fbpx
कला राजकारण विशेष

मुलाखत – किरण माने

मराठी टीव्ही क्षेत्रामध्ये अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका “मुलगी झाली हो” मधून अचानक काढून टाकल्याने गेला आठवडाभर मराठी प्रसार माध्यमे आणि सोशल मिडियावरील मराठी भाषकांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. त्यांनी फेसबूकवर केलेली एक पोस्ट ही मोदींच्या पंजाबमधील रद्द झालेल्या रॅलीशी जोडून पाहिली गेल्यानेच हा वाद रंगला आहे. फॅसिजमविरोधी, शाहू फुले आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं माने यांचं म्हणणं आहे. या प्रकरणाचा वाद रंगल्यानंतर संबंधित प्रॉडक्शन हाऊस तसेच संबंधित चॅनल यांनी माने यांच्यावर महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप लावला आहे. या सगळ्या वादामागे माने यांचं काय म्हणणं आहे, हे समजून घेण्यासाठी राइट अँगल्स टीमने त्यांची घेतलेली मुलाखत.

विशिष्ट राजकीय भूमिका सातत्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून मांडल्याने आपल्याला स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका `मुलगी झाली हो’ मधून काढून टाकल्याचं आपला आरोप आहे. नक्की काय झालं होतं? 

मालिकेतून काढून टाकायची सात-आठ दिवस आधी, मी एक उपरोधात्मक पोस्ट सोशल मिडियावर शेयर केली होती. थिएटरमध्ये एक-दोन प्रेक्षक असले तरी आम्ही शो करतो असं एक प्रसंगानुरूप मी लिहिलं होतं. त्यानंतर ट्रोल माझ्यावर तुटून पडले. ट्रोल तुटून पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण यावेळी ते जास्त आक्रमक होते. आई-बहिणीवरून शिव्यांचा खच माझ्या कमेंट बॉक्समध्ये होताच. मात्र यावेळी त्यांनी स्टार प्रवाहच्या वेबसाइटवर त्या मालिकेच्या पेजवरून जाऊन माझ्याविरोधात कँपेन सुरू केलं. किरणचा बाजार उठवून देऊ, या मालिकेचा प्रोड्युसर कोण आहे, याला बघून घेऊ अशा कमेंट तिथे झाल्या. हे नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी घडतंय याची मला जाणीव होती पण कोणत्या थराला नंतर जाईल याची कल्पना मी केली नव्हती. दोन-तीन दिवसांतच प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला की तुम्हांला या मालिकेतून काढून टाकलं आहे. त्यासाठी त्यांनी काहीच कारण दिलं नाही. मी हैराण झालो आणि धक्काही बसला. मी चॅनेलला फोन केला, पण कोणीच मला उत्तर देईना किंवा फोन उचलेना. शेवटी मला एका चॅनेमधील व्यक्तीकडून सांगण्यात आलं की, एका महिलेची तक्रार आणि राजकीय पोस्ट सोशल मिडियावर करत असल्याने काढण्यात आलं आहे. तरीही मला समजेना नक्की काय झालं. कारण गैरवर्तनाचा काही प्रश्नच नव्हता आणि माझी राजकीय भूमिका  उघड आहे. आता गेल्या आठ दिवसांत घडलेल्या या सगळ्या घटनांचा विचार करता मला एक संगती लागते की हे सर्व जाणीवपूर्वक करण्यात आलं होतं आणि त्यामागे प्लॅनिंगही होतं. फोन नंतर १२ तास काहीच झालं नाही. मला असं अधिकृत कारण न देता काढून टाकायला मी कोणी नगण्य कलाकार नाही. मी त्या मालिकेतील प्रमुख भूमिका करत होतो आणि त्या मालिका लोकप्रिय करण्यामध्ये माझं योगदान मोठं होतं. मला काहीच सांगण्यात न आल्याने मी माध्यमांसमोर जाऊन माझी बाजू मांडली.

पण तुमच्याविरोधात तुमच्याच मालिकेतल्या काही महिलांनी गैरवर्तनाची तक्रार केली आहे. त्याबद्दल काय? 

पहिलं म्हणजे याच मालिकेतल्या इतरही काही महिलांनी माझ्याबाजूने साक्ष देत माझ्या वर्तनात काहीच गैर नसल्याचं माध्यमांसमोर जाऊन स्पष्ट केलं आहे. महिलेशी “गैरवर्तणूक” हा शब्द गंभीर आहे आणि तोच माध्यमांनी उचलला. पण त्याचा अर्थ काय होतो? आरोप करणाऱ्या महिलांच्या मते मी त्यांना टोमणे मारायचो. मग त्यांनी आधी तक्रार का नाही केली? मला प्रोडक्शन हाऊसने त्याबद्दल जाब का नाही विचारला? मला माझी बाजू मांडण्याची संधी का नाही दिली? नक्की काय गैरवर्तन माझ्याकडून झालं? उलट या खोट्या प्रचाराला बळी न पडता, आपल्या करिअरची पर्वा न करता, दबावाला बळी न पडता याच मालिकेत काम करणाऱ्या इतर अनेक महिलांनी पुढे येऊन मला पाठिंबा दिला. ही दुसरी बाजू पुढे आल्याने गैरवर्तणूकीचा आरोप पूर्ण फसला. कोणतीही चौकशी न करता चॅनेलने माध्यमांना तोपर्यंत गैरवर्तणूक म्हणून कारण दिलं होतं. पण ते सत्य नसल्याने केवळ माझी राजकीय भूमिका हेच कारण उरतं.

या वादामध्ये मराठी इंडस्ट्रीतील फारच थोडे जण तुमच्या बाजूने उभे राहिले. कोणीच भूमिका घ्यायला फारसे पुढे आले नाहीत असं का?

कोणत्याही विषयावर, वादावर भूमिका न घेणं ही मराठी इंडस्ट्रीची खासियत आहे. एखाद्याची हांजी हांजी करून काम मिळवणं, गोड बोलून काम मिळवणं हे इथे सर्रास चालतं. त्यामुळे दुसऱ्याच्या लफड्यात कशाला पडा, अशी भूमिका बहुतेकांची असते. म्हणून ते एखाद्याच्या पाठी उभे राहत नाहीत. तसंच, जी विचारधारा मी मानत नाही त्याचे जास्त लोक या इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यासारख्याच्या पाठीशी उभं न राहणं यात काहीच नवीन नाही. मी त्यांच्यासाठी उपरा आहे. उलट त्यामुळे एक झालं की या लोकांचे चेहरे कळले. आमच्यासारख्या कलाकारांना मायक्रो लेव्हलला कसा त्रास दिला जातो आणि तो कसा सांगता येत नाही, हे यानिमित्ताने स्पष्ट झालं. मी २५ वर्ष या क्षेत्रामध्ये आहे, १० नाटकं माझ्या नावावर आहेत, अनेक मालिकांमध्ये मी काम केलंय, ग्रामीण भागामध्ये माझा चेहरा लोकप्रिय आहे. अशावेळी आदेश बांदेकरसारखे लोक मी प्रसिद्धीसाठी हे सर्व करत असल्याची प्रतिक्रिया देतात हे फारच हास्यस्पद आहे. त्याला मुंबई-पुण्याच्या पलीकडे महाराष्ट्रभरात असलेली माझी लोकप्रियता माहित नाही. मी त्याच्यापेक्षाही लोकप्रिय आहे. ते मला त्यांच्यातला समजतच नाहीत तर ते माझ्यासाठी उभे कसे राहणार? पण त्यावेळी निर्माता संतोष कणेकर, अभिनेत्री अनिता दाते, समीर विद्ध्वांस यांनी मात्र माझ्या बाजूने उघड भूमिका घेतली. महिलांनी आरोप केल्यावरही अनिताने माझ्याबाजूने पुन्हा एकदा सोशल मिडियावर पोस्ट टाकून मला पाठिंबा दिला. त्यामुळे साथ देणारे कमी असले तरी आहेत. माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी मॅसेज, फोन करून मला प्रचंड पाठिंबा दिला. चॅनेलवर माझ्याविरोधात कितीही बातम्या दाखवल्या तरी “आय स्टँड विथ किरण माने” म्हणून माझ्या चाहत्यांनीच सोशल मिडियावर माझ्या बाजूने कँपेन सुरू केले आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या लोकांनी साथ कमी दिली तरी माझे हजारो चाहते माझ्याबरोबर आहेत.

तुमच्या भाषेबद्दल काहींचे आक्षेप आहेत की तुम्ही शिवराळ भाषेत बोलता?

तुम्ही माझ्या कमेंट बॉक्सवर नजर टाका आणि शिवराळ भाषा कोणाची आहे ते ठरवा. मला सातत्याने आई-बहिणीवरून शिव्या येत असतील तर मी त्याला आमच्या ग्रामीण भाषेत उत्तर दिलं तर ते शिवराळ कसं? शिव्या हा आमच्या ग्रामीण भागात जगण्याचा एक भाग आहे आणि त्या केवळ रागातून, द्वेषातून दिल्या जात नाहीत. काही वेळी मी या ट्रोलरना टोचेल, असं बोलतो. पण शब्द जपून आणि जाणीवपूर्वक असतात. नालायकाला हरामखोर म्हटलं आणि दलाल असणाऱ्यांना भडवा म्हटलं की मी शिवराळ? पण ट्रोलर्सचं काय? त्यांची भाषा कोण तपासतो? प्रमाणभाषाच खरी आणि आमची ग्रामीण भाषा शिवराळ? हे काय आरोप आहेत?

या वादाच्या निमित्ताने तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. त्याबद्दल तुमचं काम मत आहे?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे खूप गरजेचं आहे आणि सध्याच्या काळात तर विशेष. याआधी कॉलेजमध्ये असताना मी एकांकिका करायचो. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तर राजीव गांधींपासून सगळ्या नेत्यांवर आम्ही टिका करायचो. किंवा गावागावत जाऊन अंधश्रद्धेच्या विरोधात प्रचार करायचो. साधूचा वेष धारण करून लोकांना आधी चमत्कार दाखवायचो आणि मग त्यातील फोलपणा. पण त्याला कोणी आक्षेप घेतला नाही की आमच्या धर्माविरोधात बोलू नका म्हणून त्रास दिला नाही. सत्तेत असलेल्या सरकार विरोधात बोलणं, त्याच्या उणीवा दाखवून देणं हे जनतेचं काम असतं. कोणत्याही काळातली जनता सत्ताधारी सरकारबद्दल समाधानी नसते, ते चांगलं सरकार असं ती कधीच म्हणत नाही. पण आता मात्र असे प्रश्न विचारले की लोक तुटून पडतात आणि तुमच्यावर धावून येतात. राजकारण हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येक गोष्ट राजकारणासहच चालते. घरातल्या साध्या गॅसपासून ते नोकरी-धंद्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही. त्यामुळे मी माझं मत व्यक्त करत राहणार, त्यासाठी मला भीती नाही. मी एक प्रामाणिक कलाकार आहे आणि त्यामुळे माझ्याकडे काम येत राहिल. माझ्या विचारांनी ते थांबणार नाही. उलट त्या विचारांमुळेच ते येईल, असा मला विश्वास वाटतो.

या प्रकरणाचं पुढे काय होणार? हा वाद किती काळपर्यंत असाच सुरू राहणार? 

मला हा वाद चॅनेलने समोरसमोर बसून सोडवावा अशी इच्छा आहे. त्यांनी योग्य ते कारण द्यावं अन्यथा आपले आरोप मागे घ्यावेत. महिलांशी गैरवर्तन या शब्दाचा मला, माझ्या घरच्यांना मानसिक त्रास झाला आहे कारण मी काहीच गैरवर्तन केलेलं नाही. मी त्याची भरपाई घेणार, मी त्याची दाद मागणार. यातून अजून एक गोष्ट घडली की सामान्य माणसांना, प्रेक्षकांना या क्षेत्रातला विखार दिसून आला. तो आमच्यासारख्या कलाकारांना शब्दांत व्यक्त करता येत नाही किंवा दाखवता येत नाही. त्या लोकांचं आयुष्य हे पाशच्या कवितेप्रमाणे

“घर से निकलना काम पर
और काम से लौटकर घर आना
सबसे ख़तरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना…” सारखं एकसूरी असतं. त्यांना या क्षेत्रात काय सुरू आहे याची जाणीव झाली. कारण ग्रामीण भागातून सातत्याने येणारे फोन, मॅसेज याची संख्या प्रचंड आहे. मी या लढाईत जिंकलो तर अनेकांना बळ मिळेल हे निश्चित.

राईट अँगल्स Editorial Board

1 Comment

  1. मधुकर कदम Reply

    आम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजुने आहोत त्या साठी पाठिंबा..लढुया.

Write A Comment