चंडिकादास अमृतराव उर्फ नानाजी देशमुखांना भारतरत्न मिळाल्याचा संघ परिवाराला आनंद होणं स्वाभाविक आहे. खरंतर ९० वर्षांच्या संघाच्या कामाला संपूर्ण बहुमतात आलेलं सरकार हेच सर्वाधिक गोमटे फळ आहे. भारतरत्न वगैरे बाबी या सत्तेच्या सोबत येतच असतात. कांशीराम यांनी देशातील दलित-बहुजन जनतेची एकजूट बांधताना कायम स्पष्ट केले होते की, `सत्ता ही सब तालों की चाबी है…’ नको त्या आंदोलनात्मक संघर्षात स्वतःची शक्ती व वेळ वाया घालवण्यापेक्षा या देशातील सत्ता निवडणुकीच्या माध्यमातून बहुजन समाजाला स्वतःकडे कशी खेचता येईल, त्यासाठी गाजावाजा न करता काम करत राहा. सत्ता हाती आली की एफटीआयआयच्या प्रमुखपदापासून ते भारतरत्नापर्यंत सगळ्या माळा गळ्यात घालता येतात. संघाची रणनिती खऱ्या अर्थाने संघाबाहेरील कुणाला समजली असेल, तर ती कांशीराम यांनाच. त्यामुळेच संघाच्या सोबत आघाडी करताना त्यांच्या मनात राजकीय नैतिकतेचे प्रश्न तयार झाले नाहीत. ज्या प्रमाणे च्यांग काय शैक याच्याशी जपानी साम्राज्यवादाच्या विरोधात आघाडी करताना ते माओ त्से तूंग यांच्या मनातही तयार झाले नव्हते. तुमचे राजकीय उद्दिष्ट मनात स्पष्ट असले की, काही काळापुरते शत्रूभावी आंतर्विरोध हे अशत्रूभावी होतात हे तत्त्वज्ञान माओ अनुभवातूनच शिकले होते. मुख्य आंतर्विरोधापर्यंत कसे पोहोचायचे व त्याला नामोहरम कसे करायचे याची पक्की खूणगाठ ज्यांनी मनाशी बांधली आहे, त्यांच्या मनात असले गोंधळ उडत नाहीत. मात्र त्याच्या उलट ज्यांच्या विचारसरणीचे मूळच आंतर्विरोधाने लडबडलेले असते त्यांना समाजातिल आंतर्विरोध ओळखणं अशक्य होऊन जातं. चंडिकादास अमृतराव उपाख्य नानाजी यांना भारतरत्न मिळाल्यानंतर अशाच प्रकारचा वैचारिक गोंधळ अनेक समाजवादी व काही काँग्रेस नेते कार्यकर्त्यांमध्ये उडाल्याचं समोर येतंय. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्यापासून ते अगदी ज्या नरेंद्र दाभोलकर यांचा खून जहाल हिंदुत्ववादी प्रवृत्तींनी केला, त्या नरेंद्र दाभोलकर यांचे ज्येष्ठ बंधू व ज्येष्ठ समाजवादी विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर यांनीही नानाजींना मिळालेल्या भारतरत्नाबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला आहे. नानाजींनी मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे उभ्या केलेल्या आश्रमात गोरगरिब आदिवासींच्या उत्थानाचे जे कार्य केले होते, त्यामुळे बहुदा हा यथोचित सन्मान असल्याची भावना या सगळ्यांच्या मनात तयार झाली असावी. मात्र नानाजी म्हणजे काही सानेगुरुजी नव्हेत, याचे भान सुटायचे नसेल, तर या देशातील जात-वर्गीय व्यवस्था व त्या व्यवस्थेवर असलेली ठराविक जनांची अधिसत्ता यांचे परस्पर हितसंबंध लक्षात घ्यावे लागतात.
नानाजी हे अगदी बालपणापासूनच संघात होते, असे संघाबाबत माहिती देणाऱ्या व नानाजींच्या कार्यांबद्दल माहिती देणाऱ्या पुस्तकांत व वेबसाईट्सवर म्हटलेले आहे. असो बालपणी कुणी काय केले याबाबत फारसे बोलण्यात अर्थ नाही. मात्र समज आलेल्या वयात नानाजींनी पूर्णवेळ संघ कार्याला वाहून घेतले होते हे महत्त्वाचे. त्यांच्यावर माधव सदाशीव गोळवलकर या दुसऱ्या सरसंघचालकांनी उत्तर प्रदेशच्या प्रचारक पदाची जवाबदारी सोपविली होती. या त्यांच्या कार्यकाळात नानाजींनी उत्तर प्रदेशात संघाचा मजबूत पाया रचला. म्हणजे काय केले, तर ज्या पूर्व उत्तर प्रदेशचे प्रभारीपद आज प्रियंका गांधी यांच्यावर सोपविले गेले आहे, त्या पूर्व उत्तर प्रदेशात फिरून फिरून या देशातील हिंदुंवर किती अनन्वित अत्यार होत आहेत व ते प्रामुख्याने मुसलमान व ख्रिश्चनांकडूनच कसे होत अाहेत, असे जाज्ज्वल्य (अ)विचार वगैरे काहींच्या मनात पेरण्याचे काम केले. उत्तर प्रदेश या देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या प्रदेशाची जवाबदारी तेव्हा तीन प्रमुख मराठी ब्राह्मणांवर गोळवलकर यांनी टाकली होती. त्यातले एक होते नानाजी देशमुख दुसरे होते भाऊराव देवरस व तिसरे होते मोरोपंत पिंगळे. भाऊराव हे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे बंधू, तर मोरोपंत पिंगळे म्हणजे बाबरी आंदोलनाचा लगाम संघाने ज्यांच्या हातात ठेवला होता, ते संघाचे धुरीण. लोकांसाठी रथावर चढलेले अडवाणी दाखवले जात होते. मात्र रथाच्या घोड्यांचे सगळे लगाम पिंगळेंच्या हातातच होते. रथयात्रा कधी काढायची, कुठून न्यायची, विटा कशा जमा करायच्या आंदोलनाने देशभरात हिंदू-मुसलमान दरी किती वाढलेली आहे याचा अंदाज घेऊन शेवटी अयोध्येत, `तेल लगाओ डाबर का नाम मिटाओ बाबर का’ म्हणत जमिनीचे सपाटीकरण कसे करायचे ही सगळी रणनिती पिंगळे यांनीच रचलेली होती.
तर या तिकडीने उत्तर प्रदेशात जे काही पन्नास- साठच्या दशकात पेरले त्याचीच परणिती तीस-चाळीस वर्षांनी नव्वदच्या दशकात आपल्याला पाहायला मिळाली होती. योगी अदित्यनाथ यांचे गुरू महंत दिग्विजयनाथ यांनी नानाजींना संघाच्या या कामात प्रचंड मदत केली. नानाजींनी १९४९ सालीच म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावर दोनच वर्षांनी दिल्लीच्या तख्तावर सेक्युलॅरिजमचे महामेरू पं. जवाहरलाल नेहरू बसलेले असतानाच अयोध्येत बाबरी मशिदीच्या परिसरात अखंड भजनाचा कार्यक्रम आयोजित करून हिंदू जनजागृतीला सुरुवात केली होती. गोळवलकर यांनी १९५३ साली गोहत्येच्या विरोधात देशभरात एक मोठी स्वाक्षरी मोहिम हाती घेतली होती. त्यावेळी या मोहिमेतील महत्त्वाची जवाबदारी महंत दिग्विजयनाथ यांनी उचलली होती. ही जवाबदारी त्यांनी उचलणे कसे महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्याचे काम गोळवलकरांचे पट्टशिष्य नानाजींनीच पार पाडले होते. याच दिग्विजयनाथांच्या मदतीने नानाजींनी गोरखपूर येथे पहिल्या संघविचारांच्या शाळेचे म्हणजे शिशू मंदिर शाळेचा पाया रचला होता. आज त्यांच्या देशभरात हजारो शाखा आहेत. पुढे सत्तरच्या दशकात संघाने शिशू भारतीवरूनच धडा घेऊन विद्या भारतीची स्थापना केली व हजारो शाळा, महाविद्यालये काढून जाज्ज्वल्य हिंदुत्वाचे धडे त्यातून द्यायला सुरुवात केली. कुराणपठणाचे धडे देणाऱ्या मदरशांना नावं ठेवणाऱ्या अनेक मध्यमवर्गीयांना या शाळांमध्ये कोवळ्या मनावर बिंबवण्यात येणाऱ्या विचारांचे बिलकूलच वावडे नसते हे विशेष!
नानाजी हे अतिशय चतुर व्यक्तिमत्व होते. काँग्रेसच्या विरोधात जाज्वल्य हिंदुत्ववादी विचारांच्या आधारावर लढणे केवळ अशक्यच नाही तर त्या आधारावर जनाधार बांधणेही कठीण आहे, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधीलच काही हिंदुत्वावादी विचारांच्या लोकांशी संपर्क वाढवला. आपल्या मधुर मिठ्ठास वाणीने त्यांनी करणसिंग सारख्यांना आपलेसे केले. राजकारणात मुरलेल्या काँग्रेसीजनांना कह्यात करण्याचे तंत्र अवगत झाल्यावर वैचारिक सुस्पष्टता नसलेल्या समाजवाद्यांना कह्यात आणणे म्हणजे त्यांच्यासाठी फारच सोपा विषय होता. डॉ. राममनोहर लोहियांपासून ते जयप्रकाश नारायणांपर्यंत आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यापासून ते चरणसिंहांपर्यंत सगळ्यांशी नानाजींनी अत्यंत सुमधूर संबंध ठेवले. त्यातूनच पहिल्यांदा काँग्रेसविरोधातील लोहियांची बडी आघाडी व त्यानंतर जयप्रकाशांचा जनता पक्ष जन्माला आला. त्यावेळी समाजवाद्यांमधील काहींना संघाच्या कार्यकर्त्यांसोबत काम करणे चूक असल्याचे वाटत होते. त्यातून कुरबुरी सुरू झाल्या. मात्र जयप्रकाश नारायण यांनी अशी कुरबूर करणाऱ्यांना थेट दम दिला की, संघ जर फॅसिस्ट असेल तर मीदेखील फॅसिस्ट आहे. झालं, यानंतर बिशाद होती का कुणाची काही बोलायची? मग शेवटी जयप्रकाश यांच्या निधनानंतरच मधु लिमये यांनी हिम्मत दाखवली. दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून मधु लिमये यांनी संघाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यां अल्टिमेटम दिला व त्यातूनच जनता पार्टीचे सरकार पडले. त्यातूनच कमळाचे चिन्ह घेऊन मग भारतीय जनता पार्टीला संघ परिवाराने जन्म दिला. खरेतर मधु लिमये ही समाजवाद्यांमधील एकच व्यक्ती अशी होती, की जीला नानाजी स्वतःच्या जाळ्यात कधीही ओढू शकले नाहीत.
महाराष्ट्रात सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सुरुवातीच्या काही ब्राह्मण प्रचारकांनी ज्या जिद्दीने व वैयक्तिक त्यागाच्या आधारावर संघाची वीण देशभरात घट्ट विणली आहे, त्यात नानाजी, दत्तोपंत ठेंगडी व मोरोपंत पिंगळे यांची नावे प्रमुख आहेत. आज देशात मोदींवरील टिकेची धार खूप वाढली असल्यामुळे यांच्यापैकी केवळ नानाजींचाच नंबर भारतरत्नसाठी लागलेला आहे. अन्यथा सारे काही २०१४ सारखे आलबेल असते तर या तिघांनाही भारतरत्न देऊन गौरविले गेले असते. पुन्हा जर मोदी दिल्लीच्या तख्तावर स्थानापन्न झाले तर मोरोपंत व दत्तोपंत या दोघांनाही भारतरत्न यथावकाश मिळणारच आहे, यात वाद नाही.
मुळात सत्ता राबवताना ती सत्ता ज्या साध्यासाठी साधन म्हणून हाती आली आहे, ते साध्य नक्की करणाऱ्या विचारसरणीसाठी सर्वस्व त्यागलेल्यांचा विसर पडू न देणे ही योग्य व महत्त्वाची गोष्ट आहे. संघ त्या बाबतीत अत्यंत कठोर व अचूक निर्णय घेणारे संघटन आहे. काँग्रेसचे मात्र असे नाही. या पक्षाची नक्की विचारसरणी कोणती हे काँग्रेसच्याच धुरिणांना अजून धड समजलेले नाही. ते राहूल गांधी यांच्या आवडीमुळे सध्या शैव पंथीय झालेले असावेत, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. त्यांना सचिन तेंडुलकर यास भारतरत्न देऊन गल्लीत क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांची मते आपल्याला मिळतील, असे कुठल्यातरी कंसल्टंट वा सॅम पिट्रोडा नामक टेक्नोक्रॅटने सांगितल्यास ते तात्काळ त्यावर अंमलबजावणी करतात. उडाला तर कावळा बुडाला तर बेडुक, असे म्हणून चूकल्यास त्यावर दुःख तर सोडूनच द्या फार गांभीर्याने पुनर्विचारही करत नाहीत. दुसरीकडे समाजवादी म्हणजे खरेतर लोकशाही समाजवादी किंवा दुसऱ्या सोशलिस्ट इंटरनॅशनलमध्ये पहिल्या महायुद्धाच्या बाजूने उभे राहिलेले वा लेनीन यांच्या युद्धविरोधी भूमिकेला राष्ट्रवादाच्या नावाखाली जोरदार विरोध करणाऱ्यांचे सांप्रतचे वंशज यांची नक्की विचारधारा काय याचा ते स्वतःच कायम परिश्रमपूर्वक शोध घेत असतात. ते भांडवलशाहीच्या विरोधी असतात, पण ते खाजगी भांडवलाला विरोध करत नाहीत. ते धर्मांधतेच्या विरोधात असतात, पण त्यांना दुसऱ्या महायुद्धात हिटलरला मदत करताना त्यात काही वावगे वाटले नाही. तसेच भारतात त्यांना संघ परिवारासोबत जोडून घेताना त्यातही काही वावगे वाटत नाही. त्यामुळेच नानाजी यांना भारतरत्न मिळाल्यावर त्यांच्या महान कार्याबद्दल समाजमाध्यमांवर वा मुख्य धारेतील माध्यमांवर नानाजींचे तोंड फुटेस्तोवर कौतुक करताना त्यांना अत्यानंद होत असतो. मात्र त्याच वेळी उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश या दलित-ओबीसी नेत्यांनी केलेल्या आघाडीत काँग्रेसला सोबत न घेतल्याबद्दल त्यांना प्रचंड राग-राग येत असतो.
नानाजी यांच्या कार्याचा गौरव करतानाच मोदींना विरोध ही अजब रणनिती काँग्रेसचे नेते व काही उरले-सुरले समाजवादी अंगिकारत असताना त्यांना फक्त इतकेच सांगावेसे वाटते, की सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्याचे जाहिर केलेल्या नानाजींना, अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कुणाला मंत्री करावे कुणाला नाही, कुणाला कुठले खाते द्यावे कुणाला कुठले देऊ नये, याची गांभीर्यपूर्वक विचारणा संघ परिवारातून व भाजपच्या नेत्यांकडून केली गेली होती, असे जाणकारांनी मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांमध्येच लिहून ठेवलेले आहे. आणखी काही वर्षांनी मोदींचे वय झाल्यावर कदाचित तेही सक्रीय राजकारणातून निवृत्ती घोषित करतील व अशाच कुठल्यातरी चित्रकुटात जाऊन गोरगरिब आदिवासींच्या सेवेस स्वतःला वाहून घेतील. नाहीतरी या देशात डिसेंबर-जानेवारी महिन्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरिबांच्या अंगावर ब्लँकेटं घालून पूण्य कमावणाऱ्या वा झोपडपट्ट्यांमध्ये टूथब्रश वाटून तेथील अन्नाला मौताज समाजाला वैयक्तिक स्वच्छतेचे धडे गिरवायला लावणाऱ्यांबाबत आपल्याला कोण ते अप्रूप असतेच की! गरिबी ही मानवनिर्मीत आहे, तिच्याकडे दैववादी दृष्टीकोनातून पाहणे ही केवळ आणि केवळ लबाडी आहे, हे माहित असूनही अनेक धुरिण अशा पुरोगामी बाबांचेही कौतुक करण्यात आयुष्यातील महत्त्वाचा वेळ खर्ची घालत असतातच. तर त्यांना इतकेच सांगणे आहे की, आज जरी मोदींच्या नावे तुम्ही नाके मुरडत असलात, तरी भविष्यात त्यांचा एखादा योगींसारखा शिष्य त्यांच्या अशाच सामाजिक कामानिमित्ताने त्यांनाही भारतरत्न जाहिर करेल. कदाचित तेव्हा ही आपण असेच म्हणू, बाकी राजकारणाचं जाऊदेत, पण काय मोदीजींनी गरिबांमध्ये काम उभं केलंय नाही?!!!
5 Comments
khup chan lekh aahe .dhanyawad itihas mahiti karun dilyabaddal
very nice article sir thanks
अत्यंत पूर्वग्रहदूषित लेख. यातून फक्त लेखकाचा संघद्वेष प्रतीत होती बाकी काही नाही. आजकाल डावे व समाजवादी हे देखील गजरात विजरीचता वस्तू झाल्यात त्यातलाच हा एक लेख. असे प्रायोजित लेखन करून फक्त आपक्त धंदा करणे एवढेच साध्य होते.
very nice article sir thanks
मदरसा आणि शिशु मंदिर शाळांची तुलना वाचून लेखकाची बौद्धिक क्षमता कळली…ओढून ताणून लिहिलेला लेख