एकीकडे हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत आहे तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संस्था संघटना (सनातन संस्था, श्रीशिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान, श्रीराम सेना, हिंदू युवा वाहिनी, बजरंग दल) या समाजात आक्रमक झाल्या आहेत. कुणी गोरक्षणाच्या मुद्द्यावर, कुणी विवेकवादी, बुद्धिवादी लोकांच्या हत्येच्या निमित्ताने तर कोणी मनुस्मृतीच्या समर्थनाने हिंदुत्ववादी पक्षाच्या सरकारला अडचणीत आणत आहेत असे म्हटले जात आहे. त्यामुळेच अधून मधून सत्ताधारी पक्षांकडून त्यांची (आक्रमक आणि हिंसक हिंदुत्ववाद्यांची) कानउघडणी केल्याचे देखावे उभे केले जात आहेत. कारण, पुढील वर्षी २०१९ मध्ये सार्वजनिक निवडणुका आहेत. हिंदुत्व चळवळीच्या आणि विचारांच्या विरोधी लोकांनी हिंदुत्ववादी चळवळीतील अंतर्विरोध, स्तर आणि श्रमविभाजन समजून न घेतल्यामुळे अनेक घोळ झाले आहेत. मग ते गोळवलकरांचे ‘सांस्कृतिक हिंदुत्व’ असो, सावरकरांचे ‘प्रादेशिक हिंदुत्व’ किंवा मग बाळ ठाकरेंचे ‘ब्राह्मणेत्तरी हिंदुत्व’ असो सगळ्यांनाच एक केले जाते. हल्ली, काही लोक हिंदुत्वाला विज्ञानवादी, धर्मनिरपेक्ष व बुद्धिवादी अभिमान्यता मिळवून देण्यासाठी ‘सेक्युलर हिंदुत्व’, ‘बुद्धिवादी हिंदुत्व’ आणि ‘विज्ञाननिष्ठ हिंदुत्व’ अशीसुद्धा चर्चा करीत आहेत. यातील सगळेच कमीअधिक प्रमाणात भाजप समर्थक असतात. सावरकरांविषयी सगळ्यांनाच प्रेम आणि भिडे गुरुजी विषयी आदर वाटणारेच असतात. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदूहितासाठी काम करणारी संघटना आहे असे म्हणणारे असतात. विशिष्ट कार्यपद्धतीच्या आणि काही विचारांच्या बाबतीत हिंदुत्व चळवळीतील संस्था, संघटना आणि पक्ष यांच्यामध्ये काही फरक आणि वेगळेपणा जरी असला तरी उद्दिष्ट्ये आणि हेतू यांच्याबाबतीत बहुतांश साम्यता त्यांच्या व्यवहारात आणि वर्तनात आढळते.
‘भीमा कोरेगावच्या दंगली’त भिडे गुरुजींचा काहीच सहभाग नाही असे सांगण्यासाठी सावरकरवादी हिंदुत्ववाले, संघवादी हिंदुत्ववाले सगळेच जीवाचे रान करतांना आपल्याला दिसले. सोशल मिडीयावर या सर्व गोष्टींचा मुसळदार पाऊस अजूनही पडत आहे. पण, धुळ्यात आणि पुण्यात भिडे गुरुजींनी ‘मनुस्मृतीचे समर्थन’ करताच सावरकरी हिंदुत्ववाले आणि गोळवलकरी हिंदुत्ववाले भिडे गुरुजींच्या ‘मनुस्मृतीच्या प्रतिपादना’चे आम्ही समर्थन करीत नाहीत असे म्हणत सुटले आहेत. गुरुजी हे राष्ट्रीय विचारांचे, धर्म, देश आणि संस्कृती रक्षणाचे काम करतात हे मात्र आम्हाला मान्य आहे असेही हे लोक म्हणतांना दिसतात. महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील बुद्धिवादी, विज्ञानवादी कार्यकर्ते, अभ्यासक आणि पत्रकार यांच्या हत्येचा संबंध सनातन संस्थेशी लावला जात आहे. काही बाबतीत स्पष्ट धारेदोरे सुद्धा सापडले आहेत. सनातन संस्था ही संघ परिवारातील संस्था नसली तरी व्यापक हिंदुत्व परिवारातील संस्था नक्कीच आहे. त्यामुळे सनातन संस्थेविषयी संघाने, भाजपने, शिवसेनेने आणि तथाकथित बुद्धिवादी सावरकरवाद्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत नाही. सोशल मिडीयावर काही लोकांनी तात्पुरता विरोध केलेला दिसतो त्याचा तेवढा अपवाद म्हणावा लागेल.
हिंदुत्व चळवळीतील अनेक लोक सोई सोईसाठी अनेक गोष्टींचा वापर करतात. बुद्धिवाद, राष्ट्रवाद, विज्ञानवाद, उदारमतवाद, लोकशाही, मानवी हक्क, राष्ट्रीय सुरक्षा, साहित्य चळवळी, शैक्षणिक कार्य, धार्मिक प्रबोधन, सेवा कार्य या सगळ्या गोष्टींचा वापर करून कोणत्याही मार्गाने हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करायचा असा नित्याचा कृतिकार्यक्रम हिंदुत्ववादी संस्था, संघटनांचा असतो. त्यासाठी हव्या त्या गोष्टी ते करत असतात. काहींना वाटेल की, हे आताच सुरु झाले आहे कि काय? पण, हिंदुत्व चळवळीचा इतिहास पाहिला तर आपणास हिंदुत्व चळवळीतील इतिहासात अनेक अंतर्विरोध दिसतील. संघ आणि सावरकरी हिंदुत्व वेगळे आहे असे जरी कितीही म्हटले गेले तरी आधीपासून तर आतापर्यंत यादोन्ही प्रवाहांचे एकमेकांशी सौख्याचे संबंध राहिलेले आहेत. गोळवलकर सरसंघचालक झाल्यावर सावरकरांशी त्यांचे ‘वैचारिक आणि कृती कार्यक्रमाला’ घेवून काही मतभेद झाले होते पण, हिंदुत्ववादी चळवळीच्या खालच्या पातळीवर त्याचा तसा काहीही परिणाम झालेला नव्हता असेच दिसते. कारण, संघाच्या लोकांना सावरकर प्रिय होतेच. कदाचित प्रामुख्याने ब्राह्मणजातीय लोक असल्यामुळे असे घडले असावे असे दिसते. हल्ली ज्याप्रमाणे संभाजी भिडे स्वतंत्र संघटना चालवून हिंदुत्वाचे काम करीत आहेत आणि व्यापक हिंदुत्व चळवळीला पोषक वातावरण निर्मिती करीत आहेत. याप्रमाणे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पांचलेगावकर महाराज, चौंडे महाराज आणि मसुरकर महाराज हे स्वतंत्र चळवळी करीत होते. हे तिन्ही महाराज हिंदू संघटन, शुद्धीकरण आणि गोरक्षण अशा चळवळी करत होते. ह्या चळवळींचा व्यापक हिंदुत्व चळवळीला फायदाच होत होता. ह्या तिन्ही महाराजांचे सावरकरांशी चांगले संबंध होते. त्यांच्यात गोरक्षण, अस्पृश्यता, वर्णाश्रम या संदर्भात काही मतभेद सुद्धा होतेच पण, हिंदुत्व चळवळीच्या निमित्ताने आणि हिंदूहिताच्या दृष्टीने ते मतभेद दूर राहत होते. असेच काही आजही शिव प्रतिष्ठान, सनातन संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंधावरून दिसते असे म्हणावे लागेल.
हिंदुत्वाचे अंतरंग हे ‘ब्राह्मणीकरणा’चे आणि बहिरंग हे ‘हिंदूकरणा’चे आहे असे अभ्यासक-कार्यकर्ते रणजीत परदेशी त्यांच्या ‘फुले-आंबेडकरांचे ब्राह्मणीकरण’ या ग्रंथात म्हणतात. हल्लीच्या संभाजी भिडेच्या मनुस्मृतीच्या समर्थनाने आणि गौरवाने ते सिद्धही होते. पण, विशेषत: ८० च्या दशकानंतर मोठ्या प्रमाणात ‘ओबीसी जातींचा’ हिंदुत्व चळवळीत सहभाग वाढलेला असल्यामुळे थेट जाती-वर्णभेद मानणाऱ्या मनुस्मृतीचे समर्थन आणि गौरव करणे हे अनेक छोट्या- मोठ्या हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि पक्षांना परवडणारे नाही. त्यामुळेच संभाजी भिडेंवर मनुस्मृतीचे समर्थन केले म्हणून काही हिंदुत्ववादी प्रश्न उपस्थित करत आहेत. परंतु, असे प्रश्न उपस्थित करणे म्हणजे गुरुजींचा अपमान करणे असेही काही लोकांना वाटत आहे. या परस्परविरोधी गुंतागुंतीला हिंदुत्व चळवळीतील अंतर्विरोध जबाबदार आहेत. तसेच संख्येचे राजकारण, प्रतिनिधित्वाचे राजकारण आणि अस्मितेंचे राजकारण म्हणजेच पर्यायाने लोकशाही राजकारण सुद्धा जबाबदार आहे. संघ-भाजपचे ‘माधव (माळी, धनगर आणि वंजारी) धोरण’ आणि मंडल चळवळीतून झालेली वर्गोन्नती आणि त्यातून निर्माण झालेल्या सांस्कृतिक अवकाशाच्या गरजेतून मोठ्या प्रमाणात ओबीसी समूह हिंदुत्ववादी चळवळीत सहभागी झालेला दिसतो. या वर्गाचे आर्थिक उन्नती बरोबरच ‘ब्राह्मणीकरण’ झालेले आहे. पण, हिंदू अस्मिता अंगीकृत करून जात अस्मिता दुर्लक्षित केली असली तरी सोबतचे ‘जात वास्तव’ सुटलेले नाही. त्यामुळेच मनुस्मृतीचे समर्थन करून ‘ब्राह्मण महात्म्य’ या समूहाला पचणारे नाही अशी कोंडी ‘ओबीसी हिंदुत्वा’ची झालेली आहे.
ओबीसीप्रमाणेच आदिवासी-दलितांचे सुद्धा झपाट्याने हिंदुत्ववादीकरण होत आहेत. कारण, त्याला ‘ब्राह्मणी-भांडवली आध्यात्मिक बाजार आणि आर्थिक संस्कृतीकरण’ कारणीभूत आहे. २०१४ मध्ये निवडून आलेले दलित आणि आदिवासी खासदार हे भाजप पक्षाचे आणि संघाशी संबंधित आहेत. बहुतेक पुरोगामी चळवळीतील लोक आदिवासी आणि दलित हे मुलत: आणि तत्वत: हिंदुत्वाच्या विरोधात आहेत असे समजत होते. २००२ च्या गुजरात दंग्यांमध्ये आदिवासी-दलित लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होतो हे स्पष्ट झाल्यावर अनेकांच्या धारणांना झटका बसला. परंतू, हिंदुत्व चळवळीचा इतिहास जर अभ्यासला किंवा चाळला तर असे शॉक आणि झटके बसू शकत नाही. कारण, हिंदुत्व चळवळीच्या आधीपासूनच आदिवासी-दलित लोकांना शुद्ध आणि संस्कारित करून हिंदुत्व चळवळीत घेण्याची खूपच जूनी परंपरा आहे. महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात ब्राह्मणी वर्चस्वाच्या विरुद्ध ब्राह्मणेत्तर चळवळ गतिशील आणि प्रभावी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंदुत्व चळवळीला या दोन्ही प्रांतात जनसमूहांमध्ये प्रसार करता आला नाही पण, विशिष्ट लोकांमध्ये त्यांनी घट्ट जाळे विणलेले दिसते. त्याचाच त्यांना पुढील विस्तारासाठी आणि प्रचारासाठी मोठा फायदा झालेला दिसतो. उदा. १९२५ मध्ये जन्माला आलेला संघ १९३५ पर्यंत म्हणावा तसा प्रभावकारी नव्हता. १९३५ च्या पुढे बहुतेक महाराष्ट्रीयन ब्राह्मणांनी संघाचा हिंदुत्वाचा विचार देशभर पसरवला. मद्रास, अलाहाबाद, कलकत्ता, लाहोर, दिल्ली अशा शहरांमध्ये ही महाराष्ट्रीयन ब्राह्मण मंडळी जावून संघाचा विस्तार करू लागली. मराठी सत्ता १८ व्या शतकात देशभर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असल्यामुळे राजे, जहागीरदार यांच्यासोबत महाराष्ट्रीयन ब्राह्मण सुद्धा देशभर मराठी राज्यांचे लेखणीक, पुरोहित म्हणून स्थायिक झालेली आहेत. या मराठी संस्थानिकांचा आणि मराठी ब्राह्मण घराण्यांचा संघाच्या नव्हे तर एकूणच हिंदुत्व चळवळीच्या प्रसाराला आणि विस्तारला खूपच मोठा फायदा झालेला दिसतो. वसाहतिक काळात महाराष्ट्रात (त्यावेळी बॉम्बे प्रांत) आणि तमिळनाडूत (त्यावेळी मद्रास प्रांत) बहुसंख्य शुद्धी आणि संघटन चळवळीच्या नावाने हिंदुत्वाचा प्रसार आणि प्रचार करणारे बहुतेक लोक ब्राह्मण होते त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीने हिंदुत्वाच्या नावाखाली यांना ‘ब्राह्मणशाही’ प्रस्थापित करायची आहे असे म्हणत हिंदुत्व चळवळीला आडकाठी केली. तरीही काही प्रमाणात या प्रांतांमध्ये हिंदुत्व चळवळ पसरलेली दिसते.
उत्तर भारतात या चळवळीचा प्रभाव पडला तसा महाराष्ट्र आणि तामिळनाडू पडलेला दिसत नाही. आर्य समाज, हिंदू महासभा आणि दलितोद्धार सभा यांच्या माध्यमातून उत्तर भारतात (ज्याला हिंदी बेल्ट असेही म्हटले जाते.) हिंदुत्व चळवळीने ‘हिंदी, हिंदू और हिंदुस्थान’ ही घोषणा देत दलितांना-आदिवासींना ‘आत्मसात’ करून सामील करून घेतले. आर्य समाज, हिंदू महासभेचा एक गट आणि दलितोद्धार सभेत मोठ्याप्रमाणात आर्य धर्म, वैदिक धर्म अशी चर्चा करत मुस्लीम आणि ख्रिश्चन यांना अराष्ट्रीय संबोधणारे ब्राह्मणेत्तर लोक (उदा. जात, राजपूत, यादव इत्यादी.) असल्यामुळे ती एकाचवेळी सनातनी वर्णधर्म, ब्राह्मण्य मानणाऱ्या ब्राह्मणांशी झगडत होती आणि सोबतच मुस्लीम आणि ख्रिश्चन यांना शत्रू म्हणून रंगवत ‘अखिल हिंदू’ चे संघटन करीत होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या काही दशकात सुरु असलेल्या या चळवळीचा पुढे १९३० च्या नंतर सावरकर नेतृत्वाखालील हिंदू महासभा आणि संघ यांना खूपच फायदा झालेला दिसून येतो. याच काळात चर्मकार, जाटव, कोळी अशा अनेक दलित, आदिवासी जातींचे हिंदुत्वकरण उत्तर भारतात झालेले दिसते. महाराष्ट्रात याचकाळात डॉ. आंबेडकर कृतीशील झाल्यामुळे हिंदुत्वचळवळीला आपला प्रसार दलित आणि आदिवासींमध्ये वाढवता आला नाही. आंबेडकरांना महारांचा नेता म्हणून संकुचित करून चांभार आणि मांग जातीच्या लोकांना काही लोकांना हाताशी धरून काही प्रयत्न हिंदू महासभेने केलेले दिसतात. त्यांना त्यात यश आलेले दिसत नाही. परंतू, आंबेडकरांच्या धर्मांतराच्या आणि विशेषत: त्यांच्या मृत्यूनंतर हिंदुत्व चळवळीने बौद्ध आणि हिंदू अस्पृश्य अशी विभागणी करत आपला डाव यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतर हिंदुत्ववादी संस्था, संघटनांपेक्षा शिवसेनाच नवबौद्ध आणि हिंदू दलित अशी फुट पाडण्यात मोठ्याप्रमाणात यशस्वी झालेली दिसते. सर्व अस्पृश्य, आदिवासी, भटके आणि गरीब लोक हे ‘दलित वर्ग’ आहेत ही दलित पंथरची ‘वर्गीय भाषा’ शिवसेनेच्या ‘धार्मिक भाषे’ने अप्रस्तूत ठरवली. वसाहतिक काळात ज्या गोष्टी करून दलितांचे हिंदुत्वकरण झाले होते. त्याचप्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रात केल्या जात आहेत. प्रत्येक दलित जातींमध्ये ‘मिथक पुरुष’ उभे करून त्यांच्या सहाय्याने हिंदुत्वाचा सांस्कृतिक, धार्मिक खेळ करून दलितांना जाती जातीमध्ये वेगळे पाडून ‘हिंदू’ या अस्मितेखाली एकत्र आणले जात आहे. यातूनच अनेक अंतर्विरोध हिंदुत्व चळवळीत निर्माण होत आहेत. एकीकडे भारतात जन्मलेले सर्व धर्मीय लोक हे हिंदू आहेत असे म्हणायचे आणि दुसरीकडे दलितांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला तर त्याची निंदानालस्ती करायची, हेटाळणी करायची. असे दुतोंडी वर्तन करण्याचा अग्रक्रमांकाचा मान हिंदुत्वाचे सिद्धांतकार सावरकर यांना जातो. हल्ली, आंबेडकरांना हिंदुत्ववादी म्हणून प्रस्तूत करत असतांना आंबेडकरांवर टीका करून सावरकरांनी कशी चूक केली असे म्हणत चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न काही बुद्धिवादी हिंदुत्ववादी लोक करत आहेत. सामाजिक समरसता मंच आणि लहूजी साळवे, वाल्मिकी आणि संत रोहिदास यांच्या नावाने छोट्या मोठ्या संस्था, संघटना काढून दलितांचे विशेषत: महारेत्तर दलितांचे झपाट्याने हिंदुत्वकरण केले जात आहे. त्यासोबतच, बौद्ध झालेल्या महारांचे सुद्धा हिंदुत्वकरण करण्याची विशिष्ट पद्धती विकसित झालेली दिसते. यामध्ये ‘बौद्ध मध्यमवर्गीय’, ‘नवबौद्ध संधिसाधू राजकीय वर्ग’ आणि वैयक्तिक महत्वाकांशा असलेले लोकांचा सोई सोईने वापर करून घेतला जातो. १९२० च्या दशकात इस्लाम आणि ख्रिश्चन विरोधासाठी म्यानमारच्या भिक्षु उत्तम यांना हिंदू महासभेने अध्यक्ष करत ‘हिंदू-बौद्ध आघाडी’ची राजकीय खेळी खेळलेली आहे. तशीच खेळी अजूनही काहीप्रमाणात खेळण्यात येतांना दिसू शकते. त्यामुळेच ‘ओबीसी हिंदुत्व’प्रमाणेच ‘दलित हिंदुत्व’ आकारास येत आहे. सोबतच वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून झपाट्याने आदिवासी जनसमूहांचे हिंदुकरण करण्यात येत आहे. अशा प्रकारे ‘हिंदुत्व चळवळीच्या अंतर्गत ब्राह्मणीकरण आणि लोकशाहीकरण’ होतांना दिसत आहे.
‘सावरकरांना भारतरत्न मिळाला पाहिजे’ अशी मागणी शिवसेनेने लावून धरलेली आहे. संघ,भाजप यांना सावरकर तुलनेने जास्त वैचारिकद्रष्ट्या जवळचे असतांनाही ‘शेंडी-जानव्याचे म्हणजे ब्राह्मणांचे हिंदुत्व’ न मानणाऱ्या शिवसेनेने सावरकरांच्या नावाने ही मागणी केली त्याला अनेक संदर्भ आहेत. ८० च्या दशकानंतर मोठ्याप्रमाणात ओबीसी समूह हिंदुत्व चळवळीत आला हे आपण वर पहिले आहे. त्याला ‘ओबीसींचे हिंदुकरण’ आणि ‘हिंदूत्वाचे ओबीसीकरण’ असे म्हटले गेले आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यावर मोदींचे ‘ओबीसीत्व’ जागे करून संघाच्या ‘ब्राह्मणी –हिंदुत्वा’वर मात करता येईल अशी चर्चा काही कंडे ओबीसी नेते आणि विचारक करत होते. परंतू, हिंदुत्वाचे बहिरंग जरी हिंदुकरणाचे असले तरी अंतरंग हे ब्राह्मणीकरणाचे आहे त्यामुळे तेथे ‘निव्वळ ओबीसीत्व’ शिल्लक राहूच शकत नाही याची त्यांना जाण नव्हती असेच म्हणावे लागते. हल्ली, सावरकरी ‘अभ्यासकांचे समाजशास्त्र’ बदलल्यामुळे सावरकरी हिंदुत्वाचा व्याप आणि आवाका वाढवला जात आहे. त्यामुळेच ‘बुद्धिवादी हिंदुत्व, विज्ञाननिष्ठ हिंदुत्व आणि सेक्युलर हिंदुत्व’ अशी चर्चा केली जात आहे. आधी करंदीकर, सहस्त्रबुद्धे, गोखले अशा आडनावांची लोक लिहित होती त्यामुळे सावरकर ‘ब्राह्मणशिरोमणी’ बनविले जात होते. पण, आता मोरे, गायकवाड, कांबळे अशा नावाची लोक लिहिते झाल्यामुळे त्यांना ‘ब्राह्मणशिरोमणी’ सावरकरांपेक्षा ‘हिंदूराष्ट्रपती’ सावरकरच अधिक महत्वाचे आणि व्यापक वाटतात. अभ्यासकांचे समाजशास्त्र बदल्यामुळे अभ्यासाचे विषयवस्तू सुद्धा बदललेले दिसतात.
आधी हिंदुत्ववादी विचार आणि चळवळ पुरुषकेंद्री आणि पितृसत्ताक आहे असे म्हटले जायचे किंबहुना अजूनही विरोधी पक्षाच्या आणि विचारांच्या लोकांकडून तसे म्हटले जाते. त्यासाठी संघात स्त्रियांना प्रवेश नाही येथपासून तर ‘पुण्यभू’ आणि ‘पितृभू’ असे पुरुषी शब्द वापरले जातात येथपर्यंत अनेक आक्षेप घेतले जातात. बहुतेक आक्षेपांमध्ये काही तथ्य जरी असले तरी खूपच वरवरचे आहेत. कारण, जरी स्त्रियांना संघात हिंदुत्ववादी चळवळीने स्थान दिलेले नसले तरी आधीपासून हिंदुत्ववादी चळवळीत स्त्रियांचे कमी अधिक प्रमाणात स्थान होते असेच दिसते. हिंदू महासभेच्या वतीने ‘अखिल हिंदू स्त्रियांचे हळदी-कुंकू’चे कार्यक्रम होतच होते. हे हळदी कुंकूचे कार्यक्रम वरवरून जरी ‘सांस्कृतिक –धार्मिक’ वाटत असले तरी ते खऱ्याअर्थाने राजकीय कार्यक्रम होते. हल्ली, त्याच हळदीकुंकुचे सर्वपक्षांच्या महीला आघाडीच्या वतीने सर्रास कार्यक्रम केले जातात. हळदीकुंकूपासून ते दुर्गादौडच्या निमित्ताने मोठ्याप्रमाणात स्त्रियांना ‘धार्मिकतेच्या, संस्कृतीच्या आणि मनोरंजनाच्या नावाखाली हिंदुत्ववादाच्या सांस्कृतिक राजकारणात सामावून घेतले जाते. त्यामुळेच, तर जगातील सर्वात मोठी स्त्रीवादी संघटना म्हणत राष्ट्र सेविका समिती जागतिक महिला दिन साजरा करतांना दिसते. ‘ज्ञानप्रबोधिनी’पासून ते ‘स्वरूपवर्धिनी’पर्यंतच्या हिंदुत्ववादी संस्था, संघटना रूढअर्थाने ‘बालविवाह, विधवाविवाहविरोध, सतीप्रथा, मनुस्मृतीवाल्या राहिलेल्या नसून आधुनिक स्त्रीशक्तीवाल्या (स्त्रीमुक्ती नव्हे) झाल्या आहेत. याचा अर्थ ह्या संस्था-संघटना स्त्री-पुरुष समता ह्या सगळ्या गोष्टी मानायला लागल्यात असेही नाही तर बदलत्या काळाचा फायदा घेवून पुन्हा आपला जुनाच रेटा नवीन पद्धतीने लावून आहेत. त्यामुळेच, तर हिंदुत्ववादी स्त्रिया स्त्रीवादाला पाश्चमात्य संस्कृतीचे खूळ असे म्हणतात. अलीकडच्या काळात साध्वी असलेल्या हिंदुत्ववादी स्त्रियांनी लव जिहादच्या निमित्ताने आणि मुस्लीम जननक्षमतेच्या संदर्भात केलेल्या टिपण्या खूपच बोलक्या आहेत. एकीकडे आजन्म साध्वी बनून हिंदुत्ववादी चळवळीला ‘आध्यात्मिक बळ’ देणाऱ्या स्त्रिया तर दुसरीकडे पतीव्रताधर्म पाळत राष्ट्रासाठी शिवाजीसारखा शूरवीर आणि धर्मनिष्ठ मुलगा जन्माला घालून ‘कौटुंबिक बळ’ देणाऱ्या स्त्रिया असा सगळा गोतावळा हिंदुत्ववादी स्त्री संघटना आणि संस्थेमध्ये आतापर्यंत दिसत होता. आता काही बदल काळाच्या रेट्यामुळे करावे लागत आहेत. त्यामुळे हल्ली धर्म, संस्कृतीला आपली अस्मिता बनवत आधुनिक पोस्ट फेनिझमवाल्या स्त्रिया आणि मुली हिंदुत्व चळवळीत दिसत आहेत. यातून नवीन प्रकारचे प्रश्न सुद्धा निर्माण होत आहेत.
आधुनिकता- परंपरा, जुने-नवे, विज्ञान, बुद्धिवाद, धर्म, संस्कृती, जागतिक – स्थानिक अशा सगळ्याच कोटीक्रमांना, संकल्पांचा हिंदुत्ववादी लोक आपल्या सोई सोईने वापर करून घेत असले तरी आपला विचार, अस्मिता म्हणून एकसुरी होण्याचा, धर्म, संस्कृती, राष्ट्र यांच्याबाबतीत सरसकटीकरण करून विरोधी विचारांच्या लोकांना देशद्रोही, धर्मद्रोही, हिंदुद्रोही, राष्ट्रद्रोही असे लेबले लावण्याचा ठेका काही सोडत नाही. हल्ली, फुरोगामी, फेक्युलर, सिक्युलर, फिबलर असे म्हणत पुरोगामी, सेक्युलर आणि लिबरल विचारांची निंदानालस्ती आणि विरोध करण्याचा नित्यक्रम जोरदारपणे हिंदुत्ववादी वर्तुळात आणि परिवारात होतांना दिसतो. ह्या सर्व गोष्टी हिंदुत्ववादी विचारांना पोषक वातावरणनिर्मिती म्हणूनच केल्या जातात. ह्या गोष्टी करणारे सगळेच अशिक्षित आणि पारंपारिक लोक नसतात. त्यांच्यामध्ये युरोप-अमेरिकेत स्थायिक झालेले, उच्चशिक्षित, विज्ञान-तंत्रज्ञानाचे प्रोफेशनल असे सगळ्याच प्रकारचे आंग्लभाषिक असतात. पण, त्यांचे ‘स्वदेशी’, ‘स्वधर्म’ प्रेम ओसांडून वाहत असते. प्रातिनिधिक स्वरुपात बोलायचेच झाले तर एकीकडे राजीव मल्होत्रासारखे लोक परदेशात स्थायिक होवून ‘तथाकथित ब्रेकिंग इंडिया’ कंपनीच्या विरोधात स्वदेशी लढा लढत आहेत. दुसरीकडे, रामदेव बाबा आणि कंपनी स्वदेशीच्या नावाने एकाबाजूला आंतरराष्ट्रीय ब्रांड बनवत आहे आणि दुसऱ्याबाजूला देशात मोफत आणि स्वस्तात शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहे.
अशा अनेक परस्परविरोधी गोष्टी आपणास हिंदुत्ववादी चळवळीत स्पष्टपणे हल्ली दिसून येत आहेत. ह्या घडामोडींमुळे हिंदुत्व परिवारात काही अंतर्विरोध उभे जरी राहत असले तरी ते एकमेकांच्या शत्रुभावी आणि विरोधी बनत नाही. कारण, हेच हिंदुत्वाचे श्रमविभाजन आहे आणि यातूनच त्यांचे ‘सेवा कार्य’ आणि ‘रक्षा कार्य’ असे दोन्ही परस्परपूरक बनत चालतात हे समजून घेणे खूपच महत्वाचे आहे. धार्मिकतेचा बाजार, सांस्कृतिक भांडवलशाही आणि नवउदारमतवाद यांचा या एकूणच प्रकियेवर मोठा प्रभाव पडत आहे आणि त्यातून हिंदुत्व आणि हिंदुत्व चळवळीचे पुनरुत्पादन होत आहे. हल्लीच्या सामाजिक-आर्थिक-मानसिक व्यवस्थेतून अगणित मेंदू-मनोविकार जन्माला येत आहेत, त्यामुळे निरुत्साही होणे, नेहमी थकल्यासारखे जाणवणे, स्वत:विषयीच संदिग्ध राहणे, आत्मविश्वास हरवणे, कल्पक आणि रोमांचकारी स्वप्नसुद्धा न पडणे, सातत्याने भीती आणि दडपण वाटणे, अशा अनेक गोष्टी होतात. याच प्रक्रियेला माणसाचे ‘अमानवीकरण’ असे म्हणतात. अशा सामाजिक-मानसिक-आर्थिक विवंचनेतून बाहेर पाडण्यासाठी सर्वसामान्य लोक मार्ग शोधत असतात. याच परिस्थितीचा फायदा घेवून ‘नवधार्मिकता’ शिकवणारे बुवा-बापू-अम्मा लोक ‘अध्यात्मिक बाजार’ वाढवतात. या आध्यात्मिक बाजारातून ‘नवधार्मिक साधक’ आणि ‘धार्मिक उपभोक्ता’ दोन्ही निर्माण केले जातात. पंतजलीचे रामदेवबाबा, आर्ट ऑफ लिविंगचे रविशंकर, सनातनचे आठवले ह्या सगळ्या लोकांचे हिंदुत्व चळवळीशी संबंध आहेत. बाबा रामरहीम, आसाराम यांच्यासारख्या अनेक ‘आधुनिक दैवीपुरुष’ लोकांनी गैरकृत्य केल्यामुळे शिक्षा झालेली आहे. पण तरीही त्यांच्या वतीने साधक लोक समर्थन मोर्चे काढतात, पत्रके वाटतात. तसेच बाबा आणि बापू हे निर्दोष आहेत असे भक्तिभावाने भावनिक होवून सांगत असतात. यातून आपल्याला स्पष्टपणे कळून येईल की, आध्यात्मिक बाजारातून निर्माण झालेला ‘नवधार्मिक साधक’ आणि ‘धार्मिक उपभोक्ता’ किती जैविकपणे यासर्व प्रक्रियेशी जोडलेला असतो. अध्यात्मिक बाजाराप्रमाणेच सांस्कृतिक भांडवलशाहीच्या माध्यमातून ‘सर्जनशीलता, निर्मितीक्षमता, स्वातंत्र्याची ओढ, नव्याचा शोध घेण्याची धडपड, प्रश्न विचारण्याची क्षमता आणि आभाळाला गवसणी घालण्याची धमक ही माणूसपणाची सर्व लक्षणे अमानवीकरणाच्या आर्थिक-लैंगिक-भावनिक आणि सामाजिक पिळवणूक तंत्राने संपविली जात आहेत आणि माणसाच्या भाव-भावनांचे, नातेसंबंधाचे, प्रेमाचे रूपांतर नफा- तोट्यात होत आहे. सौंदर्य, सेक्स, आनंद, मैत्री, विश्वास, श्रद्धा आणि प्रेम या सगळ्यांचेच यांत्रिकीकरण आणि वस्तूकरण होऊन त्याचा बाजार भरताना दिसतो. म्हणूनच ब्यूटी मार्केट, सेक्स मार्केट, कॉमेडी शो, स्पिरिच्युअल मार्केट सध्या झपाट्याने वृद्धिंगत होताना दिसत आहे. सोबतच, नवउदारमतवादी धोरणांमुळे दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. आर्थिक विषमता वाढत आहे. ह्यामुळे काहीही करून (उदा. चोऱ्यामाऱ्या, फसवेगिरी, भ्रष्टाचार) विनाश्रम पैसा कमविण्याकडे लोकांची वृत्ती वाढतांना दिसत आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेत आध्यात्मिक बाजार, सांस्कृतिक भांडवलशाही आणि नवउदारमतवाद यांच्या माध्यमातून प्रेमाच्यानावाखाली द्वेष, रक्षणाच्यानावाखाली हिंसा, एकतेच्यानावाखाली तिरस्कार वाढत आहे. हल्ली, आध्यात्मिक बाजार, सांस्कृतिक भांडवलशाही आणि नवउदारमतवाद यांचे गुंतागुंतीचे पण जैविक अनुबंध दिसून येत आहेत आणि त्याचा हिंदुत्ववादी चळवळीला फायदा होतांना दिसत आहे. त्यामुळेच या सर्व प्रक्रियेतून निर्माण होणारा हिंदुत्वाचा साधक, ग्राहक आणि उपभोक्ता असलेला कार्यकर्ता हा एकाचवेळी विज्ञानवादी डॉ. दाभोलकर, कामगार नेते कॉ. पानसरे, लेखक-विचारवंत डॉ. कलबुर्गी आणि सत्यान्वेशी पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनामध्ये सहभागी होता असे तपासयंत्रणेच्या शोधातून समोर येत आहे. सनातन संस्था, श्रीशिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या सारख्या संघटनांचे कार्यकर्ते तपासयंत्रणेच्या धारेवर आल्यापासून संघ परिवार आणि सावरकरी सर्कल मधील लोक ‘ते लोक’ हिंदुत्व चळवळीतील कसे नाहीत हे सांगत आहेत. पण, हिंदुत्व चळवळीची कार्यपद्धती पाहिली तर आपणास यात काहीच नवीन नाही हे स्पष्टपणे कळून येईल. हिंदुत्ववादी कार्यकर्ते जरी एकाच संस्था-संघटनेतील नसले तरी व्यापक हिंदुत्व परिवारातील सदस्य नक्कीच असतात. त्यामुळे त्यांच्याकडून योग्यवेळी आणि योग्यस्थळी हिंदुत्व बंधुभावाला (Saffron Brotherhood) ठीकवणारा व्यवहार नेहमीच होत आला आहे. म्हणूनच हिंदुत्व चळवळीतील आणि परिवारातील अंतर्विरोध हे शत्रुभावी अंतर्विरोध नसून बंधुभावी श्रमविभाजन आहे. हल्ली, हे श्रमविभाजन हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी झपाट्याने कार्यतत्पर झालेले दिसते. म्हणून हिंदुत्व चळवळीचा अभ्यास करणे मला अगत्याचे वाटते.
सामाजिक
7 Comments
अतिशय उत्तम विश्लेषण आणि हिंदुत्वाचे न दिल्याने पैलु दाखविल्याबद्दल आभार.
हिंदुत्व वाद्यांच्या राजकारणाचे अनेक पदर / अनेक सामाजिक – जातीय स्तरांमध्ये पोचलेला विचार — हे सर्व श्री देवकुमार अहिरे यांनी सविस्तर मांडले आहे. ब्राह्मण ,ब्राह्मणेतर जाती , गट , बौद्ध . आदिवासी अशा प्रत्येक गटासाठी त्यांची व्यूहरचना वेगळी आहे , पण अखेर सर्व प्रवाहांचा मुख्य स्त्रोत संघ विचार आहे . हे महत्वाचे . प्रत्येकासाठी व्यूहरचना वेगळी असली तरी त्यामागील विचार — हिंदू राष्ट्र स्थापनेचा आहे आणि त्याचवेळी हिंदू शिवाय असलेले सर्व आणि डाव्या विचारांचे -पुरोगामी – आधुनिकतेचा – विज्ञानाचा आग्रह धरणारे सर्व गट दुय्यम आहेत . ही दोन पायाभूत तत्वे आहेत .दुसरा मुद्धा — आधुनिक राज्यव्यवस्था त्यांच्या विचारामध्ये अंतर्भूत नसल्यामुळे , लोकशाही , समाजवाद , सेकुलरीझाम , समता , उदारमतवाद यां मूल्यांना काही स्थान नाही. आधुनिक भारतात स्वातंत्र्य आंदोलनात विकसित होत गेलेल्या अनेकविध बहुसांस्कुतिक . सर्व समावेशक अशा बाबी या सर्व प्रकारच्या हिंदुत्व वाद्यानी नाकारलेल्या आहेत . एक धर्म , एक देश , एक संस्कुती , एक भाषा , एक नेता अशा त्यांच्या घोषणा आहेत . तिसरा मुद्धा — आता अनेक गटांसाठी असलेल्या विकेंद्रित सांस्कुतिक राष्ट्रवाद स्वीकारते पण नेतृत्व मात्र एक केद्रित असते .
हे सर्व महत्वाचे मुद्धे आहेत , पण महत्वाचे असे कि यावर कोणताही तोडगा लोकशाही वादी , पुरोगामी शोधत नाहीत . तो जर नसेल तर निराशाजनक स्थिती आहे.
बरं मग.? तुमचा प्राॅब्लेम काय आहे.?
☺
हे सर्व हिंदूचे विचार आहेत या बद्दल ख्रिश्चन व मुस्लिमांची काय मते आहेत? हिंदूचे विरोधक हिंदू हे तर historical आहे. शिवाय ब्राह्मण जातीला झोडापण्यात सर्वानाच बळ येत असते. खेड्यापाड्यात दलितांवर अत्याचार आता कोण करतात ? तिथे तर दलीत व ब्राह्मण दोघेही पार हद्दपार झाले असून त्यांनी शहरांचा आश्रय धरला आहे. तेथील प्रगत व सत्तास्थानी असलेल्या समाजाबद्दल ब्र सुद्धा काढायची हिंमत होत नाही या लोकांची.
Protecting corporate interest and implementing Hindutva agenda of dominance or hegemony is an alliance formed by RSS BJP combine Game of identity politics and illusion of development aptly called regressive modernity has come together
Studious article.pls write about what is tobe done?