fbpx
सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मनुस्मृती

या देशातल्या काही घटकांना विषमतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृती ही श्रेष्ठ वाटते, देशाच्या लोकशाहीवादी घटनेपेक्षा अधिक महत्त्वाची वाटते, हे उघड गुपित आहे. ती त्यांना तशी वाटते म्हणूनच या देशात विषमतेवर आधारित चातुर्वण्य व्यवस्था शतकानुशतकं टिकून राहिली, अस्पृश्यतेचं हीनत्व समाजाच्या सर्व अंगात भिनलं. देशाला स्वातंत्र्य मिळालं, समतावादी घटनेवर आधारित राज्यव्यवस्था प्रस्थापित झाली तरी समाजातल्या काही घटकांकडून मनुस्मृतीचं समर्थन आणि पुरस्कार थांबलेला नाही. अलिकडेच मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी मनुस्मृतीचं समर्थन करत ती देशाच्या घटनेपेक्षाही महत्त्वाची आहे, असे सांगितले. हा देश मनुस्मृतीसारख्या धर्मशास्त्रांमध्ये दिलेल्या कायद्यांच्या, नियमांच्या, प्रथा-परंपरांच्या आधारे चालावा, ही विषमतावादी, चातुर्वण्य़ाचा पुरस्कार करणाऱ्या, ब्राम्हण श्रेष्ठत्व जपत हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या अनेकांची इच्छा आहे. देशात भाजपाचं सरकार आल्यापासून या अशा इच्छांना बळ आलं आहे. यातूनच पुराणकथांना विज्ञानाचा, विषमतावादी धर्मशास्त्रांना समतावादी घटनेचा दर्जा दिला जात आहे.

मनुस्मृती काय आहे, तर तत्कालिन समाजात प्रत्येक वर्णाने कसं रहावं, कसं जगावं हे सांगणारं नियमांचं, आजच्या भाषेत कायद्याचं पुस्तक आहे. विद्येचा, ज्ञानप्राप्तीचा अधिकार कोणाला आहे, कोणाला नाही, धनप्राप्तीचा-धनसंचयाचा अधिकार कोणाला आहे, कोणाला नाही हे यात सांगितलं आहे. थोडक्यात कायदा सांगणारं मनुस्मृती हे एक प्राचीन पुस्तक आहे. कायदा सांगणारी अशी एक (खरं तर अनेक) प्राचीन संहिता आमच्याकडे होती, याचा कोणाला अभिमान बाळगायचा असेल तर त्याला ते स्वातंत्र्य निश्चितच आहे. पण राज्यशास्त्राची मांडणी करणाऱ्या कौटिल्यिय अर्थशास्त्राचा ज्याप्रमाणे आपण या देशातील, भूमीतील प्राचीन शास्त्र म्हणून निर्भेळ गौरवाने उल्लेख करु शकतो, तसा मनुस्मृतीचा करु शकतो का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मनुस्मृतीने ब्राम्हणवर्णाचं श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यात आणि शूद्र वर्णाला पशुपातळीचा दर्जा देण्यात आपलं सारं बळ खर्ची घातलं आहे. स्त्रियांना दुय्यमत्त्व देतानाही ब्राम्हण स्त्रिया आणि शूद्र स्त्रिया यांच्यात भेद करत शूद्र स्त्रियांना आत्यंतिक हीन दर्जा देण्यात आला आहे. शूद्र स्त्रीला उच्चवर्णियांची भोगदासी बनवण्यात आलं आहे. थोडक्यात मनुचा कायदा हा आत्यंतिक विषमतावादी कायदा होता. त्यामुळेच ज्यांना समाजात पुन्हा एकदा विषमतावादी समाजरचना आणायची आहे त्यांना मनुस्मृतीच्या प्रेमाचं भरतं येत असतं. यात परंपरावाद्यांप्रमाणे अनेक उच्चविद्याविभूषित मंडळींचाही समावेश आहे. ब्राम्हणश्रेष्ठत्वाचं आकर्षण आणि शूद्रांविषयीची अनास्था या पायावरच हे विषमतावादी प्रेम उभं आहे. या देशातलं जे जे प्राचीन आहे ते ते सर्वोत्तम आहे यापद्धतीचा एक नवा राष्ट्रवादही अलिकडे व्यक्त होत आहे. विशेषतः परदेशी राहणाऱ्या, अत्याधुनिक जगणं जगणाऱ्या आणि स्वतःला उच्चविद्याविभुषित समजणाऱ्या मंडळींमध्ये हे असं प्राचीन श्रेष्ठत्वाचं राष्ट्रप्रेम आकाराला येत आहे.

आजही ज्यांना मनुस्मृतीचं श्रेष्ठत्व सांगावसं वाटतं त्यांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो. डा. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन का केलं? स्वातंत्र्यपूर्व भारतात समाजव्यवहारात मनुस्मृतीपेक्षाही याज्ञवल्क्यस्मृती अधिक प्रचारात होती. मिताक्षरा आणि दायभाग हे दोन्ही हिंदू समाजात प्रचलित असलेले ग्रंथ याज्ञवल्क्यस्मृतीवर आधारित होते. असं असतानाही बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचंच दहन का केलं, या प्रश्नाचं उत्तर सारासारविचार करण्यावर ज्यांचा अजून विश्वास आहे त्यांनी तरी शोधलं पाहिजे.

२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड इथल्या चवदार तळ्याकाठी डा. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. महाड इथल्या सार्वजनिक चवदार तळ्यावरील पाणी पिण्याचा हक्क अस्पृश्यांनाही मिळावा, या मागणीसाठी तसंच पाण्यासारख्या नैसर्गिक संसाधनावर स्पृश्य हिंदूंइतकाच अस्पृश्य हिंदूंचाही अधिकार आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आधी मार्च १९२७ मध्ये बाबासाहेब आपल्या अनुयायांसह महाड इथे गेले. पण सनातनी हिंदूंनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. तेव्हा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी डिसेंबरमध्ये बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांसह चवदार तळ्याकाठी जमले.

यावेळी महाड इथे केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘महाडचे तळे सार्वजनिक आहे.  येथील स्पृश्य इतके समजुतदार आहेत की, ते आपणच या तळ्याचे पाणी नेतात असे नव्हे तर कोणत्याही धर्माच्या माणसाला त्या तळ्याचे पाणी भरण्यास त्यांनी मुभा ठेवली आहे. त्याप्रमाणे मुसलमान आणि परधर्मिय लोक या तळ्याचे पाणी नेतात. मानव योनीपेक्षा कमी मानलेल्या पशुपक्ष्यांच्या योनीतील जीवजंतुसही या तळ्यावर पाणी पिण्यास ते हरकत घेत नाहीत. महाडचे स्पृश्य लोक अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिऊ देत नाहीत, याचे कारण अस्पृश्यांनी स्पर्श केला असता ते पाणी नासेल किंवा त्याची वाफ होऊन ते नाहिसे होईल अशामुळे नव्हे. अस्पृश्यांना ते पाणी पिउ देत नाहीत याचे कारण हेच की, शास्त्राने असमान ठरविलेल्या जातींना आपल्या तळ्यातील पाणी पिऊ देऊन त्या जाती आपल्या समान आहेत, असे मान्य करण्याची त्यांची इच्छा नाही.’ (कीर धनंजय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पॉप्युलर प्रकाशन, १९८९, पृष्ठः १०४)

इथे हिंदू धर्मातील विषमतेचा आधार शास्त्र आहेत हे बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात आणि पुढे सांगतात, ‘हिंदू समाज समर्थ करायचा असेल तर चातुर्वण्य आणि असमानता यांचे उच्चाटन करुन हिंदू समाजाची रचना एकवर्ण नि समता या दोन तत्वांच्या पायावर केली पाहिजे. अस्पश्यता निवारणाचा मार्ग हा हिंदू समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणून मी म्हणतो की आपले कार्य जितके स्वहिताचे आहे तितकेच ते राष्ट्रहिताचे आहे यात किंतु नाही.’ (कित्ता, पृष्ठ १०५)

थोडक्यात डिसेंबर १९२७ मध्ये महाड इथे चवदार तळ्याकाठी हिंदू समाजाचा एक सदस्य म्हणून पाणी पिण्याचा आपला हक्क बजावण्यासाठी उभ्या असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांसमोर समतावादी हिंदू समाज निर्मितीचे लक्ष्य होते. आणि आपले हे कार्य राष्ट्रहिताचे आहे याविषयी त्यांच्या मनात शंका नव्हती. समतावादी हिंदू समाज निर्माण करण्याच्या या राष्ट्रीय कार्याचा एक भाग म्हणूनच बाबासाहेबांच्या या भाषणानंतर वेगवेगळे ठराव मांडण्यात आले. त्यातला एक ठराव मनुस्मृती दहनाचा होता.

पहिल्या ठरावाने हिंदुमात्रांच्या जन्मसिद्ध हक्कांचा जाहीरनामा उद्घोषित करण्यात आला. सर्व माणसे जन्मतः समान दर्जाची आहेत व मरेपर्यंत समाज दर्जाची राहातील. विषमतामूलक समाजरचनेचा पुरस्कार करणाऱ्या प्राचीन नी अर्वाचीन ग्रंथांचा तीव्र निषेध करण्यात आला. श्रुती, स्मृती, पुराण वगैरेंचे प्रामाण्य कबूल करण्यास ही परिषद तयार नाही. ज्या गोष्टीला कायद्याने मनाई केलेली नसेल ती करण्यास सर्वांना मोकळीस असावी. रस्ते, पाणवठे, देवालये वगैरे ठिकाणी कोणासही प्रतिबंध नसावा, हा पहिला ठराव सीतारामपंत शिवतरकर यांनी मांडला. दुसऱ्या ठरावाने शूद्र जातीचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटवणारी, त्यांचे आत्मबळ नष्ट करणारी, त्यांची सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरी कायम ठेवणारी मनुस्मृती हिचाही परिषद दहनविधी करत आहे, असे जाहीर करण्यात आले. बाबासाहेबांचे ब्राम्हण अनुयायी सहस्त्रबुद्धे यांनी हा ठराव मांडला व त्याला राजभोज यांनी अनुमोदन दिले. तिसऱ्या ठरावान्वये असे जाहीर करण्यात आले की, सर्व हिंदु एकवर्णीय समजण्यात यावेत. चवथ्या ठरावाप्रमाणे ‘धर्माधिकारी’ ही संस्था लोकमतनुवर्ती नि पुरोहित लोकनियुक्त असावेत, अशी मागणी करण्यात आली. (उपरोक्त, पृष्ठः १०५)

हे चारही ठराव संपूर्ण समाजपरिवर्तनाची मागणी करणारे आहेत आणि या परिवर्तनामध्ये अडथळा म्हणून उभ्या राहणाऱ्या मनुस्मृतीचं दहन करुन हिंदू समाजात बदल घडवायचा असेल तर नेमकं काय बदललं पाहिजे हे सांगणारे आहेत. मनुस्मृतीचे दहन करावे असा ठराव झाल्यावर रात्री ९ वाजता परिषदेच्या समोर एका खड्ड्यात अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते मनुस्मृतीची होळी करण्यात आली.

या घटनेचे वर्णन करताना चरित्रकार धनंजय कीर लिहितात, मार्टिन ल्यूथरच्या काळानंतर एवढा मोठी मूर्तिभंजक हल्ला अहंकारी परंपरावाद्यांवर कुणीच केला नव्हता. यास्तव २५ डिसेंबर १९२७ हा भारताच्या इतिहासात एक अत्यंत संस्मरणीय दिवस गणला जाईल. त्यादिवशी आंबेडकरांनी जुनी स्मृती जाळून हिंदूंच्या सामाजिक पुनर्रचनेला उपयोगी पडेल अशा नव्य स्मृतीची मागणी केली. अशा प्रकारे महाड हे हिंदू मार्टीन ल्यूथरचे विटेनबर्ग ठरले.

भूतकाळातल्या विषमतावादी ग्रंथाच्या आधारे वर्तमानातील विषमता अबाधित राखण्याचे प्रयत्न केले जातात, त्यामुळे मनुस्मृती दहनाची प्रतीकात्मक कृती बाबासाहेबांनी केली. भूतकाळातील मनुस्मृतीच्या आधारे समाजातील उच्चवर्णिय आपलं राजकारण कसं साधतात, हे स्पष्ट करताना धनंजय कीर लिहीतात, ‘मनुस्मृती हा ग्रंथ सनातनी हिंदूंना सर्वज्ञ, मंगल नि परिपूर्ण असा आजही वाटतो. शूद्रातिशूद्रांना त्यातले नियम बंधनकारक आहेत असे ब्राम्हणांना वाटते. परंतु ते स्वतः मात्र त्यातील नियम पाळीत नसतात. मनुस्मृतीतील नियमाप्रमाणे ब्राम्हणांना रासायनिक द्रव्ये, रंगीत कापड, फुले, सुवासिक द्रव्ये नि शस्त्रे यांचा धंदा वर्ज्य आहे. परंतु सांप्रतेच ब्राम्हण हे असे विविध धंदे चालवितात. तरी त्यांचे समाजातील श्रेष्ठपद उणावत नाही. लोकमान्य टिळक यांनी जिनिंगची गिरणी उभारली. त्यात त्यांचे ब्राम्हण्य उणावले नाही. परंतु ब्राम्हणेतरांच्या वेद वाचण्याच्या व वेदाभ्यास करण्याच्या अधिकारास त्यांनी कधीही पाठिंबा दिला नाही. असा हा सर्वधर्मकारणात ब्राम्हणांचा स्वार्थ साधून देतो, त्यालाच ब्राम्हणेतर ब्राम्हणधर्म म्हणतात.’ (उपरोक्त, पृष्ठ – १०६)

मनुस्मृतीने हा ब्राम्हणधर्म प्रस्थापित केला आहे आणि तो अबाधित राखायचा असेल तर मनुस्मृतीचे समर्थन करत तिचे महत्त्व कायम राखणे हे आवश्यक आहे. त्यामुळे मनोहर उर्फ संभाजी भिडेंच्या आधीपासून वेगवेगळ्या पद्धतीने मनुस्मृती समर्थनाचे प्रकार झाले आहेत. व्यासंगी अभ्यासक नरहर कुरुंदकरांनी ‘मनुस्मृती’ या आपल्या ग्रंथात या अशा समर्थनातील खोटेपणा तपशीलवार दाखवला आहे. समाजातला प्रस्थापित वर्ग खोट्यावर खोटं रचत आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा कसा प्रयत्न करत आहे, हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक अभ्यासावे.

नरहर कुरुंदकर सांगतात, ‘मनूच्या आधुनिक समर्थकांचा जो गट मी उल्लेखित आहे तो आजही मनूला आदर्श मानणारा आहे. आधुनिक विद्येने आधुनिक मन या मंडळींच्या ठिकाणी निर्माण झाले नाही. मन तेच सनातनी व परंपराप्रिय राहिले. उलट आधुनिक विद्येने परंपरा समर्थनाचे नवे युक्तिवाद मात्र उपलब्ध झाले. डॅ. आंबेडकरांच्या मनात या गटाविषयी तीव्र संताप व तुच्छता होती. आंबेडकरांना हा गट जातीय हितसंबंधांचा संरक्षक व दांभिक वाटे. मी स्वतः असे मानतो की मनुसमर्थकांचा हा नवशिक्षित आधुनिकांचा गट अधिक उपद्रवी तर आहेच पण दांभिकही आहे. समोर असणाऱ्या पुराव्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करणे हे या गटाचे ठळक वैशिष्ट्य दिसते.’ (मनुस्मृती, नरहर कुरुंदकर, पृष्ठ २५)

यासंदर्भातील विविध उदाहरणं कुरुंदकरांनी या पुस्तकात दिली आहेत. यातील काही मोजकी उदाहरणे पाहिली तरी मनुस्मृतीच्या समर्थकांची खरी संस्कृती कळते. मनुस्मृतीतील १०-१२६ हा श्लोक म्हणजे शुद्रांना त्यांचा परंपरागत कायदा पाळायला परवानगी देणारा श्लोक आहे, असे पटवर्धन या मनुस्मृती समर्थकांना वाटते. शूद्रांनी शिळे खाणे, उष्टे खाणे अगर काहीही खाणे यात दोष नाही, असे हा श्लोक सांगतो. ब्राम्हण आणि इतर दोन वर्णांनी काय खावं, काय खाऊ नये याचे विधीनिषेध मनुस्मृतीने सांगितले आहेत. शूद्रांबाबत ते सांगितले नाहीत म्हणजेच मनुस्मृतीने उदार होत शूद्रांना आचारस्वातंत्र्य दिले आहे, असे येथे समर्थकांकडून सांगितले जात आहे. हे समर्थन खरं तर माणुसकीलाही काळीमा फासणारं आहे. त्यातील दांभिकता स्पष्ट करताना नरहर करुंदकर सांगतात, ‘वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. आधीच्या १०-१२५ या श्लोकामध्ये अशी नोंद आहे की, वापरुन जीर्ण झालेली वस्त्रे व शिळे आणि उष्टे अन्न शूद्राला द्यावे. नंतर पुढच्या श्लोकात असे म्हटले आहे की, शूद्रांनी शिळे खाणे, उष्टे खाणे किंवा काहीही खाणे यात दोष नाही. मुळात त्यांना धर्मात कसला अधिकाराच नाही (नवी वस्त्रे नेसण्याचा, चांगले अन्न खाण्याचा) म्हणून अमूक खाऊ नका असा निषेधही नाही. इतरांनी शिळे, उष्टे खाऊ नये असा आदेश असल्याने त्यांनी ते तसे खाल्ले तर त्यांचा तो दोष आहे. शूद्रांना असेच अन्न खावे असे असल्याने तो त्यांचा दोष नाही. आता हे स्थळ जर शूद्रांना त्यांचा कायदा पाळण्यास मुभा देणारे स्थळ आहे असे म्हणावयाचे असेल तर आपण काय वाद घालणार’ (उपरोक्त, पृष्ठ ३६)

या श्लोकाची भलामण करणारे मन क्रूर व अमानुष आहे, असं सांगून नरहर कुरुंदकर आणखी एक उदाहरण देतात. पटवर्धनांसारखे मनुस्मृती समर्थक श्लोक १०-१२० प्रमाणे शूद्र करमुक्त आहेत, याकडे लक्ष वेधतात आणि मनुने शूद्रांना करातून मोकळीक दिली आहे. विषमतावादाचं समर्थन करायंच असेल तर खोटेपणाचा आधार घ्यावा लागतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. शूद्रांना ज्याप्रमाणे वेदाध्ययनाचा अधिकार मनुस्मृती आणि इतर धर्मशास्त्र नाकारतात त्याचप्रमाणे धनाचा अधिकारही नाकारतात. जिथे धनच नाही तिथे कर कुठून भरणार() नरहर करुंदकर सांगतात, ‘शेती वैश्य, क्षत्रिय, ब्राम्हणांच्या मालकीची असते. या शेतीतून निर्माण होणारे धनधान्यही त्याच्याच मालकीचे असते. पण प्रत्यक्ष नांगर हाकणे, पेरणे इत्यादी कृषीकर्म मात्र शूद्राचेच असते. सर्व व्यवसाय शूद्रांचे आहेत याचा अर्थ त्या व्यवसायामुळे होणारे धनोत्पादन शूद्रांच्या मालकीचे आहे असे नाही. शूद्रांच्या जवळ धनसंचय नाही, चूकून धनसंचय झाला तर हिसकावून घेण्याची सोय आहे. ज्यांच्याजवळ धन नाही त्यांच्यावर कर कुठून असणार? आजही आपल्या देशात हमालांना इन्कम टॅक्स लागू होत नाही ही घटना काय सवलत समजावी की काय?’ (उपरोक्त,पृष्ठ ३२)

मनू शूद्रांना हीन लेखतो त्याचप्रमाणे दासप्रथेचेही समर्थन करतो. दासांचे सात प्रकार मनूने सांगितले आहेत. स्त्रियांबाबतची मनूची मते प्रसिद्धच आहेत. उच्चकुलीन पुरुषाची भोगसेवा करणं, हीन जातीच्या स्त्रीसाठी अनुचित नाही’ (मनुस्मृती ८-३६५), ‘अक्षमाला ही हीनजातीय स्त्री वसिष्ठांशी आणि शारंगी ही हीनजातीय स्त्री मंदपाल मुनींशी संयोग झाल्यामुळे पवित्र झाल्या. अनेक स्त्रियांनी हा मार्ग अनुसरलेला आहे’ (मनुस्मृती ९-२३ ते २५) (करुंदकर नरहर, मनुस्मृती,  पृष्ठ. १५९) इथे धर्मशास्त्रच हीनजातीय स्त्रीला भोगसेवेचा मार्ग सांगत आहे. आणि त्याचवेळी ‘उच्चवर्णियांनी शूद्र भार्या करणे केव्हाही उचित नाही’ असेही सांगत आहे.(उपरोक्त, पृष्ठ १६०)

देशाच्या समतावादी, प्रजासत्ताकवादी, व्यक्तींचे मानवी हक्क जपणाऱ्या घटनेपेक्षा ही अशी विषमतावादी मनुस्मृती श्रेष्ठ आहे, असे आजही जर एखाद्याला वाटत असेल तर घटनेचा मसुदा सादर करताना घटना समितीसमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली भीती किती सार्थ होती हेच स्पष्ट होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात, ‘२६ जानेवारी १९५० आपण विसंगत वास्तवात प्रवेश करत आहोत. राजकीय जीवनात आपण समानता हे मुल्य स्वीकारलेलं असेल पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण विषमता अनुभवत असू. राजकीय जीवनात आपण ‘एक व्यक्ती एक मत’ तसंच ‘एक व्यक्ती एक मुल्य’ हे तत्व अंगिकारलेलं असेल पण आपल्या समाजातील विशिष्ट सामाजिक आणि आर्थिक रचनेमुळे सामाजिक जीवनात आपण ‘एक व्यक्ती एक मुल्य’ हे तत्त्व नाकारत राहू. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनातील समानता आपण किती काळ नाकारणार आहोत? आपण आपल्या सामाजिक जीवनात समानता हे मुल्य फार काळ नाकारत राहिलो तर अखेरीस आपली राजकीय लोकशाही धोक्यात येईल.’

खरी ठरतेय का बाबासाहेबांची भीती? सामाजिक लोकशाहीच्या अभावी राजकीय लोकशाही धोक्यात येईल, असं बाबासाहेब सांगत आहेत. सामाजिक लोकशाही नाकारणारी मनुस्मृती जर घटनेला भिडवली जात असेल तर या देशातील राजकीय लोकशाही धोक्यात येईल का सुरक्षित राहील?

महाडच्या चवदार तळ्याकाठी मनुस्मृतीचं दहन करताना बाबासाहेबांनी समतावादी हिंदु समाजाचं स्वप्न पाहिलं होतं. पण हे स्वप्न पूर्ण झालं नाही, हिंदूच्या डोक्यातील विषमतावादी मनुस्मृती गेली नाही, देशात सामाजिक लोकशाही अवतरली नाही म्हणूनच बाबासाहेबांनी १९५६ मध्ये धर्मांतर केलं.

मनुस्मृतीचं समर्थन करताना एवढा इतिहास लक्षात असू द्यावा.

वरिष्ठ पत्रकार, लेखिकाअसून सामाजिक विषयांच्या अभ्यासक आहेत.

1 Comment

  1. जाती व्यवस्थेची आवश्यकता नाही पण कर्माच्या आधारे असणारी वर्णव्यवस्था ही राहणारच त्याच्याशिवाय पर्याय नाही

Write A Comment