fbpx
राजकारण

फोटोफ्रेममध्ये अडकलेलं सरकार

जुन्या काळी म्हणजे जेव्हा डिजिटल माध्यमं नव्हती तेव्हा लोक आपल्या प्रियजनांची आठवण म्हणून एकतरी फोटो फ्रेम करून तो अभिमानाने भिंतीवर लावायचे. आपल्या प्रत्येकाच्या घरात असे जुने फोटो असतातच. ते कधीकाळी काढताना त्या निमित्ताने जुने दिवस कसे चांगले-वाईट होते वगैरे आठवणी काही काळापुरत्या दाटून येतात आणि ती फ्रेम पुन्हा अडगळीच्या सामानात जाते. सध्याच्या मोदी सरकारचंही तसंच होणार की काय अशी शंका आता वाटू लागली आहे. कारण २०१९ लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर मोठ्या उलथापालथींना सुरुवात झाली आहे. मोदी समर्थक म्हणवून घेणारे, मोदीभक्त, मोदींच्या सरकारमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करणारे अनेक जण अचानकच मोदी सरकारच्या विरोधात बोलू लागले आहेत किंवा मोदी सरकार सोडून जाऊ लागले आहेत. पण सरकारला त्याचं काहीच पडलेलं दिसत नाही. ते अजूनही फोटो काढून घेण्यातच दंग आहे. मग त्या पंतप्रधानांच्या परदेशी वाऱ्या असोत की योग डे च्या निमित्ताने सुरू केलेलं फॅड असो.

गेली चार-पाच वर्ष मोदींच्या, त्यांच्या सरकारच्या आणि भाजपच्या समर्थकांची अक्षरशः दादागिरी सुरू होती. कधी रस्त्यावर, कधी सोशल मिडियामध्ये तर कधी अगदी कौटुंबिक सोहळ्यातही. त्यांचा विरोधकच नव्हे तर केवळ शंका उपस्थित करणारा पण भक्तांच्या दृष्टीने देशद्रोही ठरत होता. सगळं वातावरण मोदींच्या भक्तीने असं काही भारावून टाकलं गेलं होतं की, भक्तांना दुसरं काहीच दिसत नव्हतं. त्यांना गोहत्या  बंदीच्या नावाखाली मुस्लिम-दलितांच्या हत्या दिसत नव्हत्या, नोटबंदीच्या काळामध्ये रांगेत उभी राहून मेलेली १०० हून अधिक माणसं दिसत नव्हती, अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार दिसत नव्हते, आपल्याच तरुण पिढीला विद्यापीठांमध्ये होणारी मारहाण कळत नव्हती, लाखो-कोटी रुपयांचे कर्ज बँकांकडून काढून पळून जाणारे उद्योगपती दिसत नव्हते, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा उडालेला भडकाही दिसत नव्हता आणि मुख्य म्हणजे हिंदुत्वाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांबरोबरच बहुसंख्य जनतेची होणारी फसवणूकही दिसत नव्हती. कारण डोळ्यावर मोदी नामक सुपरमॅनची पट्टी बांधली होती. कितीही समस्या असल्या, कितीही वाईट परिस्थिती आली तरी सुपरमॅन काहीही करू शकतो, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला नावं ठेवून भाजपला भरगोस मतं देणारे काहीही एेकून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हते.

पण विकासाचा ढोल वाजवत खरी परिस्थिती किती काळ लपवून ठेवणार? आणि डोळ्याला पट्टीही किती काळ राहणार? आता एकेक पट्ट्या गळू लागल्यावर काही भक्त गण, काही मोदी समर्थक आपली चूक मान्य करू लागले आहेत. त्यातले सर्वच जण थेट जनतेत बोलत नसले तरी त्यांची आपण फसवले गेल्याची भावना तीव्र आहे. दोनच दिवसांपूर्वी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. खरंतर एवढ्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने नोटबंदी आणि वस्तू सेवा करासारखे महत्त्वपूर्ण निर्णय जवळून बघितले होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर होती. पण आपला कार्यकाळही त्यांनी पूर्ण केला नाही. त्यासाठी त्यांनी व्यक्तीगत कारण सांगितलं असलं तरी ते इतकं सहज नाही. त्यांच्याआधी नीती आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगढीया यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या काळातला नियोजन आयोग रद्द करून मोदी सरकारने नीती आयोगाची स्थापना केली. पण त्याचा प्रमुखच केवळ अडीच वर्ष तिथे टिकला. या दोन उच्चपदस्थांच्या राजीनाम्याच्या कारणांची फारशी चर्चा झाली नाही. पण त्यांनी सर्वकाही आलबेल नसल्याचे मात्र पूर्ण संकेत दिले. भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे मोदी भक्त अगदी हेटाळणीने बघतात की यांचे दिवस संपलेत आता पक्षात मोदी पर्व आलं आहे. मोदी भाजपचे सर्वात मोठे नेते असले तरी अशी काय परिस्थिती त्यांनी पक्षात निर्माण केली की, एका ज्येष्ठ नेत्याने पक्ष सोडून देणं पसंत केलं? शत्रूघ्न सिन्हा तर खुलेआम भाजपवर टीकेचे बाण सोडत असतात.

या वरिष्ठ नेते, तज्ज्ञ यांच्या जोडीने ज्यांच्या जीवावर फोटोशॉप सरकार उभं राहिलं त्या आयटी सेलच्या अनेकांनीही राजीनामे दिले. सर्वात आधी आयटी सेलच्या स्वाती चतुर्वेदी यांनी भाजप सोडलं. एवढंच नव्हे तर त्यांनी ‘आय अॅम ट्रोल’ हे पुस्तक लिहून सोशल मिडियाच्या माध्यमातून भाजप सरकार करत असलेल्या काळ्या कारवायांचे वाभाडे काढले. त्यानंतर आयटी सेल प्रमुख प्रद्युत वोरा यांनी राजीनामा देऊन मोदी सरकारवर टीका केली. मोदी आणि अमित शाह यांच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांना खूप आक्षेप होता. वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलं की, भाजप हा पूर्वीसारखा पक्षा राहिलेला नाही. केवळ निवडणुका जिंकणं आणि त्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणं हे पक्षाचं ध्येय झालं आहे. साध्वी खोसला या भाजपच्या ‘मिशन २७२’ मध्ये सामील होत्या. फेकन्यूजच्या माध्यमातून भाजपने कशा पद्धतीने लोकांना मूर्ख बनवलं हे त्यांनी सांगितलं. खोट्या वेबसाइट तयार करणं, वॉट्स अॅपच्या साहय्याने खोट्या बातम्या पसरवणं, पोस्ट कार्ड न्यूज सारख्या वेबसाइट तयार करून खोट्याचा खरा अाभास निर्माण करणं, देऊळ फोडल्याच्या अफवा सरवणं, एखाद्या हिंदूंच्या सणाला अफवा पसरवून अल्पसंख्याकांच्या प्रती त्यांच्या मनात शंका-व्देष निर्माण करणं, राजकीय हत्यांना हिंदूत्वाचा रंग देणं अशा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कारवाया खोसला यांनी स्वतः पाहिल्या आणि शेवटी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच उच्चपदस्थ आणि ट्वीटरवर मोदी समर्थक असलेल्या रुपा सुब्रमणिया यांनीही भाजपवर टीका करायला सुरुवात केली. काँग्रेसच्या राजवटीला कंटाळून, मोदींच्या मोठ्यामोठ्या वाद्यांना भूलून त्या मोदी समर्थक झाल्या होत्या. पण त्यांचा पूर्ण भ्रमनिरास झाल्याचं त्यांनी मान्य केलं. मध्यंतरी ध्रूव राठीने एका भाजपच्या राजस्थानमधल्या ट्रोलरची मुलाखत घेतली होती. तो खूपच लहान कार्यकर्ता होता. पण भाजपच्या आयटी सेलमधून माहिती कशी प्रसारित होते आणि खोट्याचं खरं कसं लोकांवर बिंबवलं जातं हे त्याने सांगितलं. पण त्याचबरोबर त्याने भितीही व्यक्त केली की, मी जास्त बोललो तर मला थेट मारूनही टाकतील.

आता काही जणांना हे सुद्धा खोटं वाटू शकतं. ही सगळी माणसं त्यांना हवं ते न मिळाल्याने भाजपला नावं ठेवत आहेत, असंही उरलेले भक्तगण म्हणू शकतात. पण त्यांनी व्यक्त केलेल्या भावना खऱ्या आहेत. कारण त्याचं खंडन ना भाजपने केलं ना मोदींनी. माणसामधली माणुसकी जागी झाली की, अशा घटना बघायला मिळतात आणि भ्रमनिरास होतो. मोदी आणि भाजप सरकारच्या बाबतही तेच झालं. त्यांनी खोटं बोलण्याचा सपाटा लावून सर्वसामान्य लोकांना एवढी स्वप्नं दाखवली की, ती सुपरमॅनही पूर्ण करू शकत नाही. खोटं बोलण्यातून आपण निवडून येतो हा आत्मविश्वास भाजपमध्ये आल्यावर खोट्याचा सपाटाच त्यांनी लावला. जनताही त्या खोट्याला भुलत गेली. पण हे वातावरण जास्त दिवस टिकू शकत नाही कारण धार्मिक द्वेष, जातीय दंगे याही पलिकडे जाऊन लोकांना खायला अन्न आणि हाताला काम लागतं. ते जर सरकार देऊ शकत नसेल तर ते सत्तेवर राहण्याच्या लायकीचं नाही, हे मतदार चांगलंच जाणतात. त्यामुळे लोकांपुढे आभास निर्माण करता करता भाजपचं सरकारही आभासी जगातच वावररताना दिसतंय. कालच साजरा केलेला योग दिवस हे त्याचं उत्तम उदाहरण होतं. योग ही भारताची प्राचीन विद्या आहे. त्याचं मार्केटिंग करून आणि सर्व माध्यमांमधून त्याचे फोटो प्रसिद्ध करून मूलभूत प्रश्न लोकांच्या दृष्टीआड करण्याचा मोदींनी प्रयत्न केला. पण फोटो हे लवकरच जुने होतात आणि केवळ आठवणी म्हणून काहींच्या धुसर स्मृतीत राहतात. तसंच हे फोटोशॉप सरकारही कायमस्वरुपी फोटोफ्रेममध्ये विरजमान होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात ती फ्रेम बघणारे अच्छे दिनच्या अाठवणी काढत किंती तें अच्छें दिन होंते नांही… असं अनुनासिक म्हणत राहतील इतकंच!

लेखक राईट अँगलचे वाचक आहेत.

Write A Comment