fbpx
राजकारण

प्रणब मुखर्जी यांचे उत्तिष्ठ, उपविष!

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी नागपूर येथे संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि कॉंग्रेस आणि इतरही लोकशाहीवादी, पुरोगामी लोकांत अस्वस्थता पसरली. पन्नासच्यावर वर्षे सार्वजनिक जीवनात असणारे, कॉंग्रेसकडून अर्थ, परराष्ट्र, गृह अशी मातब्बर खाती सांभाळलेले आणि राष्ट्रपती हे सर्वोच्च पद भूषवलेले प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर जाणार, तेही मोदी सरकारच्या अखेरच्या वर्षात या घटनेचा अर्थ काय लावायचा? मुखर्जी यांनी कोणता हिशोब केला आहे, असेल? २०१९ मध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही तर मुखर्जी यांना ‘सर्वसहमतीचे उमेदवार’ होऊन पंतप्रधान व्हायचे आहे काय? वगैरे तर्क लढवले जाऊ लागले. दुसऱ्या बाजूला ‘संघाचे हिशोब काय आहेत? मुखर्जीना ‘सौम्य हिंदुत्वाचा चेहरा’ करीत, आणि संघाचे तसे सर्टिफिकेट देत मोदी-शाह यांना शह द्यायचा आहे की काय? की फक्त सुसंस्कृत, सौम्य चेहऱ्यांना आपल्या व्यासपीठावर बोलावून ‘संघ बदलला/ बदलतो आहे’ असली (जेपी- ना.ग. गोरे- एस.एम. जोशी छाप) प्रशस्तीपत्रे पदरी पाडून घ्यायची आहेत?’ असे अंदाज लावले जाऊ लागले.
कॉंग्रेसमधली अस्वस्थता तर उघड होती. ७ जूनला कॉग्रेस नेते आनंद शर्मा यांनी ट्वीट केले- ‘ऐकण्याची, शिकण्याची आणि बदलण्याची ज्यांची तयारी आहे अशा लोकांशीच संवाद होऊ शकतो. संघ आपल्या मूळ अजेंड्यामध्ये बदल करण्याची अजिबात शक्यता नाही. त्याला फक्त बिगर-संघी विचारवंत/ नामवंतांना आपल्या व्यासपीठावर आणून वैधता पदरी पाडून घ्यायची आहे. ज्येष्ठ नेते- विचारवंत प्रणब मुखर्जी यांची संघ मुख्यालयातील छायाचित्रे लाखो कॉंग्रेस कार्यकर्ते आणि विविधता व लोकशाही मूल्ये मानणाऱ्या लोकांना यातना देणारी आहेत’.
सोनिया गांधी यांचे निकटचे सल्लागार अहमद पटेल यांनी ट्वीट केले ‘प्रणबदांकडून ही अपेक्षा केली नव्हती!’ कदाचित सर्वात कडक प्रतिक्रिया होती ती प्रणब मुखर्जी यांची मुलगी आणि दिल्ली काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या शर्मिष्ठा मुखर्जी यांची. ‘तुमचे भाषण विसरले जाईल, पण तुम्ही संघाच्या व्यासपीठावर गेलात याच्या प्रतिमा टिकतील- आणि प्रतिमांचे राजकारण कसे करायचे यात संघ- भाजपचा हात कोणी धरू शकत नाही’ असा इशारा त्यांनी दिला होता.
मात्र हे सगळे इशारे प्रणब मुखर्जी यांच्या भाषणात, त्यासोबतच्या प्रतिमांच्या खेळात विरून गेले. मुखर्जी यांचे भाषण ‘संघाला आरसा दाखवणारे होते’, ‘मुखर्जी यांनी भारतीय राष्ट्रवाद कसा विविधतेचा आदर करतो हे संघाच्या नाकावर टिच्चून सांगितले’ वगैरे पोपटपंची चालू झाली. मुखर्जी यांनी अगदीच ‘संघ-दक्ष, उत्तिष्ठ’ वगैरे कवायत न केल्याने सुटकेचा निश्वास त्यात होता. उदारमतवादी वर्तुळे, कॉंग्रेस समर्थक आपापल्या परीने ‘अब्रू बचावली’ याला मोठा विजय मानत मीडिया- सोशल मीडिया मध्ये प्रतिक्रियांचे रवंथ करू लागले.
तसे पहिले तर मुखर्जी यांच्या भेटीचा धुरळा अजून पुरता खाली बसायला तयार नाही. कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांचे आजच्या indian express मध्ये प्रसिद्ध झालेले प्रश्न पुरेसे बोलके आहेत. “आपल्यासारख्या असंख्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मुखर्जी अनेक वर्षे संघाच्या घातक विचारसरणीबद्दल सावध करत आले असताना त्यांनी अचानक राष्ट्रवादावर व्याख्यान द्यायला संघ मुख्यालय का निवडले? मुखर्जी हे संघावर १९७५ आणि १९९२ मध्ये बंदी घालणाऱ्या कॉंग्रेसच्या केंद्र सरकारचा भाग होते. तेव्हा संघ का धोकादायक आणि विखारी होता आणि त्याच्यात आता असा काय बदल झाला की तो सद्गुणी बनला हे मुखर्जी यांनी स्पष्ट करायला नको काय? एकतर तुम्ही आम्हाला तेव्हा संघाबद्दल जे सांगितले ते चुकीचे होते किंवा मग आज तुम्ही आपल्या सहभागाने संघाला मिळवून देत असलेली प्रतिष्ठा ही तुमच्या सार्वजनिक जीवनातील घोडचूक आहे. राजकीय विश्वातील विखार आणि विभाजनाचे तणाव कमी करणे हे यातून साध्य होणारे नसून संघाला मुख्यधारेत आणून त्याला प्रतिष्ठा देणे हेच यातून निष्पन्न होईल. इतिहास हेच शिकवतो की युरोपात हिटलर आणि नाझी यांचा धुमाकूळ सुरु असताना १९३८ मध्ये म्युनिक करार करून ब्रिटीश पंतप्रधान चेंबरलेनने ‘आपण या युगासाठी शांतता विकत घेतली’ असा जो समज करून घेतला तो किती चुकीचा होता. फासिस्त शक्तींशी असा सौदा होत नसतो’.
कॉंग्रेसखेरीज इतर पुरोगामी पक्ष, आणि लोकांच्या प्रतिक्रिया साहजिकच अधिक कठोर आणि टीकात्मक आहेत. कॉ. सीताराम येचुरी यांनी ‘मुखर्जी यांच्या ‘history capsule’ मध्ये गांधी हत्या आणि त्यासाठी जबाबदार संघाला खडे बोल न सुनावल्याबद्दल टीका केली आहे. दलित आणि इतर पुरोगामी संघटना मुखर्जी यांनी नागपुरात येऊनही डॉ. आंबेडकर यांचा गौरव केला नाही, आणि गोरक्षक, लव्ह जिहाद वगैरे विषयांवर संघाच्या संघटना करत असलेल्या दहशतवादी कारवायांवर स्पष्ट भूमिका न घेतल्याबद्दल टीका करत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर उदारमतवाद, आणि फासिझमबद्दल त्याची भूमिका आणि इतिहासाबद्दलचे आकलन यांचा विचार होणे गरजेचे आहे. मुखर्जी किंवा संघ यांचे हिशोब काय हा प्रश्न दुय्यम आहे. खरे प्रश्न आहेत ते वेळोवेळी उदारमतवादी/ समाजवादी विचारवंत- नामवंतांना संघाच्या व्यासपीठावर का जावेसे वाटते/ का जावे लागते? संघाला अशा नामवंतांनी आपल्या व्यासपीठावर यावे असे का वाटते? आणि असंख्य बौद्धिके करून, पर्यायी इतिहासाचे धडे छात्रभारती ते whatsapp युनिवर्सिटीपर्यंत देऊनही संघ घडवतो ते ‘विचारवंत’ नव्हेत तर विचारसरणीचे पाईक सैनिक- हा त्याचा पराभव म्हणावा की विजय? (हा विजयच म्हटला पाहिजे कारण संघाचे तत्वज्ञान कृतीचे आहे, त्यात स्वतंत्र आर्थिक विचार नाही, विज्ञान आणि समाजविषयक चिंतन हे केवळ प्राचीन ग्रंथांची पोपटपंची अश्या अर्थाने येते- त्यात नव्या शोधांची व्यवस्था आणि ज्ञानशाखेचा विस्तार याबद्दल काहीही सांगण्यासाठी नाही- पण हा त्या संघटनेचा कमीपणा म्हणून न पाहता उक्ती आणि कृती यांची सांगड म्हणून पाहायला पाहिजे. ग्राम्शी याला अभिप्रेत अशी समाजाच्या सर्व थरात कार्यरत आणि ‘कॉमन सेन्स’- लोकप्रिय समज यांवर हुकुमत मिळवली पाहिजे याचे भान असणारी आणि त्यात यशस्वी अशी संघटना कम्युनिस्ट पक्षांना घडवता आली नाही हे खरे. पण उजव्या फासिस्त पक्षांतही कदाचित इजिप्तमधली ‘मुस्लिम ब्रदरहूड’ वगळता अशी संघटना विरळाच)
तर सर्वप्रथम मुखर्जी यांच्या भाषणाचा उल्लेख केला पाहिजे. ‘सरसंघचालकांचा शब्द अखेरचा’ ह्या संघाच्या परंपरेला फाटा देत मुखर्जी यांनी माजी राष्ट्रपती या पदाला अनुरूप संकेत पाळत आपले भाषण सरसंघचालक भागवत यांच्या नंतरच होईल याची काळजी घेतली वगैरे वृत्तांकन जे झाले आहे ते काळजी वाढवणारेच आहे. मुळात माजी राष्ट्रपती सहभागी होत असलेल्या समारंभात ‘कायदेशीर संकेत की संघ संकेत’ अश्या वाटाघाटी होतात हेही संघ-संकेताला साजेसेच म्हणायचे. असो. तर मुद्दा मुखर्जी यांनी केलेल्या भाषणाचा. ‘नेहरू- गांधी- टागोर यांना उदधृत करून भारतीय राष्ट्रवाद विविधतेवर आधारलेला आहे’ वगैरे मांडणी करणारे संघ स्वयंसेवकांसमोर इंग्रजीमध्ये केलेले भाषण (आणि लागलीच फोटोशॉप करून ‘मुखर्जी हेही फासिस्त पद्धतीचा सल्यूट करीत आहेत’ असले प्रचार म्हणजे ‘गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता’ अशातला प्रकार आहे!) आता इंग्रजीत भारतीय राष्ट्रवाद आणि विविधतेचा पुरस्कार करणारे भाषण आणि समोर ‘हिंदी, हिंदू, हिंदुस्थान’ हे घोषवाक्य असणारे स्वयंसेवक यातला विरोधाभास आणि त्याहूनही ‘मुखर्जी यांनी संघाला आरसा दाखवला’ अशी शेखी मिरवणाऱ्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या गणंगांचा उत्साह याचे कौतुक करावे तितके थोडे. असो.
मुखर्जी यांनी आपल्या भाषणाचा बराच भाग भारताच्या इतिहासाबद्दल आणि भारतीय राष्ट्रवादाबद्दल खर्ची घातला आहे. आणि त्यांची ही इतिहासदृष्टी कशी संघाला पूरक ठरते- किंवा संघाने त्या दृष्टीचाच आपल्या सोयीने कसा वापर केला आहे हे पाहणे रंजक आहे. ‘राष्ट्र म्हणजे समान संस्कृती/ भाषा/ इतिहास असणाऱ्या सामायिक भूभागावरील लोकांचे राष्ट्र’ या पाठ्यपुस्तकी ज्ञानाला संघ कशाला आक्षेप घेईल? पुढे मुखर्जी म्हणतात- ‘भारत हा एक मुक्त समाज प्राचीन काळापासूनच राहिला आहे. तक्षशीला, नालंदा ही ज्ञानकेंद्रे, मध्य आशिया, चीन, आग्नेय आशिया इथपर्यंत पोचलेला बौद्ध धर्म, शहरांचा नियोजनबद्ध विकास, उत्तम पायाभूत सोयी- म्हणजे खुल्या, सहिष्णू समाजाचा विकास कसा होतो याचे निदर्शक होते. भारत हे पूर्वापार राष्ट्र म्हणून विकसित झाले आहे ते युरोपीय मॉडेलपेक्षा निराळ्या तऱ्हेने. ‘वसुधैव कुटुंबकम’ आम्ही सर्व जग हे कुटुंब मानत आलो आहोत. सहिष्णुता हा आमच्या सामायिक संस्कृतीचा पाया आहे’. पुढे त्यांचा प्रवास पाठ्यपुस्तकी पद्धतीने वंशावळी सांगत होतो- मौर्य घराणे, गुप्त राजवट, मग १२ व्या शतकात मुस्लिम आक्रमण, आणि त्यांनी दिल्लीचा घेतलेला ताबा, मग बाबराने मुघल राजवटीची केलेली स्थापना, पुढे इस्ट इंडिया कंपनी, ब्रिटीश राजवट- ह्या सगळ्या २००० वर्षांच्या उलाढालीत ५००० वर्षांपासूनची सांस्कृतिक वीण अक्षुन्ण राहिली. मग भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने हा वारसा स्वातंत्र्य चळवळीत कसा जपला ह्याचा आढावा घेत राज्यघटनात्मक राष्ट्रवाद/ सनदशीर राष्ट्रवाद यांचा स्वीकार कसा गरजेचा आहे हे मांडत मुखर्जी अखेरच्या भागात जपूनच संघाला काही वळसे देतात. पण ‘प्रत्येक दिवशी वाढती हिंसा, स्त्रिया- मुली यांच्यावर होणारे अत्याचार, यांचा उल्लेख करताना थेट नावे घ्यायला कचरतात. शांती, एकात्मता, समरसता, विविधता यांचा जप करणारे हे भाषण म्हणजे केवळ अस्थानी प्रवचनच नाही. धंदेवाईक हिंदी सिनेमाने ‘गांधीवादी राजकारण्याची’ जी प्रतिमा बनवली होती तिला जपणारे हे भाषण आहे.
गमतीचा भाग सोडून देऊ, पण मुळात मुखर्जी यांची इतिहासदृष्टी आणि संघाची इतिहासदृष्टी ह्यात असलेली साम्यस्थळे उघड आहेत. नव्हे तर सावरकर ते गोळवलकर ह्या हिंदुत्वाची काही एक वैचारिक व्यवस्था मांडायचा किमान प्रयत्न असलेल्या लोकांनीही ती मान्य केली आहेत. विविधता, विविधतेत एकता यात उदारमतवाद आणि हिंदुत्व ह्यांच्यात काही विरोध नाहीच- म्हणजे हिंदुत्वाचे प्रतिपादन आहे की हा उदारमतवाद आणि सहिष्णुता हिंदू धर्मात अंगभूत आहेच. प्रश्न आहे तो असहिष्णू इस्लामचा (आणि धर्म बाटवणाऱ्या ख्रिश्चन मिशनरी लोकांचा) तेव्हा ज्या ५००० वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा, मुखर्जी गौरवाने उल्लेख करतात तो तर ‘हिंदू’ वारसा आहे. सावरकर अर्थात ह्या सहिष्णुतेला ‘सद्गुणविकृती’ ठरवत आपला ‘बळी तो कान पिळी’ असा सामाजिक डार्विनवाद/ जंगलच्या कायद्याचा हिंदूराष्ट्रवाद मांडतात. पण मुळात ‘५००० वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा प्रश्न’ मार्क्सवादी आणि आंबेडकरी विचार सोडला तर उदारमतवादही खऱ्या अर्थाने विचारात घेत नाही. हा सांस्कृतिक वारसा, तत्वचर्चा, खुलेपणा वगैरे फक्त उच्चजातीय पुरुषांना लागू होते. वर्णीय शोषण- ते जातीय शोषण, आणि उत्पादक श्रमिकांना आर्थिक आणि सामाजिक अश्या दुहेरी दास्यात जखडणे हे भारतीय सुवर्णयुगाचे योगदान म्हणता येईल. आता ह्या कचाट्यातून सहज सुटता यावे म्हणून संघाने जातीयता ही मुस्लिमांनी भारतात आणली वगैरे संशोधन सुरु केले आहे. (एखादे मुखर्जी, एखादे राम गुहा संघाच्या जाळ्यात सापडून असे संशोधन ‘विचारात घेण्यासारखे आहे’ एवढे म्हणायचा अवकाश आहे!)
स्वातंत्र्य आंदोलनात उदारमतवादी प्रवाहाने सामाजिक सुधारणा व्हाव्यात म्हणून केलेले प्रयत्न हे मलमपट्टीच्या रूपात राहिले त्याला कारण हेच आहे. ‘हिंदू मुख्यधारेत तयार झालेल्या काही विकृती अशीच धारणा ‘जातीचा प्रश्न, पुरुषसत्ता’ ह्याबाबत राहिली आहे. भूतकाळात असलेले ‘हिंदू सुवर्णयुग’ परत येण्यासाठी मुखर्जी ‘खुल्या सहिष्णू धोरणाचा रस्ता सुचवतात तर संघ- हिंदुत्ववाद अधिक आक्रमक असे ‘हिंदूराष्ट्र’. दिपेश चक्रवर्ती यांच्या मते ‘असे ‘हिंदूराष्ट्र’ आजवर स्थापन झालेलेच नाही आणि म्हणूनच ते भविष्यवर्ती आहे. स्वतंत्र भारताची आधुनिक राज्यघटना एक महत्वाची सांधेतोड आहे, याचे भान ज्यांना आलेले नाही अशा सर्व प्रस्थापित उदारमतवादी विचाराला खडबडून जागे व्हायला भाग पडणारी अशी ही हिंदुराष्ट्राची मांडणी आहे’.
संघाचे विचारवंत मनमोहन वैद्य मुखर्जी ह्यांच्या संघ कार्यक्रमातील सहभागावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ‘एकाही स्वयंसेवकाने मुखर्जी यांच्या भेटीवर टीका केली नाही’ असा मोठेपणा मिरवत आहेत. ‘मुखर्जी यांच्यावर जी टीका होते आहे ती ‘परकीय’ विचारामुळे होत आहे, म्हणजे कम्युनिस्ट विचारातून होत आहे’ असा वैद्य यांचा आरोप आहे. आता शर्मिष्ठा मुखर्जी ते मनीष तिवारी ते आनंद शर्मा हे सर्व कम्युनिस्ट आहेत काय? बरे त्यापुढे जात वैद्य म्हणतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे शत्रू (उदा. कम्युनिस्ट) हेच संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल टीका करत असतात. पैकी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उदारमतवाद्यांना कोंडीत पकडणारा आहे- आणि त्यातूनच संघ-भाजपबद्दल काय भूमिका घ्यायची ह्याचा गोंधळ निर्माण झाला आहे, वेळोवेळी होतो आहे.
‘संपूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे नवथर उदारमतवादी असे म्हणतात की ‘हेट स्पीच आणि फ्री स्पीच’ ह्यांच्या सीमा ठरवणारे आपण कोण? जोपर्यंत शारीरिक हिंसाचार होत नाही तोवर आपण कुणावरच निर्बंध घालू शकत नाही’. आता गंमत अशी आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा होता होईतो फायदा सर्वाधिक उठवला आहे तो हिंसक गटांनी- भडकाऊ भाषणे, पत्रके, पोस्ट्स यांचा भडीमार सतत होत असतो. असंख्य मुखांनी कार्यरत अश्या संघासारख्या अजस्त्र संघटना सहज नामानिराळ्या राहतात त्या त्यामुळेच. प्रश्न असा येतो की संघावर तीन वेळा बंदी घालण्यात आली ती केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला म्हणून नाही तर सरळ सरळ दहशतवादी कारवाया केल्याने आणि दंगली केल्याने. ही बंदी का उठवण्यात आली? आणि त्याचा परिणाम काय झाला? उदारमतवादी प्रतिपादन असे असते की केवळ बंदी घातल्याने प्रश्न सुटणार नाही- तर चर्चा आणि शांततामय मार्गाने प्रश्न सुटेल. फासिस्त संघटना त्यातील बंदी न घालण्याचा भाग बरोबर उचलून धरतात, चर्चेचा देखावा करणे त्यांच्याइतके कुणालाच जमणार नाही आणि त्यांच्या लेखी असलेले प्रश्न हे चर्चेचा भाग बनूच शकत नाहीत. ‘हिंदू दहशतवाद’ हा अर्धवट देखावा करून जुजबी कारवाया करून ‘हेही खूष आणि तेही खूष’ होतील असला बनाव अंगाशी कसा येतो आणि अखेर गोरक्षक, बजरंगी, घर-वापसी असल्या तरतऱ्हेच्या टोळ्यांना कसे मोकळे रान मिळते हे आपण पाहतो आहोत. ‘ते रामभक्त तर आम्ही शिवभक्त’ असले बनाव तर आणखीच गंभीर आहेत.
यालाच जोडून चर्चा करावी लागेल ती संघाच्या ‘भारतीयते’ची. संघाच्या व्यासपीठावर किंवा भाजपात प्रवेश केल्याने भारतीय नागरिकत्व मिळते असाही कुणाचा समज झाल्यास नवल वाटणार नाही इतपत कर्कश प्रचार करण्यात आला आहे. मुखर्जी कॉंग्रेसमध्ये होते तेव्हा आणि विशेषतः पुनर्लक्षी करआकारणीच्या निर्णयाने राष्ट्रभक्त संघीय लोकांना ते शत्रुवत होते. आता मात्र मनू पालटला आहे.
फ्रेंच विचारवंत लकान याचा एक प्रसिद्ध विनोद आहे ‘माझी प्रेयसी कधीच वेळ चुकवत नाही. कारण जर तिची वेळ चुकली तर त्या क्षणी ती माझी प्रेयसी राहत नाही’! संघाची भारतीयतेची कल्पना उलट्या तऱ्हेने साधारण अशीच आहे. जो संघाच्या व्यासपीठ/ शाखेत जाईल तो भारतीय- मग त्याचा विचार/ आचार काहीही असो. आता अडचण अशी आहे की अगदी ‘महाप्रचंड’ असे अभियान राबवूनदेखील भाजपची सदस्यसंख्या ८-१० कोटीच्या पलीकडे गेलेली नाही. संघाच्या दृष्टीने विचार केला तर अडचण आणखी मोठीच आहे. संघाला अभिप्रेत असे ‘हिंदुराष्ट्र’ खरे तर आधीच तयार आहे असे त्याने म्हणायला हवे- ८०% लोक जर हिंदू आहेत, तर भारत हे हिंदूराष्ट्र आहेच असा त्याचा पवित्रा असायला हवा. पण गोची अशी आहे की एकीकडे ब्राह्मणी मनुस्मृती ते दुसरीकडे फासिस्त वंशसंहार असा त्या आकांक्षेचा विस्तार आहे. तेव्हा केवळ तुम्ही हिंदू असल्याने भागणार नाही (सावरकरी हिंदुत्वाच्या व्याख्येप्रमाणे) तर शाखेत जाऊन कृतीतून आपले हिंदुत्व सिद्ध करावे लागेल. गेला बाजार येता जाता मुस्लिम-द्वेष्ट्या पोस्टी टाकणे, राजकारण कसे वाईट आणि विकास, एकता, आणि एकसंधता यांचे गुणगान करावे लागेल. म्हणजे लकानच्या विनोदात अनुस्यूत आहे ते प्रेयसीला ‘प्रेयसी’ म्हणून जर टिकून राहायचे असेल तर प्रत्येक वेळी तिला वक्तशीर राहावे लागेल. इथे आठवण होते ती ‘कारसेवक’ लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रसिद्ध ‘जीनास्तुतीची’ आणि त्यांनंतर त्या लोहपुरुषाच्या सगळ्या ‘प्रवासाची’! तेव्हा कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असताना प्रणब मुखर्जी यांनी संघाकडून आपले भारतीयत्व ‘सर्टिफाय’ करून घ्यायचा निर्णय का केला असावा हा प्रश्नच आहे. पण असे करण्याने एक मात्र झाले- कर्नाटकात कॉंग्रेस-ज.द. सरकारच्या शपथविधीतल्या भाजपविरोधी एकतेच्या सोहळ्यातले हवशे, नवशे आणि गवशे कोण ह्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले. इंग्रजीत ‘can you do business with..’ हा संघाबद्दल जो प्रश्न आहे त्याची कॉंग्रेसअंतर्गतच बरीच उत्तरे आहेत; आणि (आनंद शर्मांच्याप्रमाणे) ती रोज बदलणारीही आहेत. तेव्हा ‘आरसे, मुखवटे आणि चेहरे’ जे दिसले ते संघाचे नव्हेत तर कॉंग्रेस आणि उदारमतवादी छावणीचे- याचे भान जरुरीचे आहे. हाच प्रणब मुखर्जी यांच्या संघाख्यानाचा धडा आहे.

2

लेखक दिल्लीस्थित अभ्यासक संशोधक आहेत.

Write A Comment