काँग्रेस आणि गांधीजींशी मतभेद असूनही नेताजींनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता संबोधले आणि दोन ऑक्टोबर हा गांधीजींचा वाढदिवस आजाद हिंदमध्ये राष्ट्रीय सणाचा दिवस जाहीर केला. काँग्रेस आणि नेताजी यांची लढाई ही सत्तेसाठीची लढाई नव्हती तर स्वातंत्र्य कोणत्या मार्गांनी आणि कशासाठी मिळवायचे या विचारांची लढाई होती. म्हणूनच नेताजींच्या सैन्यदलातील तुकड्यांची नावे गांधी ब्रिगेड, जवाहर ब्रिगेड अशी होती, सावरकर ब्रिगेड, गोळवलकर ब्रिगेड अशी नव्हती.
पूर्वाश्रमीच्या जनसंघाचा नवा अवतार असलेल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाबरहुकूम हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला ‘हिंदुत्व हेच भारतीयत्व’ असे बोलणे जितके भाग आहे तितकेच आपण किती राष्ट्रवादी आहोत हे पुन्हा पुन्हा जनतेसमोर मांडणेही भाग आहे. संघाची स्थापना जरी डॉ. हेडगेवार यांनी केली असे सांगितले जात असले तरी संघाचे तत्वज्ञान संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर यांनी मांडले. चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेच्या पुरस्कारापासून देशभक्ती, भारतीय संविधान, आरक्षण आदी विषयांवर मांडलेल्या त्यांच्या मताचा संघाला कितीही आदर असला आणि गोळवलकरांना संघाने गुरुस्थानी मानले असले, तरी ज्यांची मते सर्वसामान्यांसमोर मांडणे संघाला सध्यातरी गैरसोयीचे आहे. कारण या विचारांवर बहुजनांची मते मिळणार नाहीत. त्याचबरोबर संघ परिवाराने स्वातंत्र्य आंदोलनाशी द्रोह करून ब्रिटिशांची साथ दिली असल्याने आपली देशभक्त प्रतिमा सिद्ध करण्यासाठी संघाकडे आदर्श व्यक्तीच नाही. उलट शामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या हिंदुत्ववाद्यांना जनतेसमोर देशभक्त म्हणून आणण्याचा प्रयत्न सातत्याने करूनही त्याला यश आलेले नाही. अशा परिस्थितीत स्वातंत्र्य आंदोलनात जनतेने ज्यांना नेता म्हणून स्वीकार केले आणि ज्यांना जनमानसात आदराचे स्थान आहे, त्यांना आत्मसात करणे ही संघ परिवाराची मजबूरी आहे. महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा सोयीस्करपणे वापर करूनही जनमानसात फारसा फरक पडला नसल्याने आता तसाच सोयीस्कर वापर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा करण्याचे संघ परिवाराने ठरविले आहे.
असा वापर करण्यासाठी निवड करण्याची संघाची एकच कसोटी असते, ती म्हणजे ती व्यक्ती गांधीविरोधी असायला हवी किंवा नेहरूविरोधी. नेताजींनी गांधीजींच्या इच्छेविरूद्ध अध्यक्षपदाची निवडणूक दुसऱ्यांदा लढवली. गांधीजींचा विरोध असतानाही त्यांनी त्या निवडणुकीत गांधीजींचे उमेदवार, डॉ. पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव केला. त्यांनंतर काँग्रेस कार्यकारिणीने नेताजींच्याबाबत असहकाराचे धोरण स्वीकारून राजीनामा देऊन नेताजींना अध्यक्ष म्हणून काम करणे अशक्य केल्याने त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. नेताजींनी साम्यवादी विचाराचा पुरस्कार करण्यासाठी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक या गटाची स्थापना केली होती. हाच गट पुढे ‘ फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षात रूपांतरित झाला. पुढे प्रखर देशभक्तीने प्रेरित असलेले नेताजी वेषांतर करून युरोपला पोहोचले आणि जर्मनीत त्यांनी तेथे अटकेत असलेल्या भारतीय जवानांची ‘आजाद हिंद सेना’ जर्मनीच्या साहाय्याने उभारून भारताच्या स्वातंत्र्यासाठी युद्धाची घोषणा केली. काँग्रेसमध्ये असतानाही नेताजी भारतीय तरुणांच्या गळ्यातील ताईत होते आणि आझाद हिंद सेनेच्या स्थापनेनंतर तर त्यांची लोक लोकप्रियता शिगेला पोहोचली. १८ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला नसता तर पुढील इतिहास काय झाला असता याचा आता केवळ तर्कच करता येईल. नेताजींनी गांधीजींचा केलेला पराभव आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी स्वीकारलेला सशस्त्र मार्ग या दोन गोष्टींमुळे संघ परिवाराला नेताजींचा वापर करावयाचा आहे.
यासाठीच आता केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने दिल्लीच्या इंडिया गेट येथे आधी जेथे राजे पंचम जॉर्ज यांचा पुतळा होता, त्या जागी नेताजींचा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. हा पुतळा तेथे बसवला जाईपर्यंत त्याजागी नेताजींची लेसर किरण आकृती दाखवली जाणार आहे. असे केल्याने नेताजींचा उचित गौरव केला जाईल व त्यायोगे गांधी, नेहरू आणि काँग्रेस यांना कमी लेखण्याच्या वा त्यांचा वारसा पुसून टाकण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळेल या आणि इतक्याच हेतूने हे केले जात आहे. स्वातंत्र्यद्रोही हिंदुत्ववाद्यांनी नेताजी ज्या स्वातंत्र्यासाठी लढले आणि हुतात्मा झाले, त्या स्वातंत्र्यासाठीच्या लढ्याला कधीही सहभाग घेतला नाही. नेताजींचा पुतळा बसवून संघाला आता आपले स्वातंत्र्य आंदोलनात भाग न घेतल्याचे पाप झाकायचे आहे. पुतळा बसवण्याची घोषणा करण्याआधी २२ ऑक्टोबर २०२० रोजी हंगामी आजाद हिंद सरकारच्या स्थापनेच्या ७५ व्या जयंतीदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना आजाद हिंद सेनेच्या टोपी सारखी टोपी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातली होती. अर्थात अशा टोप्या घालून कोणी नेताजींचे वारस बनत नसते, ही गोष्ट यांच्या डोक्यात शिरणे, ते सत्तेच्या नशेत मग्न असल्याने सध्यातरी अशक्य वाटते.
मात्र ह्या निमित्ताने तथाकथित हिंदुत्ववादी आणि नेताजी यांच्याबाबतीतली वस्तुस्थिती आणि विचारांमधील अंतर समोर यायला हवे.
नेताजींचे आणि गांधीजी आणि काँग्रेसचे असलेले मतभेद प्रामुख्याने स्वातंत्र्यलढ्याचे स्वरूप कसे असावे यावर आणि नेताजींच्या डाव्या विचारांच्या आग्रहावर होते. स्वातंत्र्यलढा अहिंसक असायला पाहिजे हा गांधीजींचा आग्रह होता तर नेताजी हिंसक मार्गांचा अवलंब करायला हरकत नसावी या मताचे होते. त्याचबरोबर काँग्रेसमधील डाव्या विचारसरणीच्या मंडळींचे प्रतिनिधित्व नेताजी हिरिरीने करत होते. त्यांनी स्थापन केलेला ‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा पक्ष आता डाव्या आघाडीचा घटक पक्ष आहे. आता नेताजींचे गुणगाण करणारा संघ स्वातंत्र्य आंदोलनात ना सशस्त्र लढला ना निशस्त्र. उलट ब्रिटिशांना मदत होईल असे राजकारण करत स्वातंत्र्यद्रोह करण्यात हिंदुत्ववादी मंडळी धन्यता मानत होती. त्याचबरोबर संघाचे गुरु गोळवलकर यांनी विचारधन या त्यांच्या ग्रंथात, जो ग्रंथ संघाला वंदनीय आहे, केलेल्या विचारांच्या उधळणीत भारताचे अंतर्गत शत्रू म्हणून मुसलमान, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट यांना घोषित केले आहे. म्हणजेच नेताजी हे गोलवलकरांच्या हिंदू राष्ट्राचे शत्रू ठरतात. म्हणूनच नेताजींचा गौरव करण्याचा संघपरिवाराचा उद्देश जर प्रामाणिक असेन तर या गोळवळकरी ‘गुरुवाणी’चे काय करायचे? याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.
नेताजींचे अशा जातीयवादी लोकांबद्दलचे मत स्पष्ट आहे. ते मांडताना संघाची पितृसंस्था (हे पितृत्व संघ नाकारत असतो), हिंदू महासभेबद्दल, ‘द इंडियन स्ट्रगल’ या ग्रंथात नेताजी लिहितात,
“हिंदू महासभेत त्यांच्या प्रतिकृती (ऑल इंडिया मुस्लिम लीग) प्रमाणेच केवळ जुनाट राष्ट्रवादीच नाहीत तर राष्ट्रीय चळवळीत भाग घ्यायला घाबरणारे आणि त्यासाठी एका सुरक्षित संघटनेचा आश्रय घेणारेही मोठ्या संख्येने आहेत. हिंदू-मुसलमानांच्या विभाजनकारी चळवळीमध्ये वाढ झाल्याने हिंदू आणि मुसलमान या दोन समुदायांमधील तणावात वाढ झाली आहे. या दोन जमातींतील वितुष्टाने तिसऱ्या शक्तीला राष्ट्रवादी शक्तींचे बळ कमी करायची संधी मिळवून दिली आहे.” इतकेच लिहून सुभाष चंद्र बोस थांबत नाहीत. १२ मे १९४० रोजी पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे केलेल्या भाषणात नेताजी म्हणतात,
“हिंदू महासभेने मतांचा जोगवा मागण्यासाठी संन्यासी आणि संन्यासिनींना हातात त्रिशूळ देऊन उभे केले आहे. त्रिशूळ आणि भगवी वस्त्रे पाहून हिंदू आदराने नतमस्तक होतात. धार्मिक भावनांचा फायदा घेऊन आणि धर्माचे अपवित्रिकरण करून हिंदू महासभा निवडणुकीत उतरली आहे. या गोष्टीचा निषेध करणे ही सार्या हिंदू समाजाची जबाबदारी आहे. या विश्वासघातक्यांना राष्ट्रीय जीवनातून हद्दपार करा. त्यांची भाषणे ऐकून नका.”
नेताजींच्या या मताबद्दल संघाला काय म्हणायचे आहे? याचे उत्तर त्यांचा पुतळा बनवणाऱ्यांनी द्यायला हवे. नेताजी हिंदू धर्माचे अनुयायी होते परंतु त्यांनी त्यांचा धर्म स्वामी विवेकानंदनकडून शिकला होता आणि विवेकानंद हिंदू-मुसलमान ऐक्याचे तसेच विश्वबंधुत्वाचे पुरस्कर्ते होते ही गोष्ट नव्याने सांगण्याची गरज नाही. साऱ्या जगातल्या विस्थापितांना भारताने आसरा दिला, सामावून घेतले याचा स्वामीजींना विलक्षण अभिमान होता.
नेताजींना परदेशी जाऊन हिंद सेनेची स्थापन करण्याची युक्ती वि. दा. सावरकर यांनी दिली असा निराधार प्रचार गेली अनेक वर्षे सुरू आहे. सावरकरांवरील मराठी चित्रपटात दाखविलेल्या नेताजी- सावरकर भेटीत सावरकर नेताजींना कानमंत्र देताना आणि नेताजी आज्ञाधारक बालकाच्या डोक्यात प्रकाश पडल्यावर ते बालक जशी मान हालविते तशी मान हलवीत असतानाचे दृश्य दाखविले आहे. नेताजी सावरकरांना भेटले होते ही गोष्ट खरी आहे. पण त्याच वेळी ते पाकिस्तानची मागणी करणाऱ्या जिना यांनाही भेटले होते. या भेटीत त्यांनी या दोन्ही नेत्यांना आपले विभाजनकारी राजकारण थांबण्याची विनंती करून स्वातंत्र्य आंदोलनात सामील व्हायचा सल्ला दिला होता. अर्थात दोघांनीही तो सल्ला झुगारून दिला हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
सावरकरांनी तर युद्ध प्रयत्नांमध्ये ब्रिटिशांना पूर्ण साथ दिली. १९४२च्या चलेजाव आंदोलनात काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून सार्या प्रांतांतील सरकारांचा राजीनामा दिला. पण सावरकरांनी मात्र पश्चिम बंगाल, पंजाब आणि सरहद्द प्रांतात पाकिस्तान मागणाऱ्या मुस्लिम लीग बरोबर हिंदू महासभेची संयुक्त सरकारे बनविली. यासाठीच्या समितीचे ते महत्त्वाचे सदस्य होते. नेताजींची आझाद हिंद सेना ज्या ब्रिटिश फौजे विरुद्ध लढत होती त्या ब्रिटिश सैन्यात भारतीय तरुणांना भरती करण्याचे कार्य सावरकर आणि संघाने पार पाडले. हा जसा स्वातंत्र्य आंदोलनाची द्रोह होता तसा तो नेताजींशीही द्रोह होता. आणि अशा महत्त्वाच्या निर्णायक वेळी संघ आपल्या शाखांवर कवायती करत स्वस्थ बसला होता. त्याची लाठी एकाही ब्रिटिशाला लागली नाही, साधी ऊगारलीही गेली नाही.
जातीयवादी संघटनांचा उल्लेख नेताजींनी ज्या ज्या वेळी केला त्या त्या वेळी त्यांनी मुस्लीम लीगच्या आधी हिंदू महासभेचा उल्लेख केला आहे. फॉरवर्ड ब्लॉक साप्ताहिकाच्या ४ मे १९४०च्या ‘काँग्रेस अँड कम्युनल ऑर्गनायझेशन्स’ या शीर्षकाने लिहिलेल्या संपादकीय लेखात ते म्हणतात लिहितात, “पूर्वीची गोष्ट आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते हिंदुमहासभा आणि मुस्लीम लीगसारख्या जातीयवादी संघटनांचे सदस्य असू शकत होते. पण अलीकडच्या काळात परिस्थिती बदलली आहे. आता या संघटना पूर्वीपेक्षा अधिक जातीयवादी बनल्या आहेत. याला उत्तर म्हणून काँग्रेसने आपल्या घटनेत, हिंदू महासभा आणि मुस्लिम यांचे सदस्य असलेली व्यक्ती काँग्रेसच्या निवडणूक समितीची सदस्य बनू शकणार नाही, असे कलम समाविष्ट केले आहे.”
नेताजी सेक्युलर होते आणि जातीयवादी राजकारण करणाऱ्या साऱ्या संघटना आणि व्यक्ती यांचे ते कडवे विरोधक होते. त्यांचा पुतळा उभारून हे सत्य लपवता येणार नाही. जातीयवादी राजकारण ब्रिटिशांची तडजोड करत आहे याची जाणीव नेताजींना होती आणि या सार्याचा नेताजींना तिरस्कार वाटत होता. ‘आझाद हिंद’ या त्यांच्या भाषणांच्या संग्रहात स्वातंत्र्यलढ्याला विरोध करणाऱ्या साऱ्यांना उद्देशून नेताजी म्हणतात, “अजूनही जे ब्रिटिशांशी समझोता करू इच्छितात त्या जिना, सावरकर यांच्यासारख्या व्यक्तींना मी हे निक्षून सांगू इच्छितो की, उद्या येथे ब्रिटीश साम्राज्य नसेल ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. उद्याच्या भारतात ज्या व्यक्ती, गट आणि पक्षांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला त्यांना गौरविण्यात येईल. अर्थातच ब्रिटीशांची साथ देणाऱ्यांना स्वतंत्र भारतात कोणतेच स्थान असणार नाही.” ही वक्तव्ये लक्षात घेतल्यानंतर नेताजींच्या लेखी जातीयवादी राजकारण करणाऱ्यांना कोणतेच स्थान नव्हते ते अशा व्यक्तींचा तिरस्कार करत होते ही गोष्ट स्पष्ट होते.
आता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्याच जातीयवादी शक्ती नेताजींचे पुतळे उभारून आपले पाप झाकू इच्छित आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि गांधीजींचे महत्त्व कमी करू इच्छित आहेत. त्यांना काही गोष्टींची जाणीव करून देणे भाग आहे. नेताजींनी काँग्रेस सोडली हा १९३९ नंतरचा भाग झाला. त्याआधी नेताजी गांधीजींच्या अहिंसक नेतृत्वाने लढल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे महत्त्वाचे नेते होते आणि गांधीजींशी मतभेद होऊन त्यांनी जरी काँग्रेसचा राजीनामा दिला असला, अहिंसेचा त्याग केला असला तरी त्यांच्या मनात गांधीजी व काँग्रेसबद्दल द्वेष नव्हता तर आदराच्या भावना होत्या. काँग्रेसचा चारखांकित तिरंगा नेताजींच्या आझाद भारताचा राष्ट्रध्वज होता. काँग्रेस आणि गांधीजींशी मतभेद असूनही नेताजींनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता संबोधले आणि दोन ऑक्टोबर हा गांधीजींचा वाढदिवस आजाद हिंदमध्ये राष्ट्रीय सणाचा दिवस जाहीर केला. काँग्रेस आणि नेताजी यांची लढाई ही सत्तेसाठीची लढाई नव्हती तर स्वातंत्र्य कोणत्या मार्गांनी आणि कशासाठी मिळवायचे या विचारांची लढाई होती. म्हणूनच नेताजींच्या सैन्यदलातील तुकड्यांची नावे गांधी ब्रिगेड, जवाहर ब्रिगेड अशी होती, सावरकर ब्रिगेड, गोळवलकर ब्रिगेड अशी नव्हती.
म्हणूनच पुतळे उभारण्यामागचे गलिच्छ राजकारण लोकांसमोर स्पष्टपणे ठेवणे गरजेचे आहे. हे राजकारण तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांचे स्वातंत्र्यद्रोहाचे पाप लपविणे आणि गांधी-नेहरूंचा सेक्युलर वारसा नष्ट करणे या दुहेरी हेतूने केले जात आहे, ही गोष्ट अधोरेखित करायलाच हवी.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मतलबी राजकारणाबाबत नरहर कुरुंदकर यांनी पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेल्या, गोळवळकर गुरुजी आणि महात्मा गांधी, या लेखातील पुढील उतारा संघाच्या भोंदुत्वाच्या राजकारणावर प्रकाश टाकतो. कुरुंदकर लिहितात,
“ज्या राजकारणाचा प्रवाह जनतेला वास्तविक प्रश्नांच्याबद्दल शहाणे करण्याच्या खटपटीत नसतो, तर याउलट जनतेच्या श्रद्धा बेमालूमपणे आपल्या राजकारणासाठी ज्यांना वापरायच्या असतात, त्यांना सगळेच संत आत्मसात करणे भाग असते. द्वैतमतवादी मध्य संघाला प्रमाण आहेत. मध्यांनी ज्यांना कलियुगातील राक्षस म्हटले ते शंकराचार्यही संघाला मान्य आहेत. यज्ञवादी वेद संघाचेच, यज्ञ विरोधक बुद्ध हा तर खास संघाचा. शिवाजी आणि राणा प्रताप हे तर हिंदूंचे राज्यकर्ते म्हणून संघाला वंदनीय आहेतच,पण पंजाबात मराठ्यांच्या विरुद्ध लढलेले शीखही संघाचे. सगळेच आमचे म्हणून टाकल्यावर एकेकाचे कार्य, त्याचे वेगळेपण तपासण्याची गरजच काय? हिंदू समाजाची ही जुनी परंपरा आहे. आम्ही एकेकाला संत, देव, महात्मा असं म्हणून पूजनीय करतो, देवळात बसवतो, त्यानंतर आमचे रस्ते सरळ होतात. कारण कोणालाच समजून घेण्याची गरज नसते, कुणाच्या अनुकरणाची गरज नसते.”
नेताजींचा पुतळा बसवण्याचे राजकारण लोकांच्या नेत्यांवरील श्रद्धांचा वापर राजकारणासाठी करण्याचा संघ परिवाराचा कावा आहे.
1 Comment
RightAngles तर्फे एका अत्यंत महत्वाच्या विषयी लेखन व्हायलाच हवे & ते म्हणजे – गायिका-लता मंगेशकर’नी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गीत का गायले नाही, यावर जितक्या सखोलतेने, चिकित्सक रित्या, योग्य ते तथ्य, सत्यता बाहेर काढायलाच हवे. यासाठी इव्हन इंटरनॅशनल पातळीवरून सुद्धा, विविध सांस्कृतिक ऑफिसेस (UnitedNations सहित) भारत सरकारला, मंगेशकर परिवारास/फौंडेशन ला, यासाठीचे वेगळे पत्र लिहून लिखित रूपाने मंगेशकरांचा पत्र घ्यावे कि काय कारण झाले कि मंगेशकरांनी श्रीमान बाबांचे वर एकही गायन, गाणे, मेलोडी केलेली नाही.भले मंगेशकरांचा म्हणणे असेल कि, इतर भारतातील कोणिही दिग्ग्ज गायक-कलाकारांनी श्रीमान बाबांच्या वर असे गायन केलेले नसताना त्यांनी स्वतःहून का गावे, असे असेल तर, तसे मंगेशकरांनी लिहून द्यावे ….. म्हणून जे काही, असेल ते उत्तर द्यावे.मंगेशकरांना हार तर्हेने भाग पाडून, का श्रीमान बाबांच्या वर गीत गायले नाही याचे उत्तर यावे यावर व इतर या विषयातील RightAngles चे एक लेख द्यायलाच हवे.