fbpx
विशेष

ई व्ही एम चा झोल

एक्झिट पोल्सनी भाजपाच्या विजयाची आकडेवारी जाहीर केल्यापासून  मोदीविरोधक आपल्या पराभवाची स्पष्टीकरणे शोधायच्या उद्योगाला लागले आहेत. यातील सर्वांत आकर्षक स्पष्टीकरण ई व्ही एम मधील अफरातफरीचे आहे. अर्थात ई व्ही एम मधेच अफरातफर करून जिंकण्याचे तंत्र भाजपाने विकसित केलं होत, तर ते त्यांनी पंजाब मध्ये,गोव्यामध्ये का नाही वापरल ? असे प्रश्न ऐकून घेण्याच्याही मनस्थितीत काँग्रेस नाही.
ई व्ही एम हा मुळात एक कॉम्पुटर आहे. त्यामध्ये टाकलेल्या प्रोग्राम नुसार तो मतदानाची नोंद घेतो. अर्थातच त्यात अफरातफर करणे
सैद्धांतिकदृष्ट्या अशक्य नाही. पण थोडा शांतपणे विचार केल्यास ई व्ही एमच्या प्रोग्रॅममध्ये अफरातफर करून संपूर्ण राज्यातील निवडणूक जिंकणे हा निव्वळ कल्पनाविलास आहे.
थोडा तर्कशुद्ध विचार केल्यास हे असंभव का आहे, ते स्पष्ट होते.. म्हणजे असं बघा, की कॉम्पुटर ला जो प्रोग्राम भरवला जातो, तो कोणत्याही
भाषेत लिहिला असेल, म्हणजे सी, जावा, पायथॉन , कोठल्याही भाषेत असेल, तरी शेवटी त्याचे रूपांतर काही मोजक्या आज्ञांमध्ये होते. कॉम्पुटरला कोण भाजपा, कोण काँग्रेस कोण मोदी कोण राहुल गांधी याची काहीही जाणीव नसते. त्याला फक्त आकडे कळतात, जर-तर,- नाहीतर, जोपर्यंत – तोपर्यंत अशा अटी कळतात आणि अमुक अट पूर्ण होत असेल तर तमुक कर अशी आज्ञा कळते. आकडेमोड करण्यासाठी जे काही व्हेरिएबल्स वापरावे लागतात ते कॉम्पुटरला कळतात. म्हणजे शाळेत बीजगणितात आपण – “गणू कडे क्ष रुपये आहेत असे धरु, रामूने त्याला ५ रुपये दिल्यावर त्याच्याकडे एकूण पंधरा रुपये झाले तर क्ष ची किंमत काढा” अशा प्रकारची उदाहरणे वाचल्याचे स्मरत असेल, या उदाहरणात क्ष हा व्हेरिएबल आहे.
मतमोजणीचा प्रोग्रॅम कोठल्याही कॉम्पुटर भाषेत असेल तरी कॉम्प्युटरला तो काहीसा असा दिसतो
अ =०;ब= ०; क =०;
जर ( बटन १ दाबले गेले असेल तर )
अ = अ + १
जर ( बटन २ दाबले गेले असेल तर)
ब = ब + १
जर ( बटन ३ दाबले गेले असेल तर)
क = क + १

अ, ब , क या पैकी कोण काँग्रेस, कोण भाजपा कोण आप कोण अपक्ष, याचे ज्ञान कॉम्पुटरला नसते. मतदार संघातली उमेदवारांच्या याद्या इलेक्शन कमिशनकडे पोचल्यानंतर, प्रत्येक मतदार संघासाठी जितके पोलिंग बूथ आहेत तितके ई व्ही एम त्या त्या मतदारसंघासाठी तयार केले जातात. तयार केले जातात म्हणजे ई व्ही एम च्या बटनांवर पक्ष आणि उमेदवारांच्या नावाचे स्टिकर्स चिकटवले जातात.

आता विचार करा, गुजरात मध्ये विधानसभेचे एकण मतदार संघ १८२. ई व्ही एम वापरले गेले ७०,०००. म्हणजे सरासरी प्रति मतदारसंघ ७०,००० भागिले १८२ =३८४. आधी म्हंटल्याप्रमाणे कॉम्पुटर तर ई व्ही एमचे बटन दाबल्यावर अ, ब, क या व्हेरिएबलचे मूल्य १ ने वाढवत राहणार, त्याला अ म्हणजे काँग्रेस की भाजपा याच्याशी काही मतलब नाही. इलेक्शन कमिशन ने प्रसिद्ध केलेल्या ‘हँडबुक फॉर कॅन्डिडेट्स’
(http://eci.nic.in/eci_main/ElectoralLaws/HandBooks/Handbook_for_Candidates.pdf)
नुसार कोठल्याही मतदार संघातील उमेदवारांचा क्रम हा त्यांच्या अद्याक्षरावरून लावला जातो. पहिले पाच क्रमांक राष्ट्रीय पक्षाच्या
उमेदवारीसाठी आरक्षित असतात, परंतु त्यातही बटनांचा क्रम हा उमेदवाराच्या नाव नुसार लावला जातो. म्हणजे बनवारीलालचा नंबर १ असेल तर
हिरेनभाईचा नंबर २ असेल. म्हणजे ३८४ पैकी काही मतदारसंघांत भाजपा उमेदवाराचे बटन पहिल्या क्रमांकाचे असेल, काही मतदारसंघात ते दुसऱ्या ,काही ठिकाणी ते तिसऱ्या , काही ठिकाणी चौथ्या तर काही ठिकाणी पाचव्या नंबरवर असेल.

मतदारसंघ १८२, ई व्ही एम ७०,०००, प्रतिमतदार संघ ई व्ही एम ३८४ अशी आकडेवारी असली, तरी मते मोजण्याचे सॉफ्टवेअर एकच असते. सर्व ७०,००० ई व्ही एम मध्ये एकच ‘प्रोग्रॅम’ फीड केला जातो. आता विरोधकांच्या म्हणण्यानुसार हरेक तिसरे मत, कोठलेही बटन दाबले तरी भाजपास जाईल अशी व्यवस्था करायची असेल, तर किमान ५ वेगवेगळे प्रोग्रॅम करून घ्यावे लागतील, कारण काही ठिकाणी हरेक तिसऱ्या मतदानावेळी १ नंबर च्या उमेदवाराची मतसंख्या १ ने वाढवायचीय, काही ठिकाणी हीच गोष्ट २ नंबरच्या उमेदवारासाठी करायचीय, काही ठिकाणी ते ३ नंबरच्या, काही ठिकाणी ४ नंबरच्या तर काही ठिकाणी ने ५ नंबरच्या उमेद्वारासाठी करायचंय, कारण १८२ मतदार संघात, भाजपाचे उमेदवार काही ठिकाणी १, काही ठिकाणी २, काही ठिकाणी ३, ४ आणि ५ व्या क्रमांकावर असतील. नंतर ते कोठल्या मतदारसंघासाठी मशीन पाठवायचेय त्यानुसार पाच पैकी एक प्रोग्रॅम मशीनवर फीड करावा लागेल. ही प्रक्रिया जर संपूर्ण गुप्ततेत पार पाडता आली, तर ई व्ही एम चा कट सिद्धीस जाऊ शकतो. परंतु ते भयंकर जोखमीचे ठरेल, कारण हरेक मतदार संघात, हरेक बूथवर भाजपा उमेदवाराच्या मतांची टक्केवारी एकच असेल आणि ते उघडकीस येईल. म्हणजे हीच गोष्ट बेमालूमपणे करण्यासाठी अजून ‘हुशार’ सॉफ्टवेअर प्रोग्रॅम बनवावे लागतील. फक्त प्रोग्रॅम बनवून संपत नाही , त्याची चाचणी करावी लागेल आणि मशीन कोठल्या मतदारसंघात पाठवायचं त्याबर हुकूम ते मशीनला फीड करावे लागतील. यात प्रोग्रॅम बनविणारी कंपनी, ते
कॉम्पुटरला फीड करणारी एजन्सी, आणि इलेक्शन कमिशनचे कर्मचारी यांचे पूर्ण सहकार्य लागेल. अशी व्यवस्था प्रत्यक्षात आणावयास प्रचंड मनुष्यबळ वापरावे लागेल. या शेकडो कर्मचाऱ्यांपैकी एकाने जरी काय सुरु आहे याची बढाई आप्तमित्रांसमोर मारली तर बातमी षट्कर्णी होऊन जाईल. हे सगळं जुळवून आणण निव्वळ असंभव आहे.
काही विरोधी पक्षीयांनी असा अंदाज बांधला आहे की सॉफ्टवेअर एकच लोड केलय, पण ते अशा रीतीने बनवलय, की तुम्ही जाऊन १ चे बटन चार वेळा दाबलेत की त्यानंतर पडणारी सगळी किंवा दोन तृतीयांश मते १ नंबर लाच पडतील. हे जास्त ‘करता येण्याजोगं’ वाटत, परंतु १८२ मतदार संघात एकूण सत्तर हजार पोलिंग बूथ वर जाऊन अमुक एका वेळी अमुक नंबर चे बटन चार वेळा दाबण्यासाठी, हरेक पोलिंग बूथवरच्या किमान एका मतदारास सूचना देऊन तसे घडविण्याची जुळवाजुळव करावी लागेल. काही हजार लोकांना असे अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्य करण्यास प्रवृत्त करण्यासाठी जे काही प्रशिक्षण द्यावे लागेल, समन्वय साधावा लागेल, त्यात हा कट गुप्त ठेवता येणं केवळ अशक्य आहे.
त्यात या वेळी वापरली गेलेली मशीन साधी ई व्ही एम नसून व्ही व्ही पॅट होती, त्यात मत दिल्यावर एका चिटोऱ्यावर लगेच तुम्ही कोणाला मत दिलंत त्याची पावती मतदारास तिथल्या तिथे मिळते. एकंदरीत गुजरातमध्ये पराभव झालाच, तर काँग्रेसने त्याची कारणे राजकीय भूमिका, रणनितीमधील त्रूटी आदींमध्ये शोधावीत. ई व्ही एमवर ठपका ठेवून फक्त स्वतःच्या मनाची समजूत घालून घेता येईल.

लेखक संगणक तज्ञ आहेत.

1 Comment

 1. प्रमोद देव Reply

  राईट ऍंगल…पहिल्यांदाच ’राईट’ वाटला.
  असं काही तरी तर्कशुद्ध लिहा…लोकांना पटेल असं.
  लढाई, युद्ध किंवा निवडणूक..काहीही असलं तरी त्यात हार-जीत असतेच आणि ते अमान्य करून चालत नाही.
  हारण्याची कारणमीमांसा ज्याने त्याने जरूर करावी पण उगाच बालीश कारणं देऊ नयेत….
  दृश्य माध्यमातल्या चर्चा पाहतांना, निकालांवरील भाष्य पाहतांना हे नेहमीच दिसून आलंय की हरणारे लोक नेहमीच बालीश आणि न पटणारी कारणं पुढे करत असतात…त्याबाबतीत कॉंग्रेस-भाजपसह सगळेच पक्ष सारखे आहेत.कुणा एकाला चांगलं म्हणावं आणि कुणा एकाला वाईट ठरवावं असं जाणवत नाही. आपलं नेमकं काय चुकलं ह्याबद्दलचं गंभीर विचारमंथन करायला कुणीच तयार नसतं आणि म्हणूनच बरेचदा जे निर्णय धक्कादायक वगैरे वाटतात ते निव्वळ खोटा आत्मविश्वास बाळगल्यामुळेच हे सत्य पचवणं कठीण होऊन बसतं…हे म्हणजे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही असं असतं.
  प्रचाराच्या काळात सगळेच पक्ष जात-पात, धर्म,वंश वगैरेंचा आधार घेतातच त्यामुळे कुणा एकाला प्रपादण्याची गरज नाही…तसंही कुणीसं म्हटलेलं आहेच ना की प्रेमात आणि युद्धात सगळंच क्षम्य असतं म्हणून!
  त्यामुळे बहुमताने निवडून आलेल्या पक्षावर वृथा टिका करण्यात अर्थ नाही…हेच जेव्हा समस्त राजकारणी नीट समजून घेऊन त्याप्रमाणे वागतील तेव्हाच आपली लोकशाही खर्‍या अर्थाने प्रगत झाली असे आपण म्हणू शकतो.

Write A Comment