आधुनिकतेबरोबर स्त्रीशिक्षणाची वाट अधिकाधिक सबल होत जाईल, अशी एक अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात या वाटेवर धर्मवादाचा अडसर आजही कायम आहे. या धर्मवादासमोर निधर्मीवाद (सेक्युलॅरिझम), बहुसांस्कृतिकतावाद (मल्टिकल्चरलिझम) या आधुनिक संकल्पना एकच एक उत्तर द्यायला अयशस्वी ठरत आहेत. किंबहुना धर्मवाद निधर्मीवादाला आपल्या सोयीने वापरत कधी त्याला बहुसांस्कृतिकतेच्या विरोधात उभं करतो तर कधी बहुसांस्कृतिकतेच्या नावाने धर्मवादाची रुजवात करत निधर्मीवादाला नाकारतो. निधर्मीवाद, बहुसांस्कृतिकता या आधुनिक संकल्पनांचे अर्थ नीट समजून घेतले नाहीत तर त्यातील गुंते अंतिमतः धर्मवादाच्या फायद्याचे ठरतात, हेच कर्नाटकमधील शिक्षणसंस्थांमध्ये सध्या सुरु असलेल्या हिजाब वादावरुन दिसून येते.
जय श्रीराम..अशा घोषणा देणाऱ्या मुलांचा घोळका. बुरखा घातलेल्या एका मुलीच्या मागे लागलेला. मुलगीही ठामपणे महाविद्यालयाच्या दिशेने चालतेय. त्या घोळक्याला न घाबरता. मध्येच थांबून तीही घोषणा देते, अल्ला हू अकबर..
हे द्दश्य असलेला व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने फिरतोय आणि त्याच्या सोबतीने उलटसुलट प्रतिक्रियाही. गेले काही दिवस कर्नाटकमधील उडपी भागातील शिक्षणसंस्थांमध्ये हिजाब घातलेल्या मुस्लिम मुलींना शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. या वादाची ही पुढची पायरी आहे. या व्हिडिओत न दिसणाऱ्या अद्दश्य चेहऱ्यांना जे हवंय तेच नेमकं घडताना इथे दिसत आहे.
जय श्रीराम विरोधात अल्ला हू अकबर…
व्हिडिओत न दिसणारे चेहरे दोन्ही बाजूंच्या धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचे आहेत. त्यांना हिजाब वादावरुन धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणायचे आहे. जय श्रीराम विरोधात अल्ला हू अकबर.. हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. ते साकार होताना या व्हिडिओत दिसत आहे.
खरे उद्दिष्ट ‘जय संविधान’ असे हवे. त्याआधीची पायरी ‘स्त्रीशिक्षणाची जय हो’… अशी हवी. हिजाब वाद सुरु झाल्यापासून स्त्रीशिक्षणाच्या वाटेवरचे काटे आणि काचा आजही कायम असल्याची तीव्र जाणीव झाली आणि तेवढ्याच तीव्रतेने शिक्षणासाठी बळी गेलेल्या काशीबाईची, बाहुलीची आणि एका मुलीचा बळी गेल्यावरही न डगमगता दुसऱ्या मुलीलाही शाळेत घालणाऱ्या सत्यशोधक विश्राम रामजी घोले यांची आठवण आली. सत्यशोधक चळवळीतील विश्राम घोले यांनी आपली मुलगी काशीबाई, जिला घरात लाडाने बाहुली म्हणत तिला म. फुलेंनी सुरु केलेल्या शाळेत घातली. पण मुलगी शिकते, हे तत्कालिन समाजाला मान्य नव्हतं. म. फुलेंनी शाळा स्थापून स्त्रीशिक्षणाला सुरुवात केलेली असली, त्याला काही काळ लोटलेला असला तरी हिंदू समाजातील कट्टरतावाद्यांचा विरोध कायम होता. स्त्रीशिक्षण हे त्यांना धर्मविरोधी वाटत होते. काही शेजाऱ्यांनी, नातेवाईकांनी काचेचा चुरा घातलेला लाडू बाहुलीला खायला दिला. अंतर्गत रक्तस्त्राव होऊन बाहुलीचा मृत्यू झाला. विश्राम घोले यांनी आपल्या मुलीच्या स्मरणार्थ सर्व जातीयांसाठी बुधवार पेठेत पाण्याचा हौद बांधला. बाहुलीचा हौद असे त्याला नाव दिले. काशी घोले ही मुलगी हा स्त्रीशिक्षणासाठी सनातन्यांनी दिलेला पहिला बळी आहे. पण सनातन्यांचे उद्दिष्ट विश्राम खोले यांनी पूर्ण होऊ दिले नाही. न डगमगता त्यांनी आपली दुसरी मुलगी गंगुबाई हिला शाळेत घातले. कारण प्रश्न फक्त गंगुबाईचा नव्हता. सनातन्यांना घाबरुन गंगुबाईला शाळेत घातले नसते तर परिसरातल्या इतर मुलींची शिक्षणंही थांबली असती, मुलींच्या शिक्षणाची वाटच अडली असती. मुलींच्या शिक्षणाची वाट थांबू नये, म्हणून सत्यशोधक चळवळीतील म. फुले यांचे खंदे समर्थक विश्राम रामजी घोले यांनी पहिल्या मुलीचा बळी गेल्यावरही धोका पत्करुन दुसऱ्या मुलीला शाळेत घातले.
काचेचा चुरा घातलेला लाडू हा धार्मिक कट्टरतावादाचा तत्कालिन चेहरा होता. आजच्यापेक्षा हा तत्कालिन चेहरा अधिक थेट, अधिक उघडा होता. त्याची भाषा, त्याचं संभाषित पूर्णतः सनातनी होतं. जसं मलाला युसुफजाईच्या विरोधातलं तालिबान्यांचं संभाषित पूर्णतः सनातनी, स्त्रीशिक्षणालाच नकार देणारं होतं. अर्थात पूर्णतः सनातनी संभाषिताविरोधातला लढाही सोपा नसतोच, पण त्यातली गुंतागुंत कमी असते. त्यामुळे त्याविरोधात थेट लोकपाठिंबा मिळवता येतो, लोकमत तयार करता येते. मात्र हिजाब प्रकरणातला धार्मिक कट्टरतावादाचा चेहरा गुंतागुंतीचा आहे. तो निधर्मीवादाच्या आधुनिक संकल्पनेला पुकारत पुरोगामी परिवर्तनवादाला कैचीत पकडू पाहातो. पुरोगामी विचारविश्वावर ढोंगीपणाचा, अल्पसंख्यांकांच्या लांगुलचालनाचा आरोप करु पाहतो.
धर्माचे, धार्मिक चिन्हांचे स्थान खासगी, कौटुंबिक अवकाशात आहे; शिक्षणसंस्थांमध्ये, सार्वजनिक संस्थांमध्ये कोणतीही धार्मिक चिन्हे नकोत, हे निधर्मीवादाच्या मुलभूत तत्त्वांना धरुन आहे. मग तुम्ही हिजाब घालून शाळेत, महाविद्यालयात येणाऱ्या मुस्लिम धर्मीय मुलींना पाठिंबा देणार का विरोध करणार, हा पेच इथे हिजाबचे निधर्मीवादाचा मुखवटा धारण केलेले विरोधक निर्माण करतात. या पेचात पकडून एरवी निधर्मीवादाची भूमिका मांडणाऱ्या पुरोगामी मंडळींना इथे स्युडो सेक्यलर ठरवणं मग या मुखवटा धारकांना सोपं जातं.
शिक्षण घेणं हा इस्लाम धर्मिय मुलींचा भारतीय घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि तो त्या हिजाब घालतात म्हणून त्यांना नाकारता येणार नाही, ही भूमिका आज सगळीच पुरोगामी विचारविश्वातील मंडळी घेत आहेत. ती योग्य आहे मात्र ती पुरेशी नाही. कारण इस्लाम धर्मातील कट्टरतावादी मंडळीही हीच भूमिका घेऊन उभी आहेत. कोणत्याही मुद्द्याबाबत कट्टरतावाद आणि पुरोगामी विचार यात सारखेपणा येत असेल तर आपल्या पायाखालचा गुंता नीट बघून पुढचं पाऊल टाकावे लागते.
निधर्मीवाद-सेक्युलॅरिझम ही धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांचे कार्यक्षेत्र ठरवणारी, खासगी जीवन आणि सार्वजनिक जीवन यातील भेद स्पष्ट करत धर्माच्या व्यवहाराला सार्वजनिक जीवनात मज्जाव करणारी लोकशाहीवर आधारित समाजव्यवस्थेतील आधुनिक संकल्पना आहे, जी कोणत्याच धर्माच्या मुलतत्त्ववाद्यांना मान्य नाही. कारण धर्माच्या आधारे सार्वजनिक समाजजीवन अंकित करणे त्यांना सोपं राहात नाही. मात्र निधर्मीवादाच्या शब्दशः अर्थाला आणि अंमलबजावणीला केवळ मूलतत्त्ववाद्यांकडून विरोध होतो असं नाही. तर समाजातील धर्मश्रद्ध, आस्तिक लोकांनाही निर्भेळ स्वरुपातील निधर्मीवाद झेपत नाही. म्हणजे त्यांना लोकशाही शासनसंस्था मान्य आहे, त्याचे सगळे फायदे हवे आहेत, राज्यसंस्थेवर धर्माचं अधिपत्य नको, हा निधर्मीवादाचा गाभा त्यांना मान्य आहे पण सार्वजनिक व्यवहारात धर्म नको, हे निधर्मीवादाचं व्यापक रुप तत्त्वतः मान्य असले तरी ते प्रत्यक्षात स्वीकारणे त्यांना कठीण जाते. भारतासारख्या विविध धर्म-धर्मपंथ, वैविध्यपूर्ण सांस्कृतिक-धार्मिक चालीरिती, प्रथा-परंपरा असलेल्या बहुसांस्कृतिक देशात आदर्श स्वरुपातील निधर्मीवाद स्वीकारणे ही बाब गुंतागुंतीची बनते. म्हणूनच सहिष्णुतेच्या पायावर भारत या नवराष्ट्राची उभारणी करु पाहाणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीतील नेतृत्वाने सेक्युलॅरिझम या पाश्चात्य संकल्पनेचा अर्थ निधर्मीवाद असा न करता सर्वधर्मसमभाव असा केला. निधर्मीवाद हे अंतिम लक्ष्य असले तरी भारतासारख्या बहुसांस्कृतिक समाजजीवनात, धर्माआधारे फाळणी झालेल्या राष्ट्रात त्याची प्राथमिक वाटचाल ही सर्वधर्मसमभावाच्या मार्गावरुन होणे आवश्यक होते. सर्वधर्मसमभाव, त्यात अनुस्यूत असलेली सहिष्णुता हा या भारतीय मातीतला सेक्युलॅरिझम आहे. आज पुन्हा एकदा धर्माच्या आधारे समाजजीवनाची फाळणी करण्याचे टोकदार प्रयत्न सुरु असताना या देशातला सेक्युलॅरिझम सर्वधर्मसमभावाच्या रुपात उभा राहाणे आवश्यक आहे; आदर्श स्वरुपातला निधर्मीवाद आपल्याला व्यक्तिशः कितीही हवा असला तरीही.
आदर्श स्वरुपातल्या निधर्मीवादानुसार शिक्षणसंस्थेसारख्या सार्वजनिक ठिकाणी शालेय गणवेशाखेरीज कोणतीच धार्मिक-सांस्कृतिक चिन्हे घालणे मान्य नाही. पण सर्वधर्मसमभाव या सेक्युलॅरिझमच्या भारतीय अर्थाला ते मान्य आहे. आपल्या देशातल्या, विविध राज्यांमधल्या शिक्षणसंस्थांमध्ये वेगवेगळ्या धर्मपंथांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आपापल्या धार्मिक-सांस्कृतिक चिन्हांसहित शाळेत-महाविद्यालयात जात असतात. शीख विद्यार्थी डोक्यावर पगडी धारण करतात, अनेक विद्यार्थ्यांच्या मनगटावर त्या त्या भागातल्या देवस्थानांचे गंडेदोरे बांधलेले असतात, अनेक विद्यार्थिनींच्या कपाळावर टिकली लावलेली असते, हातावर मेहंदी काढलेली असते. नाकात नथनी घातलेली असते. आपल्या देशात बालविवाहांचं तसंच महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच विवाह होण्याचं प्रमाण मोठं आहे. अशावेळी लग्न झालेल्या तरुणी गळ्यात मंगळसूत्र आणि हातात हिरव्या किंवा लाल बांगड्या घालून महाविद्यालयात जातात. गणवेशाच्या निर्भेळ, आदर्श स्वरुपात हे सगळं कुठेच बसत नाही. पण तरीही या देशातील घटना आणि सर्वधर्मसमभाव या सगळ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षणसंस्थेत प्रवेश घ्यायला परवानगी देतो. त्याचप्रमाणे हिजाब घातलेल्या इस्लामधर्मिय मुलींनाही शिक्षणसंस्थेत जाऊन शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. जर शिक्षणसंस्थेत हिजाबला प्रवेश नसेल तर तो सगळ्याच धर्मांच्या धार्मिक-सांस्कृतिक चिन्हांना नाकारायला हवा. सर्वधर्मसमभावाच्या ऐवजी निर्भेळ, आदर्श स्वरुपातला निधर्मीवाद शिक्षणसंस्थांमध्ये अंमलात आणायचा असेल तर त्याचे मनापासून स्वागतच आहे, पण ते सगळ्याच धार्मिक-सांस्कृतिक चिन्हांच्या बाबतीत व्हायला हवे. तसे न करता विशिष्ट धर्माच्या मुलींना जर लक्ष्य केले जात असेल तर ते सरळसरळ धार्मिक राजकारण आहे, धार्मिक मुलतत्त्ववाद आहे.
पोशाखात विशेषतः स्त्रियांच्या पोशाखात धार्मिक-सांस्कृतिक चिन्हे अधिक प्रकर्षाने पाळली जातात. हे जसे धर्माच्या आधारे घडते तसेच ते जातिव्यवस्थेवर आधारित समाजरचनेत जातींनुसारही ठरते. एकोणिसाव्या शतकापर्यंत काही मागासजातीय स्त्रियांना शरीराचा वरचा भाग झाकण्याची, अंगात ब्लाऊज घालायची परवानगी नव्हती. कोणत्या जातीच्या स्त्रीने साडी कशी नेसायची, कोणत्या धातूचे दागिने घालायचे किंवा घालायचे नाही, याचेही निकष जातिनिहाय ठरलेले होते. आणि त्यानुसार अमूक स्त्री कोणत्या जातीची ते ओळखले जात होते. म्हणून मागासजातीय महिलांच्या परिषदेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना पारंपरिक पद्धतीने साडी न नेसता उच्चजातीय स्त्रियांप्रमाणे साडी नेसण्याचा सल्ला दिला, तसेच कथलाचे दागिने न घालण्याचा, गळ्यात अनेक माळा न घालण्याचा सल्ला दिला. म्हणजे धार्मिक राजकारणात ज्याप्रमाणे स्त्रीचा पेहराव संघर्षस्थानी येतो त्याचप्रमाणे हिंदु धर्मातील जातीआधारित सांस्कृतिक राजकारणातही स्त्रीचा पोशाख केंद्रस्थानी असतो.
पुरुषसत्ताक समाजरचनेत स्त्रीकडे त्या त्या धर्माचं, जातीचं प्रतीक म्हणून, मानचिन्ह म्हणून पाहिलं जातं. अनेक धार्मिक-सांस्कृतिक चिन्हं त्यांच्याच अंगावर असतात. त्यामुळेच धार्मिक संघर्षात कधी स्त्रियांचा देह तर कधी त्यांचा पोशाख केंद्रस्थानी येतो. सल्ली अॅपमध्ये मुस्लिम महिलांचा देह संघर्षस्थानी आणला गेला तर कर्नाटकातील उडपीमध्ये त्यांचा पोशाख संघर्षस्थानी आणला जात आहे. घटना वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागची विचारधारा एकच आहे.
कट्टरतावादी विचारधारेला त्यांच्यासारखेच उत्तर दिल्याने कट्टरतावादाचा गुणाकार होतो आणि मूळ प्रश्न कायम राहातात. ‘जय श्रीराम’ला ‘अल्ला हू अकबर’ हे उत्तर दिल्याने दोन्ही बाजूंनी केवळ धार्मिक ध्रुवीकरण होते. इथे मूळ मुद्दा पुरुषप्रधान धर्मव्यवस्था, पितृसत्ताक समाजरचना स्त्रियांना साधन म्हणून कशाप्रकारे वापरते हा आहे. जी विचारधारा मुस्लिम मुलींच्या हिजाबला विरोध करत आहे, तीच विचारधारा हिंदू मुलींनी कपाळाला कुंकू लावले पाहिजे, जीन्स घालता कामा नये, अंगभर कपडे घातले नाहीत तर बलात्कार होतात, असे सूचनावजा आदेश पेरत असते. वेगवेगळ्या परंपरा, सण यातून आपली प्राचीन परंपरा म्हणून पुरुषप्रधान मूल्य मुलींच्या मनावर लहानपणापासून बिंबवली जातात. घर, मंदिरं, प्रार्थनास्थळं, पौराणिक कथा, धर्मग्रंथ, महाकाव्य, प्राचीन वाङ्मय यातून लहानपणापासून मुलींचं जे सामाजिकीकरण होतं, त्यांच्या डोक्यात जे विचार भरवले जातात, ते पुरुषप्रधान पारंपरिक मुल्यांचं द्दढिकरण करणारंच असतं. वैवाहिक दर्जा दाखवणारं मंगळसूत्रं हे पारंपरिक पितृसत्तेचं वाहक आहे, स्त्रीला दुय्यमत्व देणारं आहे हे माहित असूनही भल्या भल्या उच्चशिक्षित महिलांना आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढता येत नाही. कधी परंपरेच्या नावाने तर कधी फॅशनच्या नावाने ते गळ्यात कायम राहातं. कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्रं या गोष्टी जशा पितृसत्ताक मूल्यांच्या वाहक आहेत त्याचप्रमाणे डोक्यावरचा घुंघट किंवा हिजाब हाही पितृसत्ताक मुल्यांचा, पुरुषप्रधानतेचा वाहक आहे. दोन्ही बाजूच्या धर्मांची नावं वेगवेगळी असली तरी विचारांचा गाभा तोच आहे, जो स्त्रीदेहाला त्या त्या धर्माची, जातीची मालमत्ता मानतो.
भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या मुस्लिम महिलांच्या स्त्रीवादी संघटनेने जे निवेदन वर्तमानपत्रांमध्ये दिलं आहे त्यात त्यांनीही घुंगट, बिंदी याप्रमाणे हिजाब हेही पितृसत्ताक व्यवस्थेने लादलेलं चिन्ह आहे, असे म्हटले आहे. फातिमा मेरनिस्सी, अस्मा लम्राबेत या मुस्लिम धर्मातील स्त्रीवादी अभ्यासक महिलांनी इस्लामचा अभ्यास करुन धर्मग्रंथातील पडदयाचा (Veil) उगम हा पितृसत्तेच्या मूळांमध्ये आहे, धर्मग्रंथांचा पुरुषसत्ताक व्यवस्थेने लावलेला तो अर्थ आहे, असे स्पष्ट केले आहे. अर्थात ज्या मुलींमध्ये ही स्त्रीवादी जाणीवजागृती नाही त्यांना हिजाब ही आपली परंपरा वाटते, ज्याप्रमाणे काही मुलींना कुंकू, मंगळसूत्र ही आपली परंपरा वाटते. कारण त्यांच्या घरांमधून त्यांना तशीच शिकवण दिली जाते. त्यामुळे ज्या घरांमधून हिजाब घातल्याशिवाय, डोक्यावरुन घुंगट ओढल्याशिवाय, कपाळावर कुंकू लावल्याशिवाय शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये पाठवत नसतील तर त्यांना त्या हिजाब आणि घुंगटासह, कुंकू आणि सिंदूरासह शाळांमध्ये स्वीकारलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत घटनेने दिलेला शिक्षण घेण्याचा मुलभूत हक्क मुलींना मिळालाच पाहिजे.
हिजाब, बुरखा यांचं मूळ पितृसत्ताक समाजरचनेत आहे, तो धर्माचा भाग नाही, ही ‘भारतीय मुस्लिम महिला आंदोलना’ची भूमिका अर्थातच मुस्लिम धर्मातील कट्टरतावाद्यांना मान्य होणारी नाही. ते आपल्या धार्मिक राजकारणासाठी पहिले हिजाब, फिर किताब ही घोषणा देत आहेत. या अशा मंडळींना मुलींच्या शिक्षणाशी आणि त्यामाध्यमातून होणाऱ्या सबलीकरणाशी देणंघेणं नाही. किंबहुना शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांचं होणारं सबलीकरण कोणत्याच धर्माच्या धर्ममार्तंडांना मान्य नाही. म्हणूनच अशा धर्ममार्तंडांच्या नादी लागलेल्या, आपल्या मुलींनी हिजाब घालूनच शाळेत गेलं पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्या पालकांना एकच सांगणं आहे. विश्राम रामजी घोले नावाच्या पित्याचे विचार समजून घ्या. स्त्रीशिक्षणाच्या विरोधकांनी काचेचा चुरा घातलेला लाडू खायला घालून एका मुलीची हत्या केल्यावरही दुसऱ्या मुलीला त्यांनी शाळेत घातलं. जीवापेक्षाही त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं. पहिले किताब, फिर बाकी सब…हे त्यांचं जीवनध्येय होतं. त्यातला अर्थ धर्माच्या नावाने जुनाट परंपरांच्या नादी लागलेल्या पालकांनी समजून घ्यावा. शिक्षणाच्या क्षेत्रात कोणत्याही धर्माचा रंग येणं चुकीचं आहे. त्यामुळे गणवेशासाठी भांडायचंच असेल तर गणवेशात शिक्षणाखेरीज कोणत्याच धर्माचा कोणताच रंग नको, यासाठी भांडायला हवं.
हिजाबचा आग्रह धरणाऱ्या मुली या पूर्णतः आपल्या पालकांच्या प्रभावाखाली आहेत. मुस्लिम समाजातील काही स्त्रीवादी महिला हिजाब, बुरखा यांचा वेगळा अन्वयार्थ लावत आहेत, हे या मुलींपर्यंत पोहोचलेलं नाही. हिजाब, बुरखा ही पुरुषसत्ताक दडपशाही आहे, ही भारतीय महिला मुस्लिम आंदोलनाची भूमिका ज्यादिवशी जय श्रीरामला ‘अल्ला हू अकबर’ हे उत्तर देणाऱ्या मुलीपर्यंत पोहोचेल, त्यातला अर्थ तिला उमगेल त्यादिवशी तीही जय श्रीरामला ‘जय संविधान’ हेच उत्तर देईल. पण परिवर्तनाची ही प्रक्रिया होण्यासाठी, त्यासाठी आवश्यक असलेली जाणीवजागृती तिच्यामध्ये आणि तिच्यासारख्या अनेक मुलींमध्ये निर्माण होण्यासाठी आधी तिला शिक्षण मिळणं, शिक्षण घेण्याचा तिचा अधिकार कायम राहाणं हे महत्त्वाचं आहे. डोक्यावरचा हिजाब असेल किंवा घुंगट असेल, कपाळावरची बिंदी असेल किंवा भांगातला सिंदूर असेल किंवा गळ्यातलं मंगळसूत्र असेल, ते घालंणं किंवा काढणं हा त्या त्या मुलीचा, स्त्रीचा अधिकार असेल, ती तिची ‘निवड’ असेल. ही निवड समतावादी मूल्यांवर आधारित अशी असायला हवी, हे खरं आहे. पण त्यासाठी आवश्यक असणारी समतावादी, स्त्रीवादी जाणीवजागृती अद्याप त्या मुलींपर्यंत पोहोचलेली नसेल तर आज जी काही त्यांची निवड आहे, त्याला पाठिंबा द्यायलाच हवा. या देशातल्या बहुसांस्कृतिकतेची, सर्वधर्मसमभावाची ती गरज आहे.
विभिन्नत्वाला अधोरेखित करणारा बहुसांस्कृतिकतावाद हा काहीवेळा समतावादाच्या आशयाला छेद देणारा असतो. पण त्याचवेळी तो एकसत्वीकरणालाही नकार देत असतो. बहुसंख्यांकांची झुंडशाही नाकारत असतो. सभोवती धार्मिक कट्टरतावादी राजकारण तीव्र होत असताना बहुसांस्कृतिकतेला जपत, सर्वधर्मसमभावाच्या मार्गाने घटनेचं समतावादी आशयद्रव्य कायम राखण्यासाठी उभं राहिलं पाहिजे.
7 Comments
या लेखातल्या सर्व मुद्दयाशी सहमत आहे. मुख्य म्हणजे ही भूमिका घेणारे आपण लोक अल्पसंख्य आहोत.
मूलभूत अधिकारांच्या समर्थनाने भारावून जाऊन पायाखालचा गुंता न पाहणे हे दिवस आता संपलेत. कर्मठ धर्मांधांचा पसारा वाढतोय. जरा जपून पावलं टाकायला हवीत आपण.
Rightly said
मॅडम,
हा लेख खुपच आवडला.
मी इस्माईल युसूफ महाविद्यालय जोगेश्वरी मध्ये ८०च्या दशकात शिकत होतो तेव्हा माझ्या वर्गातील मुस्लिम मुली येताना हिजाब घालून येत असत आणि कॉलेजमध्ये आल्यावर तो काढून ठेवीत असत. म्हणजेच तो फक्त प्रवासात आणि रस्त्यावरून येत असताना घालत असत. परवा घडलेल्या घटनेत सुद्धा असेच होत असेल. तरी हल्लीच्या काळात शक्यता कमी.
मुख्य म्हणजे जो विडिओ प्रसारित झाला त्यात कुणाचेही चेहेरे दिसत नाहीत त्यामुळे हा मुद्दाम रचलेला असावा असे वाटते, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन.
या लेखातील मला भावलेले महत्वाचे वाक्य म्हणजे-
“ही भारतीय महिला मुस्लिम आंदोलनाची भूमिका ज्यादिवशी जय श्रीरामला ‘अल्ला हू अकबर’ हे उत्तर देणाऱ्या मुलीपर्यंत पोहोचेल, त्यातला अर्थ तिला उमगेल त्यादिवशी तीही जय श्रीरामला ‘जय संविधान’ हेच उत्तर देईल.”*
हाच या लेखाचा मूळ गाभा आहे असे मला वाटते.
कळावे,
उन्मेष वीरकर
संध्या नरे पवार यांच्या नेहमीच्या अभ्यासपूर्ण शैलीत मांडणी आहे. उठवळ लेखन सोशल मीडियातून होत असण्याच्या आणि सुमारांची वाढ वेगाने होत असलेल्या काळात अशी अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्यात आहेत याचा आनंद थोडका नाही.
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख आहे.
शिक्षण हवेच, बुरख्याचा अडसर कशाला?
या लेखातील विश्लेषण मला बऱ्याच अंशी पटलं मात्र संविधानवाद हा उपाय सरधोपट आणि काहीसा सुलभीकरण (सिम्पलीफिकेशन) करणारा वाटतो. हमीद दलवाई, रझिया पटेल इत्यादीनी प्रयत्न करूनही लिबरल (सुधारणावाद या अर्थाने) विचार मुस्लिम समाजात म्हणावा तितका रुजलेला नाही. पुरोगामी, हिंदू धर्मातील कट्टरतावादाला धारेवर धरतात पण मुस्लिम धर्मातील रितीरिवाजांना आणि कट्टरतावादाला त्याच प्रकारे विरोध करत नाहीत अशी एक सर्वसाधारण धारणा आहे. त्यात तथ्य आहे असा मला वाटतं. माझ्या मते स्वतःला सुधारणावादी / पुरोगामी/ निधर्मी म्हणणाऱ्यांनी, बुरख्याचा आग्रह का? हे या प्रसंगी विचारायला हवं. लेखिका म्हणतात त्याप्रमाणे “….आज जी काही त्यांची निवड आहे, त्याला पाठिंबा द्यायलाच हवा” हे तितकंसं पटत नाही. शिक्षण हवंच. मान्य. पण सोबतच “बुरखा घालूनच शिक्षण” याला विरोध आपण (सुधारणवादींनी) करायला हवा. तो होत नाही तेंव्हा हिंदू धर्म कट्टरतावादी तो मक्ता घेतात.
२००९-१० साली सार्कोझी (फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष) यांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा बंदीचं समर्थन करताना “सौदी अरेबिया मध्ये फ्रेन्च महिलांनी बिकिनी घालून फिरलेलं चालणार असेल तर आम्हालाही बुरखा मान्य आहे ” अशी एक प्रोव्होकेटीव्ह भूमिका घेतली होती. वरकरणी विनोदी वाटली तरी त्यात तथ्य आहे.
सुधारणावादी अनेकदा मुस्लिम धर्मातील प्रतिगामी विचाराला प्रखर विरोध न करता, “त्यांचा चॉईस, त्यांचा स्वतःचा निर्णय, शिक्षण मिळाले कि मुस्लिम महिलाच हे ठरवतील ” अशी भूमिका घेताना दिसतात. ती बोटचेपी भूमिका आहे, किंवा अपिसमेंट च्या अंगानी जाणारी आहे अशी टीका त्यांच्यावर होते. ती टीका सर्वार्थाने चुकीची नाही. त्यात काही तथ्य आहे असा मला वाटतं. महिला या पुरुषप्रधान विचारसरणी किंवा धार्मिक कट्टरतावादाच्या मूक वाहक (पॅसिव्ह कॅरिअर्स) असतात हे मला पटत नाही. शिक्षण मिळाले कि त्या आपोआप कट्टरतावादाला विरोध करतील अशी अपेक्षा बाळगणं बाळबोध आहे.
बुरख्याला विरोध केला तर हिंदू कट्टरतावाद्यांची कड घेतली आणि नाही केला तर दांभिकपणाचा आरोप खरा ठरेल अशी त्रेधातिरपीट बऱ्याच पुरोगाम्यांची होताना दिसते आहे. यातून मग संविधानवाद उरी बाळगावा, शिक्षण द्या मग मुस्लिम महिलाच बदल घडवतील अशी काहीशी सुलभ भूमिका बरेच जण (जसे कि या लेखिका, घेत आहेत).
आपल्या सुधारणावादाशी प्रामाणिक राहून “बुरखा नको, शिक्षण हवे” म्हणण्याचे धाडस दाखवायला हवे. या घटनेच्या संदर्भात ते वरकरणी असंवेदनशील किंवा हिंदू कट्टरतावादाची कड घेणारे वाटले तरीही!
हिजाबला विरोध करणाऱ्या शक्ती कोणत्या आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. ते समाजप्रबोधनाच्या वाटेने जाणारे नाहीत. त्या ह्याच सनातन संस्थेसारख्या संघटना, व्यक्ती आहेत ज्यांनी आम्हा अंनिस कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसात खोटी तक्रार केली की ह्या कार्यकर्त्या आपल्या कार्यशाळेतून कुंकू लावू नका, मंगळसूत्र घालू नका असे सांगतात. त्यांच्या अपप्रचाराला संविधानाच्या मार्गावर आणणे गरजेचे आहे. आपल्या लेखात हा मुद्दा आपण प्रभावीपणे मांडला आहे.