fbpx
कला

बेलफास्ट १९६९: प्रोटेस्टंट वि. कॅथलिक

यंदाच्या (२०२२) ऑस्कर स्पर्धेत बेलफास्ट ७ नामांकनं घेऊन उतरला आहे. चित्रपट देखणा आहे. काळ्या पांढऱ्या रंगात आहे. काळा पांढरा रंग आणि १९६९ सालचं कथानक या जुळणीमुळं जुन्या आठवणींमधे प्रेक्षक गुंततो. भरीस भर म्हणून व्हॅन मॉरिसन यांचं संगीत आणि त्यांनी म्हटलेली गाणी आहेत. काळ, संथपणा, जगण्याची कोरियोग्राफी, भूतकाळात रमणं अशा सगळ्या गोष्टी व्हॅन मॉरिसनच्या गाण्यांत आहेत. गंमत म्हणजे गाणं थेट स्थानिक आहे. व्हॅन मॉरिसन आयरिश आणि बेलफास्टवासी आहेत. गाण्यातला जाझ ताल, व्हॅन मॉरिसनचं गाणं आणि गिटार झपाटून टाकतं.

कथानकाचा काळ आहे १९६९. उत्तर आयर्लंडमधलं बेलफास्ट शहर. उत्तर आयर्लंड हा बहुसंख्य प्रोटेस्टंटांचा भूभाग. त्यांना इंग्लंडमधे सामिल व्हायचं असतं. परंतू आयर्लंड मात्र असतं कॅथलिकांचं. कॅथलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यात कडवं वैर. एकमेकांचे गळे कापण्यात गुंतलेली माणसं. दोघंही येशू आणि बायबल मानणारे. पण पंथांचा अभिमान माथं फिरवणारा. कॅथलिक आणि प्रोटेस्टंटांची जुंपली आहे.

बेलफास्टमधली एक गल्ली, स्ट्रीट. तिथं काही कॅथलिक घरं आहेत. प्रोटेस्टंट लोकं कॅथलिकांची घरं उद्ध्वस्त करायला निघालेत, त्यांना वस्तीतून बेदखल करायला निघालेत.

बड, त्याचे आईवडीलभाऊ, त्याचे आजी आजोबा, प्रोटेस्टंट. बड या नऊ वर्षाच्या मुलाला सभोवतालची हिंसा कळत नाहीये. प्रोटेस्टंट प्रीस्ट कॅथलिकांना नष्ट करा असं प्रवचन चर्चमधे कां देतो ते त्याला कळत नाहीये. त्याच्या निष्पाप बुद्धीला धर्माचा लोचा समजत नाहीये. बडचे आईवडील वातावरणाला कंटाळून बेलफास्ट सोडतात. पण आजोबा हयात नसल्यानं एकटी झालेली आज्जी मात्र बेलफास्ट सोडत नाही, टिकून रहाते.

दिग्दर्शक केनेथ ब्रॅनवा हे कथानक अगदी सरळ रेषेत, सोपं करून, पटकथेत गुंफतात. बड या मुलाला दिसणारं जग ते दाखवतात. परंतू मुलाला दिसतं त्यापेक्षा जग अधिक गुंत्याचं असतं, आहे.

दोन ख्रिस्ती पंथांमधल्या मारामारीला खूप दीर्घ इतिहास आहे. त्यात राजकारणही आहे. रोमन, इंग्लीश, जर्मन संस्कृतीही त्यात गुंतलेल्या आहेत. राजकारण आणि धर्माच्या मुळाशी नेहमीच अर्थकारण असतं. राजा असो की पोप, दोघानाही कारभार करण्यासाठी पैसे हवे असतात आणि त्यासाठी राजकारण करावं लागत असतं.

उत्तर आयर्लंडमधल्या संघर्षाला खूपच कंगोरे आणि दीर्घ इतिहास आहे, ते प्रकरण एका सरळ रेषेतलं नाही. परंतू ब्रॅनवा यानी गुंता दूर करून ते सोपं केलं आहे.

राजकारणाच्या अभ्यासकांना असं कथानक पसंत नसतं. सगळा दीर्घ लोचा त्याच्यातल्या किचाटासहच पाहिला पाहिजे असा राजकारणी लोकांचा आग्रह असतो. चित्रपट या कलाप्रकारात निर्माता वेगळ्या अंगानं गोष्टीकडं पहातो. चुलीत घाला तो अनेक शतकांचा राडा, बड नावाच्या नऊ वर्षाच्या मुलाला १९६९ मधे काय दिसतं, काय सोसावं लागतं ते पहा असं चित्रपटाचा जनक म्हणतो. शेकडो वर्षं आणि युरोप दूर ठेवून चित्रपट एक गल्ली आणि त्यातली कुटुंबं आणि त्यातल्या एकाच कुटुंबावर कथानक रचतो.

हीच तर चित्रपट या कला प्रकाराची गंमत आहे. आयरिश-ब्रिटीश संघर्षावर फक्त ९७ मिनिटात चित्रपट निर्माता त्याला काय वाटतं ते सांगतो. कथानकात गुंतलेले मुद्दे तो दाखवतो, सुचवतो, तपशीलात जात नाही. चित्रपट तुम्हाला विचार करायला उद्युक्त करतो, सर्व प्रश्नांची उत्तरं देत नाही.

चित्रपट पाहिल्यानंतर समजा एकादा माणूस अस्वस्थ झाला. तर त्यानं स्वतंत्रपणे इंग्लंड, रोमन कॅथलिक धर्म, प्रोटेस्टंट धर्माची निर्मिती इत्यादींचा तपशीलवार अभ्यास करावा.

घाशीराम कोतवाल या नाटकात तेंडुलकर सत्ता कशी घटते, कसा आकार घेते, कशी हिंसक होते ते सांगतात. कोतवालाची गोष्ट सांगून. घाशीराम कोतवालचा नायक नाना फडणवीस नाही, नायक आहे घाशीराम. पेशवाई, राज्यकर्ते, राजघराण्यातली माणसं, राज्याची नोकरशाही, असहाय्य जनता इत्यादी इत्यादी हज्जारो गोष्टी अगदी दोन सव्वा दोन तासात नाटकात येतात. ज्यांना या प्रश्नाचा राजकीय अभ्यास करावासा वाटेल त्याला तो इतिहास तपशीलात जाऊन अभ्यासावा लागेल.

घाशीराम कोतवाल प्रेक्षकाला उद्युक्त करतं, त्याला विचार करायला लावतं, त्याच्या डोक्यात प्रश्न चिन्हं तयार करतं. प्रश्न आणि भावना निर्माण झाल्यानंतर समजा प्रेक्षकांना पुढला प्रवास करायचा असेल तर ती स्वतंत्र वाट असेल.

बेलफास्टासारखीच एक फिल्म १९९७ साली झाली होती. डॅनियल डे लुईस या ऑस्कर विजेत्या नटाची भूमिका त्या चित्रपटात होती. दी बॉक्सर हे त्या फिल्मचं नाव. बेलफास्टमधेच हिंसक कारवायात एक बॉक्सर अडकलेला असतो, तो १४ वर्षं तुरुंगात काढून बेलफार्टमधे परततो. हिंसेची निरर्थकता कळल्यानं तो तरूणांच्या तारुण्याला विधायक वळण देण्यासाठी बॉक्सिंग शाळा काढतो त्याची गोष्ट दी बॉक्सरमधे आहे.

बेलफास्ट या सिनेमात बड या मुलाच्या डोळ्यातून आणि दी बॉक्सरमधे डॅनी फ्लिन या बॉक्सरच्या डोळ्यातून आयर्लंडमधला संघर्ष प्रेक्षक पहातात.

दिग्दर्शक केनेथ ब्रॅनवा यांचं लहानपण बेलफास्टमधलं आहे, ते प्रोटेस्टंट आहेत. चित्रपटात बडच्या आजोबांची भूमिका करणारे केरन हाईंड्सही बेलफास्टमधलेच आहेत आणि कॅथलिक आहेत. दोघंही १९६९ च्या सुमाराला बेलफास्टच्या आसपास होते, फक्त शेजारी नव्हते येवढंच.

दिग्दर्शक आणि नट दोघांच्याही लहानपणच्या आठवणी त्या गावाशी आणि इतिहासाशी जोडलेल्या आहेत.

चित्रपट दाखवला गेल्यावर काही समीक्षकांनी बडच्या वडिलांच्या भूमिकेसाठी निवडलेल्या जेमी डॉर्मन या नटावर आणि त्या नटाच्या दिसण्यावर आक्षेप घेतला. कथानकात बडचे वडील हे सुतार कामगार आहेत आणि चित्रपटात डॉर्मन हीरोसारखे देखणे दिसतात, ते कामगार-कारागीर वाटत नाहीत असा समीक्षकांचा आक्षेप होता.

दिग्दर्शकाचं म्हणणं असं की एका नऊ वर्षाच्या मुलाला त्याचा पिता हा हीरोच असतो. वडील प्रत्यक्षात कसे आहेत हा मुद्दा नाही, ते बडला कसे दिसतात हा मुद्दा आहे असं दिक्दर्शकांचं म्हणणं.

साहित्यिक, चित्रपट निर्माता; वास्तवापासून फारकत घेण्याचं स्वातंत्र्य घेत असतो. म्हणूनच चित्रपट अनेक वेळा ऐतिहासिक माणसांचं चित्रण करत असताना त्या व्यक्तीचा गाभा सांभाळून त्याच्या भोवती कल्पित घटना गुंफत असतो. दिक्दर्शक घटना-पात्रं-भूमिकांबाबत स्वतःचे अर्थ लावत असतो.

ऑस्कर स्पर्धेत चित्रपटाचं रंजनमूल्य, बाजार मूल्य याचा विचार अधिक असतो. कलात्मकता, ऐतिहासिक सत्य, चित्रपटाचं उपदेश मूल्यं इत्यादींचा विचार ऑस्कर देताना होत नाही. परंतू स्पर्धेच्या वेळी इतरही स्पर्धक चित्रपट असल्यामुळं शेवटी तुलनात्मक विचार केला जातो. स्वतंत्रपणे विचार करता या चित्रपटाला संगीत, पटकथा, महिला सहायक अभिनेत्री (बडीची आजी, जुडी डेंच) ही बक्षीसं मिळायला हरकत नाही.

ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक व सिद्धहस्त लेखक

Write A Comment