fbpx
कला

कला देशद्रोही होते तेव्हा

पुस्तकांवर बंदी घालणं, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला आणि गायकांना विरोध करणं या गोष्टी भारतामध्ये नवीन नाहीत. सलमान रश्दी यांच्या ’सॅटॅनिक वर्सेस’ या पुस्तकावर बंदी घातलेली आपण पाहिली आहे भारत-पाक क्रिकेट सामन्याला विरोध करण्यासाठी वानखेडे स्टेडियमचं पिच उखडून टाकल्याचही उदाहरण आहे, गुलाम अली यांच्या गझलचा कार्यक्रमही उधळून लावण्यात आला होता. सध्याच्या काळात या असहिष्णूतेने परिसीमा गाठली आहे. कर्नाटकी गायक टी एम कृष्णा यांचा कार्यक्रमही अशाचपद्धतीने अलीकडे रद्द करण्यात आला. त्यांचा कार्यक्रम एअरपोर्ट अॉथोरिटी अॉफ इंडिया आणि स्पिक मॅके यांनी एकत्रितरित्या आयोजित केला होता. राष्ट्रद्रोही, शहरी नक्षल आणि जिजस् आणि अल्ला यांची गाणी म्हणणाऱ्याचा कार्यक्रम ठेवल्याने आयोजकांना धमक्या आल्या!

एअरपोर्ट अॉथोरिटीने हा कार्यक्रम पुढे ढकलल्यानंतर दिल्लीच्या आप सरकारने हा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी दाखवली. त्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि केवळ संगीत प्रेमी नाहीत तर लोकशाही व्यवस्थेबद्दल आदर असलेल्या सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

कृष्णा यांच्या कार्यक्रमाला झालेला विरोध हा गेल्या काही वर्षात सुरू झालेल्या राजकारणाचा भाग आहे. त्याला उत्तर म्हणून लेखक उदय प्रकाश आणि नयनतारा सेहगल यांनी आपले सन्मान परत केल्यावर सुमारे ५० कलाकार, लेखकांनी आपल्याला मिळालेली अॅवॉर्ड सरकारला परत केली होती. डॉ. दाभोलकर, कॉमरेड पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश याच असहिष्णूतेचा बळी ठरले. मोहम्मद अखलाख याला गोमांसाच्या नावाखाली संशयाने ठेचून मारण्यात आलं.

त्याचवेळी दलितांवरही हल्ले वाढले आणि रोहित वेमुला  या विद्यार्थ्याची संस्थात्मक हत्या झाली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठावरही हल्ले झाले. ज्यांनी देशद्रोही घोषणा दिल्या ती माणसं पकडली न जाता कन्हैय्या कुमार आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात आलं. देशद्रोही या शब्द पुन्हा पुन्हा वापरला गेला. सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्यात आलं. त्यातच भाजपची नवीन ट्रोल आर्मी उदयाला आली आणि बजरंग दलाच्या कारवायांप्रमाणे लोकांवर तुटून पडू लागली.

कृष्णा हे केवळ उत्कृष्ट गायक नाहीत तर त्यांच्या परखड राजकीय विचारांसाठीही प्रसिद्ध आहेत. ते गांधीजींचं वैष्णव जन तो हे भजनही गातात आणि जीजस् आणि अल्लाबद्दलही गातात. त्यांचं संगीत हे कोणत्याही सीमा रेषांनी बांधलेलं नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये कलाकारांना धर्माच्या नावावर विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. खरंतर भारताची संस्कृती ही वेगवेगळ्या धर्मांची सरमिसळ आहे. हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचा भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये वाटा आहे. हीच सरमिसळ भक्ती आणि सुफी परंपरांमध्ये, खाण्याच्या पद्धतींमध्ये, कला, साहित्य, स्थापत्यशास्त्र या सगळ्यामध्ये बघायला मिळते.

जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये हीच भारताची संस्कृती सांगितली आहे. नेहरूंच्या मते, संस्कृतीचे अनेक स्तर आहेत जे एकमेकांमध्ये मिसळतात आणि एकमेकांवर प्रभाव टाकतात. दोन संस्कृती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यातील संवादातून एक नवीन संस्कृती तयार होते. नवीन संस्कृतीतही पूर्वीचे रंग कायम राहतात. त्यालाच इंग्रजीमध्ये  सॅलेड बाऊल किंवा मेल्टींग पॉट म्हटलं जातं. भारताचं हे वैशिष्ट्यं आहे की, अशा विविध संस्कृती इथे येऊन त्या एक होऊन गेल्या आणि आपलं योगदानही देऊन गेल्या. भक्ती संप्रदायात ज्या पद्धतीने केवळ एका धर्मासाठी उपदेश नाही तसंच सुफी संतांच्या दर्ग्यावर जाणारे केवळ मुसलमान नसतात. साहित्यामध्ये रहीम आणि रसखान यांची भक्तीगीतं ही श्रीकृष्णाला उद्देशून आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतही असाच संस्कृतींचा मिलाफ दिसतो.

बैजू बावरा चित्रपटातलं प्रसिद्ध भक्ती गीत ‘मन तरपत हरी दर्शन को आज’ किंवा अमर मधील  ‘इन्साफ का मंदिर है ये’ हे महंम्मद रफी यांनी गायलं होतं. उस्ताद बिसमिल्लाह खान, उस्ताद बडे गुलाम अली खान यांचं भारतीय संगीतातील योगदान हे रवी शंकर आणि शिव कुमार शर्मा यांच्याच तोडीचं आहे. सध्याचं आघाडीचे संगीतकार ए आर रेहमान हे एकीकडे ‘पिया हाजी अली’ या गाण्याला संगीत देतात तर त्याचवेळी ‘शांताकारम भुजगशयनम’ यालाही संगीतबद्ध करतात.

जर कृष्णा जीजस आणि महंम्मदाबद्दल गाणं म्हणतं असतील तर ते नैसर्गिक आणि अंतःप्रेरणेतून आलेलं आहे. पण असहिष्णू लोक केवळ स्वतःच्या संकुचित चष्म्यातून या घटनांकडे पाहतात आणि त्या त्यांना सहन होत नाहीत. तालिबान आणि ख्रिश्चन मूलतत्त्ववादीही याच पद्धतीने संकुचित विचार करतात.

या सगळ्या वृत्तीला कृष्णा यांच्या एका चाहत्याने खूप चांगलं उत्तर दिलं. “ट्रोल आर्मीला इथल्या सरकारचं पाळबळ आहे. माझं सामाजिक आकलन, राजकीय विचार आणि भाजपविरोधातील माझी भूमिका यामुळे ट्रोल आर्मी अनेकदा माझ्या मागे लागली होती. माझा प्रत्येक कलेवर  विश्वास आहे. अल्ला, जीजस आणि राम हे वेगळे नाहीत. हा बहुविध भाषा आणि संस्कृतींनी नटलेला देश आहे.” असे विचार निर्भीडपणे मांडणाऱ्या भारतीयाला सलाम !

लेखक हे गेली अनेक वर्षे सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी कार्यरत असून सेक्युलरिझमच्या तत्वाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांची कम्युनल पॉलिटिक्सः फॅक्ट्स वर्सेस मिथ्स, गॉड पॉलिटिक्स, फॅसिझम अॉफ संघ परिवार, रिलिजन, पॉवर अॅण्ड व्हायलंस अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

1 Comment

  1. मंगेश देव Reply

    भारताची संस्कृती ही वेगवेगळ्या धर्मांची सरमिसळ आहे. हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचा भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये वाटा आहे. असं मत राम यांनी मांडले आहे. मग या सांस्क्रूतिक जडणघडणीमधे दोन्ही धर्मियांवर एकसारखेच धार्मिक संस्कार कां झाले नाहीत? जर श्रीक्रूष्ण, गणपती या देवता केवळ हिंदू न राहता सर्व कलाकारांच्या, कलेच्या देवता म्हणून समाजात रूजल्या. तशा पद्धतीने इतर धर्मिय प्रतिके कां तयार नाही झाली? आज लोककलांमधून हिंदू देवता, तत्सम प्रतिकांचा मुबलक व जरा उथळच म्हणावा इतपत मुक्त वापर दिसतो, पण अन्य धर्मिय देवतेच्या चित्राची कल्पना मात्र मुळासकट उपटली जाते. कुठे आणी कुणामधे आलीय सहिष्णुता? उलट तिथे तर कट्टर आणी कडवेपणाच अधिक वाढलेला दिसतोय. आणी तसा उलटा आरोप मात्र हिंदूंवर होत आहे हे च कटु पण सत्य आहे. भक्ती संप्रदायात ज्या पद्धतीने केवळ एका धर्मासाठी उपदेश नाही त्यांचं संगीत हे कोणत्याही सीमा रेषांनी बांधलेलं नाही, असं राम पुनियानी म्हणतात, पण मग साध्या वंदे मातरमला, सुर्यनमस्काराला किंवा योगासनांना पण जेंव्हा गेल्या काही वर्षांमध्ये धर्माच्या नावावर विरोध करण्यास सुरुवात झाली आहे, त्याचे बद्दल काय ? खरंतर ही सरमिसळ भक्ती आणि सुफी तसेच वारकरी परंपरांमध्ये, खाण्याच्या पद्धतींमध्ये, कला, साहित्य, स्थापत्यशास्त्र या सगळ्यामध्ये बघायला मिळते. पण त्यांतील ठराविक बाजूंनीच कायम कमीपणा, दुय्यमपणा घ्यावा अशी अपेक्षा वारंवार, सततच ठेवल्याने समतोल ढासळायला वेळ लागेल कां?

Write A Comment