सर्व पिढ्यांतील महापुरुष बहुतांशी मानवाच्या सुधारणेबद्दलच आग्रही होते. परंतु हे कसे व कशा पद्धतीने समजून घ्यावे हे प्रत्येक पिढीसाठी नेहमीच एक कठीण काम होऊन बसते. ध्येय जरी एकसारखे असले, तरी ध्येय साध्य करण्याची साधने वेगवेगळी असू शकतात. आणि दृष्टिकोनातील हा फरकही वाद निर्माण करू शकतो, वेगळी मते बनवू शकतो . महात्मा गांधी आणि भगतसिंग या आधुनिक भारतातील दोन महान व्यक्तींबाबतही नेमके हेच घडले. आणि त्यामुळेच भगतसिंग यांना महात्मा गांधींचे प्रतिस्पर्धी म्हणून स्थान देण्यात आले आहे. खरं तर गांधी आणि भगतसिंग हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे करण्यात नेहमीच कुजबूज मोहिमेचे शिल्पकार आणि त्यांचे स्वयंसेवक आघाडीवर राहिले आहेत.
डॉ. विवेक कोरडे यांच्या “भगतसिंग गांधी आणि सावरकरः अपप्रचारामागचे वास्तव” या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये इतिहासातील अनेक माहीत नसलेल्या किंवा अपप्रचाराला बळी पडलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.
गांधी हे खरे तर राष्ट्रवादाचे असे प्रेरक होते की, ज्यांच्याभोवती तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व ग्रह फिरत होते, तर भगतसिंग हे स्वत:च्या कक्षेभोवती फिरणारे एक तारा होते, असेही अनेकांना वाटते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी आपापल्या परीने मोठे योगदान दिले. पैकी सर्वांनाच जरी जनतेच्या हृदयात खोलवर प्रवेश करता आला नसला, तरी त्यांनी जनतेच्या मनात देशभक्तीची भावना आणि परकीयांना आपल्या मातीतून हाकलून देण्याचा निर्धार नक्कीच रुजवला. या भावनेमुळेच ब्रिटिश नोकरशहा अधिक धास्तावले होते.अशा स्थितीतही अनेक ब्रिटिश नोकरशहांनी क्रांतीकारकांच्या विचारसरणीला आणि पद्धतींना विरोध असतांनाही, मातृभूमीवरील त्यांच्या प्रेमाबद्दल आणि तुरुंगांमध्ये फाशीच्या शिक्षेला किंवा अत्यंत खडतर जीवनाला ज्या शौर्यपूर्ण पद्धतीने तोंड दिले, त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. क्रांतिकारकांच्या हिंसेच्या मार्गाचा निषेध करताना अहिंसेचे प्रेषित असलेल्या महात्मा गांधीनीही प्रसंगी त्यांच्या प्रखर देशभक्तीच्या भावनांचे आणि परकीय जोखडातून आपल्या देशाची सुटका करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याच्या तयारीचे निःसंकोचपणे कौतुक केले. फाशीला सामोरे जाणाऱ्या हुतात्म्यांमध्ये भगतसिंगांचे नाव अग्रक्रमाने नेहमीच आपल्या समोर झळकते. भगतसिंगही आपल्या लढ्यात सातत्याने “तुम्ही व्यक्तींना मारू शकता, पण त्यांच्या विचारांना नाही. मोठमोठी साम्राज्ये कोसळली, पण विचार टिकून राहिले.” ह्याचा पुनरुच्चार करत राहिले.भारत हा केवळ स्वतंत्रच नव्हे, तर कामगार आणि शेतकऱ्यांचा सार्वभौम, समाजवादी प्रजासत्ताक व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब फेकण्याच्या धाडसी कृत्यानंतर त्यांच्यासाठी अवघड काम नसलेल्या जागेवरून पळून जाण्याऐवजी ते खडकासारखे तेथे उभे राहिले, क्रांतिकारी घोषणा दिल्या, पत्रके टाकली आणि स्वेच्छेने अटक करवून घेतली. हा इतिहास सर्वश्रुत आहे. भगतसिंग व बटूकेश्वर दत्त यांनी दिल्ली विधानसभा बॉम्ब प्रकरणाच्या संपूर्ण कामकाजात ‘इन्किलाब जिंदाबाद’ हा जो नारा दिला, त्याचे पडसाद देशाच्या प्रत्येक भागात उमटले.यामुळे ते राष्ट्राला प्रिय झाले आणि भगतसिंग हे राष्ट्राचे प्रतीक बनले, त्यांना भारतातील तरुणांनी अनुकरणीय मानले.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यावर देण्यात आलेल्या मृत्यूच्या निकालाने देश अक्षरशः हादरून गेला होता. शिक्षा सुनावल्यानंतर पाच दिवसांनी अलाहाबाद येथे झालेल्या भाषणात जवाहरलाल नेहरू म्हणाले होते ”भगतसिंगांशी मी सहमत असो वा नसो, मात्र भगतसिंगांच्या धैर्याबद्दल आणि आत्मत्यागाबद्दल माझे मन कौतुकाने भरून आले होते. ह्या प्रकारचा माणूस अत्यंत दुर्मिळ आहे.”
भगतसिंगांनीही बहुतेक आरोपींच्या वतीने प्रिव्ही कौन्सिलकडे केलेल्या दयेच्या याचिकेशी स्वत:ला जोडून घेतले नाही. खरे तर मृत्युदंडाच्या शिक्षेचा आदेश (ऑक्टोबर ७, १९३०) आणि त्यांची फाशी (२३ मार्च, १९३१) या संपूर्ण कालखंडात त्यांनी दयेचे अपील सादर करण्याच्या या कल्पनेला नेहमी विरोधच केला.१७ फेब्रुवारी १९३१ रोजी गांधींनी व्हाइसरॉयशी या विषयावर चर्चा केली. गांधीजींच्या म्हणण्यानुसार, त्यांनी व्हाईसरॉयला सांगितले की, “सध्याचे वातावरण अधिक अनुकूल बनवायचे असेल तर भगतसिंग यांच्या फाशीला स्थगिती द्यावी.” व्हाईसरॉयने हे प्रकरण मांडल्याबद्दल गांधींबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आणि ते म्हणाले, “शिक्षेत बदल करणे ही एक कठीण गोष्ट होती, परंतु स्थगितीचा विचार केला जाऊ शकतो.” भगतसिंगांच्या शौर्याचे कौतुक करताना गांधी म्हणाले की, ‘त्यांच्या मते मार्ग काहीसा वेगळा असला तरी तो मनाच्या चौकटीत बसत नाहीत.’ त्यानंतर ते फाशीच्या शिक्षेबाबतही व्यक्त झाले व हे प्रकरण मानवतेच्या आधारावर ठरवत असतांना ते देशातील अनावश्यक गोंधळ टाळण्यासाठी शिक्षा स्थगित करण्यासाठी आग्रही राहिले.
मात्र दुसरीकडे शिक्षेबाबत जनतेच्या मनातील नाराजी सुभाषचंद्र बोस आणि काँग्रेसच्या इतर काही नेत्यांनी अधिक मनावर घेतली होती. काँग्रेसच्या काही तरुण उत्साही लोकांनी गांधीजींना विचारणा करणारी पत्रके वाटली, की देशभक्तांच्या डोक्यावर फाशीची शिक्षा लटकत असताना शांतता कशी स्थापित होऊ शकेल? त्यावर्षी ७ मार्च रोजी पन्नास हजारांहून अधिक जनसभेला संबोधित करताना गांधीजींनी निदर्शनास आणून दिले की, दोन दिवस आधी त्यांनी व्हाइसरॉयबरोबर तात्पुरत्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, ज्याला अद्याप कोणत्याही प्रकारे शांतता करार म्हणता येणार नाही.
१० मार्च रोजी झालेल्या भाषणात नेहरूंनी भगतसिंगांच्या सुटकेसाठी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना म्हटले होते की,भगतसिंगांच्या सुटकेची मागणी करताना काँग्रेसने जर आडमुठेपणा दाखवला असता, तर कदाचित या वेळेपर्यंत त्यांना फासावर लटकवले गेले असते. भगत अद्याप जिवंत आहेत, तर ते महात्मा गांधींच्या प्रयत्नांमुळेच होते आणि पुढे जर हिंसेत दोषी असलेल्या त्यांची व इतर कैद्यांची सुटका झाली, तर तेही महात्मा गांधींच्या प्रयत्नांमुळेच होईल.
मात्र सातत्याने “भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यात गांधी अपयशी ठरले का?” हा एक प्रश्न इतिहासकार आणि स्वातंत्र्य चळवळीच्या अभ्यासकांनी वारंवार विचारला आहे. गांधींनी प्रामाणिकपणे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असेही काही विशिष्ट भागात मानले जाते. आणि नेमक्या ह्याच अपप्रचारचे वास्तव तटस्थपणे समोर आणण्याचे काम डॉ. विवेक कोरडे आपल्यासमोर एक एक वास्तव उलगडत करतात. उद्देश हाच की तत्कालीन वस्तुस्थिती पुढ्यात ठेवणे आणि विद्वान वाचकांना त्यांचे मूल्यमापन स्वत:च करू देणे हा आहे.
खरे तर गांधी-आयर्विन करारामुळे गांधीजींची उंची वाढली होती. ब्रिटिश सरकारच्या एजंट्सनी शांततेच्या अटींच्या तडजोडीसाठी काँग्रेसशी समान पातळीवर वाटाघाटी करण्याची तयारी पहिल्यांदाच केली. परंतु भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या फाशीमुळे गांधीजींच्या प्रतिष्ठेला तडा गेला, कारण व्हाइसरॉयवर त्यांचा इतका प्रभाव होता की, तरुण क्रांतिकारकांचे प्राण वाचवण्यासाठी ते व्हाइसरॉयचे मन वळवू शकतील, असे मानले जात होते. आणि हीच परिस्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्यांना पोषक होती. संघाच्या स्थापनेच्या आधीपासूनच तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी कॉंग्रेसपक्ष व नेत्यांना बदनाम करायची मोहीम उघडलीच होती. टिळकांनंतर गांधीसारख्या अब्राह्मण व बनिया व्यक्तीकडे समस्त भारताचे नेतृत्व आले होते, सर्वसामान्य घटक गांधीबाबाच्या हाकेत मिसळून गेला होता व बघता बघता गांधी म्हणजे देश अशी स्थिती घट्ट झाली. साहजिकच जातीयवादी, धर्मवादी संघटनांची यामुळे पुरती गोची झाली. वास्तविक इतर जातीयवादी संघटनांप्रमाणेच रा.स्व.संघ नेहमीच स्वातंत्र्य आंदोलनापासून अलिप्त होता हे आता जगजाहीर झाले आहे.मात्र संघाचे बलस्थान असलेले विद्वेषी प्रचाराचे अस्त्र व बदनामी मोहीम सातत्याने कार्यरत आहे, ज्यातून गांधी व भगतसिंगही सुटले नाहीत. आत्यंतिक सूक्ष्म पातळीवर व यथाशक्ती, कधी उघड तर कधी बुद्धीभ्रम करुन गांधीजींना बदनाम कसे केले जाते याचा शालेय जीवनात आलेला अनुभव डॉ.कोरडे मनोगतातच व्यक्त करतात तेव्हा ह्यातील गांभीर्य अधिकच स्पष्ट जाणवते.
खरे तर युवा पिढीतील चिकित्सा आज विविध मार्गांनी धोक्यात आणली जात आहे. नव्या पिढीसमोर स्वातंत्र्य आंदोलनाबाबत आजकाल फारशी रुची उरली नाही असेही लेखक आपल्या मनोगतात व्यक्त होतात. व्हाटसअॅप युनिव्हर्सिटीच्या जगात विविध अपप्रचाराच्या धुरळ्यात आजची पिढी सत्य पाहू शकत नाही, स्वातंत्र्य आंदोलनात निर्मिली गेलेली आधुनिक मूल्ये, त्यांची व्यापक गरज याचे भान आजच्या पिढीला येणे गरजेचे आहे असा लेखकाचा आग्रह आहे. आणि म्हणूनच ‘भगत सिंग, गांधी आणि सावरकर- अपप्रचारामागचे वास्तव’ हे पुस्तक आजवरच्या हिंदुत्ववादी, सनातनी वा तसल्याच समविचारी शक्तींनी पेरलेल्या विखारावर ठोस उत्तर आहे असे माझ्यासारख्या वाचकांना वाटते.
एका बाजूला गांधीजींनी स्त्रिया, दिनदलित, रंजल्या-गांजल्यांना स्वातंत्र्य आंदोलनात दिलेला अग्रक्रम तर दुसरीकडे भगतसिंगासारख्या उमद्या तरुणने आपलासा केलेला डावा विचार व त्यातूनच व्यक्त केलेला विचारी, समजूतदार नास्तिकपणा तथाकथित हिंदुत्ववादी, जातीयवादी घटकांना खटकणे स्वाभाविक होते. त्यातूनच मग अनादीकालापासूनच भारतवर्षात उच्चवर्णवाद प्रस्थापित करु पाहणाऱ्या , नित्यनेमाने येनकेन प्रकारे विद्वेष पेरत राहिलेल्यांना शांत बसणे साजेसे नव्हते. गांधी-भगतसिंग ह्यांना अभिप्रेत असलेल्या धर्मनिरपेक्षतेवर हाच उच्चवर्णीय वर्ग विरोध करत राहिला. ह्याच विरोधातून गांधीहत्येची बीजे रोवली गेली, ह्याच विरोधातून गांधी-भगतसिंग हे प्रतिस्पर्धी म्हणून उभे केले, ह्याच विरोधातून विनायक सावरकरांसारख्या प्रतिभेची देणगी लाभलेल्यांना, कवी वा साहित्यिक बनू शकले असणाऱ्यांना कालांतराने तेज:पुंज क्रांतिवीर म्हणून समोर आणले गेले. वास्तविक सावरकरांचे सोयीचे हिंदुत्व हे खरेतर ब्रिटिशांशी न लढण्यासाठीच शोधून काढलेले नी पुढे जाऊन हिंदू-मुसलमान दुही माजवणारे हत्यार कसे होते ह्यावर अधिक स्पष्ट आणि तितकेच परिपूर्ण भाष्य डॉ.विवेक कोरडे पुस्तकातील ‘शहीद भगतसिंग व वि.दा.सावरकर’ ह्या प्रकरणात करतात. भगतसिंग हे पूर्ण विचारांअंती नि त्याहीपेक्षा पूर्ण चिकित्सेअंती क्रांतिकार्याकडे ओढले गेले होते. नास्तिकवाद, हिंसा, अहिंसा, साम्राज्यवाद, कामगारशक्ती ह्या सर्व संकल्पना ते चिकित्सा म्हणून कसे पाहत होते हे लेखकाने सप्रमाण समोर आणले आहे. त्यामानाने इतिहासातील सावरकरांचा हिंदुत्ववाद, अखंड भारताची कल्पना मात्र सदैव एकांगी वाटत राहतात. ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ ह्या आपल्या पुस्तकात सावरकर त्यावेळी बरेलीला छापून प्रसिद्ध केलेला अयोध्येच्या नवाबाचा जाहीरनामा प्रकट करतांना या देशातील समस्त हिंदू, शिख, मुसलमान ह्यांना हिंदी बांधव म्हणून एके काळी संबोधतात, तर अंदमान जेलमध्ये गेल्यावर मात्र आपली हीच हिंदू-मुस्लीम ऐक्याची भूमिका यु-टर्न घेतल्याप्रमाणे बदलतात. इतकेच कशाला जेव्हा भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी असेंब्लीत बॉम्बहल्ला केल्यावर स्वत:ला अटक करुन घेऊन त्यावर उभ्या रहात असलेल्या खटल्याच्या माध्यमातून आपल्या विचारांचा प्रसार करुन आपल्या बलिदानाने साम्राज्यवादी इंग्रजांविरुद्ध जनभावना जागृत कराव्यात असा विचार केला, प्रसंगी दयेचा अर्जही सातत्याने नाकारला, तेव्हा त्याचाच विरोधाभास वाटावा अशी भूमिका सावरकरांकडून घेतली गेली हे विसरुन कसे चालेल? २७ डिसेंबर १९२३ रोजी स्वत:च्या सहीनिशी तात्याराव सावरकर आपल्या निवेदनात स्पष्ट मान्य करतात की त्यांचेवर दाखल केलेला खटला योग्य असून शिक्षाही न्याय्य अशीच होती. क्रांतिकारक म्हणून अवलंबिलेल्या माझ्या हिंसक मार्गांचा मी निषेध करतो. ब्रिटिश कायदा व राज्यघटना मानणे माझे कर्तव्य असून भविष्यात मला सरकारने सुधारायची संधी म्हणून नाशिकला राहू द्यावे. ह्याला सुजाण वाचक एकतर सावरकरांची बिनशर्त माफी म्हणतील वा ब्रिटिशांना घातलेला दंडवत…मात्र सावरकरप्रेमी, संघप्रेमी नेहमीप्रमाणे ह्याला सावरकरांची मुत्सद्देगिरी असे गोंडस नाव देऊन मोकळे होतील.१९४२ च्या चले जाव आंदोलनात सारा भारत सक्रिय असतांना मुस्लीम लीग, हिंदू महासभा नि काही डाव्यांचा अपवाद वगळता सावरकरांची हिंदू महासभा मात्र जीनांच्या मुस्लीम लीगसोबत ब्रिटिशधार्जिणे सरकार बनवण्यात व्यस्त होती हा इतिहास नव्या पिढीला समजणे गरजेचे आहे.
केवळ ‘हिंदुत्व’ ह्या संकुचित पायावर उभ्या असलेल्या एकधर्मी राष्ट्रवादाला एका भक्कम पर्यायी आधाराची गरज होती, जी सावरकरांच्या हिंदुत्ववादाने भरली. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमुळे कनिष्ठ वर्ग, अस्पृश्य, शोषित, धर्मांतरीत हे सर्व घटक एका क्षणात सावरकरांच्या हिंदूराष्ट्रापासून दूर फेकले गेले. सावरकरांच्या व्याख्येमुळे या देशाच्या भूमिपुत्रांनाच उपरे ठरवण्याचे काम केले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापनेपासूनच स्वत:ला केवळ सांस्कृतिक संघटन घोषित करुन लोणकढी थाप मारली होती.पण हा बुरखा सोयीच्या व विद्वेषी राजकारणाचाच भाग कसा होता हे इतिहासाने नि आताच्या वर्तमानानेही जागोजागी उघडे केले आहे. हेडगेवार ते आताचे भागवत ह्यांच्या नेतृत्वाच्या कार्यपध्दतीत आजही तसूभर फरक दिसणार नाही.धर्मवाद व जातीयवाद अंगी बाणवलेले मनुष्यबळ सातत्याने निर्माण करणे हे एकमात्र ध्येय्य संघाचे आहे.
आणि त्यामुळेच स्वातंत्र्य आंदोलन, गांधीवाद, गांधीवादाची व्याप्ती, भगतसिंगांची डोळस चिकित्सा, गांधी-भगतसिंग परस्पर संबंध, सावरकरांचे फुकाचे उदात्तीकरण, संघाची बुद्धिभ्रम करणारी कार्यपद्धती ह्या बाबी नव्या पिढीला नव्याने समजून उमजून घेऊन सत्य पचनी पाडून घ्यायचे असेल तर डॉ.विवेक कोरडेलिखित हे पुस्तक एक प्रकाशझोत म्हणून वाचलेच पाहिजे. बुद्धीवर चढलेली भ्रामकतेची जळमटे त्यानिमित्ताने साफ झाली तरी पुष्कळ!
1 Comment
स्वतंत्र पूर्व काळापासून सनातन्यांनी आरंभलेले वर्ण व्यवस्था उच्णीच्टा हिंदुराष्ट्र संकल्पना मोदींच्या रूपाने या देशावर आणू पाहताहेत हीच तर सविधन लोकशाही ची शोकांतिका