fbpx
विशेष

काँग्रेसला का लागलीय मध्ययुगात परतण्याची आस !

हा लेख लिहायला सुरवात करण्याआधी मी  गुगलला भेट दिली, दोन गोष्टींसाठी.

 एक: हाऊस ऑफ कार्ड्स या नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय अमेरिकन मालिकेत एक पात्र चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या तसबिरीवर थुंकतं असा प्रसंग आहे. यावर काही वादंग अमेरिकेत झाले होते काय हे पाहण्यासाठी .
दोन: पंजाबमध्ये धर्मनिंदेविषयी पीनल कोडात जी तरतूद आहे त्यात `सुधारणा’  करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्याविषयी आपल्याकडच्या पेपरात काही आले आहे काय हे शोधण्यासाठी.
दोन्हीही गुगल-शोधांतून फार काही हाती लागले नाही.
प्रथम हाउस ऑफ कार्ड्समधल्या प्रसंगाविषयी.  फ्रॅंक अंडरवूड नामक अमेरिकन राजकारणी हा या मालिकेचा नायक. पाताळयंत्री आणि स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेपायी खूनहि करायला मागे-पुढे न पाहणारा असा.  मी उल्लेखतोय त्या  प्रसंगात तो चर्चमध्ये एकटा असताना देवाला उद्देशून एक स्वगत म्हणतो, आणि त्याचा शेवट भिंतीवर टांगलेल्या ख्रिस्ताच्या तसबिरीवर चक्क थुंकून करतो! हे बघून मी अवाक झालो. अमेरिका हा ख्रिश्चन-बहुल देश. तिथे यावर काहीच
कशी प्रतिक्रिया उमटली नाही? मुळात असा प्रसंग लिहायचे धाडस या मालिकेच्या लेखकाला झाले कसे? आपल्याकडे काय काय रामायण झाले असते! पण गुगल-शोधाने घोर निराशा केली.
तिथल्या प्रमुख वृत्तपत्रांत काही मोठी बातमी आल्याचे दिसले नाही. जी काही दोन-तीन आर्टिकले सापडली ती खाजगी ब्लॉगवरची. एकूण भावना नामक गोष्ट दुखावून घेणे आणि त्यावर उतारा म्हणून `राडा’ करणे’ हे तिकडच्या लोकांना माहित नसावे.
आता पंजाबमध्ये येऊ घातलेल्या कायद्याविषयी. इंडियन पीनल कोडमधील कलम २९५-अ  नुसार `हेतुपुरस्सर आणि खोडसाळपणे’ धार्मिक भावना दुखावणे हा गुन्हा आहेच. परंतु अमरिंदर सिंग यांच्या सरकारने त्यात आणखी एक तरतूद जोडण्याची घोषणा केली आहे. या प्रस्तावित
कलम २९५-अअ नुसार गुरु ग्रंथसाहेब, भगवद गीता, बायबल आणि  कुराण या धर्मग्रंथाच्या प्रतींना जाणूनबुजून नुकसान पोचवणे, `दुखापत’ करणे किंवा त्यांची विटंबना करणे हे दखलपात्र गुन्हे समजले जातील व त्यासाठी न्यायालय जन्मठेपेची शिक्षा ठोठावू शकेल.
हे बातमी आहे ऑगस्ट २१ची. त्यानंतर प्रश्नांचे आणि वादाचे मोहोळ फुटायला हवे होते. सर्वप्रथम
नव्या कायद्यातले विनोद पाहू. मूळ इंग्रजी मसुदा असा आहे: “Whoever causes damage, injury or sacrilege to Shri Guru Granth Sahib, Shrimad Bhagwad Geeta, Holy Quran or Holy Bible with the intention to hurt the religious feelings of the people shall be punished with life imprisonment.” (संदर्भ: तुफेल अहमद यांचा फर्स्टपोस्ट या वेब साईटवरील लेख.) आता `डॅमेज’ समजू शकतो, पण धर्मग्रंथाला `इंज्युरी’ करणे म्हणजे काय? आणि सॅक्रीलेज करणे म्हणजे काय? सॅक्रीलेज चा मराठी अर्थ `अपवित्र’ करणे असाही होतो. मग कशा-कशामुळे हे थोर ग्रंथ विटाळतील बुवा? आमटीचा डाग पडल्याने? पाण्यात भिजल्याने? पवित्र कुराणाला कपाटात सलमान रश्दी किंवा तस्लिमा नसरीन यांच्या पाखंडी पुस्तकांच्या सहवासात ठेवल्यामुळे?
बरे, हि विटंबना किंवा `दुखापत’ हेतुपुरस्सर करण्यात आली हे ठरवण्याची काही शास्त्रशुद्ध पद्धत आहे काय? का आरोपी मनुष्य दुसऱ्या धर्माचा असल्यास किंवा नास्तिक असल्यास त्याने अथवा तिने जाणूनबूजूनच असे कृत्य केले असे गृहीत धरण्यात येईल? हा कायदा अजून संमत व्हायचा आहे. पण त्याला पंजाब विधानसभेत विरोध होईल असे वाटत नाही. असा कायदा आणावा ही मूळ कल्पना अकाली दलाची. त्यांच्या सरकारने तो संमत करवून केंद्राकडे पाठवलासुद्धा, पण त्यात फक्त गुरु ग्रंथसाहेबविषयीच तरतूद होती. न्यायप्रिय व धर्मनिरपेक्ष केंद्र सरकारने अशी हरकत काढली कि फक्त गुरु ग्रंथसाहेबच का? इतर धर्मांचे ग्रंथ का नकोत? त्यामुळे कायदा अमलात आला नाही. आता अमरिंदर सिंग यांच्या काँग्रेस सरकारने ही त्रुटी दूर करून आपली जाज्वल्य धर्मनिरपेक्षता सिद्ध केली आहे.
या प्रकरणी काही मुद्द्यांचा उहापोह राष्ट्रीय स्तरावर व्हायला पाहिजे. (राष्ट्रीय स्तरावर याकरता कि पंजाबात असा कायदा संमत झाल्यावर  त्याचे अनुकरण बाकीचेही राज्ये करण्याची दाट शक्यता आहे.)  एक म्हणजे या  कायद्याचा दुरुपयोग अगदी सहज करता येईल. एखाद्या अल्पसंख्याक समाजाच्या माणसाला गुन्ह्यात गोवण्यासाठी दुसऱ्या धर्माचा ग्रंथ फाडून अथवा इतर मार्गाने  ग्रंथास `इंज्युरी’ पोचवून अशा माणसाच्या घरासमोर फेकून देणे आणि खोटी तक्रार करणे इतके ते सोपे होऊ शकते. धार्मिक भावना खोडसाळपणे, दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने दुखावणे हा आयपीसी प्रमाणे गुन्हा आहेच. पण त्यात धर्मग्रंथांच्या विटंबनेबद्दल खास तरतूद करून त्याला थेट जन्मठेपेची शिक्षा देणे याची गरज काय होती?  यात अकाली दलाच्या जातीय राजकारणाला शह देण्यासाठी  आपण अधिक धर्मनिष्ठ आहोत हे ठसवणे याखेरीज मुख्यमंत्री सिंग यांचा इतर  काही हेतू असणे शक्य नाही.
पुढचा मुद्दा: धर्मग्रंथ ही अशी काही विटंबना होऊ शकेल अशी बाब असते काय? हा प्रश्न श्रद्धाळू लोकांना आग्रहाने  विचारला पाहिजे. हे चारही ग्रंथ शतकानुशतके टिकले आहेत. ते निव्वळ फाडल्याने किंवा जाळल्याने त्यांचा अवमान होतो काय? तुकारामाची  गाथा पाण्यात बुडवली  तरी ती तरंगून राहिली हि सुंदर मिथ-कथा देशभरच्या श्रद्धाळू लोकांना ऐकवण्याची गरज आहे.
तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा: धार्मिक भावनांचा बाऊ करून व्यक्तीस्वातंत्र्य पायदळी तुडवणे आणि अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करण्यासाठी `भावना दुखावल्या’ ही सबब म्हणून वापरणे हा देशातला या घडीचा सर्वात गंभीर प्रश्न आहे. गाय या निरुपद्रवी प्राण्याचे रक्षण करायला पुढे सरसावलेल्या टोळ्यांनी कितीतरी बळी, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून, घेतले आहेत. तेव्हा भावना दुखावणे हि गोष्ट अपराध मानावी काय यावर परखडपणे वाद घालायचे सोडून काँग्रेस या तर्हेचा प्रतिगामी कायदा का आणू पाहते आहे? भाजपकडून धर्माबाबत विवेकनिष्ठा या गोष्टीची अपेक्षा करणे काही शक्य नाही. पण काँग्रेसला हि वाट चोखाळण्याचे कारण काय? आणि इतर भाजपविरोधी राजकारणी आणि पत्रकार/लेखक गप्प का?
 पंजाब सरकारच्या प्रस्तावित कायद्याविषयी लंडन भेटीदरम्यान कोणी पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर राहुल गांधींनी मोघम उत्तर देऊन सुटका करून घेतली. व्यक्तिस्वातंत्र्य  आणि विचारस्वातंत्र्य या मानवतावादी लोकशाहीसाठी अत्यावश्यक अशा  मूल्यांसाठी लढणे म्हणजे खऱ्या अर्थाने मोदी-आदित्यनाथ यांच्या भाजपचा सामना करणे हे त्यांना एक तर कळलेले नाही, किंवा त्यासाठी मैदानात उतरण्याची त्यांची तयारी नाही. बहुधा राजकारण्यांकडून हि अपेक्षा करणे भोळसटपणाचेहि आहे. पण अपेक्षा करणे आपण थांबवता काम नये. कमीत-कमी या कायद्याच्या अयोग्यतेविषयी रान उठवणे हे तरी केले पाहिजे.
अटल बिहारी वाजपेयी एकदा संसदेत म्हणाले होते कि सेक्युलॅरिझमचा अर्थ धर्मनिरपेक्षता  असा न घेता सर्वधर्मसमभाव असा घेतला पाहिजे. पण हे सोळाव्या शतकातील अकबराचे कथित सहिष्णू धोरण झाले. आम्हाला या शतकात सर्व धर्मांची चिरफाड आणि त्यांच्या ग्रंथांना `इंज्युरी’ करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. अन्यथा देशाचा प्रवास सोळाव्या शतकाकडे सुरु होईल.

लेखक राईटअँगल्सचे वाचक, हितचिंतक आहेत

1 Comment

Write A Comment