fbpx
विशेष

करुणानिधी आणि द्रविडी राजकारण

There is no god, there is no god, there is no god at all. He who created god is a fool, he who propagates god is a scoundrel, and he who worships god is a barbarian.

 

देव नाही, देव नाही, देव कुठेच नाही. ज्याने देव निर्माण केला तो मूर्ख आहे. ज्याने देवाला मोठं केलं तो बदमाश आहे आणि जो देवाची पूजा करतो तो असंस्कृत आहे.

१९३० च्या दरम्यान अशी घोषणा करून इ व्ही रामस्वामी नायकर ‘पेरियार यांनी तामिळनाडूच्या ब्राह्मणी संस्कृतीला मोठं आव्हान दिलं होतं. रामाच्या फोटोलो चप्पल मारा, गणपतीच्या मूर्ती तोडा, अशी अनेक क्रांतीकारी आणि जहाल आंदोलनं त्यांनी राबवली. मनू विरोधी, जातीविहीन, बौद्ध विचाराचाही प्रभाव असलेली सेल्फ रिस्पेक्ट चळवळ उभी करून ब्राह्मणेतर जातींना आत्मभान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्या पेरियारांच्या आंदोलनाने मध्यम जातीतला एक शेतकरी मुलगा त्यांच्याकडे आकर्षित झाला आणि पूर्णवेळ शोषितांसाठी काम करण्याचा त्याने विडा उचलला. तामिळ भाषेवरील उत्कृष्ट प्रभूत्वामुळे चित्रपटांसाठी पटकथा लिहू लागला. ते लिहिता लिहिताच राजकारणामध्ये उतरून तामिळनाडूचा मुख्यमंत्रीही झाला. एम. करुणानिधी यांच्यावर पत्रकार संध्या रवीशंकर यांनी अलीकडेच लिहिलेलं ‘ करुणानिधी- ए लाईफ इन पॉलिटिक्स’ हे चरित्र प्रसिद्ध झालं आहे. संध्या या गेली १३ वर्ष पत्रकारितेत असून टीव्ही, वृत्तपत्र आणि वेब पोर्टल अशा विविध माध्यमांतून त्यांनी दक्षिण भारतामध्ये पत्रकारिता केली आहे.

अण्णा द्रमुकच्या नेत्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांचं २०१६ मध्ये निधन झालं तर अत्यंत हुशार आणि पेरियार व अण्णा दुराई यांच्या तालमित तयार झालेले करुणानिधी गेल्याच महिन्यात ९५ वर्षांचे झाले असून राजकारणापासून दूरच झालेत. त्यामुळे गेले वर्षभर तामिळनाडूनमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा अनेकांनी प्रयत्न करून पाहिला. सरकार सत्तेत येतं, पडतं, राष्ट्रपती राजवट लागू होते का, पक्षांतर्गत फूट त्याचा फायदा करून घेण्यासाठी भाजपने हातपाय मारणं असली सगळी राजकीय नाट्य आपण पाहिली. पण करुणानिधी किंवा जयललिता यांच्याप्रमाणे भक्कम सरकार देणं कोणालाच जमलं नाही. केवळ राज्यामध्ये पुन्हा निवडणुका लागू नयेत एवढी राजकीय परिस्थिती नियंत्रणात राहिली.

या पार्श्वभूमीवर करुणानिधी यांचा राजकीय प्रवास, त्यांची द्रविड अस्मितेची चळवळ, सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्यायासाठी केलेली अनेक कामं, बाबरी मशीद पाडायला केलेला विरोध, एनडीएचा घटक पक्ष असूनही भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा राम सेतू अस्तित्वात नसल्याचं कोणाचीही भीड न बाळगता बोलणारा नेता, जयललिता मुख्यमंत्री झाल्यावर रात्री एक वाजता तुरुंगाची हवा खाणारा पण पुन्हा पुरत येऊन मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवणारा धुरंधर राजकारणी या पुस्तकाच्या माध्यमातून समोर उभा राहतो. पत्रकारितेमध्ये नवीन असताना करुणानिधींची मुलाखत घ्यायची पहिली संधी मिळाली तेव्हाच संध्या यांना त्यांच्या राजकीय बुद्धीमत्तेचं आकर्षण वाटलं. तेथूनच या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला.

तामिळ संस्कृती आणि द्रविडी आत्मभान या दोन पायांवर द्रमुक पक्ष उभा राहिला. हिंदी विरोधी आंदोलनाने या पक्षाला राष्ट्रीय राजकारणामध्ये ओळख दिली. सुरुवातीला केवळ सामाजिक कार्यामध्ये असलेला हा पक्ष १९५६ च्या सुमारास लोकाग्रहास्तव निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरला आणि १९६७ मध्ये पक्ष बहुमताने सत्तेवर निवडून आला. तिथूनच भारतीय राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढू लागलं. सध्या महाराष्ट्रामधील शिवसेना किंवा मनसे सारखा पक्ष काहीशी अशीच मराठी अस्मिता घेऊन राजकारण करत आहेत. पण द्रमुकने प्रत्यक्षात साकार केलेला सामाजिक न्याय आणि ब्राह्मणेतर जातींना दिलेली सामाजिक सुरक्षितता या मराठी मराठी म्हणणाऱ्या पक्षांच्या गावीही नाही. द्रमुक आणि शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांमधला हाच सर्वात मोठा फरक आहे.

तर द्रमुक सत्तेत येताच दोनच वर्षांत करुणानिधी मुख्यमंत्रीही झाले आणि समाजकारणाबरोबरच सत्ता टिकवण्याचं राजकारणही सुरू झालं. द्रमुकच्या सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेऊन तामिळनाडूच्या सामाजिक परिस्थितीत खूप सुधारणा केली. त्यामध्ये कमाल जमीन धारणा कायदा केला. जास्तीत जास्त १५ एकर जमीन एकाच्या मालकीची ठेवून उरलेल्या जमिनीचे फेरवाटप केलं. शेतकरी राहत असलेल्या जमिनीचे पट्टे त्यांच्या नावावर करून दिले. विद्यार्थ्यांसाठी मध्यान्य भोजनाची योजना आणखी मजबूत केली.

पण समाजामध्ये असे लोकप्रिय निर्णय घेत असतानाच करुणानिधी यांचे परममित्र आणि तामिळ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन किंवा एमजीआर यांच्या मैत्रित तणाव निर्माण होऊ लागला. या दोघांनी फिल्ममधील आपलं करिअर एकत्र सुरू केलं होतं, एकत्र स्ट्रगल केलं होतं आणि करुणानिधी यांच्या आग्रहाखातर एमजीआर यांनी द्रमुक पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं. पण राजकारणात आल्यावर प्रत्येकाच्या आकांक्षा वाढतात आणि त्या दुसऱ्याच्या आड येऊ लागतात. तसंच काहीसं या दोन मित्रांमध्ये झालं. एका गटाचं म्हणणं असं आहे की, एमजीआर यांनी आरोग्यमंत्री पद मागून घेतलं त्यावेळी करुणानिधी यांनी त्यांना फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकून पूर्णवेळ राजकारणात उडी घ्यायला सांगितलं. मात्र ते एमजीआर यांना मान्य नव्हतं कारण ते तेव्हा टॉपचे अभिनेते होते. काहींच्या मते, एमजीआर आपली सह कलाकार जयललिता यांना द्रमुकच्या माध्यमातून राजकारणामध्ये आणण्यास उत्सुक होते. ते करुणानिधींनी अमान्य केलं. खरंतर करुणानिधींची ती चूकच म्हणायला हवी. कारण मूळच्या कर्नाटकच्या, जातीने ब्राह्मण असलेल्या जयललिता या राजकारणात पूर्णपणे उतरल्यावर करुणानिधींसारख्या मुरब्बी राजकारण्याला भारी पडल्या.

अर्थातच पक्षाचे दोन तुकडे झाले आणि १९७७ ते १९८७ अशी तब्बल १० वर्ष करुणानिधी यांना विरोधी पक्षात बसावं लागलं. त्यावेळी अर्थातच एमजीआर मुख्यमंत्री झाले. याच दरम्यान, करुणानिधी यांनी इंदिरा गांधींशी चांगले संबंध असूनही आणीबाणीच्या विरोधी उघड भूमिका घेतली. त्याची शिक्षा त्यांच्या मुलाला म्हणजे स्टॅलिनला झाली आणि त्याला तरुंगात डांबवण्यात आलं. एमजीआरच्या मृत्यूनंतर करुणानिधी यांना पुन्हा सत्तेत येण्याची संधी चालून आली आणि दोनच वर्षात ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण तो आनंद अल्पकाळच टिकला. एलटीटीई या श्रीलंकेतल्या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप होऊन तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी सरकार बरखास्त केलं. त्यानंतर मात्र आळीपाळीने एकदा जयललिता तर एकदा करुणानिधी यांचं सरकार येत गेलं. दोघांनी एकमेकांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात धाडणं, टीव्ही, मिक्सर अशा एकामागोगाम एक गोष्टी मोफत वाटून मतदारांना आकर्षित करणं असं लोकप्रिय राजकारण मग दोघे करू लागले.

पण करुणानिधींच्या राजकारणाला सगळ्यांत मोठे दोन धक्के बसले ते म्हणजे राजीव गांधी यांची एलटीटीईने हत्या केल्यावर त्यांच्याशी संबंध असल्याचा झालेला आरोप आणि २जी स्पेक्ट्रम भ्रष्टाचाराचा आरोप होऊन स्वतःच्या पक्षाचा मंत्री आणि मुलगी कनिमोई यांना झालेला तुरुंगवास. खरंतर करुणानिधी आणि राजीव गांधी यांचे चांगले संबंध होते. तसंत करुणानिधी यांनी तामिळ आत्मभानाचा मुद्दा लावून धरला असला तरी त्यांनी दहशतवादी एलटीटीईबद्दल सहानुभूती व्यक्त केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा संबंध थेट दहशतवादी संघटनेशी आणि पर्यायाने राजीव गांधी यांच्या हत्येशी जोडणं हे राजकारणामध्ये एक मोठा धक्का होता. पण त्यातूनही ते सावरले आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये अापलं असं एक स्थान निर्माण केलं. यूपीएच्या सरकारमध्ये ते एक महत्त्वाचा घटकपक्ष होते. पण टूजी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यामध्ये त्यांच्या पक्षाचे मंत्री ए राजा आणि खासदार कनिमोई यांना दोषी ठरवून तुरुंगवास पत्करावा लागला. शेवटी ते निर्दोष सुटले. पण या सर्व प्रकारात पक्षाची मात्र प्रतिमा राष्ट्रीय राजकारणामध्ये मलीन झाली आणि त्याचवेळी जयललिता यांनी ती संधी साधून त्या निवडून आल्या. मात्र जयललिता यांना मुख्यमंत्री म्हणून मिळालेली सलग दुसरी संधी पूर्ण करता आली नाही. त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

द्रविड चळवळीला आता ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. ब्राह्मणी मक्तेदारी, जातीयवाद आणि हिंदी भाषेला विरोध करून तिने तामिळ अस्मिता रुजवली. मात्र अशा टप्प्यावर दोन प्रमुख नेते राजकारणातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आतापर्यंत प्रगतीपथावर असलेलं राज्य एकदम कुठेतरी थांबल्यासारखं झालयं. या पुढे होणाऱ्या राजकारणामध्ये स्टॅलिनकडे आशेने बघितलं जात आहे. पण तामिळ अस्मितेचं राजकारणाला एका नवीन दिशेची गरज आहे. ती जो राजकारणी किंवा पक्ष देईल तो उद्याचा नेता राहील.

देशाचं राजकारण कायम उत्तरेकडील पक्षांनी व्यापलेलं असताना दक्षिण भागात होणाऱ्या अनेक चळवळी, राजकारणातील उलाढाली, सामाजिक बदल हे नजरेआड होतात. त्याकडे या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे. करुणानिधी हे स्वतः राष्ट्रीय राजकारणात उतरले नसले तरी जो प्रदीर्घ काळ ते राजकारणामध्ये आहेत तो महत्त्वाचा आहे. कारण केवळ एक साधा कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून समाजकारण करता करता ते राजकारणामध्ये आले. द्रमुक काय किवा अण्णा द्रमुक काय दोन्ही पक्षांनी आपली द्रविडी मूळं अद्याप सोडलेली नाहीत. त्यामुळेच २०१४ साली मोदींच्या लाटेतही जयललिता बहुमताने निवडून आल्या. करुणानिधींचं हे चरित्र हा द्रविद राजकारणाचा एक प्रवास आहे आणि त्याचबरोबर एक तामिळनाडू सारखं एक राज्य विकसित होण्याचाही. आज जेव्हा पुन्हा एकदा भारतीय राजकारणात एकाधिकारशाही अयशस्वी ठरत असताना प्रादेशिक पक्षांचं महत्त्वं वाढलं आहे. अशावेळी प्रादेशिक पक्षांचं राजकारण कसं असू शकतं याचं चांगला आढावा या पुस्तकाच्या निमित्ताने मिळतो.

लेखिका राईट अँगल्सच्या नियमित वाचक, हितचिंतक आहेत.

1 Comment

  1. This man Karunanidhi should not be praised because his family has made billions from various enterprises which were fostered during his regime. What has he doen to improve the lot of Tamil people? His nephew Raja is implicated in the 2G scam. Leaders such ahs him have looted India. I personally do not respect such leaders.

Write A Comment