fbpx
सामाजिक

पितृसत्ता, शोषण आणि जुलूम यांच्या विरोधातील पहिल्या क्रांतीची शंभर वर्षे

बोल्शेविक क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण होत असताना आजच्या जगात(ही) पितृसत्ता/ पुरुषसत्ताक व्यवस्था ही वर्गसंबंधांचा पायाभूत भाग आहे. पितृसत्ताक कुटुंब हाच संपत्ती आणि नैतिकता यांचा वर्गीय आधार सिद्ध करणारा संघटनात्मक घटक-आणि तो वर्गविग्रहाप्रमाणेच जात, धर्म, वर्ण इ. इतर सर्वच विषमतादेखील आत्मसात करून त्यांचे व्यावहारिक चलन करणारा आहे. प्रस्थापित बूर्झ्वा कायदा आणि न्यायव्यवस्था यांचा डोलारा हा खासगी मालमत्तेचे अपृछ्नीय श्रेष्ठत्व, पावित्र्य यावर आधारलेला आहे. यातील ‘खासगी मालमत्ता’ या शब्दाची व्याख्या होते ती ‘कुटुंब कायदा’ ध्यानात ठेवून- जणू काही कुटुंब हे ‘खासगी’ ह्या संकल्पनेचे सर्वात पवित्र आविष्करण आहे. आणि प्रस्थापित ज्ञान- कायदा- व्यवहार ह्यांची अशी भक्कम पकड बोल्शेविक क्रांती आणि तिचे पितृसत्ता, शोषण आणि जुलूम यांच्या विरोधातल्या असंख्य संघर्षातील महत्वाचे योगदान ह्यांचा विसर पडण्यास, त्यांचे ऐतिहासिक महत्व ध्यानात न ठेवण्यास कारणीभूत आहे.

१९व्या शतकातील रशियातील नैतिकता आणि कायदा ह्यांचा दीर्घ इतिहास लिहिताना मुराव्येवा म्हणते: “१९ व्या शतकातील रशियात पौरुषत्व आणि स्त्रीत्व ह्यांच्याबद्दलच्या नव्या कल्पनांचा लैंगिक आणि घरगुती हिंसेपासून स्त्रियांचे रक्षण या मुद्द्यावर विशेष प्रभाव पडला होता. लैंगिक आचरण (chastity-शुद्धता) हे ‘कुटुंब, खानदान यांच्या सन्मानाच्या कल्पनेसोबत जोडले गेले. आणि स्त्रियांचे रक्षण हे वास्तवात कुटुंब- खानदान यांच्या सन्मानाचे रक्षण ठरले. व्यक्ती म्हणून स्त्रियांचे महत्व त्यातून उणावले आणि त्यामुळे अनेक स्त्रिया न्यायापासून वंचित राहिल्या. केवळ प्रचलित स्त्री-विषयक कल्पना आणि मापदंडाच्या चौकटीत बसतील अश्याच स्त्रिया न्यायास पात्र ठरल्या. घरगुती हिंसा, मारहाण ही निश्चितच ‘खालच्या वर्गाच्या’ वर्तनाचे उदाहरण बनली आणि त्यामुळे अधिकृत नियम आणि सामाजिक व्यवहार-संकेतांत ती त्याज्य ठरली. पण मारहाणीचा आणि त्यातून ‘मर्द’ सत्ता गाजवण्याचा व्यवहार मात्र अबाधितच राहिला. मात्र वरच्या वर्गात ही हिंसा अधिकाधिक अदृश्य आणि ‘जोडप्याची अत्यंत खासगी अशी बाब’ ठरत गेली. आणि त्यामुळे कायदेशीर संरक्षण मिळवणे हे स्त्रियांना अधिकाधिक कठीण बनले.”

बोल्शेविक क्रांतीचे उद्दिष्ट हे केवळ उत्पादन आणि वरकड मूल्याचे न्याय्य वाटप किंवा उत्पादक शक्तींच्या वाढीच्या शक्यता आणि मर्यादा इ. पुरते मर्यादित नव्हते. समाजवादी उत्पादन आणि परिवर्तन यांच्या चर्चेत निश्चितच ह्या सगळ्या घटकांची विस्तृत मांडणी होत राहिली आहे. मात्र ह्या सगळ्या पलीकडे जात, सामाजिक पुनरुत्पादन  (social reproduction)च्या क्षेत्रात जरुरी असलेले क्रांतिकारी परिवर्तन, त्याची वैचारिक पुनर्मान्डणी करणे, आणि पुरुषसत्ताक व्यवस्था, जुलूम यांचा अंत घडवून आणणे हीदेखील बोल्शेविक क्रांतीची महत्वाची उद्दिष्टे होती. उत्पादनाचे सामुदायीकरण आणि खासगी संपत्तीच्या हक्काचे निर्मूलन या सोविएत युनियनच्या धोरणांमुळे अन्न, आरोग्य, शिक्षण, कपडे, कामगारांना चांगले वेतन, स्त्रियांचे अधिकार या क्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती झाली हे सर्वविदित आहे. मात्र समाजवादी कुटुंब कायद्याच्या निर्मितीतून घडून आलेले मूलभूत परिवर्तन – ‘क्रांतीअंतर्गत क्रांतीचे संकल्पन’ याबद्दल मात्र बोल्शेविक क्रांतीबद्दलच्या चर्चांत विशेष दखल घेतली जात नाही.

ह्या लेखात १९१७ ते १९२३ ह्या काळात ‘सामाजिक पुनरुत्पादनाचा प्रश्न हा बोल्शेविक क्रांतीचा मध्यवर्ती क्रांतिकारी प्रकल्प व्हावा’ म्हणून झालेल्या घडामोडींची चर्चा आहे.  १९२६ मध्ये स्मिडॉइच यांनी ‘Kommunitska’ च्या एका अंकात लिहिले: ‘१९१८ मध्ये महिला कामगार परिषदेत ‘Zhenodtel’ च्या नेत्या इनेसा आर्मंड, यांनी म्हटले होते- “स्वतंत्र कुटुंब (separate household) हा बूर्झ्वा प्रस्थापित व्यवस्थेचा हानिकारक अवशेष आहे. आणि नवीन वितरण व्यवस्थेत, प्रकारात विलंब आणि अडथळा आणणे एवढीच त्याची भूमिका असते”.  असे प्रतिपादन करणाऱ्यांत ती एकटीच नव्हती. न्याय विभागाचा पहिला पीपल्स कमिसर पीआय स्टुंका यांच्या दृष्टीने यादवी युद्धकालीन साम्यवादी काळ हा ‘भविष्यातील मुक्त कुटुंबाची योजना’ होता आणि त्यांचे प्रतिपादन होते –  ‘कुटुंब व्यवस्थेच्या; उत्पादन आणि उपभोगाचे छोटे एकक, युनिट, कायदेशीर अस्तित्व, सामाजिक विमा, असमानतेचे मूर्त आणि जिवंत प्रतीक, आणि मुलांना खाऊ घालणारे आणि वाढवणारे युनिट ह्या सगळ्या भूमिका जेव्हा संपुष्टात येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने न्याय्य आणि मुक्त कुटुंब निर्माण होईल’ .

बोल्शेविक क्रांतीनंतर २६ ऑक्टोबर १९१७ रोजीच्या जमीनविषयक हुकुमानंतर डिसेंबर १९१७ मध्ये विवाह आणि घटस्फोट ह्याबद्दल पहिला हुकूम काढण्यात आला. फेब्रुवारी १९१८ मध्ये जमिनीच्या सामाजिक मालकीचा कायदा करण्यात आला. आणि ऑक्टोबर १९१८ मध्ये पहिला कुटुंब कायदा करण्यात आला. १९२२ च्या जमीन कायद्याला ही सगळी पार्श्वभूमी होती. या कायद्यांचा क्रम, वेग आणि त्यांचे शब्दांकन दर्शवते की अर्ध-सामंती आणि अर्ध-भांडवली खाजगी संपत्ती अधिकारांचे उच्चाटन हे सामाजिक पुनरुत्पादन आणि त्याचा उत्पादनाची पुनर्रचना करण्याशी असलेला अन्योन्य संबंध ह्याच्याशी निगडित होते. क्रांतीनंतर बिघडलेल्या साम्राज्यवादी भौगोलिक-राजकीय विरोधी परिस्थितीमुळे तर सामाजिक पुनरुत्पादन प्रश्न हा सोव्हिएत युनियनमधील लोकांच्या मुक्तीचाच नव्हे तर अस्तित्वाचाच मुख्य प्रश्न बनला. निरर्थक ‘कल्याणकारी’ नियमांच्या पलीकडे जात, पितृसत्ता आणि शोषण (कुटुंब, खासगी संपत्ती, आणि राज्यव्यवस्था यांच्याकडून होणारे दमन आणि शोषण) ह्यांच्यापासून क्रांतिकारक मुक्तीचे वचन हा युद्धकालीन साम्यवादी काळातील सामाजिक पुनरुत्पादनाची पुनर्रचना करण्याच्या बोल्शेविक प्रयत्नांचा विशेष होता. हा जाणीवपूर्वक असा राजकीय प्रयत्न व्यक्तिवादी नसून समूह्केंद्री, सामायिक अश्या आदर्शाने प्रेरित होता. आणि त्याला मार्क्सने कल्पिलेल्या नव्या ‘व्यक्तिमत्वांचे’  आविष्करण अभिप्रेत होते.

१९२१ मध्ये अलेक्झांड्रा कोलोन्ताई यांनी Kommunitska मध्ये लिहिले:  एकतेच्या विकासाची गरज लक्षात घेऊन आणि सामुदायिक कामाचे बंध मजबूत करण्यासाठी एक गोष्ट प्राधान्याने लक्षात घेतली पाहिजे. ‘जोडपे’ आणि त्याचे एक विशेष युनिट म्हणून समाजापासून वेगळे पडणे ह्यातून साम्यवाद मजबूत होत नाही. कम्युनिस्ट नैतिकतेला कामगार वर्गाचे सहकार्य, साहचर्य ह्याबद्दल शिक्षण करण्याची गरज आहे. समुदायाच्या वेगवेगळ्या सदस्यांचे याबाबत मनोमीलन घडणे गरजेचे आहे. व्यक्तीच्या गरजा आणि आवडी यांना सामाजिक गरजा आणि उद्दिष्टे ह्यांच्यापुढे दुय्यम स्थान दिले पाहिजे. म्हणूनच एकीकडे, कौटुंबिक व वैवाहिक बंध शिथिल होणे आवश्यक आहे, आणि दुसरीकडे, पुरुष आणि स्त्रियांना एकता आणि व्यक्तीच्या इच्छांपेक्षा सामूहिक संकल्पाचे महत्व याबाबत शिक्षित करणे आवश्यक आहे … सामुदायिकतेच्या दृष्टीने जोडपे हे स्वावलंबी युनिट नव्हे. आणि म्हणूनच ह्या युनिटसाठी विवाहित स्त्रियानी काम सोडणे हेदेखील अशा सामुदायिकतेला मंजूर नाही. त्यांनी पुढे प्रतिपादन केले: “सामूहिकता जशी अधिक मजबूत होईल तितकी साम्यवादी जीवनशैली मजबूत बनते. समाजातील सदस्यांच्या भावनिक नातेसंबंधांमुळे, एकाकी अशा वैवाहिक कुटुंबात आश्रय घेण्याची आवश्यकता कमी होते.

कम्युनिझममध्ये, बळकट असे भौतिक वास्तवही कामगारांच्या जोरकस आणि शक्तिशाली अश्या सामूहिकतेच्या इच्छेला अधीन आहे. व्यक्तीला बौद्धिक आणि भावनिक दृष्ट्या विकसित होण्याची अभूतपूर्व संधी आहे. या सामूहिकतेत, नवीन स्वरूपाचे संबंध परिपक्व होत आहेत आणि प्रेमाची संकल्पना विस्तारित आणि विकसित होत आहे’. सामाजिक पुनरुत्पादनाची पुनर्रचना करण्याच्या प्रयत्नांना विवाह, कुटुंब आणि पालकत्व याविषयीच्या कायद्यांत ऑक्टोबर १९१८ मध्ये मूर्त रूप देण्यात आले. गोल्डमनच्या म्हणण्यानुसार हा कायदा ‘स्त्री-समानतेवर आधारित सामाजिक संबंधांचा क्रांतिकारक दृष्टीकोन’ आणि ‘कुटुंबसंस्थेचे विघटन’ हे उद्दिष्ट ह्यांना मुखरित करण्याचा प्रयत्न होता. त्याच्या लेखकांना हा कायदा म्हणजे ‘पती आणि पत्नी’ असे प्रतिबंध नष्ट होतील अश्या भविष्याची तयारी असल्याचे वाटत होते. क्रांती आणि क्रांतीची सातत्यपूर्ण प्रगती ह्यातून हा कायदा देखील अनावश्यक ठरेल- ह्या कायद्याचे उद्दिष्टच भविष्यात तो अनावश्यक ठरावा असे होते .

सोविएत युनियनमध्ये आरंभीच्या टप्प्यात १९१८ मध्ये समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचे जाहीर करण्यात आले. श्रम आणि श्रमिकांच्या लैंगिक विभाजनाच्या संरचनांना तोडण्यासाठी १९१८ चा कुटुंब कायदा हा जागरुक सांस्कृतिक प्रयत्न होता. वंशपरंपरागत पुरुषसत्ताक एकपत्नी-पतीनिष्ठ कुटुंब हे सामाजिक पुनरुत्पादनाचे सामाजिक युनिट, एकक राहू नये असा त्याचा उद्देश होता. या संविधानाद्वारे गर्भपाताला कायदेशीर मान्यता देण्यात आली, पती-पत्नीपैकी कोणाही एकाच्या विनंतीने कोणत्याही कारणाशिवाय घटस्फोट घेण्याची सुविधा देण्यात आली. मुलांचे ‘बेकायदेशीरपण’ रद्द झाले आणि सर्व मुलांना पालकत्व आधाराचे हक्क मिळाले. सामूहिक पितृत्वाला कायदेशीर मान्यता मिळाली. मुले आणि महिला या कायद्याचे मध्यवर्ती केंद्र होते. ‘विवाहामुळे पती आणि पत्नी ह्यांच्यात संयुक्त मालकी हक्क निर्माण झाले नाहीत- स्त्रीचे लग्नानंतर तिच्या कमाईवर पूर्ण नियंत्रण राहिले आणि कोणत्याही वैवाहिक भागीदाराचा दुसऱ्याच्या मालमत्तेवर कोणताही दावा नसे’ हा ह्या कायद्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा होता .

१९२६ च्या कायद्यात जे बदल घडून आले त्याला कारणीभूत असे भौतिक विरोधाभास १९२० च्या दशकाच्या सुरूवातीपासून स्पष्ट होत होते. नवीन समाजवादी समाजाची कल्पना करण्याच्या प्रयत्नांमध्ये क्रांतीपुढील हा सगळ्यात मोठा अडथळा होता. जुलै १९२३ मध्ये ट्रॉटस्कीने प्रावदातील एका लेखात या विरोधाचे वर्णन केले – “कुटुंबव्यवस्थेत, किंवा एकंदर खासगी जीवनशैली, व्यवस्था यांच्यातील क्रांतिकारी बदल घडण्यासाठी समस्त श्रमिक वर्गाचे जाणीवपूर्वक प्रयत्न गरजेचे असतात. आणि त्यासाठी खुद्द श्रमिक वर्गात सांस्कृतिक प्रगतीसाठीची एक जोरकस आंतरिक इर्षा असायला लागते. मातीची खोल रुतलेली ढेकळे उपटून काढण्यासाठी खोलवर नांगरणी आवश्यक असते. सोव्हिएत राज्यातील स्त्री-पुरुषांच्यात राजकीय, कायदेशीर समानतेची स्थापना करणे हा एक सर्वात सोपा प्रश्न होता. त्यापेक्षा पुष्कळच कठीण म्हणजे कारखाने, गिरण्या आणि कामगार संघटनांमध्ये पुरुष आणि महिला कामगारांच्या औद्योगिक समानतेची स्थापना करणे आणि तीही अशा रीतीने जेणेकरून पुरुष कामगारांकडून स्त्री कामगारांवर अन्याय आणि अपाय होऊ नये. परंतु कुटुंब पातळीवर पुरुष आणि स्त्रीची खरीखुरी समानता साध्य करणे ही एक अतिशयच कष्टप्रद समस्या आहे. हे होण्याआधी आपल्या सर्व घरगुती सवयी क्रांतिकारकरीत्या बदलण्याची आवश्यकता आहे. आणि तरीही हे अगदी स्पष्ट आहे की जोपर्यंत पती व पत्नी यांच्यात कुटुंब म्हणून खरी समानता जर नसेल तर सामाजिक कार्यात किंवा अगदी राजकारणातही स्त्री-पुरुष समता स्थापन झाली असे म्हणता येणार नाही. जोपर्यंत स्त्री तिच्या कुटुंबाची काळजी, स्वयंपाक आणि शिवणकाम इ. घरकामाच्या जोखडात अडकलेली राहते, सामाजिक आणि राजकीय जीवनात सहभाग घेण्याच्या तिच्या सगळ्या शक्यता खुंटतात.

उत्पादन-पुनरुत्पादनाच्या जुन्या संस्था, रचना जसजशा मोडकळीला येऊ लागल्या तसतशा कुटुंबसंस्थेच्या ‘खाजगी’ क्षेत्रात निर्माण झालेल्या विरोध-विसंगती यांची चार तऱ्हेची वर्गवारी ट्रॉटस्कीने तयार केली. कोलोन्ताईचे व्यापक लेखन आणि विशेषतः Kommunitska मधील निबंध यांच्यात ‘उत्पादनाचे नवीन सामाजिक संघटन आणि कुटुंब ही सामाजिक पुनरुत्पादनाची संस्था यांच्यातील संघर्ष आणि विरोध’ यांचे तपशीलवार वर्णन आहे. १९२१ मधील ‘रेड लव्ह’ आणि १९२३ मधील ‘ग्रेट लव्ह’ या ललित लेखनात कोलोन्ताई यांनी ‘१९२१ मध्ये सोविएत युनियनने नवीन आर्थिक धोरण’ स्वीकारण्यातून तयार झालेल्या नव्या तंत्रज्ञ-आधारित व्यवस्था आणि त्यातून पुरुषसत्ताक व्यवस्थेचा पुन्हा बळकट होणारा सामाजिक आधार यांचा क्रांतीच्या उद्दिष्टांशी असलेला अंतर्विरोध’ स्पष्टपणे अधोरेखित केला.

समाजवादी समाजरचनेचे आजवर झालेले प्रयोग आणि त्यात निर्माण झालेल्या ‘तंत्रज्ञ- विशेषज्ञशाह्या’ ह्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कारण त्यात अनुस्यूत वर्गीय तर्क- कारणभाव असा होता की ‘उच्च स्थानी असणारे लोकच केवळ खऱ्या अर्थाने नव्या समाजनिर्मितीला जबाबदार असे कर्ते-करवते आहेत. आणि श्रमिक वर्ग म्हणजे भांडवली शोषणपद्धतीप्रमाणेच केवळ एक साधन आणि हुकमाचा ताबेदार राहतो’ . परंतु सामाजिक पुनर्रचना करण्याच्या प्रक्रियेत आणखी मूलभूत समस्या होती – वरकड उत्पादनावर मालकी गाजवणारया जुन्या शोषक वर्गांचे क्रांतीच्या काळात उच्चाटन करण्यात आले होते. पण वरकड उत्पादन करणारे श्रमिक मात्र ह्या उत्पादनाचे मालक बनले नाहीत . वरकड उत्पादन हे निश्चितच सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी होते. पण मजुरी आणि वरकड मूल्य संबंध आणि त्यात निर्णायक ठरणारी  उत्पादक आणि पुनरुत्पादक अश्या श्रमांची लैंगिक आधारावरील विभागणी यांचा प्रश्न जटील होता . नव्या आर्थिक धोरणात अभिप्रेत असलेले सामुदायिक उद्योग, आणि कुटुंब यांच्यातील संबंध हा मजुरी आणि वरकड मूल्य संबंध ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावणारा घटक होता. सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्नशील अश्या समाजांत उत्पादक आणि पुनरुत्पादक श्रमांच्या लिंग- आधारित विभागणीने  अ. मजुरी आणि वरकड मूल्य संबंध निश्चिती आ. पुरुषसत्ताक व्यवस्थेत काही पुरोगामी बदल घडवून आणले, पण उत्पादन/ पुनरुत्पादन यांच्यातील अरिष्टे; पितृसत्ताक संकेत-व्यवस्थेमार्फत जबरदस्तीने बिना-मोबदला श्रम स्त्रियांकडून करवून घेणे, त्यांच्यावर सामाजिक पुनरुत्पादनाचा बोजा टाकणे, प्रजननाच्याआड सामाजिक शोषण करणे हे सुरूच राहिले  म्हणूनच जेव्हा आपण बोल्शेविक क्रांतीची शंभर वर्षे साजरी करतो आहोत, तेव्हा हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की ‘सामाजिक पुनरुत्पादनाची समतामूलक तत्वावर उभारणी’ ह्याच्या ऐवजी ‘उत्पादक शक्तींची वाढ’ हा व्यापक परिवर्तनाचा जेव्हा केंद्रबिंदू बनला (कदाचित तो निर्णय ऐतिहासिक मजबुरी असेल किंवा ऐतिहासिक निवड असेल) तेव्हा क्रांतीपुढे पहिल्या पाच वर्षात उभे राहिलेले ते सर्वात मोठे आव्हान होते. कारण बोल्शेविक क्रांती हा जागतिक इतिहासात पितृसत्ता, दडपशाही आणि शोषण नष्ट करण्यासाठीच्या सर्वात मूलभूत प्रयत्नांचा प्रारंभ होता.

लेखिका जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथे प्राध्यापिका आहेत.

1 Comment

  1. आपल्या संकेतस्थळावरील लेख चांगले असतात. परंतु सर्वसामान्य वाचक म्हणून आम्हाला यामागील संपादकीय हात कोणाचे आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकताही वाटते. ही आपण पूर्णतः भागवावी किंवा नाही, हा आपल्या इच्छेचा भाग आहे. त्याचा मान राखतही असे सुचवावेसे वाटते की ‘आमच्याविषयी’ असा एखादा भाग यात कुठेतरी असावा. पूर्वी असा भाग होता, असे आठवते. परंतु आता रचनेतील काही बदलांनंतर तो दिसत नाही. त्यामधे काही किमान माहिती असणे अधिक मोकळेपणाचे होईल. किती माहिती टाकावी, हे आपल्या हातात आहेच. धन्यवाद.

Write A Comment