विशेष

भिडेंचे आंबे आणि राहुलचा कोकाकोला

आपल्या देशात दररोज काही ना काही विनोदी बोलण्याची स्पर्धा असल्यासारखे काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व पक्षीय नेते, लोकप्रतिनिधी वगैरे शाब्दिक ओकाऱ्या करत असतात. भिडे नावाचा स्वतःला गुरुजी म्हणवणारा एक कुणीतरी म्हातारा आहे म्हणे. त्याने शालेय जिवनात वाचलेली एक जादूची कथा स्वतःच्याच नावावर खपवली. की म्हणे त्याच्याकडे एक आंब्याचे झाड आहे. त्याचे आंबे खाल्ले की पोरं होतात. इतकेच नाही तर असे आंबे निपूत्रिक जोडप्यांना त्याने दिले आणि त्यांना खरीखुरी पोरंही झाली. पुन्हा त्यात मुलगा हवा असेल तर मुलगाच होतो. हे म्हणजे सोने पे सुहागाच की! या भिडे नामक म्हाताऱ्याने त्यांच्या लहानपणी गोष्टींची पुस्तंक वाचली पण इयत्ता पाचवीतल्या जीवशास्त्राचा अभ्यास नीट केला नसावा. अर्थात जीवशास्त्र वगैरे गोष्टी पाश्चात्य आहेत, त्यामुळे ती काय वाचायची, अधिक अभ्यासाने माणसं गांडू बनतात, असे हे भिडे नामक म्हातारे गृहस्थ जाहिर सांगतात. आपल्या महान संस्कृतीत अशा प्रकारे आंबे खाऊन, पेरू, चिकू खाऊन वगैरे मुलं जन्माला घालण्याचं तंत्र खूप पूर्वीपासून अवगत आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या रामायणातील सीता या टेस्टट्यूब बेबी असल्यामुळे भिडेंसारख्या जाज्ज्वल्य हिंदुराष्ट्राभिमानी माणसाकडे मुलं जन्माला घालणारे आंबे असल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.

भिडे इथे पौराणिक भाकडकथा स्वतःच्या नावावर खपवत असताना तिथे काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी आधुनिक भाकडकथा उपस्थित श्रोत्यांना सांगून मंत्रमुग्ध करून टाकायचा प्रयत्न केला. कोका कोला कंपनी ही एका लिंबू सरबत विक्रेत्याने सुरू केली. आता याचा जसाच्या तसा अर्थ काढून भाजप आयटी सेलची हुश्शार पोरं-टोरं कोका कोला कंपनीच्या इतिहासाचे दाखले देत फिरणार यात वाद नाही. राहूल गांधी हे ओबीसी मेळाव्यात बोलत होते. कोका कोला कंपनी ही लिंबू सरबत विक्रेत्याने सुरू केली नाही. त्याचा फॉर्म्युला हा एका रसायनशास्त्रज्ञाने शोधून काढला. जॉन पेंबलटर्न त्याचं नाव. त्याने पुढे हा फॉर्म्युला एसा ग्रीग्स कँडलर नावाच्या दुसऱ्या एका व्यापाऱ्याला विकला. हा केंडलर एका औषध दुकानात कारकून होता. पुढे त्याने वेगवेगळ्या औषधांची पेटेंट्स घेऊन त्याच्या निर्मितीचा कारखाना टाकला होता. कोका कोला त्याच्या हातात आल्यावर त्याने त्याचे अत्यंत आक्रमक मार्केटिंग केले व त्यात बक्कळ नफा कमावला. असो सांगण्याचा मुद्दा असा की, या देशातील पाठी बघून चालणाऱ्या उजव्या शक्तींना असे वाटत राहते की, आपल्या या महान संस्कृतीत सर्व काही होते. विमाने होती, प्लास्टिक सर्जरी होती, अणू बाँब होते आधुनिक युगात लागलेले सगळे शोध आमच्या या देशात अनादी काळापासून होते. भिडे नावाचा म्हातारा काय किंवा संघ परिवारातील आचरट बोलणारे अऩेकजण ही त्याचीच अपत्ये आहेत. दुसरीकडे एक वेगळ्या प्रकारचा अंधश्रद्धाळू वर्ग आहे. जो आधुनिकतेला थेट भांडवलशाहीशी जोडतो आणि जे काही महान या जगात उपलब्ध आहे ते ते या भांडवलशाहीच्या उपकारामुळेच आहे, याच्यावर दृढ विश्वास ठेवतो. भारतासारख्या देशात जिथे तब्बल ८३ कोटी जनतेकडे दररोज खर्च करण्यासाठी २० रुपये ही नसतात अशा देशात जागतिकीकरणाच्या नावाखाली मुठभर भारतीय भांडवलदार व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भले करणारे धोरण राबविणाऱ्या पक्षाचे सर्वेसर्वा यापेक्षा वेगळा विचार करूही शकत नाहीत. राहूल गांधी हे काही जनरल नॉलेजची परीक्षा द्यायला त्या ओबीसी मेळाव्यात गेले नव्हते. त्यांचा सांगण्याचा उद्देश असा होता की, अशा प्रकारे सामान्यातील सामान्य माणसांमधून मोठा उद्योजक बनू शकतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील स्टार्टअप वगैरेसारख्या फोकनाड कल्पनांच्या जाहिरातींसाठी जो कोट्यवधी रुपायांचा चुराडा करत आहेत, त्यामागे देखील नेमका हाच उद्देश आहे. 

भांडवलशाही म्हणजे उदारमतवाद, भांडवलशाही म्हणजे लोकशाही असा एक ठाम समज केवळ मध्यममार्गी काँग्रेस किंवा उजव्या विचारसरणीचे पारिवारजन यांच्यात रुजलेला आहे, असे नव्हे. तर डावा मार्क्सवादी विचार म्हणजे हुकूमशाही, स्तालीनशाही असे धडे समाजवादी साथी-गातींनी तारुण्यातील शिबीरांमधून गिरवलेले असल्याने त्यांच्याही मनात असेच काहीसे विचार रुंजी घालत असतात.

भांडवलशाहीत अशी उदाहरणे कायम दाखवली जातात. अमेरिकी भांडवलशाहीच्या विकासात तर ती अनेकदा जाणीवपूर्वक पेरण्याचे प्रकार केले जातात.  अमेरिकी भांडवलशाहीचा पाया रचणारा किंवा अमेरिकी भांडवलशाहीला साता समुद्रापार नेणारा, किंवा ज्याला सध्या आपण जागतिकीकरण म्हणून ओळखतो त्या आधुनिक युगातील जागतिकीकरणाचा अध्वर्यू म्हणून ज्याला ओळखले जाते तो जॉन डी. रॉकफेलर याच्याबाबतही कायम असल्याच कहाण्या सांगितल्या जातात. रॉकफेलर म्हणजे जागतिक पेट्रोलियम उद्योगाचा मुख्य खांब. स्टँडर्ड आईल या कंपनीचा संस्थापक, ज्या कंपनीच्या उप कंपन्यांमध्ये आज एक्झॉन, मोबील, शेवरॉन, आरको, कोनोको अशी जबरदस्त बलाढ्य नावे येतात. तर हा रॉकफेलर हा एका किराणा मालाच्या कंपनीत कारकून होता. ही अशी कारकून, किंवा सरबत विकणारी मंडळी मोठी कशी झाली तर स्वतःच्या मेहनतीवर आणि अक्कल हुशारीवर, असं कायम सांगितलं जातं. हे एकून सामान्य माणूसही प्रचंड मेहनत घ्यायला लागावा, असा या मागचा उद्देश असतो. मात्र सामान्य माणसाने मेहनत केली की त्याला केवळ घाम येतो. घामेजलेल्या शरीराला कुबट वास आल्याने मग श्रीमंत लोक त्याच्याकडे पाहून नाकं मुरडतात, कारण तो अक्कल हुशारी वापरत नाही ना. ही अक्कल हुशारी नेमकी काय असते बरं? तर रॉकफेलरसाहेबांनी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात एका मित्राच्या सोबतीने १८०० डॉलर्सच्या भांडवलावर एक किराणा कंपनी सुरू केली. त्यात बऱ्यापैकी फायदा झाल्यावर तेव्हा नव्यानेच अविष्कार झालेल्या पेट्रोलियम या उद्योगाकडे त्यांचे लक्ष वळले. या धंद्यात प्रचंड अस्थिरता होती. कच्च्या तेलाच्या पिंपाचे भाव आज १० सेंट असतील तर उद्या ते १० डॉलर व्हायचे. त्यामुळे, या धंद्यात आज श्रीमंत असलेला उद्या पार भिक मागायच्या परिस्थितीत यायचा. रॉकफेलरने यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय, तर त्याने बाजारापेक्षा कमी भावात आपल्या गिऱ्हाईकांना तेल विकायला सुरुवात केली. आता हे त्याला कसं जमलं. तर तेल धंद्यामध्ये, तेलाचा शोध घेऊन त्याच्या विहिरी खणणं, मग त्याचे शुद्धीकरण करणं, मग त्याची पिंपे भरणं, मग त्याचे वितरण करणं अशा प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रॉकफेलर शिरला. यातील वितरणाच्या भागात सर्वात मुख्य भाग होता तो रेल्वेचा. त्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन स्वतःचे भाडे इतरांपेक्षा कमी करवून घेतले. त्यामुळे त्याचा माल इतरांपेक्षा स्वस्त दरात वितरित होऊ लागला. त्यातून तो सामान्य गिऱ्हाईकांपर्यंत स्वस्तात पोहोचू लागला. या असमान स्पर्घेला तोंड देणे अनेकांना अवघड गेलं. मग अशा रितेने स्पर्धकांचे नाक दाबून त्याने त्यांना त्यांच्या कंपन्या स्वतःला विकायला लावल्या. बरं या विकलेल्या कंपन्यांची नावं त्याने कधीच बदलली नाहीत. त्यामुळे अनेक वर्षे या कंपन्या रॉकफेलरच्या ताब्यात असल्याचे कुणालाच कळले नाही. अशा रितीने त्याची या धंद्यावर मक्तेदारी तयार झाली आणि त्याने अगणित माया कमावली.

कोका कोलाचा इतिहासही असाच आहे. मक्तेदारीच्या अनेक आरोपांमधून व खटल्यांममधून कोका कोलाची मुक्तता झाली असली तरी जगभरात ते कायम कुठे ना कुठे त्यांच्यावर लादले जातातच. आक्रमक मार्केटिंग याचा अर्थच असा असतो की स्पर्धकाला साम, दाम, दंड, भेद कुठल्याही मार्गाने संपवून टाकणे. कोका कोलामुळे येणाऱ्या जाडेपणा व त्यातून निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या व्याधी यांच्यावर जेव्हा पाश्चात्य जगात टिका व्हायला सुरुवात झाली तेव्हा कोका कोलाने स्वतःच ओबेसिटीच्या विरोधात कोका कोला युद्ध पुकारत असल्याचा नारा दिला होता. जसे आपले आदरणीय मोहनजी भागवत या देशातील सगळेच लोक हे या देशावरच प्रेम करतात असं म्हणाले किंवा सांप्रतचे पंतप्रधान व तात्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना २००२च्या दंग्यात मृत्यूमुखी पडलेल्यांबाबत आपल्याला दुःख वाटते का, असे विचारले असता त्यांना कुत्र्याचे पिल्लू गाडीखाली आले तरी दुःख वाटते, असे त्यांनी उत्तर दिले होते, तसाच हा कोका कोलाचा ओबेसिटीच्या विरोधातला लढा.

तर सांगण्याचा मुद्दा काय, भिडे नावाचा म्हातारा त्यांच्या बागेतील आंबे खाऊन मुले होतात व मुलगा हवा असल्यास मुलगाच होतो हे जेव्हा सांगतात, तेव्हा त्यांना या देशातील ८० टक्के जनतेला हे सांगायचे असते की बाबांनो हजारो वर्षांपासून या देशात असलेली सनातनी वर्ण व्यवस्था टिकवा. या व्यवस्थेत भरडल्या जाणाऱ्या शूद्राती शूद्रांनो या व्यवस्थेच्या विरोधात द्रोह करू नका, कारण माझ्या जातीतील भावी पिढ्यांचे नाहीतर भले कसे होणार? दुसऱ्या बाजूला राहूल गांधी जेव्हा लिंबू सरबतवाल्याने कोका कोला कंपनी काढली, असे सांगतात तेव्हा त्यांना या देशातील ८० टक्के जनतेला हे सांगायचे असते की, बाबांनो मी ज्या वर्गातून येतो त्या वर्गाची प्रगती ही अशीच झाली आहे. भांडवलशाहीवर विश्वास ठेवा. तुमच्यात जर `अक्कल हुशारी’ (जशी रॉकफेलरने दाखवली किंवा आपल्या देशातील अनेक मोठे भांडवलदार हे चीनसोबत अफूचा व्यापर करून पुढे आले, तशी अक्कल हुशारी) असेल तर तुम्ही नक्कीच मोठे व्हाल.

मुळात या देशात काही ठराविक जातींमधील लोकांसाठी सर्व दरवाजे उघडे असतात. असे असूनही कायम आरक्षणाच्या विरोधात बोंब मारली जाते. मात्र आरक्षणानंतरही या देशातील नोकरशाही, न्यायव्यवस्था, भांडवली जगत, प्रसार माध्यमे यांच्यात एका विशिष्ट जातीतलेच लोक ८० टक्क्यांपेक्षा का दिसतात याचे कारण सांगितले जात नाही. त्यांच्यात अक्कल हुशारी आहे म्हणून ते पुढे गेले हेच कारण पुढे केले जाते. कांचा इल्लया यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या देशात भांडवलाचा प्रवाह विशिष्ट जातीतच फिरत राहतो. त्यामुळेच आपल्या देशात जातींच्या नावानेच थेट बँकाही उघडल्या जातात. तर अशा देशात स्टार्टअपसारखे फोकनाड प्रयोग राबवणे किंवा राहूल गांधींनी ओबीसी समाजातील कारागिरांना लिंबू सरबत विक्रेत्याचा कोका कोलाचा मालक झाला असली दिवास्वप्ने दाखवणे ही क्रूर चेष्टा आहे. हा देश पुराणतल्या वानग्यांनी बुडवला आहे, त्यामुळे भिडेंसारख्या म्हाताऱ्यांनातर बिलकूलच भुलता कामा नये, पण तो अशा प्रकारच्या भांडवली मक्तेदारीने आणखी रसातळाला जाऊ न देणं हीदेखील विवेकवाद्यांची जवाबदारी आहे. किमान यावर खरोखरीच थंड डोक्याने विचार तरी करायला हवा, इतकेच!

लेखक न्यू जर्सी स्थित राजकीय विश्लेषक आहेत.

Write A Comment