जय भीम…..!!!
तमिळनाडू हा प्रचंड विरोधाभासांचा प्रदेश आहे. या प्रांतात देशातली सर्वात सशक्त ब्राह्मणेतरांची चळवळ उभी राहिली. देव, धर्म यांची कठोर चिकित्सा झाली. पेरियार यांच्यासारख्या भंजक सुधारकांना तिथं लोकांनी डोक्यावर घेतलं. पण दुसरीकडे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये देवा-धर्माचा आणि कर्मकांडांचा प्रभाव आजही कायम आहे. जातीजातींमध्ये यावरून पराकोटीचे संघर्ष उद्भवत असतात.
देऊळ हे तिथल्या सार्वजनिक व्यवहारातलं फार महत्वाचं केंद्र आहे. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी लग्नाचे धार्मिक विधी देवळात करण्याची प्रथा आहे. द हिंदू हे दैनिक व त्यांची मालक मंडळी डावे म्हणून ओळखले जातात. हिंदू प्रकाशनातर्फे पुस्तकंही प्रकाशित होत असतात. त्यात, दक्षिणेतील देवळं, देव, विविध मठ, स्वामी यांच्याबाबतची पुस्तकं लक्षणीय संख्येनं आहेत.
देवळांचे उत्सव आणि त्याच्या प्रथा-परंपरा हा फार नाजूक विषय आहे. आपल्याकडे कोकणात देवाची पालखी नाचवणे, होळी पेटवणे हे गावागावातले भांडणाचे विषय असत. किंवा मराठवाड्यात महार-मांगांना हलगी वा वाजंत्री वाजवू देण्यावरून हाणामाऱ्या होत. अलिकडे हे प्रकार कमी झाले आहेत. शिवाय, त्याचे पडसाद बहुतेकदा स्थानिक पातळीपुरते सीमित राहतात. तमिळनाडूमध्ये मात्र अशा प्रकारांना राज्य पातळीवर महत्व मिळताना दिसतं.
कांडादेवी इथल्या देवळाचा रथ ओढण्यावरून होणारा जातीय संघर्ष गेल्या शतकात गाजला. देवळाचा रथ ओढण्याचा अधिकार केवळ आमचा आहे असा या कल्लार (थेवर) जातीच्या लोकांचा दावा. दलितांना मात्र तो मान्य नाही. यातून अनेकदा हिंसाचार झाला आहे.
१९३४ ला महात्मा गांधी या भागात आले असताना त्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण थेवर ऐकले नाहीत. १९९८ मध्ये वाद विकोपाला गेला. न्यायालयानं दलितांना अनुकूल निकाल दिला. पण समेट झाला नाही. हे प्रकरण अजूनही धुमसत असतं.
रथ ओढण्याच्या अधिकारावरून राड्यांचा हा प्रकार पूर्ण राज्यभर आढळतो. त्यातही दिसतं असं की, ब्राह्मणांपेक्षाही दलित व बहुजन हे आपल्या धार्मिक श्रध्दांबाबत आणि हक्कांबाबत अधिक आग्रही असतात.
दिवाळीच्या एक आठवडा आधी थिमिथी नावाचा उत्सव सर्वत्र साजरा होतो. द्रौपदी किंवा मरिअम्मन या देवींच्या भक्तीप्रीत्यर्थ हा होतो. त्यात निखाऱ्यांवरून चालण्याचा एक विधी असतो. हे एक दिव्य असतं व ते जो पार पाडू शकतो तो पुण्यवान मानला जातो. शिवाय ते करणाऱ्यावर देवीची कृपा होते. त्यामुळे हे करायला मिळणं हासुध्दा एक मान असतो. पण अनेक ठिकाणी दलितांना वा (अन्य काही जातींना) यात भाग घेण्यास अगदी आजही विरोध होत असतो.
याशिवाय, लोटांगण घालत देवीपुढे जाण्याचा किंवा नवस फेडण्याचा एक प्रकार असतो. (जयललितांपुढे त्यांचे कार्यकर्ते एखाद्या देवीपुढच्या सारखंच लोटांगण घालत असत व त्याचे फोटो प्रसिध्द होत.) त्यातही काही जातींना मज्जाव केला जातो. यावरून प्रचंड बखेडे व काही दंगे दरवर्षी होत असतात.
ब्राह्मणांच्या मंदिरात जायला मिळावं म्हणून पूर्वी मोठी आंदोलनं झाली. पण आजदेखील अनेक ठिकाणी इतर मागास समाजाच्या मंदिरांमध्ये दलितांना प्रवेश मिळत नाही. अस्पृश्यता निवारण आघाडी नावाची कम्युनिस्ट पक्षाची संघटना आहे. २००८ ते २०१६ या काळात संघटनेनं अशी ५२ विविध आंदोलनं केल्याची नोंद आढळते.
थेवर विरुध्द पल्लार
इतर मागास जातींचा दलितांबद्दलचा द्वेष हे तमिळ राजकारणातलं एक आश्चर्यकारक प्रकरण आहे. हा द्वेष भारतभर आढळतो. पण तमिळनाडूमध्ये तो कमालीचा हिंसक आहे. थेवर आणि वन्नियार या जातींकडून होणारी दलितांची दडपणूक ही मध्ययुगीन काळाची आठवण करून देणारी आहे.
पल्लार हा दलितांमधला सुधारलेला समाज आहे. शिक्षण, नोकऱ्या, परदेशात जाणं यात तो आघाडीवर आहे. १९३० नंतर यांच्यातल्या काही गटांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. थेवर समाज स्वतःला क्षत्रिय व उच्चवर्णीय मानतो. पण पल्लारांच्या तुलनेत त्यांची भौतिक प्रगती झाली नाही.
चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत हाताची घडी घालून उभे राहणे, पायावर पाय ठेवून बसणे, अमुक प्रकारे धोतर नेसणे अशा बारीकसारीक गोष्टींमध्ये देखील दलितांवर बरेच निर्बंध होते. पण ते झुगारून पल्लार पुढे निघून गेले. त्यामुळे पल्लार आणि थेवर यांच्यात भयंकर दुष्मनी आहे.
१९५७ मध्ये रामनाड दंगली झाल्या. त्या दरम्यान शांतता समितीच्या बैठकीत दलितांचे नेते इमॅन्युएल शेखर व थेवरांचे (जणू धर्मगुरुच) मुथुरामलिंगम यांच्यात बोलाचाली झाली. शेखर दलित असूनही आपल्यासमोर बसून बोलण्याची हिंमत कशी करतो असं मुथुरामलिंगम आपल्या सहकाऱ्यांना नंतर म्हणाले.
शेखर हे पल्लारांचे अत्यंत बुजुर्ग असे नेते होते. दुसऱ्या महायुध्दात सैनिक म्हणूनही ते लढले होते. दोनच दिवसात त्यांची भीषण हत्या झाली. प्रचंड उद्रेक झाला. गावंच्या गावं जाळली गेली. एकूण ४२ दलित मारले गेले. मुथुरामलिंगम यांना अटक झाली.
मुथुरामलिंगम यांचा ३० ऑक्टोबर हा जन्म व मृत्यूदिन थेवर समाजात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी दलितांविरुध्द दंगली होऊ नयेत म्हणून आजही प्रचंड बंदोबस्त ठेवावा लागतो.
१९६८ मध्ये तंजावूर जिल्ह्यात ४४ दलित शेतमजुरांची जाळून हत्या करण्यात आली.
१९९५ मध्ये कुडुयानकुलम इथं बसमध्ये दलित चालकासोबत भांडण झाल्याच्या कारणावरून दंगल झाली. त्यात १८ जण मेले. धानुषचा कर्णन हा सिनेमा त्यावरच आधारलेला आहे.
अगदी अलिकडे २०१७ मध्ये (थेवर जातीच्या) कौसल्या नावाच्या इंजिनिअरिंग विद्यार्थिनीने शंकर या दलित तरुणाशी लग्न केलं. त्यामुळे चिडून जाऊन शंकरची हत्या करण्यात आली. हे प्रकरण देशभर गाजलं. पण कौसल्याची बहादुरी अशी की स्वजातीयांचा विरोध पत्करूनही ती आता चळवळीत काम करते.
उत्तरेमध्ये वन्नियार विरुध्द दलित हा संघर्षदेखील असाच जीवघेणा आहे. २०१२ मध्ये धर्मपुरी इथल्या दिव्या नावाच्या तरुणीनं इल्लावरसन नावाच्या दलित तरुणाशी प्रेमविवाह केला. त्यावरून मोठी दंगल झाली. दलितांच्या वस्त्यांवर हल्ले करण्यात आले. शेवटी इलावरसन हा संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळला.
विशेष असा की, धर्मापुरी हा एकेकाळी नक्षल चळवळीचा बालेकिल्ला होता. जमीन वाटप सुधारणा चळवळीमध्ये वन्नियार व दलित हे एकसाथ लढले होते. आधीच्या पिढीत या दोन्ही समाजांमध्ये सर्रास लग्ने होत होती. तशी अनेक जोडपी दिव्या व इलावरसनच्या आजूबाजूला होती. पण हा विषय मुद्दाम पेटवण्यात आला व आता तो संवेदनशील बनला आहे. इतका की आता दोन समाजातील सलोखा लयाला गेला आहे.
गेल्या वर्षी याच तिरुनेलवेल्ली व दिंडीगल जिल्ह्यात दहा दिवसात चार शिरच्छेदांची प्रकरणं घडली. शिरावेगळं धड सापडलं की पोलिस पहिल्यांदा त्या मेलेल्याची जात शोधतात. तो ज्या जातीचा असतो त्यांच्या वस्तीत त्याचं मुंडकं मुद्दाम टाकलेलं असतं.
गेल्या एप्रिलमध्ये एकाचा तुरुंगात खून झाला. तर तो करणाऱ्याच्या जातवाल्यांचा मुडदा पाडल्याखेरीज याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असं याच्या जातवाल्यांनी सांगितलं. अखेर ७५ दिवसांनी कोर्टानं हस्तक्षेप केला. पण नंतर मुडदा पडलाच.
पेरियार चळवळीची मर्यादा?
अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की, पेरियार हे स्वतः कट्टर जाती व धर्मविरोधक असले तरी त्यांच्या चळवळीला ब्राह्मणविरोधाचं स्वरुप आलं. इतर मागास व दलित यांच्यातील तेढीकडे चळवळीनं म्हणावं तितकं लक्ष दिलं नाही. १९५७ किंवा ६८ च्या दलितविरोधी दंगलींनंतर इतर मागासांमध्ये प्रबोधनाची मोहिम चालवणं आवश्यक होतं. ते घडलं नाही.
द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांचे पुढारी तर बोलून चालून राजकारणी होते. आपल्याला पाठिंबा देणाऱ्या इतर मागास जातींना दुखावणं त्यांना परवडणारं नव्हतं. इतर मागास व दलित यांच्यात आजही कमालीचा दुरावा आहे.
पेरियारांच्या चळवळीनं मध्यम जातींना सामाजिक स्वातंत्र्य दिलं. जातींच्या चौकटीतले अपमान संपवले. समाजाचं पुढारपण दिलं. नाडार, गौंडरांसारख्या जातीतील काही गटांना वेगानं आपला उत्कर्ष साधता आला.
अनेकांना राजकीय सत्ता मिळाली. पण समाजाची सरासरी समज ही सरंजामीच राहिली. त्यातून आपापल्या जातींचे दुराभिमान वाढीला लागले. प्रत्येक जातीत दुराभिमान बाळगणारी टोळकी तयार झाली. त्यांचा आपापल्या समाजांवरचा दबाव वाढला.
ओबीसींना लपेटण्याचा खेळ
भाजप आता त्याचा परिचित खेळ खेळू शकेल.
हा खेळ आहे विविध जातींच्या अस्मिता फुलवण्याचा आणि अंतिमतः या सर्वांना हिंदुत्वामध्ये लपेटून घेण्याचा.
राजस्थान, बंगाल, उत्तर प्रदेशात आपण तो पाहिला. राणा प्रताप, मटुआंचे नेते हरिश्चंद्र ठाकूर किंवा सुहेलदेव यांचा एकाएकी प्रचंड गवगवा सुरू होतो. भाजप आहे म्हणूनच त्यांना न्याय मिळतो आहे असं वातावरण तयार होतं.
त्यातून त्या त्या जातींच्या श्रेष्ठत्वाचा गंड तयार केला जातो. आणि हिंदू धर्मामध्ये या समाजांचं महत्व किती मोठं आहे हे ठसवलं जातं. त्यासाठी या लोकांना हिंदू देवांसारखं रुप देऊन त्यांची पूजा वगैरे केली जाते. त्यांच्या पंथांमधील मुखंडांना हाताशी धरलं जातं. महाराष्ट्रात वंजारी समाजाच्या भगवानगडाचं महत्व गेल्या काही वर्षात असंच वाढवण्यात आलं.
नाडार, थेवर, गौंडर, वन्नियार इत्यादी जातींसोबत भाजपला हाच खेळ आता खेळायचा आहे. या खेळासाठी कसं अनुकूल वातावरण तयार झालंय याचं एक उदाहरण म्हणजे अलिकडे गाजलेला गोकुळराज खून खटला.
गोकुळराज हा इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला दलित युवक होता. त्याच्याच वर्गातील गौंडर समाजातील मुलीवर त्याचं प्रेम होतं. २०१५ मध्ये त्याची हत्या झाली. गौंडर समाजात धीरन चिन्नामलाई गौंडर पेरवाई नावाची युवकांची संघटना चालवणारा युवराज हा या हत्येमागे होता. त्याच्यासह नऊ जणांना नुकतीच (आठ मार्च) जन्मठेपेची शिक्षा झाली.
गौंडर समाज हा पारंपरिकदृष्ट्या वन्नियार किंवा थेवर यांच्यासारखा आक्रमक मानला जात नाही. पण आता त्यांच्यातही जातीच्या अभिमानाचं हे स्पिरिट घुसले आहे. त्यातूनच दलितांच्या मुलामुलींशी आपल्या मुलांची लग्नं करू नका असा इशारा देणारे गौंडर नेते उदयाला आले आहेत. युवराज हा त्यांच्यापैकीच एक.
युवराज हा नामक्कल जिल्ह्यामधील सर्व कॉलेजांमध्ये गौंडर विद्यार्थ्यांशी संपर्क साधून कोणाचे कोणाशी प्रेमसंबंध आहेत यावर लक्ष ठेवत असे. मग जातीबाहेर प्रेम करणाऱ्यांना धमक्या देत असे.
या धमक्यांना न जुमानता गोकुळराज व त्याची मैत्रीण अर्धनारीनटेश्वर मंदिरात भेटले. त्यांना पाहिल्याची खबर मिळाल्यावर गोकुळराजचं अपहरण झालं व खून झाला. या खुनामागे युवराज आहे हे स्पष्ट झाल्यावरही तो पोलिसांना तीन महिने गुंगारा देत राहिला. या काळात तो ओसामा बिन लादेनप्रमाणे रोज आपले व्हिडिओ मेसेज प्रसृत करीत असे. यामुळे गौंडर समाज त्याच्या मागे उभा राहिला. पोलिसांवर दबाव आला. इतका की, मुख्य महिला तपास अधिकाऱ्यानं आत्महत्या केली.
नंतर बराच ओरडा झाल्यावर हा खटला उभा राहिला. पण तो नामक्कलच्या बाहेर चालवावा लागला.
विशेष म्हणजे याच अर्धनारीनटेश्वराच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कादंबरीवरून (इंग्लीश – वन पार्ट वुमन, तमीळ माथोरू पागन) लेखक पेरुमल मुरुगन यांना खुनाच्या धमक्या मिळाल्या होत्या. यात गौंडर म्हणजेच कोंगू वेल्लालार समाजाच्या महिलांचा अपमान करण्यात आला आहे असा गौंडरांचा दावा होता.
शेवटी, या दबावापुढे झुकून मुरुगन यांनी कादंबरीतील कथित आक्षेपार्ह भाग वगळण्याची घोषणा केली होती. त्याच वेळी एका लेखकाचा मृत्यू झाला असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं, ज्यानं देशभर वादळ उठलं. त्यावेळी मुरुगन यांच्या एकतर्फी चौकशीसाठी नामक्कलच्या जिल्हाधिकारी कचेरीत कथित चावडी भरवण्यात याच युवराजचा पुढाकार होता.
पेरियारांच्या कुळाचं नाव सांगणाऱ्या द्रवीड पक्षांनी आजवर अशा प्रकरणांमध्ये कायमच सावध भूमिका घेतली आहे. भाजपसाठी तर एखादी जात अस्मितेच्या भाषेत बोलत असेल तर ती सुसंधीच आहे.
हे शूद्र पूर्वी कोण होते?
जाणकार सांगतात की, द्रवीडांचं संस्कृतायझेशन करण्याचा प्रयत्न शेकडो वर्षांपासून चालू आहे. त्याला पेरियारांच्या पूर्वीही विरोध झाला व पेरियारांनी तर केलाच केला. तरीही शंकर आणि विष्णू हे देव तमीळ संस्कृतीत घुसलेच. त्यांनी तिथल्या मुरुगन या मूळ द्रवीड देवाला खो द्यायचा प्रयत्न केलाच आहे. त्यातही हा मुरुगन म्हणजे शंकराचा दुसरा मुलगा कार्तिकेय असल्याचं रुढ केलंच आहे.
या वातावरणात आपलं कूळ हिंदू पुराणात दूर कुठेतरी नेऊन भिडवण्याची शर्यत चालू होते. इथल्या मध्यमच नव्हे तर दलित जातींनी देखील या शर्यतीत सहभागी आहेत.
उदाहरणार्थ, आपला मूळ पुरुष गंगेच्या खोऱ्यातील असल्याचं आणि म्हणून आपण गांगेय आहोत असं गौंडर मानतात. देवांनी पृथ्वीवरच्या लोकांची भूक भागवण्यासाठी पसा-पसा धान्य दिलं आणि आपल्या मूळ पुरुषानं शेती सुरू केली अशी त्यांची श्रध्दा-कथा आहे.
थेवर व नाडारांच्या कथा वर सांगितल्या आहेतच. वन्नियार हे स्वतःला अग्निवंशीय म्हणजे अग्निमधून निर्माण झालेले (म्हणून अत्यंत पवित्र आणि योध्दे) मानतात.
दलितांमधले पल्लार हे पूर्वास्पृश्य असले तरी स्वतःला इतर दलित जातींपेक्षा श्रेष्ठ मानतात. त्यांच्यातल्या सात जातींच्या समुहाला देवेंद्र कुल वेल्लालार असं म्हटलं जातं. अर्थातच आपण इंद्रांच्या कुळातील आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. थेवर हेदेखील स्वतःला इंद्रकुलीनच मानतात. त्यांना पल्लारांचं हे वर्तन पसंत नाही. त्यामुळेच थेवर आणि पल्लार हा झगडा तीव्र असावा.
पल्लार हे दलितांमधले असले तरी पूर्वापार त्यांच्याकडे जमिनी आहेत. अलिकडे शिक्षणातील आरक्षणांमुळे त्यांनी वेगानं प्रगती केली. त्यांना आता सामाजिक प्रतिष्ठेची शिडी चढून जायचं आहे. त्यासाठी गेले अनेक वर्षं ते आपल्याला पल्लार असं न म्हणता देवेंद्रकुल वेल्लालार असं म्हणवून घेतात.
१९९० पासून यासाठी आंदोलनं सुरू झाली. अखेर गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी ही मागणी मान्य केल्याची घोषणा केली. अनुसूचित जातींच्या गटातून बाहेर काढावं (आणि इतर मागासांसोबत ठेवावं) अशीही त्यांची दुसरी मागणी होती. जेणेकरून, आपल्यावरचा अस्पृश्य हा ठप्पा पुसता येईल असं त्यांना वाटतं. पण ही त्यांची मागणी मान्य झालेली नाही.
पल्लार हे स्वतःला पल्लव राजांपैकी देखील मानतात. अनेक ठिकाणी ते इतर दलित जातींना अस्पृश्यांसारखे वागवतात. पल्लारांच्या खालोखाल येतात ते परायार. पराई म्हणजे ढोल किंवा ताशा (वाजंत्री). पारंपरिकरीत्या ही वाद्य वाजवण्याची कौशल्य व मान त्यांच्याकडे असतो. (प्रसिध्द संगीतकार इलाय राजा तसंच दिग्दर्शक पा. रंजीत याच समाजातून येतात.)
पल्लार हे मुख्यतः शेती व शेतमजुरी करतात. मात्र परायार हे मेलेल्या जनावराचे कातडे फाडणे, कमावणे इत्यादी कामे करतात. पल्लार बीफ खात नाहीत. परायार खातात.
(भारतातील जातिव्यवस्था अथांग आहे. या परायारांच्या खाली चक्कीलियार येतात. ते भंगीकाम वगैरे करत. आणि पुथिरा वन्नन नावाची या सर्वांच्या खालची जात होती. ते धोबीच. पण ते केवळ दलितांचेच कपडे धूत असत.)
दलितांमधील चर्मकार म्हणजे अरुंधातियार. या समाजातही वीरन नावाचा एक योद्धा पुरुष आहे. एकेकाळी मदुराई नगरीचं त्यानं डाकूंपासून कसं रक्षण केलं याच्या पराक्रमकथा आहेत.
मुद्दा असा की, दलितांसकट प्रत्येक जात एक स्वतंत्र अस्मिता वाजवून दाखवू लागली आहे. आपापले अस्मितापुरुष शोधू लागली आहे. या अस्मितेच्या तारा उत्तर भारतीय आर्यांच्या पुराणांशी जोडल्या जाऊ लागल्या आहेत. हे सर्व भाजपला फारच अनुकूल आहे. बाहेरून पाहणाऱ्याला द्रवीड संस्कृती अजूनही टिकून असल्याचं वाटतं. राजकारणामध्ये द्रवीड पक्षांचा वरचष्मा कायम असल्यानं त्याला पुष्टी मिळते.
पण प्रत्यक्षात या अस्मिताबाजीमुळे द्रवीड प्रदेशाचं हिंदू भारताशी झपाट्यानं संलग्नीकरण होईल अशी शक्यता आहे.
हे करताना भाजपला कसरत करावी लागेल. तमिळांमध्ये पल्लारांची संख्या सुमारे अकरा टक्के आहे. तर एकूण दलितांची संख्या सतरा ते वीस टक्के आहे. त्यामुळे निवडणुकीच्या हिशेबात पल्लारांची एकगठ्ठा मतं भाजपला उपयोगी ठरू शकतात.
मात्र पल्लारांना एक पायरी वर आणल्यामुळे इतर गौंडर किंवा थेवर या जाती नाराज होणार आहेत. २०२१ च्या निवडणुकीतील पराभवाचं ते एक कारण आहे.
पल्लारांना देवेंद्रकुल म्हणून मान्यता मिळत असेल तर आम्हाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या अशी मागणी काही गौंडर संघटनांनी केली होती. पल्लारांना आता महत्वाच्या देवस्थानांचा ताबा मिळू दिला जाणार काय अशीही भीती व्यक्त केली गेली आहे.
तरीही एक खरंच की, भाजपनं या जातींच्या गुंडाळ्यात घुसण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यांचे पूर्वीचे प्रदेश अध्यक्ष ब्राह्मण असत. नंतर नाडार (तमिल सुंदरसाई), चर्मकार (एल मुरुगन) होत होत आता गौंडर(अण्णामलाई) अध्यक्ष आहेत.
भाजपचे तेच ते डावपेच
शक्य त्या त्या गोष्टीचा धर्माशी आणि श्रध्देशी संबंध जोडायचा आणि उपद्रव निर्माण करायचा असे हिंदुत्ववादी परिवारातील संघटनांचे डावपेच असतात. सध्या हिंदू मुन्नानी आणि मक्कल कच्ची हे ते काम पार पाडतात. शिवाय, भारतीय जनता पक्षाचे नेते काही ना काही वक्तव्य करून सतत प्रसिध्दीत राहण्याचा प्रयत्न करतात.
गेल्या काही वर्षांमध्ये धार्मिक श्रध्दा दुखावल्याची प्रकरणं वाढू लागली आहेत. २०२० मध्ये एका यूट्यूब व्हिडिओमध्ये मुरुगनची टर उडवली गेली आहे असा आरोप करण्यात आला. त्याविषयी भाजपशी संबंधित संघटनांनी मोहिम चालवली. न्यूज १८ या वृत्तसमुहाच्या एका मुस्लिम पत्रकाराचा याच्याशी संबंध असल्याचं सांगून धार्मिक रंग देण्यात आला. सरकार, पोलिस व ती कंपनी दबावाखाली आली. मुस्लिम पत्रकाराची नोकरी गेली. यूट्यूब व्हिडिओ करणाऱ्यांवर गुंडा एक्टखाली कारवाई करण्यात आली. एक वर्षांनंतर न्यायालयानं हा खटला काढून टाकला. पण तोवर भाजपचं काम झालं होतं.
भाजपच्या तेव्हाच्या प्रदेशाध्यक्षांनी या वादाचा नंतरच्या विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी एक वेल यात्रा काढली. मुरुगन या देवाच्या हाती भाला हे शस्त्र असतं. तमीळमध्ये भाल्याला वेल म्हणतात. मोदींनाही प्रचारसभांमध्ये ताळतंत्र नसतोच. त्यांनीही वेट्रिवेल वीरावेल (विजयी, धाडसी भाला) असा जयघोष केला.
विशेष म्हणजे विरोधकांनी तर सोडाच पण भाजपच्या सहयोगी अण्णा द्रमुकनं देखील या यात्रेवर जोरदार टीका केली होती. राज्यातील शांतता बिघडवण्याचे प्रकार होता कामा नयेत असं त्यांनी म्हटलं होतं.
धर्माच्या वा देवांच्या नावाने यात्रा काढून राजकारण करणं हे तमिळनाडूमध्ये पूर्वी कधीही घडलेलं नाही. पण भाजप-छाप राजकीय संस्कृती रुजवण्यासाठी ही यात्रा उपयोगी होती.
धर्मांतर हाही एक संवेदनशील मुद्दा आहे.
अगदी अलिकडे तंजावरमध्ये ख्रिश्चन संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या अकरावीतील मुलीने आत्महत्या केली. तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव होता असा आरोप भाजपने केला. गदारोळ झाला. उलटसुलट पुरावे देण्यात आले. द्रमुकचं भक्कम वाटणारं सरकारदेखील दबावात आलं. उच्च न्यायालयानं प्रकरण सीबीआयकडे सोपवलं.
पालिका निवडणुकांमध्ये या प्रकरणाचा फायदा होईल असा भाजपचा होरा होता. पण तिथं धुव्वा उडाला. पण तरीही अशा प्रकरणात संशय निर्माण झाल्यानं आणि कोर्टामार्फत तपास सीबीआयकडे गेल्यानं भाजपची भूमिका बरोबर होती असा संदेश जायचा तो गेलाच. त्याचा पक्षाला दीर्घ कालात फायदा होईल.
पेरियारांना उखडून टाकण्यासाठी…..
भाजप हा फॅसिस्टांप्रमाणे अत्यंत बंदिस्त पक्ष, किंवा खऱं तर संघटनाच, आहे. आपल्या प्रेमाचे आणि विरोधाचे मुद्दे कोणते याबाबत या संघटनेत कमालीची स्पष्टता असते. त्यामुळे या मुद्द्यांबाबत पक्षाची प्रतिक्रिया ही कमालीची तात्काळ व उस्फूर्त असते.
बहुजन समाज पक्षानं उत्तर प्रदेशात १९९५ मध्ये भाजपच्या मदतीनं पहिल्यांदा सरकार स्थापन केलं. ते जून ते ऑक्टोबर असं चार महिने टिकलं. त्यावेळी पेरियार यांचा एक पुतळा लखनौमध्ये उभारण्याचं मायावतींनी जाहीर केलं. त्या निमित्तानं एक पेरियार मेळावाही घेतला जाणार होता. पण पेरियार यांचं नाव ऐकताच भाजपने फणा काढला. बसपला आपला बेत रद्द करावा लागला.
२००२ मध्ये मायावतींनी पुन्हा उचल खाल्ली. शंभर कोटी रुपये खर्चून लखनौच्या आंबेडकर उद्यानात पेरियार यांचा पुतळा उभारण्याची घोषणा झाली. केंद्रात आणि राज्यात खरं तर भाजपला तेव्हा मायावतींचा पाठिंबा हवा होता. तरीही पेरियार यांचा पुतळा झाल तर तात्काळ मायावती सरकार पडेल असा इशारा भाजप नेत्यांनी दिला. मायावतींनी २४ तासांमध्ये घूमजाव केलं.
सारांश असा की, ज्या काही व्यक्ती आणि विचारांबाबत भाजप लगेच प्रतिक्षिप्तपणे शिंगं उगारतो त्यात पेरियार प्रमुख आहेत. (दुसऱ्या बाजूला २००७ मध्ये भरघोस बहुमताचं सरकार येऊनही मायावतींना पेरियार यांचा मुद्दा लावून धरावासा वाटला नाही हे लक्षात घेण्यासारखं आहे.)
विरोधकांच्या गंडस्थळावर थेट हल्ला करणं ही भाजपची शैली आहे (नेहरु, गांधी इत्यादी). तमिळनाडूमध्ये हेच झालं. थोडेफार पाय रोवता येत आहेत असं दिसल्यावर त्यांनी पेरियार यांच्याच दाढीला हात घातला.
आजवर त्यांच्यावर कोणीही पक्ष वावगी टीका करू धजत नसे. संघ परिवाराने मात्र थेट बदनामी सुरू केली. जोती फुले किंवा बी.आर. आंबेडकर किंवा मोहनदास गांधी असा उल्लेख करावा तद्वत ते रामस्वामींचा उल्लेख इव्हीआर असा करतात. पेरियार ही आदरार्थी उपाधी वापरत नाहीत. त्यांच्याबाबतचा द्वेष पध्दतशीररीत्या वाढवत नेतात.
या द्वेषातूनच गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात पेरियार यांच्या पुतळ्यांची तोडफोड करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
(याच रीतीनं पुढच्या दहा-वीस वर्षात महाराष्ट्रात महात्मा फुले यांना हिंदू-विरोधी ठरवून त्यांच्या बदनामीची मोहिम सुरु होण्याची पूर्ण शक्यता आहे. कारण, त्यांनी हिंदू धर्माची केलेली चिकित्सा जोपर्यंत हयात व आदरणीय आहे तोपर्यंत भाजपच्या विरोधात ताकद उभी राहण्याची शक्यता उरतेच. परिक्षिताच्या अळीची गोष्ट भाजपच्या नेत्यांना तोंडपाठ असणारच.)
२०१८ मध्ये त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत मार्क्सवाद्यांचा पराभव करून भाजप सत्तेत आला. त्यानंतर तिथला लेनिनचा पुतळा पाडण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस एच. राजा यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. शिवाय, लेनिननंतर आता जातीयवादी पेरियार यांच्या पुतळेही उद्ध्वस्त करायला हवेत असं आवाहन त्यांनी फेसबुकवरून केलं.
लगेच वेल्लोरमध्ये पेरियारांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्यानंतर अवघ्या पंधऱा दिवसात पुडुकोट्टई जिल्ह्यात पेरियार यांच्या पुतळ्याचं शिर तोडण्यात आलं. केंद्रीय राखीव पोलिस दलातील हवालदारानं हे कृत्य केल्याचं निष्पन्न झालं.
राजा यांच्यावर काही कारवाई करणार का या प्रश्नावर गृहमंत्री अमित शहा यांनी थेटपणे काहीही नाही असा जबाब दिला होता. मग बरीच टीका झाली. त्यानंतर राजा यांनी, या कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो अशी मखलाशीयुक्त दिलगिरी फेसबुकवरून व्यक्त केली.
राजा चार्टर्ड अकौंटंट तसंच वकील आहेत. (त्यांचे वडिलही स्वयंसेवक होते.) लहानपणापासून ते संघ स्वयंसेवक होते. ते शिवराळ बोलण्याबद्दल कुप्रसिध्द आहेत. पेरियार आता असते तर त्यांना मी चपलेनं मारलं असतं असं ते एकदा म्हणाले होते. त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. बाकी मुस्लिम आणि ख्रिश्चनांबद्दल वाह्यात बोलणं हेही ते नेहमी करतात.
एकूण पेरियार यांच्याबद्दलचा विद्वेष वाढवत नेणे हे संघाशी संबंधित संघटनांचं स्पष्ट सूत्र दिसतं. कोईमतूर या भाजपचा प्रभाव असलेल्या शहरात पेरियार पुतळा विटंबनेचे प्रकार अधूनमधून घडत असतात. अगदी अलिकडे जानेवारी महिन्यातही हिंदू मुन्नानीच्या कार्यकर्त्यांनी असा प्रयत्न केला.
अगदी अलिकडचा म्हणजे फेब्रुवारीतला प्रकार आहे. एका टीव्ही शोमध्ये एका मुलाने पेरियार यांच्यासारखा पेहराव करून स्त्रियांच्या समानतेबाबत अत्यंत प्रभावी भाषण केलं. हा कार्यक्रम खूप गाजला. मुख्यमंत्री एम.के स्टालिन यांनीदेखील त्याची प्रशंसा केली. नंतर या शोमधल्या मुलांना बोलवून सत्कारही केला.
एसटीमधल्या एका चालकानं सोशल मिडियावरून यावर जाहीर टीका केली. अशा मुलांना जाहीर फाशी द्यायला हवी, जेणेकरून पुन्हा असं धाडस करायला कोणी धजावणार नाही असे तो म्हणाला. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. पेरियार यांच्याविरुध्द लोकांची माथी किती मथवली गेली आहेत हे यावरून लक्षात यावं.
सोपं नाही
अर्थात भाजपचा प्रचार सरसकट पचतो आहे असं नव्हे.
जग्गी वासुदेव नावाचे एक सदगुरु आहेत. अध्यात्म आणि राजकारणाच्या अंगणात ते सोईस्करपणे बागडत असतात. कोईमतूरला त्यांचा आश्रम आहे. इंग्रजीत बोलतात. योगा करतात. आयटीवाल्या तरुणांना ते भारी वाटतात. गेल्या वर्षी जानेवारीत त्यांनी तामिळनाडूतल्या मंदिरांच्या व्यवस्थापनांचा विषय काढला.
राज्यात हिंदू रिलिजिअस अँड चॅरिटेबल एन्डाउमेंट्स कायदा आहे. त्यानुसार सुमारे ३६ हजार मंदिरांचं व्यवस्थापन सरकारतर्फे केलं जातं. साहजिकच सरकार म्हटलं की होण्याच्या सर्व भानगडी तिथं होतात. गैरव्यवस्थापन, अस्वच्छता, चोऱ्या इत्यादी. सद्गुरुंनी मागणी केली की हे व्यवस्थापन लोकांच्या हाती सोपवण्यात यावं.
हे सरळ सरळ निवडणुकांचं राजकारण होतं. विषय पेटवायचा प्रयत्न होता. भाजपनंही याचा फायदा उचलला. त्या निमित्तानं द्रमुकला घेरण्याचा प्रयत्न केला. पण मतदारांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. द्रमुकनं देवळांच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलं. शिवाय मंदिरांचे हिशेब आणि मालकीच्या जमिनींचे रेकॉर्ड्स वेबसाईटवर टाकण्याचं जाहीर केलं. तशी कारवाई सुरुही केली.
सर्वात महत्वाचं म्हणजे, ही मंदिरं आणि त्यांची शेकडो कोटींची मालमत्ता सोपवायचीच झाली तर नेमकी कोणाकडे द्यायची असा कळीचा प्रश्न द्रमुकनं विचारला. ब्राह्मणांकडे की सदगुरु टाईप लोकांकडे असा त्यातला गर्भित उपप्रश्न होता. तो लोकांना बरोबर कळला.
सध्या हिंदुस्थानात इतरत्र देऊळ, मंदिर असे प्रश्न संवेदनशील झाले आहेत. त्यावरून फार पटकन वातावरण पेटवता येऊ शकतं. पण अशा प्रश्नाला तमिळनाडूमध्ये ( जो की देवळांचा प्रदेश मानला जातो) अजूनही सणसणीत सेक्यूलर उत्तर देता येऊ शकतं व लोकांना ते मान्य होतं हे स्टालिन यांच्या द्रमुकनं दाखवून दिलं.
यात आणखीही एक उपप्रकरण आहे.
१९७० च्या २६ जानेवारीला पेरियारांनी एक आंदोलन करण्याचं जाहीर केलं होतं. देवळांमधले पुजारी सर्व जातींचे असले पाहिजेत अशी त्यांची मागणी होती. तिला थेट विरोध करणं पूर्वीच्या जनसंघाला आणि आताच्या भाजपला शक्य नव्हतं. त्यामुळे विविध जातीय संघटनांमार्फत कोर्टबाजी करून खोडे घालण्यात आले.
द्रमुकचा या मागणीला पाठिंबा होता. त्यानुसार, करुणानिधींनी २००६ मध्ये तसा कायदा करण्याची संधी साधली. पण त्यांना तो अंमलात आणता आला नाही. गेल्या वर्षी स्टालिन यांनी सत्तेत येताच तो लागू केला व २४ बिगरब्राह्मण पुजाऱ्यांची नेमणूक केल्याचं जाहीर केलं. या पुजाऱ्यांना आवश्यक ते विधी शिकवणाऱ्या संस्था करुणानिधींच्या काळापासून सुरू आहेत.
राज्यभर या सर्वांचं स्वागत झालं.
म्हणजेच द्रवीड चळवळीतील काहीच शिल्लक राहिलेलं नाही असं नव्हे. लोक अजूनही ऐकायला तयार आहेत. द्रवीड पक्षांसाठी ही अनुकूल स्थिती आहे. त्यामुळेच तर ते अजूनही निवडणुका जिंकू शकत आहेत.
पण ही स्थिती पाहता पाहता बदलू शकते. काँग्रेस व डाव्यांनी याचा अनुभव घेतला आहे.
हा मंदिरांचाच विषय घ्या. त्यांच्या गैरव्यवस्थापनांबाबत अलिकडे वाढत्या संख्येनं याचिका दाखल होऊ लागल्या आहेत. किमान दोन याचिकांच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं सरकारवर टीका केली आहे. सदगुरुंसारखे भाजपचे ट्रोल वेळ येताच पुन्हा सक्रिय होणार आहेतच.
काँग्रेसविरुध्द असंतोष तापवायला अण्णा हजारे आंदोलनाचा जसा उपयोग करून घेतला तसं भविष्यात या विषयाचं होण्याची पुरेपूर शक्यता आहे.
किंबहुना, तमिळनाडूतील भाजप अशाच एखाद्या संधीची वाट पाहत आहे. ही संधी कोणत्याही कारणानं मिळू शकते. धर्मांतर, मंदिर, अमुकांची अस्मिता.. काहीही.
तमीळ भाषा व संस्कृतीची खिंड भाजपला कधीच ओलांडता येणार नाही हा एक भ्रम आहे. भाजप तिथं केव्हाच मौजूद आहे. पुढील पाच-दहा वर्षात तो त्या राज्यातला मोठा पक्ष बनला तरी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
असं जेव्हा होईल तेव्हा भाजपला आणखी एक राज्य मिळालं, इतकाच त्याचा अर्थ नसेल. तर त्याच्या हिंदुराष्ट्रासाठी तो सर्वात मोठा विजय असेल.
द्रवीड पक्ष कसे लढतात यावर बरंच काही अवलंबून आहे. हे पक्ष म्हणजे पेरियारांची संघटना नव्हेत. राजकारणातले सर्व गुणदोष त्यांना चिकटले आहेत. सर्व तडजोडी करून झाल्या आहेत. त्यामुळे ते एकदम शुदध क्रांतिकारी भूमिकेवरून लढू शकणार नाहीत हे स्पष्ट आहे. सामान्य तमीळ लोकांकडूनही फार सजगतेची अपेक्षा करता येणार नाही.
तरीही द्रमुक म्हणजे आम आदमी किंवा तृणमूल नव्हे. त्यामुळे आशेला जागा आहे.
यासाठीची मोठी लढाई अजून दूर आहे.
…. पण ती बहुदा फार लांब नाही.
…………समाप्त…………
2 Comments
अतिशय उत्तम, अभ्यासू आणि संतुलित लेखमाला…!
Amazingly eye-opening articles. A lesson for all those selling cultural identity politics in 21St century in the name of being ‘progressive’..
. It finally lands in the lap of RSS slowly but surely..