fbpx
कला

दडपशाही, कलाकार आणि कलाकृती

अमेरिका हा मुक्त भांडवलशाहीचा पुरस्कार करणारा देश आहे,  त्यामुळे तो कम्युनिस्ट विचासरणीच्या विरोधात असणार यात नवल नाही.  तथापि १९४० आणि १९५०च्या दशकात अमेरिकेत कम्युनिस्ट विरोध अतिशय टोकाला (Paranoid) गेला. त्याकाळात तिथे सत्ताधारीवर्गाने कम्युनिस्ट असल्याच्या केवळ संशयावरून हजारो व्यक्तींचा छळ केला. कम्युनिस्टांशी कोणाचे लागेबांधे आहेत, कोण विघातक कारवाया करत आहे, कोण कम्युनिस्टांचे सहानुभूतीदार आहेत, इत्यादींबाबत अमेरिकी नागरिक,  सरकारी कर्मचारी, संस्था यांचा तपास करण्यासाठी तिथल्या वेगवेगळ्या तपास यंत्रणा, सरकारी समित्या काम करत होत्या. हजारो अमेरिकी लोकांवर ते कम्युनिस्ट असल्याचा किंवा कम्युनिस्टांचे सहानुभूतीदार, सहप्रवासी असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. काही लोकांवर तर ते सोव्हिएट रशियाकरता हेरगिरी करत असल्याचाही आरोप करण्यात आला. अमेरिकेतील तेव्हाचा एक सेनेटर जोसेफ मॅकार्थी हा कट्टर कम्युनिस्टद्वेष्टा होता. त्याने जाहीर आरोप केला की दोनशे पाच कार्डधारक कम्युनिस्ट शासनयंत्रणेत घुसलेले आहेत, त्यातील काही अमेरिकेच्या आर्मीतही आहेत. त्यामुळे तर एकच खळबळ उडाली. मॅकार्थीने कम्युनिस्टांविरुध्द जहरी अपप्रचार केला, भाषणे दिली. जोसेफ मॅकार्थी हा गव्हर्नमेंट ऑपरेशन्स कमिटीचा चेअरमन होता आणि ह्या समितीची एक पर्मनंट सबकमिटी ऑन इन्व्हेस्टीगेशन्स होती, त्याचाही तो चेअरमन होता. त्याच्या समोर सुनावणी चालायची. ह्या सुनावणीत त्याने न्याय वगैरे गुंडाळून ठेवला होता. जोसेफ मॅकार्थीच्या ह्या कम्युनिस्ट विरोधी अत्यंत द्वेषपूर्ण विचारसरणीमुळे व त्याच्या कारवायांमुळे तो काळ मॅकार्थी इरा म्हणून ओळखला जातो व मॅकार्थीझम हा शब्दप्रयोग तेव्हापासून रूढ झाला जो आजही वापरण्यात येतो. कोणताही पुरावा नसताना देशद्रोहाचा व राज्यसत्ता उलथून टाकण्याचा आरोप करणे म्हणजे मॅकार्थीझम. राजकीय  विरोधकांवर देशद्रोहाचा आरोप करणे हा प्रकार सध्या किती बोकाळला आहे ते आपल्यालाही दिसत आहेच. तसेच लोकांच्या मनात एखाद्या समुदायाविषयी किंवा विचारधारेविषयी कलुषित भावना असतात. सत्ता  मिळवण्यासाठी अशा कलुषित भावनांचा वापर करणे म्हणजेही मॅकार्थीझम. आजच्या काळातही जगभरात ठिकठिकाणी ह्या मॅकार्थीझमचा प्रत्यय येत असतोच. अमेरिकेत त्यावेळी कम्युनिस्ट असल्याचा आरोप करून ज्या लोकांची सुनावणी व्हायची त्यात सरकारी कर्मचारी होतेच, त्याबरोबर विचारवंत, कामगार संघटनेचे कार्यकर्ते, साहित्यिक व हॉलिवूडचे लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांना टार्गेट करण्यात आलेले होते. अशा  सुनावणीदरम्यान कम्युनिस्ट असल्याचा फक्त संशय असेल पण सबळ पुरावा नसेल तरी त्याला दोषी मानले जायचे. एखादी व्यक्ती कम्युनिस्टधार्जिणी आहे किंवा त्या विचारांची आहे म्हणजे फार मोठा धोका आहे असे ठरवले जायचे. अशा दोषी ठरवलेल्या व्यक्तींना नोकरी-व्यवसायाला मुकावे लागले, त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले. जे मनोरंजन व्यवसायात होते त्यांचे करिअर उध्वस्त झाले. यापैकी काहींना तर तुरुंगातही पाठवण्यात आले. कम्युनिस्ट विचारांना पायबंद घालण्यासाठी दोन कायदे करण्यात आले होते, त्यामुळे केवळ संशयावरून शिक्षा देणे सोपे होते. पण शिक्षा झालेले, दोषी ठरवलेले लोक जेव्हा अपिलात गेले तेव्हा अनेकांच्या शिक्षा गैरकायदेशीर ठरवण्यात आल्या, ज्या कायद्यानुसार शिक्षा देण्यात आल्या होत्या ते कायदेच घटनाबाह्य ठरवण्यात आले. पण तोपर्यंत त्या लोकांचे आयुष्य मात्र उध्वस्त झाले होते.

कम्युनिस्टांविरुध्द इतकी दडपशाही तिथे सुरू होती पण बहुतेक वर्तमानपत्रे, पत्रकार यांची त्याविरुध्द आवाज उठवण्याची हिंमत नव्हती. जोसेफ मॅकार्थी ह्या सेनेटरच्या विरुध्द बोलण्याच्याही हिंमत फार कोणात नव्हती. अगदी मोजक्याच लोकांनी ती हिंमत दाखवली. त्याचा परिणाम नक्कीच झाला.

एखाद्या गटाविरुध्द अशी सरकारी दडपशाही सुरू होते तेव्हा मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती ह्या अगदी सॉफ्ट टार्गेट असतात, कोणीही यावे अन्  टपली मारून जावे. सेंसॉर बोर्ड, वित्त पुरवठा, चौकशीचा ससेमिरा, त्यांच्या  सिनेमांवर बहिष्कार टाकणे अशा मार्गांनी त्यांची नाकेबंदी करणे सोपे असते. त्यावेळेस अमेरिकेत लोकप्रतिनिधींची म्हणजे सेनेटरची एक समिती १९३८ साली स्थापन करण्यात आलेली होती. हाऊस अन-अमेरिकन अॅक्टीव्हिटीज कमिटी (HUAC – एचयूएसी) ह्या नावाने तिचे कामकाज चालायचे. ह्या समितीसमोर मुख्यत: हॉलिवूडमधील अनेक लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांची सुनावणी झाली. त्यांनाप्रश्न विचारला जायचा तुम्ही कम्युनिस्ट पक्षाचे सभासद आहात का किंवा कधी होता का? तसेच त्यांना त्यांचे जे सहकारी कम्युनिस्ट आहेत त्यांची नावे सांगायला सांगितले जायचे. ज्यांची उत्तरे द्यायला नकार दिला किंवा ती समाधानकारक नव्हती किंवा समितीने ज्यांच्यावर कम्युनिस्ट असल्याचा ठपका ठेवला त्यांची ब्लॅकलिस्ट बनवली गेली व त्यांना काम मिळणे बंद झाले. एकूणतीनशे वीस  हॉलिवूड कलाकारांची अशी ब्लॅकलिस्ट बनवण्यातआली होती. ह्यातील  बहुतेकांच्या करिअरवर त्याचा वाईट परिणाम झाला. काहींची करिअर संपली तर काही ह्या वेडेपणाचा जोर ओसरल्यानंतर पुन्हा काम करू शकले.

आर्थर मिलर आणि इलिया कझान हे त्यावेळचे हॉलिवूडमधील दोन दिग्गज. आर्थर मिलर हा एक महान नाटककार आणि इलिया कझान हाही त्याचाच समकालीन हॉलिवूडचा एक महान दिग्दर्शक. त्याबरोबरच तो निर्माता, अभिनेता व लेखकही होता. ह्या दोघांमध्ये  आधी खूप घनिष्ट मैत्री होती, त्यांनी एकत्र येऊन ऑल माय सन्स, डेथ ऑफ अ सेल्समन ह्यासारख्या काही उत्तम कलाकृती दिल्या होत्या. नंतर अमेरिकेतील ह्या राजकीय परिस्थितीमुळे व दडपशाहीमुळे त्यांच्यात वितुष्ट आले. ही कहाणी जाणून घेऊ.

इलिया कझान हा १९३८च्या सुमारास दीड वर्षे कम्युनिस्ट पार्टी ऑफ युएसएचा सभासद होता. नंतर मात्र त्याचे कम्युनिस्ट पार्टीबरोबर मतभेद झाले व त्याने संबंध तोडून टाकले. पण तोकधीकाळी  कम्युनिस्ट पार्टीचा सभासद होता ह्या आधारे १९५०साली म्हणजे बारा वर्षांनी त्याला हाऊस अन-अमेरिकन अॅक्टीव्हिटीज कमिटी (HUAC – एचयूएसी) ह्या समितीसमोर सुनावणीसाठी बोलावण्यात आले. इतरही काही कलाकारांची अशी सुनावणी झालेली होती. तुमचे कम्युनिस्ट सहकारी कोण आहेत त्यांची नावे सांगा असा समितीने त्यांना आदेश दिला होता. अनेकांनी नावे सांगायला नकार दिला, त्याचे परिणाम भोगले. त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले. त्यांची करिअर संपली. कझानने मात्र आपल्या आठ मित्रांची नावे समितीला दिली. त्या आठही कलाकारांची करिअर मग संपुष्टात आली. त्यांना काम देण्यावर बंदी घालण्यात आली. कझानवर त्याच्या सहकारी-मित्रांनी विश्वासघाताचा आरोप केला. कझान सरकारी अवकृपेपासून आणि शिक्षेपासून तो वाचला, पण त्याचे काहीजवळचे सहकारी  त्याच्यापासून दूर गेले, त्यांनी त्याच्या बरोबरकाम करणे बंद केले. आर्थर मिलरही कझानपासून दुरावला, त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आले आणि नंतरची दहा वर्षे ते एकमेकांशी बोलले नाहीत की एकमेकांच्या अस्तित्वाची दखल घेतली नाही.

आर्थर मिलर हा नाटककार, सर्जनशील कलावंत. अमेरिकेतील त्यावेळच्या दडपशाहीमुळे त्याच्या मनात अस्वस्थतेचे बीज पेरले गेलेले होते, त्यातूनच द क्रुसिबल नाटक जन्माला आले. कझानच्या  कृत्यावरचे भाष्य करणारे नाटक म्हणून त्याकडे बघितले जाते, पण केवळ त्याच मुद्द्यापुरतचे हे नाटक मर्यादीत नाही. खरेतर मॅकार्थीझमचा मुद्दा आणि वातावरणातील भय, दडपशाही याच्यावर नाटक लिहिण्याचे मिलरने ठरवले होते व त्यासाठी त्याचे संशोधनही सुरू होते. केवळ संशयावरुन सामान्य लोकांची छळणूक करणे, त्रास देणे हा विच-हटींग म्हणजे चेटकीण – चेटकीण म्हणून आरोप करण्याचा प्रकार. त्या वेळेस दडपशाही इतकी टोकाला गेलेली होती की मिलरला थेट सरकारविरोधी लिखाण करता येणे शक्यच नव्हते. त्याने चेटकीण– चेटकीण हेच प्रतीक वापरून नाटक लिहिण्याचे ठरवले. १६९२मध्ये अमेरिकतील  मॅसेच्युसेट्सजवळील सालेम इथे विच हटींगचे प्रकार घडले होते.  आपल्याकडे आदिवासी भागात, दुर्गम भागात डाकीण ठरवले जाण्याची  दुष्ट रुढी अजूनही आहे (डाकीण एक अमानवी प्रथा: शोध आणि अन्वयार्थ  ह्या संध्या नरे पवार यांच्या पुस्तकात याबद्दल सविस्तर माहिती आहे).  अशी प्रथा पूर्वी जगातील अनेक देशात होती आणि स्त्रियांना डाकीण ठरवून शिक्षा दिली जायची, मारून टाकले जायचे. कोणतीही स्त्री डाकीण नसतेच, त्यामुळे ते सिध्द केले जायचे केवळ कपोलकल्पित पुराव्यावरुन किंवा संशयावरुन, लोकांना एखाद्या स्त्रीविरुध्द भडकावून. खप्पा मर्जी झालेल्या स्त्रीचा काटा काढण्यासाठी ही रुढी वापरली जायची. अमेरिकतील सालेम इथेही डाकीण असल्याचा आरोप ठेवून खटले दाखले केले गेले आणि वीस लोकांना फासावर चढवले गेले, त्यात चौदा स्त्रिया होत्या. १६९३च्या आधीही बारा स्त्रियांना डाकीण असल्याच्या आरोपावरुन फासावर चढवण्यात आलेले होते. तो जुना काळ – लोक अतिशय अंधश्रध्द असायचे, जादूटोणा, चेटकीण-डाकीण अशा गोष्टींवर चटकन विश्वास ठेवायचे, जमाव बेभान व्हायचा, मास हिस्टेरिया  तयार व्हायचा. धर्मसत्तेचे म्हणजे चर्चमधील अधिकारी व्यक्तींचेही ह्या चेटकीण प्रकरणाला समर्थन असायचे. त्यावेळेस  धर्मसत्तेला मान असल्याने मग तर चेटकीण ठरवलेल्या स्त्रीची सुटकाच नसायची. हा विषय घेऊन नाटक लिहायचे मिलरने ठरवले. त्याला हे प्रकरण माहीत होतेच, पण सालेम इथे जाऊन, दहा दिवस तिथे राहून, १६८३ सालचे जुने निवाडे, कागदपत्रे वाचून  त्याने आणखी माहिती गोळा केली आणि हे द क्रुसिबल नाटक जन्माला घातले. १९५३ मध्ये ते रंगभूमीवर आले. त्याला सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून टोनी अवार्ड हा मानाचा पुरस्कार मिळाला. एक अभिजात नाटक म्हणून ते आजही ओळखले जाते. जगभर त्याचे प्रयोग होत असतात. वारंवार प्रयोग होणारे नाटक म्हणून ते प्रसिध्द आहे कारण जमाव विरूध्द एक व्यक्ती असा संघर्ष जसा त्यात आहे तसेच व्यक्तीचा आंतरिक संघर्षही आहे. आर्थर मिलर हा इतका समर्थ नाटककार होता की असा मुद्दा घेऊन त्याने नाटक लिहिले पण ते प्रचारकी, ढोबळ झाले नाही कारण मानवी स्वभावातील गुंतागुंत तो चपखलपणे वापरतो. नायक-खलनायक, काळे-पांढरे असे चित्र रंगवत नाही. जेव्हा जेव्हा मास हिस्टेरियाच्या केसेस होतात, ह्या नाटकाची आठवण केली जाते, जेव्हा जेव्हा  राजकीय विरोधकांचा छळ सुरू होते ह्या नाटकाचा दाखला दिला जातो. ह्या नाटकावर नंतर १९९६ मध्ये एकसिनेमाही निघाला, ज्यात डॅनियल डेलेवीस व विनोना रायडर ह्यासारख्या नामवंत कलाकारांनी काम केले होते.

यात आपल्या विषयाशी संबंधित मुद्दा असा की अमेरिकेत १९५०साली जसे  कोणालाही कम्युनिस्ट कम्युनिस्ट असा आरोप करून दोषी ठरवले जायचे, देशद्रोही ठरवले जायचे त्यावरचे हे नेमके भाष्य नाटकातून व्यक्त होत होते. वैयक्तिक सूडापोटी आणि लाभासाठी कोणीही, अगदी लहान मुलेसुध्दा जसा कोणावरही आरोप करत होते आणि अधिकारी यंत्रणा ते मान्य करून शिक्षा देत होत्या तोच छळ कम्युनिस्टांबाबत सुरू होता. नाटकात असे खोटे आरोप करून जमावाला बेभान करणारी एक तरुण मुलगी असते, पण पुढे घटनांचे नियंत्रण तिच्या हातात रहात नाही, आणि तिच्या लाडक्या व्यक्तीलाही फाशीची शिक्षा दिली जाते, तेव्हा तिचे डोळे उघडतात, आपण काय करून बसलोय याची तिला जाणीव होते, पण आता फार उशीर झालेला असतो. ह्या मुळे नाटकातून सर्वात महत्वाचे भाष्य मिळते मॅकार्थीझमचा वापर करून तुम्ही तुमचे मनसुबे भलेही हासील कराल पण झुंडशाही शेवटी तुमच्यावरही उलटल्याशिवाय राहणार नाही. वास्तवात ह्या सालेम विच-हटींग म्हणजे चेटकीण – चेटकीण प्रकरणामुळे एक फायदा अनपेक्षितपणे झाला. राज्यसत्तेवर धर्मसत्तेचा अधिकार चालत होता, तो कमी व्हायला आणि खिळखिळा व्हायला सुरवातझाली, कारण  रूढींच्या फोलपणबाबत लोक थोडेतरी जागृत झाले.

आर्थर मिलरने पुढे २००० साली एक लेख लिहून त्याला नाटक का लिहावेसे वाटले सांगितलेले आहे, तो म्हणतो, १६९२ च्या सालेममधील घटना व अमेरिकेतील १९४० व ५० च्या दशकातील परिस्थिती यात मला आश्चर्यकारक साम्य दिसत होते. ही परिस्थिती अशी होती की एका संपूर्ण पिढीला जणू पक्षाघात झाला होता, सार्वजनिक जीवनात विश्वास व सहिष्णुता यांचा  रिवाज विसरला गेला होता. त्यामुळे द क्रुसिबल नाटक लिहिणे ही माझी एक गरज होती. त्यावेळेस कम्युनिस्टविरोधी हिस्टेरिकेल वातावरण होते, त्याला कोणी तत्वप्रणालींचा वाद म्हटल्याचे मलाआठवत नाही,  पण तो त्याचाच वाद होता. आम्ही चर्चा किंवा वादकरणे बंद करून टाकले, आम्ही व्यवस्था उध्वस्त करू पाहणार्‍या लोकांचाच केवळ माग काढत नव्हतो तर तशा कल्पनांचाही माग काढायला सुरवात केली, अगदी कोणाची भाषा संशयास्पद वाटतेह्यावरही नजर  ठेवली. सोशॅलिझम व कम्युनिझम यांच्या बरोबर संबंध असलेल्या कोणत्याही आणि सर्व आयडियाजची-कल्पनांची विश्वासार्हता नष्ट करणे हा आमचा उद्देश होता. तशा कल्पना कोणी सांगत असेल तर तो जाणते किंवा अजाणतेपणी सोव्हिएट युनियनचा एजंट आहे असा आम्ही त्याच्यावर शिक्कामारत होतो.

द क्रूसिबल नाटक रंगभूमीवर आल्यावर ते चालायला जरा वेळ लागला पण नंतर त्याला भरपूर यश मिळाले, पुरस्कार मिळाले, वाखाणणी  मिळाली. त्याच वेळेला कझानला आपली बाजूही स्पष्ट करायची होती. तो लगेच १९५४ मध्ये ऑन द वॉटरफ्रंट सिनेमा घेऊन आला. यांची कथा-पटकथा बड शूलबर्गने लिहिलेली होती आणि त्यानेही कझानसारखेच एचयुएसीसमितीसमोर इतरांची  नावे सांगितलेली होती. यात मार्लन ब्रॅन्डोने काम केले होते. ह्या सिनेमाचे कथानक थोडक्यात असे होते, जॉन फ्रेंडली हा बंदर कामगारांच्या युनियनचा बॉस आहे. पण ही कामगार युनियन आहे गुन्हेगारी टोळीशी संबंधित. ही युनियन कामगारांकडून हप्ते गोळा करते, त्यांची दहशत आहे. जॉन फ्रेंडलीने पैसे द्यायला नकार दिलेल्या कामगारांचे खूनही केलेले आहेत, पण त्याच्याविरुध्द साक्ष द्यायची कोणाची हिंमत नाही. एक जोयी नावाचा कामगार साक्ष देणार असतो तर त्याचाच खूनहोतो. टेरी मॅलॉय (मार्लन ब्रॅन्डो) हा  सुरवातीला जॉन फ्रेंडलीच्याबरोबर काम करत असतो. ह्या खूनानंतर त्याचे डोळे उघडतात आणि तो जॉन फ्रेंडलीविरुध्द साक्ष देतो. युनियनची दहशत संपवतो. कझानने एचयुएसी समितीसमोर साक्ष देऊन इतर आठजणांची नावे उघड केलेली होती, त्याबरोबर तो ह्या कथानकाचा संबंध जोडत होता. नावे उघड न करण्याबाबत खूप दबाव असूनही ती उघड केली हे त्याच्या मते धैर्याचे काम होते. सिनेमाची कथा  सत्य घटनेवर आधारित होती. रेड हूक ह्या ब्रुकलीनजवळील बंदरात खरोखर एका माफिया युनियनची दहशत होती आणि कामगारांचे खूनही झालेले होते. पण ह्या ऑन द वॉटरफ्रंट  सिनेमाच्या कथेबाबत आणखी एक गंमत आहे, तिचा आणि आर्थर मिलरचाही संबंध आहे. १९४७ मध्ये एक पटकथा मिलरने लिहिलेली होती आणि कझान ती दिग्दर्शित करणार होता. द हूक असे सिनेमाचे नावही ठरले होते. मिलरला बंदरातील गुंड युनियन, त्यांची दहशत याची माहिती झालेली होती. तिथे पीट पॅन्टो ह्या कामगाराने गुंड युनियनविरुध्द बंड करण्याचा प्रयत्न केला, पण १९४९ मध्ये तो गायब झाला, त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. त्यावेळेस पीट पॅन्टो कुठे आहे हा प्रश्न कामगारांमधील एक परवलीचा प्रश्न बनला होता. (मारूती कांबळेचे काय झाले ह्या सामना सिनेमातील संवादाची आठवण येतेय?) नंतर दोन वर्षांनी चुन्याच्या खाणीत पीट पॅन्टोचा मृतदेह मिळाला. मिलरने पीट पॅन्टोचे नाव मार्टी फेरेरा ठेवले होते. ही पटकथा घेऊन मिलर आणि कझान १९४७ मध्ये कोलबिंया पिक्चर्सच्या हॅरी कोहन नावाच्या प्रमुखाला भेटले. त्यांच्या सोबत खुद्द मर्लिन मन्रो होती. हॅरीने त्यांना हॉलिवूडचा एक खूप ताकदवान युनियन नेता रॉय ब्रुवर ह्याला भेटायला सांगितले. हो, कथेत युनियन  काळ्या रंगात रंगवलेली आहे,           उगाच त्यांनी नंतर बखेडे केले तर काय घ्या? रॉयने मिलर-कझानला सांगितले तुमच्या कथेतील युनियन कम्युनिस्टांशी संबंधित आहे असे दाखवा! कोलबिंया पिक्चर्सच्या हॅरीनेही त्याच्या सुरात सूर मिळवत हा बदल आवश्यक असल्याचे सांगितले. मिलरने अर्थातच  पटकथेत असा काही मूर्खपणाचा बदल करायला नकार दिला आणि पटकथा परत घेतली. तो घरी आला तर हॅरीचा एक टेलिग्राम त्याची वाट बघत होता. टेलिग्राममध्ये मेसेज होता: “आम्ही पटकथेत  अमेरिकाधार्जिणा बदल करायला सुचवल्याबरोबर तुम्ही लगेच माघार घेता हे लक्षणीय आहे. ” ऊघडचं आहे की  कझानचा ऑन द वॉटरफ्रंट सिनेमा हा ह्या द हूक पटकथेतच फेरफार करून बनलेला होता. स्वत:ला जस्टीफाय करण्यासाठी कझानने तो बनवला. मात्र आर्थर मिलरने हा विषय आधीच घेतला होता, इतके उघड साम्य होते, तरीही कझान-बड शूलबर्गने मिलरला श्रेय दिले नाही किंवा मिलरनेही त्या बाबतकाही तक्रार केली नाही, कारण एक तर सत्य घटनेवर आधारित कथा होती जी कोणीही लिहू शकत होता, दुसरे कथेत त्यांनी खूप बदल केले होते. मिलरच्या पटकथेवरच सिनेमा निघाला असता तर तो वेगळा, शोकांत झाला असता.

द क्रुसिबल व ऑन द वॉटरफ्रंट ह्या मालिकेतील आणखी एक तिसरी कडी म्हणजे १९५५-५६ साली म्हणजे ऑन द वॉटरफ्रंट सिनेमा आल्यानंतर एकच वर्षाने मिलरचे रंगभूमीवर आलेले अ व्ह्यू फ्रॉम ब्रिज हे नाटक. याचे कथानक मिलरच्या मनात आधीपासूनच घोळत होते. कथानकाचा काळ आहे १९००च्या सुमाराचा. त्यावेळेस इटलीमधून सिसिलियन लोक बेकायदेशीररित्या अमेरिकेत येत होते. येऊन स्थिर झाल्यावर नवीन येणार्‍यांना मदत करत होते. सगळाच बेकायदेशीर व्यवहारपण त्यांच्यात  एकी होती, नियम होते. कोणीही इतरांची माहिती सरकारला देत नसे. अशी कोणी माहिती सरकारला दिली तर त्याला विश्वासघातकी म्हणायचे, त्याला वाळीत टाकले जायचे. एडी हा असाच  स्थलांतरित. तो त्याच्या क्षूद्र, स्वार्थी मनोवृत्तीमुळे दोन नवीन स्थलांतरितांची माहिती सरकारला देतो, त्यांना अटक होते मात्र त्याचा परिणाम एडीला भोगावा लागतो. मिलरने एडीला‘खबरी  खलनायक’ केले नव्हते तर स्वभावदोष व परिस्थितीमुळे आलेली असहाय्यता ह्यातून झालेली एडीची शोकांतिका असे स्वरूप केले होते.

डेथ ऑफ अ सेल्समन हे आर्थर मिलरचे अभिजात नाटक. कलाकार त्यात जीव  ओतून काम करतात. त्यात एका सेल्समनची शोकांतिका आहे. उजव्या अतिरेक्यांनी त्याचा एकमेव अर्थलावला हे नाटक  भांडवलशाहीविरोधी आहे, कम्युनिझमचा पुरस्कार करणारे आहे. नाटक समाजासाठी घातक आहे! त्यावर तेव्हाही मिलरला भयंकर त्रास व मनस्ताप सहन करावा लागला.

दडपशाहीचा व ठोकळेबाज विचारसरणीचा कलाकार व कलाकृती यांच्यावर झालेला हा परिणाम. आर्थर मिलरने द क्रुसिबल नाटक का लिहावेसे वाटले ते सांगताना जे म्हटले ते वर दिलेले आहे, त्यात थोडा बदल करून विचारता येईल, आपल्या आताच्या पिढीला पक्षाघात झाला आहे का? सार्वजनिक जीवनात विश्वास व सहिष्णुता यांचा रिवाज आपण विसरलो आहोत का? सध्या देशात हिस्टेरिकेल वातावरण आहे का? ह्या तत्वप्रणालींच्या संघर्षात, चर्चा किंवा वाद करणे आपण बंद करून टाकले आहे का? आपण वेगळ्या कल्पना, मते यांचा माग काढत राहून त्यांना नेस्तनाबूत करायला बघत आहोत का? अगदी कोणाची भाषा संशयास्पद वाटते ह्यावरही नजर ठेवत आहोत का? आपल्यापेक्षा वेगळ्या अशा कोणत्याही आणि सर्व आयडियाजची-कल्पनांची विश्वासर्हता नष्ट करणे हा आपला उद्देश आहे का? तशा कल्पना कोणी सांगत असेल तर तो देशद्रोही आहे असा आपण त्याच्यावर शिक्का मारत आहोत का?

 

अमेरिकेतील ह्या कांडावरून आपल्याला घेता येण्यासारखे खूप काही आहे, तयारी फक्त हवी.

लेखक चित्रपट, नाटक, साहित्य, अर्थक्षेत्र व गुंतवणूक इत्यादी विषयांवर सातत्याने लेखन करत असतात. ते कथा लेखकही आहेत.

Write A Comment