fbpx
राजकारण सामाजिक

मुस्लिम महिलांच्या लिलावामागची मानसिकता

या नवीन वर्षाची सुरुवात कोविडच्या संसर्गामुळे शांततेत व्हावी असं वाटत असतानाच सोशल मिडियावर देशातल्या १०० मुस्लिम महिलांचा एका ॲपमार्फत ‘बुल्ली बाई’ या नावाखाली ऑनलाईन लिलाव मांडण्यात आला. तुमची शारिरीक भूक भागवण्यासाठी बायकांना विकत घ्या असाच संदेश यातून द्यायचा होता. त्यातून मुस्लिम महिलांची नावं आणि फोटो वापरून हिंदूराष्ट्रामध्ये त्यांचं काय स्थान असेल हे पुन्हा उद्धृत झालं. याआधीही अशीच घटना घडली होती आणि अद्याप त्यात कोणालाच अटक झालेली नाही. खरंतर डिजिटल जगामध्ये असले गुन्ह्यांचा शोध घेणं वेळखाऊ आणि किचकट असतं. अनेकदा व्यक्ती सापडतही नाही. पण काहीना काही माहिती नक्की मिळू शकते. पण मुस्लिम महिलांच्या बाबतीत घडलेला गुन्हा हा या देशासाठी फारसा मोठा नसल्याने सरकार त्यामध्ये फारसा तपास करेल याची खात्री वाटत नाही. त्यातही सोशल मिडियावर अशाप्रकारे महिलांना शिवीगाळ करणारे, अश्लील फोटो टाकणारे अनेक जण बेनामी ट्रोल्स आहेत. त्यामुळे ते कायमच मोकाट राहतात. काही ट्रोलर्सची तर हिंमत एवढी जास्त आहे की ते आपल्या नावानिशी महिलांवर चिखलफेक करतात. त्यातल्या अनेकांना स्वतः आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीच फोलो करत असल्याचा अनेकदा समोर आलं आहे. म्हणूनच कदाचित या लोकांची हिंमत वाढली आहे.

भाजपची सत्ता केंद्रात आल्यापासून त्यांच्या अन्यायकारक धोरणांविरोधात सामाजिक पातळीवर लढा देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते सामान्य माणसाने. त्यातही महिलांचा सहभाग हा उल्लेखनीय आहे. सगळे विरोधी पक्ष भाजपपुढे निष्प्रभ ठरले होते तेव्हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आणि गेले वर्षभर शेती विरोधी कायदे मागे घ्यावेत म्हणून असलेली शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात शाहीन बागेतल्या महिला रस्त्यावर आल्या आणि कोविडच्या आधी देशभर मोर्चे काढणारी जनता हीच सरकारच्या विरोधात उभी ठाकली. या सगळ्यामध्ये लक्ष्य कोणाला केलं गेलं तर महिलांना. शाहीन बागेतल्या महिलांची बदनामी, पिंजरा तोड आंदोलनाच्या कार्यकर्त्या नताशा नरेवाल, देवांगना कलिता आणि आसीफ इक्बाल तान्हा यांना अटक, पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीवर देशद्रोहाचा गुन्हा, सफुरा झरगर या गरोदर महिलेला दिल्ली दंगलींमध्ये अटक, भूमिका घेणाऱ्या स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, तापसी पन्नू अशा सेलिब्रिटींवर सोशल मिडियावरून शिव्यांचा भडीमार. मुस्लिम महिलांच्या लिलाव प्रकरणीही मुद्दाम गुरुमुखीतून मजकूर लिहून शेतकरी आंदोलनामध्ये सामील झालेल्या पंजाबी जनतेला बदनाम करण्याचा डाव बहुदा साधयाचा होता. एकीकडे काल्पनिक भारतमातेच्या नावाने गळे काढायचे आणि निरपराध मुस्लिमांना पकडून पकडून ‘भारतमाता की जय’च्या घोषणा द्यायला लावायच्या. पण प्रत्यक्षात मात्र स्त्रियांना दुय्यम लेखून त्यांचा शारिरीक मानसिक छळ करायचा. ही विकृती येते कुठून?

या विकृतीचं मूळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुरुषी मानसिकतेमध्ये दडलं आहे. त्यांच्या संपूर्ण विचारसरणीमध्ये महिलांना कायम दुय्यम स्थान आहे आणि मग त्यांना मखरात बसवून भारतमातेप्रमाणे त्यांची पूजा करायची. पण भारतमातेला तोंडातून शब्द काढू द्यायचा नाही. एका स्तब्ध पुतळ्याप्रमाणे किंवा फोटोफ्रेममध्ये जखडलेल्या आकृत्यांप्रमाणे भिंतीची शोभा वाढवणे एवढचं स्त्रीचं स्वातंत्र्य. महिलांच्या विकासासाठी, त्यांना समाजामध्ये समान स्थान देण्यासाठी संघ परिवार आणि भाजपने एवढ्या वर्षात नक्की काय पावलं उचलली ते त्यांनी स्पष्ट करावं. मनुस्मृतीसारखा स्त्रीविरोधी ग्रंथ आपला म्हणणारे, मनूचं राज्य यावं म्हणून उघडपणे बोलणारे भाजपसमर्थक हे याच स्त्रीविरोधी विचारांचे पाईक आहेत. कारण हिंदूराष्ट्राची स्वप्नं बघताना कायम पुराणात काय झालं आणि हिंदू किती सुधारलेले होते हीच उदारहण आणि आदर्श डोळ्यामोर ठेवला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू महिलांना लग्नं, संपत्तीमध्ये समान हक्क देणारं कोड बिल आणलं तर त्याचा हिंदुत्वावादी संघटनांनी विरोध केला. त्यासाठी कडव्या मुस्लिम संघटनांशी हातमिळवणी करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. सरसंघचालक गोळवलकरांच्या मते, महिलांना असे हक्क दिल्याने पुरुषांच्या मानसिकतेवर परिणाम होईल. आधुनिकता स्वीकारणाऱ्या स्त्रिया या चारित्र्यहीन असतात वगैरे अनेक शोध त्यांनी बंच ऑफ थॉटमध्ये लावले आहेत. त्यामुळेच चारित्र्यावर संशय घेऊन आपल्या बायकोला वनवासाला पाठवणारा, आपल्याला लक्ष्मण आवडत असल्याची सहज कबूली देणाऱ्या शूर्पणखेचं नाक-कान कापून तिला विद्रूप करणारा राम हा यांचा ‘हिरो’ आहे. महिलांनी कसं वागायचं, कसे कपडे घालायचे, कोणाशी लग्न करायचं, किती मुलं जन्माला घालायची हे सगळे हेच ठरवणार. स्वतः लग्नं न करता संन्याशी म्हणून वावरणारे यांचे साधू आणि साध्वी हिंदू बायकांनी भरपूर मुलांना जन्म द्यावा नाहीतर मुस्लिमांची लोकसंख्या वाढेल, अशी मुक्ताफळं उधळतात. महिलांना समान दर्जा हा संघ आणि पर्यायाने भाजपला मान्य नसल्याने त्यांची शक्ती ही व्हॅलेंटाइन डेला जोडप्यांना मारण्यामध्ये, पबमध्ये कमी कपडे घालून मुली जातात म्हणून त्यांना त्रास देण्यामध्ये, लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिम मुलाशी लग्नं केलं म्हणून हिंसक कारवाया करण्यामध्ये खर्च होते. नैतिकतेचे जणू आपणच फार मोठे रक्षणकर्ते आहोत या आविर्भावात गेले कित्येक वर्ष बजरंग दल, सध्या उत्तर प्रदेशमध्ये असलेले रोमिओ स्क्वाड, गोरक्षक धुमाकूळ घालत आहेत. आता डिजिटल जमान्यामध्ये बेनामी ट्रोलर्स बनून हीच परंपरा पुढे नेत आहेत.

मूळात असे नैतिकचे रक्षक किंवा ट्रोलर्स यांच्याकडे एवढी हिंमत येते कुठून तर ती सत्ताधारी पक्षातून येते. कारण या कारवाया करण्यासाठी लागणारा पैसा सत्ताधारीच देऊ शकतात. सामान्य माणूस हे एकट्याने कृत्य करू शकत नाही. लोकांना मारल्यावर, धमकावल्यावर, बिनदिक्कत कायदे तोडल्यावर आपल्याला काहीही होणार नाही याची खात्री त्यांना असल्यानेच ही हिंमत येते. सत्ताधारी पक्षाचं त्यांना असलेलं मूक पाठबळ, पैशांचा पुरवठा याच जोरावर असली कृत्यं करणं शक्य आहे. गेल्या सात वर्षांमध्ये कोणत्या ट्रोलरवर कारवाई झाली, कोणत्या गोरक्षकाला निरपराध मुस्लिमाला मारल्याची शिक्षा झाली? कोणालाही नाही. उलट सत्ताधारी पक्षातले नेते अशांचा सत्कार करतात, त्यांना आपल्या कार्यक्रमांमध्ये बोलवून, निवडणूक प्रचारामध्ये त्यांचा वापर करून घेतात. पत्रकार स्वाती चतुर्वेदीच्या ‘आय अॅम ट्रोल’ पुस्तकामधून ती ट्रोलर आणि सत्ताधारी भाजप यांच्यातले संबंध उलगडून दाखवले आहेत.

मुस्लिम हे कायम संघ परिवाराचे शत्रू राहिले आहेत. नागरिकत्व कायदाही त्यांनाच दुय्यम स्थान देण्यासाठी, मतदानाचा त्यांचा अधिकार काढून घेण्यासाठी आणला गेला. त्याचा देशभरातून विरोध झाला तरी अद्याप तो कायदा मागे घेतलेला नाही. त्यात मुस्लिम महिला यासुद्धा या हिंदू राष्ट्रामध्ये दुश्मनच आहेत. त्यांनी सरकारवर टीका करणं, मुक्तपणे आपले विचार मांडणं, शिक्षण घेणं, स्वतंत्रपणे जगू पाहणं, आर्थिक स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणं हे हिंदूत्ववाद्यांच्या विचारसरणीच्या अगदी विरोधी आहे. महिलांचा विकास या त्यांना खुपतो, महिला आपल्या बरोबरीला आल्या तर आपलं स्थान डळमळीत होईल, अशी भीती त्यांना वाटते. हिंदुत्ववाद्यांचे नेते वि. दा. सावरकर यांनी मुस्लिम महिलांच्या बलात्काराचं समर्थन केलं आहे. हीच मानसिकता घेऊन हिंदुत्ववादी हिंदूराष्ट्राची स्वप्नं गेली अनेक वर्ष पाहत आहेत. माणसांचा लिलाव ही संकल्पनाही अत्यंत प्रतिगामी आहे. माणसाच्या इतिहासामध्ये विशिष्ठ जातीच्या, वर्णाच्या माणसांना गुलाम बनवून त्यांची विक्री करण्याची अनेक उदाहरणं आहेत. अमेरिकेमध्ये काळ्या वर्णाच्या लोकांची होणारी विक्री ही अगदी अलीकडच्या काळापर्यंत होती. अशा विक्री केलेल्या गुलामांच्या शरिरावर त्या मालकाचा हक्क असतो आणि त्याला पाहिजे ते तो त्यांच्याकडून करून घेतो. गुलाम बायकांच्या शरिरावर अत्याचार, बलात्कार ही आपल्या इतिहासाची काळी बाजू आहे. तीच मानसिकता घेऊन मुस्लिम महिलांचा लिलाव करण्याचा मानस या सोशल मिडियावर करण्यात आला. डिजिटल मिडियावरच्या बेनामी विकृतींना उत्तर द्यायचं असेल तर मुस्लिम महिलांबरोबर उभं राहून हा लढा कायम दिला पाहिजे. महिलांना शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचा आज जन्मदिवस आहे. पण त्यांच्याही कामात अडथळे निर्माण करणारे, त्यांच्यावर शेण फेकणारे हे हिंदू धर्माचे पुरस्कर्ते कर्मठ ब्राह्मण होते हे विसरून चालणार नाही. तेसुद्धा याच विकृत मानसिकतेतून घडले होते आणि स्त्रियांची प्रगती त्यांना मान्य नव्हती. पण सावित्रीबाईंनी या सगळ्याला तोंड देत मुलींना सज्ञान करण्याचं काम सुरुच ठेवलं आणि त्याच सावित्रीच्या लेकी आज स्वतंत्रपणे जगू शकत आहेत, बोलू शकत आहेत. उजव्या पुरुषी मानसिकतेविरुद्धचा हा लढा जुना आहे आणि त्याने कितीही विकृत रुप धारण केलं तरी तो थांबवणार नाही.

लेखिका राईट अँगल्सच्या नियमित वाचक, हितचिंतक आहेत.

Write A Comment