fbpx
राजकारण

शीखविरोधी दंगल आणि राजकारण

दिल्ली उच्च न्यायालयाने१९८४ सालच्या शीखविरोधी दंग्यांबाबत दिलेल्या निकालानंतर दोषी ठरलेले काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांनी अखेर डिसेंबर ३१, २०१८ रोजी शरणागती पत्करून पोलिसांच्या हवाली झाले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीख समुदायाच्या विरोधात हा दंगलींचा भडका उडाला होता. नानावटी कमिशनने सज्जन कुमार यांना दिल्लीतील दंगलींसाठी दोषी असल्याचं सांगितलं. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुरलीधर आणि गोयल यांनी सज्जन कुमार यांना दोषी ठरवताना नोंदवलेलं मत महत्त्वपूर्ण आहे, “भारताच्या फाळणीनंतर अशा प्रकारच्या दंगलींमध्ये एक समान धागा आहे त्यात मुंबईमध्ये १९९३ मध्ये झालेल्या दंगली असोत किंवा गुजरातमध्ये २००२ आणि मुझफ्फरनगरच्या २०१३ च्या दंगली असोत. …या सगळ्यामध्ये अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात आलं असून ती कारवाई राज्य व्यवस्थेच्या जोरावर राजकीय नेतेच करतात. अशा दंगलींच्या गुन्हेगारांना राजकीय अभय मिळतं आणि शिक्षाही होत नाही. ”

जातीय दंग्यांसाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, जातीयवादी गट, राजकीय नेत्यांकडे जातीयवाद थांबवण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव, पक्षपाती पोलीस आणि प्रशासन व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेतल्या त्रुटी. या सगळ्याचा फायदा दंगली घडवून आणणाऱ्या शक्तींना होतो. अल्पसंख्यांकांविरोधात झालेल्या दंगलींमध्ये शीखांच्या विरोधातील हत्याकांड एकदाच झाले व त्याला राजकीय मूर्खपणा जबाबदार होता.  पण मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यावर मात्र वारंवार हल्ले होत असतात कारण हे सर्व हिंदू राष्ट्रवादाच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. शीख समुदायाच्या विरोधात झालेल्या दंग्यांना काँग्रेस जबाबदार होती तर हिंदू जातीयवादी घटक हे मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या विरोधात कायम दंगली घडवून आणतात. धार्मिक दंग्यांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, ज्या भागामध्ये असे दंगे घडवले जातात तिथे दंगे घडवणाऱ्यांना निवडणुकांमध्ये ताकद मिळते. शीखविरोधी दंग्यांनंतर दिल्लीमध्ये काँग्रेस ही शक्तीशाली पक्ष म्हणून पुढे आली तर मुंबई आणि गुजरात दंग्यांनंतर भाजपला यश मिळत गेलं. अशा प्रकारे त्यांनी जिथे आपला प्रभाव नाही त्या भागातही हातपाय पसरायला सुरुवात केली. येल विद्यापीठाने याबाबत एक अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, दंगली झाल्यावर भाजपची निवडणुकांमधली ताकद वाढत जाते. पण दिल्लीमध्ये काँग्रेससाठी मात्र काही काळानंतर उतार सुरू झाला.

शीखविरोधी दंगलींचं खापर काँग्रेसवर फोडण्यात आलं त्यात बहुतांशी तथ्यंही आहे. पण भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही या दंगलींना पाठिंबा होता-हात होता ही गोष्ट मात्र मुद्दाम लपवली जाते. हिंदुस्तान टाइम्सच्या फेब्रुवारी २, २००२ च्या अंकामध्ये भाजपचा कसा या दंगलींमध्ये सहभाग होता, याचं एक वृत्त आहे. पायोनिअरच्या एप्रिल ११, १९९४ च्या अंकातील बातमीनुसार, “आपल्या समर्थकांचा शीखविरोधी दंगलीतील सहभाग लपवण्याचा भाजपने प्रयत्न केला.” न्यूज पोर्टल खबर बारच्या माहितीनुसार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी २०१४ मध्ये सांगितलं होतं की, या दंगलींच्या एकूण १४ एफआयआर या ४९ भाजप-संघ नेत्यांच्या विरोधात आहेत. त्यांनी भाजपचे नेते राम कुमार जैन, प्रीतम सिंग, राम चांदेर गुप्ता अशी नावंही घेतली आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळल्याबद्दल अकाली दलाचे सुखबिर सिंग बादल यांना प्रश्नही केला होता. भाजपबरोबर युतीध्ये असलेल्या अकाली दलाने कायम भाजपचा १९८४ च्या दंगलींमध्ये असलेल्या संबंधांबद्दल मौन बाळगलं आहे.

सगळ्यात मोठा खुलासा तर संघाचे विचारवंत नानाजी देशमुख यांनी लिहिलेल्या एका लेखातून झाला. नोव्हेंबर २५, १९८४ ला प्रतिपक्षमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, शीख विरोधी दंगली या हिंदू समाजाचा खरा राग आहे आणि शीखांनी तो सहन करायला हवा. यावेळी राजीव गांधींना पाठिंब्याची गरज आहे. दंगली एेन भरात असताना नोव्हेंबर ५, १९८४ ला अशा पद्धतीची पत्रकंही काढण्यात आली होती. प्रतिपक्षने हा लेख छापण्याचं कारण तत्कालीन संपादक जॉर्ज फर्नांडिस यांनी लेखाबरोबरच दिलं होतं, “या पत्रकाचे लेखक हे संघाचे प्रसिद्ध विचारवंत आणि  धोरण ठरवणारे आहेत. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांनी हे पत्रक काही प्रमुख राजकारण्यांना दिलं. याला एेतिहासिक महत्त्वं असून त्यामुळेच आम्ही ते आमच्या साप्ताहिकाचं धोरण मोडून प्रसिद्ध करायचं ठरवलं. हा पत्रकामुळे इंदिरा काँग्रेस आणि संघ यांच्यातील वाढते संबंध दिसतात. आम्ही या पत्रकाचं हिंदी भाषांतर इथे देत आहोत.”

या दंगलींनंतर न्याय व्यवस्थेनेही निर्णय घेऊन दोषींना शिक्षा देण्यासाठी प्रचंड वेळ घेतला हे त्यांचं अपयश आहे. सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांनी शीख हत्याकांडाविरोधात खेद व्यक्त केला आहे. पण भाजपने मात्र कधीच मुस्लिम आणि ख्रिश्चनांविरोधात केलेल्या दंगलींचा खेद व्यक्त केला नाही. सज्जन कुमार शेवटी तुरुंगात गेले. मात्र मुंबई, गुजरात, कंधमाल, मुझफ्फरपूर दंगलींचे गुन्हेगार तुरुंगात कधी जाणार आणि त्यांना शिक्षा कधी होणार.

लेखक हे गेली अनेक वर्षे सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी कार्यरत असून सेक्युलरिझमच्या तत्वाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांची कम्युनल पॉलिटिक्सः फॅक्ट्स वर्सेस मिथ्स, गॉड पॉलिटिक्स, फॅसिझम अॉफ संघ परिवार, रिलिजन, पॉवर अॅण्ड व्हायलंस अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

Write A Comment