fbpx
राजकारण विशेष सामाजिक

भारतातील शिक्षणाची दुरवस्था

महाराष्ट्रात सध्या शैक्षणिक क्षेत्रात जोरदार घोडदौड सुरु आहे. म्हणजे तशी ही घोडदौड देशातच सुरू आहे म्हणा. न सुरू झालेल्या जिओ विद्यापीठाला उत्कृष्टतेचा दर्जा देऊन केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशासाठी एक नवा शैक्षणिक पायंडा घालून दिलेलाच आहे. आता त्यांचेच लहान भावंड असलेले विनोद तावडे सर्व ए व ए प्लस दर्जा असलेल्या शाळा महाविद्यालयांमध्ये भगवद् गीता वाटणार आहेत. यावर विधिमंडळात त्यांच्यावर विरोधकांकडून टिका झाल्यावर आम्ही कुराण व बायबलही वाटू असे विधान त्यांनी केले आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये यापुढे गीता, कुराण, बायबल यांचाच अभ्यास होणार असावा बहुदा. या देशातून पंडित, मौलवी, पाद्री यांचेच उदंड पीक निघावे व संपूर्ण जगताला भारतातून धार्मिक गुरूंचा पुरवठा व्हावा, असा तावडे यांचा उद्दात हेतू यामागे असू शकतो.

मूळात राज्यातील शालेय शिक्षणाची परिस्थिती काय आहे? ग्रामीण भागांमध्ये अनेक शाळांना इमारतीच नाहीत. शौचास उघड्यावर बसू नये हा स्तुत्य उपक्रम राबवणाऱ्या सरकारला लहान मुलांनी शिक्षण उघड्यावरच घ्यावे, त्यामुळे ज्ञानवृद्धी चटकन होते, असे वाटते काय? अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या तुटपुंजी. शिक्षकांना शिक्षण संस्था संचालकांच्या घरची धुणीभांडी करून उरलेल्या वेळात विद्यार्थ्यांना जमेल तसे शिकवावे लागते. त्यातही गरीब बहुजनांना शिकवून शहाणे करण्याचा विडा उचललेला एखादा फुले आंबेडकरवादी शिक्षक असलाच तर त्याला निवडणुकीपासून हागनदारीमुक्त गावाच्या प्रचारापर्यंत असंख्य कामे सरकारच लावून टाकते. अशा सगळ्या दिव्यातूनही अनेक मुलं शिकतात. नुसती शिकत नाहीत तर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसाही उमटवतात. त्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी या असल्या घर्मग्रंथांचा चांगला फायदा होऊ शकतो कदाचित. कर्म करत रहा. फळाची चिंता करू नका, असा थोर विचार एकदा का मनात रुजला की पुढचे सगळे मार्ग अगदी सुकर होणार यात वादच नाही.

आता या गीता वाटपाबाबत सध्याचा मोदीमय झालेला मिडियाही किती सजग आहे पहा. या सगळ्या प्रकारावर टीका करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड नागपूर विधिमंडळाबाहेर वृत्त वाहिन्यांसमोर आले असता त्यांना एकाने अगदी अनुनासिक स्वरात प्रश्न विचारला की तुम्हाला गीता पाठ आहे का? आता गीता पाठ असणे हा या देशात राजकारण करण्याचा किंवा ज्ञान असण्याचा निकष असू शकतो का? ज्या वंजारी समाजातून आव्हाड येतात त्या शूद्र समाजाला गीतेचे पठण केल्यास धर्मशास्त्राने काय शिक्षा दिल्या आहेत याची नोंद डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ‘शुद्र पूर्वी कोण होते’ या ग्रंथात केली आहे. शंबूकाला रामायणातच आपला जीव याच कारणामुळे गमवावा लागला होता. असो खरे तर आव्हाड या अनुनासिक स्वरात बोलणाऱ्या पत्रकारांस तुकोबांचा अभंग ऐकवू शकले असते ‘ वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांना वहावा भार माथा।’ पण आव्हाडांवरही इथल्या उच्च वर्णीय सांस्कृतिक वर्चस्वाचा परिणाम आहेच. त्यामुळे त्यांनी यदा यदाही धर्मस्य ग्लानीर्भवती भारत: वगैरे म्हणायला सुरुवात केली. त्यांची गंमत बघत बरेच अनुनासिक स्वरातील पत्रकार तिथे उभे होते. हं म्हणा आता पुढे असे ज्ञानदेवांनी जसे रेड्याला सांगितले त्या थाटात ते या विरोधी पक्षाच्या आमदाराला सांगत होते. आता गीता तोंडपाठ असणं यात बुद्धीचा कणभरही कस लागत नाही. पाठांतर ही एक सवय आहे. जगातिल सर्व मानसतज्ज्ञांनी यावर विपुल लिखाण केले आहे. बुद्धीचा निकष जर पाठांतर असेल तर भटजी, मौलाना वा पाद्रीच जगातीव सर्वात बुद्धीमान म्हणावे लागले असते. किंबहुना आहे ते नेमके या उलट. कारण युरोपमध्ये ख्रिस्ती जगतात झालेला रेनेसाँ, इस्लाममधील अब्बासीद घराण्याच्या काळातील मुत्तझील सांस्कृतिक क्रांती आणि हिंदू संस्कृतीतील चार्वाकांपासून, बुद्ध, महावीर ते अगदी आजवरच्या अनेक बुद्धीवंतापर्यंत सगळ्या महत्त्वाच्या सांस्कृतिक क्रांत्या ज्यातून मनुष्याने ज्ञान शाखा विकसित केल्या त्या मुळात धर्मातील या बिनडोकपणाला नाकारण्यातूनच झाल्या.

या असल्या ब्राह्मण्यवादी भंपकपणाला नाकारल्यामुळेच महात्मा फुले महात्मा झाले. त्यांच्यामुळे स्त्रिया, शूद्रांना शिक्षणाची कवाडं उघडी झाली. गीतेचेच पठण करणाऱ्या पेशवाई पगडीतील सदाशीवपेठींनी तेव्हा सावीत्रीमाई आणि ज्योतीबांवर शेणगोटे मारले होते. मात्र गीतेचे पठण करणे किंवा गीता तोंडपाठ येणे हे केवळ पवित्रच नव्हे तर महान ज्ञानाची प्रचिती देणारे कृत्य आहे, असेच सध्या वातावरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळेच मग एबीपी माझासारख्या वाहिनीवर गीतेतील श्लोक म्हणायला सांगितल्यावर आव्हाडांची उडाली फेफे अशा बातम्या तयार होतात. त्यावर ब्राह्मणी नेणिवांमुळे आव्हाडांसारखे बहुजन मी श्लोक म्हणून दाखवले, असे त्याचे न्यूनगंडातून समर्थन करत बसतात. गीता वाचण्यापेक्षा मी आषाढ महिन्यात तुकोबा वाचेन, असे संत साहित्यावर पीएचडी केलेल्या आव्हाडांना सांगता आले असते, पण शेवटी खोल नेणिवेत काय रूजलय ते महत्त्वाचे असते व ते असे नको त्या वेळी बाहेर येते. बहुजन समाजाला तुकोबा आणि महात्मा फुले हाडाची काडं करूनही पूर्ण शहाणे करू शकले नाहीत, ही ब्राह्मणी व्यवस्था इतकी खोलवर सर्वदूर पसरली आहे की प्रत्येक पावलावर लढाई आहे. तीसुद्धा ब्राह्मणी विचारांच्या बहुजनांशीच, त्यामुळे आपल्यासारखे यत्किंचित काय करणार, असे उद्वेगजनक उद्गार चळवळीतील माझा एक मित्र कायम काढायचा. देशातील ज्ञानोपासना ही अशी उलट्या दिशेला वाहताना पाहून अनेकदा असाच उद्वेग दाटून येतो. तुकोबा, ज्योतिबा, सावित्रीमाई, बाबासाहेब तुमची लढाई पुढे न्यायची तर खांदे खूप मजबूत हवेत. आमचे तितके आहेत की नाहीत याचीच खात्री वाटेना झालीय. तुमच्या विचारांनी कधीतरी अंगार फुलेल या आशेवरच जगायचं, तोवर कर्मण्येवाधिकारस्ते ना फलेषु कदाचन। म्हणत संथ पडून रहावे की काय अशीच परिस्थिती आहे.

लेखक न्यू जर्सी स्थित राजकीय विश्लेषक आहेत.

Write A Comment