fbpx
विशेष

बुलंदशहरः हिंसेचा आणखी एक नमुना

सध्याच्या वातावरणात भावनिक विषय पुढे करून हिंसेचे नवीन नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न होताना दिसतो. गेल्या काही वर्षांमध्ये बाबरी मशिद उद्ध्वस्त करणं (१९९२), गोध्रा ट्रेन जाळणं (२००२), कंधमालमध्ये एका स्वामीचा खून (२००८), लव्ह जिहादच्या नावाखाली मुझफ्फरनग दंगली (२०१३) अशी हिंसेची काही उदाहरणं डोळ्यासमोर आली. समाजातल्या वेगवेगळ्या समूहांमध्ये तेढ निर्माण करून हिंसा पसरवायची अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये गायीच्या नावाखाली हिंसा करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाला. अखलाख, जुनैद यांना गोमांस खाल्ल्याच्या केवळ संशयावरून मारून टाकण्यात आलं. याचाच एक भाग म्हणून बुलंदशहरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचीही हत्या झाली. धर्मांधतेच्या या हिंसेचे केवळ अल्पसंख्यांकच नव्हे तर बहुसंख्यांक समाजातले लोकही बळी ठरतात. हा मारला गेलेला पोलीस अधिकारी केवळ हिंदू नव्हता तर सरकारी यंत्रणेचा एक भाग होता. अद्याप या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. पण जी काही माहिती माध्यमांमधून पुढे येतेय ती भयंकर आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला बुलंदशहरमध्ये मुस्लिम इज्तेमा झाला. सुमारे ५० लाख मुस्लिम यासाठी जमले होते. अशा पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम देशामध्ये अनेक ठिकाणी होत असतात. या कार्यक्रमाच्या ठिकाणापासून साधारण ७० किलोमीटरवर सियाना नावाच्या गावामध्ये एका शेतात कापलेल्या गायीचे अवशेष सापडले. गावातल्या लोकांनी त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली.  गायीचे ते अवशेष ट्रॅक्टरमध्ये घालून तिथून हटवण्यात आले. त्याचवेळी गावाबाहेरचे ४०-५० तरुण तिथे आले आणि त्यांनी ट्रॅक्टरचा ताबा घेतला. काही बातम्यांनुसार, या तरुणांनी शेतामध्ये गोमांस फेकलं तर काही व्हिडिओ आणि बातम्यांनुसार, हे सगळं बाहेरच्या लोकांनी केलं.

या बाहेरच्या तरुणांनी तो ट्रॅक्टर पोलिसस्टेशनला नेऊन तक्रार दाखल केली आणि गोंधळ घालायला सुरुवात केली. बजरंग दलाचा स्थानिक प्रमुख योगेश राज याच्याविरोधात गोंधळ घातल्याने तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर या सगळ्या प्रकारामध्येच इन्स्पेक्टर सुबोध सिंग यांचा निर्घृण पद्धतीने मारण्यात आलं. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या सुदर्शन या वाहिनीवरून हा सगळा प्रकार मुस्लिम इज्तेमाशी जोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांकडून याचं खंडन झालं.

पण या घटनेनंतर अनेक खऱ्या-खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या. त्याचवेळी काश्मिरमध्ये नेमणूक झालेला राष्ट्रीय रायफलचा एक जवान जितेंद्र मलिक तिथे हजर होता आणि त्याच्यावर हिंसा करण्याचा आरोप आहे. त्याच्या मोठ्या भावाने हा आरोप फेटाळून लावला असून तो निरपराध असल्याचं म्हटलं आहे. मलिक याला काश्मिरवरून बोलावून घेण्यात आलं, पण त्यातून अद्याप काहीच निष्पन्न झालेलं नाही. त्यामुळे ही हिंसा घडवण्यामागे कोण होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

यामध्ये पोलीस अधिकाऱ्याला मात्र पद्धतशीररित्या मारल्याचं त्याच्या बहिणीचं म्हणणं आहे. सुबोध सिंग यांनी महंम्मद अखलाखच्या हत्येचा तपास करून अनेक दोषींना अटक करवली होता. हिंदू-मुस्लिम विषयावर कायम योग्य ती भूमिका घेणारे म्हणून सिंग यांची ख्याती होती. त्यांनी हिंदुत्व संघटनांना धार्मिक तेढ निर्माण करण्यापासून कायम रोखलं होतं. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सिंग यांची बदली करावी म्हणून मागणीही केली होती. त्याशिवाय या संपूर्ण घटनेबद्दल अजून काही चांगल्या-वाईट बातम्या आहेत. एक म्हणजे मुस्लिम इज्तेमासाठी आलेल्या लोकांना शंकराच्या देवळामध्ये राहण्यासाठी जागा दिली होती.

सिंग यांच्या मुलाने त्यांच्या मृत्यूनंतर शांततेचं आवाहन केलं होतं. तो म्हणाला, “संपूर्ण देशाला मी आवाहन करतो की त्यांनी हिंदू-मुस्लिम दंगे थांबवावेत. अगदी लहानशा घटनेनेही लोक हिंसक होतात. आपल्यावर कायद्याचे बंधन आहे याचे लोकांनी भान बाळगावे.”

त्याचवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं की, गायीच्यासंबंधातील हिंसेच्या घटना वाढत असून त्या थांबवल्या पाहिजेत. पण पोलिसांना मात्र तपास करताना सिंग यांचा मृत्यू हा गाय मारल्याची घटना थांबवण्यासाठी किंवा गायीचं स्मगलिंग थांबवण्यासाठी अपयश आल्याने झाला का, हे पहायला सांगितलं. एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू हा मृत गायीपेक्षा भाजपच्या मुख्यमंत्र्यांसाठी दुय्यम आहे. मोदी-योगी यांच्या सरकारमध्ये असे प्रसंग हे  बेचैन करणारे आहेत. पण त्यांना मात्र त्यांच्या राजकारणापुढे या सगळ्या गोष्टींचं काहीच वाटत नाही.

लेखक हे गेली अनेक वर्षे सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी कार्यरत असून सेक्युलरिझमच्या तत्वाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांची कम्युनल पॉलिटिक्सः फॅक्ट्स वर्सेस मिथ्स, गॉड पॉलिटिक्स, फॅसिझम अॉफ संघ परिवार, रिलिजन, पॉवर अॅण्ड व्हायलंस अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

Write A Comment