fbpx
विशेष

ऐसी जगेह बैठ कोई ना बोले उठ !

ऐसी जगेह बैठ कोई ना बोले उठ,

ऐसी बोली बोल के कोई ना बोले झुठ

 

सध्या यवतमाळ येथे होऊ घातलेले मराठी साहित्य संमेलन वादाच्या भोवर्यात असल्याच्या बातम्या गाजत आहे. देवसेंदिवस सत्वहीन होत चाललेल्या सारस्वतांच्या या कुंभमेळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी सुरवातीला निवडणूक की निवड पद्धतीने अध्यक्ष निवडला जाणार या मुद्द्यावर चर्चा घडविण्यात आली. परंतु त्याचे फारसे श्रेय घेता आले नाही कारण विद्रोही साहित्य संमेलनांनी हा पायंडा पडला होताच! मग निरास, निव्वळ पेशवाईतील भोजनावळी आणि बिदागीच्या पाकीट संस्कृतीची बनलेल्या, शेतकरी, कष्टकरी बहुजनांच्या करातून राजकोशातील पैश्यावर डल्ला मारणाऱ्या तथाकथित अखिल भारतीय साहित्य संमेलन गाजविण्यासाठीच  तर नवा वाद रचला गेला की काय अशी शंका घेण्या सारखी परिस्थिती आहे.

नयनतारा सेहगल या इंग्रजी भाषेत लिहिणाऱ्या प्रतिथयश साहित्यिक आहेत. त्यांना यवतमाळ संमेलनाचे उद्घाटन करण्यासठी पाचारण करण्यात आले होते. आणि नंतर म्हणजे त्यांचे भाषण संयोजकांकडे पोहचल्यावर त्यांना तुम्ही येऊ नका असे कळविण्यात आले. आणीबाणीतील मुस्कटदाबीच्या विरोधात उघड भूमिका घेणाऱ्या, पुरस्कार वापसी मोहिमेतील आघाडीच्या लेखिकेला दिली गेलेली ही मराठी सारस्वतांच्या मुखंडाची वागणूक अजिबात समर्थनीय नाहीच. त्याचा करावा तितका निषेध कमीच आहे. कारण त्यांनी येऊ नये याची जी करणे दिली जात आहेत त्याचे समर्थन  ना संयोजकांना, ना महामंडळाला करता येत आहे. मग कोणत्याश्या मराठी भाषेच्या मुद्द्यावर तगून फक्त निवडणुकांच्या राजकारण करणाऱ्या छोट्या पक्षाचे  सामान्य कार्यकर्ते हाताशी धरून नयनतारा ह्या इंग्रजी भाषिक असल्याचा टुकार मुद्दा पुढे आणला गेला आणि कोणत्याही प्रकारचा सारासार विचार न करता त्यांना येऊ नकाचा निरोपही धाडण्यात आला. यामागे कार्यरत असणारी विचारधारा आणि संघटना आपल्याला नेमकेपणाने माहित असल्या पाहिजेत. साप साप म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार काही मंडळी सोयीने करीत आहेत याचा जनांचा मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी गांभीर्याने केला पाहिजे. (कारण त्याचे मराठी भाषेचे प्रेम फक्त मराठी भाषेत पाट्या लावण्या पुरतच, बाकी खळ्ळ खट्याक  पलीकडे त्यांची धाव नाही. विचार स्वातंत्र्यानुसार मत व्यक्त करणाऱ्यांना उठाबशा काढायला लावणार्यांनी या संदर्भात काही न बोललेलेच बरे.) इंग्रजी भाषिक साहित्यिक काही पहिल्यांदा उद्घाटक म्हणून येत नव्हत्या. या पूर्वीही विविध भाषेत साहित्य निर्मिती करणाऱ्यांनी तेथे हजेरी लावली होतीच! मुद्दा भाषेचा नसून ब्राह्मणी-पुरुषसत्ताक सांस्कृतिक दहशतवादाचा आहे!

अ.भा.साहित्य संमेलने आणि त्या भरविणारी मराठी साहित्य परिषद ही संस्था यांचा मूळ आशय, गाभा, हेतू हा नेमकेपणाने १९ व्या शतकात म. जोतीराव फुले यांनी सांगितला होता. ग्रंथकार सभेला पत्र पाठवून तुमची ग्रंथकार सभा उंटावरून शेळ्या वळणारी आहे. एकतेची बीजे तुमच्या साहित्यात नाहीत, तुम्ही घालमोडे दादा आहात हे स्पष्ट शब्दात जोतीराव फुल्यांनी म. गो. रानडे यांना कळविले होते. म. फुलेंनी मराठी ग्रंथकार सभेचे निमंत्रण न्यायमूर्ती रानडेंकडून मिळताच म. फुलेंनी उत्तर दिले, ‘ त्यांच्यात मिसळल्याने आम्हा शूद्रादी अतिशूद्रांचा काही एक फायदा होणे नाही, याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे.’ म्हणजे त्यांच्या या प्रक्रियेशी संघर्ष अटळ असल्याचे  फुल्यांनी १९ व्या शतकातच सांगितले होते. आज २१ व्या शतकातही त्यांचा साहित्य-संस्कृतीचा आशय, आकृतीबंध, रूप बदलले आहे असे दिसत नाही. मराठी ग्रंथकार सभा आणि नंतरची साहित्य परिषदेला ग्रंथकार मंडळींना I am Shivaji Of Marathi Language असे इंग्रजी भाषेत सांगणाऱ्या चिपळूणकरांबद्दल अभिमान आहे. आणि  शूद्रातिशूद्रांचा, यांच्या बोलीभाषांचा तिरस्कारही! ब्राह्मणी-पुरुषसत्ताक मूल्य संस्कृतीचे पुनरुज्जीवन व पुनरुत्पादन करणारा हा साहित्य व्यवहार असल्याने  भालेकरांची ‘बळीबा पाटील’ पहिली ग्रामीण कांदबरी म्हणून ओळखली गेली नाही. आणि फुलींचे ‘तृतीय रत्न’ नाटक स्टेजवर आले नाही, या कारणास्तव बाद ठरविण्यात आले. ‘कुलकर्णी लिलामृत’ लिहिणारे मुकुंदराव पाटील, जे पहिले ग्रामीण पत्रकार होते, ते यांना मराठी साहित्य संमेलनाच्या प्रक्रियेत लायक वाटले नाहीत. ‘कळ्यांचेचे नि:श्‍वास’, ‘शबरी’, ‘बळी’ इ. स्त्रीजीवनावरच्या, भटक्या विमुक्तांवरच्या अप्रतिम कथा, कादंबऱ्या लिहणाऱ्या मालतीबाई बेडेकर या त्यांना  साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लायक वाटल्या नाहीत. स्त्रिया, शूद्रातिशूद्र आणि मुस्लिम यांच्या द्वेषावर मराठी वाग्मयीन  व्यवहार उभा राहिला. सर्व मराठी वाग्ङ्मय टिंगलटवाळीसाठी शेतकरी, बहुजन यांना वापरण्यात खर्ची पडले.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या कॉ. अण्णा भाऊ साठे, कॉ. अमर शेख आणि शा. द. ना. गव्हाणकर या त्रयीवर ब्राह्मणी साहित्यिक धुरिणांनी अन्यायचं केला. मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण कधीतरी मिळेल अशीच अपेक्षा ठेवणाऱ्या अण्णा भाऊ साठेंना तर यांनी संमेलनालाही बोलावले नाही. आणि कादंबऱ्याच्या इतिहासातही नोंदविले नाही. आपली कला या हजारो रसिक श्रोत्यांसमोर मांडण्याची अमर शेखांची अतीव इच्छा अपुरीच राहिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनवाल्यांचा जातीव्यवस्थाक सांस्कृतिक व्यवहार पुढेही चालू राहिला आहे. चिपळूणला साहित्य संमेलन व्यासपीठावर परशुरामाचा पुतळा आणून बसवणं, सासवडच्या 3 जानेवारीला झालेल्या संमेलनात स्त्री-शुद्रतीशूद्रांना शिकविणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना अभिवादन न करणे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकारांचा सनातन्यांनी केलेल्या खुनाचा साधा निषेधही न करणे……अशी शेकडो उदाहरणे ते कोणत्या मूल्य संस्कृतीची री ओढणारे आहेत हे स्पष्ट करण्यासाठी देता येतील.

चंद्रपुरच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी गंगाधर पानतावणे उभे राहिले, तेव्हा पुण्याच्या व्हिनस प्रकाशनाच्या सं. कृ. पाध्ये यांनी यांना पत्र पाठविले ‘अध्यक्षपदासाठी आपण लायक नसल्याने आपली उमेदवारी त्वरीत मागे घ्यावी, उमेदवारी मागे घेण्यासाठीचा खर्च दोन रुपये मनीऑर्डरने पाठवित आहे.’ याच सुमारास दुसरे निनावी पत्र पानतावणेंना प्राप्त झाले. त्या पत्रात ‘सरस्वतीच्या मंदिरात अस्पृशांचा प्रवेश निषिद्ध आहे. सबब आपली उमेदवारी मागे घेतली जावी. अन्यथा तंगड्या तोडल्या जातील.’ असा मजकूर होता. इतक्या हीन पातळीवर उच्चजातीय मंडळी व स्वत:ला मराठी जनतेचे सांस्कृतिक प्रतिनिधी मानणारे लोक जातात.

आपली लोकप्रियता घसरु लागताच एखादा लोकप्रिय पुरोगामी माणूस अध्यक्षपदावर बसविण्याची चलाखी ते करतात. असे करतानाही यांचा हेतू साफ नसल्याचे दिसते. अशा वेळेस ते यादव विरुद्ध सुर्वे, बापट विरुद्ध पानतावणे अशा निवडणूका घडवून आणतात. जेणे करुन एकंदर समतावादी चळवळीची हानी कशा पद्धतीने करता येईल अशाच पद्धतीची धोरणे हे सांस्कृतिक श्रेष्ठीजन आखतात. प्रा. गं.बा. सरदारांना वाळवा येथे भरलेल्या दुसऱ्या द.आ.ग्रा. संयुक्त साहित्य संमेलनाचे निमंत्रण मिळाले तेंव्हा मराठी साहित्य संमेनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचा जेवढा आनंद मला झाला नव्हता, तेवढा आनंद द.आ.ग्रा. च्या निमंत्रणाने झाल्याचे सांगून नामंतर लढ्यामुळे एकामागोमाग एक उधळली जाणारी संमेलने सुरळीत चालू होण्यासाठीच केवळ मला अध्यक्ष बनविण्यात आले होते, असे प्रा. गं बा. सरदार म्हणाले होते.

पु. भा. भावे ते द. मा. मिरासदारांसारखे जातीस्त्रीदास्यसमर्थक बहुजनांची टिंगलटवाळी करणारे, टुकार लेखक संमेलनाचे अध्यक्ष बनले. बरी ही निवडणूक प्रक्रिया तरी लोकशाही मार्गाने होते का? 273 लोकांच्या मतदारांच्या यादीत 90% मतदार हे ब्राह्मण जातीचे असणे हे कोणत्या लोकशाहीत बसते ? असा हा मराठी ग्रंथकार सभा ते आता पर्यंतची अ. भा. सा. संमेलन इथपर्यंत चालत आलेला जातीवर्चस्वाचा सांस्कृतिक प्रवास घडला. सावरकरांना संमेलनाध्यक्ष बनविणाऱ्यानी फुले आंबेडकरांना वेशीबाहेरच ठेवले. या सांस्कृतिक प्रवासाला सातत्यता केवळ जातीआधारित संवादयंत्रणा असल्यानेच लाभली. प्रकाशन संस्था असो वा नियतकालिके त्यावर उच्चजातीयांची मक्तेदारी कायमच राहिली. मराठी माणसाची वाङ्मयीनन अभिरुची सडवण्याचे बहुमोल काम या संमेलनांनी साग्रसंगीत पार पाडले. त्यामध्ये त्यांचे जातीय वर्गीय हितसंबंध गुंतलेले होते.

साठीच्या दशकात दलित साहित्याची चळवळ उभी राहिली. आपले जगण्यामरणाचे प्रश्न दलितांना वाग्मयाचे विषय बनविले. लिटील मॅगझिनच्या चळवळीने फक्त रुपापुरते(फॉर्म पुरते) बंड केले होते. परंतु आशय, रुप व मूल्य या तीनही पातळ्यांवर दलित साहित्याने बंडखोरीची भूमिका घेतली. पुढे त्यापासून प्रेरणा घेत अडखळत अडखळत ग्रामीण साहित्य चळवळ सुरु झाली. आदिवासी, भटके, विमुक्त व स्त्रिया अशा विविध स्तरातून आलेल्या लेखकांनी आपल्या वाङ्मयीन चळवळी उभ्या केल्या. त्याचबरोबर सत्याशोधक जलसे, आंबेडकरी जलसे यांचे अवशेष तसेच शाहिरी, कीर्तन वगैरे बहुजन परंपराही दुसऱ्या बाजुला चालूच होत्या. या सर्व वाङ्मयीन चळवळींनी म. फुलेंचाच वारसा पुढे नेला. त्यांच्या दृष्टिकोनातून मराठी साहित्य संमेलन, साहित्य संस्कृती मंडळ ह्यासारख्या रचना उच्च जातवर्गाचे वर्चस्व टिकवणाऱ्या यंत्रणा आहेत. विषमतावादी मुल्यांची जोपासना करण्यासाठी, जातीव्यवस्था, भांडवलशाही व पुरुषसत्ता यांनी चालवलेले अपरिमित शोषण झाकण्यासाठी कार्यरत असलेल्या या यंत्रणा आहेत. इथे जाणे म्हणजे आपल्या बहुजन कष्टकरी जनतेशी बेईमान होणे आहे. बाबुराव बागुल, तुळसी परब इ. अनेक नावे सांगता येतील की ज्यांनी या यंत्रणा व हे वाङ्मय मुळापासून नाकारले होते.

दरम्यान भांडवलशाहीच्या विकासानंतर बाजाराच्या सर्वव्यापीकरणानंतर भांडवली नियमानुसार प्रत्येक वस्तुचे क्रय वस्तुत रुपांतर होणे अटळ बनते. प्रकाशक, सत्ताधारी व लेखक या तिघांनीही एकमेकांशी असेच बाजार प्रधान नाते प्रस्थापित केले. पारितोषिकांची खैरात, प्रकाशकांची पुस्तकविक्री व लेखकांचे अवाजवी महात्व वाढणे, सत्ताधर्यांच्या शोषणाला अधिमान्यता मिळणे वगैरे गोष्टी याच प्रक्रियेशी संबंधित होत्या. अर्थात समाजव्यवस्थेत मध्यम व कनिष्ठ स्थानावर असणाऱ्यांना या बाजारात तेवढेच स्थान मिळते. याच जातीव्यवस्थाक बाजाराचे प्रतिनिधित्व आजची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने करीत आहेत. ती सांस्कृतिक शेअर मार्केट बनली आहेत.

म्हणूनच स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांना मानणाऱ्या, आपल्या बहुजन कष्टकरी जनतेशी जैविक नाते असलेल्या साहित्यिक, लेखक, कलावंत मंडळीनी या जातवर्गपुरुषसत्ताक वर्चस्ववादी सांस्कृतिक यंत्रणा उलथवून लावून म.जोतीराव फुलेंच्या शब्दात आमचा आम्ही विचार करुन पर्यायी सांस्कृतिक रचना, यंत्रणा उभ्या करणे गरजेचे आहे.

नयनतारा सहेगल यांनी मराठी साहित्य संमेलनाला येण्याचे निमंत्रण स्वीकारताना याचा विचार करायलाच हवा होता. आपण उपस्थित राहणार असलेल्या साहित्य प्रकिये बद्दल तेथील समतावादी, प्रागतिक, सत्यशोधक, विद्रोही, फुले-आंबेडकरवादी प्रवाहांशी संपर्क करायला हवा होता. त्यांचे मत जाणून घ्ययला हवे होते, चर्चा करायला हवी होती. म्हणजे त्यांना या संमेलनाचे नेमके स्वरूप ध्यानात आले असते. संमेलनाचे ब्राह्मणी-भांडवली-पुरुषसत्ताक मूल्यसंस्कृतीमूलक स्वरूप ध्यानात आले असते. पण तसे झाले नाही. आपल्यास त्याची गरजच वाटली नाही की कोण ते क्षुद्र लोक असे आपल्याला वाटले, की अशा क्रांतिकारी पर्याय मांडू पाहणाऱ्याशी आपला परिचयच नाही, की अ.भा.वाल्यांची प्रकिया, संमेलने आपल्याला धर्मनिरपेक्ष, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी वगैरे वगैरे वाटली? नयनताराताई आपली गंभीर चूकच झाली आहे! तुम्ही चुकीच्या विचारधारेच्या कंपूत जाण्याचा निर्णय घेतलात ही गंभीर चूकच आहे. त्यांच्या मंचावर जाणे म्हणजे त्यांना, त्यांच्या विचारांना अधिमान्यता देण्यासारखेच आहे हे आपल्या लक्षात कसे काय आले नाही याचे आश्चर्य वाटते. तिथे जाण्याचा निर्णयही घ्यायचा आणि त्यांनी त्यांचा ब्राह्मणी सांस्कृतिक दहशतवादी बाणा दाखवला की गळे काढायचे हे काही बरे नाही. ब्राह्मणी सांस्कृतिक दहशतवाद्यांचा निमंत्रण रद्द करत विचारांची गळचेपी केल्या बद्दल त्यांचा आणि अशा साहित्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतल्या बद्दल तुमचाही निषेधच! या संदर्भर कबीर वाणी कायम लक्षात ठेवली पाहिजे, ऐसी जगेह बैठ, कोई ना बोले उठ I

ऐसी बोली बोल, कोई ना बोले झुठ I

(हा लेख लिहिताना विद्रोही सांस्कृतिक चळवळ संस्थापक सदस्य किशोर ढमाले यांनी लिहिलेल्या ‘ ब्राह्मणी संमेलनांना आमचा विरोध का? या लेखाचा आधार घेतला आहे. – प्रतिमा परदेशी)

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

Write A Comment