fbpx
राजकारण

हिंदूराष्ट्र विरुध्द तमिळनाडू – भाग २

भाग १  |  भाग २  |  भाग ३

राजकारणाची जोडतोड

१९९९ मध्ये जयललितांनी पाठिंबा काढून घेतल्यानं वाजपेयी सरकार पडलं. त्यामुळे पुन्हा जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा भाजप द्रमुकसोबत गेला. तमिळनाडूतून त्यांचे एकदम चार खासदार निवडून आले. जयललितांच्या जागा कमी झाल्या. केंद्रात भाजपची सत्ता आली. हिंदुत्वाचा जोर वाढतो आहे असा त्याचा अर्थ मुख्यमंत्री जयललितांनी लावला.

त्यातून मग त्यांनी एका पाठोपाठ दोन कायदे केले. हे भाजपचे आवडते मुद्दे होते. धर्मांतराला बंदी आणि प्राणीहत्या व गोहत्या बंदी. यातील सक्तीच्या धर्मांतर-बंदीबाबत मीनाक्षीपुरमपासून चर्चा चालू होती. एमजी रामचंद्रन मुख्यमंत्री असताना त्यांनी याबाबत एक आयोग नेमला होता. त्यानं १९८६ मध्ये अशा बंदीची शिफारस केली होती. पण तोवर एमजीआर आजारी पडले होते. त्यामुळे अशा बंदीचा विषय मागे पडला.

शेवटी जयललितांनी २००२ मध्ये कायदा केला. वर्षभरापूर्वी गुजरातमध्ये दंगली झाल्या होत्या. २००४ च्या निवडणुकीत भाजप जिंकेल असं अनुमान होतं. अण्णा द्रमुकला त्याच्यासोबत जायचं होतं. धर्मांतर-बंदीचा कायदा झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी हिंदू संघटनांनी चेन्नईच्या चौपाटीवर एक सभा घेतली. तिला शंकराचार्य जयेंद्र सरस्वती हजर राहिले. बंदीचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

त्याच दरम्यान देवळातील पशुहत्येला बंदी करण्यात आली. त्यावरून मोठा गदारोळ झाला. रजिस्ट्रार ऑफ इंडियाच्या २०१७ च्या सर्वेक्षणानुसार तमिळनाडूतील ९७ टक्के लोक मांसाहारी आहेत. (म्हणजे अय्यर, अय्यंगार हे ब्राम्हण वगळले तर बहुदा सर्वच) उत्सवांच्या दरम्यान होणाऱ्या पशुहत्या ही तिथली आम बाब आहे. या स्थितीत ही बंदी म्हणजे वेगळ्या प्रकारच्या अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण होतं. थेवर यांच्यासारख्या जाती जयललितांच्या कट्टर समर्थक होत्या. जयललिता यांची मैत्रीण शशिकला ही थेवर समाजातील आहे. त्यामुळे अखिल भारतीय अण्णा द्रमुककडून थेवरांना काहीसं झुकतं माप दिलं जात असे. पण हेच थेवर या बंदीच्या विरोधात आंदोलन करू लागले. संभाव्य धोका लक्षात घेऊन जयललितांनी शेवटी निर्णय मागे घेतला.

अण्णा द्रमुक कायमच संघ परिवाराचा नैसर्गिक मित्र राहिला आहे. करुणानिधी जसे पेरियारांच्या चळवळीत मोठे झाले तसं एमजीआर यांचं नव्हतं. एमजीआर मूळचे मल्याळी होते. त्यांच्या कुटुंबावर गांधीजींचा प्रभाव होता. सुरुवातीला ते काँग्रेसवाले होते. नंतर ते द्रमुकमध्ये गेले.

एमजी रामचंद्रन हे करुणानिधी यांच्यासमवेत द्रवीड मुन्नेत्र कळघममध्ये होते. (या दोघांची मैत्री व नंतरचं वितुष्ट यावर आधारलेला मणीरत्नमचा इरुवर हा चित्रपट बराच गाजला.) पण नंतर सत्तास्पर्धेमधून एमजीआर वेगळे झाले. त्यांच्या सिनेमातील लोकप्रियतेचा फायदा पक्षाला झाला. पुढे याचाय फायदा घेऊन त्यांनी स्वतःचा पक्ष काढला व ते दहा वर्षं सत्तेत राहिले.

केंद्रातील सत्तेशी व पक्षाशी मैत्रीचे संबंध ठेवणे हे एमजीआरचं धोरण होतं. त्यावेळी काँग्रेस प्रबळ होती म्हणून काँग्रेससोबत ते गेले. बाकी त्यांचा विचारसरणी वगैरेशी फार संबंध नव्हता. मीनाक्षीपुरम धर्मांतराच्या आगेमागेच कन्याकुमारीमध्ये पेरियारांचा पुतळा उभारण्याचा एक प्रस्ताव होता. पण त्यांनी तो होऊ दिला नव्हता. नंतरही धर्मांतरविरोधी कायदा करण्याच्या दिशेनं ते चालले होतेच. पण त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं.

एमजीआर यांच्यानंतर पक्षाची सूत्रं जयललिता यांच्याकडे आली. जयललिता या अय्यंगार ब्राम्हण. इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालं तर ब्राह्मण ते हडप करतील अशी पेरियार यांच्या पक्षाची जुनी भूमिका होती. त्या दबावामुळे तमिळनाडूमध्ये राजाजीनंतर महत्वाच्या पदांवर तर सोडाच पण राजकारणातूनही ब्राह्मण जवळपास हद्दपार झाले होते.

अशा राज्यात जयललिता थेट मुख्यमंत्री झाल्या आणि प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्या. जयललिता यांचाही तर एमजीआरइतकाही द्रवीड चळवळीशी संबंध नव्हता. मूळच्या त्या सिनेमा अभिनेत्री. एमजीआर यांच्याशी असलेल्या जवळिकीमधून त्यांना पक्षात आपोआप वरचं स्थान मिळालं. त्यातून त्यांनी पक्षावर पकड मिळवली.
एमजीआर यांच्या काळापासून अण्णा द्रमुक हा एकखुंट्याचा पक्ष होता. जयललिता तर त्यांच्याहूनही उच्चभ्रू किंवा एलिट होत्या. त्या त्याच मार्गानं पुढं जाणार हे उघड होतं. त्यातून जयललिता यांच्या व्यक्तिमत्वाचा एक कल्ट किंवा भक्तिपंथ तयार झाला. अम्मा अम्मा म्हणून त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या पायी जाहीरपणे अक्षरशः लोटांगण घालत. पुढे त्या तुरुंगात गेल्या तेव्हा भरतानं रामाच्या पादुका गादीवर ठेवल्या तशी त्यांच्या फोटोच्या साक्षीनं पनीरसेल्वन यांनी कारभार केला.

जयललिता या कॉन्वेंटमध्ये शिकलेल्या होत्या. प्रचंड देवभक्त वगैरे होत्या. धार्मिक श्रध्देचं प्रदर्शन करणाऱ्या होत्या. कपाळाला अय्यंगाराच्या पध्दतीनं भस्म लावलेला त्यांचा फोटो प्रसिध्द आहे. पण दुसरीकडे संपत्ती व सत्तेचा हव्यासही सुटला नव्हता.

धर्मांतरबंदी, गोहत्याबंदी याबाबत त्या संघाच्या बाजूला होत्या. देशात समान नागरी कायदा व्हायलाच हवा हे त्यांचं स्पष्ट मत होतं. त्यातील बारकावे समजून घेण्याची गरज त्यांना वाटत नव्हती. त्या कमालीच्या अंधश्रध्द होत्या. संकटं आली (जी की त्यांच्यावर नेहमी येत) की त्या तिरुपतीजवळ जाऊन राहू-केतू पूजा किंवा सर्पदोष यज्ञ करीत.

पेरियार, द्रवीड राजकारणाची परंपरा इत्यादीमध्ये कुठेही बसणारं असं हे वर्तन नव्हतं. पण त्यांच्याकडे सिनेमाच्या कामातून कमावलेली लोकप्रियता होती. लोकांची जयललितांवर प्रचंड भक्ती होती. त्यांच्या पक्षाच्या नावातील द्रवीड शब्दामुळे ते त्याच चळवळीतले आहेत असा बाहेरच्यांचा समज होतो. अजूनही आहे. प्रत्यक्षात ते सनातनी हिंदू धर्माला धार्जिणे असेच लोक होते व आहेत.

जयललिता या कॉन्वेंटमध्ये शिकलेल्या होत्या. प्रचंड देवभक्त वगैरे होत्या. धार्मिक श्रध्देचं प्रदर्शन करणाऱ्या होत्या.
जयललिता या कॉन्वेंटमध्ये शिकलेल्या होत्या. प्रचंड देवभक्त वगैरे होत्या. धार्मिक श्रध्देचं प्रदर्शन करणाऱ्या होत्या.

आतून कीर्तन वरून तमाशा

संघ आणि भाजपला तमिळनाडूमध्ये घुसण्यासाठी अचूक हवा तसा हा कच्चा दुवा होता. त्याचा लाभ त्यांनी उठवला.

जयललिता आणि भाजप नेत्यांचे संबंध कायम मैत्रीचे राहिले. (द्रमुक १९९९ मध्ये भाजपसोबत जाऊनही करुणानिधींचे असे संबंध तयार होऊ शकले नाहीत. करुणानिधी हे पेरियार यांचे पहिल्या फळीतले चेले होते हे त्याचं कारण असावं.)

१९९९ मध्ये जयललितांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे वाजपेयींचं तेरा महिन्यांचं सरकार कोसळलं. तरीही पाच वर्षांनंतर, २००४ मध्ये लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं पुन्हा जयललितांशी युती केली. अशी युती करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबाव होता असं म्हटलं जातं.

मधल्या पाच वर्षांच्या खंडानंतर २०११ ला जयललिता पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. त्यावेळी तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जयललितांच्या शपथविधीला मुद्दाम हजर राहिले. पुढे २०१५ नंतर जयललितांची तुरुंगातून सुटका झाल्यावर मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. खरं तर मोदींच्या अखत्यारीतील सीबीआयनंच त्यांच्याविरुध्द खटले लढवले होते.

जयललितांनी भाजपला भरपूर त्रास दिला. १९९८-९९ मधील वाजपेयींच्या सरकारला त्यांनी क्षणोक्षणी ओलिस धरलं. त्यावेळचं राज्यातलं करुणानिधींचं सरकार बरखास्त करावं म्हणून दबाव टाकला. आपल्याविरुध्दचे भ्रष्टाचाराची चौकशी रद्द व्हावी म्हणून जंग जंग पछाडलं. शेवटी याच मुद्दयांवरून पाठिंबा काढून घेतला.

पुढे २०११ ला मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी संघाच्या स्थापना-दिनाच्या मिरवणुकांना सातत्यानं परवानगी नाकारली. इतकंच काय, यासंबंधी बोलण्यासाठी संघाच्या नेत्यांनी जेव्हा भेट मागितली तर तीही नाकारली.

२०१७ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक कोईमतूरमध्ये झाली. संघाच्या ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी बैठक इथं घेण्यात आली. मात्र त्यावेळी जयललिता वारल्या होत्या. परिणामी, जयललितांनंतरच्या तमिळनाडूमध्ये (आणि अण्णा द्रमुकमध्ये) शिरकाव करण्याची संधी म्हणून तिच्याकडे पाहिलं गेलं. अमित शहांपासून झाडून सारे नेते या बैठकीच्या निमित्तानं येऊन गेले.

जयललिता तऱ्हेवाईक, हेकेखोर व हुकुमशाही प्रवृत्तीच्या होत्याच. त्यांना संघाच्या हिंदुत्वाबद्दल सहानुभूती होती. पण त्यांच्या पाठिंबादात्यांमध्ये उत्तर भारतीय, हिंदी, हिंदूंविरोधात एक पूर्वग्रह कायम होता व अजूनही आहे. त्यांना चुचकारणं हे आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी जयललितांना आवश्यक होतं.

भाजप आणि संघाला फटके मारण्यात स्पष्टपणे हे राजकारण होतं. उत्तर भारतीय आणि हिंदीवाल्यांच्या दबावाला त्या बळी पडल्या अशी चर्चा होणं गैरसोयीचं होतं. त्यांना दृश्य रीतीनं संघापासून भरपूर अंतर ठेवून राहणं आवश्यक होतं.

पण खरं तर ते आणि त्यांचे पक्षवाले हे भाजपच्या विचारसरणीला धार्जिणे होते. भावी काळात जयललितांचे हे पक्षवालेच भाजपला बळ देणार आहेत.
संघ व भाजपच्या नेत्यांनी ही बाब ओळखली होती. त्यामुळेच अनेक अपमान सोसूनही ते लोचटपणे जयललितांच्या दारात उभे राहायला तयार होते. नरेंद्र मोदी हे तर दीर्घद्वेषी असल्याची टीका होते. तरीही ते जयललितांबाबत मात्र मवाळ धोरण घेत.

इथून पुढे भाजपचं यश कमीजास्त होईल. पण पाया नक्की तयार झालाय. आजवरची हिंदुत्ववाद्यांची पोखरा-पोखरी आणि नंतर अण्णा द्रमुकनं मिळवून दिलेली अधिमान्यता कामी आलीय.

कोईमतूर २०१७ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक. देशभरातले १४०० प्रतिनिधी उपस्थित.
कोईमतूर २०१७ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक. देशभरातले १४०० प्रतिनिधी उपस्थित.

पेरियारांची पाचर

विविध जातींच्या गाठोड्याचं तोंड बांधून काँग्रेसनं बराच काळ खाकोटीस लावून ठेवलं होतं. पण स्ट्रायकरनं सोंगट्या फोडाव्यात तसा मंडल आयोग आला. गाठोडं उसवलं. देशभरात काँग्रेसची खाकोटी हलकी झाली. भाजप घुसला. त्यानं तोवर सत्तेत न आलेल्यांचं एकेक नवं गाठोडं बांधलं. महाराष्ट्रात माधव, गुजरातेत पाटीदार, बनिया. उत्तर प्रदेशात यादवेतर. इत्यादी.

पारंपरिक वर्चस्व असलेल्या जाती व समाज यांना अजिबात डावलून इतरांच्या आधारे सत्तेत येण्याचं भाजपचं हे तंत्र कालच्या उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांपर्यंत यशस्वी ठरलेलं दिसतं.

तमिळनाडूत मात्र पेरियार आडवे आले. त्यांनी हे आधीच करून ठेवलं होतं. पूर्वी अय्यर आणि अय्यंगार ब्राह्मण समाजाचे मालक होते. शतकभरापूर्वी जस्टिस पार्टी आणि पेरियारांची स्वाभिमान चळवळ यांनी ही मालकी काढून घेतली.

गौंडर, थेवर, नाडार, वन्नियार अशा मध्यम, पण मागास असलेल्या जातींना उठाव मिळाला. शिक्षण, नोकऱ्या या क्षेत्रात या जातींना वाव मिळाला. आरक्षण हा आपला हक्क आहे अशी जाणीव रुजली. तमिळनाडूमध्ये आरक्षण ६९ टक्क्यांपर्यंत जाण्याचं कारण तेच आहे.

ब्राह्मण समाजाच्या वर्चस्वाला विरोध हा मुद्दा या सर्व जातींना एक करण्यास उपयोगी ठरला व बराच काळ पुरला. त्यातून विविध जातींमध्ये आपापले नेते तयार झाले. हे नेते तेव्हाच्या मद्रास प्रांतात ठिकठिकाणी सत्तेत आले.

ब्राह्मणांना बाजूला ठेवण्याचं स्पिरिट इतकं जोरदार होतं की, बराच काळ जस्टिस पार्टीत ब्राह्मणांना प्रवेशही दिला जात नसे. १९३० मध्ये काही नेत्यांनी असा प्रवेश दिला जावा अशी सूचना मांडली. ती पराभूत झाली. पण त्यावरून पार्टीमध्ये तट पडले.

आधी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र आणि तमिळनाडूतील ब्राह्मणेतर चळवळींचा प्रवास समांतर झाला. पण महाराष्ट्रात मराठा बऱ्याच भागात प्रबळ होता. इथल्या चळवळीचं नेतृत्व त्यांनी केलं. परिणामी, स्वातंत्र्यानंतरच्या सत्तापालटात ब्राह्मणांकडची सत्ता मराठ्यांकडे आली.

तमिळनाडूमध्ये सर्व भागात एकच एक अशी बलिष्ठ जात नाही. गौंडर हे पश्चिमेकडे, नाडार हे दक्षिणेतील तीन जिल्ह्यांमध्ये, थेवर हे मध्य भागात प्रबळ आहेत. शिवाय गौंडर इत्यादी ही जी नावं सांगितली जातात ती जाती-समूहांची नावं आहेत. आणि, अनेकदा त्या समूहांतर्गत टोकाचे भेद आढळतात.

उदाहरणार्थ, नाडार हे आपल्याकडच्या भंडारींचे समकक्ष. ताडीमाडीवाले. जिथे माड तिथे भंडारी अशी जुनी म्हण आहे. तीच नाडरांनाही लागू होती. नाडार हेही भद्रकालीचे भक्त असून नाडारांच्या वस्तीत भद्रकालीचं देऊळ हे अनिवार्य असतं. पण नाडारांमध्ये कमालीचा वर्गभेद होता. यांच्यातले बहुसंख्य ताडीमाडीवाले व त्यामुळे गरीब होते. (गंमत म्हणजे हे दारू गाळत व विकत, पण स्वतः पीत नसत असा एक उल्लेख आढळतो.)

याउलट, उत्तरेकडेच्या नाडारांकडे, जे नाडन नावाने ओळखले जात, बऱ्याच जमिनी होत्या. ते नायक राजांचे उजवे हात मानले जात व आपापल्या भागाचे छोटे राजेच होते. त्यामुळे जातिव्यवस्थेत त्यांच्याहून उंचावर असले तरी कुणबी आणि ब्राह्मणसुध्दा त्यांना वचकून असत.

विसाव्या शतकात नाडार महाजन संघम नावाच्या संघटनेमुळे सर्व प्रकारच्या नाडारांमध्ये बरीच एकी झाली. आधी ते पेरियारांच्या चळवळीत होते. पण नंतर काँग्रेससोबत गेले. कामराज हे यांचे सर्वात मोठे नेते. ते १९५३ पासून जवळपास पंधरा वर्षं मुख्यमंत्री होते.

आता नाडार सर्व पक्षात विखुरले आहेत. त्यांच्यातल्या गरीब गटांनी मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. धर्मांतरांच्या प्रकारामुळे हिंदू नाडारांमध्ये एक तिरस्कारही तयार झाला. तो हिंदू संघटना व भाजपला आला व येतो आहे.

कूळ इंद्राचं, शिक्का गुन्हेगाराचा

थेवरांची कथाही अशीच आहे. थेवर किंवा मुकुलाथोर याचा अर्थ दैवी लोक असा होतो. इंद्राच्या तीन बायकांपासून कल्लार, मारावार आणि आगमुदयार या तीन थेवर जातींची निर्मिती झाली असा त्यांचा दावा आहे. अठराव्या- एकोणिसाव्या शतकात हे गावच्या पिकांचे रखवालदार म्हणून काम करत.

हळूहळू हे स्वतःच जमीनदार झाले. पुढे यांनी ब्रिटिशांविरुध्द बंडे केली. त्यामुळे कल्लार आणि मारावार या जातींना गुन्हेगारी जाती ठरवण्यात आलं. या जातीच्या लोकांना राजकारणात भाग घेण्यास किंवा भाषणे करण्यासही बंदी होती. स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९४९मध्ये हा कायदा अखेर रद्द झाला.

या समाजाचे नेते मुथुरामलिंगम थेवर. त्यांनी गुन्हेगारी जमाती कायदा रद्द व्हावा यासाठी आंदोलनं केली. पण जस्टिस पार्टीचा यांना पाठिंबा मिळाला नाही. पेरियार यांच्याशीही त्यांचे काही जुळू शकले नाही. ते काँग्रेसमध्ये गेले. पण तिथं गांधीजींच्या विचारांना त्यांचा विरोध होता.

तसेही मुथुरामलिंगम पूर्वीपासून सुभाषचंद्र बोसांचे कट्टर समर्थक होते. १९३९ मध्ये त्रिपुरी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुभाषचंद्र बोस निवडून आले. पण गांधीजींचा पाठिंबा पट्टाभि सीतारामय्या यांना होता. बोस यांनी राजीनामा दिला. त्यावेळी मुथुरामलिंगम हे बोस यांच्या बाजूने उभे राहिले होते. मुथुरामलिंगम यांच्यानंतर थेवर समाज काँग्रेस विरोधक असलेल्या एमजीआर यांच्या पक्षाकडे गेला.

गौंडर हा पश्चिम तामिळनाडूतला बलवान जातसमूह आहे. पेशा मुख्यतः शेती, पशुपालन किंवा छोटा व्यापार. इंग्रजी शिक्षण घेण्यात हे अग्रेसर राहिला. यातील बऱ्याच जातींमध्ये धार्मिक विधी करण्यासाठी ब्राह्मण लागत नाही. जस्टिस पार्टीचे अनेक मोठे नेते या समाजातून आले होते. हा ब्राह्मणेतरांचा पक्ष असला तरी त्यात जमीनदारांचा गट आणि प्रागतिक असे दोन तट होते.

कावेरीच्या पट्ट्यातील नऊ जिल्हे हे कोंगूनाडू म्हणून ओळखले जातात. गौंडरांचा या भागात वरचष्मा आहे. जमिनीची मालकी मोठी. त्यातून हे मोठे शेतकरी झाले व सावकारी तसंच व्यापारात उतरले. पुढं त्यातूनच या भांडवल संचय झाला आणि अनेकांनी विविध उद्योग सुरू केले.

कोईमतूर आणि तिरुपूरचा सुताचा व्यापार तसंच कापड आणि होजियरीचे कारखाने यामध्ये बहुसंख्येनं गौंडरांची मालकी आहे. बराच काळ हा समाज आरक्षणाबाहेर होता. पण करुणानिधी मुख्यमंत्री झाल्यावर त्याचा समावेश मागास जातींच्या यादीत करण्यात आला.

या समाजाची एकूण प्रवृत्ती व्यापारी, वाणी किंवा सावकारी प्रकारची असल्याने कोणत्याच एका राजकीय विचारसरणीच्या मागे तो गेला नाही. त्यामुळे त्याचा असा बलिष्ठ गट तयार झाला नाही.

जयललिथा आणि सोनिया गांधी
जयललिथा आणि सोनिया गांधी

सर्वच पक्ष आपले

पी. सुब्बारायन यांचं उदाहरण देता येईल. हे कुमारमंगलम या ठिकाणचे जमीनदार. १९२६ ते ३० या काळात ते मद्रास राज्याचे मुख्यमंत्री होते. पुढे ते काँग्रेसमध्ये गेले व नेहरुंच्या सरकारात मंत्री झाले. यांचा मुलगा मोहन कुमारमंगलम हा इंदिरा गांधींच्या लाडक्या तरुण नेत्यांपैकी एक. ते मंत्रीही होते.

मोहन यांची बहिण पार्वती कृष्णन. त्या कोईमतूरमधून तीन वेळा कम्युनिस्ट पक्षाच्या खासदार होत्या. मोहन यांचे पुत्र रंगराजन कुमारमंगलम हे आधी काँग्रेसमध्ये होते. नंतर ते भाजपमध्ये गेले आणि वाजपेयी सरकारात मंत्री झाले.

म्हणजे तीन पिढ्यांमध्ये चार भिन्न पक्षांचं राजकारण यांनी केलं. एका दृष्टीनं गौंडर समाजाचं हे प्रतिकात्मक चित्रच म्हणता येईल. १९३० च्या सुब्बारायन यांच्यानंतर अलिकडे ८५ वर्षांनी इडापड्डी पलानीस्वामी हे या समाजाचे नेते मुख्यमंत्री झाले.

नाडार, थेवर आणि गौंडर या तिघांच्या तुलनेत संख्येनं अधिक आणि एकगठ्टा असलेली जात म्हणजे वन्नियार. हे उत्तर तमिळनाडूमधले कुणबी म्हणजे शेतकरी पेशाचे लोक. हेही स्वतःला क्षत्रियच मानतात. परंतु काळाच्या ओघात शेतीखेरीज हे दुसऱ्या क्षेत्रात फारसे विस्तारू शकले नाहीत. त्यामुळे शेतमजूर किंवा बंगलोरसारख्या मोठ्या शहरांमध्ये बांधकामांवरील मजुरांमध्ये वन्नियार मोठ्या संख्येनं आहेत.

या सर्व जातींचं वैशिष्ट्य म्हणजे राजकारणात त्या कोण्या एकाच राजकीय पक्षाच्या मागे सदैव उभ्या आहेत असं दिसत नाही. मुख्य दोन द्रवीड पक्ष तसंच काँग्रेस, कम्युनिस्ट इत्यादी सर्वांमध्ये या जाती दिसतात.

विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये या राज्यात बहुतेकदा एकतर्फी मतदान होतं. म्हणजे लोकसभेत ३९ पैकी ३८ किंवा ३९ जागा एकाच पक्षाला मिळाल्या अथवा विधानसभेतही असंच एका बाजूला उचलून धरणारं मतदान झालं असं अनेकदा झालंय.

याचाच अर्थ या सर्व जाती अक्षरशः ठरवून केल्याप्रमाणे कोणत्या तरी एका पक्षाला उचलून धरतात असं दिसतं.

काँग्रेस या उत्तर भारतीय व आर्यांच्या पक्षाला विरोध करायचा असल्यानं आजवर आळीपाळीनं दोन द्रवीड पक्षच सत्तेत येत होते. पण जयललिता व करुणानिधी या दोहोंच्याही निधनानंतर आता स्थिती बदलली आहे. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुक आघाडीला २३४ पैकी १५९ जागा मिळून बहुमत मिळाले असले तरी विरोधी अण्णा द्रमुकला मिळालेल्या जागा (७५) नगण्य नाहीत.

वन्नियार ही एकच जात अशी आहे की तिला स्वतःचा पट्टली मक्कल कच्ची हा नाव घेण्याजोगा पक्ष आहे. पण सर्व वन्नियार कायम यालाच मतदान करतात असंही नाही. त्यामुळे त्याच्या जागा कमालीच्या वरखाली होत असतात. अलिकडे तर महापालिका निवडणुकीतदेखील त्याचा दारुण पराभव झाला.

आपली तमीळ भाषा, संस्कृती व प्रांत यांच्याबद्दलचा अभिमान उर्फ तमीळ राष्ट्रवाद ही एक प्रभावी प्रेरणा आहे. याचं आकर्षण आणि पेरियार यांच्या चळवळीतून प्रसृत झालेल्या मूल्यांशी बांधिलकी यांच्यामधून अजून तरी इथलं सत्ताकारण ठरतं. ही चौकट काँग्रेसला तोडता आली नाही. भाजप मात्र या चौकटीत जोरानं घुसू पाहतोय.

क्रमशः

← भाग 1 वाचा

भाग 3 वाचा →

लेखक ज्येष्ठ पत्रकार असून विविध वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रातून त्यांनी काम केले आहे.

Write A Comment