fbpx
राजकारण विशेष

फितूर लढवय्या

जॉर्ज फर्नांडिस हे व्यक्तिमत्व महाभारतातल्या कर्णासारखं किंवा बर्बरिकसारखं म्हणता येईल असं. किंवा ग्रीक शोकांतिकेतील व्यक्तिरेखेशी तुलना करायची झाल्यास होमरच्या इलियाड या महाकाव्यातील आकिलीससारखं होतं. प्रचंड ऊर्जा असलेला व संघर्ष व त्यागातून उभा राहिलेला हा माणूस संपूर्ण भारतातील गरिब-शोषीत, कामगार-शेतकरी, दलित-अल्पसंख्याकांच्या मनावर अधोराज्य गाजवू शकेल असा होता. अल्पसंख्य ख्रिस्ती समाजात जन्माला येऊनही केवळ स्वकर्तृत्वावर जॉर्ज फर्नांडिस बहुसंख्याक हिंदू असलेल्या भारतात पंतप्रधान बनण्याची क्षमता ठेवणारा माणूस होता. कर्णासारखा धनुर्धारी व कवचकुंडलाचं वरदान लाभलेला… पण राजकीय लढाईत अनैतिकतेच्या बाजूने कुरुक्षेत्रात उतरलं तर दारूण अंताशिवाय हाती काही लागत नाही. जॉर्ज यांच्याबाबतीतही असंच झालं.

दक्षिण कन्नड भागातून मुंबईत नशिब कमवायला आलेल्या तरुण जॉर्जकडे मुंबईच्या रस्त्यांवर झोपण्यासाठी पसरण्याची पथारीही नव्हती. शिक्षणात फारसा काही उजेड पाडू न शकलेल्या या तरुणाला वाचनाची मात्र प्रचंड आवड होती. कन्नडसोबतच इंग्रजी भाषेतील जे मिळेल ते अधाशासारखे वाचण्याच्या या छंदातूनच त्यांची लोकशाही समाजवादाच्या तत्त्वज्ञानाशी जुजबी ओळख झाली होती. यातूनच मुंबईत आल्यावर ते समाजवादी कामगार नेते पी. डिमेलो यांच्या संपर्कात आले. जॉर्जच्याच मँगलोरमधून आलेल्या डिमेलो यांना त्यांच्यातील ठीणगी जाणवली व त्यांनी त्याला डॉक वर्कर्स युनियनच्या कामात सामावून घेतले. जॉर्ज फर्नांडिस हे व्यक्तिमत्व बनण्याची ती पहिली पायरी होती.

जॉर्ज फर्नांडिस - संघर्ष
जॉर्ज फर्नांडिस – संघर्षाचे दिवस

डॉक वर्कर्स युनियनमध्ये काम करतानाच त्यांचा संपर्क मुंबई महापालिका कामगारांशी आला. महापालिका कामगारांच्या प्रश्नावर लढणारी कुठलीच आक्रमक संघटना अस्तित्वात नव्हती. विशेष म्हणजे मुंबई स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांची अवस्था तर खूपच वाईट होती. डॉ. राममनोहर लोहिया यांच्या पिछडा पावे सौ मे साठ या नितीवर काम करणाऱ्या जॉर्ज यांनी महापालिकेतील या प्रामुख्याने दलित समाजातील कचरा कामगारांचे संघटन उभे करण्याचा विडा उचलला व 1955 साली मुंबई म्युन्सिपल मजदूर युनियनची स्थापना झाली. त्यानंतर मग बेस्ट वर्कर्स, मुंबईतील रेस्त्राँ कामगार, छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी बॉम्बे लेबर युनियन, मग टॅक्सीमेन्स असा प्रवास वेगाने झाला. जॉर्ज त्या काळी रात्री 12 वाजता बोरिबंदरच्या आझाद मैदानावर हॉटेलमधील व छोट्या दुकानातील गुमास्ता कामगारांची सभा घेत असत. काम संपवून कामगार खांद्यावर लाल बावटा टाकून साथी जॉर्ज फर्नांडिस झिंदाबादचे नारे देत आझाद मैदानात जमत. त्यांच्या कामाचा शिण जणू जॉर्ज यांच्या भाषणाने पार उतरून जात असे. न थकता दोन-तीन तास देशातील राजकारण, काँग्रेसची भांडवली निती, आंतरराष्ट्रीय राजकारण, साम्राज्यवाद या साऱ्या बाबी कामगारांशी व्यक्तीगत चर्चा केल्याप्रमाणे जॉर्ज भाषण देत. कामगारांच्या मनात व्यवस्थेच्या विरोधातील विद्रोहाचे स्फुल्लिंगच ती भाषणे पेटवत असत. ती सभा संपली की तिथेच सायकलवर फिरणाऱ्या किंवा पहाटेपर्यंत चालणाऱ्या स्टॉलवर चहा आणि इडली खावून संघटनेतील इतर साथींसोबत चर्चा चाले. तोवर सकाळचे पाच वाजलेले असत. म्युन्सिपल कामगारांचा जथ्था त्याच आझाद मैदानात जमे. सकाळी कामावर जाण्यापूर्वी ते त्यांचा नेता जॉर्ज फर्नांडिसला ऐकायला आलेले असत. मग त्यांच्यापुढे पुन्हा सारे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण-अर्थकारणाचे संदर्भ खुले केले जात.

जॉर्ज यांनी कामगार संघटना या केवळ वेतनवाढ व त्यातून निर्माण होणारे कामगार पुढाऱ्यांचे हितसंबंध इतक्यापुरती चालवली नाही. त्यांनी कायम कामगारांना राजकीय प्रक्रियेत सक्रीय व्हायला उद्युक्त केले. जॉर्ज यांच्यावर डॉ. लोहिया यांच्या विचारसरणीचा प्रचंड़ प्रभाव होता. डॉ. लोहिया हे कट्टर लोकशाही समाजवादी. आचार्य नरेंद्र देवांप्रमाणे मार्क्सवादाचा अभ्यास करणेही त्यांच्यासाठी त्याज्यच जणू. त्यामुळे जॉर्ज यांनाही कायम मार्क्सवाद व मार्क्सवाद्यांचे वावडेच. पण तरीही त्यांनी मार्क्सवादी धाटणीने कामगारांना एक राजकीय शक्ती म्हणून उभे केले. त्यातूनच मुंबई बंदचे सम्राट म्हणून ते पुढे आले. प्रिमियर कंपनीत आर. जे. मेहता यांच्या नेतृत्वाखाली 1958 साली झालेल्या वेतनवाढीच्या संपाला त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील कामगारांनी पाठिंबा द्यावा यासाठी मुंबई बंदचे आवाहन केले. बेस्ट आणि टॅक्सी या वाहतुक क्षेत्रातील कामगारांनी आपल्या नेत्याच्या या आवाहनाला 100 टक्के प्रतिसाद दिला. मुंबई एकही दगड न पडता 100 टक्के बंद झाली आणि दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमांनी जॉर्ज यांना बंद सम्राट ही पदवी बहाल केली.

Political leader George Fernandes.

जॉर्ज यांची संसदीय राजकारणातील वाटचाल ही मात्र लोहियांच्या काँग्रेसविरोधी धोरणाबरहुकूमच राहिली. त्यांनी 1967 साली मुंबई काँग्रेसचे नेते व मुंबईचे अनभिषिक्त सम्राट स. का. पाटील यांना धूळ चारली. `तुम्ही स. का. पाटील यांचा पराभव करू शकता’ या घोषवाक्यासह त्यांनी सुरू केलेला कल्पक प्रचार हे त्या निवडणुकीचे वैशिष्ठ्य होते. एका बाजूला प्रचंड संघटन शक्ती, पैसा, मुंबईतील गुंडगिरीची साथ या विरुद्ध कामगार संघटना व काही कल्पक मित्रवजा शिष्यांचे टोळके, याच्या जीवावर जॉर्ज यांनी चक्क सदोबा पाटलांना  धूळ चारली. अर्थात यात सदोबा पाटलांच्या विरोधात असलेल्या इंदिरा गांधी व यशवंतराव यांनीही त्यांना आतून साथ दिल्याचे बोलले जाते.

या निवडणुकीनंतर समाजवाद्यांमध्येच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात जॉर्ज यांचे नाव ओळखले जाऊ लागले. त्याचीच परणती जॉर्ज यांना ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे अध्यक्षपद देण्यात झाली. 1973 साली जॉर्ज यांच्या हातात रेल्वे कामगारांचे हे मोठे संघटन आले. रेल्वेच्या कामगारांच्या प्रचंड समस्या होत्या. सरकारकडे पुरेसा निधी नव्हता. त्यामुळे वेतन अपुरे. मात्रा दुसऱ्या बाजूला ठेकेदारांचा रेल्वेच्या कंत्राटांमध्ये सुळसुळाट व त्यातून पैशाची देवाण घेवाण हे सर्रास सुरू होते. जॉर्जने संप पुकारला. संपूर्ण देशातील रेल्वे बंद! दिवस होता 8 मे 1974… जॉर्ज फर्नांडिस का बंद मतलब बंद. देशातील लाखो कामगार या संपात उतरले. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता सगळ्या मोठ्या शहरांमधील रेल्वे सेवा बंद झाली. जॉर्ज यांना अटक करण्यात आली. 20 दिवसांनी संप मागे घेतला गेला. पण इंदिरा गांधी यांची मानसिकता आणीबाणीपर्यंत नेण्याच्या दिशेने ही पहिली ठिणगी होती.

पुढे आणीबाणी जाहिर झाल्यावर जॉर्ज भूमीगत झाले. त्यांनी पत्रके काढणे, कार्यकर्त्यांच्या छोट्या छोट्या सभा घेणे, सरकारविरोधी आंदोलनाच्या नवनव्या क्लृप्त्या योजणे अशी कामे सुरू ठेवली. मात्र देशभरात ज्येष्ठ तसेच मधल्या फळीतील असंख्य समाजवादी कार्यकर्त्यांची झालेली धरपकड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. इंदिरा गांधी मूळापासून हादरल्या पाहिजेत असं काही करी करायला हवं, हेच त्यांच्या मनात घोळत होतं. त्यातूनच मग बडोदा डायनामाईट प्रकरण घडलं. बडोद्याजवळच्या हालोल खाणीतून डायनामाईट मिळवून त्याचे देशात निरनिराळ्या ठिकाणी स्फोट करण्याचं योजलं गेलं. मुंबईतील सायन येथील गांधी मार्केट येथे एक स्फोट झालाही. यातून जॉर्ज यांच्यावर काहीजणांनी नक्षलवादी असल्याचाही ठपका ठेवला होता. मात्र मार्क्सवादाशीच वाकडं असलेल्या जॉर्ज यांना नक्षलवादाशी काहीही देणं घेणं नव्हतं. जॉर्ज यांना अटक झाली. पोलिसांनी बेदम चोप दिला. त्यांना बिहारमधील मुजफ्फरपूर येथील तुरुंगात डांबण्यात आलं. चोवीस तास दंडाबेडी ठोकण्यात आली. आणीबाणी उठली तरी जॉर्ज सुटले नव्हते. त्यांनी तुरुंगातूनच निवडणुकीचा अर्ज भरला व पोस्टरवर त्यांचा दंडाबेडीतला फोटो झळकला. त्यांच्या समर्थकांनी घोषणा दिली… `जेल का ताला टुटेगा जॉर्ज फर्नांडिस छुटेगा !’.

जॉर्ज फर्नांडिस आणि मोरार्जी देसाई
जॉर्ज फर्नांडिस आणि मोरार्जी देसाई

जॉर्ज प्रचंड बहुमताने निवडून आले व केंद्रात उद्योग मंत्री झाले. पुढे त्यांनी कोकाकोला व आयबीएमसारख्या कंपन्यांना त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवून देशातून हाकलंल. त्यांच्या आक्रमक समाजवादी विचारसरणीवर त्यामुळे शिक्कामोर्तबच झालं. पण जनता पार्टीचा प्रयोग लवकरच फसला. मधु लिमयेंनी जनता पक्षात राहूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व ठेवलेले नेते व कार्यकर्ते यांच्या निष्ठेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. संधीचा फायदा काँग्रेसने उठवला व यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून सरकारवर अविश्वास ठराव आणला. जॉर्ज यांनी पहिल्या दिवशी या ठरावाला विरोध करणारं जोरदार भाषण संसदेत केलं. जॉर्ज यांच्या भाषणाची सर्वत्र खूप चर्चा झाली. मात्र त्यांना त्याच संध्याकाळी मधु लिमये यांनी भेटायला बोलावलं व त्यांची भूमिका बदलली. त्यांनी परत दुसऱ्या दिवशी सरकारच्या विरोधात तितक्याच जोशात भाषण केलं.

सरकार पडलं. यानंतर जॉर्ज पुन्हा प्रकाश झोतात आले ते व्ही. पी. सिंग यांच्या कालावधित. व्ही. पी. सिंग यांना घोड्यावर बसवण्यात त्यांची मोठी भूमिका होती. काँग्रेस पक्ष व गांधी घराण्याचा विरोध या लोहियांनी दिलेल्या धड्यांमुळे बोफोर्सच्या आरोपांचं कोलित त्यांच्यासाठी सुवर्ण संधी होती. व्ही. पी. सिंग यांचं सरकार आलं व जॉर्ज त्यात रेल्वे मंत्री झाले. मात्र ते सरकारही लवकरच कोसळलं. त्यानंतर आलेल्या देवेगौडा आणि गुजराल या सरकारमध्ये मात्र जॉर्ज मंत्री नव्हते. बिहारमधील त्यांचे शिष्य असलेल्या नितीश आणि लालू यांच्यातील स्पर्धा तीव्र झाली होती. जॉर्ज तुलनेने कमी जनाधार असलेल्या नितीश यांच्या बाजूने उभे राहिले होते.

पुढे बाबरी मशिद पाडण्यात आली. देशभरात दंगे उसळले. जॉर्ज सर्वत्र या हिंसाचाराच्या विरोधात भाषण देत फिरत होते. मात्र त्याच वेळी त्यांनी जनता दल फोडून त्यातून समता पार्टी स्थापन करायचं नक्की केलं होतं. 1993-94 साली त्यांनी समता पक्षाची स्थापना केली देखील. स्थापनेपासूनच त्यांनी वाजपेयी-अडवाणींशी सूत जुळवलं. जॉर्ज यांच्या लढाऊ, धर्मनिरपेक्ष कारकिर्दीला ग्रहण लागायला इथूनच सुरुवात झाली. लालू यांची बिहारमधील वाढती लोकप्रियता नितीश यांच्यापेक्षा जॉर्ज यांच्या डोळ्यात खुपू लागली होती. त्यातूनच देवेगौडा आणि गुजराल यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. उत्तर भारतातल्या गंगेच्या खोऱ्यातील राजकारणात जॉर्ज यांचं स्थान मोठं असलं, तरी ज्या पिछड्यांच्या नावावर त्यांनी राजकारण केलं होतं, त्या पिछड्या समाजातील कार्यकर्ते आता स्वतः नेता बनण्याच्या स्पर्धेत उतरले होते. ते जॉर्ज यांना पचत नव्हतं.

जॉर्ज यांनी समता पक्षाची स्थापना केली आणि ते भाजपच्या वळचणीला गेले ते कायमचेच. बाबरी विध्वंसानंतर ते वाजपेयी मंत्रिमंडळात सामील झाले. संरक्षण मंत्री झाले. इतकच कशाला तर त्यांनी गुजरातमध्ये गोधरा कांडानंतर झालेल्या मुस्लिमांच्या कत्तलींनंतरही वाजपेयी व गुजरातमधील मोदी सरकारचं संसदेत जोरदार समर्थन केलं. गुजरात दंगलीत झालेल्या मुस्लिम महिलांवरील अत्याचाराची संसदेत चर्चा झाली, तेव्हा जॉर्ज म्हणाले की, बलात्कार कुठे होत नाहीत, व यापूर्वी कधी बलात्कार झालेच नाहीत का, बलात्काराचं इतकं अवडंबर माजवून तुम्ही लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला खाली खेचण्याची भाषा कशी काय करू शकता… जॉर्ज यांच्या या भाषणाने त्यांचा लढाऊ बाणा, त्यांची उरली सुरली धर्मनिरपेक्ष प्रतिमा सगळे एका क्षणात मातीत मिळाले.

यानंतर इंड़िया शायनिंगच्या नाऱ्यासह निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वाजपेयी सरकारला लोकांनी धूळ चारली. ज्या बिहारच्या मातीत जॉर्ज यांनी लालू- नितीशसह अनेकांना राजकीय धडे गिरवायला शिकवलं होतं, ज्या मुजफ्फरपूरमधील तुरुंगात त्यांना आणीबाणीनंतर ठेवण्यात आलं होतं व त्याच मुजफ्फरपूरमधून त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा धुव्वा उडवत जनता पार्टीचा नेता म्हणून संसदेत प्रवेश केला होता, त्याच मुजफ्फरपूरमध्ये जॉर्ज यांना पराभाव चाखावा लागला.

जॉर्ज यांची राजकीय कारकीर्द खरंतर तिथेच संपली होती. त्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली. पुढे त्यांना अलझायमर या असाध्य रोगाने ग्रासले. ते राजकीय व सामाजिक विजनवासात गेले. त्यांना अशाही अवस्थेत नितीश यांनी राज्यसभा सदस्यत्व दिले. मात्र त्यांना सदस्यत्वाची शपथ व नोंदवहीत करावयाची स्वाक्षरी करणे ही जमत नसल्याचे टीव्हीवर पाहणे त्यांच्या चाहत्यांच्या नशिबी आले. अशाच अवस्थेत त्यांनी हिंदुत्ववाद्यांशी केलेल्या तडजोडीबाबत लालू यांनी त्यांना भर संसदेत जोरदार सुनवले होते. क्या टुकूरटकूर देखते हो, असे लालू यांनी त्यांना म्हटल्यावर जॉर्ज यांच्या चेहऱ्यावर जेव्हा कॅमेरा गेला तेव्हा त्यांचा चेहरा धारातिर्थी पडलेल्या कर्णासारखा निरागस दिसत होता. प्राणपणाने लढूनही लढाईत धारातिर्थी पडलेला वीर चुकीच्या मार्गावर चालल्याने हृदयात साठलेलं सगळं हलाहल एका क्षणात देहातून बाहेर पडल्यावर जसा निरागस दिसावा, अगदी तसा. बास! हा त्यांच्या बाबतीतला आठवणीत राहणारा शेवटचा प्रसंग. त्यानंतर त्यांना अल्झायमर ने इतके ग्रासले की अधे मधे त्यांच्या बिघडणाऱ्या तब्येतीच्या केवळ बातम्या कानावर यायच्या. ते दिसले कधीच नाहीत.

कर्ण असो वा बार्बरिक किंवा आकिलीज हे महान योध्ये होते हे जगाने मान्यच केलं आहे. मात्र त्यांनी लढाईत जी बाजू घेतली ती अनैतिकतेची होती. जॉर्ज यांचं नेमकं तेच झालं. ज्या धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या आधारावर त्यांना लोकांनी नेता बनवलं होतं, त्याच धर्मनिरपेक्ष विचारधारेला त्यांनी हरताळ फासला. त्या विचारधारेशी त्यांनी फंदाफितुरी केली. जॉर्ज यांच्यासारखा लढवय्या विरळाच. पण दुर्दैवाने `फितुर लढवय्या’ हे बिरुद त्यांच्यापासून कुणीच वेगळं करू शकणार नाही. त्यांच्या लढवय्या बाण्याला सलाम करतानाच त्यांच्या फितुरीची सल कायम मनात डाचत राहील, व त्यांच्या त्या धर्मनिरपेक्षतेसोबतच्या फितुरीला आम्ही कायम प्राणपणाने विरोध करत राहू इतकेच त्यांच्या निधनानंतर सांगणे महत्त्वाचे आहे.

राईट अँगल्स Editorial Board

Write A Comment