fbpx
कला सामाजिक

अमेरिकेतील धार्मिक कट्टरता

पाश्चात्य देश हे आधुनिक विचारसरणीचे असा समज सहसा असतो, पण धार्मिक बाबतीत तिथेही कट्टरता असते. आयर्लंड इथे स्त्रिच्या जीवाला थेट धोका असल्याशिवाय गर्भपात हा गुन्हा मानला जातो व ह्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा आहे. ह्या कायद्यात आता (मे २०१८मध्ये) बदल करण्यात येत असून त्यानुसार गर्भपाताला परवानगी दिली जाणार आहे, गुन्हेगारीचे कलम रद्द करण्यात येणार आहे. ह्या नव्या कायद्याला सविताज लॉ नाव द्या अशी मागणी तिथे करण्यात येत आहे, याचे कारण सहा वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१२ मध्ये सविताचा गर्भपात नाकारल्याने झालेला मृत्यू व त्यातूनच पुढे सहा वर्षांनंतर का होईना आता बदल होत आहे. ही घटना अशी होती, सविता हलप्पनवार ही भारतीय वंशाची ३१ वर्षांची महिला आयर्लंड इथे इथे रहात होती. गरोदरपणात गुंतागुंत झाली, १७ आठवड्यांचा गर्भ होता. स्पष्ट गुंतागुंत असूनही कायद्याच्या धाकाने गर्भपाताचा विचार करण्यास ते धजावले नाहीत व त्यातच तिचा मृत्यू झाला.

आयर्लंडमधील ही परिस्थिती, पण काही काळापूर्वी अमेरिकेतही अशीच स्थिती होती. एका चित्रपटाच्या साहाय्याने ती जाणून घेऊ. अमेरिका हा अतिशय व्यक्तीवादी देश आहे, मुक्त विचारांचे वारे तिथे वाहात असते, लैंगिक व्यवहाराबाबत तिथे मोकळीक आहे अशी प्रतिमा अनेकांच्या मनात असते आणि ती बव्हंशी खरी आहे. तथापि काही बाबतीत तिथे कट्टरता असते, गर्भपात विरोधी हिंसक चळवळी तिथे झाल्या याची फारशी माहिती नसते किंवा असलीच तरी पुसट माहिती असते. इफ दीज वॉल्स कुड टॉक हा चित्रपट बघायला मिळाला आणि हा पैलू दिसला. चित्रपट बनण्यामागची कहाणी वाचली तर हे सत्य जास्त प्रकर्षाने समोर आले. १९५२, १९७४ आणि १९९६ ह्या बावीस वर्षांचे अंतर असलेल्या तीन वर्षात तीन स्त्रियांना गर्भपाताच्या बाबतीत काय अनुभव आला याचे चित्रण ह्या चित्रपटात आहे. हे त्या त्या काळाचे जवळपास प्रातिनिधीक चित्रण आहे असे म्हणता येईल.

१९५२च्या कथानकात क्लॅरी ही एक नर्स आहे. तिच्या पतीचे सहा महिन्यापूर्वी निधन झालेले आहे. ती एकटीच रहात आहे, मात्र सासरची मंडळी प्रेमळ आहेत, तिच्यावर जीव लावलेला आहे. विवाहीत नणंद येऊन-जाऊन असते. मात्र क्लॅरीला दिवस जातात आणि तिचा खडतर काळ सुरू होतो. त्याकाळी तिथेही विधवा स्त्रीस दिवस जाणे म्हणजे पाप आणि गर्भपाताचा विचार करणे तर महापाप. त्याला कायद्याने मान्यता नाही. छुप्यामार्गाने कोणी करून देईल तर ठीक नाहीतरी भोंदू डॉक्टर किंवा अघोरी उपाय. ती चांगल्या हॉस्पिटलमध्येच काम करत आहे. तिच्या डॉक्टरला विनंती करते तर तो म्हणतो मी असली कामं करत नाही. ती तिचं आयुष्य बरबाद होईल सांगते तर त्याचा सौम्य शब्दात पण फटकार, मजा मारताना विचार करायचा होता. नणंदेला कल्पना देते तर तिचं वागणं क्षणात बदलतं. ती म्हणते, सहा महिन्यातच तुला कसं काय एकटं वाटायला लागलं? तू आता इथं राहू नकोस, आमच्या घराची इज्जत जाईल, आईला काय वाटेल? क्लॅरी एकटीच स्वत:च्या हाताने क्रूर पध्दतीने गर्भपात करायला बघते, पण ऐनवेळी हिंमत खचते. शेवटी सहकारी नर्सकडून पत्ता मिळवून ती गर्भपात करणाऱ्या एका डॉक्टरला घरी बोलावते. तो अतिशय व्यस्त, अर्थात अनेक स्त्रियांना गर्भपात करायचा असतो, किती काम आहे त्याच्याकडे. आगाऊ पैसे घेऊन किचन टेबलवर ओबडधोबड पध्दतीने तो तिचे गर्भपाताचे ऑपरेशन करतो. लगेच निघतो आणि जाताना सांगतो रक्तस्त्राव व्हायला लागला तर हॉस्पिटलला फोन कर. नेमके तेच होते. भयंकर रक्तस्त्राव सुरू होतो, घरी ती एकटीच. कशीबशी ती फोनपर्यंत पोचू शकते, पण घराचा पत्ता देण्याच्या आत खाली कोसळते. त्यातच तिचा मृत्यू होतो. मृत्यू की सामाजिक चालीरितींच्या दबावाचा बळी?

१९७४च्या कथानकात बार्बरा ही एक मध्यमवयीन विवाहीत स्त्री. नवरा पोलिसात, चार मुलं, त्यापैकी मोठी मुलगी वयात आलेली. बार्बराला संसाराच्या
रगाड्यातून आता जरा उसंत मिळालेली आहे. त्यामुळे पुन्हा कॉलेज शिक्षण सुरू केले आहे. त्यात तिला इंटरेस्ट वाटतो आहे आणि मातृत्वाची चाहूल
लागते. तोपर्यंत गर्भपाताला कायद्याची मान्यता मिळालेली आहे. काही चांगल्या हॉस्पिटलमध्ये ती सोय आहे. ती नवर्‍याला दिवस गेले आहेत सांगते.
तिच्या मनात आहे, त्याने गर्भपाताचा विषय काढावा, पण ती कल्पना त्याच्या मनाला स्पर्शही करत नाही. तो लगेच म्हणतो, आपण काटकसर करू, तू तुझे शिक्षण पुढे ढकल, मोठ्या मुलीला सरकारी कॉलेजात घालू. मोठी मुलगी जाणत्या वयाची. तिने हे संभाषण ऐकलेले, ती आईला ठणकावते, मी काही सरकारी कॉलेजात वगैरे जाणार नाही. ती जणू ठपका ठेवत आहे, तुमच्या मजेसाठी माझ्या करिअरची वाट का लावता? ती आईला उपदेश करते, जवळच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपाताची सोय आहे, त्याला कायदेशीर मान्यता आहे, तू ते करुन का घेत नाहीस? मुलीची चिडचिड होत आहे ती आई त्यागमूर्ती बनत आहे म्हणून. ती आईला म्हणते, मला काय हवं, डॅडींना काय हवं, सगळ्यांना काय हवं तुला माहीत आहे, पण तुला स्वत:ला काय हवं याचा तू कधी विचार करतेस का? आई-मुलीचे संबंध फार छान दाखवले आहेत. आईच्या मनात गर्भपाताचे विचार घोळत आहे, मुलीच्या बोलण्याने फरक पडलेला आहे. हो ना हो ना करता शेवटी ती निर्णय घेते तो मात्र मुलाला जन्म देण्याचा. कायदा बदलला तरी सामाजिक दबावाचा प्रभाव जात नाही, हेच खरं.

गर्भपाताला अमेरिकेत कायद्याची मान्यता मिळाली ती १९७३ मधील रो विरुध्द वेड (Roe v. Wade) ह्या एका केसमुळे. घटनेने प्रत्येकाला प्रायव्हसीचा
हक्क दिलेला आहे आणि तो स्त्रीच्या गर्भपात करण्याच्या निर्णयाला लागू होतो, काही बाबी लक्षात घेऊन गर्भपात करायचा की नाही हे ठरवण्याचा हक्क तिला आहे, असा निवाडा सुप्रीम कोर्टाने दिला. गर्भपाताचा मार्ग मोकळा झाला, पण कर्मठ धर्मवादी त्याविरुध्द उभे ठाकले. गर्भपात म्हणजे एका जीवाची हत्या असे म्हणत प्रोलाईफ नावाने तिथे हिंसक चळवळी झाल्या. १९७३ ते २००३ दरम्यान गर्भपाताविरुध्द, गर्भपाताची सुविधा उपलब्ध करुन देणार्‍या हॉस्पिटलविरुध्द अनेक हिंसक घटना झाल्या. अगदी खून आणि बॉंबस्फोट इतका टोकाचा विरोध झाला. संततीनियमनाची साधने वापरायलाही धार्मिक कारणावरुन विरोध होता.

ह्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे तिसरे कथानक घडते. काळ १९९६चा. ख्रिस्तीन ही कॉलेज विद्यार्थिनी. विवाहीत प्रोफेसरकडून तिला दिवस जातात. प्रोफेसर हात वर करुन मोकळा होतो आणि तिच्या हातात पैसे टेकवत गर्भपात करुन घे सल्ला देतो. डॉ.बेथ थॉम्सन ही नावाजलेली स्त्री-रोग तज्ज्ञ. ती एका हॉस्पिटलमध्ये गर्भपाताची ऑपरेशन्स करत असते. ख्रिस्तीन मैत्रिणीबरोबर तिथे जाते. हॉस्पिटलबाहेर कर्मठ धर्मवादी स्त्रिया खुर्च्या टाकून बसलेल्या आहेत. कोणी स्त्री आत जायला लागली की लगेच त्या तिला घेरणार आणि गर्भपातविरोधी उपदेशाचा भडिमार तिच्यावर करणार. सश्रध्द मनावर दडपण येईल असे बौध्दीक, शिवाय मुलाच्या जन्मानंतर मदत करण्याची लालूच. ख्रिस्तीनचं मन चलबिचल होतय, पण ती आत जायला निघते, तर एक स्त्री ओरडते, तुही माझ्यासारखीच आई आहेस, फरक इतकाच की माझं मुलं माझ्या कडेवर आहे तर तुझं मुलं तुझ्या पोटात. जिव्हारी घाव लागेल असं नियोजन. ख्रिस्तीन आत जाते, तिथे मात्र शांत वातावरण. तिथली समुपदेशक सांगते, गर्भपात करच असा आमचा आग्रह नाही. तुला योग्य वाटेल, पटेल तो निर्णय तू घे. तू गर्भपात करायचं ठरवलंस तर त्यासाठी आम्ही तुला नक्कीच मदत करू. ख्रिस्तीन तेव्हा माघारी फिरते, लगेच बाहेरच्या स्त्रिया तिचं अभिनंदन करण्यासाठी तत्पर. पण काही दिवसांनी ख्रिस्तीन गर्भपात करायचाच निश्चय करुन पुन्हा हॉस्पिटलजवळ येते. तिथे आता उग्र निदर्शने सुरू आहेत. धक्काबुक्की सहन करत ख्रिस्तीन आत जाते. डॉ.बेथ थॉम्सन आत जाताना तर तिला शिव्यांची लाखोली मिळते. ख्रिस्तीनला गर्भपाताच्या ऑपरेशनसाठी तयार केलेलं आहे, ती ऑपरेशन टेबलवर आहे. बाजूच्या खोलीत एकांतात डॉ.बेथ टिपं गाळत प्रार्थना करते कारण तिही सश्रध्द आहे. तरीही ती हे काम का करते असं ख्रिस्तीन विचारते तेव्हा डॉ.बेथ सांगते, जेव्हा ह्याला कायदेशीर मान्यता नव्हती तेव्हा गर्भपात करण्याच्या प्रयत्नात स्त्रिया कशा हाल हाल होऊन मरत मी बघितलेलं आहे. ऑपरेशन यशस्वी होतं, पण एक कट्टर तरुण सुरक्षारक्षकांना चकवा देऊन आत शिरलेला आहे, तो गोळ्या झाडून डॉ.बेथचा जागेवरच खून करतो. सुन्न करणारा शेवट.

१९९० नंतर तर अमेरिकेत अचानक गर्भपातविरोधी मोहिमेने जोर पकडला. गर्भपात करणार्‍या डॉक्टरांचे खून झाले, अनेक हिंसक घटना, मोर्चे, निदर्शन असे प्रकार झाले. एरिक रॉबर्ट ह्या कट्टर माणसाने तर गर्भपात विरोधासाठी सिरीयल बॉम्बिंग केले होते. हे तर उघड विरोध. पण सुप्त दबाव किती ते चित्रपट कसा बनला त्या कहाणीवरुन कळते. डेमी मूर ही हॉलिवूडची टॉपची अभिनेत्री. सात वर्ष ही कथा तिच्याकडे होती, पण कोणताही निर्माता-स्टुडिओ त्याची निर्मिती करायला तयार नव्हता. ह्या विषयाबरोबर स्वत:चे नाव जोडायची त्यांची तयारी नव्हती. शेवटी एचबीओ ह्या टीव्ही चॅनेलच्या मदतीने टीव्हीसाठी १९९६ मध्ये ह्या चित्रपटाची निर्मिती होऊ शकली. डेमी मूर याची कार्यकारी निर्माती होती आणि पहिल्या भागातील क्लॅरी ह्या नर्सच्या भूमिकेतही ती होती. डेमी मूरबरोबरच ह्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी उभी राहणारी दुसरी अभिनेत्री म्हणजे चेर. तिसर्‍या भागाचे तिने दिग्दर्शन केले आणि डॉ.बेथची भूमिका निभावली. चेर हीसुध्दा गायिका आणि अभिनेत्री म्हणून टॉपची, शिवाय सौंदर्याचे देखणे शिल्प. तिचा मुनस्ट्रक हा चित्रपट अतिशय गाजलेला. हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ह्या दोघी सामर्थ्यवान अभिनेत्री ह्या चित्रपटाच्या मागे खंबीरपणे उभ्या नसत्या तर याची निर्मिती झालीच नसती.

आपल्याकडे गर्भपाताविरुध्द अशा हिंसक चळवळी झाल्या नाहीत याचा अर्थ आपण उदारमतवादी आहोत असा मात्र होत नाही. माणसाच्या जीवाचे मोल आपल्याकडे फारसे नाही तर आपण गर्भाची पर्वा काय करणार?

लेखक चित्रपट, नाटक, साहित्य, अर्थक्षेत्र व गुंतवणूक इत्यादी विषयांवर सातत्याने लेखन करत असतात. ते कथा लेखकही आहेत.

1 Comment

Write A Comment