fbpx
राजकारण

गुजरात डायरीज भाग ३

एक नाही, दोन नाही, गुजरातेत २००२ पासून सलग तीन विधानसभा निवडणुका जय श्री राम चा नारा देत भाजपाने तीव्र धार्मिक ध्रुवीकरण करून सहज जिंकल्या होत्या. परंतु याखेपेस पाटीदार आंदोलकांचा जय सरदार चा नारा जय श्री रामवर भारी पडताना दिसत आहे.
तेवीस वर्षीय हार्दिक पटेल व पाटीदार अमानत आंदोलन मधील त्याच्या साथीदारांनी भाजपनेत्यांच्या उरात धडकी भरेल अशी परिस्थिती आणली आहे. भाजपचे आमदार, नगरसेवक अगदी पंचायत समितीतील भाजप नेत्यांवर आपल्याच मतदारसंघात पोलीस संरक्षण घेऊन फिरण्याची वेळ आली आहे.
प्रचारास बाहेर पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर पाटीदार आंदोलकांनी अंडी फेकून त्यांना पिटाळून लावल्याचे विडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतात. चार हजार गावांमध्ये तर चक्क प्रवेशद्वारावरच “भाजपा प्रचारकांसाठी कलम १४४” – म्हणजे प्रवेशबंदीचे बोर्ड लागले आहेत.
सोशल मीडिया वर तर “विकास गांड थायो छे” हा परवलीचा शब्द झालाय. त्यावर विनोद, नाच, व्यंगकवितांचे इतकं विक्रमी पीक सोशल मीडियावर आलय, कि या वेळी विकास हा शब्द सुद्धा भाजपास प्रचारात वापरताना दहा वेळा विचार करावा लागतोय.  स्टँडअप कॉमेडिज, व्यंगचित्रे, फोटो आदी #विकासगांडोथयोछे या टॅगलाईनद्वारे सुरू असलेल्या भाजपच्या मस्करीच्या या धुमधडाक्यामुळे भाजपचे नेते हादरून गेले आहेत. गुजरातच्या विकास मॉडेलचा जो ढिंडोरा आजवर पिटला गेला तो यामुळे पुरता उघड झाला आहे. यामुळे भाजपने आता पासच्या युवा नेत्यांच्या विरोधात फौजदारी खटले भरायला सुरुवात केली आहे.
हार्दिक पटेल याची एका महिले सोबतची `सेक्स सीडी’ सोशल मिडियावर व्हायरल करून भाजपने आपल्या खुनशी राजकारणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांचे समर्थक असल्या खेळांमध्ये अत्यंत माहिर आहेत. २००५ साली भाजपचेच तत्कालीन सरचिटणीस संजय जोशी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी अशाच प्रकारची एक सिडी बाहेर आली होती. त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
पटेल समाजाला संवैधानिक मर्यादेत आरक्षण देण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनानंतर हार्दिक पटेल याने उघड उघड काँग्रेसचे समर्थन केल्याने डिसेंबर ९, १४ रोजी होणाऱ्या राज्यातील निवडणुकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हार्दिक आणि पासच्या कोअर कमिटीच्या सदस्यांनी आरक्षणाच्या फॉर्म्युलाबाबत काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर हार्दिक ने सांगितले की, अत्यंत घासाघिसीनंतर आम्ही या निष्कर्षाला पोहोचलो आहोत की, काँग्रेसने दिलेल्या फॉर्म्युल्यावर पाटीदार समाजाला आरक्षण मिळू शकते व सर्वोच्च न्यायालयातून ते हाणून पडण्याची भितीही नसेल.
पासच्या कोअर कमिटीच्या या निर्णयानंतर ग्रामीण भागातील व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पाटीदारांची मते काँग्रेसकडे वळण्याची मोठी शक्यता निर्माण झाली असून हा भाजपसाठी मोठा फटका आहे.
पाटीदार किंवा ज्यांना सर्वसामान्यपणे पटेल म्हणून ओळखले जाते हा समाज गुजरातच्या एकूण लोकसंख्येच्या १५ ते १७ टक्के असून तो आजवर कुठल्याही विधानसभा वा लोकसभा निवडणुकीत कायम भाजपचाच पाठीराखा राहिला आहे.

पासने काँग्रेसचा फॉर्म्युला मान्य केल्याच्या काही तासांतच हार्दिक पटेलची तथाकथित सीडी सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आली. हार्दिकने मात्र ही सिडी खोटी असून आरक्षणाच्या लढाईला हानी पोहोचविण्यासाठी केलेले हे षड्‌यंत्र असल्याचे म्हटले आहे.

हार्दिकने ३ नोव्हेंबर रोजीच भाजप त्याची प्रतिमा मलिन करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे विकृत राजकीय खेळ खेळण्याची शक्यता लक्षात घेऊन आधीच याचे सुतोवाच केले होते. त्यात त्याने अशा प्रकारच्या सिडीची शक्यताही बोलून दाखवली होती हार्दिकच्या म्हणण्याप्रमाणे या सिडीतील तरुण हार्दिक नसून त्याचा चेहरा हार्दिकच्या फोटोने मॉर्फ्ड करण्यात आला आहे.
सरदार पटेल ग्रुप या पासमधील एका संघटनेचे नेते लालजी पटेल यांनीही या सिडीद्वारे खेळण्यात आलेल्या भाजपच्या किळसवाण्या राजकरणाचा निषेध केला आहे. तसेच ही सिडी फोरेन्सिक प्रयोगशाळेत तपासून घेण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. हार्दिक आणि लालजी या दोघांनीही या सिडीप्रकरणानंतर हे स्पष्ट केले आहे की, त्यांना कोणीही पाटीदारांच्या मागण्यांपासून परावृत्त करू शकत नाही की पाटीदार समाजालाही या असल्या राजकारणाद्वारे संभ्रमीत केले जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवायला हवे.
काँग्रेसचे प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल यांनी याबाबत म्हटले आहे की, या सिडी प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की, भाजप यातून प्रचंड गर्भगळित झाली असून या निवडणुकीत ते विरोधकांवर मात करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात.
अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी नुकताच उत्तर गुजरातचा तीन दिवसांचा दौरा संपवताना अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवाणी व हार्दिक पटेल या तिन्ही युवा नेत्यांना हे दबलेल्यांचा आवाज आहेत, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे.
सेक्स सिडीचा उल्लेख करण्याचे टाळून राहूल यांनी मेहसाणा येथील रॅलीत हे स्पष्ट केले की, भाजपा येन केन कारणाने त्यांच्या विरोधकांचा आवाज शांत करू इच्छिते, मात्र ते यात कधीच यशस्वी होणार नाहीत. शक्तीशाली ब्रिटीशांनीही भारतीयांचा आवाज अशाच प्रकारे दाबण्याचा खूप प्रयत्न केला होता. मात्र त्यांना याच गुजरात राज्यातील दोन महान नेते महात्मा गांधी व सरदार पटेल यांचा आवाज कधीच दाबता आला नाही व अखेर देश सोडून जावे लागले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.

दलितांच्या एका सभेमध्ये राहूल यांनी त्यांना आपल्या समस्या स्थानिक काँग्रेस नेत्यांना सांगून त्या काँग्रेसच्या जाहिरनाम्यात घालण्यास सांगितले. राहूल म्हणाले की, एकदा का जाहिरनाम्यात एखादी गोष्ट आली आणि काँग्रेसला जर जनतेने सत्ता दिली तर त्या जाहिरनाम्याची अंमलबजावणी ही करावीच लागेल. राज्याचा भावी मुख्यमंत्री कुणीही असो जर त्याने काँग्रेसच्या जाहिरनाम्याची अंमलबाजवणी केली नाही, तर त्याला पदावरून जावे लागेल, असे राहूल म्हणाले.
काँग्रेस सत्तेवर आल्यास स्त्रियांना विधिमंडळात व संसदेत ५० टक्के आरक्षण देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तुम्ही ३३ टक्के आरक्षण मागत आहात. मात्र तुम्हाला पुरुषांप्रमाणेच समान वाटा मिळायला हवा. विधिमंडळ व संसदेत तो भविष्यात नक्कीच मिळेल, असेही राहूल म्हणाले.

लेखक गुजरातस्थित ज्येष्ठ पत्रकार असून इंग्रजी, हिंदी व गुजराती भाषेतील अनेक वर्तमानपत्रे, वैचारिक नियतकालिकांत सातत्याने लेखन करतात. २००२ च्या दंग्यांनंतर गुजरातचा सामाजिक, राजकीय व आर्थिक अंगाने अभ्यास करणारे विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे.

1 Comment

  1. Nice informative series of articles on Guj elections. Hope it is precise and factual in which case BJP may not get majority but might turnout to be single larger party .

Write A Comment