fbpx
राजकारण

मी शाकाहारी, तू मांसाहारी

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, हिटलरच्या नाझी विचारसणीने अनेकांना भुरळ घातली असली तरी त्याला विरोध करणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. नाझी विरोधी प्रचाराचा भाग म्हणून, कच्च्या कोबीचं लोणचं खातात म्हणून जर्मनांना हिणवलं जायचं. पण नाझी विचारसणी एवढी वर्चस्ववादी आणि हेकेखोर होती की त्यांनी त्या विरोधकांना उलट सुनावलं. “होमलँड कुकिंग” नावाचं एक पुस्तक त्या काळात लिहिलं गेलं. त्यात जर्मन असल्याने कच्ची कोबी खाणं कसं योग्य आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात आलं. पण ते करताना एक राजकीय इशाराही दिला.

We should not forget it
A German created it, therefore it’s a German dish

If such a little piece of meat, white and mild lies in a kraut, that is a picture
As like Venus in Roses.

थोडक्यात, तुम्ही जे खाता तसे तुम्ही होता आणि तुम्ही माझ्याप्रमाणे खात नसाल किंवा मी खातो ते खात नसाल तर तुम्ही माझे शत्रू आहात, असं नाझींनी केवळ शत्रूपक्षाला नाही तर देशबांधवांनाही सांगितलं.

नाझींचा हा इशारा आठवण्याचं कारण म्हणजे रामनवमीच्या दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये मांसाहारावरून झालेला वाद. काही विद्यार्थ्यांनी मांसाहारी पदार्थ खाल्ल्यावरून भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी सेनेने केवळ आक्षेप घेतला नाही तर त्यांना मारहाण केली. गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून मुस्लिमांना लक्ष्य करून ठेचून मारल्याच्या घटनांनंतर आता मांस खाल्ल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना मारलं जाण्याची ही ताजी घटना आहे. अन्नाच्या थाळीवरच घाव घालणं हा वर्चस्ववादी राजकारणाबरोबरच दहशत बसवण्याचा प्रकार आहे. अन्न खाणं ही वैयक्तिक बाब असून राजकारण त्या थाळीपर्यंत पोहोचलं आहे. लोकांनी काय विचार करावा हे तर आधीच वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांच्यावर लादलं जात आहे. आता काय खावं हे सांगून मारहाण केल्याने बसणारी दहशत ही जास्त भयंकर आहे, कारण अन्नं आणि विशिष्ट अन्नं पद्धती हे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शेवटी सगळे कष्ट, जगणं, हे माणूस अन्न खाण्यासाठी आणि त्याच्या पद्धतीचं अन्न खाण्यासाठी करतो. अन्नावर हल्ला किंवा बंदी हा लोकांच्या मनावर सर्वात मोठा आघात असतो.

मांसाहारी विरुद्ध शाकाहारी अन्नं हा वाद भारतात नवा नसला तरी मांसाहार करणाऱ्यांवर हल्ले, गोमांस खाल्ल्याचा आरोपावरून झुंड बळी, त्यांना ठार मारणं, झुंडींनी त्यांच्या मागे लागणं आणि सत्ताधारी पक्षाने या झुंडींना अभय देणं हे नक्कीच नवीन आहे. गोमांस बंदीचा भाजप आणि त्याआधी हिंदुत्ववादी पक्षांचा अजेंडा नवीन नाही. अगदी काँग्रेससारख्या पक्षातही पूर्वीपासून गोमांसाविरोधात आवाज उठवणारे महाभाग होतेच. पण जेव्हा जेव्हा हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत येतो तेव्हा हा गोमांसाचा मुद्दा नव्याने वर आणला जातो. ह्यूमन राइट्स वॉच या संस्थेच्या अहवालानुसार, २०१५ ते २०१८ या काळामध्ये म्हणजे मोदी सरकार सत्तेत आल्यावर ४४ जण गोमांसाच्या आरोपाखाली मारले गेले आहेत. पण त्या झुंडीतल्या एकालाही त्याची कडक शिक्षा झालेली नाही. उलट सत्ताधारी भाजपचे नेते अशा घटनांना आपल्या भाषणांमधून, वक्तव्यांमधून प्रोत्साहनच देताना दिसतात.

अन्नं ही माणसाची ओळख सांगते. अन्नं बनवण्याच्या पद्धती, त्यात वापरले जाणारे पदार्थ, शिजवण्याची पद्धत अशा अनेक गोष्टी माणसाच्या समूहाबद्दल, धर्म-जातीबद्दल सांगून जातात. अन्न-धान्य, फळं, भाजीपाला उगवून तो खाण्यालायक रुपात येईपर्यंत त्यावर अनेक संस्कार होतात. ही सर्व प्रक्रिया माणूस शेकडो वर्षांच्या प्रयोगातून शिकला. शेतीचा शोध लागण्याआधी तो मांसावरच अवलंबून होता. मासे मारणं, हिंस्र प्राण्यांनी सोडलेलं मांस गोळा करणं, झाडावरची फळं खाणं हे त्याचं अगदी आदीम काळातलं अन्न होतं. आगीचा शोध लागल्यावर मांस, अन्न भाजून आणखी रुचकर लागू शकतं हे त्याला उमजलं आणि शेती करता येऊ लागल्यावर अन्नासाठीची भटकंती कमी झाली. अन्नं साठवून ठेवता येतं, त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ करता येतात, मसाल्यांचा वापर करून ते आणखी चविष्ट बनू शकतात हे सारं त्याला अनुभवातून कळत गेलं. भारत, चीन, ईजिप्त इथे मानवी संस्कृतीचा विकास सर्वात आधी झाला आणि त्यामुळे या देशांमधली खाद्य संस्कृती ही खूप प्रगत आहे आणि त्याला एक रंजक इतिहास आहे. आज प्रत्येक आनंदाच्या आणि दुःखाच्या क्षणी अन्नाचं विशिष्ट महत्त्वं असतं. जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणतीच गोष्ट, समारंभ अन्नाशिवाय होऊ शकत नाही. उलट लग्नाला विशिष्ट पदार्थ असतात तर श्राद्धाला आणखी वेगळे. अन्न शिजवणं आणि ते चविष्ट बनवून खाणं ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाला प्राण्यांपासून वेगळी आणि श्रेष्ठ ठरवते. याच अन्नाच्या वैशिष्ट्यामुळे त्याचा राजकारणासाठी वारंवार वापर केला जातो. विशिष्ट अन्नावर बंदी घालणं हे इतिहासामध्ये अनेकदा घडलं आहे. बहुतांशी धर्मांमध्येही अन्नाला धरून काही नियम आहेत. काही हिंदू उच्च जातींमध्ये मांस, लसूण, कांदा खाण्यास मनाई आहे, ज्यू आणि मुस्लिमांमध्ये डुक्कर निषिद्ध मानला जातो. ज्यू मांस खाताना “कोशर” आहे याची खात्री करून घेतात तर मुस्लिमांमध्ये “हलाल”चं महत्त्वं आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये असा थेट काही नियम नाही. पण त्या धर्मांतर्गत विविध पंथ आणि विशिष्ट काळामध्ये काही अन्नपदार्थ हे निषिद्ध मानले होते. ख्रिश्चन धर्मात मध्ययुगीन काळात सुमारे १५० वर्ष टॉमेटो खाण्यावर बंदी होती हे एेकून आश्चर्य वाटेल. पण टॉमेटोचं रोप मॅन्ड्रेक्स नावाच्या रोपासारखं दिसतं त्यामुळे ही बंदी होती. मध्ययुगात असं मानलं जात होतं की माणसाची निर्मिती मॅन्ड्रेक्स रोपापासून झाली आहे त्यामुळे त्याचा संबध लैंगिकतेशी जोडला गेला. साधारण १७०० सालात पहिल्यांदा इटलीमध्ये टॉमेटो प्युरीचा वापर लोकप्रिय झाला आणि अमेरिका हा सर्वात शेवटचा देश होता ज्याने टॉमेटो सॉसचा स्वीकार केला. पण येशू ख्रिस्तांनी या अन्न बंदीवरचा वादच मिटवून टाकला. त्यांनी स्पष्ट सांगून ठेवलं की, “it is not what goes into the mouth that defiles a person, but it is what comes out of the mouth (Matthew 15:11)” (आपण जे अन्न घेतो त्याने माणूस अपवित्र होत नाही तर त्याच्या तोंडातून काय बाहेर पडतं त्याने तो अपवित्र ठरू शकतो.)

एप्रिल २०२२: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय - राम नवमी च्या दिवशी हिंसाचार
एप्रिल २०२२: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय – राम नवमी च्या दिवशी हिंसाचार

आता भारताचाच विषय आहे तर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण -४ नुसार, देशातील ७० टक्के लोक हे मांसाहारी आहेत म्हणजे केवळ ३० लोक शाकाहारी आहेत. पण भारताची प्रतिमा मात्र शाकाहारी देश अशी मुद्दाम बनवण्यात आली आहे. जगभरात सगळीकडे भौगोलिक परिस्थिती, हवामान, नागरिकांकडे पैसे खर्च करण्याची असलेली क्षमता यानुसार अन्नं ठरतं. भारतात त्यात जात आणि धर्म व्यवस्थेची आणखी भर पडते. उच्च जातींची अन्नं संस्कृती ही श्रेष्ठ ठरते आणि सगळीकडे तीच संस्कृती बहुजनांवर लादली जाते. धर्माच्या बाबतीत बोलायचं झालं तर हिंदू हा बहुसंख्य धर्म असल्याने हिंदूंची अन्न संस्कृती महान ठरवली जाते आणि त्यापुढे मुस्लिम, ख्रिश्चन आदींच्या अन्न संस्कृती या कनिष्ठ ठरतात. त्यामुळेच मुस्लिम गोमांस खातात हा प्रचार बहुसंख्यांक हिंदूंच्या मनात इतका बसला आहे की त्याला कोणीच तार्किक प्रश्न विचारत नाही. प्रत्यक्षाच अनेक मुस्लिम गोमांस खात नाहीत, तर काही उच्चवर्णिय हिंदू जाती गोमांस खातात ही बाब सहज नजरेआड केली जाते.

भारतामध्ये अन्नाच्या बाबतीत शुद्ध-अशुद्ध, पवित्र-अपवित्र या संकल्पना जाती व्यवस्थेतूनच निर्माण झाल्या आहेत. ब्रिटीश मानववंशशास्त्रज्ञ मेरी डग्लसच्या मते, भारतामध्ये तोंडात अन्नं घेऊन त्यात मिसळली जाणारी लाळ ही सुद्धा अपवित्र मानली जाते. ब्राह्मणाने जेवताना त्याचा हात चुकून ओठांना लागला तर त्याला अंघोळ करावी लागले किंवा किमान कपडे तरी बदलावे लागतात. लाळ अपवित्र असल्यानेच पेल्याला तोंड लावून पाणी पित नाहीत तर वरून पेला तोंडावर धरून पितात. आपल्यापेक्षा कनिष्ट जातींकडून अन्न सोडा पण त्यांचा स्पर्शही अमान्य आहे. दलितांविरोधातल्या अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी असली तरी ती प्रथा पूर्णतः संपलेली नाही. आजही अनेक उच्च वर्णीयांच्या घरामध्ये दलितांना प्रवेश नसतो, खाण्या-पिण्याचं तर दूर राहीलं. गंमत बघा, अमेरिकेनेही दलितांप्रमाणेच आफ्रिकन वंशाच्या काळ्या लोकांना गुलाम बनवून त्यांच्यावर अनन्वयित अत्याचार केले. पण तिथे अस्पृश्यता नसल्याने अमेरिकन खाद्य संस्कृती ही या आफ्रिकेतून गुलाम बनवून आणलेल्या काळ्या वर्णाच्या लोकांनीच विकसित केली. भारतात मात्र अन्न संस्कृतीबाबत अशी सरमिसळ झालेली नाही. कारण मागास जातींचे अन्न हे कायम निकृष्ट ठरवलं गेलं. आज मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शहरामध्ये जैनांच्या पर्यूषणाच्या काळामध्ये प्राणी हत्येवर बंदी आणावी अशी मागणी दरवर्षी केली जाते. यावेळी कत्तलखाने बंद ठेवावेत यासाठी प्रशासनावर दबाव टाकला जातो. असे अनेक भाग मुंबईत आहेत जिथे जैन, मारवाडी, गुजराती वस्ती वाढली की मांसाहारी पदार्थ, मांसाहारी पदार्थ विकणारी हॉटेल्स हद्दपार होतात. अशा अनेक इमारती आहेत जिथे मांसाहार करणाऱ्या लोकांना घर विकलं जात नाही.

स्वाती नारायण या संशोधक महिलेने २०१८ मध्ये एक गंभीर बाब पुढे आणली ती म्हणजे भाजप सरकार सत्तेत आल्यावर मध्यान्न भोजन योजनेतून अंडी गायब झाली. त्यात गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणा, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर यांचा समावेश होता. भाजपशासीत उत्तराखंड, कर्नाटक, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मात्र तेव्हा अंडी दिली जात होती. भाजप युतीमध्ये असलेल्या मिझोराम, सिक्कीम, नागालँड आणि मेघालयमध्येही अंडी बंद करण्यात आली. भारतामध्ये लहान मुलांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना स्वस्त प्रथिनांचा स्त्रोत त्यांना नाकारण्यामध्ये काय साध्य होणार? पण हा वर्चस्ववाद इतका जास्त आहे की अनेक बहुजन जातींनी नाखुशीने उच्च वर्णीयांप्रमाणे अन्नपद्धती स्वीकारलेली दिसते, उदाहरणार्थ विशिष्ट वारालाच मांसाहार करणं.

युपीए सरकारच्या काळात नियोजन आयोगाने (आताचा नीती आयोग) २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, देशातील ४०.७४ करोड जनता दारिद्र रेषेच्या खाली आहे. म्हणजेच शहरी भागामध्ये दरदोई दर महिना उत्तन्न ९६५ रुपये तर ग्रामीण भागामध्ये ७८१ रुपये आहे. ही जनता डाळ, भाज्या, फळं कशी काय विकत घेणार? सध्याच्या परिस्थितीत तर अन्न शिजवायचा गॅसही त्यांना परवडणार नाही. अंडी, स्वस्तात मिळणारं गोमांस जर त्यांनी पोटाची खळगी भागवण्यासाठी वापरलं तर त्यात काय बिघडलं?

पण या “का?” ला देवाचं किंवा धर्माचं नाव दिलं की प्रश्न मिटतो. कारण देवा-धर्माला प्रश्न विचारायची मुभा कोणत्याच धर्मात नसते. पण तरीही आगाऊपणा करून आपण रामाकडे बघुया. रामनवमीला मांसाहार न करण्यामागे नक्की काय कारण असावं? राम मांस खात नव्हता का की त्या काळात मांसावर बंदी होती? नक्कीच नव्हती. इतिहास तज्ज्ञ डी. एन. झा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मामध्ये असलेल्या गोमांस सेवनाविषयी संस्कृत श्लोकांसह सविस्तर लिहून ठेवलं आहे. त्यातील काही नमुने पाहुया.

वनवासात असताना सीतेला झालेला हरणाचा मोह आणि त्यानंतर झालेलं तिचं अपहरण हा प्रसंग आठवून पहा. ते हरिण अर्थातच सीतेला खाण्यासाठी हवं होतं हे वेगळं सांगायला नको. पण ती कथा सोयीस्कर बदलून त्या हरणाचं कातडं हवं होतं वगैरे आपल्या गळी उतरवलं गेलं.

वाल्मिकी रामायाणातील श्लोकांमध्ये प्रभूरामचंद्रांच्या आहाराविषयी असलेल्या या श्लोकात काय म्हटले आहे पाहा…

कुशास्तरण सस्तीर्णेरामः सन्निषसादह |
सीतामादाय हस्तेनमधु मैरेकमशुचि ||
पापयामांस काकुतस्थ शची मिव पुरन्दरः
मांसानि च सुमृष्यनि फलानि विविधानि च ||
रामस्याभ्य वारार्थ किकरास्तू माहरन |
उपानृत्यंश्चराजन नृत्यगीत विशारदा ||
अप्सरोरगसंघाश्च किन्नरी परिवारिता |
दक्षिणा रूवत्यश्च स्त्रिय पावन संगत ||

(वाल्मिकी रामायण १०-४२-१८ ते २१)

याचा अर्थ असा की, श्रीरामाने आपल्या अंतःपुराजवळील समृद्धशाली राजकीय उपवनात विहार करण्यासाठी प्रवेश केला व फुलांनी सजविलेल्या कुशाच्या आसनावर ते बसले. काकुत्स्थ वंशात जन्मलेल्या राजा रामचंद्राने सीतेच्या हाताला धरून तिला मैरेय नावाचे पवित्र मद्य पाजले. हेच मद्य इंद्र, आपली पत्नी शची हिला पाजतो. सेवकांनी अनेक प्रकारचे उत्तमोत्तम मांस, पक्वान्ने व फळे त्यांच्या समोर भोजनासाठी ठेवली. त्यावेळी नाच-गाण्यात निपुण अप्सरा, नागकन्या, किन्नरी, रुपवान व गुणवान स्त्रिया मद्याच्या नशेत धुंद होऊन नाचू लागल्या.

सीता वनवासाला निघाली असताना सुखरूप परत येण्यासाठी गंगा ओलांडताना म्हणते

सुरा-घट-सहस्रेण मांसभूत-ओदनेन च |
यक्ष्ये त्वां प्रीयतां देवि पुरीं पुनरुपागता ||२.५२.८९||

याचा अर्थ असा की, इतकेच नव्हे, परंतु हे देवी, मी अयोध्यानगरीला परत आले, म्हणजे सहस्र घट मद्य आणि मांसमिश्र ओदन यांचा तुला बळी देईन. गंगे! तू मला प्रसन्न हो.

आता वैदिक संस्कृतीचे हिंदू संस्कृतीच्या नावाखाली पुनरुज्जीवन करू पाहणाऱ्यांपैकी काही जण हा तर्क देऊ शकतील की, सीता स्वतः मांस खात होती असे यात कुठे म्हटलंय? मात्र वैदिक संस्कृतीत ज्या गोष्टी मनुष्याला खाण्यास योग्य होत्या, त्याचाच नैवेद्य देवाला दाखवला जात होता, याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?

रामाची नगरी समजल्या जाणाऱ्या अयोध्येच्या आजूबाजूला राहणारे लोक काय खात होते ते पाहुयात. अयोध्येच्या जवळ बस्ती जिल्ह्यामध्ये सिसवानिया म्हणून गावात १९९५ च्या दरम्यान आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने खोदकाम केलं. त्याचा संपूर्ण वृत्तांत इंडियन आर्किओलॉजी १९९६-९७ रिव्ह्यू या भारत सरकारच्या पुस्तकात छापला आहे.
(http://asi.nic.in/nmma_reviews/Indian%20Archaeology%201996_97%20A%20Review.pdf)

त्या वृत्तांतानुसार वेदिक काळाच्या शेवटच्या टप्प्यात, त्या भागामध्ये बैल, म्हैस, घोडा, बकरा, मेंढा, हरिण, सांबर, जंगली डुक्कर, डुक्कर, कुत्रा, मांजर, ससा, उंदिर, कासव, मासा, कोंबडी व तत्सम पक्षी अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडले. यातील बहुतेक प्राणी (कुत्रा आणि मांजर सोडून) हा त्यावेळच्या माणसांचा आहार होता. कारण या प्राण्यांच्या हाडांवर कापल्याचे आणि तुकडे केल्याच्या खूणा आहेत, असं हा वृत्तांत सांगतो.

मूळात सनातन हिंदू धर्मामध्ये यज्ञाचं फार मोठं प्रस्थ ब्राह्मणांनी निर्माण केलं होतं आणि त्यासाठी शेकडो प्राण्याची कत्तल होत होती. हे प्राणी नंतर खाण्यासाठी वापरायचे. त्यामुळे प्राणी कसे कापायचे याचंही शास्त्र तेव्हाच्या ब्राह्मणांना चांगलं अवगत होतं. प्राण्याच्या शरिराचा कोणता भाग कोणाला प्रसाद म्हणून द्यायचं याचं सविस्तर वर्णनं हिंदू ग्रंथांमध्ये आहेत. मात्र ते प्राणी त्यावेळची सामान्य जनता, शेतकरी यांच्याकडून जबरदस्तीने घेतले जायचे. त्यामुळे लोक या प्रथेला कंटाळले होते. अशावेळी कर्मकांड, हिंसाचाराला विरोध करणारे जैन आणि बौद्ध धर्म भारतामध्ये लोकप्रिय झाले. या धर्मांमध्येही सुरुवातीला मांसाहारावर बंदी नव्हती. बौद्ध धर्म अती पूर्वेकडच्या देशांमध्ये गेला तिथेही मांसाहारावर बंदी नाही. हिंदू धर्मातील अनेक पवित्र समजल्या जाणाऱ्या ग्रंथांमध्ये विविध प्राण्यांचे मांस, ते बनवण्याच्या पद्धती, सोमरस यांचा वारंवार सविस्तर उल्लेख आहे. अगदी उंदीर शिजवण्याची पाकाकृतीही इसवी सन ६०० ते १३०० दरम्यान लिहिल्या गेलेल्या “मानोल्लास” आणि “लोकोपाक” या दोन पुस्तकांमध्ये आहे. मोठा काळा उंदीर आवळा आणि मीठ चोळून भाजला जायचा. त्याला साफ करून आलं पावडर, जिरं यांचा वापर केला जायचा. पण आज उंदीर खाणाऱ्या जमाती अस्तित्वात आहेत त्यांच्याकडे हीनतेने पाहिलं जातं किंवा शहरी लोकांचा समज आहे की अन्न मिळत नसल्याने ते उंदीर खातात. पण उंदरासारखा प्राणीही हिंदू अन्न संस्कृतीचा भाग आहे हे विसरून चालणार नाही.

महाभारतावर लिहिलेल्या प्रसिद्ध कन्नड लेखक एस. एल. बहिरप्पा यांच्या “पर्व” या कादंबरीमधील वर्णन पाहुया. भीमासाठी स्वयंपाक तयार केलेला असतो. त्यात भात, जिरं घालून केलेल्या चपात्या, जास्त शिजवलेलं मांस असतं आणि गोमांस. भीमाला काय आवडतं हे स्वयंपाक बनवणाऱ्यांना माहित असलं तरी त्याला कच्चं गोमांस आवडतं याची त्यांना कल्पना नसते. अशावेळी त्याच्या मनात प्रश्न येतो की, मी कच्चं मांस खाल्लं तर लोक मला अनार्य – राक्षस जातीचा ठरवतील जणूकाही आर्य होणं म्हणजे शिजवलेलंच मांस खाणं. मग त्याला अचानक त्याची राक्षस गणातील बायको हिडिंबेची आठवण येते जी कच्चं मांस खायची. आपण तिला शिजवलेलं अन्न खाण्यासाठी कसं सांगायचो आणि ती तेही आवडीने खायची, असं भीमाला आठवतं. या प्रसंगातही आर्य विरुद्ध अनार्य यांच्या अन्नपद्धतीमध्ये असलेला फरक उधृत होतो.

प्राचीन भारतावर लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकांमध्ये मांस, गोमांस खाण्यासंबंध असे हजारो पुरावे मिळतात आणि तज्ज्ञांनी ते वारंवार पुढेही आणले आहेत. पण सध्याच्या वॉट्सअॅप युनिवर्सिटीच्या संदेशांचा मारा एवढा तीव्र आहे की त्यापुढे खरा इतिहास मागे पडलाय. मग प्रश्न राहतो तो हिंदुत्ववादी नक्की कोणती हिंदू संस्कृती आपल्यावर लादू पाहत आहेत? अर्थातच ही ब्राह्मणी संस्कृती आहे ती हिंदू संस्कृती नाही. कोणतीही बंदी ही राजकीयच असते त्याचा धर्माशी संबंध जोडल्याने त्याची अंमलबजावणी सोपी होते. इथेही हिंदुत्ववादी शक्ती या धर्माच्या नावाने गोमांस, मांस यावर बंदी घालू पाहत आहेत आणि दहशत निर्माण करत आहेत. सातत्याने एखाद्या संस्कृतीवर हल्ला करत राहिलं की ती नष्ट होते. इथे बहुजनांची अन्न संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. हा सर्वच समाजाला एक धोक्याचा इशारा आहे. कारण आज मांसावर बंदी आहे उद्या एखाद्या भाजीवर बंदी येऊ शकते.

इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात त्यात किती तथ्यं आहे ते वाचकांनी ठरवावं. पण इतिहासात झालेल्या चुका भविष्यासाठी धडे मात्र नक्कीच घालून देतात. लेखाची सुरुवात नाझी विचारसणीने झाली आहे तर शेवट त्या विचारसणीचा प्रणेता हिटलरबद्दल सांगून करुया. हिटलर हा स्वतः शाकाहारी होता आणि चित्रपट पाहताना प्राण्यांना इजा पोहोचवल्याची दृश्य आली तर तो रडायचा, डोळे बंद करायचा आणि दृश्य संपल्यावर आपल्याला सांगा अशा विनंत्या उपस्थितांना करायचा. त्याच्या मते, मांसाहारी लोक दुटप्पी आणि “प्रेतं खाणारे” होते. श्रेष्ठ वंशासाठी ते योग्य उमेदवार नव्हते. नाझी प्रचार तंत्राचा भाग म्हणून सिगरेटच्या पाकिटांवर सफरचंद सोलणाऱ्या हिटलरचं चित्रं छापलं जायचं. त्यालाही जर्मनीला शाकाहारी देश बनवायचं होता. पण त्यामुळे अन्न साखळी व्यवस्थेत अडथळे निर्माण होऊन युद्धात त्याचा फटका बसेल हे लक्षात आल्याने त्याने ते प्रयत्न थांबवले. हिटलरला सत्तेत आणण्यासाठी जर्मन शाकाहारी समूहांची मोठी मदत झाली. पण सत्तेत येताच त्याच्या शाकाहारी मित्रांनाही त्याने सोडलं नाही. इतिहासकार जेन बार्कस यांच्या मते, हिटलरने प्रथम शाकाहारी/निसर्गप्रेमी गट वँडर-वोगेलला सुपर-आर्यन युनियन ऑफ ट्युटोनिक नाईट्समध्ये बदलण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याने शाकाहारी कॉलनी ईडनला नाझी वंश सिद्धांत शिकवण्यासाठी दबाव आणला. हे अयशस्वी झाल्यावर त्यांनी संपूर्ण शाकाहारी चळवळीवर बंदी घातली. त्यांचे मुख्य नियतकालिक, व्हेजिटेरियन वार्टे, दडपण्यात आले आणि प्रमुख बैठकीच्या ठिकाणांना नाझी छळ छावण्यांमध्ये रूपांतरित करण्यात आले. ज्ञात शाकाहारींना अटक करण्यात आली, त्यांची पाकाकृती पुस्तकं जप्त करण्यात आल्या आणि कोलोनच्या लोकप्रिय वेगा रेस्टॉरंटचे मालक, वॉल्टर फ्लीस, गेस्टापोच्या मोस्ट-वॉन्टेड यादीत झळकले. त्यांना शाकाहारी ज्यू म्हणून अशी शिक्षा दिल्याचं वरवर सांगण्यात आलं.


संदर्भः

१. पर्व, एस.एल. भैरप्पा, के. राघवेंद्र राव, साहित्य अकादमी, १९९४ द्वारे इंग्रजीत अनुवादित.

२. इन अ डेव्हिल्स गार्डन, अ सिनफुल हिस्ट्री ऑफ फॉरबिडन फूड, स्टीवर्ट ली ऍलन.

३. फीस्ट अँड फास्टः अ हिस्ट्री ऑफ इंडियन फूड इन इंडिया, कॉलीन टेलर सेन.

४. हिंदुनी केले गोमांस भक्षण, एस.एल. सागर, २००६, प्रमिला बोरकर यांचे सुगावा प्रकाशन मराठीत अनुवाद.

लेखिका राईट अँगल्सच्या नियमित वाचक, हितचिंतक आहेत.

1 Comment

Write A Comment