fbpx
कला

सैन्य, सैनिक, चित्रपट व वास्तव

प्रहार हा नाना पाटेकर दिग्दर्शित व अभिनीत १९९१मध्ये प्रदर्शित झालेला एक उत्तम चित्रपट. सैनिकांना किती खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते, त्यातूनच ते कसे कणखर बनतात ते ह्यात दिसते. मात्र याची दुसरी बाजूही ह्या चित्रपटात आहे. नाना पाटेकर ह्या सिनेमात सैन्यातील मेजर असतो. त्याचा लाडका अधिकारी पीटर डिसुझा याचा गुंडांनी खून केला आहे कळल्यावर तो आधी सनदशीर मार्गाने न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण भ्रष्ट व्यवस्थेत ते शक्य नाही दिसल्यावर कायदा हातात घेऊन त्या गुंडांना स्वत:च मारून टाकतो. नागरी समाजातील अभद्र व्यवहार बघून त्याची मनोवस्था बिघडायला सुरवात झालेली असते, शेवटी तर तो मनोरुग्ण होतो. अ फ्यू गूड मेन हा १९९२ साली आलेला हॉलिवूडचा चित्रपट. हाही सैन्य आणि त्यातील कर्मचारी – अधिकारी वर्ग यांच्या मनोवस्थेसंबंधीच बोलतो. सॅंटीयागो हा कमजोर मनाचा सैनिक. त्याच्यात प्रयत्न करुनही सुधारणा होत नाही तेव्हा त्याची बदली हा एक मार्ग. पण कर्नल नाथन जेसप त्याच्या इतर दोन सैनिकांमार्फत त्याला शारिरीक शिक्षा देतो, ते त्याचा छळ करतात आणि त्यात सॅंटीयागोचा मृत्यू होतो. त्या दोन सैनिकांचे कोर्ट मार्शल होते, त्यात कर्नल नाथन जेसप साक्षीदार असतो. तो उन्मत्तपणे उत्तरे देतो, तो म्हणतो, एक कमजोर सैनिक मेला तर काय बिघडलं, आमच्या जीवावर तुम्ही नागरी लोक जगताय, आम्हाला प्रश्न कसले विचारता? हा चित्रपट लक्षात राहतो ते त्याच्या ह्या उन्मत्त जबानीसाठी. ह्या चित्रपटाचे नाव काढले तरी ही भूमिका साकारणारा अभिनेता जॅक निकल्सन आणि त्याचा उन्मत आवाज प्रथम आठवतो.

अमेरिकेने व्हिएटनाम युध्द केले ते साधारण १९५५ ते १९७५ अशी तब्बल वीस वर्षे चालले व शेवटी अमेरिकेला तिथून नामुष्की सहन करून माघार घ्यावी लागली. कोणत्याही देशाचे देशप्रेमी लोक जसे युध्दात त्यांच्याच देशाला पाठिंबा देतात तसे सुरवातीला अमेरिकेच्या नागरिकांनी ह्या युध्दाला पाठिंबा दिला. पण नंतर अमेरिकेने व्हिएटनामवर हे युध्द लादणे चुकीचे आहे लक्षात आल्यावर अमेरिकेच्याच नागरिकांनी त्याला विरोध करणे सुरू केले. साधारण १९६४ पासून हा विरोध सुरू झाला तो वाढतच गेला. ह्या व्हिएटनाम युध्दाविरुध्द अमेरिकेत काही चित्रपट निघाले. त्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका आहे, तसेच अमेरिकेच्या सैन्याने व्हिएटनामी जनतेवर केलेले अत्याचारही दाखवले आहेत. ज्येष्ठ लेखक वसंत नरहर फेणे यांचे ०६ मार्च २०१८ला निधन झाले. त्यांनी परदेशातील माणसांवर काही कथा लिहिलेल्या आहेत, त्यापैकी त्यांची शत्रुघ्न ही कथा व्हिएटनाम युध्दातून अपंग होऊन परत आलेल्या एका सैनिकाचे चित्रण करते. मार्क परत येतो तेव्हा त्याला वाटतं जीवावरची लढाई लढून आपण परत आलो, आपलं स्वागत होईल, पण समाज तर त्याचा तिरस्कार करतोच, त्याचे कुटुंबियही त्याला जवळ करत नाहीत, शेवटी हिंसक व मनोरुग्ण होत तो आत्महत्या करतो.

व्हिएटनाम युध्दासारखेच अमेरिकेने इराकमध्ये जे युध्द केले त्याविरुध्दही अमेरिकेत जनमत होते. इन द व्हॅली ऑफ इलाह हा २००७चा हॉलिवूडचा एक चित्रपट, त्या युध्दातील सैनिकांच्या मनोवस्थेचे चित्रण करतो. चित्रपटाच्या केंद्रस्थानी नेमका तोच विषय आहे, इराकला गेलेल्या सैनिकांचे मानसिक संतूलन बिघडणे, त्यांनी इराकी युद्धकैद्यांचा केलेला छळ, ह्या सैनिकाचे माणूसपण हरवून जाते, वरकरणी ते नेहमीसारखे वागत असले तरी आतून जणू क्रूरपणाची लहर दौडत असते. ह्या चित्रपटाविषयी औत्स्यूक्य कायम राहिल याची काळजी घेत, त्याचे कथानक थोडक्यात असेः हँक डिअरफील्ड हा एक निवृत्त लष्करी अधिकारी, त्याचा मोठा मुलगा त्याने आधीच गमावलेला आहे. त्याचा लहान मुलगा माइक हाही सैन्यात आहे. इराक युद्धावर जाऊन तो तळावर परत आला आहे. अचानक तो बेपत्ता होतो. बाप त्याचा शोध घ्यायला तळावर येतो. मूलाचा मृतदेह सापडतो. प्रेताचे अनेक तुकडे केलेले आहेत, जाळलेले आहे. शरीरावर भोसकल्याच्या बेचाळीस खूणा आहेत, खरे तर जी उरलीसुरली बॉडी शिल्लक आहे, त्यातून इतक्याच मोजता आलेल्या आहेत. शेवटच्या रात्री, मूलाबरोबर त्याचेच काही सहकारी सैनिक होते. त्या सगळ्यांनी बार, दारू, स्त्री यात रात्र घालवलेली. आधी तपास लष्कराने करायचा की पोलीसांनी, अधिकार कोणाचा यावर वाद होऊन मग पोलीस तपास सुरू करतात. लष्करी अधिकार्‍यांचा पूर्ण असहयोग. एका महिला पोलीस अधिकार्‍याच्या मदतीने बापाला मूलाचा खून कोणी केला ते कळते. सत्य ऊघडकीला येते ते हादरवून टाकणारे. बाप स्वतः लष्करात होता, त्याला पूर्ण खात्री, सहकारी मूलाचा खून करणार नाहीत, सैनिकांमध्ये बंधुभाव असतो, जे एकमेकांच्या जीवाला जीव देतात, ते सहकार्‍याचा जीव कसा घेतील? शक्यच नाही. त्याचा विश्वास खोटा ठरतोच, शिवाय ज्या कारणासाठी खून केला तेही क्षूल्लक, खरे तर कारणच नाही. खून कसा केला ते सांगतानाही खूनी सैनिकाच्या चेहर्‍यावर गोड हसू. खून करून ते शांतपणे जेवायला जातात. पण इतकेच नाही. बापाला आपल्या मुलाबद्दल जे कळत जाते, ते बापाला उध्वस्त करणारे. मुलगा इराकला गेलेला, तिथे गेलेल्या अनेक अमेरिकी सैनिकांप्रमाणे हाही मानसिक अवस्थेत बिघाड झालेला. युद्धकैद्यांचा छळ करून त्याची मजा घेणारा. बापाला तो फोन करुन सांगतो, इथे काही घडले आहे. मला परत यायचे आहे. पण परतीच्या वाटा बंद आहेत. काय घडले आहे शेवटी आपल्याला कळते तेव्हा आपणही उध्वस्त होतो.

चित्रपटाने सून्न करणारा अनुभव दिला. जितका चित्रपटाविषयी विचार केला अस्वस्थ होऊन असे वाटले, झक मारली आणि हा चित्रपट बघितला. मुलगा बापाला फोनवरून काय सांगतो, सांगताना रडत का असतो ते कळल्याशिवाय इतके अस्वस्थ का केले ते समजणार नाही. सैन्यातील नोकरी म्हणजे एक उदात्त भावना. देशासाठी प्राण द्यायचे. पण ही भावना आता नष्ट झाली. सैनिकांना कळतय आपला वापर सत्ताधार्‍याचा फायदा व्हावा ह्यासाठी होतोय. देशाचे रक्षण हा मुद्दाच नाही. आणि हे सैनिक असतात कोण? १९-२० वर्षांची कोवळी मुले. आपल्याला झेपत नाही हे त्यांना कळले तरी त्यातून सुटकेचा मार्गं नाही. लष्कर – आर्मी – ह्या संस्थेचे पार अवमूल्यन झाले आहे. चित्रपटात बायबलातील डेव्हिड व गोलायथ ह्या कथेचा संदर्भं आहे. गोलायथ हा कोणी महाकाय माणूस. तो रोज आव्हान द्यायचा त्याच्याबरोबर कोणी लढायला तयार आहे का? सगळे घाबरून असताना डेव्हिड ह्या लहान मुलाने त्याच्याबरोबर लढून त्याला ठार केले. ही लढाई व्हॅली ऑफ इलाह इथे झाली. त्यामुळे चित्रपटाचे नाव इन द व्हॅली ऑफ इलाह आणि लढाईसाठी लहान वयाच्या मुलांना पुढे केले जात आहे त्याच्याशी साम्य आहे हाही मुद्दा येतो.

चित्रपटात सुरवातीला एक दृष्य आहे. बाप रस्त्याने जात असताना एकजण अमेरिकन ध्वज फडकावण्याचा प्रयत्न करीत असतो, पण चुकून तो उलटा फडकावतो. बाप त्याला ध्वज बरोबर कसा लावायचा दाखवतो आणि सांगतो ध्वज उलटा फडकवला तर त्याचा अर्थ आपला देश संकटात आहे. चित्रपटाच्या शेवटी पुन्हा एकजण ध्वज फडकवण्याच्या प्रयत्नात आहे. बाप तो त्याला लावून देतो आणि पुढे जातो. कॅमेरा दाखवतो, ध्वज उलटा फडकत आहे. बापाला मनोमन पटलेले आहे, देश संकटात आहे आणि त्याला वाचवायची गरज आहे.

हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. रीचर्ड डेव्हिस ह्या इराक युद्धावरून परतलेल्या अमेरिकी सैनिकाचा त्याच्या सहकार्‍यांकडून असाच खून झाला व त्याच्या मिलिटरी पोलीसातून निवृत्त झालेल्या वडिलांनी त्याचा शोध घेतला होता.

इराक युद्धाला अमेरिकेतच विरोध होता, त्यावर आधारित असे उत्तम सिनेमा, साहित्यकृती तिथे होतात. पण त्यात मुख्यतः सैनिकांचे मनोरूग्ण होणे, त्यांनी केलेला कैद्यांचा छळ हे विषय हाताळले आहेत. खुद्द इराकी लोकांची काय स्थिती झाली, त्यांना काय हाल-अपेष्टांना तोंड द्यावे लागले, त्यांचा दृष्टीकोन ह्यावर काही हॉलीवूडचा चित्रपट आहे का माहित नाही. आपल्याकडील स्थिती बघितली तर आपल्याला सैन, सैनिक यांचे उदात्तीकरण, गौरवीकरण हेच ऐकण्याची व बघण्याची सवय आहे, तेच आपल्याकडे दाखवले जाते. आता तर वातावरण असे झाले आहे की त्याविरुध्द एक शब्द बोलला तरी गहजब होतो.

त्याशिवाय चित्रपट काय किंवा साहित्याबाबत आपल्याकडे काय निकष आहेत? साहित्यात तर सामाजिकता नको असा जणू मानदंडच आहे. काही समस्येवर आधारीत साहित्य असेल तर ते अभिजात नाहीच असा ग्रह आणि आग्रह. काही चित्रपट दिग्दर्शकांचाही असाच दृष्टीकोन आहे. चित्रपट व साहित्याने सामाजिक प्रश्नांची दखल घ्यायची नाही, प्रबोधन करायचे नाही, चला ठीक आहे. पण विषयाचे वैविध्य पाहिजे त्याचे काय? किती दिवस स्त्री-पुरुष संबंध आणि आता पुरुष-पुरुष संबंध व स्त्री-स्त्री संबंध हेच विषय खपवणार? बॉम्ब-स्फोटाच्या घटनेवर उर्दूत तेरा कथा आहेत असे मी ऐकले. मराठीत किती आहेत? हा विषय आपल्या लेखकांना अस्वस्थ करत नाही की वास्तवावर आधारित ते दुय्यम दर्जाचे अशी त्यांची ठाम धारणा आहे म्हणून ते यावर लिहित नाहीत? लेखक, दिग्दर्शकांची आपल्या आयुष्यापलिकडे जायची तयारी आहे की नाही हा कळीचा मुद्दा आहे, की स्वतःच्या अनुभवविश्वापलिकडचे काही देण्याची कुवतच नाही मग लंगडे समर्थंन म्हणून असे मुद्दे सांगितले जातात? अ वेन्सडे व मुंबई मेरी जान असे दोन चित्रपट त्यावेळेस अवश्य आले. अ वेन्सडेची खूप तारीफ झाली व होत असते. पण मला निशिकांत कामतचा मुंबई मेरी जान जास्त चांगला वाटतो. त्याचे पुरेसे कौतुक झाले नाही. विविध कथानके एकत्र आणून त्याची कौशल्याने गुंफण घातली होती. अ वेन्सडे हा फॅंटसी होता. सामान्य माणूस – आम आदमी सिनेमात दाखवले आहे तसे करू -शकेल ही कल्पनारम्यता आहे. असो. हा इन द व्हॅली ऑफ इलाह चित्रपट मात्र अवश्य बघा.

लेखक चित्रपट, नाटक, साहित्य, अर्थक्षेत्र व गुंतवणूक इत्यादी विषयांवर सातत्याने लेखन करत असतात. ते कथा लेखकही आहेत.

Write A Comment