गुजरातच्या निवडणुकांचे मतदान पार पडले आहे आणि निकालांची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीदरम्यान दिसून आलेली एक लक्षणीय बाब म्हणजे कॉंग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला जोमदार आणि सुनियोजित प्रचार. इतक्या हिरीरीने राहुल गांधी प्रचारात उतरल्यामुळे आणि तथाकथित गुजरात मॉडेल – विकास-अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर आत्मविश्वासाने प्रधानमंत्री मोदींना थेट सवाल करत आव्हान देऊ लागल्यामुळे कॉंग्रेस समर्थक तसेच एकंदर संघ-भाजपविरोधी लोकशाहीवादी –पुरोगामी घटकांमध्ये नव्याने उमेद आली आहे. याचदरम्यान कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधीनी हातात घेतली आहे आणि हे ‘नव्या रूपातील ‘ ‘बदललेले’ ‘ कात टाकलेले ‘ अध्यक्ष कॉंग्रेस तसेच एकंदर विरोधी पक्षाच्या राजकारणाला उभारी देतील अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. गुजरातच्या निवडणुकीत कॉंग्रेसला लक्षणीय यश मिळाले तर हि उमेद आणि अपेक्षा बळकटच होईल. मात्र राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित नसते आणि या निवडणुकीपलीकडच्या किंवा एकंदरच केवळ निवडणुकीच्या राजकारणाच्यापलीकडच्या लांब पल्ल्याच्या राजकारणावर राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्ष कसा प्रभाव टाकू शकेल ह्याचा विचार त्यांच्या वैचारिक-राजकीय धोरणाच्या ( ideological-political line ) संदर्भातच करावा लागेल. नरेंद्र मोदींचे पीआर जाहिरातबाज व्यक्तिस्तोम माजवले जाण्याच्या काळात नव्या –बदललेल्या वगैरे राहुल गांधींबद्दलही देहबोली –वावर –चालणेबोलणे अशा बाबींच्या संदर्भातच चर्चा होत राहून वैचारिक-राजकीय धोरणाच्या चर्चेला बगल दिली जाण्याचा धोका संभवतो. अर्थात केवळ गुजरात निवडणुकीच्या प्रचारावरून राहुल व त्यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्षाच्या वैचारिक-राजकीय धोरणाबद्दल अनुमान काढणे शक्य नसले तरी त्याबद्दल काही संकेत निश्चित त्यामधून मिळतात. पुरोगामी- लोकशाहीवादी घटकांचा उत्साह आणि उमेद वाढवणारे ते नाहीत किंबहुना चिंताजनकच आहेत.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधीनी अनेक मंदिरांना दिलेल्या भेटी या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अर्थातच राहुल गांधींना मंदिरात जाण्याचा –पूजाअर्चा करण्याचा अधिकार आहे आणि धर्माचे पालन करणे व न करणे ही त्यांची व्यक्तिगत बाब आहे. मात्र निवडणुकांच्या तोंडावर चालवलेला देवदर्शनाचा सपाटा हा राजकीय संदेश देण्याचा भाग नाही असे मानणे भाबडेपणाचे किंवा नामानिराळे राहण्यासारखे ठरेल. संघ भाजप मोदी यांनी पद्धतशीरपणे कॉंग्रेस मुसलमान धार्जिणी आणि हिंदूविरोधी असल्याचा प्रचार सातत्याने करत आलेले आहेत आणि गुजरातमध्ये या धृविकरणाच्या रणनीतीचा फायदाही त्यांना मिळत आलेला आहे. ह्या प्रचाराचा मुकाबला करण्यासाठी राहुल गांधींची ‘हिंदू धर्माचे आचरण करणारे ‘ अशी प्रतिमा उभी करणे हा या देवदर्शनाचा हेतू असावा , कॉंग्रेस नेतृत्वाच्या निकटवर्ती मानले जाणाऱ्या पत्रकारांपैकी काहींनी ह्याचा दाखला देऊन राहुल यांची धर्मनिरपेक्षतेची कल्पना ही नेहरूंपेक्षा इंदिरा- राजीव यांच्या जवळची म्हणजे धार्मिकतेची अभिव्यक्ती करणारी असेल अशा धर्तीची मांडणी करायला सुरुवात केली आहे. मात्र हा मुळातच बचावात्मक पवित्रा आहे कारण संघाने ठरवलेल्या शर्तींवर हा सामना होतो आहे , संघाच्या मैदानावर जाऊन त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न हा संधिसाधूपणाचा आणि वैचरिक दिवाळखोरीचा आहेच आणि तात्कालिक यशअपयशापलीकडे निसरड्या घसरणीचा ठरण्याचाही धोका आहे. त्याची प्रचीती राहुल गांधीच्या सोमनाथ मंदिरभेटी नंतर भाजपने उठवलेल्या नकली हिंदू –असली हिंदू वादामधून आणि त्याला कॉंग्रेसने दिलेल्या उत्तरामधून आलीच. मुळात एका राष्ट्रीय पक्षाचा नेता हिंदू आहे किवा काय हा निवडणुकीत चर्चेचा विषय बनणे हे संघाचा हिंदुत्वाचा विचार प्रभूत्व्शाली –hegemonic झाल्याचे लक्षण आहेच पण त्यावर कॉंग्रेस प्रवक्त्यांनी राहुल हे हिंदू आहेतच पण तितकेच नाहीत तर ते जानवे धारी हिंदू आहेत शिवभक्त आहेत हे ठासून सांगणे हे तर हिंदुत्वाच्या प्रभुत्वाला आव्हान उभे राहण्याबाबतच शंका आणि प्रश्नचिन्ह उभे करायला लावणारे आहे. अनेक उदारमतवादी पुरोगामी तथाकथित soft हिंदुत्व ही आजघडीला अपरिहार्य असलेली व्यावहारिक तडजोड असल्याचा तर्क देत आहेत मात्र राजकीय चर्चाविश्व –राजकीय स्पर्धा हिंदुत्वाच्याच अंगणात खेळली जाणार आणि कोण असली/नकली चांगला/वाईट हिंदू यावर त्याचे स्वरूप ठरणार हे एकंदर राजकीय व्यवस्थेचे केंद्रच अधिकाधिक उजवीकडे घेऊन जाणारे ठरेल ह्याचे एकतर त्यांना भान नाही किंवा ते सोयीस्कर काणाडोळा तरी करत आहेत. भारतीय राजकारणाचे केंद्रच उजवीकडे सरकण्याची प्रक्रिया गेल्या ३५-४० वर्षांपासून सुरु आहेच , २०१४ हा या प्रक्रियेतला निर्णायक टप्पा होता ,आणि आता प्रमुख विरोधी पक्ष ही परिस्थिती बदलण्यासाठी नवा विचार/कार्यक्रम मांडण्याऐवजी परिस्थितीशरण भूमिका पत्करत असेल तर ते संघपरिवाराच्या हिंदुत्वाच्या राजकीय प्रकल्पाचे मोठे यश आहे आणि त्याला विरोध करणाऱ्या सर्व लोकशाहीवादी घटकांसाठी चिंतेची बाब आहे. परिस्थितीच्या अपरिहार्यतेची ढाल पुढे करण्यात हिंदुत्वाचा मुकाबला करण्यात आलेले अपयश किंवा अनिच्छा झाकण्याचीही सोय आहे कारण मग स्वतःची सत्ता असताना संघपरिवाराला चाप लावण्यासाठी काय केले या अवघड प्रश्नाला बगल देऊन आजची परिस्थिती कशी निर्माण झाली ह्याची चिकित्सा टाळता येते. soft हिंदुत्वाच्या सोयीस्कर स्वीकाराचे धोके काय आहेत हे या निवडणुकीच्या दरम्यान घडलेल्या काही घटना आणि त्याबद्दलचा कॉंग्रेसचा पवित्रा या संदर्भात बघता येईल आणि त्याचे दूरगामी परिणाम किती भयावह असू शकतात याचा किमान अंदाज बांधता येईल.
या सबंध निवडणुकीत राहुल गांधींची हिंदू प्रतिमा ठसवण्याबरोबरच कॉंग्रेसने गुजरातमधील मुसलमानांबद्दल कमालीचा अंगचोर ( indifferent ) आणि हात झटकू पाहणारा पवित्रा स्वीकारल्याचे दिसते. गुजरातच्या एकंदर लोकसंख्येच्या १० % असलेला समाजघटक जणू काही अस्तित्वातच नाही अशा प्रकारे प्रचार आणि चर्चेतून गायब आहे ..मुस्लीम समाजाच्या हक्काचे न्यायाचे प्रश्न उठवल्यास ( अर्थात कॉग्रेस ने ते कधी आणि किती नेमकपणे उठवले हा वेगळाच प्रश्न आहे , सच्चर अहवालाने ‘मुस्लिमांचे लाड ‘ केले जाण्याच्या प्रचाराचा पोकळपणा दाखवलाच पण पर्यायाने कॉंग्रेसने मुस्लिम समाजाला गृहीत धरून दुर्लक्षच केल्याचेही चित्र समोर आणले ) मोदी आणि भाजपला धृवीकरणाची संधी मिळेल अशी भीती बाळगून निवडणुकीपुरती केलेली हीदेखील एक व्यावहारिक अपरिहार्य तडजोड असे याकडे बघावे असा सल्ला कॉंग्रेससमर्थक तसेच अन्य उदारमतवादी पुरोगामीही देताना दिसतात. मात्र कॉंग्रेसने कितीही सोयीस्कर soft हिंदुत्व स्वीकारले – मुसलमानांबद्दल अंगचोर पवित्रा घेतला तरी संघभाजप वेगवेगळ्या प्रकारे धार्मिक ध्रुवीकरणचे डावपेच वापरणारच , मग ते कॉंग्रेसला पाकिस्तानधार्जिणे ठरवून असेल किंवा तुम्हाला मंदिर हवी कि मस्जिद असे विचारणे असेल. अशा प्रत्येक मुद्द्यावर संघभाजपच्याच मैदानात त्यांच्यावर कुरघोडी करायला जाणे हे निव्वळ व्यावहारिक दृष्ट्याही फायद्याचे ठरणार नाही कारण हिंदुत्वाच्या खेळात संघभाजप नेहमीच वरचढ ठरत राहतील. अर्थात soft हिंदुत्वाच्या निसरड्या मार्गावरून अधिकाधिक घसरत प्रति-भाजप होण्याचाच पर्याय कॉग्रेसने स्वीकारला तर गोष्ट वेगळी ,त्यातून निवडणुकीतले यश मिळूही शकेल पण त्याची मोठी किंमत देशाला आणि लोकांना मात्र चुकवावी लागेल.(युरोपातील ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्षांप्रमाणे उजवा मध्यममार्गी ‘हिंदू डेमोक्रॅटिक’ पक्ष बनण्याची शक्यता भारतात नाही , एकतर अगोदर म्हणल्याप्रमाणे मुळातच केंद्रच अधिकाधिक उजवीकडे सरकते आहे आणि दुसरे म्हणजे जातीव्यवस्थाक श्रेणीबद्ध समाजात असा पक्ष साकारण्यात मुळातच अडचणी आहेत, यावर अधिक विस्ताराने लिहिता येईल पण ते या लेखाच्या आवाक्याबाहेरचे आहे) धर्मनिरपेक्ष –लोकशाहीवादी म्हणवणाऱ्या प्रमुख विरोधी पक्षानेही जर मुस्लीम समाजाला बेदखल करण्याचा वार्यावर सोडण्याचा रस्ता धरला तर आधीच उन्मादी हिंदुत्वाच्या काळात असुरक्षिततेच्या सावटाखाली वावरणाऱ्या आणि बहुसंख्येने आर्थिकसामाजिकदृष्ट्या वंचित असलेल्या मुस्लिम समाजात तुटलेपणाची –alienation भावना कशी प्रबळ होईल याचा विचार संधिसाधू आणि र्हस्वदृष्टीच्या कॉंग्रेस पक्षाने केला नाही तरी लोकशाही धर्मनिरपेक्षतेची बूज असलेल्या पुरोगाम्यांनी तरी केलाच पाहिजे. मुसलमानाना दुय्यम नागरिक बनवण्याच्या संघपरिवाराच्या हिंदुत्वाच्या प्रकल्पाचा एक भाग आहे तो इथल्या लोकशाही राजकीय प्रक्रियेत त्यांना संदर्भहीन करून टाकणे -२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातून एकही मुस्लीम खासदार निवडून न येणे हा ह्या प्रक्रियेच्या यशाचा महत्वाचा टप्पा होता. याला खतपाणी घालणारी धोरणे कॉंग्रेस पक्षही स्वीकारू लागला तर या देशाच्या राजकीय व्यवस्थेतून हद्दपार केले गेल्याची भावना मुस्लीम समाजात का वाढीस लागू नये ? एखाददुसरे अपवाद वगळता मुस्लीम जमातवादी पक्षांना साथ न देता सातत्याने कॉंग्रेस तसेच इतर धर्मनिरपेक्ष आणि डाव्या पक्षांना साथ देणाऱ्या मुस्लीम समाजात एकंदर लोकशाही राजकीय प्रक्रियेबद्दलच तुटलेपणा आणि अविश्वास वाढीस लागण्याचे काय परिणाम होतील, याचा अंदाज बांधायचा असेल तर एथनिक आणि धार्मिक अल्पसंख्याकाच्या हक्कांची गळचेपी आणि त्याविरोधातील बंडखोरीची उत्तर आयर्लंड मधील अल्स्तर ते सर्बिया-क्रोएशिया-बोस्निया-चेचेन्या पासून ते तुर्की-इराक मधील कुर्द लोकांपर्यंत आणि अशी अनेक उदाहरणे आहेत. संघ-भाजप ला हरवायचे ते त्यांच्या विद्वेषी विभाजनवादी राजकारण- समाजकारणाचा धोका आहे म्हणून पण त्यासाठी soft हिंदुत्वाचा निसरडा मार्ग पत्करणे हे आत्मघातकीच ठरेल. गुजरात निवडणुकीपुरत्या केलेल्या काही डावपेचात्मक तडजोडीच्या आधारे तुम्ही अकारण बागुलबुवा उभा करत आहात –बाऊ करत आहात असे काहीजण म्हणतील , इतका निष्काळजी दृष्टीकोन नसणारे काही असे म्हणतील की हे या निवडणुकीपुरतेच आहे – मुळात कॉंग्रेसचा पाया हा बहुलतावादी धर्मनिरपेक्ष लोकशाही विचाराचा आहे त्यापासून दूर जाणार नाहीत अशी ग्वाही देतील , मात्र असा विश्वास बाळगावा अशी काही चिन्हं कॉंग्रेसच्या व्यवहारात दिसत नाहीत. गेल्या काही दिवसातलीच दोन उदाहरणे बोलकी आहेत. राजस्थानमध्ये अफ्राझुल या बंगाली स्थलांतरीत कामगाराची क्रूरपणे हत्या केल्याची जी घटना घडली त्याचा राहुल गांधी किंवा कॉंग्रेस पक्षाने औपचारिक निषेध तरी केला आहे काय ? याबद्दल त्यांनी अवाक्षरही काढलेले नाही. राजस्थान प्रदेश कॉंग्रेस चे अध्यक्ष सचिन पायलट यांनी निषेधाचे पत्रक काढले पण त्यात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न यावरच अधिक भर आहे – ही घटना उघडच धार्मिक विद्वेषातून झालेली असतानादेखील! ६ डिसेम्बरला बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाली , लालू प्रसाद यादवांनी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून या घटनेने धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर कसा घाला आणला आणि आज हे संकट कसे वाढत आहे असे लेख लिहिले –डाव्या पक्षांनी काळा दिवस पाळला देशभरात निषेध मोर्चे काढले , मात्र कॉंग्रेस पक्षाने अवाक्षरही काढले नाही. १९४९ साली मूर्ती ठेवण्यापासून ते मंदिराचे टाळे उघडणे असो ते पी व्ही नरसिंह रावांच्या मूक संमती पर्यंत या प्रश्नी काँग्रेसचा जो पवित्रा राहिला आहे त्याच्याशीच आजही ते इमान राखत आहेत असे मग का म्हणू नये? ( एवढे असून कपिल सिबलवरून भाजप ने कॉंग्रेस ला लक्ष्य करायचे ते केलेच! म्हणजे गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही … soft हिंदुत्वाच्या गाढवाला झोंबण्याआधी निदान याचा तरी विचार कॉंग्रेस करेल काय ? ) बरं ,संघ परिवाराच्या दृष्टीने अयोध्या सिर्फ झांकी है ..मग उद्या मथुरा आणि काशीचा मुद्दा त्यांनी उकरून काढला की शिवभक्त राहुलजी काय करणार ? संघावर त्यांच्याच खेळात कुरघोडी करण्यासाठी ‘मंदिर हम ही बनायेंगे ‘ असा नारा कॉंग्रेस देणार का ?
राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्ष वर उल्लेख केलेल्या ‘व्यावहारिक तडजोडी’ यापुढे टाळेल किंवा त्यांचे रुपांतर तत्वाला सोडचिट्ठी देण्यात होऊ देणार नाही असा आशावाद काही सुजाण पुरोगामी उदारमतवादी बाळगताना दिसतात. असे होण्यातल्या ज्या धोक्यांची चर्चा वर केली आहे त्याचे भान त्यांना असते पण तो काही कॉंग्रेसचा स्थायीभाव नाही असा त्यांचा तर्क असतो , अलीकडेच मानिनी चटर्जी यांनी राहुल गांधींना उद्देशून लिहिलेल्या लेखाचा सूर अशाप्रकारचा आहे. कॉंग्रेसच्या मूळ तत्वापासून आणि स्वतःच्या स्थयीभावापासून ढळण्याची चूक राजीव गांधीनी ८० च्या दशकात केली ती राहुलनी करू नये असा सल्ला त्या देतात. अशा धर्तीच्या मांडणीच्या मुळाशी कॉंग्रेस पक्ष आणि त्याचे चारित्र्य याविषयीची काही एक कल्पना आहे , भारतीय धर्मनिरपेक्ष लोकशाही राजकीय व्यवस्था आणि बहुलतावादी सामाजिक सांस्कृतिक व्यवहाराचा राखणदार/विश्वस्त अशी कॉंग्रेसची प्रतिमा या कल्पनेत आहे किंवा निदान ते कॉंग्रेस पक्षाचे ऐतिहासिक कार्य ( historical responsibility ) आहे अशी धारणा आहे .विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत काँग्रेस पक्षाने किंवा नेहरूंसारख्या त्यांच्या नेतृत्वाने कमीजास्त प्रमाणात ही भूमिका बजावली असली तरी हा काँग्रेसचा वैचारिक पाया आहे असे म्हणता येणार नाही. काँग्रेसमध्येच उजवा आणि हिंदुत्ववादी जातीवर्चस्ववादी प्रवाह कायम राहिला आहे आणि वेळोवेळी त्याने उचल खाल्ली आहे , सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्ष हा शासक शोषक वर्गजातींचे हितसंबंध जोपासणारा त्यांचे प्रभुत्व कायम ठेवू पाहणारा पक्ष राहिला आहे ,(आता ती जागा भाजप घेतो आहे . ) मूलभूत सामाजिक परिवर्तन करू पाहणारा तो पक्ष नाही. हिंदुत्वाच्या प्रकल्पात शासक शोषक वर्गांच्या हितसंबंधाला कोणताही धक्का पोहोचवणे दूर किंबहुना त्यांचे वर्चस्व अबाधित राखण्याचा हुकमी उपाय ठरतो .त्यामुळे काँग्रेसला त्याचे वावडे मुळातच आहे असे म्हणण्याला आधार नाही, इतिहासातही अनेकदा काँग्रेसने या ना त्या रुपात हिंदुत्वाशी लगट केल्याची उदाहरणे आहेतच .आज काँग्रेस राहुल गांधींच्या ज्या जानव्याचा झेंडा करून फडकवते आहे ते जानवे काँग्रेसच्या खादीत कधी उघड तर कधी बेमालूमपणे मिसळलेले आहेच! मात्र जेंव्हा जेंव्हा काँग्रेसने उजवे वळण घेतले तेंव्हा त्याचा परिणाम सामाजिक विघटनाच्या प्रक्रिया गतिमान होण्यात झाला( अगदी १९३७ साली सत्तेत आलेल्या काँग्रेस मंत्रिमंडळांच्या कारभारातील सामाजिक आणि आर्थिज उजव्या वळणाचा मुस्लिम लीगची ताकद वाढायला कसा हातभार लागला इथपासून ते इंदिरा राजीव नरसिंह रावांच्या तत्वशून्य तडजोडींमुळे संघपरिवाराची ताकद कशी वाढत गेली हा सगळा इतिहास नजरेखालून घालता येईल) कारण एकंदर राजकीय प्रक्रियेचे केंद्र -मध्यममार्ग निश्चित करण्यात काँग्रेसला स्वातंत्र्यलढ्यापासून प्राप्त झालेले स्थान.विविध परिवर्तनवादी प्रवाहांना ( सत्यशोधक आंबेडकरी कम्युनिस्ट समाजवादी इत्यादी)सक्षम आणि व्यापक स्वतंत्र पर्याय उभा करण्यात आजवर आलेल्या अपयशामुळे आज ही अपरिहार्यता आहे. त्यामुळे फॅसिझमचा धोका असताना भाजप काँग्रेस दोन्ही सारखेच असा तर्क देणेही परवडणारे नाही. कारण अगोदर म्हणल्याप्रमाणे विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत काँग्रेसला धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या रक्षणाची आणि डावीकडे झुकलेली मध्यममार्गी भूमिका घ्यायला जेंव्हा जेंव्हा भाग पाडले आहे ते कष्टकरी बहुजन स्त्रीपुरुषांच्या संघटित चळवळींच्या त्यांच्या पक्षांच्या रेट्यामुळे! आज काँग्रेस संधीसाधुपणे उजवीकडे वाहवत जाण्याचा धोका टाळण्यासाठी असा रेटा लावणे भाग आहे. भाजपला मदत होईल म्हणून काँग्रेसवर टीका करणे टाळून त्यांच्या चुकांवर पांघरूण घालत राहणे परवडण्यासारखे नाही.
तळटीप -काँग्रेसच्या उजव्या वळणाचा धोका जाणवण्याचे आणखी एक कारण म्हणजे सामाजिक सांस्कृतिक अंतर्विरोध नजरेआड करून टेक्नोक्रॅटिक पद्धतीने राजकारण करण्याची पक्षात आणि खासकरून पक्षाच्या नवसमर्थकांमध्ये वाढीस लागलेली प्रवृत्ती. राहुल यांचा चर्चित अमेरिका दौरा ते त्यांच्या जानव्याचा शोध यांमध्ये एक संगती आहे त्याचा विचार स्वातंत्रपणे करावा लागेल.