fbpx
सामाजिक

कुत्रं मेलं तर येवढा बाऊ कशाला ?

टू किल अ मॉकिंगबर्ड ही साठच्या दशकात हार्पर ली यांची प्रकाशित झालेली कादंबरी खरोखरीच अक्षर वाङ्मयात मोडते. या कादंबरीतील अॅटिकस ही व्यक्तीरेखा गावातील टीम जॉन्सन नावाच्या पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी घालते. हे कुत्रं नक्की पिसाळलेलं आहे, त्याच्यामुळे गावातील सगळ्यांच्यासमोर एक मोठी समस्या उभी राहिलेली आहे किंवा कसे याबाबतची संदिग्धता लेखिकेने शेवटपर्यं कायम ठेवली आहे. नेमके त्याच वेळी टॉम रॉबिन्सन या निष्पाप काळ्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल होतो. काळी व्यक्ती ही गोऱ्यांच्या जगात राहण्यासाठी अयोग्य आहे, असे ठरवले जाते. टीम जॉन्सन नावाचं कुत्रं आणि टॉम रॉबिन्सन नावाचा काळा माणूस… नावाच्या उच्चारातही लेखिकेने जाणीवपूर्वक ठेवलेलं साम्य…

असो या कादंबरीवर हॉलिवूडमध्ये सिनेमे निघाले, नाटकंही झाली. अजूनही आधुनिक इंग्रजी वाङमयाचा अभ्यास ली यांच्या टू कील अ मॉकिंगबर्डशिवाय पूर्ण होत नाही. पूर्ण होणार कसा? सातासमुद्रापार अमेरिकेतील लेखिकेला मानवी विकृती, सद्गुण, भाव-भावना यांचं झालेलं दर्शन हे काय भारतीय तुकोबा आणि ज्ञानेश्वरांपेक्षा वेगळं थोडंच असणार. आता हेच बघा ना, श्रीराम सेने नावाची कर्नाटकातील एक हिंदुत्ववादी संघटना आहे. तिचे सर्वेसर्वा आहेत, प्रमोद मुत्तालीक हे सद्गृहस्थ. मुलींनी पाश्चिमात्य तोकडे कपडे घालू नयेत, असा त्यांचा आग्रह. त्यामुळे त्यांनी व त्यांच्या कट्टर शिष्योत्तमांनी बंगळूरूमधल्या काही पब व उपहारगृहांमध्ये जाऊन काही तरुण तरुणींना मारहाण करून धर्मरक्षणाचं उद्दात कार्य केल्यामुळे हे मुत्तालीकसाहेब देशाच्या नकाशावर काही वर्षांपूर्वी झळकले होते.

गेल्या दोन तीन दिवसांमध्ये गौरी लंकेश यांच्या खुन्याला पकडल्यानंतर समाजमाध्यमांवर त्या खुन्यासोबत या मुत्तालीक साहेबांचे फोटो फिरू लागले. सध्या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या फोटोंबाबत फारसं न बोललेलंच बरं असतं. कारण फोटो संपादित करण्याची अशी काही तंत्र विकसित झालेली आहेत की, गांधीजी गोळवलकरांचे पाय चेपत असल्याचे फोटोही बिनदिक्कत इथे टाकले जातात व पाठांतराच्या जीवावर शालांत परिक्षांमध्ये इतिहासात पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे ही घटना खरी असल्याच्या अविर्भावात ते शेयर करून ते १०० टक्के खरे असल्याबाबत वाद घालत राहतात. त्यामुळे या फोटोंकडेही कुणी फारसे गांभीर्याने पाहिले नव्हते. मात्र काल म्हणजे रविवारी १७ जूनला या मुत्तालिक साहेबांनी हिंदू जन जागृतीच्या कार्यक्रमात एक जबरदस्त आक्रमक भाषण केले. त्यातील आक्रमकतेला बेडगी मिर्चीची फोडणी द्यावी तशा थाटात त्यांनी सांगितलं की, कर्नाटकात एखादं कुत्रं मेलं तर त्याची दखल पंतप्रधान मोदींनी कशाला घ्यायला हवी. बरं हे बोलल्यानंतर कार्यक्रम संपल्यावर त्यांनी मोठ्या धैर्याने वृत्तवाहिन्यांकडे तात्काळ खुलासाही केला की, बंगळुरूत हत्या झालेल्या गौरी लंकेश यांची तुलना कुत्र्याशी करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. त्या आमच्या वैचारिक विरोधक होत्या खऱ्या मात्र, त्यामुळे त्यांचा असा खून व्हावा, असे काही आमचे म्हणणे नव्हते.

मुत्तालीक साहेबांच्या एकंदरच वृत्तीला व त्यांच्या धैर्याला सलामच करायला हवा. परशुराम वाघमारे या संशयिताला कर्नाटक पोलिसांनी लंकेश यांच्या खुनाच्या आरोपात पकडलेले आहे. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे वाघमारे याने लंकेश यांचा खून केल्याची कबुलीही त्यांच्याकडे दिली आहे. लंकेश या हिंदू धर्माच्या विरोधात होत्या व त्यामुळेच आपण त्यांचा खून केल्याची कबुलीही त्याने दिलेली आहे. अर्थात पोलिसांकडे दिलेल्या कबुलीवर तात्काळ विश्वास ठेवण्याचीही काही गरज नाही. किंबहुना तो कधी ठेवूही नयेच. मात्र या सगळ्यातून स्वतःला हिंदुत्ववादी किंवा आक्रमक हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांची प्रवृत्ती काय आहे, ते तरी नक्कीच समोर आले आहे. एका पन्नाशीच्या स्त्री पत्रकाराला रात्री एकट्याने गाठून दोघाजणांनी पिस्तुलातून गोळ्या घालून जे काही शौर्य दाखवले आहे, त्या शौर्याचा अभिमान वाटावा? त्याबाबत स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्यांनी काही तरी तर्क लढवून त्याचे समर्थन करत फिरावे इतके जर विवेकाचे स्खलन झाले असेल, तर मग या देशाचे भवितव्य काय आहे, हे ओळखण्यासाठी बुद्धीवर फारसा जोर देण्याची गरज आहे, असं वाटत नाही.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी अशा ज्येष्ठ खरेतर म्हाताऱ्या बुद्धिवंतांना एकट्याने गाठून पिस्तुलातून गोळी घालून जी काय धैर्याची परिसीमा हे जे कुणी आहेत, त्यांनी गाठलेली आहे, ती म्हणजे आयसीस कापत असलेल्या गळ्यांपेक्षा तसूभरही कमी नाही, हे या असल्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांनी वा, या घटनांचा निषेध करणाऱ्यांना समाजमाध्यमांवर शिवीगाळ करणाऱ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

चीनमध्ये डॉग मीट फेस्टिवल सुरू आहे. या फेस्टिवलसाठी तिथे हजारो कुत्री मारली जातात. कारण चीनमध्ये कुत्र्याचं मांस चवीने खाल्लं जातं. आपल्याकडच्या ईशान्येच्याही अनेक राज्यांमध्ये ते खाल्लं जातं. त्यामुळे आपल्या देशातील अनेक कुत्रा प्रेमींचा कंठ सध्या दाटून आला आहे. जगभरातून या प्रकाराचा निषेध करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. त्याचं मूळ पाश्चिमात्य राष्ट्रातून उगम पावत असलं, तरी आपल्याकडीलही श्वानप्रेमी मंडळी त्यात मागे नाहीत. कुत्र्यांना कशा क्रूर पद्धतीने ठार केलं जात आहे, इथपासून ते मारलेल्या कुत्र्यांच्या ढिगांचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल केले जात आहेत. भारतातील मांसाहारींचे अजूनतरी नशिब म्हणायचे की, या असल्या प्रचारात बोकड, कोंबड्या, डुकरं प्रेमी अद्याप उतरलेले नाहीत. कारण बोकड कोंबडी किंवा डुक्कर म्हटलं की, त्याच्या मांसाच्या विविध व्यंजनांची आठवण होऊन आपले जिव्हालौल्य जसे चाळवते तसेच ते कुत्राप्रेमींच्या मांस खाणाऱ्यांचेही चाळवले जाऊ शकते, याचा किंचतसाही विचार हे करणाऱ्यांच्या मनात येत नाही. असो हे विषयांतर झाल्यासारखे वाटले तरी ते विषयांतर नाही. कारण कुठेतरी हजारो मैल दूरवरच्या चीनसारख्या देशातील डॉग मीट फेस्टिव्हलवरून कंठ दाटून येणाऱ्यांना एका पत्रकार स्त्रीला ती घेत असलेल्या वैचारिक भूमिकेमुळे ठार मारलं जातं व त्यानंतर तिची तुलना कुत्र्याशी केली जाते, याचं काहीच वैषम्य वाटत नाही? गाय मारल्याच्या संशयावरून या देशात निष्पाप चाळीसेक जणांचे दिवसा ढवळ्या खून पाडले जातात, याचं काहीच दुःख नाही? या असल्या विखारी प्रचाराला बळी पडून तिकडे राजस्थानात एक विकृत रेगर नावाचा मनुष्य एका म्हाताऱ्या मुस्लिमाला उभा कापतो वर त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करतो, याचं समर्थन करायचं? हे असलेच प्रकार शेजारच्या पाकिस्तानात पंधरा वर्षांपूर्वी सुरू झाले होते. तिथल्या शिया पंथीयांवरचे हल्ले, त्यांचे खून, तिथल्या अत्यल्पसंख्य हिंदू, शिख व्यक्तींवरील हल्ले, ख्रिश्चनांवरचे हल्ले, या सगळ्याला तिथल्या उदारमतवादी लोकांनी विरोध सुरू केल्यावर असेच शालेय इतिहासाच्या पेपरात पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे पाकिस्तानी दीडशहाणे मग इतिहासतले दाखले देत  अगदी अनादी काळापासून काय काय झाले याची वर्णने सांगून या खूनसत्रांचे समर्थन करत होते. काय झालं पुढे? आज हे खूनसत्र घडवणाऱ्यांचा बोलबाला इतका वाढला आहे की, त्या देशातील प्रशासकीय व्यवस्था, पोलीस, निमलष्करी दले अगदी लष्करही या असल्या शक्तींसमोर हतबल झाल्याचे दिसते आहे. पाकिस्तानात कधीही कुठेही बॉम्ब फुटू शकतो आणि मुस्लिम मुल्ला मौलवींच्या विरोधात वैचारिक भूमिका घेणाऱ्याला कधीही कुठेही दिवसाढवळ्या क्रूर पद्धतीने यमसदनी पाठवले जाऊ शकते. या असल्या वातावरणात पाकिस्तानमध्ये जगभरातील गुंतवणुकदार गुंतवणूक करण्यास तयार होत नाहीत. त्या देशातील काही मूठभर लोक सोडले तर बाकी बहुतांश पाकिस्तानी नागरिकांना जगण्यासाठीच्या सामान्य गोष्टींसाठीही संघर्ष करावा लागतो. अशाच पद्धतीचा भारत म्हणजेच बलशाली भारत अशीच संकल्पना असेल, तर हे सगळं फार भयंकर आहे. माणसाची तुलना प्राण्याशी करून त्याच्या खुनाचं समर्थन करणं ही विकृती आहे. वेदांच्याही आधी या पृथ्वीवर अवतरलेल्या मनुष्य, ह्यूमन बिइंग, होमो सेपियन या प्राण्याने ही सर्व सृष्टी ज्या सृजनातून निर्माण केली ती प्रेम आणि सद्भावनेतूनच. त्यावर अधिकार गाजवण्यासाठी हिंसा पुढे आली. मात्र त्या हिंसेतून सर्वनाशापलिकडे हाताला काहीही लागत नाही, हे प्राचीन, अति प्राचीन किंवा अगदी आर्वाचीन इतिहासही दाखवून देतो. थोर लेखक बाबूराव बागूल म्हणतात…

वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,

पंच महाभूतांचे पाहून, विराट, विक्राळ रूप

तू व्यथित, व्याकूळ होत होतास,

आणि हात उभारून तू याचना करीत होतास,

त्या याचना म्हणजे  ‘  ऋचा  ’

सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव, तूच साजरे केलेस,

सर्व प्रेषितांचे बारसेही, तूच आनंदाने साजरे केलेस

हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस

आणि सूर्य, सूर्य झाला

तूच चंद्राला चंद्र म्हटलेस, आणि चंद्र, चंद्र झाला

अवघ्या विश्वाचे नामकरण

तू केलेस

अन् प्रत्येकाने मान्य केले, हे प्रतिभावान माणसा,

तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच संजीव सुंदर

झाली ही मही.

हार्पर लीनेदेखील टू कील अ मॉकिंग बर्डमध्ये नेमकं हेच सांगितलेलं आहे. तेव्हा गौरी लंकेशला कुत्रा म्हणणारे मुत्तालिक असोत किंवा गुजरात दंग्यात मृत्यूमुखी पडलेल्यांबाबत दुःख होतं का, असं विचारल्यावर कुत्र्याचं पिल्लू गाडीखाली आल्यावरही दुःख होतं, असं म्हणणारे नरेंद्र दामोदरदास मोदी असोत या एकसमयावच्छेदेकरून काम करणाऱ्या महाभागांनी  कायम हे डोक्यात पक्कं करावं की जे पेराल तेच उगवेल…!

लेखक राईट अँगलचे वाचक आहेत.

1 Comment

Write A Comment