fbpx
राजकारण

हिंदूराष्ट्र विरुध्द तमिळनाडू – लढाई अजूनही दूर… पण फार लांब नाही – भाग १

भाग १  |  भाग २  |  भाग ३

जानेवारी ३०, कोईमतूर. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे सदस्य जी. रामकृष्णन बोलत होते. गोडसेवादी प्रवृत्तींविरुध्द लढण्याची शपथ घेऊया असे ते म्हणाले. त्यासरशी पोलिस आले. त्यांनी कार्यक्रम थांबवला. ते म्हणाले- गांधीजींच्या प्रतिमेला हार घालण्यापुरतीच कार्यक्रमाला परवानगी आहे. कार्यक्रमाच्या बॅनरवर गोडसेचा उल्लेख हिंदू माथेफिरू असा होता. तोही त्यांनी काढायला लावला. गोडसेने गांधींचा खून केला हे निर्विवाद आहे. यापुढे तसं म्हणायचं नाही का असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. पण पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडलाच.

तमिळनाडूमध्ये द्रवीड मुन्नेत्र कळघमचं सरकार आहे. कम्युनिस्ट पक्ष त्यांच्यासोबत आघाडीमध्ये आहे. राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष अण्णा द्रमुक आहे. दोन्ही द्रमुक द्रवीड चळवळीतून उगम पावलेले आहेत. द्रवीड चळवळीचा ब्राह्मणी हिंदू धर्माला विरोध होता. त्या विरोधातून एकेकाळी राम आणि इतर देवांच्या मूर्तींना चपलांचे हार घालून त्यांच्या मिरवणुका निघत. म्हणजे, एकेकाळी इथं साक्षात रामाच्या मूर्तीभंजनानेसुध्दा लोक दचकत नव्हते.

चौदा फेब्रुवारी. तमिळनाडूतील महापालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. चेन्नई महापालिकेत दोनशे वॉर्ड्स आहेत. आजतागायत भाजपला तिथं शिरकाव करता आला नव्हता. यंदा पहिल्यांदाच एक जागा मिळाली. उमा आनंदन असं भाजपच्या एकमेव विजयी उमेदवाराचं नाव आहे. उमा या नथूराम गोडसे याच्या समर्थक आहेत. त्या म्हणतात – महात्मा गांधींना खूप आधीच मारायला हवं होतं. त्यांनी देशांचं खूप नुकसान केलं. ख्रिश्चन आणि मुस्लिम हे दहशतवादी असतात असंही त्या म्हणतात. शिवाय, जातिव्यववस्था हा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे, त्यात गैर काही नाही असं त्यांना वाटतं. आपण ब्राह्मण आहोत याचा त्यांना अभिमान आहे. अशा या उमाबाईंच्या भाजपचा मतदार तमिळनाडूत तयार होऊ लागला आहे.

महाशिवरात्र. दक्षिणेतला महत्वाचा दिवस. चेन्नईच्या कपालीश्वर मंदिरात सरकारी खात्यातर्फे रात्रभराच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. उत्तर भारतात सर्रास सरकारतर्फेच हिंदू सण साजरे होतात. त्यात कोणाला काही खटकत नाही. पण तमिळनाडूमध्ये हा प्रकार नवीन आहे.

सध्याच्या द्रमुक सरकाराचा मित्र पक्ष असलेल्या व्हीसीकेनं (विधुतलाई चिरुतगळ कच्ची- liberation panther party) या महाशिवरात्रीला आक्षेप घेतला. व्हीसीकेचे प्रवक्ते म्हणाले – भाजप आणि संघ यांना खूष करण्यासाठी द्रमुक सरकार हे करीत आहे काय? भाजप ज्यांच्या सोबत आहे त्या अण्णा द्रमुकनं देखील सत्तेत असताना असा प्रकार केला नव्हता. पण स्टालिन यांच्या द्रमुक सरकारनं ही तक्रार कानाआड केली. कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला.

शंभर वर्षांपासूनचा विचार

द्रवीड चळवळीचा विचार तमिळनाडूमध्ये शंभरेक वर्षांपासून रुजलेला आहे. जस्टिस पार्टीची स्थापना नोव्हेंबर १९१६ मध्ये झाली. ब्राम्हणेतरांना सरकारात संख्येनुसार प्रतिनिधित्व मिळायला हवं, हा त्या पक्षाचा मूळ कार्यक्रम होता. १९४० च्या दशकात द्रवीड कळघम संघटनेची स्थापना झाली. पेरियार हे तिचे नेते. कार्यक्रम विस्तारला. उत्तर भारतीय हिंदू व हिंदी संस्कृती विरुध्द तमिळ संस्कृती अशी जालीम संकल्पना कळघमनं रुजवली. आर्य विरुध्द द्रवीड असं या लढाईचं नाव ठरलं.

देवळांमध्ये संस्कृतऐवजी तमीळमधून मंत्रपठण व्हावं असा आग्रह कळघमने धरला. आजही अनेक धर्मविधींमध्ये तमीळ मंत्र म्हटले जातात. १९३७ मध्ये राजाजींचं प्रांतिक सरकार निवडून आलं. राजाजी गांधीवादी आणि ब्राह्मण. त्यांनी शाळांमध्ये हिंदी सक्तीची करण्याचा नियम आणला. तो विरोधाचा मोठा मुद्दा झाला. तो सतत पेटता राहिला. तीस वर्षांनंतर अण्णादुराई मुख्यमंत्री झाले. त्यांनी त्रिभाषा सूत्र स्पष्टपणे फेटाळून लावलं. इंग्रजी आणि तमीळ या दोनच भाषा ठेवल्या.

उत्तर भारतात दसऱ्याच्या निमित्त रामलीला सादर होते. त्याला कळघमनं प्रत्युत्तर दिलं. रावणलीला साजरी केली जाऊ लागली. यामध्ये शेवटी राम, लक्ष्मण व सीता यांच्या प्रतिमा जाळण्याचा कार्यक्रम असे. कधी तो होई. बऱ्याचदा पोलिस हाणून पाडत. ऑगस्ट १९५६ पासून (म्हणजे बाबासाहेबांच्या धम्मचक्रप्रवर्तनाच्या केवळ दोन महिने आधी) पुढे १९७० च्या दशकापर्यंत अनेकदा अशी आंदोलनं झाली.

द्रवीड कळघम संघटनेच्या मुशीतून द्रवीड मुन्नेत्र कळघम तयार झाला. रामाची प्रतिमा जाळण्याला द्रमुकचा विरोध होता. आधी अण्णादुराई आणि नंतर करुणानिधी द्रमुकचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी कळघमच्या लोकांवर कायम कारवाई केली. पण कळघमला वेगळं मत मांडण्याचा अधिकार आहे असं ते प्रत्येक वेळी सांगत. कळघमच्या आंदोलनांचा त्यांना फायदाच झाला. उत्तर भारतीय आर्यांपेक्षा आपण द्रवीड वेगळे आहोत, ही जाणीव तमीळ समाजात मजबूत होत गेली.

या वातावरणामुळे देशभर बलिष्ठ असलेली काँग्रेस १९६७ मध्ये तमिळनाडूमधून उखडली गेली. ती आजतागायत आपल्या पायावर उभी राहू शकलेली नाही. (मराठी ब्राह्मणांचा विचारव्यूह आणि बनिया, मारवाडी इत्यादींचा पाठिंबा यावर आधारलेला जो एक पक्ष होता त्याला तर त्यावेळी आर्यदेखील थारा देत नव्हते. द्रवीडांचा तर प्रश्नच नाही.)

चिरेबंदीला तड
पण.. पण..

काळाच्या ओघात कोणत्याही चळवळीत काही फटी निर्माण होतात. तशा त्या द्रवीड चळवळीत झाल्या. या चळवळीभोवतीचं देशातलं पर्यावरणही बदलत गेलं. द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोहोंनीही कधी ना कधी आर्यांच्या त्या पक्षाचा हात पकडला. त्याला प्रतिष्ठा दिली. आता त्या पक्षाच्या हिंदुत्ववादाचा दाब जाणवेल असा वाढू लागलाय.

आरंभी उल्लेख केलेली तीन उदाहरणं त्याचीच निदर्शक आहेत.

अलिकडच्या महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकालही पाहण्यासारखे आहेत.

गेल्या वर्षी (एप्रिल २०२१) झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप अण्णा द्रमुकसोबत होता. पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकट्याने लढला. त्याला फार यश मिळालं नाही. पण प्रादेशिक पक्षांना त्यानं मागे टाकलं.

उदाहरणार्थ, पट्टली मक्कल कच्ची अर्थात पीएमके. वन्नियार या अल्पभूधारक शेतकरी जातीचं प्रतिनिधित्व हा पक्ष करतो. उत्तर तमिळनाडूमध्ये तो बलवान मानला जातो. एकेकाळी, म्हणजे २०१६ मध्ये, विधानसभा जिंकून आपला मुख्यमंत्री बसवण्याची भाषा तो करीत होता. त्या पक्षाचे नेते अंबुमणी रामदास यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला जात होता.

गेल्या वर्षी अति-मागासांच्या (मोस्ट बॅकवर्ड) एकूण वीस टक्के आरक्षणामधील साडेदहा टक्के केवळ वन्नियारांसाठी राखून ठेवण्याची दुरुस्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकांच्या ऐन तोंडावर हा निर्णय घेण्यात आला. त्यामागे पीएमकेला खूष करणं हा तेव्हाच्या अण्णा द्रमुक सरकारचा हेतू होता. नंतर द्रमुकच्या स्टॅलिन सरकारनंही ही दुरुस्ती कायम ठेवली. पण उच्च न्यायालयानं ती फेटाळली.

अशा या पीएमकेचा कालच्या पालिका निवडणुकीमध्ये सफाया झाला. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये मिळून पीएमकेचे अवघे पाच नगरसेवक निवडून आले. याउलट भाजपचे मात्र बावीस जण जिंकले. शशिकला यांचा भाचा दिनकरन यांचा एएमएमके, वायकोंचा एमडीएमके हे पक्ष तर कितीतरी मागे राहिले.

राज्याच्या मानाने बावीस या फार जागा नाहीत. शिवाय, यातील निम्म्याअधिक कन्याकुमारी जिल्ह्यातल्याच आहेत. कन्याकुमारीमध्ये भाजपचा अनेक वर्षांपासून प्रभाव आहे. (२०१४ मध्ये तिथं त्यांचा खासदार निवडून आला होता.) पण भाजपसाठी इथली एकेक जागा जिंकणं म्हणजे शत्रुला कमकुवत करण्यासारखं आहे. कारण, त्याच्या दृष्टीनं, तमिळनाडू हा हिंदुत्वाला आतून खिंडार पाडू शकणारा शत्रूप्रदेश आहे. ही धोक्याची घंटा आहे असंच द्रवीड पक्षांनाही वाटतं. कारण, भाजपकडे केंद्रात व बहुसंख्य राज्यात राक्षसी सत्ता आहे. साधनसंपत्ती आणि त्यातून येणारी मिजास आहे.

परिणामी, तमिळनाडूमध्ये पुढील दोन्ही विधानं एकाच वेळी खरी आहेत. एक- भाजप तिथं अद्यापही फार वाढू शकलेला नाही. आणि दोन – तिथं हिंदुत्ववादाचा जोर वाढतो आहे.

करुणानिधी आणि एम. जी. आर.
करुणानिधी आणि एम. जी. आर.

कम्युनिस्टांचा पाडाव.. द्रविडांचा टिकाव..

ब्रिटीश राजवटीचे जे पहिले पडाव होते त्यात कलकत्ता आणि मद्रास ही दोन शहरे महत्वपूर्ण होती. बंगालमध्ये आधुनिक राजकारणाचा पाया घातला गेला. नवीन शिक्षणपध्दती, विविध प्रश्नांची सार्वजनिक चर्चा, समाजसुधारणांचा आग्रह, वृत्तपत्रं इत्यादी या राजकारणाचे घटक होते. पुढे बंगाल हा उद्योग व व्यापाराचं केंद्र बनला. मद्रास प्रांतात या गोष्टी काहीशा नंतर सुरू झाल्या.

स्वातंत्र्यानंतर बंगालमध्ये आधुनिक राजकारणाचा विकासक्रम अशा रीतीनं पुढं गेला की, तिथं डाव्यांचं प्रभुत्व प्रस्थापित झालं. लोककारणाला आणि राजकारणाला डाव्यांनी व्यापून टाकलं. १९७७ ते २००६ या काळात डाव्या आघाडीनं सलग सात विधानसभा निवडणुका जिंकल्या. बहुपक्षीय संसदीय लोकशाहीच्या आखाड्यात कम्युनिस्टांनी मिळवलेलं हे यश हा जागतिक विक्रम होता. आगामी काळात तो मोडला जाण्याची शक्यता खूपच कमी आहे.

तमिळनाडूमध्ये राजकारणाच्या विकासक्रमाचं नेतृत्व द्रविडी चळवळीनं आपल्याकडे खेचून घेतलं. मध्यम व मागास जाती केंद्रस्थानी आल्या. द्रवीड कळघम संघटनेतून बाहेर पडून द्रवीड मुन्नेत्र कळघम स्थापन झाला (१९४९). त्यानंतर अठरा वर्षात म्हणजे १९६७ मध्ये त्याला अभूतपूर्व यश मिळालं. स्वातंत्र्यानंतर देशात कोणत्याही राज्यात एकहाती सत्ता मिळवणारा पहिला काँग्रेसेतर पक्ष म्हणून इतिहासात त्याची नोंद झाली. (१९६७ मध्येच बंगालमध्ये डावे पक्ष काँग्रेससह संयुक्तरीत्या सत्तेत आले आणि नंतर दहा वर्षांनी म्हणजे १९७७ मध्ये त्यांना एकहाती विजय मिळवता आला.)

कम्युनिस्ट व द्रवीड चळवळ या दोघांचा मुख्य शत्रू त्या काळात काँग्रेस हाच होता. आंतरराष्ट्रीय डाव्या चळवळीशी आपलं नातं आहे आणि आपण वर्गीय राजकारण करीत आहोत यावर कम्युनिस्टांची श्रध्दा होती. त्यांच्या लेखी काँग्रेस ही भांडवलदारी हितसंबंधांची बटीक होती. याउलट द्रवीड राजकारण हे पूर्णपणे देशी होतं. ब्राह्मणेतर चळवळीचा आविष्कार होतं. चळवळीच्या लेखी काँग्रेस ही उत्तर भारतीय (आर्य), ब्राह्मणवादी संस्कृतीचं प्रतीक होती.

गेल्या वर्षी म्हणजे २०२१मध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला. डाव्या पक्षांचा पूर्ण सफाया झाला. त्यांना एकही जागा मिळवता आली नाही.

या राज्यात डाव्यांनी कारभारात लोक-कैवाराची जी काय मूल्यं रुजवली असतील ती किती टिकून आहेत याचं विश्लेषण कोण्या जाणत्या माणसानंच करायला हवं. पण सकृत दर्शनी तरी तिथं डाव्यांची कोणतीही चौकट उभी दिसत नाही. थोडाफार सेक्युलर ढाचा तिथं असावा. पण त्याचा फायदा तृणमूल या अत्यंत व्यक्तिकेंद्रित पक्षाला झाला आहे. भाजपला तिथं ३८ टक्के मतं आणि ७७ जागा मिळाल्या आहेत. यामुळे सेक्युलर ढाचा कसा डळमळला आहे याचा अंदाज येतो. नजीकच्या काळात डावे पुन्हा तिथं उभारी घेऊ शकतील अशी शक्यता नाही.

याउलट, तमिळनाडूमध्ये आजतागायत द्रवीड चळवळीशी नातं सांगणारे पक्ष आळीपाळीने पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. गेल्या वर्षी, भाजपसोबत युती करणाऱ्या अण्णा द्रमुकला सत्ता गमवावी लागली व या चळवळीशी अधिक घनिष्ट नातं सांगणारा द्रवीड मुन्नेत्र कळघम हा सत्तेत आला.

बंगालात पूर्वीच्या सत्तारुढ व अलिकडच्या प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या डाव्यांची जागा भाजपने घ्यावी आणि तमिळनाडूमध्ये मात्र भाजपला द्रवीड पक्षांनी अजूनही मुख्य आखाड्यात घुसू देऊ नये हे सूचक आहे. (केरळमध्येही या दोन राज्यांच्या जोडीनेच निवडणुका झाल्या. डावे पुन्हा सत्तेत आले. तिथं डावे व काँग्रेस यांनी भाजपला अजून तरी शिरकाव करू दिलेला नाही. त्याचं विश्लेषण स्वतंत्रपणे करायला हवं. तो आपला सध्याचा विषय नाही.)

संघ आणि भाजप यांचं पुढचं उदिदष्ट दक्षिण भारत जिंकणं हे आहे. (पाहा- राईट अँगलमधील पूर्वीचा लेख – चार जानेवारी २०२२) तेलंगणात त्याची ताकद किरकोळ आहे. तरीही तोच मुख्य विरोधी पक्ष असल्याची हवा तयार केली गेली आहे. कर्नाटक त्यांच्याकडे आहेच. आंध्रात खटपट चालू आहे. सुनील देवधरांसारखे संघाचे लोक तिथं तैनात आहेत. (या देवधरांच्या पायगुणानं त्रिपुरात सत्ता आली असं भाजपमध्ये मानलं जातं.) केरळमधला काँग्रेसचा प्रभाव कमी करून त्या पोकळीत घुसण्याचा त्याचा इरादा स्पष्ट आहे.

पण, भाजपला खरा सलतो आहे तो तमिळनाडू. कारण, आर्य विरुध्द द्रवीड ही सणसणीत पाचर आहे. तिच्यामुळे हिंदुत्वाच्या राजकारणाला आतून छेद जाऊ शकतो.

पेरियार आणि करुणानिधी
पेरियार आणि करुणानिधी

पेरियारांनी उभारलेली इमारत

द्रवीड चळवळीची इमारत उभारली ती पेरियार इ.व्ही. रामस्वामी नायकर यांनी. महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीत शोभावेत असे ते बलदंड क्रांतिकारक होते. पण दुर्दैवानं महाराष्ट्रात त्यांचं नाव कमी घेतलं जातं.

त्यांचा जन्म १८७९चा इरोड इथला. ( त्यांच्या नावातील इ म्हणजे इरोड आणि व्ही म्हणजे वडिलांचं नाव वेंकटप्पा) इरोड हे कावेरी नदीच्या तीरावरचं शहर. हळद, कापूस, ऊस अशा नगदी पिकांचा हा परिसर आहे. पूर्वापार इरोडचा हळद बाजार हा देशभरात प्रसिध्द आहे. याखेरीज सूत आणि कापड उद्योगही अनेक वर्षांपासून चालतो.

एकेकाळी इरोड कोईमतूर जिल्ह्याचा भाग होता. मग विभाजन झालं. १८७१ मध्ये, म्हणजे १४० वर्षांपूर्वी, इथं नगरपरिषद स्थापन झाली होती. पेरियार यांचे वडील श्रीमंत व्यापारी होते. पुढारीपण घरात होतंच. १९११ मध्ये इरोड नागरी सहकारी बँकेची स्थापना पेरियार यांच्या घरात झाली होती. आजही ती अत्यंत अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते.

त्यांचं कुटुंब हे कर्मठ वैष्णव. घरी सतत संत-महंतांचं येणंजाणं होतं. पण पेरियार लहानपणापासून बंडखोर होते. वडिलांशी भांडण झालं. पंचविसाव्या वर्षी कुटुंबाचा त्याग करून ते फिरू लागले. वाराणसीला गेले.

तिथं एकदा हे जातीनं ब्राह्मण नाहीत हे उघड झाल्यानं अन्नछत्रामधून यांना हाकललं. बाहेर येऊन पाहतात तर ज्या इमारतीत ते अन्नछत्र होतं ती द्रवीड व्यापाऱ्यांनी म्हणजे त्यांच्याच कोणी भाईबंदांनी बांधलेली होती. हे पाहून त्यांच्या डोक्यात तिडिक गेली. आर्य आणि ब्राम्हणी संस्कृती आणि त्यातून निर्माण होणारी अस्पृश्यता व जातिभेद यांचे ते कडवे विरोधक बनले.

नंतर ते इरोडला परतले. प्रतिष्ठित व्यापारी झाले. १९१८ मध्ये इरोड नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले. राजाजींशी मैत्री झाली. त्यांच्या आग्रहावरून ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. नगरपरिषदेचा राजीनामा दिला आणि गांधीजींच्या असहकारिता चळवळीत तुरुंगात गेले.

गांधीजी त्यांच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांची बहिण व पत्नी यांनी समाजातील दारुच्या व्यसनाकडे लक्ष वेधलं. असं म्हणतात की, गांधीजींनी दारुबंदी चळवळ सुरू केली ती या दोघींशी झालेल्या बोलण्यामुळेच. पेरियार देखील या चळवळीत सहभागी होते.

वायकोम सत्याग्रह ते द्रवीड देशाची मागणी

पण जातींच्या प्रश्नावरून काँग्रेसमध्ये त्यांचं भांडण सुरू झालं. ब्राह्मणेतरांना शिक्षण व नोकरी यांमध्ये ठराविक राखीव जागा मिळायलाच हव्यात ही जस्टिस पक्षाची मागणी होती. पेरियारांनी ती उचलून धरली. १९२० पासून त्यांनी सातत्यानं काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये तसे ठराव मांडले. पण काँग्रेसमधील ब्राह्मण नेत्यांनी ओळीनं पाच वर्षं असे ठराव हाणून पाडले.

त्याच दरम्यान केरळमधील वायकोम सत्याग्रहाचं यशस्वी नेतृत्व केलं. तुरुंगवास भोगला. दलितांना मंदिराजवळच्या रस्ते खुले झाले. मनुस्मृती किंवा रामायणासारखे ग्रंथ हे ब्राह्मणी मूल्यांचा पुरस्कार करणारे असून ते जाळून टाकले पाहिजेत हे तेव्हाच म्हणू लागले.

वायकोम सत्याग्रहादरम्यान गांधीजींशीही त्यांचे मतभेद झाले. अखेर १९२५ मध्ये काँग्रेस सोडून त्यांनी सेल्फ रिस्पेक्ट अर्थात स्वाभिमानी चळवळीची सुरूवात केली. ब्रिटिशांपेक्षाही ब्राह्मणशाही किंवा ब्राह्मणोक्रसीचा धोका अधिक आहे अशी भूमिका घेतली.

(एक वेधक बाब. महाराष्ट्रातील ब्राम्हणेतर चळवळ, आंबेडकरांचा संघर्ष आणि पेरियार यांचा प्रवास कमालीचा समांतर जाणारा आहे. पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याची मागणी केशवराव जेधे यांनी १९२५ मध्ये केली होती. त्यानंतर ब्राम्हण-ब्राम्हणेतरांचा संघर्ष अधिक पेटला. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली तीही त्याच दरम्यान म्हणजे १९२७ मध्ये.)

तिथून पुढे जवळपास पन्नास वर्षं पेरियार यांनी ब्राम्हणशाही या शत्रुविरोधात सातत्याने लढाई केली. त्यासाठी त्यांनी वादग्रस्त म्हणता येतील अशा भूमिका घेतल्या. ब्रिटिश जाऊन येणारं राज्य आर्य-बनिया- हिंदूंचं असेल असा दावा केला. स्वतंत्र द्रवीड देशाची मागणी केली. १५ ऑगस्ट १९४७ काळा दिवस म्हणून पाळला. हे स्वातंत्र्य खरं नाही अशी भूमिका घेतली. १९५० च्या दशकात राज्यघटना जाळण्याचं आंदोलन केलं. उच्च न्यायालयांमध्ये ब्राह्मणी दृष्टिकोन ठेऊन निकालपत्र दिली जात असल्याचे आरोप केले. त्याबद्दल शिक्षा सहन केल्या.

मागास जातींच्या आरक्षणाच्या हक्काबाबत ते कायम जागृत होते. शिवाय, आत्मसन्मान मिळवण्यासाठी दलित हे इस्लाम वा ख्रिश्चन धर्म स्वीकारत असतील तर ते रास्तच आहे असं मत त्यांनी मांडलं.

त्यांची लढाई एककलमी नव्हती. सर्वस्पर्शी होती. स्त्रियांच्या हक्कांसाठीही ते झगडले. कुटुंबाचा विरोध पत्करून त्यांनी स्वतःच्या विधवा बहिणीचा पुनर्विवाह लावून दिला होता. स्त्रियांना मालमत्तेत हक्क मिळाला पाहिजे इथपासून ते अगदी विवाहित स्त्रिया जर त्यांना आवडलेल्या परपुरुषाकडे जात असतील तर तो गुन्हा समजता कामा नये इथपर्यंत अनेक प्रागतिक भूमिका त्यांनी घेतल्या.

पेरियार यांच्या विचारांची समीक्षा करता येऊ शकते. तशी ती केली जातेही. काही प्रसंगीच्या त्यांच्या अतिरेकी भूमिकांवर टीका करता येऊ शकते. खुद्द पेरियार यांचाही त्याला विरोध नव्हता. अनेकदा आपल्या नियतकालिकांमधून त्यांनी विरोधकांचे लेख छापले.

देव, देश अन् धर्मापायी….

ते तरुणपणापासून निरीश्वरवादी व इहवादी होते. उत्तरकाळात तर धर्म नष्टच करायला हवा अशी त्यांची धारणा होत गेली. “देवाची पूजा करणं हे रानटीपणाचं लक्षण आहे आणि देवाचा प्रचार करणारे हरामखोर आहेत,” किंवा, “धार्मिक माणूस हा पाण्यात वाहणाऱ्या ओंडक्यासारखा असतो (म्हणजेच त्याला स्वतःचं मत नसतं, तो प्रवाहपतितासारखा कशालाही बळी पडत जातो.) तो कधीही बुध्दिवादी असू शकत नाही” अशी त्यांची प्रसिध्द वक्तव्यं आहेत.

१९७३ मध्ये वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या सुमारे वर्षभर आधीचं एक भाषण प्रसिध्द आहे. त्यात ते म्हणाले होते – देव, धर्म, शास्त्र आणि ब्राम्हण्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत जातीव्यवस्था राहणारच. म्हणजेच जाती नष्ट करायच्या तर प्रथम या चार गोष्टी नष्ट कराव्या लागतील.

ब्राह्मण्यावर प्रहार करण्यात त्यांनी जे सातत्य व जो त्वेष दाखवला तो असाधारण होता. त्याबाबत त्यांची स्पष्टता शेवटपर्यंत ढळली नाही. भाषेच्या बंधनांमुळे त्यांचं काम तमिळनाडूपुरतंच मर्यादित राहिलं. पण झालं ते काम चोख झालं. जातिरचनेतील कनिष्ठ स्तरांमध्ये स्वाभिमानाची तीव्र जाणीव निर्माण झाली.

आपण वर बंगाल व तामिळनाडूची तुलना केली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाषा व संस्कृती यांचा तीव्र अभिमान आहे. पण बंगालमध्ये या अभिमानावर भद्र किंवा ब्राह्मणी छाप आहे. पेरियारांमुळे तमिळमध्ये ही छाप स्पष्टपणे अब्राह्मणी (किंवा खरं तर ओबीसींची) आहे. तीच छाप तिथल्या राजकारणावरही आहे.

त्यामुळेच या राज्यातील दोन मुख्य् आणि इतर अनेक छोटे पक्ष यांचं कुळ पेरियारांशी जाऊन मिळतं. पेरियारांना डावलून, अजून तरी, तमीळ राजकारण होऊ शकत नाही.

संस्कृती आणि स्वावलंबन

जाता जाता दोन निरीक्षणं नोंदवायला हवीत. बंगाल आणि महाराष्ट्र या दोन्ही प्रांतातील उद्योग हे मुख्यतः मारवाडी, गुजराती इत्यादींच्या भांडवलावर उभे राहिले आहेत. याउलट, तमिळनाडूमध्ये उद्योगांमध्ये लक्षणीय संख्येनं स्थानिक लोक आहेत. मारवाडी व इतरही आहेत. पण तुलनेनं कमी.

तिरुपूरमधून वर्षाला सुमारे ३० हजार कोटींची होजियरी व कापड निर्यात होते. यातले बहुसंख्य उद्योग तमिळींच्या हातात आहेत. गौंडर जातीचं यात वर्चस्व आहे. किंबहुना, गौंडर हे मारवाड्यांप्रमाणे एकमेकांच्या मदतीने उद्योगात पुढे सरकणारे अशी त्यांची ओळख आहे. शिवकाशीचा फटाके उद्योग, आयटी (नाडार), वित्त, बँकिंग, इंजिनिअरिंग, सिमेंट (चेट्टियार) अशी अन्य अनेक उदाहरणं आहेत.

घाऊक व किरकोळ व्यापार मारवाड-जैनांच्या वा गुजरात्यांच्या हातात आहे ही गोष्ट मात्र खरी. धान्य, कपड्यापासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सर्वत्र ते दिसतात. आता तर ते रियल इस्टेट व इतर क्षेत्रात घुसू लागले आहेत. पण सर्व आर्थिक नाड्या त्यांच्याच हातात आहेत असं नाही.

दुसरं निरीक्षण म्हणजे तमिळनाडूतील वृत्तपत्रे (थंटी, दिनमलार, दिनमणि, हिंदू), टीव्ही चॅनेल्स (सन, जया, थंटी) व सिनेमा उद्योग हा बहुतांश तमिळींच्याच मालकीचा आहे. म्हणजे तिथली माध्यम व्यवस्था ही तमिळींच्या अखत्यारीत आहे. महाराष्ट्रात ती बहुतांश मारवाडी व गुजरात्यांच्याच हातात आहे.

त्यामुळे तिथले भाषा व संस्कृतीचे आग्रह हे अधिक अस्सल असतात. (महाराष्ट्रात ते श्रावणी कथेतल्या गरीब ब्राह्मणांच्या याचनेसारखे वाटतात.)

पी. वरदराजुलू नायडू आणि पेरियार
पी. वरदराजुलू नायडू आणि पेरियार

भाजपच्या शिड्या आणि माड्या

भाजपची झटापट आज नजरेत भरते. कारण, तो पक्ष थोड्याबहुत जागा मिळवतोय. पण हिंदुत्ववाद्यांची खटपट पूर्वापारपासून चालू आहे.

पी. वरदराजुलू नायडू यांना दक्षिणेचे बाळ गंगाधर टिळक म्हटले जाई. कारण, त्यांनी काढलेल्या विविध वृत्तपत्रातील लेखांमुळे त्यांच्याविरुध्द राजद्रोहाचे खटले होऊन त्यांना शिक्षा झाली होती. १९३२ मध्ये इंडियन एक्स्प्रेसची स्थापनाही त्यांनीच केली. गोएंकानी नंतर तो त्यांच्याकडून घेतला.

नायडू आणि पेरियार हे समवयस्क व जुने मित्र होते. किंबहुना पेरियार यांना काँग्रेसमध्ये आणण्यात त्यांचाही वाटा होता. चेर्नमादेवी इथं काँग्रेसचे तत्कालिन (ब्राम्हण) पुढारी व्हीव्हीएस अय्यर एक वसतिगृह चालवत. तिथं ब्राह्मण व ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना जेवण्यासाठी वेगवेगळं बसवलं जाई. त्याविरुध्द आवाज उठवण्यात पेरियार आणि नायडू एकत्र होते. इतरही बाबतीत त्यांची मतं जुळत होती. पण पेरियारांच्या स्वाभिमानी चळवळीमुळे त्यांचे मार्ग वेगळे झाले.

हिंदू महासभा, संघ…

नायडू हे दुसऱ्या महायुध्दाच्या काळात म्हणजे १९३९ मध्ये हिंदू महासभेचे सचिव व उपाध्यक्ष झाले. (पुढे ते काँग्रेसमध्ये परतले व आमदारही झाले. कामराज हे नाडार समाजाचे पुढारी मुख्यमंत्री होण्यात त्यांचा मोठा वाटा होता.)

नायडू हे मुळातले गांधीवादी. पण ते काही काळ का होईना सावरकरांसारख्यांच्या आहारी गेले. त्यामुळे हिंदुत्ववादाला प्रतिष्ठा मिळाली. नायडू यांनीच पुढाकार घेऊन १९४४ मध्ये पेरियार यांची हिंदू महासभेचे पुढारी बा.शि. मुंजे यांच्याशी भेट घडवून आणली. (हे तेच मुंजे जे मुसोलिनीला भेटले होते.) जिनांच्या विरोधात सर्वजातीय हिंदूंचं ऐक्य करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा तो एक भाग होता. पेरियार यांनी अर्थातच त्याला धूप घातली नाही.

नायडू यांच्या निमित्तानं महाराष्ट्रातील ग.वि.केतकरांची आठवण होणे अपरिहार्य आहे. हे लोकमान्य टिळकांचे नातू. गांधीवादी. पण त्यांचे संघ आणि हिंदू महासभा यांच्याशीही संबंध होते. गांधीहत्येनंतर संघावरील बंदी उठवण्यासाठी त्यांनी गोळवलकरांच्या वतीने पटेलांकडे रदबदली केली होती. अशाच अनेक गांधीवादी काँग्रेसवाल्यांनी ठिकठिकाणी हिंदुत्ववादासाठी रस्ता साफसूफ करून दिलेला दिसतो.

स्वातंत्र्यपूर्व काळात बराच काळ काँग्रेसवर अय्यर, अय्यंगार ब्राम्हणांचं वर्चस्व होतं. राजाजी हे त्यातले प्रमुख. सरकारी प्रशासन, न्यायव्यवस्था आणि शिक्षण यांच्यातही त्यांचाच वरचष्मा होता. त्या काळात पेरियार यांच्या चळवळींनी जसजसे ब्राम्हणांना मागे रेटले तसा त्यांना आपल्या पंखाखाली घेण्याचा प्रयत्न हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोहोंनीही केला.

पेरियार हयात असेपर्यंत तमिळनाडूमध्ये हिंदुत्ववाद्यांचा प्रभाव किरकोळ राहिलेला दिसतो. पण नंतर विविध कारणांनी तो वाढत गेला.

मीनाक्षीपुरम धर्मांतर प्रकरणाने त्याला मोठी चालना मिळाली.

तिरुनेलवल्ली जिल्ह्यातील मीनाक्षीपुरम खेड्यातील सुमारे आठशे दलितांनी फेब्रुवारी १९८१ मध्ये मुस्लिम धर्म स्वीकारला. अस्पृश्यतेची वागणूक मिळत असल्यानं आत्मसन्मानासाठी त्यांनी हे पाऊल उचललं. यानं तामिळनाडूच नव्हे तर देश हादरला. अरब देशांनी पैशाचं आमिष दाखवून अशी धर्मांतरं सुरू केल्याची बोंब सुरू झाली. प्रत्यक्षात या धर्मांतराच्या कार्यक्रमासाठी या दलितांनीच पदरचे ४१ हजार रुपये खर्च केले होते असं सरकारी चौकशीत निष्पन्न झालं.

हिंदू मुन्नानी चे संस्थापक राजगोपाळन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव दत्तात्रेय होसबळे
हिंदू मुन्नानी चे संस्थापक राजगोपाळन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव दत्तात्रेय होसबळे

हिंदू मुन्नानीची स्थापना

तरीही हिंदू धर्म धोक्यात असा प्रचार भरपूर झाला. अटलबिहारी वाजपेयी व अडवानी येऊन गेले. राष्ट्रीय प्रसिध्दी झाली. दुसरीकडे, थेवर, वन्नियार, गोंडार अशासारख्या मध्यम वा मागास जाती वाईट वागणूक देत असल्यानेच दलित धर्मांतर करीत असल्याची टीका सुरू झाली. यामुळे ध्रुवीकरण झालं. या जातींचे काही गट हिंदुत्ववाद्यांच्या आश्रयाला गेले. त्यातूनच हिंदू तमीळ मुन्नानीची स्थापना झाली.

रामगोपालन नावाच्या नेत्यांनी ही स्थापना केली. अलिकडचे कोरोनानं त्यांचं निधन झालं. १९४५ सालापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. भाजपचे एल. गणेशन, राधाकृष्णन हे राष्ट्रीय पातळीवर गेलेले नेते हे त्यांचे शिष्य.

रामगोपालन यांचे सहकारी होते एकेकाळचे गांधीवादी आणि काँग्रेसचे माजी खासदार थनुलिंगम नाडार. नंतर ते हिंदू मुन्नानीचे प्रदेशाध्यक्ष झाले. ख्रिश्चन धर्मांतरितांविरुध्द दंगली घडवण्यात मुन्नानीचा पुढाकार असल्याचा आरोप होतो.

नाडार, मच्छिमार किंवा दलित जातींमध्ये ख्रिश्चन धर्मांतराचं प्रमाण लक्षणीय आहे. त्याविरुध्द काही प्रमाणात असंतोष आहे. कन्याकुमारी परिसरात तो जाणवतो. हिंदू मुन्नानीने तिथं मुद्दाम जोरात विनायक चतुर्थी साजरी करणे, रस्त्यात मांडव घालणे असे प्रकार केले आहेत. त्यावरून दंगे होऊन माणसे मेली आहेत.

शिवसेनेची पहिली घोषणा बजाव पुंगी हटाव लुंगी होती. थनुलिंगम नाडार यांनी बाळ ठाकरे यांना आवाहन केलं की, आम्ही ख्रिश्चनांविरुध्द लढतो आहोत. तेव्हा आम्हाला साथ द्या. आपण सर्व हिंदूच आहोत, असंही ते म्हणाले. ठाकऱ्यांचं धोरण यानंतर बदललं, असं हिंदू मुन्नानीच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे.

हे खरंच असं घडलं का हे सांगणं कठीण आहे. पण शिवसेनेनं त्याच दरम्यान “मद्रासी अण्णांविरुध्दची” मोहीम बंद केली हे मात्र खरं.

रामगोपालन यांनी महाराष्ट्राच्या धर्तीवर तमिळनाडूत गणेशोत्सव सुरू केला. गणपती विसर्जनाच्या मोठमोठ्या मिरवणुका सुरू झाल्या. त्यातून दंगेही सुरु झाले. रामगोपालन यांना त्यांचे समर्थक तामिळनाडूचे टिळक म्हणतात.

१९५३ मध्ये पेरियारांनी गणपतीची प्रतिमा तोडण्याचं एक आंदोलन केलं होतं. हिंदूमध्ये सर्व कार्यांची सुरुवात गणपतीच्या पूजेनं होते. त्यामुळे देवांच्या प्रतिमा तोडण्याच्या आंदोलनाचा प्रारंभ आपण गणपतीपासूनच करत आहोत असं त्यांचं स्पष्टीकरण होतं. त्यांच्या निधनानंतर दहा वर्षांनी चक्र उलटं झालं. विनायक चतुर्थीचा सण साजरा करण्याने जोर पकडला. याला तेव्हाच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा सक्रिय पाठिंबा होता. रामगोपालन हे त्यांचे कट्टर समर्थक बनले. त्यावरून पुढे मुन्नानीमध्ये फूट पडली.

त्यातूनच हिंदू मक्कल कच्ची या संघटनेची स्थापना झाली. मुन्नानीला मवाळ ठरवून कच्चीनं अधिकाधिक भडक भूमिका घ्यायची असं धोरण आखण्यात आलं. विश्व हिंदू परिषदेतून बजरंग दलाची निर्मिती व्हावी तसा हा प्रकार होता. हिंदू मक्कल कच्ची ही हिंदूंच्या भावना दुखावल्यावरून सतत आंदोलनं करीत असते. नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेशी संबंध ठेवण्यावरून त्यांच्यावरही या कच्चीनं टीका केली होती.

मुस्लिम संघटनांची पेटवापेटवी

या हिंदू संघटनांना प्रत्युत्तर म्हणून अल उम्मा स्थापन झाली. ही भयंकर धर्मांध व हिंसक होती. सय्यद अहमद बाशा हा लाकडाचा व्यापारी तिचा नेता होता. कोईमतूरमध्ये तणाव निर्माण करण्यात ती आघाडीवर होती. मुस्लिम इलाख्यातील लोकांनी महापालिकेचे कर देऊ नयेत अशी छुपी मोहीम यांनी चालवली. शिवाय, व्यापाऱ्यांनी आपसातील वादविवाद कोर्टाकडे न नेता संघटनेच्या कांगारू कोर्टाकडे आणावेत असा आदेश निघाला.

हिंदू संघटनांच्या नेत्यांची पोस्टर्स झळकवून त्यांना आपण ठार मारणार असे हे उघडपणे जाहीर करत. तशा काही हत्या झाल्याही आहेत. किंबहुना, दोन्ही धर्मांच्या या संघटनांनी गेल्या काही वर्षात परस्परांच्या अनेक कार्यकर्त्यांना ठार मारले आहे.

देशात बाबरी मशि‍दीवरून भाजपनं याच काळात आंदोलन पेटवलं होतं. १९९२ ला मशीद पाडली गेल्यावर तमिळनाडूतही पेटवापेटवीचा प्रयत्न झाला. १९९३ मध्ये चेन्नईतल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोट प्रकरणात हात असल्याच्या संशयावरून पलानीबाबा या वादग्रस्त मुस्लिम नेत्याची नंतर संघाच्या कार्यकर्त्यांनी क्रूरपणे हत्या केली.

नोव्हेंबर १९९७ मध्ये कोईमतूर इथं भीषण दंगल झाली. यात १८ मुस्लिम मारले गेले. एक पोलिस हवालदार मारल्याचं निमित्त होऊन ही दंगल भडकली. पोलिसांनी वेचून वेचून मुस्लिमांना मारलं व त्यांची दुकानं फोडून टाकली.

त्याचा कथित सूड घेण्यासाठी फेब्रुवारी १९९८ मध्ये कोईमतूरमध्ये साखळी बाँबस्फोट घडवण्यात आले. त्यात माणसे ५८ जण मारले गेले. अल उम्माहशी संबंधित मुस्लिम नेत्यांचा याच्याशी संबंध होता. त्या प्रकरणात अनेकांना शिक्षा झाल्या. पुढे सुमारे दोन वर्ष पूर्ण तमिळनाडूमध्ये छोटे-छोटे बाँबस्फोट होत राहिले.

भाजपला निवडणुकीत फायदा व्हावा अशा रीतीनं हे सर्व घडलं. जयललितांनी काँग्रेससोबतची युती तोडून भाजपला सोबत घेतलं. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे तमिळनाडूत तीन खासदार विजयी झाले. जयललितांचा पाठिंबा आणि हिंदुत्ववादी राजकारण, दंगे कामी आले. तेव्हापासून आजतागायत भाजपनं द्रवीड पक्षांच्या पाठीवर बसून काही ना काही लाभ मिळवला आहे.

गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चार आमदार निवडून आले. विशेषतः त्याचा सोबती अण्णा द्रमुकच्या सत्तर जागा (२०१६च्या तुलनेत) कमी झाल्या असतानाही भाजपला हे यश मिळालं.

क्रमशः

भाग २ वाचा →

लेखक ज्येष्ठ पत्रकार असून विविध वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रातून त्यांनी काम केले आहे.

1 Comment

  1. SACHIN KETKAR Reply

    उत्तम आर्टिकल आहे. आता ह्या बॅकड्रॉपवर तामिळी राजकारण भविष्यात कसे जाईल, हिंदुत्वाशी लढाईची भाषा करून आतून जुळवून घेतील, कि थेट विरुद्ध उतरतील, त्यातून बहुसंख्यवाद देशात पराभूत होऊ शकेल का. यातून पुन्हा तामिळ स्वतंत्र राष्ट्रवाद उफाळेल का? तसे झालेतर इतर प्रांत हि ह्यापासून कसे प्रभावित होतील वगैरे तपशिलात वाचायला उत्सुक आहे.

Write A Comment