fbpx
राजकारण

गुजरात डायरीज – भाग ५

गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरावयाच्या शेवटच्या दिवशी, भाजपातील बंड चव्हाट्यावर आले आहे. बंडखोर केवळ गल्ली पातळीवरील नाराजच नव्हेत तर भूतपुर्व मंत्री व गुजरात भाजपाचे ज्येष्ठ नेतेसुद्धा बंडाच्या पवित्र्यात आलेले दिसतात.
धनजी पटेल या धनिकाकडून नऊ कोटी रुपये घेऊन, पक्षश्रेष्ठींनी वाधवान मतदारसंघ -सुंदरनगर जिल्हा- ज्या मतदारसंघाचा या धनजी पटेलशी काहीही संबंध नाही – येथील भाजपा उमेदवारी विकल्याचा आरोप करीत एकेकाळी मंत्री असलेले रणजितसिंग झाला भाजपातून तडकाफडकी बाहेर पडले. ‘मला स्वतःला तिकीट हवे होते अशातली गोष्ट नाही, परंतु “पार्टी विथ या डिफरन्स” अशी बढाई मारणाऱ्या पक्षाचे श्रेष्ठीच जर हे व्यहवार करणार असतील, तर या पक्षात राहण्यात काय अर्थ उरतो’ असा सवाल झाला यांनी केला.
या धनजी पटेलांना उमेदवारी देताना, वाधवान मतदारसंघातील विद्यमान आमदार वर्षा दोषी यांना पक्षाने घरी बसविले. खरतर या मतदारसंघातुन उभे राहण्यासाठी, माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्ती आय के जडेजा हे हि इच्छूक होते. परंतु आनंदीबेन पटेलांचे पक्षाध्यक्ष अमित शहांबरोबर बिनसल्यामुळे जडेजांची डाळ शिजली नाही.
सौराष्ट्रातील कोडिनार मतदारसंघातून भाजपचे जेठाभाई सोळंकी २०१२च्या निवडणुकीत विक्रमी मतांनी – ६३ हजारहून अधिक मताधिक्याने जिंकले होते. जेठाभाई दलित समाजातील प्रमुख नेत्यांत गणले जातात.ते भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे सचिवसुद्धा होते. या खेपेस त्यांना तिकीट नाकारल्यावर त्यांनी पक्षाचा व सर्व पदांचा राजीनामा दिलाय.
नऊ डिसेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या फेरीसाठी भाजपा उमेदवारांची यादी घोषित झाल्यापासून वडोदरा, छोटा उदेपूर, दक्षिण गुजरात मधील नवसारी, भरूच , सौराष्ट्रातील महुआ, जसदन, अमरेली, सर्वत्र नाराज नेत्या/कार्यकर्त्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरू झाले.
या पहिल्या फेरीतील १३४ जागांसाठी भाजपाने आपली यादी सत्तर, छत्तीस आणि अठ्ठावीस अशी तीन भागांत प्रसिद्ध केली. पटेल समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधात गेल्यामुळे, त्यांना गोंजारण्यासाठी शेवटच्या २८ जणांच्या यादीत तब्ब्ल १५ पटेल उमेदवार भाजपाने घोषित केले.
या पंधरा पटेलांमध्ये एक नाव पूर्व पेट्रोलियम मंत्री सौरभ पटेल यांचेही आहे. हे सौरभ पटेल आनंदीबेन पटेलांचे निकटवर्ती मानले जातात. परंतु यावेळी त्यांना त्यांच्या अकोट- वडोदरा या विद्यमान मतदारसंघातून उमेदवारी न देता, सौराष्ट्रामधील बोतड येथून तिकीट दिले आहे.
जामनगर मतदारसंघातून, विद्यमान आमदार आणि आनंदीबेन पटेलांच्या भगिनी वसुबेन त्रिवेदींचे तिकीट कापून त्याजागी बंडाच्या तयारीत असलेले आर सी फालदू यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसमधून फुटून भाजपात आलेल्या राघवजी पटेल यांची सोय जामनगर- ग्रामीण या फालदूयांच्या मतदारसंघात केल्याने आर सी फालदू भडकले होते. आता फालदूंची शांती करायला वसुबेन त्रिवेदींचा बळी गेला.
हार्दिक पटेल व त्याच्या आंदोलनाचे सर्वात कडवे राजकीय विरोधक, विद्यमान राज्यमंत्री- हिरउद्योग, श्री नानूभाई वनानी यांना याखेपेस पक्षाने घरी बसविले आहे . सुरत मधून नानूभाईंसह इतर चार विद्यमान आमदारांना भाजपाने याखेपेस तिकीट दिलेले नाही. उमेदवार याद्या घोषित झाल्यानंतर एकूण चाळीस विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या अंतर्गत तीव्र असंतोष आहे.

लेखक गुजरातस्थित ज्येष्ठ पत्रकार असून इंग्रजी, हिंदी व गुजराती भाषेतील अनेक वर्तमानपत्रे, वैचारिक नियतकालिकांत सातत्याने लेखन करतात. २००२ च्या दंग्यांनंतर गुजरातचा सामाजिक, राजकीय व आर्थिक अंगाने अभ्यास करणारे विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे.

Write A Comment