fbpx
कला

वर्णद्वेषावरचा एक चित्रपट, काही बोध व जग्गूला वाचवा!

अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा होती. कृष्णवर्णीय लोकांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री होत असे. प्रेसिडेंट लिंकन यांनी १८६५ साली घटनादुरुस्ती करून ही प्रथा निकालात काढली. पण त्यांना त्यासाठी प्रचंड विरोध सहन करावा लागला. एक यादवी युध्दच तिथे झाले. गुलामगिरीची प्रथा गेली तर वर्णभेद मात्र पुढे अनेक वर्षे कायम होता. १९६५ साली प्रेसिडेंट लिंडन जॉन्सन यांच्या काळात काळ्या लोकांना मताधिकार मिळाला, समान अधिकार मिळाले. तथापि कट्टर वर्णद्वेषी गोरे तिथे होतेच. काळ्या (म्हणजे ऑफ्रीकन अमेरिकन) लोकांचा ते द्वेष करतात. तो संघर्ष तिथे आहेच. आपल्याकडे जसे कमजोर वर्गाला दिल्या जाणार्‍या आरक्षणविषयी आकस आहे, तसेच अमेरिकेतील अशा गोर्‍या लोकांना काळ्या लोकांना दिल्या जाणार्‍या सवलतीबाबत राग आहे. ते वंशश्रेष्ठत्वाचे  कट्टर पुरस्कार असल्याने काळ्यांना हीन लेखतात. त्यांचा द्वेष करतात. अफरमेटीव्ह ऑक्शनच्या नावाखाली सरकारने लाडावून ठेवले आहे म्हणतात. आता तर ट्रम्प प्रेसिडेंट झाल्यापासून ह्या घटनांमध्ये वाढ होत चाललेली आहे.

१९९८चा ‘अमेरिकन हिस्टरी एक्स’ ह्या सिनेमा अशा दोन वंशश्रेष्ठत्ववादी गोर्‍या भावांची, त्यांच्या द्वेषपूर्ण विचारसरणीतून काय घडते, त्याची कथा सांगतो. डेरेक व्हिनयार्ड हा लॉस एंजलीस इथे राहणारा गोरा अमेरिकन तरूण व डॅनिएल हा त्याचा लहान भाऊ. त्यांचे वडील फायर ब्रिगेडमध्ये काम करतात.  लॉस एंजलीसच्या काळ्या लोकांची वस्ती असलेल्या एका भागात आग विझवण्याचे काम करत असताना एका काळ्या ड्रग डिलरकडून वडिलांची हत्या होते. डेरेकमध्ये आधीच वंशश्रेष्ठत्वाची भावना आहे, त्यात ह्या घटनेमुळे काळे, उपरे अशा सर्व लोकांवरचा त्याचा राग, द्वेष आणखी वाढतो. काळ्या लोकांबाबतचा द्वेष आधीच त्याच्या नसानसात भिनला आहे, त्यात आणखी भर पडते. तो काळ्या, उपरे अशा लोकांचा द्वेष करणार्‍या गोर्‍याच्या संघटनेत सामील होतो. त्याच्यात इतका विखार आहे की त्याच्या जहाल वागण्याने त्या संघटनेचा म्होरक्याही प्रभावित होतो. डेरेकला तो उप-प्रमुख बनवतो. कॅमरॉन नावाचा हा त्यांचा म्होरक्या स्वत: कधी समोर येत नाही. स्वत: नामानिराळे राहून हे द्वेषाचे जहर, अपरीपक्व, बेरोजगार गोर्‍या तरूणांच्या मनात पेरत राहणे हे त्याचे काम.

काळ्या गॅंगचे काही लोक एका रात्री डेरेकचा ट्रक चोरी करून न्यायचा प्रयत्न करतात. डेरेक पिस्तुल घेऊन त्यांचा सामना करतो. एकाला सरळ शूट करतो. दुसरा निशस्त्र अवस्थेत, जखमी झालेला, असहायपणे जमीनीवर पडून आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने डेरेक त्याचा आपल्या डॅनियल ह्या भावासमोर खून करतो. पोलीस डेरेकला पकडतात तेव्हा भावाकडे बघत तो विखारी, विजयी हास्य करतो. तीन वर्षासाठी तो तुरूंगात जातो.

मोठ्या भावाच्या अशा वागणूकीमुळे, डॅनियलवरही ह्याच द्वेषमूलक विचारसरणीचा कब्जा आहे. शाळेत तो एका निबंधात हिटलरची तारीफ करणारा मजकूर लिहतो. त्याचे इतिहासाचे शिक्षक त्याला शाळेच्या प्राचार्यांकडे घेऊन जातात. डॉ.स्वीने हे कृष्णवर्णीय गृहस्थ प्राचार्य. ते डॅनियलला सांगतात, आजपासून मी तुझा इतिहासाचा शिक्षक. आपल्या तासाचे नाव ‘अमेरिकन हिस्टरी एक्स’ व तुझी पहिली असाईनमेंट आहे, तुझ्या भावावर निबंध लिहणे. डॅनियल हा निबंध लिहत आहे अशा रितीने सिनेमा उलगडत जातो.

इकडे तुरूंगात डेरेकला धोका आहे, तिथल्या काळ्या कैद्यांपासून. पण तो शर्ट काढून आपल्या छातीवरचा, संघटनेचा स्वस्तिकचा टॅटू प्रदर्शित करून आपल्याला संघटनेचे पाठबळ आहे, आपण एकटे नाही हे जाहीर करतो. काळ्यांचा द्वेष करणारे कट्टर वंशद्वेषी गोरे कैदी तिथे आहेत, त्यांच्यात सामील होतो.  सुरवातीला त्याचे त्यांच्याबरोबर चांगले संबध असतात. पण त्याच्या लक्षात येते, ह्या गोर्‍या कैद्यांना विचारसरणीशी काही घेणे-देणे नाही. भलेही आशियाई, मेक्सिकन लोकांविरूद्ध ते जनतेसमोर गरळ ओकत असतील, पैशाचा प्रश्न येतो, तेव्हा ते ह्या लोकांबरोबर व्यवहार करतात. आतून त्यांच्यात देवाण-घेवाण असते. तत्वज्ञान वगैरे झूट आहे. राजकारण, मतलब, स्वार्थ साधणे, पैसा हेच त्यांचे लक्ष्य. आपल्याला वापरून घेतले हे डेरेकच्या लक्षात येते. तो ह्या गोर्‍या कैद्यांपासन दूर राहतो. ते चवळतात. डेरेकवर गॅंगरेप करतात. डेरेक तरीही त्यांच्यात पुन्हा सामील होत नाही. एका काळ्या कैद्याकडून त्याला जिव्हाळ्याची वागणूक मिळते. प्राचार्य डॉ.स्वीने हे डॅनियलसारखे डेरेकचेही शिक्षक होते. ते त्याला तुरूगांत भेटतात. त्यांच्या मदतीने तो तुरूगांतून बाहेर येतो.

आता त्याच्यात बदल झालेला आहे. द्वेषाच्या विचारसरणीचा त्याने त्याग केलेला आहे. आपल्या भावाला ह्या विचारसरणीपासून त्याला वाचवायचे आहे. मात्र, त्याचे जुने सहकारी, त्यांचा म्होरक्या इतक्या सहज त्याचा पिच्छा सोडतील? सेठ रायन हा डेरेकचा सघंटनेतील खास जवळचा मित्र. डेरेक तुरूंगात असतानाही त्याचे डेरेकच्या घरी येणे-जाणे आहे. त्याच्या वागणूकीतून एक सत्य अधोरेखीत होते. कायदा हातात घेण्यावर विश्वास ठेवणार्‍या संघटनेचे तुम्ही सदस्य असता, तेव्हा तुम्ही दुबळे झाल्यावर, इतर सदस्य नक्कीच तुमच्याही बाबतीत जोर-जबरदस्ती करतील. तुम्ही त्यांच्याबरोबर आहात म्हणून तुम्हाला सोडणार नाहीत. तुम्हालाही त्रास देतील. असो.

डेरेक आपल्या भावाल – डॅनिएलला द्वेषमुलक विचारसरणीपासून मुक्त करू शकतो का? बदललेल्या मार्गाने त्याला स्वत:ला चालायचे आहे. संघटनेच्या कारवायांना बळी न पडता, तो ते करू शकतो का? द्वेषमूलक विचारसरणी एकदा अंगीकारल्यानंतर त्यापासून सहज सुटका होऊ शकते की त्याची किंमत चुकती करावी लागते?

हा सिनेमा, एक सिनेमा म्हणून अंगावर येतो,  आपल्याला उध्वस्त करतो.  तितकेच हा सिनेमा देतो खूप महत्वाचे बोध. एक बोध आहे डॅनिएल आपल्या निबंधात शेवटी लिहतो, ‘हेट इज अ बॅगेज,’ म्हणजे द्वेष हे एक ओझे आहे, त्यामुळे तुमचाच घात होईल.  दुसरे, डॉ.स्वीने, डेरकला सांगतात, मीही एकेकाळी माझ्याबाबतीत घडणार्‍या प्रत्येक वाईट गोष्टींसाठी गोर्‍याना जबाबदार धरत होतो. मला चुकीची उत्तरे  मिळत होती, कारण मी चुकीचे प्रश्न विचारत होतो. मी तुला एक प्रश्न विचारतो, “Has anything you’ve done made your life better?”

“तू जे केले आहेस, त्यापैकी कशाने तरी तुझ्या आयुष्यात सुधारणा झाली का? ” थोडा फेरफार करून हा प्रश्न असाही विचारता येईल, आपल्या आयुष्यात सुधारणा व्हावी यासाठी आपण काय पावले टाकली की फक्त दुसर्‍याना दोष देत बसलो? तिसरा अत्यंत महत्वाचा बोध आहे, आपण मुलांवर काय संस्कार करतो? वडिलांचा काळ्या व्यक्तीकडून खून झाला म्हणून डेरक इतका वंशद्वेषी झाला का, की ते विष त्याच्या मनात आधीपासून होतं आणि असलं तर का? सिनेमात एक प्रसंग आहे, डेरेकचे वडील एकदा तावातावाने काळ्यांना दिल्या जाणार्‍या सवलतीविषयी बोलत आहेत. हे अकार्यक्षम लोक आमच्या डोक्यावर बसवले जात आहेत म्हणून आगपाखड करत आहेत. डेरेकने हे संस्कार घेतले असतील का? आपल्या मुलांवर आपण संस्कार करतो, म्हणजे त्यांना समोर बसवून चार गोष्टी सांगतो असे नसते, तर मुले आपल्या वागणूकीतून, बोलण्यातून ते वेचत असतात. अगदी कॅज्युअली, आपण एखाद्या समुदायाविषयी विद्वेषाची भावना त्यांच्या मनात रुजवावी का? मग ते कुठपर्यंत जाईल? मुलांना त्याची काय किंमत चुकवावी लागेल? सिनेमा संपल्यावर तुम्ही सुन्न होऊन बसून रहाल.  पण त्याचबरोबर दोन प्रकारांपैकी एक भावना मनात येऊ शकते. आपल्या मुलांवर आपण खुल्या विचारांचे, द्वेष न करण्याचे संस्कार केले असतील तर हायसे वाटेल, समाधानाचा सुस्कारा सोडला जाईल किंवा दचकून जागे व्हाल.

आपले आयुष्य, आपली विचारसरणी आपल्या बरोबर. पुढच्या पिढीला स्वच्छ मनाने विचार करू द्या. राज कपूरच्या ‘जिस देशमें गंगा बहती है’ सिनेमात एक प्रसंग आहे. तो डाकूंना शरण जायला सांगतो तेव्हा एक डाकू बाई (ललिता पवार) विचारते आम्हाला काय मिळणार त्यातून? आम्ही तुरुंगात का जायचं? त्याचचे उत्तर आहे, ‘तेरा जग्गू बच जाएगा माई, जग्गू बच जाएगा.’ तुमचा मुलगा जग्गू वाचेल, पुढील पिढी तरी वाचू शकेल, जग्गूला वाचवा!

आपल्याकडे काही दिग्दर्शक सतत कुरकुर करत असतात, मराठी सिनेमाकडून बोध मिळण्याची अपेक्षा केली जाते, त्यामुळे आमच्यावर मर्यादा येतात, आम्हाला चांगले सिनेमा देता येत नाहीत. हा हॉलिवूडचा सिनेमा असे बोध देतोच, पण त्याचे कलात्मक मूल्य कुठेही कमी न होऊ देता, त्याबाबत कुठेही तडजोड न करता. तसेच आपल्याकडे साहित्यात वगैरे एक भूमिका घेतली जाते, सामाजिक बांधिलकी नको, कोणतीच बांधिलकी नको. त्या लोकांच्या लक्षातच येत नाहीय, बांधिलकी नको म्हणणे हेही बांधिलकी स्वीकारणेच आहे! बांधिलकी नकोची बांधिलकी त्यांना हवी आहे. एक वाचक/प्रेक्षक म्हणून मला त्याच्याशी काय घेणे-देणे असते? तो सिनेमा, ते पुस्तक मला काय अनुभव देते हे माझ्यासाठी महत्वाचे. असो.

हा अमेरिकन सिनेमा. पण त्यातील घटनांचे वन-टू-वन मॅपिंग आपल्याकडे लागू होते असे तुम्हाला वाटते? विचार करून तुम्हीच निष्कर्ष काढा.

लेखक चित्रपट, नाटक, साहित्य, अर्थक्षेत्र व गुंतवणूक इत्यादी विषयांवर सातत्याने लेखन करत असतात. ते कथा लेखकही आहेत.

Write A Comment