fbpx
विशेष

डॉ भीमराव “रामजी” आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यापुढे उत्तर प्रदेशात भिमराव रामजी आंबेडकर या नावाने ओळखण्यात येणार आहे. योगी अदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारने तसा फतवाच जारी केला आहे. बाबासाहेबांच्या वडलांचे रामजी हे नाव उत्तर प्रदेश सरकारला सध्याच्या राजकीय वातावरणात अतिशय महत्त्वाचे वाटत असावे, असे याबाबत अनेक राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कदाचित यामुळेच त्यांनी रामदास आठवले यांनाही केंद्रात राज्यमंत्री केले असण्याची शक्यताही समाजमाध्यमांवर विनोदी अंगाने व्यक्त केली जात आहे. रामदास आठवले यांनी मोदींचे कट्टर समर्थक असल्याच्या आवेशात या नामांतराचे तोंड भरून कौतूकही केले आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे या नामांतराच्या संघर्षाच्य़ा मूशीतून घडलेल्या नेतृत्वाचे विचारधारेच्या पातळीवर किती अधःपतन होऊ शकते याची भारतीय इतिहासात अनेक उदाहरणे असल्यामुळे याला फारसे गांभीर्याने घेण्याची तशी काही गरज नाही.

प्रश्न आहे तो, बाबासाहेबांनी हिंदू धर्माच्या केलेल्या चिकित्सेचे काय करायचे याचा ! हिंदू धर्माची चिकित्सा करताना त्यांनी रामावर केलेल्या टिकेचे भगवेवस्त्रधारी योगीजी नक्की काय करणार? की रिडल्स ऑफ हिंदूइजममध्ये त्यांनी रामावर केलेली टीका ही त्यांनी केलेलीच नव्हती. ती कोणीतरी परकीय, शक्यतो मुस्लिम वगैरे माणसाने लिहिली असावी, असा नवा इतिहास परिवारातील `तज्ज्ञा’कडून लिहून घेणार? वाली आणि सुग्रिवाच्या भांडणामध्ये वालीचा राज्यावर बसण्याचा असलेला हक्क केवळ स्वतःच्या फायद्यासाठी डावलून त्याला कपटाने मारल्याचा उल्लेख बाबासाहेबांनी रिडल्समध्ये केला आहे. सितेला परित्यक्ता बनविण्यामागे असलेल्या पुरुषीवृत्तीवर याच रिडल्समध्ये बाबासाहेबांनी अत्यंत कठोर टीका केली आहे. हे लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भिमराव रामजी आंबेडकरच होते. कदाचित सध्या विविध पोटनिवडणुकांमध्ये तोंडावर आपटल्याने भाजपच्या नेतृत्वाचे व विशेषतः योगीजींचे हे भान सुटले असण्याची शक्यता आहे. मात्र आंबेडकरी विचारांच्या मुशीतून देशभरात घडलेल्या लाखो तरुणांना याचे भान आहे. नावात बदल करून विचारधारा कशी बदलता येणार? कांशारीमजी यांनी शिवाजी पार्कवरील एका जाहिर सभेत सांगितले होते की, सरकारी नोकरी करत असताना त्यांच्या वाचनात डॉ. आंबेडकरांचे अॅनेहिलेशन ऑफ कास्ट आणि गेल ऑम्व्हेट यांचे क्ल्चरल रिव्होल्ट इन कोलोनियल इंडिया ही दोन पुस्तके आली. त्यानंतर त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. विचारधारेची ताकद काय असते हे समजावे या उद्देशाने हे उदाहरण या परिप्रेक्ष्यात महत्त्वाचे आहे. वयाच्या चाळीसाव्या वर्षी कांशीरामजींनी बहुजन समाजाला राजकीय ताकद मिळवून देण्याचा निर्धार केला. सरकारी नोकरी सोडून हातात काहीही नसताना पुढे तो परिश्रमपूर्वक फलद्रुप केला.

भारतीय जाती व्यवस्थेच्या विरोधातील लढाई उभारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय इतिहासाचे आधुनिक पद्धतीने विश्लेषण केले. भारतात जाती कशा जन्माला आल्या आणि त्या जनसामान्यांच्या नेणिवेत कशा रुजल्या याचा त्यांनी काटेकोर अभ्यास केला. भारतीय इतिहासाचे मूळ हे हिंदू-मुस्लिम संघर्षाच्या इतिहासात नसून मौर्य व गुप्त घराण्यांच्या संघर्षात असल्याची मांडणी त्यांनी केली. भारताचा इतिहास हा वर्णाश्रमअंतक बौद्ध धम्म व वर्णसमर्थक आर्यद्वीज यांच्यातल्या संघर्षाचा इतिहास आहे, असे अनुमान त्यांनी काढले. इसवीसनापूर्वी मौर्य राजाचा पुष्यमित्र शुंगाने केलेल्या खुनापासून या देशातील प्रतिक्रांतीला सुरुवात झाल्याचे बाबासाहेबांचे म्हणणे होते. या प्रतिक्रांतीच्या काळातच त्याचा सांस्कृतिक पाया भक्कम करण्यासाठी रामायण, महाभारत, मनुस्मृती व पुराणांची रचना झाल्याचे बाबासाहेबांचे म्हणणे होते. समाजाचे विभाजन करणारी व विषमतेच्या आधारावर शोषणाची परिसिमा गाठणारी  जाती व्यवस्था हे या प्रतिक्रांतीचेच फळ असल्याचे बाबासाहेबांचे म्हणणे होते.

माणासाला पशूवत जिवन जगायाला भाग पाडणारी जाती व्यवस्था समूळ नष्ट करण्यासाठीच परदेशात जाऊन विद्वत्ता प्राप्त करून हा महामानव पुन्हा भारतात परतला होता. या महामानवाच्या मूळ लढ्याला लपवण्याचा प्रयत्न करून, त्यांच्या नावात बदल करणाऱ्यांचा उपद्व्याप हा त्यामुळेच हास्यास्पद आहे.

हिंदू धर्मातील जाती या केवळ युद्धखोर गट आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. जाती व्यवस्थेविरोधातील लढाई सोपी नाही, याची त्यांना कल्पना होती. कारण जात पाळणारा माणूस हा त्याच्या मनावर धर्माने बिंबवलेल्या प्रथा व परंपरांचे पालन करत असतो, असे त्यांचे म्हणणे होते. त्या धर्माला आधार असणाऱ्या धर्मशास्त्राच्या विरोधात त्यांची लढाई होती.

या लढाईचे अंतिम टोक म्हणजे हिंदू धर्म सोडून त्यांनी बौद्ध धम्माचा केलेला स्वीकार होता. ही त्यांची कृती म्हणजे एकाच वेळी सांस्कृतिक व राजकीय लढाईचे रणशिंग फुंकणे होते. म. जोतीबा फुल्यांनी भारताचा इतिहास हा अनार्य शूद्र व आर्य द्वीज यांच्यातील जाती संघर्षाचा इतिहास असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या म्हणण्याला जमिनीवरच्या लढाईत परावर्तित करणारी ही कृती होती.

हे धम्म परिवर्तन समाजाती ज्या तळागाळातील दारिद्र्यात खितपत पडलेल्या व जाणीवपूर्वक ज्ञानबंदी, धनसंचय बंदी लादलेल्या शूद्रातीशूद्र समाजाला सोबत घेऊन करतो आहे. वर्षा नु वर्षांच्या या जोखडाला मानेवरून उखडून फेकून देताना पुन्हा ही विविध रुपांमध्ये भुलभुलय्या दाखवणारी संस्कृती अंतिमतः कधी वामनावतार धारण करेल याचा नेम नाही, याची कल्पना असल्यामुळेत बाबासाहेबांनी आपल्या विचारधारेसोबत आलेल्या सगळ्या समाजाला व त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी २२ प्रतिज्ञा घेणे सक्तीचे केले.

१मी ब्रह्माविष्णुमहेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

२मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

३मी गौरीगणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

४देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.

गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.

६मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.

७मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.

८मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.

९सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.

१०मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.

११मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.

१२तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.

१३मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.

१४मी चोरी करणार नाही.

१५मी व्याभिचार करणार नाही.

१६मी खोटे बोलणार नाही.

१७मी दारू पिणार नाही.

१८ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.

१९माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्ध धम्माचा स्वीकार करतो.

२०तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.

२१आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.

२२इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.

या त्या २२ प्रतिज्ञा! यातील दुसऱ्याच प्रतिज्ञेत त्यांनी मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही, असे म्हटले आहे. या प्रतिज्ञा प्रत्येक आंबेडकरी माणसासाठी प्राणाहूनही प्रिय आहेत. या प्रतिज्ञा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भिमराव रामजी आंबेडकर यांनी लिहिलेल्या आहेत. तर मग गोरखनाथ मठाचे महंत व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना जर असे वाटत असेल की २०१९ला येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बाबासाहेबांच्या वडलांचे नाव रामजी असल्याने दलित समाजाला राम मंदिराचा मुद्दा आपलासा वाटू शकतो, तर हे असे वाटणे हास्यास्पद नाही का? अर्थात देशातील दंगलींचा इतिहास पाहिला तर अनेक ठिकाणी दलित समाजाला मुस्लिमांविरोधात भडकवून स्वतःची पोळी भाजून घेण्याची रणनिती परिवाराच्या कामाला आलेलीही आहे. मात्र उत्तर प्रदेशात जिथल्या राजकीय जमिनीची मशागत कांशीराम यांनी अत्यंत मेहनतीने केलेली आहे. त्या जमिनीवर केवळ बाबासाहेबांच्या नावामध्ये बदल घडवल्याने दलित जनमानसही बदलेल हा राजकीयदृष्ट्या अव्यापरेषु व्यापारच ठरण्याची शक्यता अधिक!

लेखक राईट अँगलचे वाचक आहेत.

Write A Comment