fbpx
विशेष

मा. प्रणवबाबु मुखर्जींच्या निमित्ताने…

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी रा.स्व.संघाच्या मंचावर हजरी लावणार अशी बातमी येताच त्यांनी तेथे जावे की जाऊ नये या संदर्भात आणि एकुणच संघाच्या व्यासपीठावर जाणे बरोबर की चूक याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा.स्व.सं.) किंवा जनसंघ यांच्या व्यासपीठावर जाणे, त्यांच्याशी आघाडी करणे भारतीय राजकारणात चुकीचे मानले जात होते, याला जनसंघवाले राजकीय अस्पृश्यता म्हणत होते. स्थापनेपासून रा.स्व.संघ जी मूल्यव्यवस्था व ज्या विचारसरणीला मानतो ती जात आणि स्त्रीदास्य समर्थक विचारसरणी आहे. गोळवलकरांचा ‘बंच ऑफ थॉट्स’ मधून आणि एकुणच त्यांच्या आजवरच्या व्यवहारातून ते स्पष्ट झालेले आहे. या संदर्भात वेळोवेळी महाराष्ट्रात चर्चा होत राहिलेली आहे. म्हणूनच संघाच्या प्रतिगामी विचारांना मानणार्‍या जनसंघाला राजकीय दृष्टीने एकाकी पाडण्याचा प्रयत्न वेळोवेळी झालेला आहे. म.गांधींच्या हत्तेच्या कटात सामील असल्याच्या आरोपाचा कलंक संघाला अजूनही धुवून काढता आलेला नाही, रा.स्व.संघापासून चार हात दूर राहच्याचा सर्वजण प्ररत्न करत असत.

संयुक्त महाराष्ट्र समितीमध्येही जनसंघाला घ्यावे की नाही यावर न भूतो न भविष्यती अशी चर्चा झाली होती. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी नेहमी सांगत असत. ‘देश धरम का नाता है, गाय हमारी माता है’ असे म्हणणार्‍या धर्माधिष्ठीत राष्ट्रवादी विचारांच्या जनसंघाला संयुक्त महाराष्ट्र समितीत प्रवेश देणे ही सर्वात मोठी गंभीर अशी चूक होती.

या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्र समितीत आणि नंतर 1977 मध्ये आणीबाणीच्या काळात जनसंघाला जनता पक्षामध्ये समाविष्ट करून घेण्यात आले, त्यावेळेस डॉ. बाबा आढाव यांनी जनता पक्षाच्या या प्रयोवर कडाडून टिका केली. स्वातंत्र्यचळवळीप्रमाणे आणीबाणीमध्ये माफी मागून तुरुंगातुन सुटणार्‍या रास्वसंघाच्या आणीबाणीविरोधी लढ्यातील सहभागाबद्दलच डॉ. बाबा आढाव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या प्रतिगामी विचारसरणी असलेल्या जनसंघाला जनता पक्षात घ्यावे का?  असा प्रश्‍न त्यांनी विचारला होता. नंतरच्या काळात एस.एम. जोशी यांनी डॉ. बाबा आढाव यांच्या विचारांना मान्यता दिलीच नाही; उलट काही लोकांना एकत्रितरित्या गलबतात बसल्यावर जोराजोरात उलट्याच होतात, त्यातलाच हा प्रकार आहे अशी या विचारांची संभावना केली. आपल्या विचार परिवारातील मित्रांसोबत त्यांचे मतभेद झाले. याबाबत बाबा आढाव लिहिले आहे की, ‘जनता पक्षात असे मित्र बरेच आहेत. (संघ बदलतोय) या विषयावर तुरुंगात आमचे मतभेद होते. रास्वसंघ हळूहळू बदलतोय असे त्यांना वाटते व सध्याच्या राजकीय गटबंधनाच्या दृष्टीने त्यांना ही चर्चा अप्रस्तुत वाटते. महाराष्ट्र काँग्रेसच्या हातात यामुळे आयतेच कोलीत मिळेल असेही काहींना वाटते. मला वाटते इतका तात्पुरता विचार करून भागणार नाही. जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांतीच्या नार्‍याचा मग नेमका अर्थ काय? कोणत्या शक्तींच्या आधारावर या देशाचे राजकारण चालणार? ते शोषित, दलित शक्तींचा विचार करुन राजकारण चालले पाहिजे. काँग्रेसजनांना फारसे उपयोगी पडणार नाही. कारण संघाला नैतिक आधार मिळवून देण्याचे काम स्वत: इंदिरा गांधींनी व त्यांच्या सहकार्‍यांनीच केलेले आहे.’ त्यानंतर जनता पक्षातच द्विसदस्यता प्रकरणावरुन राडा झाला आणि पक्ष फुटला. दुर्दैवाची गोष्ट यात पुढाकार घेणार्‍या जॉर्ज फर्नांडिस यांनीच पुन्हा एकदा काँग्रेसविरोधात बड्या आघाडीची हाक देत वाजपेयी सरकारला सत्तेमध्ये आणण्यामध्ये पुढाकार घेतला. तेव्हा तयार करण्यात आलेल्या ‘नॅशनल डेमॉक्रॅटीक अलायन्स’चे ते निमंत्रक बनले. आणि  म. गांधींच्या हत्येनंतर बाबरी मशीद पाडण्याच्या कृत्यामुळे भाजपाचे जे प्रतिगामी चारित्र्य पुन्हा एकदा पुढे आले होते, अशा काळात त्यांच्याबरोबर युती करुन त्यांना रंगसफेदीची संधी देण्याचे काम पुलोद आघाडीनंतर एनडिएच्यानिमित्ताने पुन्हा समोर आले. हा मुद्दा होता जनसंघ किंवा रास्वसंघासोबत राजकीय युती करावी की न करावी याबद्दलचा.

असाच पेच कम्युनिस्टांपुढेही आला होता. कामगार संघटनांच्या आघाडीमध्ये संघीय विचारसरणीचा भारतीय मजदुर संघ असतो. त्याच्या तेथील सहभागाबाबत प्रश्न उपस्थित केला – आक्षेप घेतला असता कामगार वर्गात राजकारण आणायचं नाही, कामगारवर्गाची एकत्रित आघाडी बांधायची अशा पध्दतीची उत्तरे दिली गेली.  संयुक्त महाराष्ट्र समिती असो, जनता दलाचा प्रयोग असो किंवा नंतरचा एनडिए असो या सर्व प्रक्रियेमध्ये राजकीयदृष्ट्या एकाकी पडलेल्या जनसंघाला, भारतीय जनता पार्टीला त्यांच्या प्रतिगामी विचारव्यवहाराकडे डोळेझाक करत त्याच्याशी एकजूट करण्याचा जे  प्रयत्न झाले त्याची किंमत आपल्याला आज मोजावी लागत आहे.

प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर जाणं या प्रक्रियेतून आपली प्रतिगामी विचारसरणी कायम ठेवून बदलल्याचा आभास तयार करत भारतीय राजकारणात हस्तक्षेप करण्याची रास्वसंघाची वाढलेली हिंमत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली लोकशाही मानणारे संघटन अशी प्रतिमा तयार करण्याची धडपड प्रतीत होते. या पार्श्‍वभूमीवर हा प्रश्न बघायला हवा.

रा.स्व.संघाने त्यांच्या विचारसरणीला साजेशा पध्दतीने जनसंघटना बांधलेल्या आहेत. त्यांनी एकाबाजूला कामगार वर्गाचे हितसंबंध जोपासणार्‍या पक्षांना, कामगार संघटनांना विरोध करण्याची भूमिका घेतली. परंतु नंतर राष्ट्रवादी कामगारांची एकजूट करणे आवश्यक आहे असे म्हणत भारतीय मजदुर संघाची स्थापना केली. दुसर्‍या बाजूला परकीय भांडवलाला मुक्त प्रवेश देण्याच्या प्रक्रियेमध्ये ब्राह्मणी नोकरशाही संपूर्णपणे रास्वसंघाला मानणारी होती. त्या नोकरशाहीने तत्कालिन राज्यकर्त्यांच्या सहकार्याने  परकीय भांडवलाशी हातमिळवणी केली. त्या प्रक्रियेला रास्वसंघाने भरघोस पाठिंबा दिल्याची पावती म्हणून त्यांना परदेशातून फार मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्याचे दिसते. हे पैसे विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम इ. सेवाभावी संस्थांच्या नावाखाली आणून दंगलीमध्ये कशाप्रकारे वापरण्यात आले राची उदाहरणे गुजरात हिंसाचारानंतर प्रसिद्ध झालेली आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वदेशी जागरण मंचही त्यांनीच स्थापन केला. स्वदेशी जागरण मंचाचे निमित्ताने भारतीय बाजारपेठेची बाजू घेणार्‍या विचारांमध्रे हस्तक्षेप करारचा आणि दुसर्‍याबाजूला परकीय भांडवलाला पाठींबा देऊन त्याची पावती म्हणून संघवृद्धीसाठी परकीय पैसा मिळवायचा, अशाच सर्व प्रकारे हा हजार हातांचा ऑक्टोपस सगळ्या पद्धतीने आपल्याला गुंडाळत आलेला आहे. हा ऑक्टोपस आहे याला हजार हात आहेत ही वस्तुस्तिथी विसरून काही लोक त्याचं एकांगी वर्णन करतात आणि मग त्यांच्या मंचावर जाउन आपले विचार मांडायला काय हरकत आहे? असे म्हणतात तेव्हा त्यांच्या आकलनाबद्दल कीव करावीशी वाटते.

दुसर्‍या बाजूला त्यांनी अशाच पद्धतीने जातीव्यवस्थेचे समर्थन करणार्‍या गोळवलकरांना पूजनीय मानायचे आणि नंतर बाळासाहेब देवरस रांच्या 1974च्या भाषणाचा हवाला देत डॉ. आंबेडकर आणि हेगडेवार यांची जन्मशताब्दी एकाच वर्षात आली असे घोषित करत त्याच वर्षात ‘समरसता मंच’ स्थापन करायचा. हेडगेवार-आंबेडकर विशेषांक एकत्रितरित्या काढायचा असे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत.

डॉ. रावसाहेब कसबे यांना या समितीने हेडगेवार-आंबेडकर विशेषांकात लिहिण्यासाठीचे पत्र दिले होते. नाटककार विजय तेंडुलकर एकदा डॉ. रावसाहेब कसबे यांना शेषराव मोरेंचे पुस्तक दाखवत म्हणाले की आता आहे का याला उत्तर? तेव्हा कसबेसरांनी निर्धार केला आणि सावरकरांवरील ग्रंथ लिहायला घेतला. त्यावेळेस आमची (किशोर ढमाले व प्रतिमा परदेशी) त्यांच्या संगमनेरच्या घरी भेट झाली होती. आम्ही पुण्यातून काही दुर्मिळ पुस्तके त्यांच्यासाठी घेऊन गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले, की खरतर मीही यांच्या कारस्थानात अडकलो असतो, पण या पुस्तकाच्या लिखाणामुळे माझे त्यांच्या त्या पत्राकडे दुर्लक्ष झाले, नाही तर कुठलातरी जुना लेख पाठवुन दिला असता आणि नंतर तुमच्या शिव्या खायला लागल्या असत्या.

हेडगेवार-आंबेडकर विशेषांकाचे उद्घाटन करण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि त्यातही डॉ. बाबासाहेबांचे सहकारी असलेल्या दादासाहेब रुपवतेंना बोलवण्यात आले होते. पुण्यातील सत्यशोधक विद्यार्थी संघटना, चेतना गट, डॉ. आंबेडकर संघटना, छात्र भारती, इ. सर्व पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन या अनैतिहासिक तुलना करणार्‍या ग्रंथ प्रकाशनाला विरोध करण्याची भूमिका घेतली होती. पुण्यातील सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या प्रतिमा परदेशी, छाया दाहिंजे इ.नी दादासाहेब रुपवते या कार्यक्रमास उपस्थित राहू नये यासाठी प्रयत्न केले. दरम्यान ताडीवाला रोड जवळील सजनाबाई भंडारी शाळेत सत्यशोधक पोहचले. शाळेचे मुख्याध्यापक केशव मोतीराम भगत यांना विषय सांगितला. दादासाहेबांशी बोलायचे आहे म्हंटल्याबरोबर त्यांनी मुंबईला थेट फोनच लावुन दिला. मनुवाद्यांच्या कार्यक्रमाला तुमची हजेरी कशी काय? इ. बोलणे झाले आणि त्यांना विद्यार्थ्यांची भुमिका मान्य झाली आणि त्यांनी कार्यक्रमाला येणार नाहीत असे संयोजकांना कळवले सुध्दा. पाहुणे रद्द झाले तरी कार्यक्रम रद्द झालेला नव्हता. पुण्यातील पुरोगामी विद्यार्थी आघाडीने कार्यक्रमात जाऊन रितसर निषेध करायचा असा निर्णय घेतला होता. त्यात प्रदीप मोहिते, प्रतिमा परदेशी, हर्ष जगझाप, झिनत खान, राजेश्‍वरी देशपांडे, उषाताई व विलास वाघसर इ. नी पुढाकार घेतला होता. आम्हाला पहाताच संयोजकांची हालचाल सुरु झाली. आमच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले होते. अत्यंत हिंसकपणे समतावाद्यांना रोखण्याचा प्रकार तेव्हा झाला होता. असो अशा प्रकारे हेडगेवार-आंबेडकर एकत्रित मांडणीला प्रत्यक्ष विचार आणि व्यवहाराच्या पातळीवर विरोध करण्याचे काम हे महाराष्ट्रात 80 ते 90 च्या दशकात मोठ्या प्रमाणावर सुरु झाले. जातीस्त्रीदास्यसमर्थक रास्वसंघाच्या व्यासपीठावर जावू नये कारण पुरोगाम्यांच्या तेथे जाण्याने तेथे रास्वसंघाच्या प्रतिगामी आणि विचारांस अधिमान्यता मिळते यासाठी पुरोगामी, समतावादी मतपरिवर्तन करण्याचे काम सुरु होते.

याच संदर्भात आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या संघनेत्यांनी तुम्ही संघस्थानावावर म्हणजे पुण्यातील मोतीबागेत या असे निमंत्रण दिले. नानासाहेब गोरे मोतीबागेत दाखल झाले. त्याबद्दल पुण्यात पुरोगामी वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त केलं गेले. किशोर ढमाले यांनी नानासाहेब गोरेंची भेट घेतली होती व यासंदर्भात विचारलं तेव्हा त्यांनी अत्यंत हिणकस, हिंसक, अश्लिल भाषेत संघ कार्यकर्त्यांनी त्यांना पाठविलेल्या पत्रांचा गठ्ठाच त्यांनी दाखवला. विलास वाघसरांनाही अशीच धमकीची पत्रं आल्याचे त्यांनीही सांगितले होते. किशोर ढमाले यांनी विचारले इतकी विखारी पत्रे पाठविणार्‍यांकडे तुम्ही कसे गेलात? त्यावर ते म्हणाले, अनपेक्षितपणे त्यांनी बोलवल्यामुळे मी होकार दिला आणि मी तिथे जाऊन माझेच विचार मांडले, संघ विचार खोडून काढले. परंतु दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रात त्यासंबंधी बातमीच नव्हती. उलट नानासाहेब गोरेंना वाढदिवसानिमित्त संघ साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले असा उल्लेख मात्र होता. डॉ. बाबा आढाव यांनी पुरोगामी सत्यशोधक मध्ये याविषयी सविस्तर लिहीले आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य वाचावे.

संघाच्या ‘स्टेज’वर जाण्याला एक मोठी पार्श्वभूमी आहे. 1990 नंतर तर समरसता मंच वगैरे ठिकाणी जाणार्‍या पुरोगाम्यांविरुध्द सत्यशोधक विद्यार्थी संघटना, क्रांतिसिंह नाना पाटील अकादमीने तर मोहीमच हाती घेतली होती. फुले-आंबेडकरी चळवळीत त्याला खूपच पाठिंबा मिळाला. जेष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहरांनी गंगाधर पानतावणेसरांच्या समरसतागमनाविरुध्द लिहीले. पानतावणेसरांनी समरसता मंचावर जाण्याचे वेगवेगळ्या पध्दतीने लंगडे समर्थन केले. पण त्यांचा युक्तिवाद टिकू शकला नाही. कुणी अस्पृश्यता मानणे, जातीभेद पाळणे साडत असेल तर त्यांचे स्वागत करायला पाहिजे असे ते म्हणत. पण हे एखाद्या व्यक्तीच्या बाबत म्हणणे आणि रास्वसंघासारख्या संघटित प्रतिगामी शक्तीबाबत म्हणणे यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. हे पानतावणेसरांनी कधीच लक्षात घेतले नाही. अगदी अलीकडील काळातही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दोन-तीनवेळा पडूनही! त्यांची पावती त्यांना विश्‍व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदातून मिळाली! प्रसिध्द विचारवंत हरी नरके यांच्या समरसता मंचावर जाणे, समरसता मंचाच्या नियतकालिकात लेख लिहिणे याबद्दल संतापलेल्या तरुणांनी विशेषत: सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 1996 साली वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी स्वागताध्यक्ष आणि विद्रोही साहित्यिक बाबूराव बागूल अध्यक्ष असलेल्या दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलनात हरी नरके यांचे भाषण उधळल्यानंतर या प्रश्नावरची चर्चा महाराष्ट्रात सार्वजनिक चर्चाविश्‍वात खूप काळ चालली. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी दै. महानगरमधुन सत्यशोधकांची झुंडशाही असे म्हणत हरि नरकेंची पाठराखण केली होती. तीच गोष्ट जेष्ठ संपादक उत्तम कांबळे यांनीही दै. सकाळचे संपादकीय लिहून आमच्यावर टीका करत नरकेंचे समर्थन केले होते. नंतर आनंद यादवांसारखे, अपवाद वगळता साहित्यिकांनी समरसतेला हजेरी लावणे थांबवले. दरम्यान आरक्षणविरोधासाठी मशहूर असलेल्या संघाच्या विद्यार्थी आघाडी अभाविपने प्रतिभा संगम साहित्य संमेलन सुरु केले. प्रख्यात लेखक नामदेव ढसाळांची मुंबईला भरलेल्या प्रतिभा संगम संमेलनात प्रज्ञा दया पवार यांनी घेतलेली मुलाखत हाही असाच एक अपवाद!

प्रा. रणजीत परदेशी फुले-आंबेडकरांचे ब्राह्मणीकरण संघ-भाजपचे डावपेच या पुस्तकात म्हणतात, संघ-भाजप परिवार आपला हिंदुराष्ट्रवाद दलित-ओबीसींमध्ये लोकप्रिय व्हावा म्हणून फुले-आंबेडकर हिंदुसमाजसुधारक होते अशी भ्रमव्यवस्था उभी करीत आहे व फुले-आंबेडकरवादाने अधोरेखित केलेली विभाजनरेषा पुसट करीत आहेत. (पृ. 2) प्रा. रणजीत परदेशी यांनी याच पुस्तकाच्या पान क्र.35 वर समरसता मंचावर गेलेल्या हरी नरकेंसंदर्भात केलेले मापन लक्षात घ्यायला हवे. ‘मार्च 1990 मध्ये मभारतीय विचारसाधना’ या रास्वसंघाच्या प्रचार प्रकाशन संस्थेने ‘म. फुले स्मृतीशताब्दी’ वर्षाचे निमित्त साधून 30 जुलै रोजीच्या मुंबईच्या समरसता परिचर्चेतील निबंध प्रकाशित केले आहेत. श्री. हरी नरके यांनी मांडलेला निबंध, श्री. नरकेंच्या मलपृष्ठावरील परिचयासह प्रकाशकांनी छापला आहे. आपली एरवी क्रांतिकारी मुखवटा धारण करणारी अब्राह्मणवादाची संकल्पना श्री. नरके समरसताश्रेष्ठींच्या अनुनयाखातर सुधारक म्हणून सादर करतात :- ब्राह्मणी धर्माने ‘न स्त्री शूद्राय मतीम दध्यात’  चा मनुवादी दंडक घातल्यामुळे स्त्री-शूद्रादी जातींनी शिक्षण घेणे दंडनीय गुन्हा ठरविला गेला, तप साधना करणार्‍या शंबूकाचा शिरच्छेद आणि एकलव्याचा अंगठा कापणे हे ब्राह्मणी शिक्षणनीतीमुळे झाले, इतिहासाचा दाखला आणि जातीय श्रेष्ठत्वाची कारणमीमांसा देणे समरसता व्यासपीठावर श्री. नरके टाळतात. ही वस्तुस्थिती लपविण्यासाठी ते पुढील भ्रांत कारणमीमांसा देतात-ब्रिटिश काळात शिक्षण घेणे ही पूर्णपणे वैयक्तिक बाब मानली जाई. ब्रिटिश राजवटीत प्रथमच आपल्याकडे शिक्षणव्यवस्थेला सरकारी यंत्रणेचे स्वरुप आले. ब्राह्मण शास्त्या जातींनी हेतूत: जातीय स्वार्थाखातर कनिष्ठ जातींना शिक्षणसंधी मिळू दिली नाही असा रोखठोक निर्देश करण्याऐवजी ते ‘मूठभर जाती’ आणि ‘प्रगत जाती’ असे शब्दप्रयोग करुन वेळ मारुन नेतात. उदा. ‘प्रगत जातींमध्येही खुळचट समजूतींनी थैमान घातलेले होते.’, ‘मुलींना शिक्षण दिल्यास त्या स्वैराचारी बनतील असा सनातनी वर्गाचा आक्षेप असे-’, ‘सनातनी मंडळींनी आरडाओरड करुन काम थांबविण्याचा भरपूर प्रयत्न केला.’(म. फुले : जीवन व कार्य, 26)

याच काळात आम्ही म. फुलेंनी मराठी ग्रंथकार सभेला लिहीलेले पत्र पुढे ठेवत होतो. त्या पत्रात म. फुले लिहितात, ‘अशीच का शेवटी ते सर्व आर्य ब्राह्मण या हतभाग्य देशाची उन्नती करणार! असो, आता यापुढे आम्ही शुद्र लोक, आम्हांस फसवून खाणार्‍या लोकांच्या थापांवर भुलणार नाहीत. सारांश, यांच्यात मिसळल्राने आम्हा शुद्रादि अति शूद्रांचा काही एक फायदा होणे नाही, याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे. अहो, या दादांना जर सर्वांची एकी करणें असेल, तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यात परस्पर अक्षर बंधूप्रीती कार केल्यानें वाढेल, याचे बीज शोधून काढावें व ते पुस्तकद्वारे प्रसिद्ध करावें. अशा वेळी डोळे झांकणे उपयोगाचे नाही. या उपर या सर्वांची मर्जी. हे माझे अभिप्राया दाखल छोटेखानी पत्र या मंडळींच्या विचाराकरिता तिजकडे पाठविण्याची मेहेरबांनी करावी. साधे होके बुढ्ढेका येह पहिला सलाम लेव.’ आपला दोस्त जोतीराव गो. फुले, (ज्ञानोदर, दि. 11 जून 1885 ) हा विचार लक्षात घेउन अ.भा.मराठी साहित्य संमेलने जी ब्राह्मणी-पुरुषसत्ताक साहित्याची शेअरमार्केट बनली आहेत त्यावर जाण्यापेक्षा वारंवार अपमानित होत अध्यक्षपदाच्या निवडणूका तेथे लढवण्याऐवजी म. फुलेंनी म्हंटल्याप्रमाणे शूद्रादिशूद्रांच्या स्वहिताच्या ग्रंथकार सभा सुरु करण्याचा आदर्श जो आदरणीय बाबूराव बागुल, कॉ. शरद पाटील, डॉ. आ.ह.साळुंखे, तुळशी परब, राजाभाऊ ढाले, डॉ. गुंदेकर इ. नी निर्माण केला होता. तो विद्रोही साहित्य संमेलनाने सुरु करुन जपण्याचा प्रयत्न डॉ. भारत पाटणकर, समर खडस, राजू कोरडे, सुबोध मोरे, किशोर ढमाले, किशोर जाधव, प्रतिमा परदेशी, जयवंत शेडगे, जयंत पवार, संजय पवार, संभाजी भगत, मोतीराम कटारे, त्रिशला कांबळे, दिपक पवार, अविनाश कदम, उत्तम पवार, उर्मिला पवार अशी समरसता, प्रतिभासंगम, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रतिगामी विचारांविरुध्द लढणारी मोठी फळी महाराष्ट्रात उभी राहिली होती.

मध्यंतरी गोव्यातील भाजपा आमदार कवी विष्णू सूर्या वाघ यांनी काव्यहोत्र आयोजित करुन त्यात कवितारुपी समिधा टाकण्यासाठी महाराष्ट्रातील कवींना विमानाने बोलवले होते. हे निमंत्रण स्विकारु नये म्हणून सुबोध मोरे, दिवंगत शाहीर शा.शंतनु कांबळे यांनी प्रयत्न केले तरिही विष्णू वाघांच्या काव्यहौत्रात अनेक पुरोगामी – क्रांतिकारी कवी-शाहीरांनी समिधा टाकल्याच. अगदी सुबोध आणि शंतनु यांना धमक्या देण्यापर्यंत काही फेसबुकवरील चमकोंची आणि शाहिराची मजल गेली होती.

आज या सर्व गोष्टींची आठवण यासाठी करुन दिली कारण एवढी प्रदीर्घ चर्चा होउनही जणू काही यावर मंथन झालेच नाही असे भासवत संघस्थानी जाण्याने काय होते? आपले विचारच तर मांडतोना आपण? तिथे जाउन धर्मनिरपेक्षता वगैरे विचार मांडणे धाडसाचेच नाही का? वगैरे म्हणणे काही लोक मांडतात तेव्हा तो भाबडेपणा नसून एक प्रकारचा संभावितपणाच म्हणावा लागेल.

प्रणवदांसारख्या मुरलेल्या काँग्रेसी नेत्याने देशातील सर्वोच्चपद भोगून झाल्यावर रास्वसंघाच्या शिबीरात जाणे याचे एक कारण काँग्रेसच्या तत्वज्ञानातही आहे. बाळ गंगाधर टिळकांनी गीतारहस्य ग्रंथ लिहून काँग्रेसला वेदांती तत्वज्ञानाचे अधिष्ठान दिले असल्याचे कॉ. शरद पाटीलांचे मत होते. काँग्रेसपेक्षाही जहाल हिंदुत्वाच्या म्हणजे खरे तर ब्राह्मणी- पुरुषसत्ताक विचारांच्या पायावर भारताची उभारणी करण्याच्या हेतूनेच रास्वसंघाचा जन्म झाला आहे. म्हणजे प्रस्थापित भाषेत सांगायचे तर मवाळ आणि जहाल हिंदुत्वाचा हा प्रश्न आहे. त्यामुळेच तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रास्वसंघाला अनेकदा देशभक्त संघटना म्हणून प्रमाणपत्र दिले आहे. ती प्रमाणपत्रे संघानेही गरजेनुसार बरेचदा वापरली आहेत. त्यामुळे ब्राह्मणी चर्चाविश्‍वातल्या दोन तात्विक भुमिकांवर उभ्या दोन संघटना (काँग्रेस आणि रास्वसंघ) एकमेकांशी वैचारिक आदानप्रदान करणारच! आज देशपातळीवर राजकारणात एकाकीपडण्याची भिती पुढे येत असताना रास्वसंघाची रंगसफेदी झाली. आज माजी राष्ट्रपती येउन गेले. उद्या विद्यमान राष्ट्रपतींना तेथे बोलवण्याची वाट मोकळी करुन गेले. संघाला मोदींना आम्ही काँग्रेसजनांनाही जवळ करू शकतो असा संदेशही द्यायचा असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर धर्मनिरपेक्षताविरोधी संघटना म्हणून असलेली प्रतिमा बदलण्यासाठी बघा माजी राष्ट्रपती आमच्यामध्ये येतात! हे दाखवायचे असेल. अलिकडे त्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय विचार मंचाने मुंबईच्या शासकीय सह्याद्री अतिथी विश्रामगृहात इफ्तार पार्टी दिली. पण संघमुख्यालयात देण्याचे नाकारले. उद्या तिही देउन टाकतील!

एकूणातच आजतरी प्रणवबाबूंना बोलवण्याचा संघाचा हेतू सफल झाला! संघस्थानी संघविचाराव्यतिरिक्त लोकांनी जाउ नये, संघ-जनसंघाबरोबर आघाडी करु नये या व्यवहाराला संघवाले राजकीय अस्पृश्यतेची वागणूक आम्हाला दिली जाते असे म्हणत. त्यांना एकंदर जातीसमाजातील अस्पृश्यतेची संपूर्ण माहिती असल्यानेच त्यांना एकटे पाडण्याच्या राजकारणाला त्यांनी अस्पृश्यता ही उपमा दिली. हे एकटेपण दूर करण्यासाठीच त्यांनी कायम खटाटोप केला. अगदी काँग्रेसलाच आपली राजकीय आघाडी मानण्याचाही! ते ‘समाधानकारकरित्या’ होत नाही म्हंटल्यावर त्यांनी जनसंघ आणि भाजप निर्माण केले. तरी मधुनआधुन त्याच्याशीही बिनसल्यावर जुन्या वैचारिक ‘सहोदराची’ आठवण येते. जशी मुलांशी भांडल्यावर वयोवृध्द जोडप्यांना आपले बहिणभाऊ आठवतात! प्रणवदांना बोलवण्याचे एक कारण हेही असेल.

 

संदर्भ – 1) डॉ. बाबा आढाव, ढोंगी रा. स्व. संघ ,दिग्नाग प्रकाशन,1998 पुणे

2) प्रा. रणजीत परदेशी फुले-आंबेडकरांचे ब्राह्मणीकरण संघ-भाजपचे            डावपेच – (प्रकाशक किशोर ढमाले, सावित्रीबाई फुले प्रकाशन, 14 एप्रिल           1996)

ढमाले सत्यशोधक शेतकरी सभेचे नेते व समतावादी प्रबोधक आहेत,प्रा. परदेशी अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

Write A Comment