संपूर्ण भारत देश दोन दिवस ओलीस धरला होता त्या कसाबच्या वकिलाला आपल्या पक्षाची खासदारकी देणाऱ्या माणसाच्या डोक्यावर ? ज्या माणसाने केंद्रात संरक्षणमंत्री असताना दाऊद इब्राहिम च्या शार्प शुटर याना संरक्षण खात्याच्या विमानातून आणले असे आरोप
  गोपीनाथ मुंढे यांनी केले होते आणि ज्याचे समाधानकारक उत्तर अजून जनतेला मिळाले नाही त्याच्या डोक्यावर? ,ज्याने खोठ्या स्टॅम्प पेपर छापवून करोडो रुपयांच्या भ्रस्टाचार केला त्या तेलगीने त्याची नार्को तपासणी करताना ज्या माणसाचे नाव आपला मानस पिता म्हणून घेतले त्या माणसाच्या डोक्यावर ?ज्या दाऊद इब्राहिम याने मुंबईत ११ बॉम्बस्फोट केले असता ज्याने १२ स्फोट केले आणि १२ वा स्फोट मुस्लिम वस्तीत झाला असे खोटे सांगून मुसलमानाची दाढी कुरवळणाऱ्या माणसाच्या डोक्यावर ? ज्याने सोनिया गांधीच्या इटालियन जन्मावर आक्षेप घेऊन काँग्रेस पक्ष सोडला आणि पुन्हा त्याच पक्षाशी हातमिळवणी करून निवडणूक लढविल्या व सोनिया गांधी याना बिनदिक्कतपणे पाठिम्बा दिला त्याच्या डोक्यावर ?
  ३) हि पगडी जेव्हा छगन भुजबळ याच्या डोक्यावर आली तेव्हा ती विचार करू लागली कि मी इकडे कोठे आले ? ज्या माणसाने बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या हिंदू हृदयसम्राट यांचेशी गड्डरी केली आणि आपण सूर्याजी पिसाळ याची औलाद आहोत हे दाखवून दिले त्याच्या डोक्यावर ? ज्या माणसाने
  खोठ्या स्टॅम्प पेपर छापवून करोडो रुपयांच्या भ्रस्टाचार केला त्या तेलगीशी संभान्ड असल्याच्या आरोपावरून राजीनामा दिला त्याच्या डोक्यावर ?ज्या माणसाने अब्जावधींची संपत्ती चा भ्रस्टाचार केला म्हणून त्याचेवर खटला भरला आणि त्या खटल्यात सकृतदर्शनी पुरेसे पुरावे आहेत असे नायायाधीशाना पटल्याने त्यांनी दोन वर्षे तुरुंगात ठेवले आणि नंतर केवळ जामिनावर मोकळे केले अशा भ्रष्ट माणसाच्या डोक्यावर ?
  ४) हि पुणेरी पगडी घातल्यावर शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या मनात उलथापालथ सुरु झाली आणि ती पवित्र पराक्रमी पगडी घालणे असह्य झाल्याने शरद पवार यांनी ती काढून टाकली आणि दुसरी पगडी घातली

Write A Comment