fbpx
विशेष

जुलमाची प्रतिके हटवा

3 जानेवारीस ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्रातील सत्यशोधकांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याला स्मरुन एका महत्वपूर्ण मागणीसाठी पुण्यात आंदोलने केली. मुख्य मागणी  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात रेखाटण्यात आलेला शनिवारवाडा काढुन टाकण्यात यावा ही होती. या मागणीला तमाम डाव्या, सत्यशोधक, पुरोगामी, समतावाद्यांचा पाठिंबा असायलाच हवा.

पूर्वीच्या पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात शनिवारवाडा, त्याखाली उघडलेल्या पुस्तकावर पुणे विद्यापीठ असे लिहिले आहे आणि त्या पुस्तकाच्या शेजारी डाव्या बाजूस स्थापना वर्ष शके 1870 असे तर उजव्या बाजूस इंग्रजी मध्ये 1948 A.D. असे लिहिले आहे. या चौकटीच्या दोन्ही बाजूस टाप उंचावलेले दोन घोडे रेखाटण्यात आले आहेत. याच चौकटीखाली  UNIVERSITY OF PUNE  आणि शेजारी स्वस्तिक चिन्ह, खाली ‘य: क्रियावान् स पण्डित:’ (विद्वत्तेसोबत जो क्रियावान असतो तोच खरा पंडित )  हे बोधवाक्य आणि त्याच्या उजव्या बाजूला टेकडीवरील मंदीर (बहुदा पर्वती टेकडीवरील मंदीर) रेखाटले आहे.

वासाहतिक काळापासून भारतात विविध प्रदेशात विविध विद्यापीठांची स्थापना झालेली दिसते. त्या प्रत्येक विद्यापीठाचे सूचक असे बोधचिन्ह, बोधवाक्य आहे. उदाहरणार्थ पुणे विद्यापीठाच्या एक वर्ष आधी म्हणजे  १९४७ साली स्थापन झालेली पंजाब युनिर्व्हसिटीचे बोधचिन्ह प्रवाही नदी (बहुदा सतलज) आणि वरच्या बाजूला अंधार भेदुन उगवणारा सूर्य. बोधवाक्य दिले आहे ते ‘तमसो मा, ज्योतिर्गमय’ अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे असे सूचित करणारी चिन्हसंहिता वापरण्यात आली आहे. २३ नोव्हेंबर १९४९ रोजी गुजरात युनिव्हर्सिटीचे बोधवाक्य ‘योग: कर्मसु कौशलम’ म्हणजे ‘कुशलतापूर्वक कार्य करणे’ म्हणजे योग होय हे आहे. १९२२ मध्ये स्थापन झालेल्या युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीचे बोधवाक्य ‘निष्ठा धृति: सत्यम’ हे आहे. त्यासाठी ‘हत्तीसारखी कार्यावर निष्ठा असावी’ असे सूचित करणारे बोधचिन्ह दिसते. ज्ञानप्रक्रियेशी संबंधीत तसेच त्या त्या प्रदेशाच्या भौगोलिक विशेषत: बोधचिन्ह व वाक्यात वापरण्यात आलेल्या दिसतात.

या पार्श्‍वभूमीवर पुणे विद्यापीठाचे बोधचिन्ह नेमके काय सूचित करते? पुण्याची अस्मिता किंवा विशेष म्हणून शनिवारवाडा, पर्वती टेकडी आहे का?

स्वस्तिक चिन्ह ज्ञानाचे प्रतिक म्हणून नक्कीच घेतले नसणार, मग ते ‘सांस्कृतिक पुणे’चे प्रतिक आहे असे दिसते. यामुळेच त्याला सत्यशोधकांची हरकत आहे. कारण स्वस्तिक, पर्वती टेकडी व शनिवारवाडा ही पुण्याची वैशिष्टयपूर्णता नाही. पर्वती टेकडी ही ब्राह्मणांची बिदागी म्हणजे रमणा वाटप केंद्र म्हणून आणि पेशव्यांनी बांधलेल्या स्त्रियांना प्रवेश नसलेल्या कार्तिकेय स्वामीच्या मंदीरासाठी प्रसिद्ध आहे. शनिवारवाडा हा खरे तर कष्टकरी बहुजनांसाठी ‘शोषणवाडा’ आहे. चौथाईचा अधिकार प्राप्त असलेल्या पेशव्यांनी अमानवी पद्धतीने शेतसारा वसूल केल्याच्या नोंदी इतिहास दप्तरी सापडतात. शेतकर्‍यांनी कधी अतिवृष्टी किंवा अवर्षण किंवा अन्य कोणत्याही कारणांनी त्यावर्षी महसूल भरावयास असमर्थता दर्शविली तर शिवशाहीतील धोरणांना हरताळ फासत शेतकर्‍यांना याच शनिवारवाड्याच्या समोर बेंबीत सुरुंग ठोसून मारुन टाकण्यापर्यंतच्या शिक्षा दिल्या गेल्या आहेत. याच शनिवारवाड्यात जगद्गुरु तुकोबांच्या अभंग म्हणण्यावर बंदी घालण्यात आली होती. ही कृती म्हणजे ज्ञानावर पुकारलेली आणीबाणीच! ज्ञानपीठाच्या बोधचिन्हावर ज्ञानबंदीच्या ब्राह्मणी-फॅसिस्ट कृत्याचे प्रतिक असणार्‍या शनिवारवाड्याचे रेखाटन असताच कामा नये. शनिवारवाडा म्हणजे शेतकरी शोषणाचे, अस्पृश्यतेचे, जाती अहंकार व वर्चस्वाचे प्रतिक आहे. अस्पृश्यांना गळयात मडके आणि कमरेला खराटा बांधण्याची सक्ती करून अपमानित करणार्‍या जातीनियमांचे पुनरुज्जीवन करणारी वास्तू म्हणजे शनिवारवाडा आहे. ब्राह्मण पुरोहितांना वरगाळ्याने दक्षिणा वाढत भोजनावळी घालण्याच्या स्मृती शनिवारवाड्याच्या निमित्ताने कष्टकरी बहुजन स्त्रीपुरुषांच्या मनात आजही कायम आहेत. १९ व्या शतकात सावित्रीज्योतीबांची शिष्या मुक्ताबाई मांग हिने देखील आपल्या प्रसिद्ध निबंधात त्यांना ‘लाडू खाऊ बामण’ असे म्हंटले होते. भोजनभाऊ संस्कृतीचे, जातीयवादाचे, कष्टकरी बहुजन स्त्रीपुरुषांच्या ज्ञानावर बंदी घालण्याचे कारस्थान शनिवारवाड्यातुन केले गेले आहे. त्याती प्रतिकृती ज्ञानकेंद्राच्या बोधचिन्हात असताच कामा नये. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातुन पर्वती टेकडी, स्वस्तिक आणि शनिवारवाडा काढुन टाकलाच पाहिजे. कारण पर्वती टेकडी ही पेशव्यांच्या रमण्यासाठी व त्यांनी तेथे बांधलेल्या कार्तिकेय स्वामीच्या मंदीरासाठी प्रसिद्ध आहे. ऐतिहासिकदृष्ट्या कालक्रमानुसारही (क्रोनोलोजी ) शनिवारवाडा १७३२ मध्ये बांधण्यात आला आहे तर त्याच्या तब्बल १०२ वर्ष आधी म्हणजे १६३० मध्ये शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवाबांसाठी लालमहाल बांधला होता. पुण्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तू म्हणून विद्यापीठाच्या बोधचिन्हात म्हणूनच त्याचा समावेश असणे संयुक्तिक आहे.  शनिवारवाडा बहुजन शेतकरीविरोधी, जातीवर्चस्वाचे प्रतिक, बहुजन स्त्रीपुरुषांच्या ज्ञानावर बंदी लादण्याचे प्रतिक आहे ते पुण्यात समस्त स्त्रिया आणि शुद्रादिशुद्रांसाठी ज्ञानाची कवाडे खुली करणार्‍या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या विद्यापीठाच्या बोधचिन्हात विषमतेची, शोषणाची प्रतिके काढलीच पाहिजेत.

शनिवारवाडा, पर्वती टेकडीवरील मंदीर ही पुण्याची सांस्कृतिक ओळख नाही. शनिवारवाड्याला ऐतिहासिक महत्व आहे, पण तो ज्ञानकेंद्रावर अभिमानाने मिरवण्याची वास्तू मात्र अजिबात नाही. पुण्याचे वैभव, अस्मिता, अभिमान असणारी आणि शनिवारवाड्या आधी बांधण्यात आलेली एक ऐतिहासिक वास्तू म्हणचे जिजाऊंच्या नेतृत्वात बांधण्यात आलेला लाल महाल! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात लाल महाल आणि सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र समाविष्ट करुन त्यातील शनिवारवाडा, स्वस्तिक व पर्वती मंदीर टेकडी तात्काळ काढुन टाकण्यात यावी. जुलमाची , शोषणाची प्रतीके बोधचिन्हांत चिरायू करणे सुसंस्कृत समाजास शोभत नाही.

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

1 Comment

  1. Name Not Needed Reply

    Hello Pratima Tai, thank you for writing this article. The Swastik is a holy symbol for Hindu religion, hence included in SBPPU.

    Is this demand a veiled attempt to remove Brahmin contribution to history by militant Sambhaji Brigade ? Sambhaji Brigade thrives on hatred and wants to make persecution a state wide agenda. While playing to progressive gallery, you may wish to take notice of their hatred for OBCs.

    Also, lest we forget, Sambhaji Brigade and other Supremacists have called Shaniwar Wada , Maharashtra’s 1st dance bar and home of prostitutes. But yes,okay with progressives as long as women, brahmins and peshwai is abused i guess.

    Perhaps Parvati Hill is an attraction for tourists and hence was included. How about doing away with the logo altogether ? I do not know if Horses and Elephants have anything to do with education. They are symbols if anything.

    I wish you all the best.
    Thanks.

Write A Comment