fbpx
राजकारण

हे काय खाक लढणार ?

भारताचे माजी अर्थमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी सध्या मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. राष्ट्र मंच नावाने त्यांनी केंद्रातील सरकारच्या विरोधात एक आघाडी उभी केली आहे. ही आघाडी राजकीय नाही, असेही ते म्हणाले आहेत. वास्तविक पाहता राजकारणाच्या परिघाबाहेर काहीही नसते. बर्टोल्ट ब्रेख्त म्हणतो त्याप्रमाणे सर्वात मोठा अडाणी हा राजकीय अडाणी असतो. जगण्याची किंमत राजकारणच ठरवत असते, अगदी काय खाता, कुठे राहता, काय शिकता, काय उद्योग करता सारं काही राजकारणाचाच परिपाक असतो… तर सांगण्याचा मुद्दा असा की, आयुष्याचा सुरुवातीचा काळ भारतीय प्रशासकीय सेवेत काढल्यानंतर चंद्रशेखर यांच्या सावलीत राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या यशवंत सिन्हा यांनी अनेक राजकीय पावसाळे उन्हाळे पाहिले आहेत. अगदी जनता पार्टीपासून सुरू केलेला त्यांचा प्रवास हा भाजपच्या तंबूत जाऊन स्थिरावला. मात्र मोदी नावाचा उंट या तंबूत शिरल्याने त्या तंबूत आता जागा उरलेली नाही. तर अशावेळी थेट राजकारण करत असताना आपली आघाडी राजकीय नाही असे म्हणत ताकाला जाऊन भांडे लपविण्यात काय हशील?

असो काहीही असले तरी भाजपमधील मोदी-शहा जोडगोळीवर नाराज असलेल्या असंख्यांपैकी यशवंत सिन्हा व शत्रुघ्न सिन्हा या दोघांनीही ही नाराजी उघड दाखविण्याची केलेली हिंमत ही दाद देण्यासारखीच म्हणावी लागेल. या दोन्ही बिहारी कायस्थ नेत्या अभिनेत्यांचा प्रवास जनता पक्षापासून सुरू झाला होता. पुढे जनता पक्षाचे काय झाले हे सांगण्याची गरज नाही. मात्र जनता पक्षाचे पुढे जनता दलात रुपांतर होऊन काँग्रेसमधून आलेल्या व्ही. पी. सिंग यांना काही काळ पंतप्रधानपदी बसण्याची संधी मिळाली होती. मुख्य म्हणजे व्ही. पी. सिंग यांनीदेखील जनता दलाची स्थापना करण्यापूर्वी जन मोर्चा या नावाने अशीच आघाडी उघडली होती.

आता या आघाडीत भाजपेतर सर्वांनाच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आमंत्रण आहे. त्यामुळे त्यात काँग्रेस, राष्ट्रवादीपासून काही पत्रकार, प्राध्यापक, कलाकार अशी जनमानसावर प्रभाव टाकणारी मंडळीही वळचणीला जाऊ शकतात. हा राष्ट्र मंच महाराष्ट्रातील मुंबई, कोल्हापूर, अकोला या ठिकाणी आपल्या सभा करणार आहे. या सभा अराजकीय असतील आणि यात केंद्र सरकारच्या दमनशाही विरोधात एल्गार पुकारण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. मुंबईत झालेल्या या राष्ट्र मंचच्या पहिल्या बैठकीला शत्रुध्न सिन्हा उपस्थित राहिले नाहीत. मात्र काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्यापासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अनेक नेत्यांची मांदियाळी या कार्यक्रमाला उपस्थित होती.

यशवंत सिन्हा यांच्या या राष्ट्र मंचला जनतेत किती पाठिंबा मिळेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. नरेंद्र मोदी यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात देशभरात विविध पातळ्यांवर लोक संघटित होत आहेत. त्याचाच हा भाग अाहे. यशवंत सिन्हा यांनी एक व्यापक आघडी उघडण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी विरोधाला संघटित करण्याचा चालवलेला हा प्रयत्न स्तुत्यही आहे. मात्र राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते या बैठकीला उपस्थित होते. त्या नेत्यांना सोबत घेऊन यशवंत सिन्हा पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नक्की कसले रणशिंग फुंकू शकतात, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. मोदी यांनी त्यांच्या स्वतःच्या करिश्म्यावर राज्यात भाजपला न भुतो न भविष्यती अशा १२३ जागा मिळवून दिल्या. मोदी यांनी सर्व ज्येष्ठ भाजप नेत्यांना बाजूला सारून स्वतःचा विश्वास असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राज्यावर बसवले. गेली तीन साडेतीन वर्षे फडणवीस राज्याचा कारभार हाकत आहेत. राज्यात विविध पातळ्यांवर प्रश्न उभे राहिलेले आहेत. मराठा समाजापासून ते दलित समाजापर्यंत सर्व स्तरात असंतोष भरून राहिलेला आहे. शेती प्रश्नाने अत्यंत उग्र स्वरुप धारण केले आहे. नव्या नोकऱ्या तयार होणे तर दुरच राहिले, असलेल्या नोकऱ्याही कमी झाल्या आहेत. या उप्पर राज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांवर विविध गैरव्यवहारांचे आरोप झाले आहेत. यातील प्रत्येक आरोपाला अगदी छातीठोकपणे फडणवीस यांनी केवळ प्रत्युत्तरच दिले नाही तर संबंधित मंत्र्यांना विधिमंडळात उभे राहून क्लीन चीट दिलेली आहे. इतके सगळे प्रश्न असताना व दररोज नवनवे प्रश्न निर्माण होत असताना राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील फडणवीस यांच्या कारभारावर नक्की कोणता हल्ला आजवर चढवला?

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळातील बहुतांश नेते हे सहकार चळवळीतील अध्वर्यू आहेत. प्रत्येकाचे आपापल्या मतदारसंघात साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बँका, मार्केट कमिट्या यांच्यावर वादातीत वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडून काढायचे ठरवल्यास शासन संस्थेसाठी तो डाव्या हातचा मळ आहे. परंतु राजकारणात सरसकट तलवार चालवून कत्तल करायची नसते. मांजर जसे उंदराला खेळवते तसे खेळवून खेळवून मारण्यात भाजपच्या नेतृत्वास फार मजा येत असावी. त्यामुळे त्यांनी या नेत्यांना विविध मार्गांनी जेरीस आणण्याची रणनिती आखली आहे. सहकार चळवळीतील नेत्यांना आपल्या संस्था वाचवण्यात रस असल्यामुळे त्यांनी तोंडात मिठाची गुळणी धरली आहे. दुसरीकडे सहकारी संस्था नसलेल्या शहरी नेत्यांना फडणवीस यांनी सुरुवातीला विविध प्रकरणांची भिती दाखवून कह्यात घेतले व त्यानंतर त्यांची अनेक वैयक्तिक कामे केल्याची राजकीय वर्तुळात उघड चर्चा होत असते. त्यामुळे हे नेते फडणवीस यांच्या विरोधात ब्रही काढायला तयार नसतात. बुद्धीबळाच्या खेळात जोवर राजा जिवंत आहे तोवर सगळ्या सोंगट्या मेल्या तरी खेळ संपत नाही आणि सगळ्या सोंगट्या पटावर असूनही फक्त राजा मेला तरी खेळ संपतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

यशवंत सिन्हा यांच्या आमंत्रणावरून राष्ट्र मंचच्या मुंबईतील बैठकीला जमलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कोणता असा माई का लाल आहे, ज्याने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट आव्हान देण्याचा अगदी एखादातरी प्रयत्न केला आहे? प्रयत्न तर सोडूनच द्या, साधे चार चौघात बोलतानाही त्यांच्यावर छोटासा टिकेचा सूर सुद्धा उमटवण्याची हिंमत ठेवणाराही एकाही नेता या दोन्ही पक्षांमध्ये नाही. छगन भुजबळ यांना भ्रष्टाचाराच्या नावाखाली ईडीने तुरुंगात टाकल्यापासून या दोन्ही पक्षांतील नेत्यांची मनातल्या मनात प्रचंड बोबडी वळली आहे. एक हाथ मे माल से भरी हुई थैली और दुसरे हाथ मे पिस्तौल अशा हिंदी सिनेमा स्टायलीत राज्यातील सुरू असलेल्या कारभाराचे सूत्र आहे. गोली खानी है या माल खाना है, असा प्रश्न विचारधारेशी काडीमात्र संबंध नसलेल्या या दोन्ही पक्षांमधील नेत्यांना विचारल्यावर ते एका झटक्यात माल असेच म्हणणार यात एखाद वेळी भाबड्या मनाला शंका घेताही आली असती. मात्र गेल्या तीन वर्षांमधील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळातील लोकप्रतिनीधींचे काम पाहणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेत येवढा भाबडेपणा शिल्लक असेल असे वाटत नाही.
राजकारण म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याची कला असा एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय समज असतो. राजकारण येवढे जर का सोपे असते तर फारच बरे झाले असते. मग त्यात कुणालाही वाव मिळाला असता. लोकं सोडा, मुके प्राणी सुद्धा चटकन मूर्ख बनत नाहीत. समोरचा आपल्याला भविष्यात मूर्ख बनवेल, याची कल्पना असूनही अनेकदा लोकं एखाद्याच्या नावावर शिक्कामोर्तब करतात त्यात त्यांचे असे काही आडाखे असतात. दुसऱ्या वाईट पर्यायापेक्षा हा बरा, किंवा किमान काही काळ तरी हा बरा वागेल, वगैरे अनेक गोष्टी डोक्यात ठेवून लोक मतदान करत असतात. मात्र लोक मूर्ख असतात, असे समजून राजकारणात उतरलेल्या व्यक्तींची पाठच मातीला लागत नाही, तर तोंडातही माती जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एकीकडे सरकार नावाच्या कुठल्या तरी अमूर्त गोष्टीला आपण प्राणपणाने विरोध करत आहोत, असा देखावा निर्माण करायचा व खाजगीत मुख्यमंत्र्यांना सर म्हणून त्यांच्या पायावर लोटांगण घालायचे, हे लोकांना कळत नसेल, असे समजणे म्हणजे स्वतःच स्वतःला वेड्यात काढण्याचा प्रकार आहे, हे लक्षात घ्यायला लागेल.

एकतर व्ही. पी. सिंग यांनी जेव्हा जनमोर्चाची स्थापना केली तेव्हा राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री या नात्याने काम करत असताना त्यांनी बोफोर्सच्या विरोधात जे रान उठवले त्याची पार्श्वभूमी होती. यशवंत सिन्हा यांना अशी कोणतीही पार्श्वभूमी नाही. मोदी सत्तेवर येऊन बसेपर्यंत आणि सिन्हा यांना विचारेनासे होईपर्यंत सिन्हांमधील सद्सद् विवेक कुठे गेला होता? बाबरी मशीद पडत असताना सिन्हा काय करत होते. गोमांस भक्षणावरून निष्पापांचे मुडदे पाडायला सुरुवात झाली तेव्हा सिन्हा कुठे होते, अगदी बाकीचे जाऊचदेत जगाला मोदींच्या एकाधिकारशाहीचे धडे देण्यापूर्वी ते स्वतःच्या मुलाकडून ते का गिरवून घेतले नाहीत, असे अनेक सवाल यातून निर्माण होतात. असो हे प्रश्न बाजूला ठेवूनही सिन्हा यांनी अखेर मोदी यांच्या विरोधात रणशिंग फुंकले हेही काही कमी नाही. मात्र एकतर त्यांच्या पाठी व्ही. पी. सिंग यांच्यासारखे वलय नाही. दुसरे म्हणजे, जितेंद्र आव्हाड किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना घेऊन महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि अकोला या ठिकाणी ते नक्की कोणता मोठा जनाधार जमवणार आहेत? या व यांच्या पक्षातील नेत्यांनी गेल्या साडेतीन वर्षामध्ये फडणवीस यांच्या विरोधात नक्की कोणती लढाई लढली, असे अनेक प्रश्न जनतेच्या जाणिवेत नसले तरी नेणिवेत नक्कीच घर करून असणार. राज्यातील पुढील निवडणूक केवळ मोदींच्या करिश्म्यावर होणार नाही, तर त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराचाही लेखाजोखा जनता घेणार आहे. त्यांच्यावर आजपर्यंत आरोपाचा एक साधा शिंतोडाही या विरोधी नेत्यांनी उडवण्याची हिंमत दाखविलेली नाही. चुकीच्या व्यूहरचनेवर उभी राहिलेली आघाडी ही भांडणाचे मूळ बनण्यापलिकडे काहीही करू शकत नाही. संयुक्त आघाडी ही मोठ्यात मोठ्या शत्रूचा पाडाव करण्याची ताकद ठेवते हे माओ त्से तूंग यांनी चीनमध्ये क्रांती करताना दाखवून दिले होते. मात्र संयुक्त आघाडीत आधी किमान आडात असणारे काही जण असतील तरच ते पोहोऱ्यात येईल. अन्यथा चर्चा चर्चा खेळण्यापलिकडे यातून काहीही साध्य होणार नाही. असल्या वांझोट्या चर्चांमधून मोदींच्या राजकारणावर ओरखडाही उमटणे शक्य नाही!

लेखक राईटअँगल्सचे नियमित वाचक व हितचिंतक आहेत.

1 Comment

  1. Shekhar Naik Reply

    Thought provoking article on possibilities only 2019 will prove you right.
    So we can all bow to the great grandson
    Shri Rahulji who will take India to great heights or maybe Mamtaji or Akhilesh Yadav.
    Time to get real there is no alternative to Shri Narendra Modi in the near future.

Write A Comment