fbpx
राजकारण

हार्वर्डात प्रेमाचे अडिच अक्षर शिकवत नाहीत…!!

संत कबिरांच्या ६२० व्या प्रकटदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी अलिकडेच उत्तर प्रदेशमधील मगहर येथील त्यांच्या मजारवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी पुन्हा एकदा भारतीय इतिहासाचे त्यांचे म्हणून जे आकलन आहे, त्यावरून वाद निर्माण झाला. मोदीजी आपल्या औघवत्या शैलीत समोर जमलेल्या श्रोत्यांना म्हणाले की गुरु नानक, बाबा गोरखनाथ आणि कबीर इथेच बसून अध्यात्मावर चर्चा करायचे. आता गुरु नानक आणि गोरखनाथ यांचा कार्यकाल ११ व्या शतकातील तर कबीर हे चौदाव्या शतकातील. मोदीजींच्या सांगण्यावरून एखाद्या विद्यार्थ्याने असं उदाहरण इतिहासाच्या परिक्षेत लिहिलं तर तो नापासच व्हायचा, पण मोदीजी हे काही इतिहासाच्या परिक्षेला बसलेले नसल्याने त्यांना त्याचा काही फरक पडत नाही. पुन्हा मोदीजींना त्यांचं काही चुकलय हे दाखवलेलं त्यांना तर आवडत नाहीच पण त्यांच्यापेक्षा त्यांच्या भक्तांचा तर त्यामुळे खूप राग राग होतो. असो आता या घटनेलाही तसे खूप दिवस झाले. सध्या भारतीय राजकारणात दररोज इतक्या गमती जमती घडत असतात की इतका जुना विनोद सांगितल्यामुळे एखाद्याला कंटाळा यायाचा. पण कबीरांचे महात्म्य मोदीजींना आणि त्यांच्या भक्तांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील कितीजणांना किती समजले आहे हे माहित नाही. माहित नाही हा त्यांना संशयाचा फायदे देण्याचा भाग झाला. कारण त्यांच्या कृतीवरून ते बिलकूलच समजलेले असावे, असे वाटत नाही.

कबिरांनी सांगितलं होतं पोथी पढि पढि जग मुआं पंडित भया न कोय, ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय… कबीर म्हणतात की, खूप अभ्यास करून आणि पुस्तकं वाचून कुणी विद्वान होत नसतो. प्रेम या अडिच अक्षरांचा अर्थ जर तुम्ही समजून घेतलात तर या जिवनात तुम्हाला खरी ज्ञानप्राप्ती झाली असं समजावं. आता कबीर जे म्हणतात ते खरं की खोटं याचा शोध घेण्याची ही जागा नाही. मात्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील जयंत सिन्हा हे राज्यमंत्री कबिराच्या या म्हणण्याचे अगदी यथोचित उदाहरण म्हणून पाहता येईल. जयंत सिन्हा हे आयआयटी मधून इंजिनिअर झाले मग त्यानंतर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया, मग तिथून अमेरिकेतील हार्वड विद्यापीठ. अबबब म्हणजे कुठल्याही मध्यमवर्गीय उच्च वर्णीय घरातील आई बापाचे जे आपल्या मुलाबद्दलचे स्वप्न असते, ते जयंत सिन्हांनी साकार केले. हे जयंत सिन्हा झारखंडमध्ये गोमांसांच्या संशयावरून अलिमुद्दीन अन्सारी यांची निर्घृण हत्या करण्याचा आरोप असलेल्यांना भेटले. हे आरोपी जामिनावर तुरुंगातून सुटून बाहेर आले होते. त्यांना उच्च विद्याविभुषित जयंत सिन्हा यांना भेटण्याची उर्मी आली. मग ते जयंत सिन्हा यांना भेटायला गेले. गोमांसांच्या संशयावरून माणसाला ठार मारणाऱ्या या महान योद्ध्यांना जयंत सिन्हा कसे भेटणार नाहीत? ते मोदीजींच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहे. मेलेला अलिमुद्दीन आहे ना. कबीर कुठल्या धर्माचे होते याबाबत वादंग आहेत. मात्र या महात्म्याने सहाशे वर्षांपूर्वी काय सांगून ठेवले…? “हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना, आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए, मरम न कोउ जाना।” हिंदू म्हणतात आमच्यासाठी राम हेच आदर्श आहेत तर मुसलमान म्हणतात रहीम, दोघे आपसात लढून मरतात पण तरीही त्यांना सत्य काय आहे हे समजतच नाही… कितीही द्रष्टेपणा! किंवा सध्याच्या गिरीराज सिंग, साक्षी महाराज, सोगी आदित्यनाथ वगैरेंच्या काळात म्हणायचं तर किती हा अगोचरपणा!?? आता कबिरांचं हे असं काही तरी म्हणणं मोदीजींच्या मंत्रिमंडळातील सदस्याला कसे काय मान्य असू शकतं? कबिराच्या मजारवर गेल्यावर तिथे प्रथेप्रमाणे डोक्यावर टोपी घालण्याची प्रथा आहे. पण आपले पंतप्रधान जाज्ज्वल्य हिंदुत्ववादी, त्यांनी उघड्या डोक्यानेच चादर वाहिली. चांगलं आहे, या देशात अशा प्रकारे प्रथा परंपरांना मोडले जाणे ही चांगलीच बाब आहे. फक्त हे पुरीच्या जगन्नाथ मंदिरात मात्र त्यांनी करण्यास धजू नये. कारण तिथे मोदीजींपेक्षा एक पायरी वर असलेल्या राष्ट्रपती कोविंद यांनाही दलित म्हणून गाभाऱ्यात प्रवेश नाकारला गेला आहे. मोदीजी ओबीसी म्हणजे धर्मशास्त्राप्रमाणे शूद्र आहेत. प्रियांका गांधी त्यांना नीच बोलल्याचे त्यांनी २०१४च्या निवडणुकीत मोठे भांडवल केलेलेच आहे. त्यामुळे त्यांनी या प्रथा परंपरा सुफी दर्ग्यांवरच मोडाव्यात, या देशात कुणाला का होईना आधुनिकतेची कास ते धरायला लावत आहेत ही स्वागतार्हच बाब म्हणायला हवी. तर सांगण्याचा मुद्दा काय की, जयंत सिन्हा त्या अलिमुद्दीन या गरीब निशस्त्र माणसाला ११ जणांनी ठेचून मारल्याचा आरोप असणाऱ्यांना भेटले. नुसते भेटले नाहीत तर त्यांचा झेंडुच्या फुलांचा हार वगैरे घालून अगदी यथोचित सत्कार वगैरे केला. नंतर यावर देशभरातील उदारमतवाद्यांनी ओरड केल्यावरही त्यांनी यापासून पाठ फिरवली नाही. कारण ते पेनसिल्व्हानिया व हार्वड वगैरेमध्ये शिकलेले असल्याने त्यांच्यात जो बाणेदारपण मुरला आहे, त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीचे समर्थनच केले. मी जे काय केले ते कायद्याच्या चौकटीतच राहूनच, अशा आशयाचे ते समर्थन होते.

या देशात अशा काही कहाण्या तयार झाल्यात की ज्यामुळे सामान्य माणूस संभ्रमात पडू शकतो. माणूस शिकला की त्याची प्रगती होते. भारतातील जातीवाद, धार्मिक उन्माद यांमागे या देशातील निरक्षरता किंवा अशिक्षितपणा हे महत्त्वाचे कारण आहे, वगैरे बरेच गैरसमज या देशात पसरलेले आहेत. विशेषतः मध्यमवर्गात हे खूप खोलवर आहेत. वाचाल तर वाचाल वगैरे ओळीतर एसटी महामंडळाच्या बसवर वगैरेही लिहिलेल्या असतात. त्यामुळे अनेकदा लोक रोखठोक वगैरे वाचत वाचतात… असो. कबिराने सहाशे वर्षांपूर्वी सांगून ठेवलेल्या सत्याकडे दुर्लक्ष केल्याचाच हा परिणाम असावा. नाहीतर बघाना संघाचे प्रथम सरसंघचालक डॉक्टर, दुसरे सरसंघचालक एमएससी होते. जमात ए इस्लामीचे संस्थापक मौलाना मौदुदी हेसुद्धा आधुनिक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते. इतकेच कशाला झाकीर नाईकसुद्धा डॉक्टर आहेत. आपल्या जेजे रुग्णालयाला संलग्न वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी मिळवलेले. ही यादी खूप मोठी करता येईल. उदाहरणार्थ लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुब्रमण्यम स्वामी वगैरे…

जयंत सिन्हा यांनी त्या आरोपींना भेटून त्यांचा सत्कार वगैरे केला. वर त्याचे समर्थन केले. त्यामुळे त्यांचे आता अलिमुद्दीनच्या खुनाबद्दल काय मत आहे, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे, जे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. कदाचित संगित सोम याच्याप्रमाणे तेही अलिमुद्दीनच्या कुटुंबाची चौकशी करा वगैरे म्हणू शकतात. कारण अखलाकच्या खूनानंतर संगीत सोम यांनी अखलाकच्या कुटुंबाचीच चौकशी करावी, त्यांच्या घरात गोमांस ठेवले होते की नाही हा समस्त हिंदू धर्माच्या आस्थेचा प्रश्न आहे वगैरे सांगितले होते.

आपल्या देशात इंग्रजी येणे ही ज्ञानाची पहिली कसोटी आहे. इंग्रजी चांगले येणे ही ज्ञानाची शेवटची कसोटी आहे. एखाद्यास इंग्रजी न येणे म्हणजे त्याची नोंद या देशातील निरक्षरांच्या यादीतच होते. प्रश्न असा आहे की, इंग्रजी येणारे हे कायम उदारमतवादी असतात असा भ्रम या देशातील भंपक अभिजन डाव्यांनीही करून ठेवला आहे. पुरोगामी विचारांच्या प्रसारातील अडथळ्यांमध्ये हा भंपक हायपोथिसीस हा प्रमुख अडथळा आहे. मोदी या इंग्रजी न येणाऱ्या आक्रमक हिंदुत्ववाद्याने देशातील तमाम इंग्रजी येणाऱ्यांना जे काय कामाला लावलं तेही बघण्यासारखं आहे. जयंत सिन्हांसारख्याला राज्य मंत्री ते हजारो फर्राटेदार इंग्रजी बोलणाऱ्यांना चाळीस पैसे प्रतिपोस्टचा भाव देऊन ट्रोलर अशी विविध कामे त्यांनी लावून दिली आहेत.

सिन्हासारख्या पश्चिमेत शिकलेल्या माणसाने असे का केले असावे, असा एक प्रश्नवजा सूर इंडिया इंटरनॅशन सेंटरमध्ये सेमिनारमधून क्रांती क्रांती खेळाणाऱ्या काही उदारमतवाद्यांनी लावला आहे. जणू काही आयआयटी, युपेन, हार्वर्ड अशी वारी केल्यानंतर माणूस माणसाला माणसाप्रमाणेच वागवायला शिकतो, असा एक काहीसा अन्वयार्थ या सूरवटी आळवणाऱ्यांच्या नेणिवेत रुजलेला असावा. या देशातील कबीर, बुल्लेशहा, तुकोबा, चोखा मेळा अशी महान गावरान संत मंडळींनी या असल्या अभिजनांच्या अप्पलपोटी मानसिकतेची चिरफाड कित्येक शतकांपूर्वीच करून ठेवलीय. या देशातील भांडणं, तंटे, राडे, लफडी, यातूनही भारत नावाच्या भूभागावर काहीतरी एक समानतेचा धागा आहे. भांडणानंतर येणाऱ्या, रागानंतर येणाऱ्या, लफड्यानंतर येणाऱ्या, राड्यानंतर येणाऱ्या प्रेमाचा तो धागा आहे. त्या प्रेमाच्या अडिच अक्षरांचा अभ्यास उजव्या बाजूच्यांना वर्ज्यच आहे म्हणा, आणि डाव्या बाजूच्यांना असं काही असतं हे माहितच नसावं. सध्या देशात जो तिढा निर्माण झालाय तो नेमका हाच आहे. प्रेमाच्या अडिच अक्षरांचा अभ्यास वर्ज्य असणाऱ्यांनी पाश्चिमात्य नव्या तंत्रज्ञानाच्या जोरावर एत्तदेशीय सनातऩ धर्माचा भोंगा इतक्या जोरात वाजवायला सुरुवात केली आहे की तीच आदर्श व्यवस्था असावी असा भ्रम अनेकांच्या मनात तयार होतो आहे. त्यामुळेच तर तुकोबांपेक्षा मनू श्रष्ठ होता हे उघड बोलण्याची मनोहर भिडेंची हिंमत होते. भारतीय सामाजिक, सांस्कृतिक जगतात काळच असा उभा राहिला आहे की, उजवा विचार हाच खरा डावा विचार आहे, असे आता भल्या भल्यांना वाटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच आंबे खाल्ल्याने मुलं होतात, या विधानानंतर एबीपीसारख्या चॅनलवरून `हेच ते वादग्रस्त आंब्याचे झाड,’ अशी शोधपत्रकारिता केली जाते आणि भिडे हे कसे साधे राहतात यावर बीबीसी मराठी बातम्या करतं. या सगळ्याला छेद द्यायचा असेल, तर प्रेम या अडिच अक्षरांचे अन्वयार्थ लक्षात घ्यावे लागतील. ते आपल्याच इतिहासात, परंपरांमध्ये लपलेले आहेत. ते समजून घेऊन या भोंग्यांच्या कोलाहलात सांगण्याचं काम करावं लागेल. त्या शब्दांची ताकद इतकी मोठी आहे की, भोंग्यांची ताकद नक्कीच त्याच्यापुढे कमी पडेल!

लेखक एक राईट अँगल्सचे नियमित वाचक आहेत.

Write A Comment