fbpx
सामाजिक

फुलेंचे बालहत्याप्रतिबंधकगृह ते भिडेंची आमराई

केले एखाद्याने मनुस्मृतीचं समर्थन तर तुम्ही एवढी तीव्र प्रतिक्रिया का देता? अशा पुराणमतवादी लोकांकडे दुर्लक्ष का करत नाही? आपला वेळ का वाया घालवाता? असे काही प्रश्न मनुस्मृती समर्थनाच्या विरोधात लेख लिहिल्यावर कायम विचारले जातात. ही मंडळी स्वतःला सजग, आधुनिक मानत असतात. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी मनुस्मृतीचे समर्थन करत मनुस्मृती आणि राज्यघटनेची तुलना केली, मनुस्मृतीला राज्यघटनेपेक्षाही महत्त्वाचे मानले, त्याविरोधात लेख लिहिल्यावरही पुन्हा हेच प्रश्न काहींच्या मनात आले. एकाने संभाजी भिडे ब्राम्हण असल्याने हा एवढा एल्गार केला जातो आहे का, असा प्रश्नही थेट विचारला. पण या सगळ्या प्रश्नांची मी काही उत्तरे देण्याआधीच मनोहर उर्फ संभाजी उर्फ गुरुजी भिडे यांनीच ते नासिक या क्षेत्री दिले.
माझ्या बागेतले आंबे खाल्ल्याने अपत्यहीन जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, मुलगा हवा असतो त्यांना मुलगा होतो, असे वक्तव्य त्यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि मनुस्मृती समर्थकांची नेमकी संस्कृती काय असते हे स्पष्ट झाले. मनुस्मृती समर्थनावर वेळीच प्रतिक्रिया का द्यायला हवी, हेही त्यांच्या या वक्तव्यातून अधिक स्पष्टपणे सामोरे आले. जी मंडळी कालबाह्य, विषमतावादी, जातवर्णवर्चस्ववादी विचार मांडणाऱ्या एखाद्या ग्रथांचं जेव्हा समर्थन करतात त्यावेळी त्यांची इतर विचारसरणीही अशीच कालबाह्य आणि विषमतावादी असते आणि आपल्या उक्ती व कृतींमधून ते असेच कालबाह्य, विषमतेला खतपाणी घालणारे, विवेक आणि विज्ञानाची पायमल्ली करणारे विचार समाजात पेरत असतात. त्यामुळे प्रश्न केवळ प्राचीन काळातल्या एखाद्या चुकीचे विचार मांडणाऱ्या ग्रंथाच्या समर्थनाचा नसतो तर त्यानिमित्ताने जे विचार आजच्या वर्तमानात, समाजात पेरले जातात त्याचा असतो. जी मनुस्मृती स्त्रियांना दुय्यमत्व देते, हीन लेखते, पुत्रजन्माचं कौतुक करते तिचं समर्थन करणारी व्यक्ती ‘माझ्या बागेतला आंबा खाल्ल्याने अपत्यप्राप्ती होते’ यासारखी बाष्कळ विधानं अगदी सहजतेने करणार. समाज जितका अधिक मानसिक गुलामगिरीत राहील तेवढे जातवर्णवर्चस्ववादी मानसिकतेला हवे असते किंबहुना तेच त्यांचे उद्दिष्ट असते. म्हणूनच मग मनुस्मृतीसारख्या ग्रंथांचं समर्थन करतानाच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला अलौकिकत्व देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच कोणताही आंबा खाऊन किंवा कोणत्या तरी शिंदे गुरुजींच्या बागेतले आंबे खाऊन अपत्यप्राप्ती होत नाही तर ती ‘माझ्या बागेतले’ आंबे खाल्ल्यानेच होते, हे लक्षात घ्यायला हवे. भिडे जेव्हा ‘माझ्या’म्हणतात तेव्हा अपत्यप्राप्तीचं श्रेय ते आंब्याला देत नाहीत तर स्वतःकडे घेतात, पर्यायाने स्वतःला अलौकिकत्व बहाल करतात. स्वतःभोवती चमत्काराचं वलय तयार करण्याचा प्रयत्न करतात. लोकांना मानसिक गुलामगिरीत ठेवण्यासाठी या अशाच अलौकिकत्वाची आवश्यकता असते. मनुस्मृतीचं प्राचीनत्व अधोरेखित करत तिचं श्रेष्ठत्व सांगणारी मानसिकताच हा असा चमत्काराचा दावा करु शकते, आजच्या प्रचलित कायद्यांच्या विरोधात जाणारी वक्तव्य करु शकते. मनुस्मृती समर्थकांची संस्कृती ही अशी आहे, यासाठीच जिथे जिथे मनुस्मृती समर्थन होते तिथे तिथे विरोधी भूमिका घेऊन लिहावे लागते.
२५ डिसेंबर १९२७ ला महाडच्या चवदार तळ्यावर घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. पण त्याआधीच एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या ग्रंथाचे दहन करायला हवे, असे महात्मा फुले यांनी सांगितले होते. महात्मा फुले यांनी आपल्या लेखनातून सातत्याने मनुस्मृतीविरोधात भूमिका घेतली होती, मनूवर टीका केली होती. मनुस्मृतीमधील पानापानावर असलेल्या विषमतावादाला विरोध करणाऱ्या जोतिराव फुले यांनी कायम समतावादाचा पुरस्कार केला. जातिअंताच्या चळवळीचा पाया घालताना स्त्रीपुरुष समतेलाही तितकेच महत्त्व दिले. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांचे वक्तव्य आणि महात्मा जोतिराव फुले यांचे प्रत्यक्ष कार्य समोर ठेवले तर मनुस्मृती समर्थकांची विषमतावादी संस्कृती आणि मनुस्मृती विरोधकांचा समतेचा पुरस्कार हा भेद अधिक ठळकपणे स्पष्ट होतो.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई या जोडप्याला मुल नव्हते. तेव्हा कुटुंबियांनी त्या काळच्या रीतीप्रमाणे जोतिरावांच्या दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. जोतिरावांनी या प्रस्तावाला संमती तर दिली नाहीच पण त्याहीपुढे जाऊन, मुल होत नाही म्हणून माझं दुसरं लग्न करायचं आणि सावित्रीला सवत आणायची तर त्याच न्यायाने सावित्रीचं दुसरं लग्न करुन मला सता का आणायचा नाही, असा प्रश्न तरुण जोतिरावांनी आपल्या कुटुंबियांना विचारला होता. हा असा प्रश्न विचारण्याची मानसिक आणि बौद्धिक तयार आजही किती पुरुषांची आहे? ज्याकाळात आजूबाजूचे सगळे वातावरण परंपरा आणि रुढी यांनी ग्रस्त होते त्यावेळी समाजात मान्यता असलेल्या मनुस्मृतीसारख्या ग्रंथाचे विश्लेषण करत, त्यातील सामाजिक गुलामगिरीवर बोट ठेवत हा ग्रंथ जाळायला हवा, असं म्हणणारे जोतिरावच असा काळाच्या पुढचा विचार करु शकत होते. स्वतःच्या दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळत अपत्यहीन स्त्री म्हणून सावित्रीबाईंच्या वाट्याला येणाऱ्या अवहेलनेला नकार देत होते. काळाच्या पल्याड जाणारे एक नवे समतावादी पाऊल उचलत होते.
जातव्यवस्थेकडून होणारे शूद्र-अतिशूद्रांचे शोषण, स्त्रियांची अवहेलना याचप्रमाणे प्रत्येक माणसाचे माणूस म्हणून असलेले हक्क, मानवधर्म याविषयीही जोतिराव फुले जागरुक होते. उच्च जातींमधील बालविवाहांमुळे त्याकाळात बालविधवांची संख्या मोठी होती. या बालविधवांवर अनेकदा कुटुंबातील किंवा परिचयातील व्यक्ती अत्याचार करत असे. यातून गरोदर राहिल्यावर त्या लहान मुलींपुढे एकतर स्वतःचा जीव देणं किंवा जन्माला आलेल्या तान्ह्या बाळाचा जीव घेणं एवढे दोनच पर्याय असत. अशाच एका फसलेल्या आणि जीव देणाऱ्या काशीबाईला वाचवून जोतिराव फुलेंनी स्वतःच्या घरी आणलं आणि तिचं बाळंतपण करण्यासाठी सावित्रीबाईंकडे सुपूर्द केलं. यानंतर या जोडप्याने आपल्या घरावर ‘बालहत्याप्रतिबंधकगृहा’ची पाटी लावली व संकटात असलेल्या स्त्रियांनी, तरुणींनी इथे येऊन बाळंत व्हावे, असे आवाहन केले. अशा फसेलेल्या 40 बालविधवांचे बाळंतपण सावित्रीबाईंनी केले आणि त्यांच्या अनाथ मुलांसाठी अनाथाश्रम चालवला. यातल्याच काशीबाई नावाच्या ब्राम्हण बालविधवा स्त्रीच्या मुलाला या जोडप्याने स्वतः दत्तक घेतले. मानवी जन्माची प्रतिष्ठा जपण्याचं काम या जोडप्याने केलं. त्यातूनच मातृत्वाचा आणि पितृत्त्वाचा आनंद स्वतःही घेतला. अपत्यप्राप्ती व्हावी म्हणून आंबा देणारा कोणी गुरुजी शोधत बसले नाहीत ते. याउलट अनेक अपत्यांचे पालक बनले.
मनुस्मृतीला विरोध करणारी मानसिकताच समाजाच्या प्रत्येक व्यवहारात हा असा समतावादाचा पाया घालू शकते. समाजमान्य नसलेल्या संबंधातून जन्माला आलेल्या अपत्याचा जन्माला येण्याचा मानवतावादी अधिकार मान्य करते, एवढंच नाही तर त्यातल्याच एका अपत्याला आपला म्हणते. दत्तक घेतलेल्या यशवंतला सावित्री-जोतिबांनी वैद्यकीय शिक्षण दिले, म्हणजेच त्याचे यथासांग संगोपन केले, मृत्यूपत्र लिहून आपल्या मालमत्तेचा अधिकारही त्याला दिला. ज्याला पुत्र म्हणून स्वीकारले त्याला त्यांनी सर्वार्थाने आपला मानले.
अपत्यप्राप्तीसाठी कोणत्याही स्वघोषित बाबामहाराजांच्या, गुरुजींच्या नादी लागू नका, एका अनाथ जीवाला आपलं म्हणा, हा विवेकवादी, विज्ञानवादी संदेश जोतिबा-सावित्रींनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दिला आहे. आणि इथे एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात माझ्या बागेतले आंबे खायला या, असं आवतण अपत्यहीन जोडप्यांना दिलं जात आहे. एकूणच रोजच्या दैनंदिन जगण्यात आणि समाजजीवनात मनुस्मृतीचं समर्थन करणारी विचारसरणी आणि मनुस्मृतीला विरोध करणारी विचारसरणी यांची वाटचाल परस्परविरोधी दिशेने सुरु असते.
शूद्र-अतिशूद्रांच्या गुलामगिरीची गीता असलेल्या मनुस्मृतीचं समर्थन हे विषमतावादाची पायाभरणी तर करतच पण अंतिमतः ‘माझ्या बागेतले आंबे खा आणि मूल जन्माला घाला’ अशा भंपकपणाकडे येऊन ठेपतं.
म्हणूनच मनुस्मृती समर्थनाची, विषमतावादी मानसिकतेची ही वाटचाल वेळीच ओळखणं गरजेचं आहे.

वरिष्ठ पत्रकार, लेखिकाअसून सामाजिक विषयांच्या अभ्यासक आहेत.

Write A Comment