fbpx
सामाजिक

जमावाकडून होणार्‍या हिंसेचा रोग

धुळे जिल्ह्यात भटक्या समाजातील पाच नागपंथी डवरी गोसावी जमातीतील भिक्षेकर्‍यांना ठेचून मारण्याची घटना घडली आहे. ही घटना अत्यंत दु:खद आणि निषेधार्ह आहे. याचप्रकारची घटना ओरीसामध्ये घडली आणि ओरीसामध्ये सरकारी योजनांचा प्रचार करणार्‍या कलावंताला पोरे पळविणार्‍या टोळीचा माणूस म्हणून पकडण्यात आले आणि तिथेल्या त्याला मारण्यात आले. त्याच्याआधी अकलख नावाच्या माणसाला त्याच्या घरात गोमांस शिजते आहे. अशा अफवेवरुन ठार मारण्यात आले. त्याचा मुलगा हा सैन्यामध्ये आहे आणि त्याच्या घरातील मांसाचे परिक्षण केले तेव्हा ते गोमांस नसुन बकर्‍याचे मांस होते असे सिद्ध झाले. धुळ्याच्या घटनेतील भिक्षेकरी हे भिक्षा मागायला आलेले होते. आणि ते दाखवत होते की आमच्याकडे पोलिसांचे प्रमाणपत्र आहे; आणि आम्ही त्यांच्याकडे नोंद केलेली आहे, आमची पालं (झोपड्या) पिंपळनेर पोलिस चौकी जवळ पडली आहेत, असे त्यांनी सांगूनही त्यांना जमावाने काहीही न ऐकूण घेता ही पोरं पळवणारी टोळी किंवा किडनी चोरणार्‍या टोळींचे सदस्य आहेत असे समजून त्यांना मारले. ओरीसाची घटना असो किंवा धुळ्याची घटना असो की अखलकची घटना असो याप्रकारच्या अनेक घटना या आजुबाजूला घडतांना होताना दिसत आहेत. अशा घटनांमध्ये आजवर 28 मृत्यू झाले आहेत.

यात दोन गोष्टी आहेत. त्यात जमावाने दाखवलेले क्रौर्याचे समर्थन जमाव करत होता. क्रौर्याला जमावाने केलेल्या दंगलींमध्ये झालेल्या क्रौर्याला तसी प्रतिष्ठा नव्हती. स्वातंत्र्यपूर्व नव्हती आणि स्वातंत्र्योत्तर नव्हती. पण 1990 ला बाबरी मशीद पडल्यानंतर तेथून सार्वजनिक हिंसेला राजकीय-सामाजिक अधिमान्यता मिळाली. 2002 मध्ये गुजरातमध्ये या पद्धतीच्या नरसंहाराला प्रतिष्ठा देण्यात आली. गर्भारबाईचे पोट तलवारींने फाडण्यापर्यंत आणि माजी खासदार असलेल्या मुस्लिम गृहस्थाला त्याच्या घरात घुसून जाळून मारण्यापर्यंत ज्या घटना 2002 मध्ये घडल्या तर त्यावेळेसही प्रचंड मोठ्या अफवांचे पिक पेरवले गेलेले होतं. आणि त्याचा परिणाम हा समाजावर दीर्घकाळ झालेला दिसतो. अफवांमध्ये निरूपद्रवी वाटणार्‍या पण दीर्घकाळपर्यंत परिणाम करणार्‍या गणपती दुध पितो अशा अफवाही पसरवल्या गेल्या आणि गणपती दुध पिल्याचे मुख्यमंत्र्यानींच जाहीर केले होते. या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर क्रौर्य या गोष्टीला 90 नंतरच्या काळामध्ये जी प्रतिष्ठा मिळाली आहे आणि एखाद्या समाजाच्या विरोधामध्ये एखाद्या जातीच्या विरोधामध्ये अशापध्दतीने क्रौर्य केले तरी हरकत नाही ते क्रौर्य हिंसा लादण्यासाठी लायक लोक आहेत त्यांची लायकीच ती आहे, अशा पध्दतीने निश्चित केल्यानंतर मग या गोष्टींना प्रतिष्ठा मिळते. गोवंश हत्या केल्याच्या आरोपावरून ज्यांनी 4 लोकांचे बळी घेतले अशा गुन्हेगारांचा सत्कार मोदीसरकारचे केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी केला. हे प्रतिष्ठा देणारे लोक कोण आहेत? धर्म व जात आधारे क्रूर हिंसेला राजकीय पाठबळ किती उघडपणे दिले जाते याचे हे ताजे उदाहरण. पण अफवांवर विश्वास ठेवणारी मानसिकता आणि क्रौर्य करण्याची मानसिकता, हिंसा करण्याची मानसिकता, हे कुठून येते. अफवांवर विश्वास ठेऊन त्या प्रमाणे कृती करणारे लोक हे एकप्रकारचे अफवांचे बळीच असतात, आणि अफवा पसरवणारे जे मुख्य लोक आहेत, त्यांच्यापर्यंत जाणं आणि ते शोधून काढण ही दुसरी गोष्ट पण महत्वाची आहे. पण अफवांवर विश्वास ठेवणारी मानसिकता आणि क्रौर्य करण्याची मानसिकता, हिंसा करण्याची मानसिकता, हे कुठुन येते. तर त्याला पूरक एक सामाजिक पर्यावरण उपलब्ध असते. ज्यामध्ये या पद्धतीच्या गोष्टी उभ्या राहतात. हे सामाजिक पर्यावरण वेगवेगळ्या गोष्टींनी ठरत असते. स्वांतत्र्यलढ्यातून भारत उभारणीला सुरूवात झाली आणि त्यावेळेस राज्यघटना हा आपला राष्ट्र उभारण्याचा पाया असणार हे निश्चित झाले. सर्व गोष्टींना राज्यघटनेच्या चौकटीत मान्यता मिळणं राज्यघटना कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि प्रसारमाध्यमे या चार गोष्टींवरती भारतीय लोकशाहीची इमारत ही उभी राहण्याची सुरूवात झाली होती. सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही या दिशेने जाण्याचे निश्चित झाले होते. त्यातून लोकशाहीचे संस्थीकरण सुरु झाले. या लोकशाहीकरणाला सर्वात मोठा अडथळा ठरत होता ती जातीव्यवस्था. त्या जातीव्यवस्थेच्या विरोधात निर्णायक लढाई मात्र झाली नाही. दुसर्‍या बाजूला भांडवलशाहीनं वेग पकडला आणि एक नव्या पद्धतीची जातीय भांडवलशाही ही भारतामध्ये उभी राहली. या ब्राह्मणी भांडवलीशाहीने आता ब्राह्मणी फॅसिझमकडे वाटचाल सुरू केलेली आहे. या वाटचालीचा टप्पा 90 नंतर झालेला आहे आणि खरे तर भाडवलशाहीने युरोपप्रमाणे प्रबोधान क्रांतीने सरंजामशाहीचा नायनाट करायला हवा होता. भारतीय भांडवलदार लोकांनी जातीव्यवस्थेशी एकजुट केलेली असल्यामुळे उलट आपले वर्चस्व अबधित ठेवण्याच्या उद्देशाने प्रतिक्रांतीच्या दिशेन प्रवासाने सुरू झाला. या प्रवास फॅसिझमचे टोक गाठले गेले आहे. अशा पद्धतीच्या राज्यकर्त्यांना अफवा, भ्रम यांचे जाळे पसरवणे हे अत्यावश्यक बनत. एखाद्या व्यापार्‍याला किंवा उद्योगपतीला आपला माल लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मोठी जाहिरात करावी लागते. ती जाहिरात बरोबर आहे. पण जेव्हा भेसळयुक्त दुध हे शुध्द देशी गायचे दुध आहे असे सांगून त्यापासून बनविलेले कोणी तूप विक्री करायला लागतो, जाहिरातींमार्फत, त्यासाठी अधिमान्यता मिळण्यासाठी योग आणि भगव्या वस्त्राचा आधार घेतो, त्यावेळेस एक खोटी गोष्ट जाहिरातीच्या माध्यमातून अतिरेकी पद्धतीने सांगतली जाते. तेव्हा ती एक प्रकारची अफवाच असते. अशा प्रकारच्या फॅब्रिकेटेड अफवा, फॅब्रिकेटेड भ्रम हे आज राज्यकर्त्यांचीच गरज बनली आहे आणि म्हणून त्यांनी झूंडीच्या झूंडी या दिशेने जातील अशापद्धतीने सुरूवात केली आहे.

गणपती दुध पितो
गणपती दुध पितो

बाबरी मशीद पाडली तेव्हा आणि गणपती दुध पितो या अफवेच्या वेळी सोशल मीडिया काही अस्तित्वात नव्हता. म्हणून आज जे घडते आहेत त्याला एकटा सोशल मीडिया जबाबदार आहे असे म्हणण हे जरा थोडसं वस्तुस्थितीचे सुलभीकरण करण्यासारखे होईल या घटना घडण्यासाठी आवश्यक अस सामाजिक पर्यावरण, राजकीय पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण हे उपलब्ध आहे. आज म्हणूनच या सांस्कृतिक-सामाजिक पर्यावरणामध्ये हिंसक घटना, जमावाने ठेचून मारण्याच्या घटना घडत आहेत. सांस्कृतिक पर्यावरणामध्ये आज विचार करण्याला बंदी असल्यासारखे वातावरण आहे. बिनडोक लोक हे फिल्म इन्स्टिट्युट, इतिहास संशोधन संस्था, विद्यानविषयक संस्थांवर आणले जात आहेत. युजिसीसारख्या संस्थांना सुरुंग लावणे, नियोजन आयोगाची रचना तोडणे हे जाणीवपूर्वक केले जात आहे. विचारांना चालना देणारे अभ्यासक्रम बदलून त्यात भ्रामक विचारांची भरताड केली जात आहे. लोहशाही माध्यमातून उभ केलेल्या संस्था जेव्हा नष्ट होतात तेव्हा समाजामध्ये एकप्रकारची अराजकता उभी राहते. पाच भिक्षेकर्‍यांना जमावाणे टेचून मारले ही क्रूर हिंसा आहे. त्या बद्दल संताप बरोबरच आहे. पण भारत या देशामध्ये अशाप्रकारचा समुह आहे की ज्यांना भिक्षेवरच उदरनिर्वाह करावा लागतो, हे जातीव्यवस्थेच्या काळातील शोषण आज जागतिकीकरणानंतरही कायम आहे. हे ही क्रौर्य ठळकपणे समोर आणले पाहिजे. जातीव्यवस्थेमध्ये भटक्या-विमुक्तांना कुठल्याही प्रकारे उपजीविकेचे साधन दिले गेले नाही. पिंगळ्या जोशी या भटक्या जमातीमध्ये दिवसभर मागून आणलेले धान्य किंवा त्यातले शिजवलेले अन्न सुर्यास्ताच्या वेळी खड्डा खणून उरलेले अन्न पुरण्याची प्रथा आहे. का तर त्याने जर अन्न साठवून ठेवले तर तो दुसर्‍या दिवशी पिंगळ्यासारखा आवाज काढत भिक्षा मागणार नाही, म्हणून त्यांना साठवणूक करण्यालाच बंदी! म्हणजे त्यांना उत्पादनाची काही साधन नाही. आणि जे काही जगण्याचे साधन आहे त्यात रोज भिक मागण्याशिवाय पर्याय ठेवला नाही अशापद्धतीची धर्माज्ञा या समाजामध्ये घर करून बसली आहे आणि आपण जर आपला जाती व्यवसाय सोडला तर आपण धर्म बुडवला अशी ही या समूहाची मानसिकता आहे. दुसर्‍या बाजूला या समुहाना ना गाव आहे ना गावकुस आहे. गावकुसाच्या बाहेरही जागा नाही. त्यांना अस्पृश्य ठरवण्यात आलेले नाही, पण त्यांना उत्पादनाचे साधन न दिल्यामुळे ते जातीव्यवस्थतील एक रिझर्व्ह फोर्स म्हणून कार्यरत असलेले आपल्याला दिसतात. जातीव्यवस्थेमध्ये तेव्हा या भटक्यांना जातीमध्ये रूपांतर करून घेण्याचा पर्याय उच्चजातींयासमोर होता. परंतु त्यांनी ते केले नाही. जातीच्या उत्पादन साधनाच्या संदर्भात भटक्याचे स्थान आपल्याला लक्षात येते. या शोषणाला पुन्हा धार्मिक अधिमान्यता मनुस्मृती व इतर ग्रंथातून दिलेली दिसते. या समाजामध्ये अशा पद्धतीने लोकांनी भारतभर भ्रमण करत चारही दिशा वाटून घेतल्या आहेत आणि त्या दिशेने ते भिक मागत फिरतात. वर्षानुवर्ष ही पद्धत आहे. ही ब्राह्मणी परंपरा आपल्या देशात आहे. भिकेला तथाकथित प्रतिष्ठा देणे किंवा भिक मागणे हाच पर्याय व्यवस्थेने एका समुहावर लादणे या गोष्टींबद्दलही संताप याला हवा.

आज 1990 नंतर जस राजकीय पर्यावरण बदलले तसे आर्थिक पर्यावणही मोठ्याप्रमाणावर बदललले दिसते. शेतीची अवस्था भयानक झालेली आहे. भिक मागण्याची पर्याय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आत्महत्या हाच पर्याय राहतो. महाराष्ट्रात एकूण 78 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या तीन महिन्यात 639 आत्महत्या झाल्या. याचा दर बघितला तर तीन तासात एक आत्महत्या ही महाराष्ट्रात झालेली आहे. शेती दारूण अवस्थेत आहे. या भिक्षेकरू कुटुंबाकडे दोन एकर कोरडवाहू जमीन होती. या पलीकडे त्यांना काही जगण्याचे साधन नव्हते. त्यामुळे ते वर्षानुवर्ष ते भिक मागण्याचे काम करत आहेत आणि त्या दोन एकरावरती आठ कुटुंबे अवलंबुन होती. खरेतर दोन एकरात काय अगदी 40 एकरावर सुध्दा त्यांच भागण्याची शक्यता राज्यकर्त्यांनी खरे तर आजच्या शेती क्षेत्रात ठेवली नाही.

बेरोजगारांची फौज
बेरोजगारांची फौज

रोजागराचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी बेरोजगारांची फौज तयार करण्याचे काम ही व्यवस्था करते. बाहेर बेरोजगारांची रांग उभी आहे हे बघितल्यानंतर जो रोजगाराला लागलेला असतो त्याची वाटाघाटीची बार्गेनिंग करण्याच्या क्षमता कमी होतात. अशा पद्धतीच्या बेरोगाराच्या फौजा उभ्या राहणं आणि एक असुरक्षित आशा पद्धतीचे जगणे सामान्य बनते तेव्हा अशा मानसिक पर्यावरणामध्ये भ्रमांचा-अफवांचा बाजार मोठ्या पद्धतीने उठतो. आपल्या कुटुबांचे पालनपोषण करण्यास असमर्थ आहोत, आपण प्रतिष्ठा गमावलेले लोक आहोत, असे लोकांना वाटू लागते. या सगळ्या मानसिक पोकळीमध्ये मग शौर्य गाजवण्याची, सामर्थ्य दाखवण्याची ‘संधी’ हा जमाव शोधत असतो. असे जमाव व झुंडी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. 2006 च्या काळात शबरी कुंभमेळ्याच्यानिमित्ताने उठलेल्या अशाच अफवांचे बळी डांग (गुजरात) येथील आदिवासी ठरले होते. त्या तव्यावर स्वामी असीमानंद आणि इतरांनी आपली पोळी शेकून घेतली होती.

आज असुरक्षित बनलेले, उद्याच्या काळजीने जगणारे, सांस्कृतिकदृष्ट्या संचित गमावत चललेले समुह वाढले आहेत. खरेतर भारत हा विविध रंगी देश आहे हे म्हणणे एका पातळी पर्यंत बरोबरच आहे. त्यातील विषमता लक्षात ठेवूनही सांस्कृतिकरित्या बहुजनांची सर्वसमावेशक अब्राह्मणी संस्कृती या देशात होती व आहे. हे भारतामध्ये खाण्यापिण्यापासून राहण्या पर्यंतच्या वेगवेगळ्या चालिरिती मधूनही लक्षात येते. त्याची जातधर्मानुसार वेगवेगळी वैशिष्टेही आहेत. हे सर्व पुसून आता भारताला एकसाची करण्याचे उच्चजातवर्गीयपुरुषसत्ताक मानसिकतेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या जागतिक दोस्तांच्या आधारे ठरवले आहे. आणि सांस्कृतिक वैविध्य नष्ट होणार पण त्याच्या मागची शोषणाची यंत्रणा मात्र नव्या स्वरूपात काम करत राहणार अशा पद्धतीचे प्रयत्न हे एकसाचीकरणाच्या माध्यमातून होत आहेत. अशापद्धतीने जे राजकारण, समाजकारण चालेले आहे, त्यातून हिंसा आणि क्रौर्याला उधाण येते. भारतीय फॅसिझम हा जगात आजवर झालेल्या फॅसिझम पेक्षा क्रुर असेल. हिटलरला विषारी वायुंची बंकर्स तयार करावी लागली. पण येथे मात्र जन्मापासून मरेपर्यन्तच नाही तर त्या पुढेही अखंड चालणारी भेदाभेदाची जातीस्त्रीदास्याची यंत्रणाच उपलब्ध आहे. हिटरला जे अपेक्षित होते ते घडविण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले. ते भारतीय सत्ताधारी जातवर्गाला त्यामुळेच करावे लागत नाहीत. ओरीसापासून धुळ्यापर्यंतच्या जमावाच्या क्रौर्याच्या घटना याच फॅसिस्ट राजकीय-सामाजिक पर्यावरणाची उपज आहेत. जमावाकडून होणार्‍या हिंसेचा रोग थांबवयाचा असेल तर फुले-शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक लोकशाहीचा नारा बुलंद करावा लागेल. जातीस्त्रीदास्यांताच्या दिशेने वाटचाल करावी लागल हे आपण या निमित्ताने लक्षात घेतले पाहिजे.

लेखक सत्यशोधक शेतकरी सभेचे नेते व समतावादी प्रबोधक आहेत.

Write A Comment