fbpx
राजकारण विशेष

आज भारतात शांततेचा प्रसार कसा करायचा?

आपण अशा काळातून जात आहोत, जिथे समाजातील दुर्बल घटक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांविरुद्धचा द्वेष प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गोमांसाच्या कारणास्तव जमावाकडून होणाऱ्या हत्या आणि विशिष्ट जातींना दिली जाणारी अपमानकारक वागणूक, दलितांना होणारी मारहाण, या पाठोपाठ देशभरात आता मूलं चोरल्याच्या अफवेमधून जमावाकडून होत असलेल्या हत्या  वाढत आहेत. राजकीय पातळीवरुन या कृत्यांना असलेली मान्यता पाहून हे जमाव अधिकच प्रोत्साहीत झाल्यासारखे वाटतात. महेश शर्मा यांच्यासारखा मंत्री दादरी घटनेतील आरोपीच्या अंत्ययात्रेला उपस्थित होता, तर अलिमुद्दीन हत्याप्रकरणातील आरोपींना जामीन मिळाल्यावर जयंत सिन्हा यांनी त्यांचे स्वागत केलं. आता बलात्कारासारख्या भीषण घटनांनासुद्धा सांप्रदायिक वळण दिलं जातं. एका बाजूला फेक न्यूजचा बिनधास्त वापर होतो तर दुसरीकडे बलात्कारातील आरोपींना सामाजिक पाठींबा मिळतो. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये भितीदायक प्रमाणात वाढ होत आहे. कथुआ प्रकरणात झालेल्या अटकेचा निषेध करण्यासाठी म्हणून हिंदू मंचने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपचे मंत्री चौधरी लाल सिंग आणि चंदर प्रकाश गंगा यांची हजेरी ही शरमेची बाब आहे.

आता मंदसौर बलात्कार प्रकरणात, एका समुदायाला वाईट ठरवण्यासाठी त्या घटनेला चुकीचं वळण दिलं जात आहे. या प्रकरणातील आरोपी मुस्लिम समाजातील होते. या आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून मुस्लिम गटांनी मोर्चा काढला. आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी काढलेल्या मेणबत्ती मोर्चात कॉंग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया सहभागी झाले होते. मात्र ते जणू काही आरोपींच्या सुटकेचीच मागणी करत आहेत, असा द्वेषपूर्ण संदेश पसरविण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर केला गेला. मुस्लिमांची वाईट प्रतिमा रंगवण्याच्या उद्देशाने मोर्चाच्या छायाचित्रांत फोटोशॉपच्या माध्यमातून फेरफार केले गेले. एक असा संदेश सोशल मिडियामधून पसरवला गेला केला, ज्यात म्हटलं होतं की, मुस्लिम समाजातील सदस्यांनी एकत्र येऊन गुन्ह्यातील अपराध्याला सोडण्याची मागणी केली कारण अन्य धर्मिय महिलांवर बलात्कार करण्यास कुराणाची मंजूरी असते.

मंदसौर मोर्चातील फलकांवरचा मजकूर होता, “आम्ही मुलींवरचे हल्ले सहन करणार नाही, हे क्रौर्य थांबवा.” पण एक ट्वीट फिरवले गेलं की, “एनसीआरबीच्या अहवालानुसार भारत हा महिलांसाठी सर्वात धोकादायक आहे कारणः भारतात, ९५ टक्के बलात्कार प्रकरणांत गुन्हेगार मुस्लिम असतात. बलात्काराच्या एकूण ८४,७३४ घटनांपैकी ८१,००० बलात्कारांच्या घटनांमध्ये बलात्कार करणारे मुस्लिम होते आणि ९६ टक्के बळी हे अन्य-धर्मिय आहेत आणि त्यांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे, बलात्काराच्या घटनाही वाढतील.”

यापेक्षा खोटा प्रचार काही असूच शकत नाही. एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरो) बलात्काराच्या प्रकरणांत धर्माची नोंदच करत नाही. हे ट्वीट आणि ज्योतिरादित्य सिंधियांबाबतचे ट्वीट अाल्टन्यूज या फेक न्यूजच्या विरोधात काम करणाऱ्या वेबसाइटने उघडं पाडलं. आल्टन्यूज हे एक असं पोर्टल आहे जे फेक न्यूजच्या मूळापर्यंत जातं आणि सत्य समोर आणून, धार्मिक अल्पसंख्यांकांना जाणीवपूर्वक खलनायक ठरवणाचा प्रयत्न करणाऱ्या बातम्यांना उघडं पाडतं. खरं तर हे काम करुन ते समाजाची मोठीच सेवा करत आहेत. मुझ्झफरनगर प्रकरणात आपल्याला आठवेल;  मुसलमानांसारख्या दिसणाऱ्या लोकांच्या गर्दीकडून तरुणांना मारहाण होत असल्याचे फोटो पसरवून हिंसा भडकवली गेली. हिंदू युवकांना मारलं जात असल्याचे दाखवलं गेलं. तो फोटो प्रत्यक्षात पाकिस्तानातील होता आणि लोक दोन चोरांना मारत होते.

कैरानामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणूकीत निवडून आलेल्या महागठबंधनच्या उमेदवार तब्बसूम हसन यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. निवडणूक जिंकल्यावर त्या म्हणाल्या, “ हा सत्याचा आणि ‘महागठबंधन’ चा विजय आहे आणि राज्य आणि केंद्रातील भाजपचा पराभव आहे. प्रत्येक जण बाहेर पडला आणि आम्हाला पाठींबा दिला. मी त्यांना धन्यवाद देते.” पण सोशल मिडीया आणि टीव्हीवरील चर्चांमध्ये असे दाखवले गेले की, “हा अल्लाचा विजय आहे आणि रामाचा पराभव आहे.” भाजपचे समर्थन करणाऱ्या अनेक फेसबुक पेजेसवर हे वाक्य पोस्ट केलं गेलं, ज्यामध्ये योगी आदित्यनाथ – ट्रू इंडीयन या अकाउंटचाही समावेश होता. त्यावरून १ जूनला हे पोस्ट केलं गेलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात शेअर केलं गेलं.

स्वाती चतुर्वेदींनी त्यांच्या “आय एम ट्रोल” पुस्तकामध्ये सांगतल्याप्रमाणे अलिकडच्या काळात हजारो ट्रोल्सचा वापर करुन भाजप जाणूनबुजून सोशल मिडीयाचं वातावरण गढूळ करत आहे. एकूणच या मुस्लिम विरोधी द्वेषाच्या प्रचाराला सुरुवात करतात ती म्हणजे इस्लामचा प्रचार करण्यासाठी, बहुपत्नीत्वासाठी, मध्ययुगीन काळात कशी हिंदूंची मंदिरं मुसलमान राजांनी कशी उद्धस्त केली वगैरे… जातीयवादी विचारधारेचं प्रशिक्षण घेतलेले लोक आणि सत्याला निर्लज्जपणे तोडून-मोडून दाखवण्यासाठी केला जात असलेला सोशल मिडीयाचा वापर यामुळे आता या गोष्टीने धोकादायक वळण घेतलं आहे. आगामी निवडणुकांमध्ये फायदा  मिळवण्यासाठी लाखो स्वयंसेवकांना सोशल मिडीयाच्या वापराचं प्रशिक्षण देण्याची भाजपची योजना असल्याच्या बातम्या आहेत. हा वाढता द्वेष एखाद्या राक्षसासारखा बनत असून नियंत्रणाबाहेर चालला आहे.

पण हा द्वेष तीव्र करण्यासाठी आपण फक्त सोशल मिडीयालाच जबाबदार धरु शकतो का? या अतिशय प्रभावशाली माध्यमासाठी काही नियंत्रण आणि संयम आवश्यक आहे. तसंच प्रसारित होणाऱ्या माहितीमध्ये काही तथ्यं आहे का, याची तपासणी गरजेची आहे. त्याचबरोबर या खोट्या माहितीचा मुकाबला करण्यासाठी आल्टन्यूजसारख्या यंत्रणा लोकप्रिय करणंही आवश्यक आहे. ट्विटरने सात कोटी फेक अकाउंटस् बंद करण्याचा घेतलेला निर्णय दिलासादायक आहे. त्याचबरोबर आपल्या समाजमनावर पसरवलेले गैरसमज आणि द्वेषाचं राजकारण यांचा सामना प्रेमाच्या संदेशाने करणेही गरजेचे आहे. सत्याचा प्रसार आणि शांततेचा अधिक प्रभावी वापर आपल्यासाठी गरजेचा आहे. आपल्याकडे फैजल खान यांच्यासारखे कार्यकर्ते आहेत, जे त्यांच्या खुदाई खिदमतगारच्या माध्यमातून शांतता मोर्चा काढतात. जमावाच्या हिंसेचा बळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना भेटून आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करुन हर्ष मांदेर यांची पैगाम-ए-मोहब्बत संस्था खूपच चांगलं काम करत आहे. अयोध्येतील महंत युगल किशोर शरण शास्त्री, फारसा गाजावाजा न करता आपल्या शांतता मोर्चांतून सहिष्णुता आणि शांतीचा संदेश घेऊन समाजातील विविध वर्गांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रयत्नांना समर्थन देणं आणि ते वाढवणं गरजेचं आहे. या दिशेने सुरु असलेल्या उपक्रमांमधील ही फक्त काही उदाहरणं आहेत, भारतातील सलोखा वाढवण्याच्या आणि जतन करण्याच्या दृष्टीने इतरही अनेक उपक्रम असे आहेत ज्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.

हिंदू धर्माच्या परंपरेनुसार शांतीचा प्रसार करण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीचा विचार हा सध्याच्या जातीय-धार्मिक द्वेषाचा विरोध आणि सामाजिक सलोख्याचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. फेक न्यूजचे भयावहरित्या वाढणारं प्रमाण पाहता भारतीय राष्ट्रवादातील बंधुत्व या संकल्पनेला धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी स्वातंत्र्य संग्रामाचा पाया असणाऱ्या आणि आपल्या संविधानाचा खूप महत्वाचा भागही असणाऱ्या मैत्री आणि सौहार्दाच्या मूल्यांकडे वळणं आवश्यक होऊन बसलं आहे.

लेखक हे गेली अनेक वर्षे सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी कार्यरत असून सेक्युलरिझमच्या तत्वाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांची कम्युनल पॉलिटिक्सः फॅक्ट्स वर्सेस मिथ्स, गॉड पॉलिटिक्स, फॅसिझम अॉफ संघ परिवार, रिलिजन, पॉवर अॅण्ड व्हायलंस अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

Write A Comment