fbpx
सामाजिक

जिजाबाईंचे चारित्र्यहनन ते फुले दाम्पत्याचे किरकोळीकरण

शारीरिक हिंसा शक्य नसेल त्यावेळी प्रतिपक्षाच्या कर्तृत्त्वाला, त्याच्या मानदंडांना अनुल्लेखाने मारायचे. मौनाच्या या कटानंतरही प्रतिपक्षाचे मानदंड समाजमानसात तगून राहिले तर मग त्यांच्या विरोधात कुजबूज तंत्र वापरायचे. असत्याची पेरणी करण्यासाठी कधी अवास्तव कहाण्या तर कधी संभ्रमित सत्य, आभासी सत्य विविध माध्यमातून कुजबुजत राहायचे. विरोध वाढला की शांत राहायचे, विरोध कमी झाला की पुन्हा सुरु करायचे. जेव्हा स्वतःला बोलणे शक्य नसेल तेव्हा दुसऱ्याच्या तोंडून वदवायचे. पण कुजबुजत राहायचे. जातवर्णवर्गलिंगवर्चस्वाच्याआधारे शोषणशासनाची व्यवस्था राबविणाऱ्या ब्राह्मण्यश्रेष्ठत्ववादी विचारधारेने हे कुजबूज तंत्र आपल्या सांस्कृतिक सत्तेच्या राजकारणात कायम उपयोगात आणले आहे. घरगुती गप्पांमध्ये, मित्रमैत्रिणींच्या बैठकीत अगदी सहज बोलून जायचं की, मुस्लिमांच्या आक्रमणानंतर देशातील स्त्रीशिक्षण थांबले. इस्लामधर्मिय आक्रमक देशात आले ते आठव्या शतकानंतर पण त्याआधीच पहिल्या, दुसऱ्या शतकातच धर्मशास्त्र सांगणाऱ्या स्मृतीग्रंथांनी स्त्रीशिक्षणाला नकार द्यायला सुरुवात केली होती. बालविवाहाला सुरुवात झालेली होती. पण इतिहासाचे पुरावे कोण शोधत बसतंय? सर्वसामान्य लोकांच्या इतिहासविषयक अज्ञानाचा गैरफायदा घेत आपल्याला हव्या असलेल्या तथ्यांची बेमालूमपणे पेरणी करत राहायचं आणि द्वेषमूलक, परंपरावादी विचारांचं पिक घेत राहायचं, ही या कुजबूज तंत्रांची खासियत आहे. ब्राह्मण्यश्रेष्ठत्ववादी विचारधारेचं बाळकडू जिथे बनतं त्या शाखांमध्ये शारीरिक कवायतींबरोबरच या मानसिक कोलांट्याउड्यांचा, पर्यायाने कुजबूज तंत्राचा पद्धतशीर विकास करण्यात आलेला आहे.

चारित्र्यहनन हा या कुजबूज तंत्राचा आवडता उद्योग आहे. राजमाता जिजाबाई, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु ते सोनिया गांधी अशी इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत त्यांची वाढती यादी आहे. त्यांच्या जातवर्णवर्गलिंगवर्चस्ववादी, विषमतामूलक, कर्मकांडवादी सनातनी विचारांच्या आणि मुख्य म्हणजे त्या विचारांच्या सत्तास्थानाच्या आड जे जे येतील त्यांना लक्ष्य केलं जातं. काहींना थेट गोळ्या घातल्या जातात. ज्यांच्याबाबतीत ते शक्य नाही त्यांचे चारित्र्यहनन केले जाते. राजमाता जिजाबाईंच्या चारित्र्यहननाचा क्षोम जेम्स लेन प्रकरणात साऱ्या महाराष्ट्राने वेगवेगळ्या प्रकारे अनुभवला आहे.

खरं तर या जेम्स लेन प्रकरणात सनातनी कुजबूज तंत्रांचा प्रभावी वापर कसा केला जातो, हेच दिसून येते. संशोधक, अभ्यासक असलेला जेम्स लेनही या कुजबूजीच्या मोहिनी तंत्रात अडकला आणि सत्य-असत्याचा ऐतिहासिक पडताळा न करताच ‘असे असे नौटिली जोक्स’ केले जातात, असे लिहून गेला. शिवचरित्राच्या अभ्यासासाठी भारतात, पुण्यात आलेल्या जेम्स लेनपर्यंत पोहोचलेले, खोडसाळपणे केलेले विनोद म्हणजे पद्धतशीरपणे राबवलेली कुजबूज मोहिमच होती. जेम्स लेनच्या कानात हे खोडसाळ विनोद कोणी सांगितले? कोणत्या पद्धतीने सांगितले? जेम्स लेन रस्त्यावर फिरणारा सामान्य प्रवासी नव्हता, तर संशोधन संस्थेत बसून अभ्यास करणारा संशोधक होता. मग त्याच्या कानापर्यंत हे नौटिली जोक्स कसे गेले? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला मिळायला हवं होतं. पण राजमातेच्या चारित्र्यहननाने संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या तरुणांनी भांडारकर संशोधन संस्थेमध्ये घुसून, मोडतोड करत आपला निषेध व्यक्त केला. निषेध चुकीच्या मार्गाने केला गेला आणि या संपूर्ण प्रकरणाला वेगळं, जातवर्णवर्चस्ववाद्यांना जे हवं होतं ते वळण लागलं. ज्ञानभांडारावर हल्ला झाला, असं म्हणत या हल्ल्याच्या निषेधातच महाराष्ट्रातील ज्ञानवंत बुडून गेले आणि ज्ञाननिधी गोळा करायला लागले. ज्ञानाच्या क्षेत्रातील हिंसेचा प्रवेश हा केव्हाही निषेधार्यच असतो, विचारांचा प्रतिवाद विचारांनीच करायला हवा. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचा निषेध केला गेला यात गैर काहीच नव्हते. तो करायलाच हवा होता. पण गैर हे होते की, संभाजी ब्रिगेडचा निषेध करताना या ज्ञानवंतांना राजमातेच्या चारित्र्यहननाचा विसर पडला. जेम्स लेनच्या कानात कुजबूज कोणी केली, चारित्र्यहननाचा डाव का टाकला गेला, त्यामागे सांस्कृतिक प्रभुत्वाचं कोणतं राजकारण शिजतंय, हे प्रश्न उपस्थित करायला महाराष्ट्रातील ज्ञानवंत मंडळी विसरली. ज्यांनी हे प्रश्न उपस्थित केले त्यांना जातीयवादी, मराठावादी, ब्रिगेडवादी अशी लेबलं लावण्यात आली. ब्रिगेड समर्थक आणि ब्रिगेड विरोधक या गलबल्यात चारित्र्यहनन आणि कुजबुजमोहिम यांना प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज क्षीण झाला. सांस्कृतिक प्रभुत्वाच्या राजकारणातील कुजबुज मोहिमेचं यश हे असं असतं. जेम्स लेन प्रकरणाचा हा निचोड आहे.

जेम्स लेन
जेम्स लेन

वैदिक, ब्राह्मणी जातवर्णवर्गलिंगवर्चस्ववादी विचारव्यूहाला छेद देणाऱ्या दलित-बहुजनसमाजातील नेतृत्त्वाचं चारित्र्यहनन जिथे शक्य नाही किंवा ते करुनही फारसा उपयोग होत नाही किवा ते करण्याला विशेष संधी नाही, अशा वेळी त्यांचं किरकोळीकरण केलं जातं. त्यांचं कर्तृत्व फारसं मोठं नाही किंवा त्यांनी केलेलं काम आणखी कोणीतरी केलेले आहे, हे बिंबवणारी कुजबूज मोहिम सुरु केली जाते. गेली काही वर्ष जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात किरकोळीकरणाची ही कुजबूज मोहिम सुरु असलेली दिसते. अलिकडच्या काळात समाज माध्यमांमुळे या कुजबूजमोहिमेला व्हाटस् अप वरील शेरेबाजीचं, फेसबुक वरील पोस्टचं आणि प्रतिक्रियांचं स्वरुप आलेलं आहे. कुजबुजमोहिमेतीलच एखादा मेंदू विकिपिडियावर काही माहिती टाकणार, तीच माहिती मग आणखी कोणी फेसबुक पोस्टचा आधार म्हणून वापरणार, तिसरा कोणी त्याला दुजोरा देणार, असे हे कुजबुजी वर्तुळ आहे. ते सतत गोल गोल फिरत राहाते.

३ जानेवारी ही सावित्रीबाई फुले यांची जयंती तर १२ जानेवारी हा राजमाता जिजाबाई यांची जयंती. गेली काही वर्ष महाराष्ट्रात हे दहा दिवस समतावादी विचारांचा जागर घातला जातो. परिवर्तनादी विचारांच्या विविध संस्था-संघटनांचा यात पुढाकार असतो. यात जातवर्णव्यवस्थेपासून ते पुरुषसत्तेपर्यंत शोषणशासनाच्या साऱ्या व्यवस्थांना प्रश्न विचारले जातात. गीत-नृत्य-नाट्य-चर्चासत्र-परिसंवाद अशा वेगवेगळ्या माध्यमातून हे जागरण सुरु असतं. समाजमाध्यमांमुळे या जागरणाची व्याप्ती अधिक द्दश्यमान झालेली आहे आणि त्यामुळेच किरकोळीकरणाची कुजबुज मोहिमही यावर्षी अधिक तीव्र झालेली दिसते. परस्परविसंगत विधानं करत, गोलमाल भाषेतच ही कुजबुज मोहिम राबविली जाते.

या कुजबुज मोहिमेंतर्गत सत्यशोधनाचा आव आणत म. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात दोन-तीन मुद्दे वेगवेगळ्या फेसबुक पोस्टमार्फत मांडण्यात आले. म. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी या देशातील स्त्रीशिक्षणाची पायाभरणी केली, हे परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून सातत्याने सांगितलं जातं. आद्य स्त्रीशिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचा गौरव केला जातो. ज्या शूद्र जातींच्या ज्ञानार्जनावर, वेदाध्ययनावर आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपनयनावर वैदिक धर्माच्या धर्मशास्त्रांनी, स्मृतीग्रंथांनी बंदी घातली होती त्या शूद्र जातीतील पतीपत्नींनी कर्मठ पुण्यातील सनातनी मंडळींच्या विरोधातला तोंड देत, वडिलोपार्जित घर सोडत स्त्रीशिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली, केवळ उच्चजातीच्याच मुलींना नाही तर महारमांगांच्या मुलामुलींना शिकवायला सुरुवात केली, हे त्या काळाच्या परिघात एक क्रांतिकार्यच होते. पण शूद्र जातीतील पतीपत्नीला मिळणारा हा बहुमान खोडून काढायचा तर मुलींची पहिली शाळा आणखी कोणी तरी काढली होती, हे सांगण्याचा खोडसाळपणा केला जातो. तोही रितसर अभ्यास करुन, संशोधन करुन, जुन्या कागदपत्रांची पडताळणी करुन नाही, तर गुगलच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे.

अशोक वानखेडे यांच्या नावाने फेसबुकवर एक पोस्ट फिरत आहे. यात सुरुवातीला म. जोतिबा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढण्याआधी पाश्चात्य मिशनऱ्यांनी भारतात आणि पुण्यात मुलींच्या शाळा काढल्या होत्या, असे सांगण्यात आले आहे. तेही अशा पद्धतीने की जणू हे काही पहिल्यांदाच सांगितले जात आहे, महाराष्ट्राला हे ज्ञातच नाही. मुळात म. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे जे ग्रंथ महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’, ‘डा.बाबासाहेब आंबेडकर, म. फुले आणि राजर्षि शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती’ यासारख्या संस्थाच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत, त्यांच्यामध्येच जोतिबांच्या आधी वेगवेगळ्या मिशनऱ्यांनी सुरु केलेल्या शाळांची माहिती आहे. जोतिबांचं शिक्षण अशाच शाळेत झालेलं होतं. १८४८ मध्ये जोतिबांनी सुरु केलेल्या शाळेत आद्यशिक्षिका म्हणून काम करण्याआधी सावित्रीबाईंनी सगुणाबाईंच्या बरोबरीने नगरला फरारबाईंच्या शाळेत शिक्षण घेतले होते. मिसेस मिचेल यांच्या ‘नॉर्मल स्कूल’मध्ये १८४६-४७ मध्ये शिक्षिकेचा कोर्स पूर्ण केला होता. ऐतिहासिक कागदपत्रं अभ्यासली, एकोणिसाव्या शतकातील वृत्तपत्रं पाहिली तरी ही माहिती मिळते. फुले प्रेमींनी तसेच फुलेंच्या अभ्यासकांनी ही माहिती दडवलेली नाही. मात्र या अभ्यासकांनी तत्कालीन मिशनऱ्यांनी सुरु केलेल्या शाळांवर ब्राह्मणी प्रभुत्वाचा कसा पगडा होता आणि त्यावरुन तत्कालीन सनातनी वृत्तीच्या वर्तमानपत्रांमध्ये आणि सुधारक वृत्तीच्या वर्तमानपत्रांमध्ये एकमेकांना विरोध करणारी वृत्ते कशी प्रसिद्ध होत होती, हेही दाखवून दिले आहे.

१८२१ साली चॅप्लिन नावाच्या इंग्रज आयुक्ताने स्थापन केलेल्या संस्कृत पाठशाळेत (पूना कॅलेज) फक्त ब्राम्हणांनाच प्रवेश मिळे. इतर जातीच्या हिंदूंना तीत प्रवेश नसे. शूद्रांना ज्ञानार्जनाचा अधिकार नाही, ही स्मृतीग्रंथांची आज्ञा, जी शतकानुशतके पाळली गेली, जिचं पेशवाईत काटेकोरपणे पालन झालं ती ब्रिटिश काळातही कायम होती. मात्र ती पाठशाळा निरुपयोगी आहे, असे १८३८ साली ठरले. बराच विचार विनिमय करुन व ब्राम्हणांची संमती घेऊन ते महाविद्यालय सर्व हिंदूंना खुले करण्यात आले. त्यामुळे पुणे शहरातील ब्राह्मणांचा संताप अनावर झाला. त्याविषयी लिहिताना ‘ज्ञानोदय’ या वृत्तपत्राने लिहिले आहे की, ‘ब्राह्मण भूदेव हे शिक्षणाचे दरवाजे सर्वांना सारखे उघडे झाले आहेत, असे पाहून अत्यंत नाखूश झाले आहेत. पुण्यातील ब्राह्मण पंडित भीतीने व रागाने थरथरत होते. त्यांनी सरकारी धोरणाला कसून विरोध केला. ब्राह्मण शिक्षकांनी ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना संस्कृत शिकविण्यास नकार दिला. कारण धर्मशास्त्राप्रमाणे ब्राह्मणेतरांना संस्कृत शिकण्याचा अधिकार नव्हता.’ इथे ‘ज्ञानोदय’ हे सुधारकी विचारांचे वृत्तपत्रं ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध करताना दिसते. मात्र त्याचवेळी ज्या दोन ब्राह्मण पंडितांनी पुणे महाविद्यालयात ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्याचे काम चालू ठेवले होते, त्यांच्यावर हल्ला चढवताना ‘ज्ञानप्रकाश’ हे सनातनी वृत्तीची पाठराखण करणारे वृत्तपत्रं लिहिते, ‘नारायणशास्त्री अभ्यंकर व गोपाळशास्त्री गोखले ह्यांनी सरकारपाशी सर्व जातींच्या मुलांस संस्कृत शिकवण्याचे कबूल केले. आम्ही मुद्दाम विश्रामबागेत जाऊन पाहिले. तो वर लिहिलेले शास्त्रीबुवा स्वधर्माचा व स्वजातीचा अभिमान सोडून फक्त आपले पोट भरण्यावरच नजर देऊन सोनार, शिंपी, परभू, फारशी इत्यादी जातींच्या मुलांस पुढे घेऊन संस्कृत कौमुदीतील नियम त्यांस सांगत होते. हर! हर! हर! हे दुष्ट कर्म पाहून आमचे मनास तर फारच विस्मय झाला. बरे असो, हे विलक्षण कृत्य ह्या उभयता शास्त्र्यांनी चालवले, हे गावभर झाले आहे. भट्ट व शास्त्री वगैरे लोकांची मने अगदी खवळून गेली आहेत. आम्ही असे ऐकतो की, येथील शुक्ल पक्षाकडील अग्रेसर भट व शास्त्री यांनी सभा भरवून सदहरू शास्त्र्यांस बहिष्कार घातला. या ग्रामण्य प्रकरणी आम्ही आमच्या वाचकांना पुढे लिहून कळवू.’

रेव्हरंड मरे मिचेल यांनी लिहिलेल्या आठवणींमध्ये त्यांच्या शाळेत महार मुलगा शिकायला आल्यावर ब्राह्मण मुलांनी तुमच्या शाळेत महार मुलांना शिकवले जाणार असेल तर आम्ही शाळा सोडू, अशी धमकी दिली. त्या मुलाला वेगळ्या चटईवर बसू देण्याचीही ब्राह्मण मुलांची तयारी नव्हती. शाळेतील हे वातावरण पाहून तो महार मुलगा फिरुन शाळेत आलाच नाही, याची खेदपूर्वक नोंद रेव्हरंड मिचेल करतात.

हा सगळा तपशील अभ्यासताना फुले यांच्या शाळांआधी पुण्यात पाश्चात्य मिशनऱ्यांनी शाळा सुरु केल्या असल्या तरी तिथे शूद्र-अतिशूद्र यांच्या शिक्षणासाठी अनुकूल वातावरण नव्हते, उलट कठोर विरोध होता, हेच दिसून येते. फुले पतीपत्नींनी शाळा काढण्याआधी पुण्यात, महाराष्ट्रात मराठी शाळा होत्या, हे सांगणारी मंडळी या शाळांमधील जातवर्णश्रेष्ठत्वाचे फुत्कार सोयीस्करपणे दडवतात. फुले पतीपत्नीच्या शैक्षणिक कार्याचे महत्त्व इथेच दिसून येते. फुले यांनी शूद्रअतिशूद्र मुलामुलींसाठी शाळा काढल्या आणि त्यात इच्छुक ब्राम्हण मुलामुलींनाही सामावून घेतले. वर उल्लेख केलेल्या सनातनी वातावरणात हे काम करणे हीच क्रांतिकारी गोष्ट होती. शिवाय १८४८ मध्ये फुले दाम्पत्याने मुलींसाठी जी शाळा काढली तिचाही उल्लेख फुलेंचे अभ्यासक ‘देशातील मुलींची पहिली शाळा’ असा करत नाहीत. तर ‘एतद्देशीय व्यक्तीने काढलेली मुलींची पहिली शाळा’ असाच उल्लेख केला जातो. पण मुलींची शाळा काढणारा ‘पहिला एतद्देशीय’, ‘पहिला भारतीय’ हा मान फुलेंना मिळावा, याचाही काहींना त्रास होत असावा, असे दिसते. त्यामुळे नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी मुलींची पहिली शाळा काढली होती, असे गुगलवरील माहितीचा हवाला देऊन पुढे केले जाते. वानखेडे यांच्या या पोस्टच्या शेवटी ‘भारतातील मुलींची पहिली शाळा असे टाईप करुन गुगलवर शोधल्यावर जी माहिती मिळाली ती संकलित करुन लिहिली आहे’, असे स्पष्टपणे म्हटले आहे. खऱं तर, जगन्नाथ शंकरशेट आणि त्यांच्यासोबतच्या इतर मंडळींनी काढलेल्या मुलींच्या शाळेचीही चर्चा अभ्यासकांनी केलेली आहे आणि फुले यांच्या बाजूने निर्वाळा दिलेला आहे. पण अभ्यासकांनी संशोधनाच्या आधारे लिहिलेले ग्रंथ न वाचता गुगलवरील माहितीचा आधार घेत आणि मुख्य म्हणजे त्या माहितीतही स्वतःच्या सोयीने फेरबदल करत स्वतःला हवा तो निष्कर्ष काढला जाणार असेल, तर सत्य-असत्याची भेळच सत्यशोधन म्हणून पुढे येणार.

नाना जगन्नाथशंकर शेट यांचा गौरव करताना वानखेडे यांच्या पोस्टमध्ये दिलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे – ‘१८३२ साली (जेव्हा जोतिबा फुले केवळ चार वर्षांचे होते) त्यांनी Bombay Education Society काढली. आणि पुढे Elphinstone college काढले. १८४५ साली Student’s Literary and Scientific Society ची स्थापना केली आणि स्वतःच्या घरात मुलींची शाळा काढली. ही शाळा काढल्याबद्दल लोकांनी त्यांना सळो की पळो करुन सोडले…परंतु महापुरुषांत गणना होण्यासाठी केवळ प्रचंड कर्तृत्व असून भागत नाही, त्याबरोबर ब्राह्मणद्वेष करता आला पाहिजे. ते गुण (जगन्नाथ शंकरशेट) यांच्यात नसल्याने त्यांची गणना महापुरुषात होत नाही किंवा मुंबई विद्यापीठ वगैरेला त्यांचे नाव दिले जात नाही.’ या शेवटच्या विधानातनं वानखेडे यांचं स्वतःचं ब्राह्मणीप्रभुत्वाचं प्रेम आणि त्यांचा बोलविता कुजबूजकार कोणी दुसराच आहे, हेही स्पष्ट होतं. या शेवटच्या विधानाकडे येण्याआधी जगन्नाथ शंकरशेट यांचं शैक्षणिक कार्य पाहू.

पोस्टकर्त्यांनी ज्या गुगलवरील माहितीचा संदर्भ म्हणून वापर केला आहे, तिथली विकिपिडियावरील माहिती वाचली असता पुढील महत्त्वाचे मुद्दे आढळतात. विकिपिडियावरील माहितीच्या सुरुवातीलाच जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे यांचा १८०३ मध्ये संपन्न अशा दैवेज्ञ ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. पुढे असे म्हटले आहे की, समाजातील त्यांची पत एवढी उच्च होती की, अरब, अफगाण आणि इतर पाश्चात्त्य व्यापारी आपली धनसंपत्ती बॅंकांमध्ये ठेवण्याऐवजी जगन्नाथ शंकरशेट यांच्या ताब्यात देत असत. त्यांनी अल्पावधीतच मोठी संपत्ती मिळवली आणि तिचा उपयोग सामाजिक कार्यात दान देण्यासाठी म्हणून केला. १८२४ मध्ये त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन’ची स्थापना करुन शाळा काढली. याच संस्थेचं नाव १८४० मध्ये ‘बोर्ड ओफ एज्युकेशन’ झालं आणि १८५६ मध्ये ‘एल्फिस्टन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन’ झालं. पुढे मुलींच्या शाळेच्या संदर्भातला उल्लेख असा आहे की, जेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी ‘स्टुडन्ट लिटररी अॅन्ड सायन्टिफिक सोसायटी’ची स्थापना झाली तेव्हा जगन्नाथ शंकरशेट यांनी या संस्थेला भरपूर आर्थिक सहाय्य केलं. या सोसायटीची स्थापना जगन्नाथ शंकरशेट यांनी एकट्याने पुढाकार घेऊन केली किंवा त्यांनी पुढाकार घेऊन मुलींची शाळा सुरु केली, असं विकिपिडियावरील या इंग्रजी भाषेतील माहितीतही म्हटलेले नाही.

विकिपिडियावर मराठी भाषेतही जगन्नाथ शंकरशेट यांच्याबाबत माहितीपर लेख आहे. त्यात एल्फिन्स्टन या ब्रिटिश अधिकाऱ्याने १८२२ मध्ये ‘शाळापुस्तक मंडळी’ काढून शाळा सुरु केली, त्याचे आधारस्तंभ नाना होते, असे म्हटले आहे. पुढे हिचे १८२४ मध्ये ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत’ रुपांतर झाले. एल्फिन्स्टन नंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा ‘एल्फिन्स्टन फंड’ जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले (याचा अर्थ या तिघांव्यतिरिक्त बोर्डात पाश्चात्त्य सभासद होते). पुढे म्हटले आहे की, ‘स्टुडंन्टस् लिटररी व सायन्टिफिक सोसायटी’ (१८४८) आणि जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा (१८४९) या त्यांनी स्वतःच्या वाड्यात सुरु केल्या.

भिडेवाडा - सावित्रीबाई फुले यांनी जानेवारी १, १८४८ रोजी सुरु केलेली मुलींसाठी पहिली शाळा
भिडेवाडा – सावित्रीबाई फुले यांनी जानेवारी १, १८४८ रोजी सुरु केलेली मुलींसाठी पहिली शाळा

मुलींच्या शाळेसंदर्भातील वरील उल्लेखात मुलींच्या शाळेचे साल १८४९ दिलेले आहे आणि फुले दाम्पत्याने शाळा सुरु केलेले साल १८४८ आहे. स्वतः वानखेडे यांनी आपल्या पोस्टमध्ये जगन्नाथ शंकरशेट यांनी मुलींची शाळा कधी सुरु केली याचा स्पष्ट उल्लेख न करता ‘१८४५ मध्ये स्टुडन्टस् लिटररी व सायन्टिफिक सोसायटीची स्थापना करुन स्वतःच्या घरात मुलींची शाळा काढली’ असे म्हटले आहे. विकिपिडियावरील इंग्रजी लेखामध्ये या सोसायटीची स्थापना कधी झाली ते दिलेले नाही, मराठी लेखामध्ये ती १८४८ मध्ये झाली, असे म्हटले आहे, तर वानखेडे आपल्या पोस्टमध्ये ती १८४५ मध्ये झाली, असे सांगतात. आपल्या संदर्भासाठी त्यांनी गुगलवरील नेमकी कोणती माहिती वापरली, गुगुलवरील वेगवेगळ्या माहितीत जी तफावत आहे किवा विकिपिडिया या माहितीच्या विश्वासार्हतेबाबत शंका घेतंय, ही बाबही त्यांनी पुढे आणलेली नाही.

जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे यांच्याबाबात विकिपिडियावर जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या सुरुवातीलाच विकिपीडियातर्फे एक डिसक्लेमर टाकण्यात आलेला आहे. तो पुढीलप्रमाणे – ‘या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्त्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यास मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची विश्वसनीयताही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.’ गुगलच्या आधारे आपण माहिती संकलित केलेली आहे, असे स्वतः वानखेडे सांगतात तेव्हा त्या माहितीचे आधार किती तकलादू आहेत, हे इथे स्पष्टपणे दिसून येते.

म्हणूनच हे गुगुलपुराण बाजूला ठेऊन अभ्यासकांनी संशोधनाच्या आधारे जे ग्रंथ सिद्ध केले आहेत ते पडताळले पाहिजेत. यासंदर्भात ‘स्त्री प्रश्नांची चर्चाः एकोणिसावे शतक’ हा प्रतिभा रानडे यांनी लिहिलेला ग्रंथ महत्त्वाचा आहे. या ग्रंथात एक संपूर्ण प्रकरण स्त्रीशिक्षणावर आहे. इथे एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट केली पाहिजे की प्रतिभा रानडे या तथाकथित फुलेप्रेमी नाहीत. स्त्रीशिक्षणावरच्या प्रकरणातही त्यांनी फुले दाम्पत्याचा उल्लेख अत्यंत कमी, जिथे आवश्यक आहे तिथेच केला आहे. या संपूर्ण ग्रंथात पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे आणि ताराबाई शिंदे यांच्यावर स्वतंत्र प्रकरणे आहेत. असं स्वतंत्र प्रकरण सावित्रीबाईंवर नाही. स्त्रीशिक्षणावरच्या ६७ पानांच्या प्रकरणामध्ये सावित्रीबाईंचा शिक्षिका म्हणून उल्लेख एकदाच, पान नऊवर येतो. तोही त्रोटक. तो असा – ‘शाळा तपासणीच्या समारंभाने एक तर्हेची खळबळच समाजात उडवून दिली असे म्हणावयास हवे. एकतर सावित्रीबाई फुले स्वतः शिकून मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात होत्या’, असे एकच वाक्य आहे. या वाक्यात कुठेही सावित्रीबाईंना आद्यशिक्षिका म्हटलेले नाही. त्यांच्या शैक्षणिक कार्याचं कौतुक राहू देत, पण त्याचं वेगळेपण सांगणारं विश्लेषण केलेले नाही. विसंगती अशी की त्याच पान क्रमांक नऊवर प्रतिभा रानडे ‘पुना आब्झर्व्हर’ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला वृत्तांत देतात. जोतिबा-सावित्रींच्या शाळेची १८५३ मध्ये जी जाहीर तपासणी झाली आणि त्यातील हुशार मुलींच्या कौतुकाचा बक्षीस समारंभ गव्हर्नरच्या निवासस्थानी झाला त्याविषयीचा हा वृत्तांत होता. त्याची माहिती देताना प्रतिभा रानडे सांगतात, ‘सरकारी शाळांची जोतिबांच्या मुलींच्या शाळांबरोबर तुलना करुन ‘पूना आब्झर्व्हर’ मध्ये संपादकाच्या एका मित्राने असे मत व्यक्त केले की, सरकारी शाळेपेक्षा जोतिबांच्या शाळेतील मुलींची पटसंख्या दसपटीने मोठी आहे. हा जो आश्चर्यकारक परिणाम झाला आहे त्याला कारण असे की, मुलींना शिकवण्याची जी व्यवस्था झाली आहे ती मुलांच्या शाळेतील व्यवस्थेपेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ दर्जाची आहे. त्यामुळे पुण्यातील विचारवंत पुरुषांना मोठी निराशा वाटत आहे. जर अशीच परिस्थिती चालू राहिली तर सरकारी शाळांमधील मुलांपेक्षा जोतिबांच्या शाळांमधील मुली वरचढ होतील. जर सरकारी शिक्षा मंडळीने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली नाही तर स्त्रियांनी पुरुषांवर मात केली, हे पाहून आम्हा पुरुषांना लाजेने माना खाली घालाव्या लागतील.’ म्हणजे जोतिबा-सावित्रींच्या शाळेतील मुलींच्या यशाने तत्कालिन समाजात काय खळबळ उडाली होती, हेच या वृत्तांतामधून स्पष्ट होते. तत्कालिन कर्मठ, परंपरावादी वातावरणात, मुलगी शिकली तर तिला पाप लागतं, तिचा नवरा मरुन ती विधवा होते अशा समजूती होत्या. अशा स्थितीत सरकारी शाळांमधल्या मुलांपेक्षा जोतिबा-सावित्रींच्या शाळेतील मुली अधिक यश मिळवत होत्या, त्याविषयीचं वृत्त वर्तमानपत्रात छापून येत होतं, ते कशामुळे? कारण त्यांच्या गुणांना वाव मिळेल असं शिक्षण त्यांना मिळत होतं. शेणगोळ्यांचा मारा सहन करुन शाळेत शिकवणाऱ्या सावित्रीबाईच त्यांना हे शिक्षण देत होत्या. १८४८ ला पहिली मुलींची शाळा सुरु झाली आणि १८५३ मध्ये हा शाळा तपासणीचा जाहीर समारंभ झाला. अवघ्या पाच वर्षात अशा हुशार विद्यार्थिनी घडवणाऱ्या सावित्रीबाई-जोतिबांच्या कौतुकाचे चार शब्दही नकोत? कौतुक राहू देत पण अभ्यासक म्हणून तुम्ही या घटनेकडे कसे बघता, याची मांडणी नको? अभ्यासाच्या क्षेत्रातही सावित्रीबाईंच्या कार्याचं किरकोळीकरण हे असं सुरुवातीपासून होत होतं, याचाच हा बोलका दाखला आहे.

प्रतिभा रानडे फुले पक्षपाती नाहीत, हे यावरुन स्पष्ट होईल. म्हणूनच उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे प्रतिभा रानडे मुलींच्या पहिल्या शाळेबद्दल काय म्हणतात ते पाहायला हवे. सुरुवातीला त्याही मिशनऱ्यांनी सुरु केलेल्या शाळांविषयी बोलतात. १८२४ मध्ये मुंबई शहरात ‘अमेरिकन मिशन सोसायटी’ने पहिली मुलींची शाळा स्थापन केली, हे नमूद करतात. पुढे ‘एतद्देशीयांचे प्रयत्न’ या शीर्षकाखाली त्या लिहितात, ‘शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने १८४८ मध्ये ‘स्टुडंटस् लिटररी अॅन्ड सायंटिफिक सोसायटी’ची स्थापना मुंबईमध्ये झालेली होती. भाऊ दाजी लाड, रावसाहेब मंडलिक, दादाभाई नवरोजी वगैरे मंडळी या संस्थेशी निगडित होती. मुलींसाठी शाळा काढणारी ही पहिलीच एतद्देशीय संस्था. १८५१ साली भाऊ दाजी लाड हे या संस्थेचे पहिले भारतीय अध्यक्ष झाले. (आधीचे अध्यक्ष पाश्चात्त्य होते). तेव्हा या संस्थेने चालविलेल्या मुलींच्या एकंदर पाच शाळा होत्या…’ या मांडणीत प्रतिभा रानडे जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव कुठेही घेत नाहीत. इथे प्रामुख्याने ‘स्टुडंटस् लिटररी अॅन्ड सायंटिफिक सोसायटी’शी संबंधित म्हणून भाऊ दाजी लाड व दादाभाई नवरोजी यांचे नाव येते आणि या सोसायटीची स्थापना १८४८ मध्ये झाली, असेही येते.

पुढच्या परिच्छेदात ‘फुल्यांची शाळा’ या शीर्षकाखाली प्रतिभा रानडे लिहितात, ‘एतद्देशीयांनी मुलींसाठी शाळा काढण्याचा दुसरा प्रयत्न जोतिबा फुले यांनी केला. एका द्द्ष्टीने विचार करता फुल्यांचा हा प्रयत्न खऱ्या अर्थाने पहिला एतद्देशीय प्रयत्न म्हणायला हवा. फुले यांच्या अगोदर स्टुडंटस् लिटररी अॅन्ड सायंटिफिक सोसायटीने मुलींसाठी शाळा काढली होती. ती संस्था जरी एतद्देशीय होती तरी त्यामध्ये युरोपिअन लोकांचा सहभाग होताच. तेव्हा फुल्यांनी मात्र संपूर्णपणे स्वतःच्या कर्तबगारीवरच मित्रांच्या मदतीने शाळा काढली. त्यांना युरोपिअनांची सहानुभूती, मदत असली तरी त्यांचा सहभाग नव्हता.’

म्हणजे एतद्देशीय व्यक्तीने संपूर्णपणे एतद्देशीय बळावर काढलेली पहिली मुलींची मराठी शाळा ही फुले यांनी काढली, हे प्रतिभा रानडे इथे मांडत आहेत. हेच मत वेगवेगळ्या अभ्यासकांनी मांडले आहे. ‘स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे जोतिराव हेच पहिले भारतीय होत’, असे धनंजय कीर ‘महात्मा फुलेः साहित्य आणि चळवळ’ या ग्रंथातील ‘शिक्षणतज्ञ म. फुले’ या लेखात सांगतात. (पान क्र.५७).

खरं तर, फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली की नाही, सावित्रीबाई आद्यस्त्रीशिक्षिका होत्या की नाही, हे मुख्य मुद्देच नाही आहेत. मूळात त्यांनी कोणत्या परिस्थितीत हे शैक्षणिक कार्य केलं, हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शैक्षणिक कार्य करताना त्यामागची त्यांची भूमिका काय होती, ही बाब त्यांच्या संपूर्ण कार्याला एक वेगळं परिमाण देते. जोतिबांच्या जन्माच्या आधी काही वर्षंच १८१८ मध्ये पेशवाईचा अंत झालेला होता. पेशवाईच्या काळात पुण्यात ब्राह्मणी वर्चस्वाचं काटोकोरपणे पालन केलं जात होतं. याच काळात रस्त्याने चालताना अस्पृश्यांसाठी गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू बांधणं सक्तीचं झालेलं होतं. गळ्यातलं मडकं थुंकण्यासाठी आणि कमरेचा झाडू रस्त्याने चालताना झालेला विटाळ मागून झाडण्यासाठी. ब्रिटिशांचं राज्य आलेलं असलं तरी पुणे परिसर ब्राह्मणवर्चस्ववादी मुल्यांच्याच प्रभावाखाली होता. त्यामुळेच पाश्च्यात्य मिशनऱ्यांनी मुंबई, कलकत्ता इथे काढलेल्या मुलींच्या शाळा सुरु असताना पुण्यातल्या शाळा मात्र कालांतराने बंद पडत होत्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या चरित्रग्रंथात डा. मा.गो.माळी लिहितात, ‘पुणे म्हणजे भटभक्षुकनिर्मित धर्म व धर्माचाराची राजधानी. मग अशा ठिकाणी स्त्री-शूद्रांना शिक्षण देण्यासाठी शाळा चालू करणे हे तत्कालिन मिशनरी लोकांनासुद्धा जमले नाही. मिस कुक यांनी १८२० साली बंगालमध्ये काही शाळा चालू केल्या. त्यानंतर त्या १८२९ साली मुंबईस आल्या. मुंबई इलाख्यात त्यांनी सहा शाळा काढल्या. लग्नानंतर त्या मिसेस विल्सन झाल्या. १८३० मध्ये त्यांनी पुण्यात शनिवारवाड्यात शाळा काढली. ती कशीबशी १८३२ पर्यंत चालली. शेवटी यशस्वी म्हणून गाजलेल्या मिसेस विल्सन यांना ती बंद करावी लागली. १८४४ साली चर्च ऑफ स्कॉटलंड मिशनने मंगळवार पेठेत एक मुलींची शाळा काढली. तीत युरोपिअन शिक्षिका शिकवत. पण १८४७ मध्ये ही शाळा बंद पडली. या तपशीलावरुन पुण्यामध्ये एकोणिसाव्या शतकात स्त्री व शूद्र यांच्यासाठी शाळा सुरु करुन त्या पुढे चालविण्याचा सर्व प्रयत्न विफल झाल्याचे दिसून येईल.’

याच वास्तवामुळे फुले यांचे समकालीन मामा परमानंद, फुले पतीपत्नीच्या कार्याबद्दल लिहितात, ‘एका मराठ्याने आपल्या पत्नीस शिकवून तिच्या करवी ब्राह्मणांच्या मुलांना शिकविण्याचा त्यांच्या बालेकिल्ल्यात प्रयत्न करणे हे मोठे धाडसाचे काम होते. परंतु त्यांच्या बालेकिल्ल्यात राहून महारमांगांसाठी शाळा उघडून आणि त्यांना समाजाचे घटक म्हणून बनविणे म्हणजे तर सिंहाची आयाळ त्याच्या गुहेतच उपटण्यासारखी गोष्ट आहे.’

फुले यांनी पहिली शाळा काढली की नाही, सावित्रीबाईंच्या आधी स्त्रीशिक्षिका देशात झाल्याच नाहीत का, असे मुद्दे उपस्थित करुन फुले पती-पत्नीच्या कार्याचे किरकोळीकरण करु पाहाणाऱ्यांनी एकदा मामा परमानंद सांगतात तो बालेकिल्ला म्हणजे काय, सिंहाची गुहा म्हणजे काय आणि त्या गुहेत जाऊन ती आयाळ उपटणे म्हणजे काय, हे नीट समजून घ्यावे. वेगवेगळ्या पोस्ट लिहिणाऱ्यांना याचे भान नसले तरी कुजबुज मोहिमेच्या धोरणकर्त्यांना फुले यांनी नेमकी कोणती आयाळ उपटली, याची माहिती आहे. म्हणूनच वेगवेगळ्या लोकांच्या कानात कुजबुजून किरकोळीकरणाचे काम सुरु आहे.

फुले यांनी ब्राह्मणशाहीची, ब्राह्मणी श्रेष्ठत्वाच्या आधारे जातीची उतरंड रचणाऱ्या वैदिक मूल्यांची आयाळ धरली होती. देशातील शूद्र-अतिशूद्र जनतेचं शोषण करणाऱ्या शेटजी-भटजींना त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. गुलामगिरी, तृतीय रत्न, शेतकऱ्याचा आसूड या आपल्या साहित्यातून त्यांनी या विषमतावादी जातव्यवस्थेच्या मागे जे ब्राह्मणीश्रेष्ठत्वाचं आणि वर्चस्वाचं विचारविश्व आहे त्याचा वेध घेतला आहे. स्त्रिया आणि शूद्र-अतिशूद्रांना अध्ययनापासून ते संपत्तीपर्यंतचे सारे अधिकार नाकारत त्यांच्यावर दासवत जिणं लादणाऱ्या स्मृतिग्रंथांना आणि पुराणांना त्यांनी प्रश्न विचारले आहेत. या ब्राह्मणी श्रेष्ठत्वाच्या गुलामगिरीतून शूद्रअतिशूद्रांना बाहेर काढण्याचं एक साधन म्हणून फुले शिक्षणाकडे पाहात होते. केवळ लिहिणे वाचणे म्हणजे शिक्षण नाही, असे वानखेडे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, ते खरेच आहे. फुले यांच्या शाळेत केवळ लिहावाचायला शिकवले जात नव्हते. तर आपल्या सामाजिक स्थानावरुन आपल्या गुलामगिरीचा वेध घ्यायला शिकवले जात होते. म्हणूनच फुले यांच्या शाळेतील चौदा वर्षांची मुक्ता मांग ही विद्यार्थिनी त्याकाळात ‘उदक जर ईश्वराकडून येते तर त्यावर आमचा अधिकार का नाही?’ असा प्रश्न धर्मशास्त्रांना विचारत होती.

तत्कालिन ब्रिटिश अधिकारी आणि एतद्देशीय शिक्षणतज्ज्ञ ‘फिल्टरेशनची थिअरी’ मांडत होते. म्हणजे समाजातील वरिष्ठ वर्णियांना शिक्षण द्या म्हणजे ते खालच्या वर्गातील लोकांना शिक्षण देतील, अशी ही मांडणी आहे. मात्र या मांडणीला फुले यांनी कडाडून विरोध केला. ‘हंटर कमिशन’ समोर दिलेल्या साक्षीत या देशातील उच्च जातीय मागास जातीयांना शिक्षण देणार नाहीत, हे त्यांनी ब्रिटिश अधिकार्यांसमोर स्पष्ट केले. प्राथमिक शिक्षण हे सार्वत्रिक व सक्तीचे असले पाहिजे, अशी मांडणी करणारे फुले हे पहिले भारतीय होते. इथे ज्ञानाची मक्तेदारी ब्राह्मण आणि समकक्ष उच्चवर्णियांच्या ताब्यात राहाण्यास फुले विरोध करत होते. शूद्रादी जातींनी जर प्राथमिक शिक्षणच नीट मिळाले नाही तर ते उच्चशिक्षण घेणार कसे, हा मुद्दा उपस्थित करत जोतिबांनी प्राथमिक शिक्षणाची होणारी आबाळ हंटर कमिशनसमोरच्या साक्षीत सविस्तरपणे मांडली. गुगलपुराण न वाचता फुले यांनी हंटर कमिशनसमोर दिलेली ही साक्ष जरी नीट वाचली तरी फुले हे ब्राह्मणद्वेष्टे होते, का या देशीतील शूद्र-अतिशूद्र आणि स्त्रियांचे मुक्तिदाते होते, हे नीट समजेल. फुले यांनी या देशातल्या ब्राह्मणशाही विरोधात, ब्राह्मणी प्रभुत्वाची ऐतिहासिक मांडणी करणाऱ्या धर्मशास्त्रांच्या विरोधात सांस्कृतिक संघर्ष केला. बंडाचे निशाण रोवले. ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखातून तर शूद्र त्याच्या पायातून ही पुरुषसूक्ताची विषमतावादी मांडणी नाकारत फुले यांनी समतावादाची मागणी केली. सार्वजनिक सत्यधर्माची रुजवात केली. या समतावादाच्या मांडणीत जर कोणाला ब्राह्मणद्वेष दिसत असेल तर ती ब्राह्मणीप्रभूत्ववादी विचारसरणीची गुलामगिरी आहे. ब्राह्मणीप्रभुत्वाच्या मूल्यावर आधारलेली जातव्यवस्था वेगळी आणि या जातीत जन्मलेली ब्राह्मण व्यक्ती वेगळी याचं भान फुले यांना नक्कीच होतं. म्हणूनच शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांना दासवत करणाऱ्या ब्राह्मणीप्रभुत्वाच्या धर्मव्यवस्थेवर कठोर टीका करत असतानाही आपल्या अखंडात ते म्हणतात,

‘मूढ मांगासह ब्राह्म मुजोर, मूळ सत्य सार, त्यांस सांगा
निर्मिकाचा धर्म एक आहे सत्य, व्यर्थ कां पांडित्य, जोती म्हणे…’
‘ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी, धरावे पोटाशीं, बंधुपरी
मानव भावंडे सर्व एकसहा, त्याजमध्ये आहां, तुम्ही सर्व..’

जे परंपरागत विषमतावादी व्यवस्थेला बळी पडून मूढ झाले आहेत आणि जे त्या व्यवस्थेचे सारे लाभ घेऊन मुजोर झाले आहेत अशांनी सत्याचे मानवतावादी सार समजून घ्यावे, असे आवाहन करत जोतिबा ख्रिस्ती, महंमद, मांग, ब्राह्मण या साऱ्यांना बंधुत्वाच्या एका धाग्यात बांधू पाहात आहेत. पण ज्यांना हा बंधुत्वाचा समतावादी धागा मान्य नाही ते फुलेंनाच जातीयवादी, ब्राह्मणद्वेष्टे ठरवणार यात नवल काय?

नाना जगन्नाथ शंकरशेठ
नाना जगन्नाथ शंकरशेठ

जगन्नाथ शंकरशेट हे ब्राह्मणद्वेष्टे नव्हते म्हणून ते दुर्लक्षित राहिले, असे विधानही वानखेडे यांची पोस्ट करते. या देशातील ब्राह्मणीप्रभुत्ववादाच्याविरोधातील, शूद्रांवर दासवत जिणं लादणाऱ्या स्मृतीग्रंथांच्या विरोधातील सांस्कृतिक संघर्षाचं आणि सांस्कृतिक राजकारणाचं हे आत्यंतिक सुलभीकरण तरी आहे किंवा कुजबुजयंत्रणेचा निव्वळ खोडसाळपणा आहे. जगन्नाथ शंकरशेट ज्या एल्फिन्स्टन साहेबासोबत शिक्षणाचं काम करत होते त्या एल्फिन्स्टन साहेबाची शूद्रांच्या शिक्षणाबाबतची मतं काय होती, ते तपासले असता त्यात समतावादी विचारांचा कुठे मागमूसही दिसत नाही. उलट दिसतं ते तत्कालिन सांस्कृतिक राजकारणच.

माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन म्हणतात, ‘मिशनऱ्यांच्या मते खालच्या वर्गातील मुले उत्कृष्ट विद्यार्थी असतात. परंतु त्या वर्गातील लोकांना आपण विशेष उत्तेजन देण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण त्यांचा (खालच्या वर्गाचा) अतिद्वेष केला जातो. एवढेच नव्हे तर समाजात जे अनेक गट आहेत त्यातला हा बहुसंख्य असलेला गट आहे. जर आपल्या शिक्षणपद्धतीने त्यांच्यातच प्रथम मूळ धरले तर शिक्षणाचा प्रसार होणार नाही आणि आपणास पुढे असे आढळून येईल की, जे शिक्षणाने पुढारलेले आहेत परंतु इतर जाती ज्यांचा द्वेष करतात अशा एका नवीन वर्गाचे आपण पुढारी आहोत. मग आपल्याला त्यांनाच पसंत करावे लागेल. जर आपण सैन्याच्या बळावर राज्य करायचे ठरवले असते किंवा लोकांच्या एका घटकाच्या निष्ठेवर सत्तेकरता अवलंबून राहायचे ठरवले असते तर ही गोष्ट चालली असती. परंतु आणखी व्यापक पायावर राज्यसत्ता आधारावयाचे जे आपले प्रयत्न आहेत त्यांच्याशी हे धोरण विसंगत आहे.’

बहुसंख्य शूद्र-अतिशूद्रांना शिक्षण देण्यापेक्षा (जरी ते उत्कृष्ट विद्यार्थी असले तरी) अल्पसंख्य उच्चवर्णियांना शिक्षण देणे आपल्या सत्तेच्या द्द्ष्टीने अधिक योग्य आहे, हे एल्फिन्स्टन साहेबाचे मत नेमकी कोणाची कुजबूज ऐकल्याने, द्वेषाचं नेमकं कोणतं वास्तव पाहिल्याने बनले, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. म्हणूनच फुले दाम्पत्याने केवळ उच्चजातीय मुलींना शिक्षण दिले नाही तर शूद्र-अतिशूद्र जातींमधील मुलींना आणि मुलांनाही शिक्षण दिले, ही बाब एल्फिन्स्टन साहेबाच्या विधानाच्या बाजूला ठेऊन त्याचा तौलनिक अभ्यास व्हायला हवा. तो केवळ गुगलपुराणाच्या वाचनाने होणार नाही.

ब्राह्मणीप्रभूत्व डोक्यावर मिरवण्याची आस एवढी की, केवळ फुले यांनी प्रथम मुलींची शाळा काढली की नाही, याबाबत विवाद निर्माण करुन समाधान होत नाही तर सावित्रीबाई आद्यशिक्षिका होत्या का नाही, याबाबतची मळमळही व्यक्त करण्यात आली आहे. ही पोस्ट लिहिण्यामागचा आपला उद्देश स्पष्ट करताना वानखेडे लिहितात, ‘उद्देश एवढाच की, सावित्रीबाई फुले नसत्या तर जणू या देशातल्या मुली शिकल्याच नसत्या व आज स्त्रियांची जी काय प्रगती व भरभराट झाली ती फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच झाली हा भ्रम नाहिसा व्हावा म्हणून.’

खरं तर, हे विधान वाचून राग येण्यापेक्षा खंतच अधिक वाटतो. सावित्रीबाई होऊन गेल्यावरही या देशातल्या अनेक जातींमध्ये, विस्तारित कुटुंबांमध्ये आजही मुलींची पहिलीच पिढी पदवीधर होतेय, शासकीय अधिकारी होत आहे, डॉक्टर होत आहे. अगदी आताच २२ मे २०१९ ला आत्महत्या केलेली पायल तडवी आठवली तरी काळीज तुटतं. शाळागळतीची, बालविवाहांची, बालविवाहांमुळे अर्धवट राहाणाऱ्या शिक्षणाची आजची आकडेवारी काय सांगतेय? या आकडेवारीत कोणत्या जातवर्गाच्या मुलींची बहुसंख्या आहे, हे जरी तपासलं तरी एकच उत्तर समोर येतं – आजही एक नाही तर अनेक सावित्रीबाईंची समाजाला, इथल्या बहुजनांना गरज आहे.

वानखेडे यांची पोस्ट इथे चर्चेसाठी उदाहरणादाखल घेतली आहे. अलिकडे अशा अनेक पोस्ट तुकड्यातुकड्याने फिरत असतात. मुळात मुलींची पहिली शाळा फुलेंनीच काढली असे म्हणा, हा कोणाचा हट्टाग्रह नाही. अभ्यासाच्या क्षेत्रात, संशोधनामध्ये तो तसा असूही शकत नाही. खुद्द फुलेंनीच काढलेली पहिली शाळा ही १८५१ ला काढलेली होती, असे सुरुवातीचे अभ्यासक मांडत होते. पण नंतर ज्ञानोदय वर्तमानपत्रामध्ये १८४८ ला फुलेंनी पहिली शाळा काढली होती, याचे उल्लेख आढळले आणि फुलेंच्या पहिल्या शाळेचं साल १८४८ झालं. उद्या आणखी काही जुनी अस्सल कागदपत्रं किंवा पुराव्यांचे इतर स्त्रोत सापडले आणि त्यात १८४८ च्याही आधी फुलेंनी किंवा इतर कोणत्याही भारतीय व्यक्तीने मुलींची शाळा स्वबळावर, पाश्चिमात्त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय काढली होती, असे आढळले तर ते स्वीकारले जाईलच. पुरावे दाखवा, कागदपत्रं आणा आणि आपल्या निष्कर्षाची मांडणी करा, ही सामाजिकशास्त्रांतील संशोधनाची पद्धती आहे. गुगलपुराण वाचणाऱ्यांनीही या संशोधनपद्धतीचं पालन करावं.

इथे मुख्य मुद्दा एकच, कोणत्याही पहिलेपणावर जोतिबा आणि सावित्रीबाईंचे मोठेपण अवलंबून नाही. कदाचित कुजबूज परिवाराला याची जाणीव असावी. म्हणूनच ब्राह्मणद्वेष या आरोपाची चिंधी जोतिबा-सावित्री नावाच्या जरीपटक्याला बांधली जाते. ब्राह्मणद्वेष केला असता तर जगन्नाथ शंकरशेट यांचं नाव मुंबई विद्यापीठाला दिलं गेलं असतं, हे वानखेडे यांचे विधान कोणती मनोवृत्ती दाखवते? सावित्रीबाई या केवळ अक्षरज्ञान देणाऱ्या शिक्षिका नव्हत्या तर जीवनज्ञान देणाऱ्या मार्गदर्शक होत्या. त्यांनी हळदीकुंकू समारंभ केला नाही तर तिळगूळ समारंभ करत सर्व जातीधर्माच्या स्त्रियांना, विधवा-विवाहिता अशा सर्व स्त्रियांना एकसमान मानून एका जाजमावर बसून तिळगूळ समारंभ केला जाईल, अशी जाहिरात १८५३ मध्ये दिली. अत्याचार झालेल्या आणि गरोदर राहिलेल्या बालविधवा स्त्रियांची बाळंतपणं केली. यातील बहुसंख्य ब्राह्मण जातीच्या होत्या. औरस-अनौरस हे भेदाभेद न मानता मानव्यालाच सर्वोच्च मानत ब्राह्मण बालविधवेच्या मुलाला, यशवंतला स्वतः दत्तक घेतले. त्याला वैद्यकीय शिक्षण दिले. दुष्काळात अन्नछत्र उघडले. आंतरजातीय विवाह करणाऱ्या एका प्रेमी जोडप्याला गावाच्या हल्ल्यापासून वाचवले. प्लेगच्या साथीत गावोगाव फिरुन रुग्णांना स्वतःच्या मुलाच्या, यशवंतच्या इस्पितळात दाखल केले. गावच्या माळरानावर मुलाच्या सोबतीने हे इस्पितळ उभारले. या साथीतच सावित्रीबाईंचा अंत झाला. पतीच्या माघारीही ही स्त्री स्वयंप्रज्ञेने जगली. आजही स्त्रियांना वैभवलक्ष्मीच्या व्रतात आणि अथर्वशीर्षाच्या पठणात गुंगवून ठेवलेल्या संस्कृतीरक्षकांना सावित्रीबाईंसारखी विषमतावादी परंपरांना विरोध करणारी स्त्री खटकणारच. समतावादी, मानवतावादी मूल्यांची रुजवात करणाऱ्या स्त्रीचं नाव पुणे विद्यापीठाला दिलं गेलं, पुणे विद्यापीठ हे ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ झालं, याचा त्रास अनेकांना झाला. वानखेडे यांच्या पोस्टमधून त्याला केवळ शब्दरुप मिळालं एवढंच.

विषमतावादी जातीय शोषणाला नाकारत प्राचीन संस्कृतीच्या गुणगौरवात अडकलेल्या जातवर्णवर्चस्ववादी वृत्तीला हा असा त्रास होत राहातो, म्हणून मग बहुजनांच्या मानदंडाचे कधी चारित्र्यहनन केले जाते तर कधी किरकोळीकरण. सांस्कृतिक प्रभुत्वाच्या राजकारणात वर्षानुवर्ष ज्यांनी सांस्कृतिक सत्ता भोगली ते या गोष्टी विविध माध्यमातून करतच राहाणार. चिडवत राहाणार आणि दबा धरुन हिंसक प्रतिकार कधी होतो, याची वाट बघत राहाणार. म्हणजे मग अडाणी, रानटी म्हणून बहुजनांना झोडपणे सोपे जाते. ती विषमतावादाची व्यूहरचना आहे.

प्रश्न हाच आहे की, समतावादाची व्यूहरचना काय असणार? या मातीतील विषमतावादाची पाळंमुळं शोधून काढत ती खोडणाऱ्या संशोधनसंस्था कधी उभ्या राहाणार? संशोधनाच्या क्षेत्रातील दलित-बहुजनांमधल्या एकेका व्यक्तीची एकांडी शिलेदारी हे चित्रं कधी बदलणार?

संघर्ष अंतिमतः ज्ञाननिर्मितीचा आणि ज्ञानावरील सांस्कृतिक सत्तेचा आहे. राजकीय सत्ता हे केवळ माध्यम आहे.


संदर्भग्रंथ –

१. महात्मा फुलेः साहित्य आणि चळवळ – संपादकः प्रा. हरि नरके

२. स्त्री प्रश्नांची चर्चाः एकोणिसावे शतक – प्रतिभा रानडे

३.महाराष्ट्रातील स्त्रीविषयक सुधारणावादाचे सत्ताकारण – डा. नारायण भोसले

४.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले – डा. मा.गो.माळी

५.म. फुले समग्र वाङ्मय – संपादकः प्रा.हरि नरके

वरिष्ठ पत्रकार, लेखिकाअसून सामाजिक विषयांच्या अभ्यासक आहेत.

8 Comments

  1. दिलीप चव्हाण Reply

    अतिशय महत्त्वाचा लेख आहे हा. योग्य वेळी तो प्रकाशित झाला. सनातन्यांच्या सर्व मुद्द्यांच्या संध्याताईंनी अक्षरशः चिंधड्या उडवल्या आहेत. जिजाऊ ते सावित्रीबाईसारख्या महान स्त्रियांना कमी लेखण्याची जी हलकट वृत्ती आजही आपल्या समाजात दिसते त्याचा जबरदस्त समाचार घेतलाय या लेखात. त्यांनी लेखात दिलेल्या संदर्भातून या विषयासाठी केलेला सखोल अभ्यास दिसतो. अशा लेखाची खूप गरज होती.

  2. Arjun jagadhane Reply

    खूपच अभ्यासपूर्ण आणि संयत पण तरीही सणसणीत लेख झालाय.

  3. डॉ अनिल खांडेकर Reply

    संध्या नरे – पवार यांचा हा लेख योग्य वेळी प्रसिद्ध झाला आहे. लेखिकेचे आणि संपादकांचे मनःपूर्वक आभार. संघ परिवार आता अधिकाधिक धीट होत चालला आहे. एकूणच पुरोगामी समतावादी . आधुनिक विचाराना आणि महापुरुषांना विरोध करण्याचा कार्यक्रम नेटाने पुढे नेट आहेत . दुर्दैवाने बहुजन समाजातील लोक त्यांच्या काव्याला ओळखत नाहीत . त्याला बळी पडत आहेत. पुरोगामी विचारांना आणि ऐतिहासिक तथ्यांना विरोध करताना कोणत्याही प्रकारची भीड मुर्वत , सत्याची बुज सनातनी ब्राह्मण्य वादी राखत नाहीत . सनातनी अनेक तोडानी फुत्कार सोडतात . खोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्या कडे किंवा काही वेळा चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया देण्याचा कल असतो. पण संध्या नरे –पवार यांनी साधार , अभ्यासपूर्ण , मार्मिक उत्तर दिले आहे. . अनेक वर्षांपूवी एक इंग्रजी संपादक अरुण शौरी यांनी ” Worshipping False Gods: Ambedkar, and the Facts which Have Been Erased ” नावाचे पुस्तक लिहिले होते . डॉ य .दी . फडके यांनी डॉ बाबासाहेब आणि त्यांचे संविधान यांच्या मधील अतूट नाते पुराव्यानिशी , निर्विवाद पणे सिद्ध केले . तेंव्हा पासून तो आवाज बंद झाला. पण पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या संदर्भात उचल घेतो. प्रा. हरी नरके यांनी पण डॉ बाबासाहेब आणि संघ यांच्या संबध दाखविणार्‍या लेखाचे उभे आडवे विच्छेदन केले होते . संध्या नरे – पवार . आपले आभार .

  4. Rohini Vejre Reply

    👍👍 संदर्भांची पडताळणी करून केलेली समर्पक आणि महत्वाची मांडणी. कुजबुजीकरणाचं समाजमाध्यमांवर सार्वत्रिकीकरण होतंय आणि तेच सत्य म्हणून रेटलं जातंय. अशा पार्श्वभूमीवर आलेला; सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातला सावित्रीबाई फुलेंचा मोलाचा वाटा विशद करणारा हा लेख म्हणूनच खूप स्तुत्य आहे. यासाठी संध्या नरे-पवारांचं अभिनंदन.

  5. Alka Gadgil Reply

    अशोक वानखेडे यांनी या ‘कुजबूज’ चळवळीत भाग का घेतला समजत नाही. पहिली मुलींची शाळा कोणी काढली हा प्रश्न उपस्थित करून फुले दांपत्याचं किरकोळीकरण करण्याचा प्रयत्न अनेक वर्षे होत आहे. खूप पुरावे देऊन वानखेडेंसारख्यांना तू सज्जड उत्तर दिलं आहेस

  6. सुरेश पंदारे Reply

    अति शय अभ्यास पुर्वक व संदर्भ देऊन लेख लिहिला आहे.आजही वर्चस्व आहेच . बहुजन समाज मात्र देव धर्म
    याला बळी पडतात.वैचारिक क्रांती ही काळाची गरज आहे

  7. Keshav Bapu Reply

    मुंबई या आपल्या जन्मभूमि आणि कर्मभूमिवर जगन्नाथ शंकरशेठ यांचे निरतिशय प्रेम होतं. भारतात सुरु होणा-या नव्या गोष्टींचा मुळारंभ, हा मुंबईपासूनच झाला पाहिजे, हा नानांचा ध्यास होता. इंग्रजांची भारतातील राजधानी कलकत्ता होती. तरीही या देशात रेल्वेचा मुळारंभ मुंबईपासून झाला, त्याचं सर्व श्रेय नानांना आहे.
    आज रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन (जीवनरेखा) बनली आहे. पण खरोखरच ‘दैवज्ञ’ नानांनी, नियतीच्या हातातली लेखणी काढून घेऊन, स्वहस्ते ती जीवनरेखा मुंबईच्या करतलांवर रेखली आहे. त्यासाठी आपल्या संवादकुशलतेने त्यांनी इंग्रज अधिका-यांचं मन वळवलं. त्यांना सर्वप्रकारच्या सहकार्याचं आश्वासनही दिलं. त्यासाठी १८४३ साली ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. नुसता पुढाकारच घेतला नाही, तर या कंपनीच्या तीन प्रवर्तकांपैकी एक प्रवर्तक नानाच होते. तसेच रेल्वेच्या कार्यालयासाठी स्वत:च्या घरात जागा उपलब्ध करुन देऊन, नानांनी रेल्वेच्या मार्गातील तोही अडथळा दूर केला. अशाप्रकारे १६ एप्रिल १८५३ रोजी, मुंबई-ठाणे या मार्गावर धावलेली ही रेल्वे, फक्त भारतातील पहिली रेल्वे नव्हती, तर आशिया खंडातील पहिली रेल्वे होती. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणा-या, बोरीबंदर-पुणे या रेल्वेमार्गाचे जनकही, नानाच आहेत. नानांच्या या बहुमोल कार्याचा गौरव इंग्रज सरकारने सोन्याचा पास देऊन केला. त्यायोगे नानांना रेल्वेच्या पहिल्या वर्गातून, प्रवासाची सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिली.
    नानांच्या लोककार्याच्या यज्ञाची सांगता इथेच होत नाही, तर मुंबई विद्यापीठ, ग्रँट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जे. जे. स्कूल अॉफ आर्टस, एल्फिन्स्टन कॉलेज या शिक्षणसंस्थांच्या उभारणीत, नानांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. स्रीशिक्षणाचेही नाना पुरस्कर्ते होते. मुलींसाठी त्यांनी स्वखर्चाने स्वत:च्या घरात शाळा सुरु केली. तसेच मुलींसाठी शाळा सुरु करणा-या रेव्हरंड विल्सन यांना शाळेसाठी, गिरगावात जागा उपलब्ध करुन दिली. तत्पूर्वी सन १८४६-४७ मध्ये नानांनी महाराष्ट्रभर हिंडून, शैक्षणिक परिस्थितीची पहाणी करुन, आपले अनुभव बोर्ड अॉफ एज्युकेशनचे अध्यक्ष, सर अर्स्किन पेरी यांना कळविले. त्यातूनच महाराष्ट्रात सार्वत्रिक शिक्षणाचा पाया घातला गेला. त्यामुळेच आचार्य अत्रेंनी म्हटले आहे, “आज मुंबई इलाख्यामध्ये विद्यादानाचा जो विराट वृक्ष पसरलेला दिसतो त्याचे बीजारोपण नाना शंकरशेठ यांनी केले आहे हे प्रत्येक महाराष्ट्रीयाने ध्यानात धरावे. आम्ही हे म्हणतो असे नव्हे तर महर्षि दादाभाई नौरोजींनीच मुळी तसे लिहून ठेवले आहे.”
    अन्य क्षेत्रातली नानांची कामगिरीही थक्क करणारी आहे. ‘ग्रेट ईस्टर्न स्पिनिंग अँड विव्हिंग’ या मुंबई त सुरू झालेल्या पहिल्यावाहिल्या कापड गिरणीचे नाना प्रवर्तक डायरेक्टर होते. गुजरात व सिंधशी दळणवळणासाठी, सन १८४५ मध्ये त्यानी, ‘बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी’ स्थापन केली. ‘याग्रो हार्टिकल्चरल सोसायटी अॉफ वेस्टर्न इंडिया’, ‘जिअॉग्राफिकल सोसायटी’ आणि धान्य व्यापार्यांच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी ‘जॉईंट स्टॉक ग्रेन कंपनी’ या महत्वपूर्ण संस्थांच्या स्थापनेतही, त्यांचाच पुढाकार होता. तसेच १८४२ मध्ये स्थापन झालेल्या ‘बँक अॉफ वेस्टर्न इंडिया’चे ते प्रवर्तक संचालक होते. तर १८५७ मध्ये मुंबईत पहिले नाट्यगृहही बांधले ते नानांनीच.
    नानांच्या कार्याची यादी इथेच संपत नाही. मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी विहार लेकची निर्मिती तर त्यांनी केलीच, शिवाय पाणीटंचाईच्या काळात रेल्वेच्या डब्यांमधून पाणी आणून, ते विहीरी व तळ्यांमध्ये ओतण्याची व्यवस्थाही त्यांनी करविली.
    मुंबईच्या रस्त्यांवर खोबरेल तेलाचे दिवे लावले जात. पण त्यांच्या अपु-या प्रकाशामुळे लोकांची गैरसोय होई, नि चोरचिलट्यांचं फावत असे. इंग्लंडमध्ये रस्त्यांवर ग्यासचे दिवे लावले जातात, ही गोष्ट कानावर येताच नानांनी, तशा प्रकारच्या दिवाबत्तीच्या सोयीसाठी, चिंचपोकळीला ग्यास कंपनी सुरू केली.
    मॉरिशसहून ऊसाचं बेणं आणून त्यांनी आपल्या बागेत त्याची लागवड केली.
    अशा सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधांचं जाळं नानांनी मुंबईत विणलं. त्यामुळेच आज मुंबईला आर्थिक राजधानीचा व आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे. या महात्म्यामुळेच मुंबई ही प्रत्येक मराठी माणसाची स्वप्ननगरी बनली. आयुष्यात एकदा तरी या स्वप्ननगरीला भेट दिल्याशिवाय, त्याला आपलं जीवन असार्थक वाटू लागलं. त्यातूनच ‘जीवाची मुंबई करणे’ हा वाक्प्रचार रुढ झाला. मुंबईवर कवणं रचली गेली. अण्णाभाऊ साठेंनी मुंबईची लावणी लिहीली. तर हिंदी चित्रपटातही मुंबईवर अनेक गीतं लिहीली गेली. ती गाजली, लोकप्रिय झाली.
    आज आम्ही ‘आमची मुंबई, आमची मुंबई’ असं अभिमानाने म्हणतो. पण त्यातून मंबईविषयीचं प्रेम कमी, आणि प्रांतिक अस्मिताच अधिक डोकावते. डोकवे का ना, पण मग मुंबईच्या विकासातही आमचा सहभाग असला पाहिजे, तरच आमची मुंबई म्हणण्याला अर्थ आहे. ज्या निर्जन मुंबईत एकेकाळी लोकांना यायची भीती वाटायची, त्या मुंबईचं नानांनी आपल्या परिसस्पर्शाने सोनं केलं. त्या सोन्याच्या मुंबईची आम्ही बकाल मुंबई करुन टाकली आहे.
    सतीप्रथाबंदीसाठी राजा राममोहन राय यांच्यासोबत पुढाकार घेऊन नानांनी, नऊ वर्षे लढा दिला व सतीप्रथा प्रतिबंधक कायदा करवून घेतला. सतीबंदीसाठीच्या त्यांच्या कार्याची गव्हर्नर जॉन माल्कम यांनी मुक्त कंठाने स्तुती केली. नानांच्या लोकप्रियतेने प्रभावित झालेल्या सर फ्रेडरिक लिओपोल्ड यांनी आपल्या मुलाचं नाव ‘लिओनार्ड रॉबर्ट शंकरशेठ’ असं ठेवलं होतं.
    सरकार दरबारी नानांच्या उत्तरोत्तर वाढत्या प्रभावामुळे, पोटशूळ उठलेल्या नानांच्या हितशत्रूंनी, नानांवर १८५७ च्या उठावकर्त्यांना अर्थसहाय्य केल्याचे व आपल्या धर्मशाळेत त्यांना आश्रय दिल्याची बालंटं आणून, नानांच्या नावे पकडवॉरंट जारी करायला सरकारला भाग पाडले होते. पण हितशत्रुंचे हे कट नानांनी उधळून लावले.
    ज्या काळात भारताच्या राजकिय, सामाजिक व औद्योगिक क्षितिजावर समस्त राष्ट्रीय नेत्यांचा, संस्था-संघटनांचा, उद्योजकांचा उदयही झाला नव्हता, त्या घनतमी, नाना जगन्नाथ शंकरशेठ हा शुक्रतारा, आपल्या तेजाने तळपत होता. म्हणूनच त्यांचे एक चरित्रलेखक डॉ. माधव पोतदार हे नानांना, ‘आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रपुरुष’ संबोधतात, तर नानांच्या जीवनावर “प्रारंभ” ही कादंबरी लिहीणारे सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ, नानांचा ‘आधुनिक भारताचा आद्य शिल्पकार’ असा सार्थ गौरव करतात. व्यक्तिगत पातळीवर नानांच्या कार्याचं महत्त्व जाणणारे अनेक आहेत. परंतु शासकीय पातळीवर मात्र नानांचं ऋण जाणणारा नि त्यातून उतराई होणारा कोणी नाही.
    ज्यांचा शासनाने ‘भारतरत्न’ किताबाने गौरव केला पाहिजे, असे नाना जगन्नाथ शंकरशेठ उपेक्षेचे धनी ठरले आहेत. कारण नानांच्यामागे ना मतपेटीवर प्रभाव टाकू शकणारं ‘सामाजिक पाठबळ’ आहे, ना पुरस्कारासाठी आराडाओरडा करणारी ‘शाऊटिंग बटालियन’ आहे. परिणामी मुंबईवर जीवापाड प्रेम करणारा हा मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, मुंबईतही उपेक्षित आहे. मुंबईच्या विकासासाठी जातीनिरपेक्ष भावनेने, सढळ हातांनी आर्थिक मदत व भूमीदान करणा-या नानांच्या स्मारकासाठी मात्र मुंबईत जागा नाही, एवढी मुंबई कृपण नि कृतघ्न झाली आहे. हे पाहून नानांच्या आत्म्याला काय वाटत असेल…

    हल्लीचे नेते राजकीय लाभाच्या शक्यतेखेरीज, कुणाचीच तळी उचलत नाहीत. आणि त्यांच्या राजकीय लाभाच्या गणितात, नाना मात्र नापास आहेत. शासनाची ही उदासिनता आणि ज्या दैवज्ञ सोनार जातीत नाना जन्माला आले, त्या ज्ञातीबांधवांची आत्ममग्नता खरोखर वेदनादायी आहे.
    सद्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स करण्याचा धंदा जोरात सुरु आहे. ही मंडळी मुलांसमोर देशीविदेशी उद्योजकांचे आदर्श उभे करते, पण त्यांच्या आदर्शांच्या दोनशे वर्षं आधी, नाना जगन्नाथ शंकरशेठ नामक, ‘फर्स्ट इंडियन आयकॉन’ होऊन गेला, हे त्यांच्या गावीही नाही. तर शालेय पाठ्यपुस्तक मंडळालाही त्याचं विस्मरण झालं आहे. इतकी प्रचंड अनास्था या युगपुरुषाच्या वाट्याला आली आहे. याला काय म्हणायचं! वैचारिक दिवाळखोरी की भावी महासत्तेची मस्ती! अपूज्यांची पूजा नि पूज्यांची अवहेलना करुन, भारत महासत्ता बनेल असं कुणाला वाटत असेल, तर तो त्यांचा ‘बनेलपणा’आहे, माझं अस्वस्थ मन मात्र म्हणते आहे…
    जोतिबा फुले हे पर्वतिची टेकडी आहेत तर जगन्नथ शंकरशेठ हे एवरेस्ट शिखर आहेत

Write A Comment