fbpx
सामाजिक

गाय हमारी माता है…!!!

राजस्थानमध्ये पुन्हा एकदा गायीला घेऊन जाणाऱ्या दोन मुस्लिम युवकांवर गोळीबार करण्यात आला. यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा अत्यवस्थ आहे. गेले काही दिवस गायीवरून माणसं मारण्याच्या या प्रकारांना थोडासा आळा बसल्यासारखे वाटत असतानाच आता गुजरात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आणि पुन्हा हे प्रकार सुरू झाले आहेत.

भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून भारतात गांधीजींना अभिप्रेत नसलेले रामराज्य स्थापन करण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले आहेत. या गांधीजींना अभिप्रेत नसलेल्या रामराज्याचा अविभाज्य भाग म्हणून हिंदूंसाठी गाय पवित्र असून ती गोमाता आहे. त्यामुळे केवळ गोमाताच नव्हे तर गोमातेचा बाप, पती, मुलगा म्हणजेच मांसासाठी बैल मारण्यावरही अनेक राज्यांनी बंदी घातली आहे. त्यानंतर गोमातेचीच दूरची बहीण वगैरे असावी म्हणून  म्हशीलाही मांसासाठी मारता कामा नये, असा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी मांडला होता. पण त्याला विरोध झाल्याने सध्या तो प्रस्ताव गुंडाळून ठेवण्यात आहे. इंडिया स्पेंड या वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, २०१० ते २०१७ या काळामध्ये गोहत्येच्या नावाखाली २८ जणांना मारण्यात आलं. तर ६३ हिंसाचाराच्या घटना घडल्या. गोहत्येच्या आरोपातून किंवा संशयातून मारल्या गेलेल्यांची नोंद पोलीस वेगळ्या पद्धतीने करत नाहीत त्यामुळे खरा आकडा कळणं मुश्किल आहे. मात्र हिंदू संस्कृतीच्या नावाखाली प्रत्यक्षात वैदिक संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या आणि गांधीविरोधी रामराज्य येण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनी थोडा वैदिक इतिहासाचा अभ्यास केला तर त्यांना ते करत असलेली आंदोलने ही प्रत्यक्षात वैदिक संस्कृतीच्याच विरोधात असल्याचं दिसून येईल. अगदी ज्या रामाच्या नावाने देशातील गंगा-जमना तहजीबला ध्वस्त करण्याचा खेळ सुरू असतो, त्या रामाच्या आहाराविषयी वाल्मिकींच्या रामायणात राम मांस खाण्याचे दाखले आहेत, अर्थात यासाठी थोडा संस्कृतचा अभ्यास गरजेचा आहे. धर्माच्या आधारावर ज्यांच्या डोक्यात राख घातली जाते, त्यांना सर्वप्रथम मेंदू न वापरण्याचीच पूर्वअट असल्याने अभ्यास वगैरे या गोष्टींशी त्यांचा संबंध येत नाही, तरीही वैदिक काळातील गोमांस भक्षणाच्या विविध दाखल्यांकडे अशा वातावरणात सद्‌सद विवेक जागा असणाऱ्यांनी तरी पाहायला शिकलं पाहिजे, त्यादृष्टीने वैदिक काळातील गोमांस भक्षण व त्यानंतर वैदिक काळातच राजकीय अपरिहार्यतेतून पसरलेला शाकाहार, भारताच्या स्वातंत्र्यानंतर संविधान समितीत गोहत्या बंदीवरून झालेल्या चर्चा यांकडे एक दृष्टीक्षेप टाकण्याचा प्रयत्न करुयात.

वाल्मिकी रामायाणातील श्लोकांमध्ये प्रभूरामचंद्रांच्या आहाराविषयी असलेल्या या श्लोकात काय म्हटले आहे पाहा…

कुशास्तरण सस्तीर्णेरामः सन्निषसादह |

सीतामादाय हस्तेनमधु मैरेकमशुचि ||

पापयामांस काकुतस्थ शची मिव पुरन्दरः

मांसानि च सुमृष्यनि फलानि विविधानि च ||

रामस्याभ्य वारार्थ किकरास्तू माहरन |

उपानृत्यंश्चराजन नृत्यगीत विशारदा ||

अप्सरोरगसंघाश्च किन्नरी परिवारिता |

दक्षिणा रूवत्यश्च स्त्रिय पावन संगत ||

 

(वाल्मिकी रामायण 10-42-18 ते 21)

 

याचा अर्थ असा की, श्रीरामाने आपल्या अंतःपुराजवळील समृद्धशाली राजकीय उपवनात विहार करण्यासाठी प्रवेश केला व फुलांनी सजविलेल्या कुशाच्या आसनावर ते बसले. काकुत्स्थ वंशात जन्मलेल्या राजा रामचंद्राने सीतेच्या हाताला धरून तिला मैरेय नावाचे पवित्र मद्य पाजले. हेच मद्य इंद्र, आपली पत्नी शची हिला पाजतो. सेवकांनी अनेक प्रकारचे उत्तमोत्तम मांस, पक्वान्ने व फळे त्यांच्या समोर भोजनासाठी ठेवली. त्यावेळी नाच-गाण्यात निपुण अप्सरा, नागकन्या, किन्नरी, रुपवान व गुणवान स्त्रिया मद्याच्या नशेत धुंद होऊन नाचू लागल्या.

आता पुढे पाहुयात, सीता वनवासाला निघाली असताना सुखरूप परत येण्यासाठी गंगा ओलांडताना काय म्हणते ते…

सुरा-घट-सहस्रेण मांसभूत-ओदनेन च |

यक्ष्ये त्वां प्रीयतां देवि पुरीं पुनरुपागता ||2.52.89||

याचा अर्थ असा की, इतकेच नव्हे, परंतु हे देवी, मी अयोध्यानगरीला परत आले, म्हणजे सहस्र घट मद्य आणि मांसमिश्र ओदन यांचा तुला बळी देईन. गंगे! तू मला प्रसन्न हो ||89|| (द्वितीय भाग, पा 352)

 

आता वैदिक संस्कृतीचे हिंदू संस्कृतीच्या नावाखाली पुनरुज्जीवन करू पाहणाऱ्यांपैकी काही जण हा तर्क देऊ शकतील की, सीता स्वतः मांस खात होती असे यात कुठे म्हटलंय? मात्र वैदिक संस्कृतीत ज्या गोष्टी मनुष्याला खाण्यास योग्य होत्या, त्याचाच नैवेद्य देवाला दाखवला जात होता, याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?  रामाची नगरी समजल्या जाणाऱ्या अयोध्येच्या आजूबाजूला राहणारे लोक काय खात होते ते पाहुयात. अयोध्येच्या जवळ बस्ती जिल्ह्यामध्ये सिसवानिया म्हणून गावात 1995 च्या दरम्यान आर्किओलॉजिकल सर्व्हे अॉफ इंडियाने खोदकाम केलं. त्याचा संपूर्ण वृत्तांत इंडियन आर्किओलॉजी 1996-97 रिव्ह्यू या भारत सरकारच्या पुस्तकात छापला आहे.

(http://asi.nic.in/nmma_reviews/Indian%20Archaeology%201996_97%20A%20Review.pdf)

त्या वृत्तांतानुसार वेदिक काळाच्या शेवटच्या टप्प्यात, त्या भागामध्ये बैल, म्हैस, घोडा, बकरा, मेंढा, हरिण, सांबर, जंगली डुक्कर, डुक्कर, कुत्रा, मांजर, ससा, उंदिर, कासव, मासा, कोंबडी व तत्सम पक्षी अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडले. यातील बहुतेक प्राणी (कुत्रा आणि मांजर सोडून) हा त्यावेळच्या माणसांचा आहार होता. कारण या प्राण्यांच्या हाडांवर कापल्याचे आणि तुकडे केल्याच्या खूणा आहेत, असं हा वृत्तांत सांगतो. आता थोडंसं रामायाण काळातून महाभारत काळाकडे येऊयात. महाभारताच्या अनुशासन पर्वातील पुढील श्लोक काय म्हणतो पाहा.

गव्येन दत्तं श्राद्ध तु सवस्तर मिहोच्यते |

याचा अर्थ असा की, गाईच्या मांसाने श्राद्ध केल्यास पितरांना एक वर्षासाठी तृप्ती मिळते. (अनुशासन पर्व अध्याय 88 श्लोक 5)

महाभारतातल्या उपकथांमधला एक रन्तिदेव राजा काय काय खायचा ते पाहा.

राज्ञो महानसे पूर्वे रन्तिदेवस्य वै व्दिज ||8|| व्दै सहस्रे तु वध्यते पशूनामन्वहतदा | अहन्यहनि वध्यते व्दै सहस्रे गवा तथा ||9|| स मास ददतो हयन्नं रन्तिदेवस्य नित्यशः | अतुला कीर्तिरभव मृपस्य व्दिज सत्तम ||10|| (वन पर्व 208 व 199 अध्याय). याचा अर्थ असा की, रन्तिदेव राजाच्या पाकशाळेत दोन हजार पशुंची कत्तल होई. रोज दोन हजार गायी कापल्या जात. मांस व अन्न दान करून करून रन्तिदेव राजाची कीर्ति खूप वाढली.

आता वैदिक कर्मकांडांच्या काळाकडे पाहुयात. ग्रह्य सूत्रात तर गाय कापणे, तिचे मांस खाणे याचेही नियम आहेत. याचे दाखले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या “डिड द हिंदूज नेव्हर इट बीफ” या निबंधामध्ये पुराव्यासह दिले आहेत. डॉ. आंबेडकर आपल्या निबंधात म्हणतात की, “आपस्तंभ गृहसूत्रामध्ये आर्य लोकांमध्ये घरी येणाऱ्या महत्त्वाच्या पाहुण्यांना मधुपर्क दिला जायचा. ग्रह्य सूत्रानुसार, ब्राह्मण, राजा, शिक्षक, वधू-वर, प्रियजन आणि पदवीधर हे उच्चजातीचे असतील तर त्यांचे स्वागत मधुपर्काने करावे. लग्नकार्य आणि इतर विवाह प्रसंगी मधुपर्क केला जात असे. आजही मंगलाष्टकांत +मधुपर्क पूजन+ अशी एक ओळ भटजी म्हणतो. आता हा मधुपर्क कशाने बरं बनत होता? मानव ग्रह्यसूत्रानुसार, तो मांसाशिवाय बनत नव्हता.”

मनुस्मृतीही मांस खावे म्हणून सांगते. पितरांच्या श्राद्धात देवतांसाठी ही हव्य किंवा हवन केले जावे. हे कदाचित खरं वाटणार नाही, त्यामुळे मनुस्मृतीतील पुढील श्लोक पाहा.

मन्यन्ननि पयः सानो मांस ववचानु परस्कृतम् अक्षार लवणं चैव प्रकृत्या हवि रुच्यते ||

याचा अर्थ असा की, मुनिंचे अन्न, दूध, सोमरस, शिजवलेले मांस, सैंधव या सर्व पदार्थांना हव्य म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे हवन दिल्याने देवता भिन्न भिन्न कालावधीपर्यंत तृप्त राहतात. पुढे तर मनूस्मृती ब्राह्मणांना गोमांस खाण्याचा आग्रहच धरते. लग्नाला जेवणाच्या पंगतीत जिलेबी किंवा लाडूचा आग्रह धरतात ना तसच काहीसं.

यज्ञामध्ये पशूंचा बळी दिला जायचा हे तर सर्वश्रुत आहे. राजा दशरथ आणि कौसल्येने केलेल्या अश्वमेध यज्ञामध्ये घोड्याची आहुती दिल्याचे उदाहरणेही रामायणात आहे. इंद्रासाठी घोडा, गाय, बैल, सांड, मेंढा बळी दिला जायचा याचे ऋग्वेदान उल्लेख आहेत. तैत्तरिय ब्राह्मणात तर गाय म्हणजे खरोखरचं चांगलं अन्न असून अगस्त ऋषीने 100 बैलांचा बळी दिल्याचा उल्लेख आहे. चरक संहितेतही वेगवेगळ्या प्रकारचे मांस हे औषध म्हणून सांगितले आहे. गोमांसाचं कालवण आणि डाळींबाचे दाणे हे चरकाने तापावर उपाय म्हणून सांगितले आहेत. अगदी मनुस्मृतीमध्येही गोमांस खावे व खाऊ नये अशी परस्पर विरोधी उदाहरणंही आहेत.

वरील सर्व उदाहरणं (संस्कृत श्लोक व अर्थ- हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण, लेखक- एस एल सागर, भाषांतर-प्रमिला बोरकर) मुद्दाम देण्याचं कारण की, गोमांस हे वैदिक धर्मासाठी आणि विशेषतः ब्राह्मणांसाठी कधीच वर्ज्य नव्हते हे लक्षात घेण्यासाठी. ऋग्वेद, मनुस्मृती, रामायण, महाभारत अशा अनेक ग्रंथांमधून असे शेकडो दाखले मिळतात, ज्यानुसार वैदिक धर्मात गोमांस वर्ज्य नव्हतं, हे स्पष्ट होतं. केवळ गोमांस नव्हे तर मांस हाच मूळात माणसाच्या अन्नाचा महत्त्वाचा घटक होता. कोणता प्राणी खावा, कोणता खाऊ नये, तो कशाप्रकारे खावा याच्या पाकाकृतीही आहेत. पण संघ परिवार आणि त्याच्या समर्थकांनी मांसाहाराबद्दल सुरू केलेला अपप्रचार हा स्वइतिहासाच्याच विरोधात आहे. अनेकजण विशेषतः या प्रचाराच्या तडाख्यात सापडलेले बहुजन डोळे मिटून हा प्रचार स्वीकारताना दिसतात. पण या प्रचारातून  माणसाच्या खाण्यावरच निर्बंध लादून फॅसिजमच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याला मदत होत असल्याचे या देशातील आपापल्या लहान मुलांच्या बुध्यांक चाचण्या करून घेणाऱ्यांच्या लक्षात येत नाही, हे थोडंस दुःखद आहे!

माणसाच्या आयुष्याची धडपड, कष्ट, नोकरी-धंदा हे सगळं शेवटी पोट भरण्यासाठी होत असतं. बुद्धीचे दाखले देत आरक्षणाला विरोध करणाऱ्या उच्च जातींमधील अनेकांनी तर सांप्रतच्या त्यांच्या आहार संस्कृतीत बहुतांश गोमांस खात नाहीत म्हणून या प्रचाराच्या विरोधात भूमिका न घेता गप्प बसून गंमत बघायची यात काही छुपा अजेंडा असल्याचा संशय जर काहींच्या मनात बळावला तर त्यात वावगे काय?  अशाच पद्धतीने या अपप्रचाराचा आत्मविश्वास वाढत राहिला तर मग पुढे या वावदूकपणातून कदाचित अळूच्या भाजीवर किंवा बटाट्यावरही संक्रांत येऊ शकते. खरंतर, बटाटा, साबुदाणा, मिरची, रताळं या गोष्टी भारतीय उपवासाला चालतात याचंही कारण वैदिक काळात नसलेल्या या गोष्टी इसविसनानंतर शेकडो वर्षांनी परदेशातून आपल्या जेवणात आल्या आहेत. अगदी चणा, चवळी, मसूर, मटार ही कडधान्यं-धान्यं यांचा उगम भारतात झालेला नाही. मात्र तर्कसंगत प्रश्न वा वादांसाठी हुल्लडबाजांकडे वेळ नसल्याने यावर चर्चा होणे अशक्यप्रायच आहे.

अन्न संस्कृतीवर घालण्यात येणारी बंदी ही कायम राजकीयच असते. क्वचितच एखाद्या राजाच्या मर्जीनुसार  विशिष्ट अन्नावर बंदी आल्याची उदाहरणं आहेत. पण राज्यकर्त्यांना बहुतेक वेळा विशिष्ट अन्नपदार्थावर बंदी घालून एक राजकीय संदेश जनतेपर्यंत आणि विरोधकांपर्यंत पोहोचवायचा असतो.  त्यामुळे फक्त हिंदूच नव्हे तर इस्लाम, ज्यू, ख्रिश्चन धर्मातही कोणते अन्न खावं याचे नियम आहेत. इस्लाममध्ये हलालपद्धतीचं मांस खाल्लं जातं तर डुक्कर खाणं निषिद्ध मानलं जातं. ही पद्धत ज्यू धर्मातून आली आहे. ज्यूंसाठी विशेष अन्न बनवणाऱ्या परदेशी हॉटेलांमध्ये कोशर मीट असं लिहिलेलं असतं आणि ते डुक्कर निषिद्ध मानतात. डुक्कर निषिद्ध का याचा एक अंदाज खूपच रोचक आहे. डुक्कर हे उच्च तापमान असलेल्या वातावरणात राहू शकत नाही. त्याला आपल्या शरीराचं तापामान कमी राखावं लागतं. त्यामुळे पाणथळ ठिकाणी किंवा चिखलात लोळणं त्याला आवडतं. ज्यू आणि इस्लाम या धर्मांचा उगम ज्या भागांमध्ये झाला त्या वाळवंटी प्रदेशात तापमान हे खूप अधिक असतं. त्यामुळे डुकराला स्वतःला थंड ठेवण्यासाठी जेव्हा चिखल, पाणी काहीच मिळत नाही, तेव्हा डुक्कर स्वतःच्याच मुत्र व विष्ठेमध्येच लोळून तो थंडावा मिळवतं. अशा प्राण्याला बघणं हे किळसवाणं आणि खाणं त्यापेक्षाही. त्यामुळे स्वच्छतेच्या कारणाने डुक्कर खाण्यावर बंदी आली असावी, असा अंदाज काही तज्ज्ञांचा आहे. पण त्याच भागामध्ये उगम पावलेल्या ख्रिश्चन धर्मात मात्र अशाप्रकारे डुक्कर खाण्यावर बंदी नाही. कदाचित ख्रिश्चन धर्म वाळवंटात उगम पावला असला तरी त्याचा मुख्य प्रसार युरोपात झाल्यामुळे हे झालं असावं, असंही तज्ज्ञांना वाटतं.

अगदी अलीकडच्या काळात २०११ मध्ये, सोमालियामध्ये तिथल्या धर्मांध शक्तींनी सर्व भारतीयांचा अावडता समोसा, त्याच्यावर बंदी घातली. त्याची दोन कारणं सांगितली गेली, एक तर समोसा त्रिकोणी असल्याने तो ख्रिश्चन

धर्माच्या “होली ट्रिनीटी” या संकल्पनेची आठवण करून देणारा आहे आणि त्यामुळे इस्लामच्या तत्त्वांमध्ये तो बसत नाही. (http://www.foxnews.com/world/2011/07/26/somali-extremist-group-bans-samosas-in-country.html)

गंमत म्हणजे समोशाचा उगम हा मध्य पूर्वेकडचाच म्हणजे इस्लामचे वर्चस्व असलेल्या भागातलाच आणि त्यात मांस वापरले जायचे. तो भारतात आल्यावर त्याला आपण एकदम शाकाहारी करून टाकलं. युरोपने मोठ्या प्रमाणात आफ्रिकन वसाहतींनी काय खायचं आणि उगवायचं याचेही नियम केले होते. काही परदेशी संस्कृतींमध्ये शार्क माशाचे पंख खाण्याची पद्धत आहे. मात्र तिथल्या हॉटेलांमध्ये हा पदार्थ ठेवण्यावर बंदी आहे. अगदी मोठ मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्याही विकसनशील देशांनी काय उगवावं यासाठी त्या देशातल्या राज्यकर्त्यांना प्रभावित करतात. त्यांचे ब्रँड्स इथे विकून नफा कमावण्यासाठी परदेशी अन्न पदार्थ आक्रमकपणे स्थानिक लोकांच्या गळी उतरवले जातात. अगदी जगभर असलेली सुपर मार्केटच्या संस्कृतीमागेही अन्नाचं राजकारण आहे. जेनेटिकली मॉडिफाइड धान्य हे सुद्धा विकसित देश आणि त्यातील कंपन्यांच्या राजकारणाचा भाग आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की, जगभर अन्नपदार्थांवर बंदी, ही धार्मिक बाब कमी आणि राजकीय बाब जास्त आहे.

मुघल राज्यकर्त्यांमध्ये हुमायूने पहिल्यांदा गोमांस खाणं सोडलं पण त्याला इतर प्राण्याचं मांस आवडायचं. त्याने गुरुवार आणि रविवारी मात्र प्राण्यांची कत्तल करायला मनाई केली होती. गुरुवारी अकबराचा जन्म झाल्याने ही बंदी घातली होती तर रविवारची बंदी ही बाबराने घातली होती. औरंगजेबाने तर मांस कधीच खाल्लं नाही, असं त्यावेळचा एक फ्रेंच व्यापारी जॉन बाप्टीस्ट तावर्निअरने लिहून ठेवलं आहे. अकबराला मांस खाण्याची फारशी आवड नव्हती. त्याच्या जेवणामध्ये शाकाहारी पदार्थांचा भरणाच जास्त असायचा. त्या पदार्थांची यादी आणि पाकाकृतीही आता उपलब्ध आहेत. त्याने गोहत्या बंदी घातली कारण त्याची बहुसंख्य प्रजा ही हिंदू होती. प्रजेला नाराज करायचं नाही म्हणून त्याने ही बंदी घातली होती. हिंदुत्ववाद्यांनी मुस्लिम राज्यकर्त्यांबद्दल कितीही नाकं मुरडली तरी अकबर स्वतः शाकाहारी होता हा इतिहास ते लपवून ठेवतात. त्यामुळे भाजप सरकारने गोहत्या बंदीचं श्रेय स्वतःकडे उगीचच घेऊ नये. त्यासाठी त्यांना अकबराची परंपरा मान्य करावी लागेल.

वैदिकांमध्ये  असलेली मांस खाण्याची परंपरा पुढे कमी होत गेल्याची काही प्रमुख कारणं आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे बौद्ध आणि जैन धर्माकडून सुरू झालेली स्पर्धा. तसंच सम्राट अशोकाने अनेकप्रकारच्या मांसावर घातलेली बंदी. त्याने कलिंगच्या युद्धात पाहिलेली प्रचंड हिंसा बघितल्याने अस्वस्थ होऊन त्याने शांततेसाठी प्रयत्न सुरू केले. त्याने बुद्ध धर्मही स्वीकारला आणि बुद्ध धर्माला राजाश्रय दिला. यज्ञ आणि विधिंमध्ये विनाकारण होणाऱ्या पशू हत्येवर त्याने बंधन आणलं. शाही स्वयंपाक घरातही विशिष्ट पशू-पक्ष्यांचे मांस त्याने बंद केलं. पण गोमांसावर कोणत्याही प्रकारची बंदी आणली नाही. केवळ सम्राट अशोकच नाही तर यज्ञामध्ये होणाऱ्या प्राण्यांच्या विनाकारण कत्तलींवर बळी राजासारख्यानेही बंदी घातली होती.

बळीराजा म्हणजे प्रल्हादाचा नातू. तो शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचा राजा होता. त्याने यज्ञात प्रचंड प्रमाणात पशूंचे बळी देण्यावर निर्बंध आणले. त्याने अनेक कामे ही चाकोरी तोडून केली होती त्यामुळे उच्च वर्णीयांचा त्याच्यावर राग होता. त्यातूनच चिडून वामनाने त्याची हत्या केली. बौद्ध आणि जैन या दोन्ही धर्मांनी पहिल्यापासूनच यज्ञामध्ये विनाकारण दिल्या जाणाऱ्या पशूंच्या बळीला विरोध केला होता. बौद्ध धर्माने मांस खाण्यावर थेट बंदी घातली नव्हती. अगदी बौद्ध भिक्षूंना जे काही लोक अन्न दान करतील ते खाण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे समोर येणारं मांस, मद्य याचाही ते स्वीकार करायचे. गौतम बुद्धांनी त्यांना मांस खाण्यासाठी पशू मारण्यावर बंदी घातली होती. पण मरून पडलेल्या किंवा इतर कुठल्या प्राण्याने मारलेला पशू खाण्यावर बंदी नव्हती. इतकंच काय तर बुद्ध भिक्कूंचे स्पर्धक म्हणजे जैन श्रमण एका ठिकाणी तक्रार करतात की, “हे भिक्कू काही वाट्टेल ते खातात अगदी मांस आणि मद्यही.” त्यामुळे बौद्ध काळात विशिष्ट प्रकारच्या अन्नावर बंदी नव्हती. गौतम बुद्धांचा मृत्यू डुकराचे मांस खाल्ल्याने झाल्याबद्दल वाद प्रतिवाद आहेत. ते डुकराचं मांस  होतं की विषारी अळंबी यावर बरचं लिहिलं गेलं आहे. (१) त्यावेळची एक मजेशीर गोष्ट विनयपिटीकेतल्या महावग्गामध्ये आहे.

जैनधर्मातून बाहेर पडून बौद्ध धर्म स्वीकारलेल्या एक सेनापती सिहा नावाच्या व्यक्तीने बुद्ध आणि त्याच्या भिक्कूंना घरी जेवायला बोलावलं. त्याने बनवलेल्या जेवणामध्ये मांस होतं. त्यामुळे जेवण सुरू झाल्यावर काही जैन श्रमण घराबाहेर रस्त्यावर उभं राहून ओरडू लागले की, “जनरल सिहाने मुद्दाम गौतम बुद्धासाठी प्राणी मारून मांस बनवलं आहे. प्राण्यांची हिंसा करू नका सांगणारा बुद्ध मांस खात आहे.” त्यानंतर बुद्धाने समोर येणारं मांस, मद्य स्वीकार करा मात्र मुद्दाम तुमच्यासाठी कोणी प्राणी मारत असेल, तुमच्या दृष्टीला असं काही पडलं किंवा असं काही एेकलं तर ते अन्न स्वीकारू नका, असा नियम घातला. आता या गोष्टीवरही वादप्रतिवाद आहेत हेही लक्षात घ्यायला हवं. (२)

जैन धर्माने अहिंसेचं तत्त्व जास्त आक्रमकपणे लावून धरलं अगदी बौद्ध धर्मापेक्षाही जास्त. मात्र तत्कालीन परिस्थितीमध्ये मांस खाणं ही खूपच सहज बाब असल्याने त्यांनाही थेट मांस खाण्यावर बंदी घालता आलेली नव्हती.

भगवती सूत्रामध्ये स्वतः महावीरांनी मांस खाल्ल्याचा उल्लेख आहे (अर्थात याचाही प्रतिवाद अनेक जैन धर्म अभ्यासक करतातच). अहिंसेचं तत्त्वं हे सिंधु संस्कृतीपासून अस्तित्वात आहे. मात्र त्याला अहिंसा हे नाव खूप उशीरा पडलं.

आता आणखीन गंमत पहा, विहायापनत्ती शतका १५ मध्ये खूप आजारी असलेले महावीर आपल्या शिष्याला एक निरोप देतात. महावीर म्हणतात की, “तू मेढिक गावातील रेवती नावाच्या स्त्रीकडे जा. तिने माझ्यासाठी दोन कबुतरे शिजवून ठेवली आहेत. ती मला नको आहेत. तू तिला सांग की, काल मांजराने मारलेल्या कोंबडीचे मांस तू शिजवले आहेत तेवढे दे.” (३)

या श्लोकाला अनेक जैन मुनींचा आक्षेप आहे. काहींच्या मते, ती दोन कबुतरं नसून महावीरांनी दोन भोपळ्यांचा उल्लेख केला होता. मतितार्थ एवढाच की, या दोन्ही धर्मानी अहिंसेचे तत्त्व लावून धरलं तरी सामाजिक परिस्थितीनुसार निर्णय घेणं त्यांना गरजेचं होतं. त्यामुळे दोन्ही धर्मातल्या भिक्कू आणि श्रमणांना मांस खाण्याची परवानगी होती. मात्र त्यासाठी स्वतः पशू-पक्षांना मारायला बंदी घातली होती.

वैदिक सनातन धर्मातल्या कर्मकांडाना, जातीव्यवस्थेला कंटाळलेल्या अनेकांनी जैन धर्माचा स्वीकार केला. जैन धर्म हा साधारण इसवी सनपूर्व ८व्या शतकापासून कदाचित त्याही आधीपासून अस्तित्वात आहे. त्याला लोकप्रियता ही महावीरांच्या काळात म्हणजे इसवी सनाच्या पाचव्या शतकात मिळाली. अगदी राजा चंद्रगुप्त मौर्यनेही जैन धर्म स्वीकारल्याचं म्हणतात. त्याने जैन धर्माच्या तत्त्वांनुसार अन्न पाण्याचा त्याग करून देहत्याग केला. जैन धर्माला मोठ्या प्रमाणात राजाश्रय मिळाला अगदी दक्षिण हिंदुस्तानातही तो पसरला. त्याचसुमारास म्हणजे इसवीसनपूर्व पाचव्या शतकात गौतम बुद्धाने बौद्ध धर्माच्या तत्त्वांचा प्रचार सुरू केला. त्याचाही पाया हा वैदिक धर्मातील जातीविरोधी होता. बौद्ध धर्माचा प्रभाव इतका जास्त होता की, भारतातले बहुसंख्य प्रदेशातील लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. वैदिक धर्मातील जात व्यवस्था, कर्मकांड यांच्यापेक्षा बौद्ध धर्म हा अधिक व्यावहारिक होता. सम्राट अशोकाने त्याला राजाश्रय दिला. जात व्यवस्था न मानणारा होता आणि कर्मकांडाला विरोध करणारा होता. त्यामुळे जनतेमध्ये त्याबद्दल आकर्षण असणारच.

मात्र सनातन धर्मातल्या ब्राह्मणांना काही हे खपले नाही. सर्वच लोकांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला तर त्यांची मक्तेदारी मोडीत निघेल याची पुरेपुर कल्पना सनातनी ब्राह्मणांना होती. त्यामुळे इसवीसनपूर्व पाचव्या आणि सहाव्या शतकानंतर हिंदू धर्माच्या पुस्तकांमध्ये म्हणजे महाभारत, रामायण, मनुस्मृतीमध्ये गोमांस किंवा एकूणच मांस खाण्याविरोधात श्लोक लिहिले गेले. अनेकदा तर एकाच पुस्तकात मांस खाण्याबदद्ल आणि मांस न खाण्याबद्दल असे परस्पर विरोधी लिखाणही आहे. ते कदाचित जैन आणि बुद्ध धर्माच्या आगमनानंतरचं असावं. तसंच प्राण्यांच्या विनाकारण होणाऱ्या हिंसेवर टीका करणाऱ्या जैन आणि बौद्ध धर्माला टोमणेही मारले आहेत. एक अशाच अर्थाचा श्लोक महाभारतामध्ये अध्वर्यू नावाच्या ब्राह्मणाने म्हटला आहे, “तुम्ही पृथ्वीतून उगवलेल्या गोष्टी खाता, पाण्याचे विविध स्वाद पिता, प्रकाशाचे वेगवेगळे रंग पाहता, हवेतून येणाऱ्या अनेक गोष्टी तुम्हाला जाणवतात,आकाशातून येणारे आवाज एेकता, तुम्ही मनाने विचार करता आणि या सगळ्या गोष्टी सजीव असल्याचंही मानता. तुम्ही हत्या करणं थांबवलं असेल पण तुम्ही तर हिंसेमध्येच जगता. त्यामुळे हिंसेशिवाय जग नाही. ” (४)

त्यानंतर साधारण इसवीसनपूर्व पाचव्या शतकाच्या शेवटी आदि शंकराचार्य उदयाला आले. अस्वस्थ सनातनी ब्राह्मणांचं नेतृत्व त्यांनी आपल्या हाती घेतलं आणि अत्यंत आक्रमकपणे वैदिक धर्माचा पुन्हा प्रचार सुरू केला.

त्यामध्ये वैदिकांनी बौद्ध भिक्षू आणि जैन श्रमणांच्या अक्षरशः कत्तली केल्या. या युद्धामध्ये बौद्ध आणि जैन धर्मापेक्षा वेगळेपण दाखवण्याची धडपड वैदिक धर्माकडून होऊ लागली. त्यामुळे केवळ यज्ञामध्ये पशूंची आहुतीच नव्हे तर जेवणाच्या ताटातूनच मांस हळूहळू बाद करण्यात आलं. धर्म रक्षणाचं काम त्यावेळी अर्थातच सनातनी ब्राह्मणांच्या हाती असल्याने त्यांनी पहिल्यांदा मांस खाणं सोडलं. त्या काळामध्ये माणूस हा शेतीवर जास्त अवलंबून असल्याने गाय हा एक मोठा उपयुक्त पशू होताच. तिलाच हिंदू धर्माचा “सिम्बॉल” बनवण्यात आले. पण त्याचवेळी जात व्यवस्थेच्या उतरंडीवर असलेल्या जातींनी मात्र गोमांस खाणं सुरूच ठेवलं कारण ब्राह्मणांप्रमाणे त्यांना धर्मरक्षणाची वगैरे गरजच नव्हती. त्यांना मुळातच वैदिक धर्मात काही स्थान नव्हतं. त्यामुळे गोमांस किंवा इतर मांस खाणं सोडल्याने त्यांच्या सामाजिक परिस्थितीमध्ये काहीच फरक पडत नव्हता. त्यांचं शोषण सुरूच होतं. भारताचा एवढा जुना काळ इथे नमूद करण्याचं कारण हेच आहे की, राजकीय घटनांनुसार इथल्या लोकांच्या अन्नामध्ये, अन्नपद्धतीमध्ये बदल होत गेले. भारतात प्राणी मारून मांस खाण्यास मनाई करणारा बौद्ध धर्म अतिपूर्वेकडच्या देशात गेल्यावर मात्र तसा कोणताच निर्बंध लादू शकला नाही. मूळात धर्मप्रचार आणि प्रसाराच्या राजकारणातून धर्म स्वतःचे नियम लवचिक बनतो याचं हे उदाहरण आहे.

मात्र गायीला पवित्र कधीपासून मानलं जाऊ लागलं हे वैदिक धर्माच्या अभ्यासकांना अजूनही पडलेलं कोडं आहे. सिंधू संस्कृतीमध्ये गाय होती पण तिचं दैवीकरण झालं नव्हतं. अगदी त्यावेळी सापडलेल्या मुद्रेवर बैल आहे पण गाय नाही. महाभारत, रामायण यातंही गायीचं दैवतीकरण थेट दिसत नाही. मात्र भारतात शेतीच्या वाढलेल्या वापरामुळे गाय हा महत्त्वाचा प्राणी झालेला असावा. उपजिवीकेसाठी उपयुक्त पशू म्हणून गायीचं दैवतीकरण झालेलं असू शकतं, असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे.  मात्र आधुनिक भारतामध्ये या दैवतीकरणाने इतकं उग्र रूप घेतलं की, मुस्लिमांविरोधात त्याचा पुरेपूर राजकीय फायदा करून घेण्यात आला. जेव्हा जेव्हा गोहत्या बंदी किंवा गोमांस सेवनावर बंदी घालण्यात आली तेव्हा तेव्हा ती राजकीय कारणातूनच होती. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती, विनोबा भावे, अगदी लोकमान्य टिळक यांनीही गोहत्या बंदीचा हिरिरीने पुरस्कार केला. त्यातील दयानंद सरस्वती आणि टिळक यांचा गोहत्येला विरोध हा मुस्लिमविरोधातून होता. विनोबा भावे यांनी लहानपणापासून गायीचे दूध प्यायल्याने त्यांनी गायीच्या प्रती कृतज्ञता म्हणून विरोध सुरू केला होता असं त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहून ठेवलं आहे.

आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये डोकावून पाहू. भारत स्वतंत्र होण्याआधीपासूनच ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवला होता. त्यामुळे मुस्लिमांना सरसकट गोमांस खाणारे म्हणूनच गृहीत धरलं जायचं. पण त्याचवेळी हिंदू धर्माच्या उतरंडीवरच्या काही जाती गोमांस खातात याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं होतं. बाबर आणि अकबरच्या गोहत्या बंदी नंतर १८५७च्या बंडाच्या वेळी, हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन लढावं म्हणून दिल्लीच्या बादशाहने दिल्लीमध्ये गोहत्या बंदी आणली. इतिहासातलं हे अपवादात्मक उदाहरण म्हणता येईल जेव्हा गोहत्या बंदी मुस्लिमांच्या विरोधात वापरली नाही. ब्रिटीश काळामध्ये गोहत्येविरोधातलं पहिलं बंड पंजाबमध्ये झालं जिथे गोहत्येला कडाडून विरोध होता. शीख आणि नामदारी पंथाने निदर्शनं सुरू केली. त्यांनी अमृतसर आणि लुधियानामधल्या मुसलमान कसायांना मारून टाकलं. शीख आणि मुसलमान यांच्यातलं वैर पूर्वीपासूनच होतं. त्याला गोहत्येच्या अनुषंगाने आणखी एक कारण मिळालं. शीखांच्या अधिपत्याखाली असलेल्या भागांमध्ये गोहत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा दिली जात होती. त्यानंतरच्या काळात दयानंद सरस्वतींच्या आर्य समाजानेही गोहत्या बंदीसाठी प्रचंड राजकारण केलं. १८८२ मध्ये दयानंद सरस्वती व इतर काही हिंदुत्ववादी नेत्यांनी गायीच्या सुरक्षेसाठी गट-कमिट्या बनवल्या.

अवध, बिहार या उत्तर भागांमध्ये व काही प्रमाणात मध्य भारतात या कमिट्या खूपच लोकप्रिय झाल्या. आर्य समाजाने सुरुवातीला ब्राह्मण्य आणि हिंदू धर्मातील विधिंवर टीका केली तरी गोहत्या बंदीची मागणी करून त्यांनी पुन्हा ब्राह्मण धर्माचीच तळी उचलून धरली. सबंध देशभर फिरून आर्य समाजी गोहत्या बंदीची मागणी करू लागले. त्याचसुमारास हे प्रकरण कोर्टात गेलं.

१८८८ मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने असा निकाल दिला की, भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ मध्ये दिल्याप्रमाणे गाय ही पवित्र नाही त्यामुळे गोहत्या करणाऱ्या मुस्लिमांना ते हिंदू धर्माचा अपमान करत असल्याचं म्हणता येणार नाही व त्यांना तुरुंगावासाची शिक्षा करता येणार नाही. दुर्दैवाने एवढा परखड निर्णय नंतरच्या काळात कोणत्याच कोर्टाने दिला नाही. (कलम २९५ नुसार, पवित्र समजल्या जाणाऱ्या कोणत्याही जागा किंवा व्यक्तींचे नुकसान करण्यास मनाई होती.) स्वातंत्र्यानंतरच्या काळात झालेल्या गोहत्या बंदीच्या खटल्यांमध्ये न्यायालयांनी कायम हिंदूंच्या बाजूने निकाल दिलेले आहेत. अगदी मुस्लिम धर्माचा अभ्यास करून बकरी ईदसाठी गायीचाच बळी द्यावा असं बंधन नसल्याचं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे. मात्र तेवढाच अभ्यास त्यांनी हिंदू धर्माचा केलेला दिसत नाही. किंबहुना बहुसंख्य समाजाच्या (अर्थात हिंदूंच्या भावना) नजरेआड करता येणार नाहीत म्हणून गोहत्या बंदीला उठवण्यास न्यायालयांमधूनही नकारच मिळाला आहे.

पुन्हा आर्य समाजाकडे पाहुयात. त्यांच्या गोहत्याविरोधी चळवळीने इतकं उग्र रूप धारण केलं की, आपली गाय कसायाला विकणाऱ्या हिंदूंवर बहिष्कार घालणं, त्यांना गाय परत आणायला भाग पाडणं, दंड भरायला लावणं असेही प्रकार केले गेले.

भर सभेमध्ये गोमांस खाणाऱ्यांची नावं घेऊन त्यांची निंदाही केली जात असे. लोकांना पत्र पाठवून ही पुढे दहा जणांना पाठवा अशा पद्धतीने प्रचार सुरू ठेवला जाण्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यामध्ये शहरी भागातले नोकरी करणारे हिंदू आणि ग्रामीण भागातले लहान-मोठे जमीनदार व शिक्षक यांच्या आश्रयाने हा संदेश त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून शेवटी १८९३ मध्ये बिहारमध्ये बकरी ईदच्या दिवशी दंगली झाल्या आणि अनेक निरपराधांचे बळी गेले. आताचे गोरक्षक आणि त्यांच्या कारवाया अशाच प्रकारच्या आहेत. पण चुकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत असेल तर तिला विरोध व्हायलाच हवा. कारण स्वतःच्याच देशातल्या निरपराधांचे बळी घेऊन ते नक्की कोणती देशभक्ती किंवा स्वधर्मरक्षण सिद्ध करत आहेत, हे आकलनापलिकडचे आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या काँग्रेस पक्षातही हिंदुत्ववादी गट कार्यरत होता. ज्याचं गोहत्या बंदीला समर्थन होतं. गोहत्या बंदी विरोधात काँग्रेसमध्ये ठाम भूमिका कोणी घेतली असेल तर ती केवळ जवाहरलाल नेहरूंनीच. १९२३ मध्ये अलाहाबादचे महापौर असताना नेहरूंनी गोहत्याबंदी विरोधी प्रस्ताव फेटाळून लावला होता. दुर्दैवाने काँग्रेसचे नेते नेहरूंची ही परंपरा पार विसरून गेले आहेत आणि सध्याच्या गोहत्याबंदीच्या कायदा किंवा विधेयकांवर त्यांच्याकडून म्हणावा तसा विरोध होताना दिसत नाही. काँग्रेमध्ये हिंदुत्ववादाकडे झुकणारे अनेक नेते होते आणि त्यांनीच गोहत्याबंदीचा समावेश संविधानामध्ये करायला लावला. अगदी राजेंद्र प्रसादांचाही गोहत्या बंदीला संपूर्ण पाठिंबा होता. पुढच्या काळामध्ये याचाच पद्धतशीर वापर मुस्लिमांच्या, दलितांच्या कत्तलींमध्ये झालेला आपण पाहतो.

संविधानामध्ये गोहत्या बंदी हा विषय राज्य सरकारांच्या अखत्यारित ठेवला. त्यामुळे राज्यामध्ये जी सरकारे येतात ती आपल्या विचारसरणीनुसार गोहत्याबंदीचा कायदा करून मोकळी झाली. महाराष्ट्रातही २०१४ मध्ये भाजपचं सरकार आल्यावर गोवंश बंदी लागू झाली. खरंतर गोहत्या हा विषय त्याबाबत कायदा करण्याएवढा निकडीचा आहे का?  कारण देशासमोर अनेक गंभीर प्रश्न असून ते अद्याप सोडवलेले नाहीत. त्यामध्ये भूक, गरिबी, आरोग्य आणि शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे विषय आहेत. पण ते सगळे सोडून राजकारण मात्र गोहत्या बंदीचं केलं जातं आणि लोकांनाही त्यातच गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या कलम ४८ नुसार दुभती गाय आणि वासरू मारण्यावर बंदी आहे. मूळात गोहत्या बंदीसारख्या विषयाला संविधानामध्ये स्थान देण्याची गरज होती का, याबाबतही विविध राजकीय तज्ज्ञांनी विविधांगाने चर्चा केल्या आहेत. खरेतर त्यावेळची देशाच्या सामाजिक-राजकीय नेणिवा पाहता हे कलम घालण्यात आल्याचे अनेक संविधानाच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्याचा मूलभूत अधिकारांमध्ये आंतर्भाव करण्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला.

काँग्रेसचेच एक खासदार पंडीत ठाकूरदास भार्गव यांनी कलम ३८-अ ही सुधारणा आणून गोहत्येबंदीला संविधानामध्ये स्थान दिलं. ही सुधारणा नंतर कलम ४८ बनली. त्यानुसार, राज्य हे शेती व पशूपालन हे आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यावर भर देईल, गाय, वासरू आणि दुभत्या पशूंच्या संरक्षणासाठी आणि त्यांची उत्तम पैदास करण्यासाठी प्रयत्न करेल तसेच त्यांच्या हत्येविरोधात पाऊले उचलेल, असं त्यात म्हटलं आहे. संविधानातच हे कलम आल्याने गोहत्या बंदीची मागणी कायद्याच्या तत्त्वांवर चुकीची ठरत नाही. पण या कलमाचा गैरवापर करून गोहत्या बंदीचं राजकारण मात्र सर्रास केलं जात आहे.

मार्गदर्शक तत्वातील कलम ४८ बाबत पुढे असे घडले की, काँग्रेसचेच जबलपूरचे खासदार सेठ गोविंद दास यांनी गोहत्या बंदी हा मूलभूत अधिकांरात समावेश करण्यासाठीही मागणी केली होती. पण डॉ. आंबेडकरांनी त्याला विरोध करून संविधानाच्या चौथ्या भागात म्हणजे राज्य सरकारांना दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश केला. तसंच हिंदू धर्माचा कोणताही संदर्भ यामध्ये त्यांनी येऊ दिला नाही. त्या एेवजी आधुनिक, वैज्ञानिक अशा शब्दांचा वापर केला. काही अभ्यासकांच्या मते, सरसकट गोहत्या बंदीला नेहरूंनी विरोध केला आणि राजीनामा देण्याची धमकीही दिली. त्यामुळे मग आधुनिक, वैज्ञानिक शब्द वापरण्यात आले. संविधान बनण्याच्या या चर्चेमध्ये काही सदस्यांनी तर अगदी हास्यास्पद उदाहरणं देऊन गोहत्या बंदीचं जोरदार समर्थन केलं आहे. उत्तर प्रदेशमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या आर. व्ही. धुलेकर यांच्या मते, गाय ही प्राणी साम्राज्याची प्रमुख आहे ज्याप्रमाणे पिंपळाचं झाडं हे वनस्पतींमधलं प्रमुख आहे आणि शाळीग्राम हा खनिजसंपत्तीतला प्रमुख आहे. मानवी जग आणि या तीन जगांमध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. त्यामुळे भारतातील हिंदूंनी मानव, गाय, पिंपळ आणि शाळीग्राम यांना जगाचे प्रतिनिधी मानलं आहे म्हणून गायीचं संरक्षण करायला हवं. गोहत्या बंदीच्या मागणीचा प्रस्ताव हा किती पोकळ पायावर उभा आहे हे या कारणांमधून स्पष्ट होतं.

झेड. एच. लारी यांनी मात्र गोहत्या बंदी घालायचीच असेल तर ती स्पष्ट शब्दांत घालावी आणि राज्य सरकारांवर सोडू नये अशी मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय मुसलमानांची अशी समजूत आहे की, ते कायद्यांचं उल्लंघन न करता बकरी ईदला गाय किंवा इतर प्राण्यांचा बळी देतात. त्यामुळे त्यावर बंदी घालायची असल्यास ती स्पष्ट असावी आणि त्यात संदिग्धता ठेवू नये. तसंच त्यांनी मुस्लिम धर्मामध्ये गाय कापावी असं बंधनकारक नसल्याचंही सांगितलं. मात्र संविधानातील आधुनिक आणि वैज्ञानिक या दोन शब्दांना त्यांनी विरोध केला. त्यांच्यामते आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीने शेती करणं आणि गोहत्या बंदी या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत.

त्यांचं म्हणणं पुढे जाऊन खरंच ठरलं. संविधानाने ही जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवल्याने प्रत्येक राज्याने आपल्याला पाहिजे तसा कायदा केला.

आसाम मधून निवडून आलेले सय्यद महंमद सलालुद्दीन यांनी तर्कसंगत प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, बंदी ही धार्मिक आहे की, अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे हे पहिल्यांदा स्पष्ट व्हायला हवं कारण काही सदस्यांनी गोहत्या बंदी घातल्यास शेतीचं अर्थकारण कसं सुधारू शकेल यावर चर्चा केली होती. सलालुद्दीन यांच्या मते, सर्व मुसलमान गोमांस खात नाहीत आणि सर्व मुसलमान गायही मारत नाहीत. हिंदू शेतकऱ्यांप्रमाणे मुसलमान शेतकरीही आहेत ज्यांच्यासाठी पशूधन महत्त्वाचं आहे. सलालुद्दीन यांचे हे तिनही मुद्दे गोहत्या बंदीची हवाच काढून घेतात. कारण ज्या मुद्द्यांसाठी गोहत्या बंदी मागितली जात होती ते सर्व मुद्दे कसे तकलादू आहेत हेच त्यांच्या भाषणातून स्पष्ट होतं. आजही याच मुद्द्यांवर चर्चा केली तर गायीच्या दैवतीकरणाचं राजकारण समोर येतं आणि त्यावर गोहत्या बंदी मागणारे निरुत्तर होतात.

संपूर्ण गोहत्या बंदीचा कायदा न झाल्याने हिंदुत्ववादी नेत्यांच्या कारवाया सुरूच राहिल्या. काही हिंदुत्ववादी नेत्यांनी मखलाशी करून जवाहरलाल नेहरू गोमांस खातात, असा प्रचार सुरू केला. नेहरू या प्रचाराला वैतागून गोहत्या बंदी लागू करतील, अशी त्यांची भ्रामक अपेक्षा होती. याच हिंदुत्ववाद्यांचं एक शिष्टमंडळ नेहरूंना भेटायलाही गेलं. तेव्हा नेहरूंनी विचारलं की, “मी गोमांस खातो असा प्रचार तुम्ही का सुरू केला आहे?” अर्थात या शिष्टमंडळाने त्याबाबत कानावर हात ठेवले आणि उलट नेहरूंनाच सल्ला दिला की, गोहत्या बंदी लागू केली तर त्यांच्या विरोधातलाहा प्रचार आपोआप गळून पडेल. त्यानंतर १९५५ मध्ये मांडण्यात आलेल्या गोहत्या बंदी विधेयकालाही नेहरूंनी कडाडून विरोध केला. आपल्या संसदेतल्या भाषणामध्ये ते म्हणाले की, “देशाचा पंतप्रधान म्हणून राजीनामा देण्याची माझी तयारी आहे मात्र विधेयक संमत होऊ देणार नाही. अर्थशास्त्र आणि शेती कळत नसलेल्या लोकांना माझा सल्ला आहे की त्यांनी असं कोणतंही पाऊल उचलू नये ज्यामुळे देशातील पशूधन नष्ट होईल.” देशाच्या पहिल्या पंतप्रधानाला गायीचं दैवतीवरण किती घातक आहे हे कळत होतं. पण भविष्यातील प्रत्येक पंतप्रधान हा संवेदनशीलच असेल, असा जर त्या काळातील देश घडविणाऱ्या विद्वानांचा होरा, असल्यास तो कसा चुकीचा होता, हे सध्या आपण अनुभवतच आहोत.

पण इतकं सगळं होऊनही त्या काळातील हिंदुत्ववादी काही शांत बसले नाहीत. गीता प्रेसचे मालक हनुमान प्रसाद पोद्दार यांच्या पुढाकाराने २५ सप्टेंबर १९६६ रोजी सर्वदलीय गोरक्षा महा अभियान समितीची स्थापना झाली. त्यामध्ये काँग्रेस, जनसंघ, आरएसएस, आर्य समाज, हिंदू महासभा आणि इतरही छोट्या राजकीय पक्षाचे पुढारी होते. त्यांनी पुन्हा गोहत्या बंदीचा कायदा व्हावा म्हणून जोरदार प्रचार सुरू केला. गीता प्रेसच्या कल्याण मासिकाने गोहत्या बंदीसाठी जोरदार मोहीम उघडली आणि अनेकांची मतं त्याबद्दल छापून आणली. हिंदी भाषिक प्रांतांमध्ये कल्याण मासिकाचा प्रभाव चांगला असल्याने वातावरण पेटत ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. मग ७ नोव्हेंबर १९६६ रोजी याच सर्व हिंदुत्त्ववादी नेत्यांनी एका विराट सभेचं आयोजन दिल्ली येथं केलं. त्यासाठी १.२५ ते सात लाख लोक जमल्याचं बोललं जातं. या प्रचंड जनसमुदायाला उद्देशून भाषण करण्यासाठी सरसंघचालक सरसंघचालक गोळवलकर, करपत्री महाराज, प्रभूदत्त ब्रह्मचारी, काँग्रेसचे सेठ गोविंद दास, जनसंघाचे अटलबिहारी वाजपेयी आणि गीता प्रेसचे पोद्दार उपस्थित होते. कार्यक्रम ठरल्याप्रमाणे सुरू होता. मात्र जनसंघाचे खासदार स्वामी रामेश्वरानंद यांनी उत्तेजक भाषणाला सुरुवात केली आणि जनसमुदायाला संसदेवर मोर्चा नेण्यासाठी प्रवृत्त केलं. लाखाेंनी उपस्थित लोक हे त्यानंतर भारतीय संसदेवर चालून निघाले आणि रस्त्यात दगडफेक, मारामाऱ्या सुरू झाल्या.

काँग्रेस अध्यक्ष के. कामराज यांच्या घरात घुसून त्यांच्या घरातील सरकारी कर्मचाऱ्यांना  मारहाण करण्यात आली आणि अहिंसेसाठी गोहत्या बंदीचा पुरस्कार करणारा हा मोर्चा मात्र हिंसक ठरला. त्यात आठ लोकांचा बळी गेला.

यामुळे चिडून पंतप्रधान इंदिरा गांधींनी गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांना काढून टाकलं तर ते पुढे दोन वर्षांनी या गोहत्या बंदी मागणाऱ्यांच्या कळपातच सामील झाले, असं अक्षय मुकुल यांच्या “गीता प्रेस अॅण्ड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया”मध्ये म्हटलं आहे. संसदेवर हल्ला म्हटलं की केवळ अफझल गुरूने केलेल्या हल्ल्याचा उदाहरण डोळ्यासमोर येतं. पण संसदेवर पहिला हल्ला हा कुणाच्या चिथावणीमुळे झाला होता, हे यातून लक्षात यायला हरकत नाही.

मात्र त्यासाठी कोणालाच साधी तुरुंगवासाचीही शिक्षा झाली नाही, फाशीतर सोडूनच द्या. त्या चिथावणी कार्यक्रमामध्ये वाजपेयीही उपस्थित होते हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे.

गोमांस बंदी आणि गोवंश हत्याबंदीसारखे निर्णय हे राजकीय असून गांधीविरोधी रामराज्याच्या संकल्पना बाळगणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचा एकछत्री अंमल बसवण्याचा प्रयत्न आहे. यातून रोजगार, उद्योगधंदे यांचे तर नुकसान होतच आहे. पण ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. आज मुंबईसारख्या शहरांतही रस्त्यावर सोडून दिलेल्या गायी मोठ्या प्रमाणात दिसतात. गोहत्या बंदीच्या पार्श्वभूमीवर देशभरात निघालेल्या गोशाळांमधील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे विविध प्रसारमाध्यमांमधून वारंवार समोर येत असतात. दुसरीकडे देशातल्या मुस्लिम आणि दलितांच्या विरोधात या गोहत्याबंदीचा वापर केला जात आहे. गाय हा उपयुक्त प्राणी आहेच, पण तिला धर्मबिंदू बनवून सरसकट गोवंशहत्या बंदी लागू केली जात असेल व समाजातील गरिब वर्गाचे अन्न ओरबाडून घेतलं जात असेल आणि त्याला जर कुणी वैचारिक विरोध करू लागला, तर त्यावरही तात्काळ हिंदूविरोधी व देशद्रोहाचे लेबल लावले जाते. अशा वातावरणात विवेकवादी जनतेने संघटित होण्याशिवाय पर्याय नाही.

 

संघ परिवार, भाजप किंवा हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या आक्रमक संघटना सांगतात तीच जर हिंदू संस्कृती मानायची असेल तर इतिहासातील या दाखल्यांचं काय करायचं हे तरी हिंदुत्ववाद्यांनी सांगायला हवे. गांधीजी गोहत्या बंदीचे पुरस्कर्ते होते, असं वारंवार सांगितलं जातं. मात्र अहिंसेचा पुरस्कार करणारे आणि स्वातंत्र्य चळवळीला वेगळं परिमाण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीही गोहत्येबाबत जास्त व्यावहारिक होते. ते म्हणतात, “भारतात गोहत्याबंदी लागू करण्यासाठी कोणताही कायदा बनू शकत नाही. हिंदूंना गोहत्या मान्य नाही, याबाबत दुमत नाही. मी स्वतःसुद्धा गायीची सेवा करण्याची शपथ घेतली आहे. पण माझा एकट्याचा धर्म हा भारतातल्या इतरांचा धर्म कसा असू शकतो. याचा अर्थ इतर भारतीयांवर हिंदू धर्माची जबरदस्ती केल्यासारखं होईल.” महत्मा गांधींचं नाव स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने का होईना सांप्रतचे देशाचे पंतप्रधान अनेकदा घेतात. ते गांधीजींच्याच भूमीतून आले आहेत. पण गांधीजींच्या विचारांवर चालणं त्यांच्या राजकीय पठडीला कदापी परवडणारं नाही हेच खरं!

 

स्रोतः

(१,२,३) The History of Vegetarianism and Cow veneration in India by Ludwig Alsdorf, page 5,11 and 38 -The Myth of Holy Cow by Prof D N Jha

– बळीवंश -आ. ह. साळुंखे

– B. R. Ambedkar, ‘Did the Hindus never eat beef?’ in “The

Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables?” in Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches, vol 7, (Government of Maharashtra, Bombay, 1990, first edition 1948) pp 323-328. Source:

countercurrents.org

-The Hindus : An Alternative History by Wendy Doniger.

-The Oxford Handbook of Food, Politics and Society edited by Ronald J. Herring

– Religious Nationalism – Hindus and Muslims in India by Peter van der Veer

– Feasts and Fasts: A History of Food in India by Colleen Taylor Sen

– Indian Food, A Historical Companion by K T Achaya.

– Negotiating the ‘Sacred Cow: Cow Slaughter and the Regulation of Difference In India by Shraddha Chigateri

– Cow, Pigs, Wars and Witches by Marvin Harris

– Constituent Assembly of India Debates, Vol III, Nov 24, 1948

http://beef.sabhlokcity.com/

लेखिका मुंबईस्थित राजकीय पत्रकार आहेत